मराठी साहित्य – विविधा ☆ “घड्याळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “घड्याळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

जेवतांना सहज घडाळ्याकडे लक्ष गेल. आज पर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहील हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिल आणि घडाळ्यातील तीन काट्यात आणि परिवारात काहितरी साम्य जाणवल.

घडाळ्यात तासकाटा,मिनीटकाटा, आणि सेकंदकाटा असतो. तसच परिवारातील तासकाटा म्हणजे वडील,मिनीटकाटा म्हणजे आई,व सेकंदकाटा म्हणजे मुलं असल्याचं जाणवल.

या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती असली तरी प्रत्येकाची गती वेगळी पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तूळ पुर्ण झाल्याशिवाय तास पुर्णत्वास येऊ शकत नाही.

परिवारातील वडील म्हणजे तासकाटा,याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व ऊद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पुर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडीलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. आणि ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

आई म्हणजे मिनीटकाटा असते. प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत) तीची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनीटकाटा जस फिरताना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्यावेळाने थोडाकाळ तो तास काट्या बरोबर थांबतो,व परत तास काट्याला मागे टाकून त्यांची ओढ सेकंद काट्याकडे असते, अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने घालवते,व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंदकाट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंदकाटा म्हणजे आपली मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आई-वडिलांच्या मागे पुढे कायम ऊत्साहाने तुरूतुरू पळतांना,खेळताना,बागडताना दिसतात. ती सतत तासकाटा आणि मिनीटकाटा (वडील आणि आई) यांच्या मध्येच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशीवाय पुर्णत्व येत नाही,तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील,आई, आणि मुल यांची गती एकाच दिशेला असल्याशीवाय घराला पुर्णत्व येत नाही.

पण लक्षात ठेवा,सेकंद, मिनिटे,तास यामुळे दिवस, आठवडे, महिने,वर्ष हे पुर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे. एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते. तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीवनसंग्राम… – भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जीवनसंग्राम… – भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी

भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि ती जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली.काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता.”आज तरी चांगली कमाई व्हायला पाहीजे”अशी मनाशीच बडबडत ती “भाजी घ्या होsss मेथी,पालक,भोपळा भेंडी,मिरची,कोथिंबीर “असं ओरडत गल्ल्यागल्ल्यातून फिरु लागली.फिरतांना मात्र तिचं मन थाऱ्यावर नव्हतं.मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती.घटनाच तशा घडल्या होत्या.नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती.दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने त्या ओल्या बाळंतिणीला तिच्या निष्पाप पोरीसकट घरी आणून टाकलं होतं.जावयाची तिनं खुप मनधरणी केली.त्याच्या पाया पडली.जावई थोडा नरमला.बायकोमुलीला घरी घेऊन जायला तयार झाला.पण सासू महाहलकट होती.ती जावयावरच भडकली “नातू झाल्याशिवाय इस्टेटीतला एक रुपया पण देणार नाही” अशी धमकी दिल्यावर जावई घाबरला.शेवटी कमलाच्या मुलीला आणि दोन्ही नातींना तिथंच सोडून निघून गेला.आता मुलासाठी तो दुसरं लग्न करणार होता.एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होता हे कमलाला कळत नव्हतं.वंशाला दिवा पाहिजे म्हणे!वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्याने काय दिवे लावले होते हे काय तिला माहित नव्हतं?कमलाच्या पोटी दोन मुलांना जन्माला घातलं हाच काय त्याचा पराक्रम.त्यानं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा,कमलाचा चोविस वर्षांचा मुलगा काहीच कामधाम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या मागेमागे फिरायचा.रात्री अकराबारा वाजेपर्यंत त्याचा पत्ता नसायचा.कोबडी खायला मिळते आणि दारु प्यायला मिळते म्हणून त्यानं आपलं आयुष्य असं  बरबाद करावं हे काही तिला पटत नव्हतं.पुढाऱ्याने त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.पण तो अशी स्वप्नं सगळ्याच तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरुन घेत होता हे कमलाला कळत होतं.तिनं ते पोराला अनेकवेळा समजावूनही सांगितलं होतं.पण पोरगा ऐकत नव्हता.नवरा वारल्यानंतर तीनंच मुलांना मोठं केलं होतं.तसाही नवऱ्याचा तिला काहीच उपयोग नव्हता.रोज दिवसा पत्ते खेळत बसायचं,रात्री दारु पिऊन तमाशे करायचे आणि कमलाने विरोध केला की तिला मारहाण करायची हेच त्याचं रोजचं काम.त्याची अशी थेरं पाहून लग्नानंतर दोनच वर्षांत कमलाने भाजीची टोपली हाती धरली होती.नवऱ्याने तिला पोसायच्या ऐवजी तिनंच नवऱ्याला पोसलं होतं.शेवटी तिच्या कुंकवाचा धनी होता ना तो!नवरा लिव्हर सडून मेला तेव्हा ती लोकलाजेस्तव रडली खरी पण खरं तर तिला खुप हायसं वाटलं होतं.आता मुलगा मोठा झाला की तो काहीतरी कामधाम करुन घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हातान्हात, थंडीपावसात दारोदारी फिरुन भाजी विकणं बंद होईल अशी तिला आशा वाटत होती.ती मुलाने फोल ठरवली होती.शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो की काय अशी कमलाला भिती वाटायला लागली होती.

 विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली तिचं तिलाच कळलं नाही.उन्हाचे चटके बसायला लागले तशी ती भानावर आली.आज अजूनही बोहनी झाली नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती धास्तावली.अजून बंगलेवाल्यांची काँलनी बाकी आहे हे पाहून ती त्या काँलनीत शिरली.

खरं तर तिला या काँलनीत यायला आवडायचं नाही.करोडोंच्या बंगल्यात रहाणारे,लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षाला हजारोंची दारु पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी पाचदहा रुपयांसाठी घासाघीस करायचे,वाद घालायचे.बाईच बाईचं दुःख समजू शकते असं ती नेहमी ऐकायची पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं.उन्हाळ्यात साधं पाणीसुध्दा पाजायला त्या नखरे करायच्या.

उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्याने कुठेतरी बसून पाणी प्यावं असं तिला वाटू लागलं.एका बंगल्याच्या सावलीत ती बसली.टोपलीतून गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून ती पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली.गाडीतून एक तरुण बाई उतरली.कमलाबाईला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“काय आहे?कशासाठी रस्त्यात बसलीये?” ती जोरात कमलावर खेकसली

“ताई काही भाजी हवी अशीन तर घ्या.भोपळा आहे,भेंडी आहे,मेथी,मिरची……”

“काही नको.तू जा इथून “ती चिडून बोलली तशी

कमला उठून जायला निघणार तेवढ्यात ” अग अशी काय करतेस?” असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला”परवा आपल्याकडे कार्यक्रम आहेच. त्याला लागेल ना भाजी!मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी?”

तो सगळी भाजी घेतोय यावर  कमलाचा विश्वास बसेना तरी तिनं हिशोब लावला.तो भावात घासाघीस करेल या विचाराने तिनं भाजीचे शंभर रुपये वाढवून पाचशे रुपये सांगितले.पण त्याने काही न बोलता लगेच पाकिट काढून तिला पाचशे रुपये दिले.गडी माणसाला बोलावून टोपली रिकामी करुन दिली.

“अरे आपण मार्केटमधून आणली असती भाजी.स्वस्त मिळाली असती.दारावर येणाऱ्या या बायका खुप महाग देतात “

त्याच्या बायकोची कटकट अजून सुरुच होती.

“जाऊ दे गं.मावशींकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि वीस पंचवीस रुपयांकडे काय बघायचं?बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीचची पायपीट करावी लागते.वीसपंचवीस रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं ?”तो तिला आत नेत म्हणाला.

कमला खुश झाली.बायांपेक्षा हे बापे जास्त दिलदार असतात याचा पुन्हा एकदा तिला प्रत्यय आला.बोहनी झाली होती तीही दणदणीत पाचशे रुपयाची!आणि तीही एका फटक्यात!आनंदाने ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली.स्वयंपाक करुन मुलीला,नातीला जेवू घातलं.मग नातींशी खेळताखेळता झोपून गेली.

