मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हाफ पोलिस – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हाफ-पोलीस…… नितीन महादेव यादव

? इंद्रधनुष्य ?

☆ हाफ पोलिस – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हाफ-पोलीस… — गुन्हेगारांचं परफेक्ट स्केच काढणारा आपला माणूस….!

आज आपण पोलीस खात्यातील एका अशा कर्तबगार माणसाला भेटणार आहोत जो पोलीस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतो.

CID मालिकेत तुम्ही अनेकदा स्केच आर्टिस्टला पाहिलं असेल पण आज भेटूया एका खऱ्याखुऱ्या स्केच आर्टिस्टला.

हाफ-पोलीस…… नितीन महादेव यादव

हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढून देण्याचं काम करत आहेत. त्यांनी आजवर काढलेल्या स्केचेसमधून तब्बल ४५० स्केचेसच्या आधारे गुन्हेगारांना यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. आज जाणून घेऊया पोलीस खात्याचा अविभाज्य भाग असलेल्या नितीन महादेव यादव यांच्याबद्दल.

कुर्ल्याच्या साबळे चाळीत राहणारे नितीन यादव हे त्यांच्या मित्रपरिवारात हाफ-पोलीस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची लिस्ट जर बघितली तर त्यांची कर्तबगारी पोलिसांपेक्षा कमी नाही. गेल्या २५ वर्षांपासून ते एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांची चित्रे काढत आहेत. या कामात त्यांचा हातांना विलक्षण देणगी लाभली आहे.

नितीन यादव यांचा प्रवासाला सुरुवात झाली ती त्यांच्या लहानपणी. कामगारांच्या ज्या संपाने मुंबईचा चेहरामोहरा बदलला त्याचा मोठा फटका हा नितीन यादव यांच्या कुटुंबालाही बसला होता. ७ वी इयत्तेत असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली होती. पोटापाण्यासाठी ते नंबर प्लेट्स, बॅनर, इत्यादी रंगवण्याचं काम करायचे.

एकेदिवशी पोलीस स्टेशनमध्ये ते चौकीचा बोर्ड आणि नावाच्या पाट्या रंगवत होते. त्याचवेळी पोलीस स्टेशन मध्ये एक केस आली. GSK हॉटेल मध्ये हत्या झाली होती. हॉटेलच्या वेटरनेच फक्त चहा देताना गुन्हेगाराचा चेहरा पाहिला होता. नितीन यादव पोलिसांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं, ‘’जर तुम्ही वेटरला बोलतं केलंत तर मी त्याच्या वर्णनावरून खुन्याचं चित्र काढू शकतो.’’ पोलिसांनी मंजुरी दिली. नितीन यादव यांच्या स्केचच्या आधारे गुन्हेगार केवळ ४८ तासात पकडला गेला. त्यावेळी ते १० वीत शिकत होते.

लहान वयात त्यांच्या हातांनीच त्यांचा पुढचा मार्ग शोधला होता. या कर्तबगारीनंतर त्यांचा प्रवास सुरु झाला. आजवर अनेक महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास कामात त्यांनी मदत केली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर २०१३ चं शक्तीमील बलात्कार प्रकरण, पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट अशा महत्वाच्या केसेसमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

त्यांचा कामातील हातखंडा दाखवणारा एक किस्सा पाहा. ज्यावेळी अजमल कसाबवर खटला चालू होता तेव्हा फोटोग्राफर्सना कोर्टात येण्यास बंदी होती. एका पत्रकाराने त्यांना गाठून त्यांना कोर्टरूमचं वर्णन ऐकवलं. या वर्णनावरून त्यांनी कोर्टरूम मधला हुबेहूब प्रसंग चितारला होता. हे स्केच वर्तमानपत्रातही छापून आलं होतं.

नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये. बलात्कार पिडीत मुलीकडून गुन्हेगाराची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो. अशा केसेस मध्येही नितीन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे. ‘’काहीवेळा चित्र एवढं ‘परफेक्ट’ असतं की पीडीत मुलीला अश्रू अनावर होतात’’ असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते..

१० वर्षापूर्वी कॅन्सरसाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि ते नुकतेच बरे होत होते तेव्हा एक बलात्काराची केस त्यांच्याकडे आली. या केसमध्ये मुलगी कर्णबधीर आणि मुकबधीर होती. तिच्याकडून माहिती काढणं हे जवळजवळ अशक्य होतं. यावर त्यांना एक मार्ग सुचला. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शरीराच्या भागाचे जसे की चेहऱ्याचे, केसांचे, त्वचेच्या रंगाचे, जेवढे म्हणून चित्रांचे नमुने होते ते पिडीत मुलीच्या समोर ठेवले. मुलीने नमुन्यातील एकेक गोष्टींची निवड केली आणि गुन्हेगाराचा चेहरा तयार झाला. तो गुन्हेगार पुढील ७२ तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात होता.