उन्हात फिरल्याने संध्याकाळी तिला सणकून ताप चढला.ती नाही नाही म्हणत असतांनाही मुलीने तिला डाँक्टरकडे नेलं.सकाळी झालेली सगळी कमाई डाँक्टरची फी आणि औषधात साफ झाली.आता उद्या भाजी विकता येईल की नाही या चिंतेने आणि मुलांच्या काळजीने तीला रात्रभर झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशीच काय तीन दिवस तिला तापामुळे भाजी विकायला घराबाहेर पडता आलं नाही. तीन दिवसांनी तिचा ताप उतरला.तिन्ही दिवस ती घरीच होती.डाँक्टरचं बिल थकलं होतं.प्रचंड अशक्तपणा आला होता.उन्हातान्हात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहीलं नव्हतं.एकीकडे मुलगा काही कमवत तर नव्हताच पण तिच्याकडेच सतत पैशांची मागणी करुन तिला त्रास देत होता आणि दुसरीकडे लेकुरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती.सगळीकडे अंधार पसरला होता.आशेचे किरण कुठंच दिसत नव्हते.कमलाला आता खचल्यासारखं वाटू लागलं.या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पेलवेनासं झालं.कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागलं.पण कोण येणार याचं उत्तरही तिच्याकडे नव्हतं.दुसऱ्याच्या दुःखांनी खुश होणाऱ्या नातेवाईकांकडून तर ति ला काडीचीही अपेक्षा नव्हती.त्यापेक्षा छताला लटकून मरुन जावं म्हणजे या सगळ्या कटकटींतून मुक्तता तरी होईल अशीही भावना तिच्या मनात डोकावू लागली.

नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या. किर्तनकार सांगत होते

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– ‘‘पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा’’— लेखक – श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा’’— लेखक – श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा…

(पु. ल. स्मृती)

गेले काही दिवस पुलंविषयी  बरंच काही छापून आलं, बोललं गेलं, दूरदर्शनवरही दाखवलं गेलं. आज मी आपणास ‘पुलं आणि माझे वैयक्तिक संबंध याविषयी चार शब्द सांगणार आहे.

प्रत्यक्ष मुद्यावर येण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करणे आवश्यक आहे.

पुलंचे आजोबा, श्री. वामन मंगेश दुभाषी यांच्या कुटुंबियांची कारवारला एक चाळ होती. त्यात आम्ही लहानपणापासून भाडेकरू म्हणून रहात होतो. १९४० साली मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मी व माझी थोरली बहीण मुक्ता, दोघे प्रथम मुंबईला आलो. त्यावेळी कारवारला मॅट्रिकचे सेंटर नव्हते. आल्या आल्या, वडिलांच्या सांगण्यावरून वामनरावांना भेटण्यासाठी आम्ही दोघे पार्ल्याला त्यांच्या राहत्या घरी गेलो असताना त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ची त्यांनी, मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाची एक प्रत आम्हाला बहाल केली. वामनराव खरोखर विद्वान असून, संस्कृत पंडित होते. तसेच उत्तम चित्रकारही होते. त्यांनी घरातल्या भिंतींवर रामायण, महाभारतातील काही प्रसंग उत्तम तर्‍हेने चितारले होते. त्यावेळी मी अवघा १७ वर्षाचा होतो व पुलं माझ्याहून फक्त दोन वर्षानी मोठे. तरीही तोवेळपर्यंत माझा व पुलंचा परिचय मुळीच नव्हता.

पुढे १९४२ मध्ये मी वांद्र्याला राहायला गेलो. तिथे राष्ट्रसेवादलाशी संबंध आला आणि मी सेवादल सैनिक म्हणून सेवादलात दाखल झालो. इथंच प्रथम पुलंची ओळख झाली व हळूहळू स्नेहात रूपांतर झालं.

१९४२ च्या चळवळीत सेवादलातर्फे, जनजागृतीसाठी म्हणून त्यावेळी पुलंनी ‘पुढारी पाहिजे’ नावाचा वग लिहिला. सुदैवाने त्यात काम करण्याची संधी मला मिळाली. तमाशाच्या तालमी पुलंच्या राहत्या घरी पार्ल्याला होत असत. ते राष्ट्रप्रेमाने भारावलेले दिवस होते. रात्रौ १२-१२ वाजेपर्यंत तालमी चालत. पुलंच्या दिग्दर्शनाखाली आमची चांगलीच तयारी झाली व लवकरच आम्ही सेवादलातर्फे महाराष्ट्राचा दौरा यशस्वी केला. त्यातील एका शेतक-याचा रोल माझ्या वाट्याला आला होता. माझ्या नावावरून ‘पुलं’नी त्यात एक गाणे रचले होते. त्याची सुरुवात अशी होती,

“शंकरभटा, लवकर उठा,

जागा झाला शेतकरी,”

वगैरे… हा तमाशा साऱ्या महाराष्ट्रात अत्यंत गाजला.

त्याच सुमारास, नामवंत समाजवादी पुढारी ना. ग. गोरे, S.M. ऊर्फ अण्णा जोशी, भाऊसाहेब रानडे यांच्यासारख्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांचा पुलंना आशीर्वाद लाभला व त्यातूनच अशा थोर मंडळींची ओळख होण्याचे सद्भाग्य आम्हालाही लाभले.

पुढे १९४९ च्या जून महिन्यामध्ये मी माहीमला ‘सारस्वत कॉलनीत’ राहायला आलो. योगायोगानं पुलंची थोरली बहीण वत्सला पंडित सारस्वत कॉलनीत राहायला आल्या. मी ४ थ्या मजल्यावर व पंडित कुटुंब ५व्या मजल्यावर. पुलंचं अधूनमधून बहिणीकडे येणंजाणं असायचं व अशावेळी आम्ही पुलंना आमच्याकडेही बोलवत असू. माझी धाकटी मुलगी पद्मजा त्यावेळी ४-५ वर्षाची होती. तिचा आवाज चांगला असल्यामुळे वत्सलाताई तिच्याकडून गाणी म्हणून घेत असत व तिचे कौतुक करीत. जा पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई मुलीकडे आल्या म्हणजे आमच्याकडे आल्याशिवाय राहत नसत. त्याही पद्मजाकडून गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. तसंच माझी थोरली मुलगी उषा हिला मी वक्तृत्व स्पर्धेसाठी लिहून दिलेले, “आम्ही विद्यार्थी म्हणजे समाजाचे आरसे” वगैरेंसारखे विविध विषयावरचे लेख, पुलंच्या आई, “मी भाईला हे वाचून दाखवते”, असे म्हणून कौतुकाने घरी घेऊन जात. आणि दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक घेऊन येणाऱ्या उषाला बक्षिसानिमित्त भरपूर पुस्तके देऊन कोडकौतुक करीत. दुसऱ्याचे मनापासून कौतुक करण्याचा हा वारसा पुलंना आईकडूनच मिळाला असावा.

पुढे १९७४ मध्ये मी माहीमच्याच ‘अव्हॉन अपार्टमेंट्स मध्ये राहायला आलो. इथे आल्यावर माझ्या नव्या घरी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनीही आमंत्रण आनंदाने स्वीकारलं. त्यावेळी ते एन.सी.पी.ए.’चे डायरेक्टर इनचार्ज होते. त्यांचे जवळचे नातेवाईक अत्यंत सिरीयस असल्याने अर्ध्या तासाहून अधिक वेळ ते आम्हाला देऊ शकणार नाहीत या पूर्वअटीवर ते आले. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बजावलं की, “अर्धा तास झाल्याबरोबर बोलवायला यावं. अर्धा तास होताच ड्रायव्हर आला. पण पुलं पूर्णपणे रमले होते. त्यांनी त्याला अजून एका तासाने यायला सांगितलं, पद्मजाकडून २ गाणी म्हणून घेतली. पंडित अभिषेकींचं, ‘शब्दावाचून कळले सारे’ आणि आणखी एक गीत तिने गायलं. ही ऐकून पुलं खूप खूष झाले. ते म्हणाले, “ही मुलगी पुढे मोठ्ठी गायिका होईल.” पंचवीस वर्षापूर्वीचे भाईंचे हे भाकीत किती खरे झाले हे पाहून पुलं हे एक उत्तम द्रष्टे होते असे म्हणता येईल. तिचं गाणं ऐकून त्यांनी लगेच फर्माईश केली, “पेटी काढा’. पेटीवर मस्तपैकी बालगंधर्वांची दोन नाट्यगीते व दोन राग वाजवून त्यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बोटातील जादू अवर्णनीय अशी होती.