त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून १६४ पुरस्कार मिळाले आहेत. पोलिसांना मदत करण्यासोबत ते चेंबूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. पोलीस खात्याशी निगडीत सगळ्यांनाच जीवे मारण्याची धमकी ही येतेच. याला नितीन यादवही अपवाद नाहीत. पण कोणताही अडथळा त्यांना त्यांच्या कामापासून लांब ठेवू शकला नाही.

२५ वर्षांपासून त्यांनी कामासाठी एक रुपयाही घेतलेला नाही पण मागील काही वर्षापासून पोलीस खाते स्वतःहून त्यांना पैसे देऊ करते.

बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची एक अट असते. एकदा का गुन्हेगार पकडला गेला की ते त्याला एक सणकून कानाखाली देणार. त्यांची ही अट पोलिसांनी चक्क मान्यही केली आहे.

तर मंडळी अशा या पडद्यामागच्या हिरोचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. फक्त एवढंच म्हणू शकतो की ‘तुमच्या कामाला प्रणाम !!’… 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

“पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती “ —  हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी  वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वर महाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल. पण या शंकेचे निरसन झाले,  ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात. तेव्हा त्यानी या शब्दांचा अर्थ असा सांगितला, ‘ कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि  करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा.’  हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा  गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल. 

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळ फाकती प्रभा। 

अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा॥१॥

ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.

कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। 

खोळ बुंथी घेउनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥ 

प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु)  आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी,  माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भुमिका हाच तर करत असतो. त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंधी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे. 

शब्दविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कैसेंनि गमे। 

परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेंनि सांगे॥३॥  

प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, ‘बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ‘, हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत?  परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे  मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे  खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही,  शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभु असे। 

समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥ 

या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे.  पण माझ्या समोर उभा  आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून  हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे,  ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.

क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनि स्फूरताती बाहो।

क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव रावो ॥५॥ 

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल  त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.

बाप रखुमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। 

दृष्टीचा डोळा पाहों गेले। तव भीतरी पालटु झाला ॥६॥ 

हा विठ्ठल बाहेर नसून ह्रुदयात वसतो असे कळले म्हणून  त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्यासारखीला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आलें तर पाऊले लपवतोस,  समोर- मागे येऊन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि  अनाकलनीय (कानडा) आहेस.   

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध केला आहे.

राम कृष्ण हरी

याचसाठी गदिमा ‘ वेदांनाही नाही कळला अंतपार याचा ।। कानडा राजा पंढरीचा…।।’  असं म्हणतात.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दान… दृष्टीचे ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ दान… दृष्टीचे 👁️ ☆ सौ कल्याणी केळकर बापट

(१० जून..आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिनानिमित्त)

नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.

नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे, हे दृष्टीदिनाचे उद्दिष्ट आहे. विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.

कुठलही दानं हे उत्स्फूर्तपणे करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांना काही देऊ करतो त्या गोष्टींची आवश्यकता, गरज ही समोरील व्यक्तीला हवी. तुमच्याकडे अतिरिक्त असणाऱ्या गोष्टी दुसऱ्या ला फारशी गरज नसतांना देऊ करणे हे दान ह्या परिभाषे खाली नक्कीच येत नाही हे देणा-यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.

नुकत्याच उमलू लागलेल्या आमच्या वयात “धनवान”ह्या चित्रपटातील “ये आँखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है”हे गाणे किंवा “आँखोंही आँखोमे ईशारा हो गया,बैठे बैठे जिने का सहारा हो गया”ह्यासारखी अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी दिसण्याच्याही पलीकडील नजरेच,दृष्टी चं महत्व आम्हाला सांगू लागली. खरचं सगळ्या जगाची,ज्ञानाची, माहिताची ओळख पटविण्याचं काम हे डोळेच तर करतात. लहानसं इटुकलं पिटुकलं बाळ सुद्धा जन्म झाल्याबरोबर आपल्या मिचमिच्या डोळ्यांनी उजेडाचा क्षणभर त्रास सहन करीत अवतीभवतिच  हे जग बघायला सुरवात करतं. मग हळुहळू हे डोळे आपल्याला नुसतीच नजर, दृष्टी देतात असं नाही तर सभोवतालचे ज्ञान मिळवित एक नवा दृष्टिकोन पण देतात.

हे डोळेच तर आपल्याला नवनवीन संकल्पना सहज समजवायला मदत करतात , हे डोळेच आपल्याला नवनवीन क्षेत्रात प्रगती करायला मदत करतात, हे डोळेच आपल्याला ह्या आणाभाका, कस्मेवादे निभवायला शिकवितात. हे डोळेच आपल्याला परस्परांची ओळख पटवायला शिकवितात. त्याचबरोबर ह्या डोळ्यांनी स्वतःला कसं ओळखावं हे पण शिकवितात. ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला माया,ममता,प्रेम दिसून येतं,जीवन खूप सुंदर आहे ह्याची ग्वाही पटते, तर कधीकधी ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला चीड, राग,संताप दिसून आल्याने आपलं नेमकं कुठं, काय, किती चुकलं ते आपण शोधायला लागतो. ह्य डोळ्यां मध्येच कधी आपल्याला वासनेची झलक आढळून आल्यास आपण लगेच सतर्क होतो. खरोखरच हे डोळे आपल्याला सगळी ओळखं पटवून देऊन जगात सक्षमपणे जगणं शिकवितातं.

आपल्याला निरामय, अव्यंग,सुदृढ शरीर नशीबाने देवाने दिले तर आपल्याला त्या अवयवांच्या किंमतीचा अंदाजच लागत नाही. ज्या कुणाजवळ ह्यातील एखाद्या अवयवाचा जरी अभाव असेल तर त्यालाच त्याच्या खरी किंमत ही कळते.आजकाल बरीच जनजागृती झाल्याने, त्याचं महत्त्व पटल्याने लोक आजकाल अवयवदानाचा त्यातल्यात्यात नेत्रदानाचा संकल्प सोडतात.

मी माझ्यापुरती तरी नेत्रदानाची व्याख्या बदलली आहे. मी ह्याला नेत्रदान न म्हणता नेत्रभेट म्हणते. “दान दिले” ह्या संकल्पनेपेक्षा “भेट दिली”ही संकल्पना वापरल्याने माणसासाठी जास्त घातक असलेल्या “मी”पणा किंवा “अंह”चा स्पर्श होत नाही, शिवाय दान ह्याचा अर्थ तुम्हाला कामी असतांना, गरज असतांना सुद्धा तुम्ही ते दुस-याला दिले तर त्या त्यागाला दान म्हणणं उचित ठरेल. परंतु नेत्रदान तर आपण आपला शेवटला श्वास सोडल्यावर, त्यांची आपल्याला गरज संपल्यावर दुसऱ्या ला देतो म्हणून नेत्रभेट हे नाव जास्त समर्पक असं मला वाटतं.

त्या ईश्ववराची लीला पण अगाध असते बरं का,

एखादा अवयव नसलेल्या व्यक्तीत त्याची उणीव,कमतरता भरून काढायला पर्यायी ईश्वराने दुसरी एखादी शक्ती त्याला खास म्हणून दिलेली असते. त्यामुळे डोळे नसून सुद्धा दया, प्रेम,कणव, संस्कार, कृतज्ञता,समजूतदारपणा, सुसंस्कृतपणा ह्या बाबतीत अग्रेसर असलेल्या अंध व्यक्ती आपल्या सभोवती सहजतेने, विनातक्रार वावरतांना आढळतात.

आजच्या दिनी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडून अंधांना दृष्टी देण्याचं मोलाचं कार्य करावं एवढचं मी म्हणेन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

 

??

☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर

राजस्थान रॉयल्सचा कप्तान संजू सॅमसन याची परवा इन्स्टाग्रामवर पोस्ट बघितली.

त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, दूर लांबवर नजर आणि डोळ्यात आशेची चमक. 

त्याने खाली लिहिले होते,” वियप्पु थुनियित्ता कुप्पयम. “… म्हणजे माझा शर्ट माझ्या घामाने विणला आहे.

त्याला म्हणायचे होते, ‘ मी जो इथवर पल्ला गाठलाय तो केवळ कष्टाने, घामाने.आणि अजून खूप पुढे जायचे आहे.’ 

आयुष्यात पुढे यायचे असेल तर कष्ट आलेच. गीतेत कृष्णही हेच सांगतो, 

“उद्धरेत आत्मना आत्मानम् ।”….. स्वतःच स्वतःचा विकास करत रहा. 