हॉस्पिटलमधून निरोप आल्याने आता मात्र जाणे भाग होते. तब्बल दीड तास कसा निघून गेला कळलंच नाही. पुढे त्यांनी रागदारी संगीत पेश करण्यासाठी NCPA वर पद्मजाला संधी दिली. प्रयोग छानच रंगला.

कालांतराने पुलं पुण्याला स्थाईक झाले आणि माझा फारसा संपर्क राहिला नाही. तरीदेखील पद्मजा ज्या ज्या वेळी पुण्याला जात असे तेव्हा पुलंना भेटल्याशिवाय रहात नसे. तेव्हाही ते आणि सुनीताबाई तिच्याकडून दोन-चार गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. माझ्या कुटुंबाचीही चौकशी करीत. त्यांना मातृभाषेचा फार अभिमान होता. त्यांच्या मातोश्रींप्रमाणे ते सुद्धा आम्हां सर्वांशी कारवारी कोकणीत बोलत.

असा हा- विनोद सम्राट, हास्य रसाचे गिरसप्पा, कवी, लेखक, गायक, नट, चित्रपट निर्माता, दानशूर, बहुरुपी आनंदयात्री आम्हाला कायमचा सोडून गेला आहे. मागे उरली आहे अपेक्षा- समस्त मराठी आठ कोटी बांधवांची त्यांच्याच कवितेच्या ओळी उद्धृत करून मी म्हणतो –

“पाखरा, जा त्यजुनिया, प्रेमळ शीतल छाया,

भेटूनि ये गगनाला,

बघुनि ये देव लोक सारा

विश्व अपार, हृदयी संचित घेऊनि

परतूनी ये घरा

परतूनी ये घरा…”

हे पुरुषोत्तमा, पुन्हा जन्म घेऊन येशील ना?…

लेखक : श्री. शंकर फेणाणी 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पायविहीर, दर्यापूर —  लेखक – श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

पायविहीर, दर्यापूर —  लेखक – श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गडकिल्ले, वास्तू आहेत. त्या पुरातन वास्तूंशी सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते आहे. त्यापैकी एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर आहे. ही विहीर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.

यादवकालीन आणि बहामणी कालीन असे दोन मतप्रवाह या विहिरीच्या इतिहासाबाबत आहेत. महिमापुर या गावाच्या मधात ही विहीर आहे. या विहिरीचे संपूर्ण बांधकाम मध्य प्रदेशात आढळणाऱ्या तांबूस रंगाच्या दगडांचे आहे. चौकोनी आकाराची ही विहीर ऐंशी फूट खोल आहे. या विहिरीची रुंदी 40 मीटर इतकी आहे. जिल्ह्यात असणाऱ्या विविध पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांपैकी दर्यापूर तालुक्यात महिमापुर या गावातील विहीर ही संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तळघरात जणू किल्ला बांधला असावा असाच थाट या विहिरीचा पाहायला मिळतो. अनेक पर्यटक इतिहास तसेच स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही विहीर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत आली आहे.

विहिरीचे वैशिष्ट्य: — 

तळघरात सात मजल्यांची असणाऱ्या या विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की, काय असा अनुभव येतो. प्रवेशद्वारांवर दगडात कोरलेली दोन फुलंही सर्वांचे लक्ष वेधतात. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे आहेत. या विहिरीच्या आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीच्या तळाशी चारही बाजूंनी मोठ्या समान रचना करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातून तांबूस दगड : —- 

तांबूस रंगाच्या दगडासह काही ठिकाणी या विहिरीच्या बांधकामात काळा दगड देखील वापरण्यात आला आहे. तांबूस दगड हा मध्य प्रदेशातून या ठिकाणी आणण्यात आला. ही संपूर्ण विहीर कातीव दगडात बांधलेली असून नैसर्गिक झऱ्यांसाठी विहिरीला जागोजागी छिद्र सोडण्यात आली आहेत. या विहिरीत अनेक कमानी छोट्या खोल्या सुरक्षित कोणाकडे मागच्या आणि वरच्या बाजूस राहता येईल अशी दालने आहेत. या दालनांमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पातशाहीत सैन्याच्या पडावाचे ठिकाण:— 

मध्ययुगीन कालखंडामध्ये हसन गंगू उर्फ बहामणशहा याने बहामनी राज्याची स्थापना केली होती. हसन गंगूच्या नंतर विस्तारलेल्या बहामणी साम्राज्याची शकले पडली. 1446 ते 1590 या 144 वर्षाच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच शाह्या निर्माण झाल्या. यामध्ये विजापूरची आदिलशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, अचलपूरची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाचही शाह्या एकमेकांशी सतत भांडत असत.

विहीरीचा प्रमुख हेतू:—- 

अचलपूरची निमाजशाही आणि हैदराबादच्या गोवळकोंडाची कुतुबशाही यांच्या मधल्या प्रवासाच्या दोन मार्गांपैकी एक मार्ग हा अमरावती जिल्ह्यातील सावळापूर कोल्हापूर महिमापूर येथून हैदराबादकडे जायचा. दुसरा मार्ग अचलपूर ह्या राजधानी तून पाथर्डी माहूर चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील बैतूल पर्यंत जायचा. या मार्गाने सुलतान आणि त्याचे सैन्य जात असताना सैन्याचा पडाव असणाऱ्या ठिकाणी अनेक विहिरी बांधण्यात आल्या त्यापैकी एक विहीर ही महिमापूरची आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोडे यांनी दिली. सैन्याला सहजपणे पाणी उपलब्ध होणे हा प्रमुख हेतू या विहिरी मागे होता. त्या काळात सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक विहिरीत तैनात असायचे. यामुळेच या विहिरीत झोपण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे आढळते.

विहीर 900 वर्षे जुनी :—- 

खरंतर महिमापुर येथील विहीर नेमकी यादवकालीन की, बहामणी कालीन असे इतिहास अभ्यासकांचे दोन मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. देवगिरीच्या यादवांच्या राजधानीचे ठिकाण हे दौलताबाद होते. त्यांच्या राज्याची सीमा सातपुडा पर्वतरांगेपासून तापी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरली होती. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर असल्याचे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे.

इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर आहे.

विहिरीचे पाणी औषधीयुक्त:—-

या विहिरीचे बांधकाम केल्यामुळे कालांतराने विहिरीच्या परिसरात लोक वस्ती निर्माण झाली. आज जवळपास 100 घर महिमापूर या गावात आहेत. आता उन्हाळ्यात ही विहीर कोरडी पडली असली तरी, सात मजल्यांच्या या विहिरीत पूर्वी पाण्याची पातळी ही दुसऱ्या मजल्यापर्यंत होती. परिसरातील ग्रामस्थ याच विहिरीतून पाणी भरत असत. या विहिरीत बाबर नावाची वनस्पती होती, या वनस्पतीमुळे विहिरीचे पाणी औषधीयुक्त बनले होते. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिल्याने डायरिया, पोटाचे आजार यासारखे कोणतेही विकार होत नव्हते. मात्र कालांतराने या विहिरीतील पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्यामुळे, या विहिरीतील वनस्पती नष्ट झाल्या. या विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. आज देखील ही भव्य विहीर आपली ओळख जपून आहे. यामुळेच या विहिरीला भेट देण्यासाठी वर्षभरात देशभरातून अनेक पर्यटक तसेच इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी भेट देतात.

लेखक : श्री एकनाथ वाघ

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐक परमार्थाचे साधन… ☆ विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐक परमार्थाचें साधन… ☆ विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले 

ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥

(दास.०७.०८.०१)

सरळ अर्थ :-

श्रीसमर्थ म्हणतात की, आता परमार्थाचे साधन सांगतो, ते ऐका. ज्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्रास होते ते साधन म्हणजे श्रवण होय, हे तू जाणून घे.

विवेचन:- 

श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्ये नमः ।। श्री गुरुवे नमः ।।

जन्माला आलेला जीव सर्वप्रथम श्रवण करायला शिकतो, म्हणून भक्तीच्या नऊ प्रकारांमध्ये श्रवण भक्तीस पहिले स्थान प्राप्त झाले असावे. मूल जन्माला आले की त्याच्या कानाशी टिचकी वाजवून त्याला ऐकायला येते कीं नाही याची खात्री पूर्वीच्या काळी सुईणी करीत असत. मनुष्य सर्वप्रथम ऐकायला शिकतो, अर्थात मनुष्य श्रवण प्रथम करतो आणि कालांतराने बोलू लागतो. काही मुलांची जीभ जड असते. काही मुलं मुकी असतात. पण शास्त्र असे सांगते की ज्याला ऐकायला येते तोच बोलू शकतो. त्यामुळे ज्याला ऐकायला येते, तो लगेच बोलू शकला नाही, तरी नंतर बोलू शकतो.

शब्द श्रवण करायचा असतो. विद्वानाला बहुश्रुत म्हणतात; कारण त्याने खूप श्रवण केलेले असते. ग्रंथांचे वाचन हे एक प्रकारचे श्रवणच असते. अर्थात शब्द वाचणे आणि कोणाच्या तोंडून ऐकणे यात फरक राहणारच. ज्याला परमार्थ साधन करावयाचे आहे, त्याने एखादा सर्वमान्य संत-ग्रंथ घ्यावा आणि तो मनापासून, सावकाश, अनेक वेळा वाचावा. अशा प्रकारे ग्रंथांचे वाचन-मनन केल्यास श्रवणभक्ती घडते. श्रवणाने अनेक संशय फिटतात, भाव स्थिरावले जातात आणि भगवंतांचे प्रेम मिळते.

ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील पहिली ओवी

“तरी अवधान एकले दीजें । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।  (ज्ञा. 9.1)

श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *’अहो श्रोते हो, तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका.

“ज्ञाना’चे ईश्वर म्हणता येईल अशी आपली ज्ञानेश्वर माऊली कळकळीने आपल्याला सांगत आहेत की श्रोते जनहो अवधान देऊन ऐका. अवधान द्या म्हणजे लक्ष देऊन ऐका. एकदा चित्रपट पाहिला की अनेकांची चित्रपटातील गाणी पाठ झालेली आपण पाहिली असतील. परंतु अभ्यासाची कविता असो किंवा मनाचे श्लोक असो. ते पटकन पाठ होत नाहीत किंवा प्रवचन कीर्तन ऐकताना अनेकांवर निद्रादेवी प्रसन्न होत असते. मनुष्य मनापासून, त्यात रस घेऊन, एकाग्रतेने ऐकत नाही, अर्थात अवधान देऊन ऐकत नाही हेच खरे!!

*मनुष्य लक्षपूर्वक ऐकायला शिकला तर त्याच्या जीवनातील ५०% समस्या कमी होतील असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या श्रवण भक्तीच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपण आजपासून ‘ऐकायला’ आणि ‘ऐकून घ्यायला’ सुरुवात करू.

जो मनुष्य पूर्ण एकाग्र होऊन संतांच्या ग्रंथाचे श्रवण करतो, त्याच्या मनाचा तळ आणि मनाच्या तळाशी असलेला मळ दोन्हीही अगदी स्वच्छ होऊ शकते. उत्तम श्रोता असलेला मनुष्य कोणताही विषय सहज समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याची  लौकिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

श्रवण करणे याचा आणखी एक अर्थ आहे कृती करणे. उदा. एखाद्या मनुष्याला दुसऱ्याने पाणी आणून दे असे सांगितले. त्याने ते नीट ऐकले. दोनचार मिनिटे अशीच गेली. दुसऱ्याने त्याला पुन्हा आठवण केली. तरी तो ढीम हलला नाही. शेवटी थोड्या त्राग्याने दुसऱ्याने पुन्हा विचारले की मी बोललो ते ऐकलस ना. तर तो हो म्हणाला. मग पाणी का देत नाहीस ? तेव्हा तो म्हणाला की तेवढंच करायचं राहिलं. लौकिक जीवनांत अथवा पारलौकिक जीवनात अनेक लोकं बरेंच काही ऐकतात, कधीकधी तर अगदी तल्लीन होऊन ऐकतात. परंतु त्यांच्या हातून योग्य ती कृती घडत नाही. अशा प्रकारचे लोकं लौकिक अथवा पारलौकिक जीवनात यशस्वी होणे अवघड आहे. म्हणून ज्याला साधक व्हायचे आहे, त्याने आधी ऐकायला शिकावे. काय ऐकायचे ?  कसे ऐकायचे ? कोणाचं ऐकायचे याचा विचार आपण पुढील लेखांत करू. जाता जाता एक वाक्यावर आपण चिंतन करू. ‘समोरचा मनुष्य जे बोलतो ते ऐकायलाच हवे परंतु तो जे बोलू शकत नाही ते सुद्धा ऐकता यायला हवे.’

जय जय रघुवीर समर्थ!!

विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गृहलक्ष्मी… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ गृहलक्ष्मी… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

तुम्ही कधी एकटे असताना

शांतपणे बसून विचार केला आहे का?

…… तिनं तुमच्यासाठी काय केले आहे याचा ?

 

ती तासंतास स्वयंपाक घरात

काही बाही बनवत असते…

आणि तुम्ही काही सेकंदात ते फस्त करता …

 

कधीतरी ती उन्हात काहीतरी वाळवते…

तर कधी पाण्यात काही तरी भिजवते …

कधी चटपटीत मसालेदार..

कधी कधी गुळापेक्षाही गोड…

तर कधी तिखटआंबटगोड चवींचं…

 

मेथीच्या पराठ्यात, गाजराच्या हलव्यात,

भोपळ्याच्या भरीतात, जवसाच्या चटणीत,

बारीक चिरलेल्या कोथिंबीरीत तर कधी

वेलदोड्याच्या टरफलात …

 

आपण फक्त सजलेली डीश पाहतो…

आणि ताव मारतो…. पण आपल्याला दिसत नाही…

 

 

स्वयंपाकघरातली उष्णता,

 

हातावर गरम तेलाचा शिडकावा,

 

अंगावर आलेली गरम वाफ,

 

कापलेल्या खुणा,

 

पायांना येणारी सूज,

 

पांढरे होणारे केस..

 

आणि थकत चाललेली तिची गात्रं ….

 

ती जाणवू देत नाही….

 

त्या छोट्याश्या स्वयंपाकघरात कधीतरी नीट बघा… तुम्हाला तीच दिसेल…..

ओट्याचा आधार घेऊन उभी असेल!

 

वर्षानुवर्षे काय बदललेलं आहे…

काही दात सरकले असतील…

काही केस गळून पडले असतील…

तुमच्या घराचं घरामध्ये रूपांतर करताना

काही सुरकुत्याही आल्या असतील…..

 

तिचा नाकावर येणारा चश्मा ,

हातात वळणारा लाडू,

गोल गरगरीत पोळी लाटताना

व्यस्त असणारी तिची नजर …

आजही ती तेच करतेय…

गेली अनेक वर्षे ती तेच ते करतेय,

आणि तुम्हाला बघताच मग विचारेल…..

“काय हवंय ?”…

 

हे सर्व कुठून आणते माहीत नाही…

किती आणते कुणास ठाऊक…

कशात किती काय काय घालते….

पुरवून उरवते मात्र!

कधीतरी विचार करा …

आजवर तिनं जे काही केलं असेल…

ते तुम्ही नक्कीच करू शकणार नाही…

 

तिच्या मनातल्या काही अव्यक्त भावना आणि दडपलेल्या इच्छा कधी पाहिल्याचं आठवतंय,

ज्या आपल्याला दिसत नाहीत..

 

कारण न दिसणाऱ्या गोष्टी पाहणे

आपल्या साठी महत्त्वाचे नसते कधी…

रादर…. तसा चश्मा आपल्याकडे नसतो,

 

कधी तिच्या अनुपस्थितीत…

जेव्हा  दोन बिस्किटं अन् तिनंच केलेला चहा

हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर येऊन

कोचावर स्वतःला झोकून देतो ,

 

तेव्हा मग तिचेच शब्द,

विचार करायला भाग पाडतात…

‘काय हवंय?’

कारण एवढ्या वर्षांत तिनं

फक्त अन्न शिजवलेलं नसतं …

तर  घरपण तयार केलेलं असतं …

स्वतःला झिजवून…

 

बनवायला तास लागतात हो …..

 

संपूर्ण घर उभं केलंय तिनं…

रात्रंदिवस मेहनत करून.

 

तुम्ही एकदा यादी बनवता का?

तिनं काय केले आहे याची ?

 

यादी बनवता येणार नाही

प्रयत्न केला तरी ..

पण चश्मा नक्कीच बदलू शकतो आपण!