विकासाचा रस्ता कायम अंडर कंस्ट्रक्शन असतो. अडचणींचे दगड, धोंडे ओलांडावे लागणार

…  रफाल नडाल, २२ वेळा ग्रॅन्ड स्लाम जिंकला. उत्तम टेनिसपटू. तरीही अपूर्णतेची हुरहुर. 

मनात जिद्द…. दोन,तीन महिन्यापूर्वी बेडरिडन होता. त्याची हिप सर्जरी झाली होती. त्याला स्वतःला तो टेनिस खेळू शकेल की नाही याची खात्री नव्हती. पण मनात दुर्दम्य इच्छा.मे महिन्यात पॅरीसमधे फ्रेन्च ओपन खेळण्याची. आणि तो इच्छाशक्तीच्या जोरावर पॅरीसमधे खेळला.

कृष्ण गीतेत सांगतो ….. 

आत्मनः म्हणजे मन बलवान करा. 

मन याचा अर्थ अंतर्मन….  सबकाॅन्शस माईंड. 

या मनात चांगले विचार, सकारात्मक विचार पेरत रहा. 

या अंतर्मनाची शक्ती इतकी अफाट आहे की ते विचार सत्यात उतरतील.Thoughts will turn into things.

जाॅर्ज वाॅशिंग्टन गरीब होता. एका शाळेत शिपायाची नोकरी करीत होता.शाळा सुटायच्या वेळी घंटा वाजविण्याचे काम त्याचे होते. घंटा वाजवताना तो मस्करीत म्हणायचा,

“टण,टण,अमेरिकेचा प्रेसिडेंट वाॅशिंग्टन. ” .. हे रोज म्हणता म्हणता तो विचार त्याच्या अंतर्मनात 

आपोआप झिरपत गेला.तो झपाटून गेला. त्याच्या कामाची व्याप्ती वाढली व तो खरोखर अमेरिकेचा अध्यक्ष झाला.

जसा समुद्रावरचा वारा जहाजाला कुठल्याही दिशेने भरकटवू शकतो तसेच मनही भरकटते.

पण जहाजाचे शीड जहाजाची दिशा ठरवते तसेच उत्तम विचार हे मनाच्या तारूची दिशा ठरवतात. 

कृष्ण नंतर हे ही सांगतो, “ न आत्मानम्अवसादयेत् l “ 

… स्वतःची अधोगती करू नका…… स्वतःला कमी लेखू नका….. न्यूनतेची भावना नको. 

… आपल्यातल्या उणिवा ओळखून त्या दुरुस्त करा.

थोडक्यात उन्नती साधायची असेल तर स्वतःचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. थोडी रिस्क घ्यावी लागते.

परवा आय.पी.एल. मॅचमधे विराट कोहली इतका तगडा बॅट्समन असूनही त्याला जाणवलं की स्पिनर्स- -समोर त्याचा स्ट्राईक रेट कमी होतो आहे. ही त्याची उणीव भरून काढण्यासाठी त्याने पंजाबसमोर खेळताना रिस्क घेतली. त्याने स्लाॅग स्वीपचा सरावही केला नव्हता. तरीही त्याने तो शाॅट मनात इमॅजिन करून मारला व सिक्सर्स घेतल्या.

थोडक्यात  परिस्थितीप्रमाणे स्वतःला ढाच्यात बसवता आले पाहिजे.

स्वतःच्या उन्नतीचा मार्ग आपणच शोधला पाहिजे……. 

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

(म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे  तटस्थपणे बघू शकू.) — इथून पुढे .. 

सर्वसाधारणपणे मनुष्य आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे आपापल्या नजरेने बघत असतो. त्यामध्ये तो आपले पूर्वसंस्कार, श्रद्धा आणि पूर्वानुभव मिसळून त्या घटनेकडे बघत असतो. त्यामुळे त्या घटनेपासून त्याला दुःख होण्याची शक्यता जास्त असते. Rebt मनुष्याला विवेक अर्थात विचार करायला सांगते. त्या विशिष्ट घटनेकडे बघताना आपण कोणताही पूर्वलक्षी प्रभाव न ठेवता त्या घटनेकडे वस्तूनिष्ठपणे पाहायला शिकविते. जेव्हा आपण कोऱ्या मनाने, शांत मनाने कोणत्याही घटनेकडे बघतो तेंव्हा मनुष्य अधिक सजगतेने त्या घटनेकडे बघू शकतो. आणि जेव्हा ‘मी’ विरहीत होऊन निर्णय घेतला जातो तेव्हा तो जास्तीत जास्त अचूक असतो. 