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त निबंध)

(मला माणसाला विचारावसं वाटतं, “तुमची जीवनदायी मी  माझे उपकार फेडणार, कृतज्ञ होणार, की माझ्या अस्तित्वाशीच खेळणार रे ? माझ्या अस्तित्वाची भवितव्याची मला घोर काळजी लागलीय.)

नदीची अशी व्यथा ऐकत असताना मन बेचैन झालं तिच्याविषयी सहानुभूती आणि काळजी वाटायला लागली पुढील पिढ्यांना काय सांगायचं असं वाटायला लागलं तिच्या व्यथा निराकरण आणि उपचार गांभीर्याने करायला हवेत

त्यांना आरोग्यदायी करायला हवं तरच जीवसृष्टीचे आरोग्य चांगले राहणार आहे एका व्यक्तीपासून म्हणजे स्वतःपासून पुढे कुटुंबापासून सुरुवात करायला हवी . उत्सव सणवार याचे निर्माल्य,

तसेच मृत्यू पावलेल्यांच्या अस्थी, रक्षा या गोष्टी नदीत विसर्जन करतात .ते टाळण्यासाठी समुपदेशन करणे अत्यंत

गरजेचे आहे. नदीमध्ये जनावरे धुणे, कपडे धुणे कसे अपायकारक आहे, हे समजवायला हवे .गणपती उत्सवाच्या वेळी मूर्तींना दिले जाणारे रंग विषारी असतात. प्लास्टरच्या मूर्ती विरघळत नाहीत. जलचरांना या गोष्टींचा धक्का पोहोचतो. पूर्वी कुंभाराच्या मातीचे ‘ गणोबा ‘ केले जायचे. ( लहान मूर्ती ) त्याचीच पूजा केली जायची. त्याला रंग नसायचा .जल प्रदूषणाचा प्रश्न नव्हता .पंचगंगा नदी तर जलपर्णीने झाकून गेल्याने तिचा प्रवाहच दिसत नाही ,अशी अवस्था आहे .कोयना प्रकल्पामध्ये काम केलेल्या श्री वी. रा .जोगळेकर यांनी जलपर्णी पासून उत्तम कंपोस्ट खत बनवले. असे प्रयोग ,त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. चांगले आचरण आणि शुद्ध विचारांचा सर्वांनी अंगीकार करायला हवा. नद्यांचे संरक्षण करून त्यांना पुनरुज्जीवन  द्यायला हवे. राजस्थानचे एक आदर्श उदाहरण म्हणून अंगीकार करायला काहीच हरकत नाही.

व्यष्टी पासून सुरुवात करून, समष्टी पर्यंत प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा आधार म्हणून नदी शुद्धीकडे पाहायला हवे. नद्यांच्या काठावर बांबूची झाडे लावायला हवीत. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया प्लांट उभे करणे व ते कार्यरत ठेवणे सक्तीचे करायला हवे. अन्यथा कडक शासन आणि मोठे दंड करायला हवेत .याबाबत सांगायचं तर पैशाच्या आमिषाने सगळे कायदेभंग करून कारखाने खुशाल घाण पाणी नदीत सोडतात. तात्पुरती डागडुजी होते. पुन्हा तोच प्रकार चालू राहतो .आणि नदीवर माशांचा खच दिसायला लागतो. कोण कोणाला जबाबदार धरणार!. प्रथम भ्रष्टाचार बंद व्हायला हवा. अलीकडे कृष्णा प्रदूषणाबद्दल, काही सहकारी साखर कारखान्यांना चार कोटी 46 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. (प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून) तसेच सांगली महापालिकेला लागू होणाऱ्या दंडाची रक्कम मोठी असल्याने त्याची गणती करण्यासाठी मुदत मागितली गेली. शहरातील सांड पाण्यावर प्रक्रिया व्हायला हवी .साखर कारखान्यांनी सोडलेल्या पाण्यात 1000 ते 1500 मिलिग्रॅम पर्यंत बी . ओ. डी . सेंद्रिय पदार्थ, मळीपासून अल्कोहोल तयार करणाऱ्या आसवाणी मधून  स्प वॉश नावाचे अत्यंत दाहक लाल सेंद्रिय पदार्थ असलेले क्षार असणारे सांडपाणी बाहेर पडते. त्याचा सर्वात जास्त (बि.ओ.डी. चार हजार ते पाच हजार मि. लि.) प्रदूषणाचा धोका असतो. स्पेसमड या टाकाऊ घनपदार्थाच्या मिश्रणातून कंपोस्ट खत बनविण्याचा प्रकल्प करायला हवा. शहराच्या सांडपाण्यावर म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. उपसा व शुद्धीकरणातही बऱ्याच त्रुटी आहेत. बंधाऱ्यांमुळे प्रवाह नसल्याने हवेतील ऑक्सिजन योग्य प्रमाणात पाण्यात मिसळत नाही . तसेंच रेठरे नाला आणि शेरी नाला यांचे प्रश्न अजून चालूच आहेत. शेतकरी शेतीला भरमसाठ नको इतके पाणी पाजतो. एक तर जमीन खराब होते. आणि खते कीटकनाशके मातीत मुरून ते पाणी नदीत उतरते .रसायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांच्या वापराबद्दल समुपदेशन व्हायला हवे. नवीन उद्योगधंद्यांना परवानगी देताना, त्यावर प्रदूषण मंडळांनी कडक बंधने घालायला हवीत. वाळू तस्करांवर कडक कारवाई करायला हवी.आदर्श उदाहरण म्हणून देता येईल . किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सामाजिक बांधिलकी, उपक्रमाच्या माध्यमातून मोरेवाडी आणि राजेंद्र नगर या कोल्हापूरच्या उपनगर परिसरातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर जलशुद्धीकरणाच्या एक छोटा प्रयोग आणि प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे .हे सांडपाणी शिवाजी विद्यापीठ परिसरातून पुढे जयंती नाल्याला मिसळते .आणि पुढे ते पंचगंगा नदीत जाते .मोरेवाडी आणि राजेंद्रनगर येथून जे पाणी वाहते, त्याच ठिकाणी लुप्त झालेली ‘ ‘गोमती ”  नदी आहे .या प्रवाहाचे पात्र न बदलता , तेच पाणी दोन तीन ठिकाणी वळवून घेऊन, वरच्या भागातला प्रवाह स्वच्छ करून, थोडा रुंड केला .तीन चार ठिकाणी दगडी भिंती, बांध घालून नैसर्गिक रित्या गाळणीची प्रक्रिया केली. तीन-चार ठिकाणी पाणी स्थिर झाल्याने ऑक्सिडेशन ची प्रक्रिया जलद व्हायला लागली. दुर्गंधी कमी झाली .तिथेच एक लाख लिटर पाणी मावेल असा खड्डा खणला ,आणि त्यामध्ये पाणी साठवण होत आहे. असे प्रयोग अनेक ठिकाणी राबवता येतील .रोज प्रक्रियाविना हजारो लिटर पाणी जयंती नाल्यात मिसळत होते. ते स्वच्छ होऊन वापरात आले. मोठमोठी झाडे व पक्षांचा अधिवास वाढला .एक नवी परिसृष्टी  विकसित होताना दिसत आहे .यासारखे प्रयोग त्याचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र व्हायला हवा.

आज 75 नद्यांच्या पुनरुज जीवनासाठी निधी मंजूर झाला आहे .पण त्यावर कृती व्हायला हवी .प्रत्येक गाव ,तालुका, जिल्हा ,राज्य, आणि देश अशा पातळीवर कृती व्हायला हवी. जागतिक स्तरापर्यंत ,” पाणी आणि नद्या” यावर परिषदा घ्यायला हव्यात .नदी – -समाज– शासन यांचा समन्वय साधायला हवा .नद्यांवर लिहिलेल्या पुस्तकांची प्रसिद्धी व्हायला हवी. नदी स्वच्छतेविषयी काढलेली पत्रके घरोघरी वाटप करून लोकांमध्ये जागृती व्हायला हवी. शालेय पातळीवर प्रत्येक इयत्तेत हा विषय शिकवायला हवा. चार भिंतीत शिकवत असताना पंधरा दिवसात किंवा महिन्यात मुलांना नदीवर नेऊन सर्व गोष्टी दाखवायला हव्यात .नद्या पुन्हा अमृतवाहिनी ,शुद्ध ,निर्मळ ,पवित्र व्हाव्यात या दृष्टीने आराखडे केले जात आहेत .” चला जाणूया नदीला” अभियान सुरू आहे. निसर्ग प्रतिष्ठान ,माझी माय कृष्णा   (,महाराष्ट्रात ) ,आभाळमाया, देवराई फाउंडेशन ,नेचर कॉन्सर्वेशन,  यांनी चळवळ सुरू केली आहे .गंगाशुद्धीसाठी जपानने हात पुढे केला आहे. सामाजिक प्रयत्न चालू आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे .

हे काम एकट्या दुखट्याचे नाही, तर व्यक्ती ते समाजापर्यंत प्रत्येकाने , ” सहना ववतु सहनौभुनक्तु अशी जबाबदारी स्वीकारायला हवी. पाणी हे जीवन समजून, नदीला जीवनदायिनी समजून निरामय जीवन जगायचंय. मग सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत ना? झालेली घाण काढून नवीन घाण नदीत जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी. नद्यांच्या जलप्रवाहाचा खळखळणारा मधुर आवाज, संगीत पूर्वीप्रमाणेच ऐकायला मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं ना !नदी म्हणते,

 गंगा यमुना गोदा कृष्णा.

 तृप्त करतो सजीवांची तृष्णा.

 विकसित झाली इथे संस्कृती.

 बांध घालूनी वीज निर्मिती.

 असूनही आम्ही जीवनदायीनी.

  भय अस्तित्वाचे संपत नाही.

  वंदन करिते देवा तुजला.

  सदबुद्धी दे या मानवाला.

— समाप्त — 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवणाचा डबा… लेखिका : नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ शिवणाचा डबा… लेखिका : नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

परवा मी काहीतरी उसवलेलं शिवत होते.

सुईदोरा पाहिला आणि नात(वय वर्षे ८ ) म्हणाली ,”आजी काय करतेस ?”

मी म्हटलं, “अगं आजोबांच्या पॅंटचा काठ उसवलाय  तो शिवतेय.”

मग तिचे प्रश्न काय संपतायत ?

उसवलं म्हणजे काय ? काठ म्हणजे काय ?

मग सगळं शिस्तवार समजावून सांगणं आलं. पण त्याचा एक फायदा झाला. 

ती म्हणाली,” मला शिकव ना.”आणि लगेच एक कापडाचा तुकडा घेऊन आली . 

चला हे ही नसे थोडके म्हणून मी पण लगेच सुई ओवण्यापासून सगळं शिकवलं आणि माझं गुणी बाळ पण लक्ष देऊन पहात होतं.

मग तिला हेम म्हणजे काय? धावदोरा म्हणजे काय? उत्साहाने सगळं सांगितलं आणि खरंच तिने सांगितल्याप्रमाणे इतका छान प्रयत्न केला ना .. हेम,  धावदोरा घालायचा… मला तर भरुनच आलं. 

शाळेला सुट्टी त्याचा एवढा फायदा झाला याचाच मला आनंद . आता त्याचा प्रत्यक्ष उपयोग कधी होईल देवास ठाऊक .कारण हल्ली ब्रॅंडेड कपडे उसवतही नाहीत आणि फाटतही नाहीत.  वाढत्या वयामुळे लवकर लहान मात्र होतात . 

पण आपल्या लहानपणी शिवणकाम शिकताना जगण्याचे संस्कार होत होते , मुलामुलींच्या मनावर. 

कारण शाळेत ५वी ते ७ वी शाळेत शिवण विषय असायचा. धावदोरा, हेम घालणं, काजं करणं, बटण लावणं (तेव्हा हूक नव्हते.) या प्राथमिक गोष्टी शाळेतच शिकायला मिळाल्या . आणि वार्षिक परिक्षेत त्याचे % टक्क्यांमध्ये भरघोस मार्क वाढायचे हा आनंद जास्त!

फार पूर्वी तर घरी हातानेच कपडे शिवायची पद्धत होती . मला आठवतय माझी आजी पांढरी चोळी (त्यावेळेस बायका पोलके किंवा ब्लाऊज म्हणत नसत. )घालायची आणि ती स्वत : शिवायची हाताने! आणि ती चोळी ८ तुकड्यांची असायची. वितीने माप घेऊन कसं तिला बरोबर साधायचं…. आता खरच कमाल वाटते . .. पण अडून राहणच नाही हा मला वाटतं पहिला संस्कार असावा बाईवर .कुंची, लंगोट, दुपटी, झबली (आता ही नावंसुद्धा वापरातून बाद होतील बहुतेक. ) घरीच शिवायची . आजीमुळे हे शिकायला मिळालं . 

शिवणाच्या डब्यात बारिक जाड सुया, खाकी पॅंटची आणि इतर मोठी बटणं, प्रेस बटणं, रिळं याचा संग्रह असायचा .माझ्या डब्यात आता गरजेप्रमाणे इलॅस्टिक, वेलक्रो अश्या गोष्टीही सामावल्यात .  

अजूनही या सुई दो-याने शिवण्याचा, सिनेमात फक्त हिरो हिरॉईनचा रोमान्स दाखवताना, हिरोच्या जवळ उभं राहून त्याच्या  अंगातल्याच शर्टाला बटण लावायचा सीन हमखास दाखवला जातो . जो प्रत्यक्षात कधी नसतोच . नवरा एकतर पटकन शर्ट काढून देईल किंवा दुसरा शर्ट घालेल. 

आताच्या मुली असा डबा ठेवत असतील का ?आणि किती जणींना याचं ज्ञान असेल ? अपवाद असतीलच . 

त्यामुळे या ज्ञानातून जे आज्यांकडून (मौलिक ?)विचार ऐकायला मिळायचे ते संपलेच … 

१. अगं एक टाका वेळेवर घातला तर पुढचे १० टाके घालायचे वाचतात . 

२. अगं थोडी चूण घालावी गं कपड्यासारखी मनाला . 

३ अगं कपड्यासारखी अलगदपणे माणसं जोडता आली पाहिजेत गं बाळा.

४ .धागा उसवला म्हणून कुणी कपडा टाकून देतं का ? तसंच नात्याचं आहे बयो, टाका घालून जोडता आलं    पाहिजे गं .

५ .बाईच्या जातीला शिवण टिपण आलं पाहिजे गं बाई, तिलाच तर सारं जोडायचं आणि बांधून ठेवायचं  असतं संसारात . 

.. .. असे संवाद संपलेच की आता . दुपारच्या वेळी माजघरात शिवण टिपण करत बायका एकमेकींशी सुखदुखाच्या गोष्टी  बोलतायत, हे दृश्य फक्त सिनेमात किंवा  फोटोत दिसेल आता. आता वेळ कुणाला आहे जोडाजोडी करायला ? आणि लागतंच नाही असं काही करायला . सगळं रेडीमेड मिळतच की, 

.. .. आणि माणसांचं म्हणाल तर ते फारसं  महत्वाचं नाही. कुणी आलं बरोबर तर ठीक आहे ..   त्याच्यासह,…  नाहीतर ठीक आहे , त्याच्याशिवाय . फक्त धावायचं असतं प्रत्येकाला . 

पण अजूनही निरागस मनाची नातवंडं आजूबाजूला असतील  ना तर नक्की आजीने टाके घालून जोडायचं कौशल्य शिकवत राहावं. कुणी सांगावं काळ फिरुन येईल  आणि काळाची गरज म्हणून  ( कपडे आणि नाती जोडायला )  परत या गोष्टी करायला शिकवेल. तेव्हा आपली आठवण निघेल.

— तोपर्यंत आपण आपला शिवणाचा डबा त्यातील सर्व सामानासकट जपून ठेवू या. आपण एवढं तर करूच शकतो . 

लेखिका :   सौ . नीलिमा लेले

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालगंधर्वांची अखेर..!! – लेखक : श्री वसंत शा. वैद्य ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ बालगंधर्वांची अखेर..!! – लेखक : श्री वसंत शा. वैद्य ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

*१४-१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना..!!*

त्या दिवशी नेमका मी पुण्यात होती. दुपारच्या जेवणाची वेळ..!! मी नारायण गेटाजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार, इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो..!! बघतो तो काय..!! त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली ..!! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकाने पुढे विस्तव धरलेला, आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली ‌‌..!! ती जवळ-जवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची ..!! पुण्याच्या नाट्य-क्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्य-क्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे, त्या प्रेत-यात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले..!!*

‘कोण ..??’*

न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले…. “अहो ..गंधर्व ..बालगंधर्व” ..!!*

साक्षात बालगंधर्वाची प्रेतयात्रा ..!! अणि ती देखील इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत ..??*

*-बालगंधर्व ..* .. *- सौभद्र ..*.. *- स्वयंवर ..*.. *- मृच्छकटिक ..*  *-एकच प्याला ..*..  *”जोहार मायबाप जोहार .. अन्नदाते मायबाप हो ..!!”*…. हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली ..!!*

ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात, प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरा-पान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं सगळं ..!! चला आता ..’!!

घरी आलो. चार वाजून गेले होते ..!! बालगंधर्वांची प्रेतयात्रा ,अशा घाईगडबडीने आणि पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत, कसलाही गाजावाजा न करता, गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली ..?? त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे ..!!

गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतीस्थानात नारायणराव राजी-खुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले ..!! त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नट-मंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा .. पिसे गळालेला राजहंस ..!!

कुणीही केली नसती अशी सेवा, या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली ..!! त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता ..!! कारण एकच .. त्याच्या गळ्यावरील तिचे भक्ति-युक्त प्रेम ..!! …. *जे प्रेम राधेने कृष्णावर केले ..!!* …. *अहिल्येने प्रभू रामावर केले .‌.!!* ….. तसेच प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले ..!! त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्या-पांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी, अगोदर अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत, दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच विदीर्ण झालेला राजहंस ..!! त्यावेळी त्याच्या रसिक-जनांनी व भगत-गणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत, पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते ..!!

*असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व ..!!* …. मुसलमान झालेला ..!; आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना अव्हेरून, त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते .. आता धर्मांतरही झाले ..!! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत, गावो-गांवच्या जुन्या भगत-गणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले ..!!

एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. प्रसंग सोलापूरचा ..!! ह्याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली ..!! पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. ‘मेकॉनकी थिएटर’ म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेरच ..!! ‘तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो, असे वाटते’ असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी, जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले ..!! नाटके लावता येत नव्हती ..!! पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्या-भाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वांना थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पाय-पिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला ..!!*

 गंधर्वाचे भाषण सुरू झाले …. “अन्नदाते ..!! मायबाप हो ..!! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच आता मला जगवा ..!! तुमच्या उष्ट्याचा मी महार” ..!!*

असे अनेक थैली-समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत ..!! चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे, उभी, आडवी, तिरपी कशीही बेरीज केली तरी, उत्तर येईल शून्य ..!! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य ..!! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला ..!! परंतु बिचारीचे नशीबच खोटे ..!! ती तरी त्याला काय करणार ..?? बाल-गंधर्वांभोवती, त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोत-पक्षी त्याच्याजवळून उडून गेले, आणि साऱ्या महाराष्ट्रात, ‘गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश’ केला अशी हाकाटी करीत राहिले ..!! वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कला-जीवनाचा मृच्छ-कटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे ..!!

ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्री-भूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात, मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गान-नृत्यही करून, एक आगळा साक्षात्कार घडविला होता ..!! तो काळ दृष्टीसमोर आणा, म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुति-माधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून ..!! हिराबाईंच्या गान-माधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत ..!! मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनय-कुशल आणि नृत्य-गान-कुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय.  जाति-धर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य-समीक्षकांनी, आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते ..!! नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले ..!!

दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन, गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून, त्याचे कोड-कौतुक करणार्‍या मानवजाती प्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठीच आहेत, असा भ्रामक समज त्यांच्या अवती-भोवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोह-भस्म आणि सुवर्ण-भस्म जे दडलेले असते, त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात ..!!

सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी ..!! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानव-जातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व त्या राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली ..!! तिचे व बालगंधर्वांचे मीलन, हिंदू रसिकांना न रुचल्याने, त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदा-नालस्ती झाली त्यामुळे, ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे ..!! ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे, अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंच-पक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्व-भक्तांच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे ..!! ती काळी साळ आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे ..!! गोहरला ‘चेटकीण’ म्हणणारे हे महाभाग, कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील आणि नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे ..?? कारण, बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती तर विजापूरची कलावंतीणच होती ना ..!!

ते काहीही असो .. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे, गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीर-संबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता, तर तो गायनाची पताका दिगंत घेऊन जाणारा झाला असता ..!! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला ..??*

ह्या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे ..!! ….  *’गंधर्व अत्यवस्थ’ ..!!* .. अशी सिंगल कॉलममधील ती बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ..!! ती वाचून, मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना ..!!

आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की, आजही अंगावर शहारे येतात ..!!

*आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार ह्या शिवाय दुसरे काही नाही केले, त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक उपस्थित नव्हता ..!! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता ..!!* होते ते एका हौशी नाट्य-संस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर ..!!

एखाद्या कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची, असा विधिलिखित संकेतच असतो की काय, कुणास ठाऊक ..!! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस  ‘प्यासा’ रहावे लागते ..!!  एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा, ह्यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली ..!!

गंधर्वांचे भाग्य थोर ..!! त्यांच्यावर आता पुस्तके लिहिली जात आहेत ..!! 

…. *पण अप्सरेचा मानवी अवतार, तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला ..!!*

लेखक :  श्री वसंत शा. वैद्य. 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिकामटेकडी… लेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रिकामटेकडीलेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

जवळजवळ दोन वर्षांनी लांबच्या शहरात राहणारे काका काकू आले म्हणून प्राजक्ता मनातून खूपच आनंदी होती. आणि तिची मुले, त्यांचे आवडते मामा मामी आले म्हणून! काका काकू अगदी सहकुटुंब आले होते प्राजक्ताच्या घरी.

तिला तर काय करू अन् काय नको, असं झालं होतं. लहानपणी काही वर्ष एकत्र कुटुंबातच वाढली असल्याने, काकू म्हणजे तिच्यासाठी दुसरी आईच होती जणू. त्यांच्या मुलाबरोबरच वाढली होती प्राजक्ता. त्यामुळे अगदी सख्ख्या भावंडासारखंच प्रेम होतं. प्राजक्ता दहावीत गेल्यावर मात्र तिच्या वडिलांची बदली झाली आणि नंतर हळूहळू कुटुंबातली सगळीच माणसं वेगवेगळ्या दिशेनं पांगली.

पण ओढ मात्र तशीच राहिली.

त्याच ओढीनं एकमेकांकडे जाणं येणं होत होतं.

म्हणूनच दिवाळीनंतर काका काकू आपल्या मुलाला आणि सुनेला घेऊन चार दिवस प्राजक्ताकडे राहायला आले होते.

आल्यादिवशी संध्याकाळी प्राजक्ताने मस्त भरल्या वांग्याची भाजी केली आणि सर्वांसाठी जवळच असणाऱ्या पोळीभाजी केंद्रातून मस्त खरपूस गरमागरम भाकरी आणल्या. सर्वांची छान जेवणं झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोळ्यांना बाई आली. चहा पाणी झाल्यावर, दोन्ही घरचा दिवाळीचा फराळ खाल्ल्यावर प्राजक्ता सर्वांशी गप्पा मारत बसली असता तिचा भाऊ म्हणाला, नाष्ट्याला कर काहीतरी पोहे, उप्पीट.

प्राजक्ताला कळेना,आत्ता फराळ झाला, परत का नाष्टा? पण कधीतरी आलेल्या पाहुण्यांना नको कशाला बोला, म्हणून तिने गरमागरम उप्पीट केलं.

ते झाल्यावर गप्पा टप्पा करतच प्राजक्ताने भाजी, कोशिंबीर केली. गुलाबजाम त्यांच्या एरियातल्या प्रसिद्ध हलवाईकडून आणले होते. खास आपल्या माणसांसाठी म्हणून!

पोळ्या बाईने केलेल्या होत्या म्हणून पटकन जेवण तयार झालं सुद्धा. वहिनीला तर तिने स्वैपाकघरात फिरकूसुद्धा दिलं नाही.

मुलांना मामा मामी भेटले होते, म्हणून प्राजक्ताला जे हवं ते मनसोक्त करू दिलं त्यांनी.

दुपारची जेवण आटोपली. पाहुणे आडवे झाले. प्राजक्ताच्या घरी दुपारी झोपायची सवयच नसल्याने ती मुलांबरोबर खेळत राहिली.

संध्याकाळी सर्व मस्त बाहेर फिरून आले. सकाळच्या पोळ्या उरल्या होत्या, प्राजक्ताने विचारलं पोळ्या तर आहेत, भाजी कोणती करू?