Rebt आपल्याला आपल्या समजुती (beliefs)  बदलायला सांगते.  कोणतीही घटना आपल्याला कमीअधिक प्रमाणात भावनावश करते. भावना समजून घेतल्याचं पाहिजेत पण भावना बदलणे अवघड आहे म्हणून भावना बदलण्याच्या प्रयत्न न करता आपण आपले विचार बदलले तर घडणाऱ्या घटनेचे परिणाम बदलू शकतात. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय बरेच वेळा घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. विचारानुसार होणारी कृती ही अधिक  लाभदायी ठरण्याची शक्यता जास्त असते. 

आपले विचार सर्वस्वी हवामानावर अवलंबून नसतात. तसं असतं तर कडाक्याच्या थंडीत सर्वजण कामधंदा न करता घरात बसून राहिले असते. पण तसे तर होतं नाही. याचाच अर्थ आपले विचार हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतात. ते बहुतांशी स्वतंत्र असतात. खरंतर ते आपल्याच हातात असतात. बाहेरच्या वातावरणाचा किती परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा हे सुद्धा आपल्याच हातात असते. आपण ठरवलं तर आपले विचार आपण खात्रीपूर्वक बदलू शकतो.  तसेच मोकाट विचारांना काबूत आणणे हे सुद्धा आपल्याला प्रयत्नांती नक्कीच शक्य आहे. भरकटणाऱ्या विचारांना थांबविणे म्हणजेच स्वतःला सावरणे होय. मनुष्य अस्वस्थ होतो तो त्याच्या विचारांमुळेचं आणि शांत होतो तो सुद्धा त्याचा विचारांमुळेचं.  कोणते विचार निवडायचे याचे स्वातंत्र्य मनुष्याला असते. प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारात होते आणि मग भौतिक रुपात. आजवर आपण जे पाहिले त्याची निर्मिती प्रथम विचारात झाली आहे नि मग प्रत्यक्षात झाली आहे. आपले अंतर्मन बघू शकत नाही पण आपण जी दृश्ये त्यास दाखवितो ती ते खरी मानते आणि तशी स्थिती ते आपल्या मनात निर्माण करीत असते. आपण जे विचार पेरीत असतो तेच अनंत पटीने वाढून परत येत असतात. एक फळात किती बिया आहेत हे आपण सांगू शकतो पण एका बीमध्ये किती फळ आहेत हे सांगणे कठीण असते. फक्त योग्य विचार निवडणे, ते प्रसारित करणे आणि त्यानुसार आचरण करणे जर मनुष्याला जमले तर आपण सर्व समस्यांवर मात करु शकतो. हे जग जसे आहे तसे आपल्याला दिसत नाही तर जसे आपले विचार असतात तसे ते आपल्या नजरेस दिसत असते. 

समर्थ आपल्याला हेच ‘मानसशास्त्र’ थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. समर्थांची मांडणी त्या काळानुरूप म्हणजे थोडी अध्यात्मिक स्वरुपाची आहे. मनुष्य भक्तिमार्गात चालू लागला की त्याच्या अंतरंगात नकळत बदल होण्यास सुरुवात होते. विशुद्ध जाणिवेतून मनाच्या शोधाला रामनामातून आरंभ होतो. सद्गुरुकृपेमुळे मन अधिक सजग व्हायला सुरुवात होते. मनाला विवेकाचे अधिष्ठान लाभते. मनाला चांगल्या वाईटाची जाणीव होऊ लागते. ते स्वतःशी संवाद करु लागते. खरंतर त्याचे स्वतःशी द्वंद्व करु लागते. मनात चांगल्या वाईट विचारांची घुसळण सुरु होते. आणि मग विवेकाने मनुष्य चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला सुरुवात करु लागतो. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन मनुष्य नुसता विवेकी होत नाही तर मनुष्यत्व ते देवत्व असा प्रवास करण्यास उद्युक्त होतो. हा प्रवास बहुतांशी अंतर्गत असतो. कारण मूलभूत बदल मनातच होत असतात आणि तेच गरजेचं असतं. बरेच वेळेस अंतरंगातील बदल बाह्यरूपात प्रतिबिंबित होतातच असे नाही. मनाच्या श्लोकात उत्तम भक्त (अर्थात उत्तम पुरुषाची) लक्षणे सांगितली आहेत. तसेच व्यक्तिमत्व विकास, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी अनेक सूत्रे सुद्धा अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आढळतात. ‘

मनुष्याला नेहमी सुख मिळावे असे वाटत असते. पण त्याला सुख मिळतेच असे नाही किंवा खरे सुख म्हणजे काय हे त्याला कळतेच असे नाही. समर्थानी सांगितलेले ह्याचे एकमेव कारण म्हणजे देहबुद्धी. ही देहबुद्धी नष्ट करण्यासाठी ‘विवेका’ची कास धरण्याची समर्थ शिकवण देतात. ‘विवेक’ म्हणजे विचारांच्या प्रक्रियेला लाभलेली विचारांची खोली. विचाराला स्वच्छ जाणिवांची खोली लाभली की विवेक जन्मतो. विवेक जगण्याची धारणा देतो. विवेकाने क्रिया पालटते. ‘विवेक’ आणि ‘प्रयत्न’ हे  समर्थांचे  विशेष आवडते शब्द आहेत. मनाच्या श्लोकांत त्यांनी ‘विवेक’ हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. ‘विवेके सदा सस्वरूपी भरावे'( १०,१४५) ‘विवेके देहबुद्धी सोडून द्यावी'(१२), ‘विवेके कुडी कल्पना पालटीजे'(४०), ‘विवेके तजावा अनाचार हेवा'(६९),  ‘विवेके क्रिया आपली पालटावी'(१०५),  ‘विवेके  मना आवरी स्थानभ्रष्टा'(१०६),  ‘विवेके अहंभाव याते जिणावें'(११०), ‘विवेके अहंभाव हा पालटावा'(११५), ‘विवेके तये वस्तूची भेटि घ्यावी'(१७०), ‘विवेके विचारे विवंचुनी पाहे'(१७३), इ. अशा प्रकारे विविध पद्धतीने समर्थ आपल्याला विचार करायला सांगतात. 

(* कंसातील क्रमांक हे मनाच्या श्लोकांचे आहेत)

मनुष्याने कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत नितीमूल्यांची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्या प्रगतीस काही अर्थ नाही. मनाचे श्लोक मनुष्याला सामान्य मनुष्य ते देव, अर्थात रामाच्या पंथाकडे नेतात. मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला नि त्याप्रमाणे आचरण केले तर मनुष्य देवत्वास नक्की पोहचू शकेल यात शंका नाही. समर्थ शेवटच्या श्लोकांत तसे अभिवचन देत आहेत.

मनाची शते ऐकता दोष जाती।

मतीमंद ते साधना योग्य होती॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।

म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी॥२०५।।

अर्थात, मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने मनुष्याची अंशतः का होईना उन्नतीच होते असे फलश्रुती वाचल्यावर आपल्या लक्षात येते.

आतापर्यंत आपण दोन्ही पद्धती स्थूलमानाने अभ्यासल्या आहेत. पण प्रत्येक मानसोपचार पद्धतीची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक जाणकार त्याची प्रतवारी वेगवेगळी करु शकेल. सामान्य मनुष्याने मनाच्या श्लोकांकडे पारंपरिक आणि धार्मिक भावनेने न बघता एक विचारपद्धती अर्थात software म्हणून बघितले तर ते अधिक उपयुक्त (user friendly) होईल असे वाटते. तसेच rebt पद्धती ही सुद्धा योग्य प्रकारे आचरणात आणली गेली तर ती सुद्धा उपयुक्त अशीच आहे. आज सारे जग त्याचे चांगले परिणाम अनुभवत आहे. REBT पद्धती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. 

इथे एक गोष्ट थोडी परखडपणे सांगावीशी   वाटते की आपल्या संस्कृतीतील गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम आदि ग्रंथ हे मनुष्याचा आत्मिक विकास साधण्यासाठी निर्माण झालेले प्रमाण ग्रंथ आहेत. संतांनी स्वतः ती उच्चस्थिती प्राप्त केली आणि अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे असा शुद्ध हेतू उरात ठेऊन ह्या सर्व ग्रंथाची निर्मिती केली आहे.  त्या ‘पोथ्या’ नाहीत. आपण त्यांना वस्त्रात गुंडाळून कोनाड्यात ठेवले ही आपली घोडचूक आहे. ‘जीवन जगण्याची कला’ शिकविणारी पाश्चात्य लेखकांची अनेक पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील सर्व तत्वज्ञान आपल्या गीतेमधील, ज्ञानेश्वरीमधील आणि  दासबोधातीलच आहे. असे असूनही आजच्या तरुणपिढीला आपण मनाचे श्