तर तिचा भाऊ पटकन म्हणाला, पोळ्या नको भाकरी कर.

प्राजक्ता म्हणाली,भाकरी खायचीय का तुला?

ठीक आहे, मी आणते कालच्यासारखी.

छे, छे बाहेरच्या नको. तू कर……

अरे पण तुला काल तर आवडल्या होत्या त्या भाकरी?

हो. पण तू कर की. मी कालपासून बघतोय. तू काहीच करत नाहीस घरात. तू करून दे आम्हाला भाकरी…….

प्राजक्ताला खरंतर रागच आला होता, त्याच्या बोलण्याचा. तरी तो गिळून ती म्हणाली, मी नाही करत भाकरी. मला येतही नाहीत. एवढे फिरून आलो आपण, आता कुठे भाकरी करत बसू? आणि जवळच तर मस्त गरमागरम मिळतात. मी का कष्ट घेत बसू उगाच? लागेल तेव्हा आणते मी.

तेवढ्यात काकू म्हणाली, “पोळ्या तुझी बाई करते. धुण्याभांड्यालाही बाई आहे. घरातली कामं सगळ्यांना वाटून टाकलीयेस. अगं, नवराही ऑफिसवरून आल्यावर काम करतो तुझा, अगदी मुलीलाही काम लावलंयस. तू काही करताना दिसतच नाहीस. त्यातून तू घरातच आहेस.आमची सुनबाई बरी की. ती तर ऑफिसला जाऊनही स्वैंपाकासकट किती कामं करते!”

“अगं काकू, घरातली कामं घरातल्या सर्वांनी वाटूनच करायची असतात. ज्याला त्याला त्याचं आवडतं काम दिलंय. ते त्यांच्या सवडीने करतात. कुणावर काही जबरदस्ती नाही केली मी. नवरा ऑफिसवरून आल्यावर काम करतो, तर ते त्याला आवडतं म्हणून. मुलीने तर हौस म्हणून मागून घेतलंय. घरी आहे म्हणून मीच सर्व केलं पाहिजे असं कुठे लिहिलंय?”

“पण बाईच्या जातीला असं नुसतं बसून राहणं शोभतं तरी का?” काकूला तर पटलंच नाही तिचं बोलणं.

“अगं काकू , तुला कुणी सागितलं, मी नुसतं बसते. माझे मला उद्योग आहेत चिक्कार!

आता तुम्ही आलात म्हणून मी तुमच्याबरोबर माझी रोजची कामं सोडून गप्पा मारत बसलीये एवढंच. उलट तुम्हाला तर छान वाटलं पाहिजे. पाहुणे आलेत म्हणून स्वतःला स्वैपाकघरात गाडून न घेता मी तुमच्याबरोबर एन्जॉय करतीये म्हणून!

इकडे येऊन पण तुम्ही एकमेकांची तोंडं बघत बसलात तर फायदा काय? मला भेटायला आलात ना प्रेमाने. मग मीही तुमच्याबरोबर राहून, तुमच्याबरोबर सतत गप्पा मारून तुमचे आणि माझे चार दिवस सुखाचे करतीये तर त्यात काय चुकलं माझं?

आता तुम्ही आल्यावर मी माझी कामच करत बसले तर काय म्हणाल, बघा आम्हाला बोलावलं आणि तिच्याकडे काही वेळच नव्हता आमच्यासाठी!”

तेवढयात तिचा भाऊ म्हणाला, “पण कामं तर काही दिसतच नाही तुला. रिकामटेकडीच तर बघतोय दोन दिवस.”

“दादा, मी रिकामी दिसतेय कारण मुलं तुमच्यामागे आहेत. पाहुणे आल्याचा त्यांना आनंद झालाय, म्हणून त्यांनी मला सोडलंय. तुम्ही सकाळी सातला उठताय. मी ही अगदी तेव्हाच उठते रोज. चहा पाणी करते. पटकन भाजी टाकते. पोळ्या बाई करते. तेवढा वेळ मिळतो त्यात मी व्यायाम, योगा करते माझ्यासाठी. मग मी माझी आवडती पुस्तकं वाचते. कधी आवडती गाणी ऐकते. माझा वेळ मी हवा तसा घालवते. अगदी मोजके दीड-दोन तास मिळतात रे मला माझ्यासाठी. नऊला मुलं उठली की चक्र सुरू होतं माझं. मग त्यांचं सर्व झालं की चार वाजल्यापासून मी ऑनलाईन क्लासेस घेते आठवी ते दहावीच्या मुलांचे संस्कृतचे. ते अगदी आठपर्यंत चालतात. ते संपल्यावर मुलं इतका वेळ मी बिझी होते, म्हणून खेळायला सांगतात त्यांच्याशी. त्यांना मी त्यांच्याबरोबर रहावी, वाटतं . मग त्यांना बाजूला सारून स्वैपाकपाणी करत बसणं, त्यासाठी जिवाची मारामारी करणं, नाही पटत मला. सुटसुटीत मोकळं राहायला आवडतं मला. आणि अगदी घरच्या चवीची भाजी भाकरी गरमागरम मिळते बाजूलाच, तर का उगाच करत बसू मी?

भले घरी असते, घरातून थोडं बहुत काही करते, म्हणून रिकामं मोकळं राहायचा अधिकार नाही का मला? मला आवडतं, आणि माझ्या घरी सर्वाना चालतंही.

“उद्या आमची सुनबाई म्हणाली असं तर आम्हाला नाही चालणार मात्र,” काका मधेच म्हणाले.

“तुम्ही थोडा तिच्या बाजूने विचार केलात तर नक्की चालेल तुम्हालाही. अर्थात तिची तशी इच्छा असेल तरच.

काय रे दादा, तू विचारलं का तिला कधी?”

“मला हे तुला असं बघूनच त्रास होतोय, तर ती ही अशी वागली तर काय होईल! ए, तू हिला शिकवू नको बाई असलं काही.”

“मी कशाला शिकवू, दादा? आपली मतं कुणावर लादता येतात का कधी? जो तो स्वतःच्या अनुभवाने शिकतो. जमलं तर बदलतो नाहीतर मन मारून जगतो वर्षानुवर्ष.

आता तुम्ही आलात म्हणून माझं रुटीन थांबवलंय मी. सगळा वेळ तुमच्यासोबत घालवतेय. क्लासला चक्क सुट्टी दिलीये मी तुम्ही असेपर्यंत!

तर तुम्हाला माझं रिकामपण टोचायला लागलंय.”

“आम्हाला बघायला वेगळं वाटतं असं,” काकू नाराजीने म्हणाली.

“वेगळं कुणाला पटकन पचत नाही, हे खरं. बघणाऱ्या बाईला नाही आणि पुरुषाला तर नाहीच नाही.

वर्षानुवर्षे बाईला कामात गढलेलीच बघायची सवय ना डोळ्यांना. मोकळेपण डोळ्यात सलतं बाईचं. मोकळ्या मनाने मोकळी राहू देणारच नाहीत कोणी तिला. बोलण्यातून नाहीतर नजरेतून घायाळ करणारच तिला.” प्राजक्ताने आपली बाजू मांडायचा केलेला प्रयत्न फारसा कोणाला रुचलाच नाही. ते त्यांना स्वतःच्या सोयीचं वाटलं नसावं बहुतेक, म्हणून प्राजक्तानेही पुढे जास्त बोलणं टाळलं.

पाहुण्यांचे चार दिवस संपले, तसे ते निघाले. जाताना मात्र प्राजक्ताच्या भावाच्या बायकोने आजूबाजूला कोणी नाही बघून तिला हाताला धरून ‘Thank you’ म्हटलं.

 “चार दिवस मी जो मोकळेपणा अनुभवला तुमच्याकडे तो बाकी कुठेच कधी अनुभवला नाही, अगदी माझ्या माहेरी पण. जरा निवांत बसले, की कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खुपायचंच हो! काही ना काही करत राहणारी बाईच आवडते सर्वांना. जरा बसली की नावं ठेवणं सुरू, मग ते घरचे नाहीतर दारचे कोणी का असेना!

सध्या तरी माझी मानसिक तयारी नाही कुणाच्या विरोधात जाण्याची, पण हळूहळू झाली की मला आवडेल तुमच्यासारखं रहायला!”

प्राजक्ताने गोड हसून तिला निरोप दिला. ‘सर्वांनाच जमणाऱ्यातलं नाही ते,’ असं मात्र आवर्जून मनात वाटलंच तिला.

लेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares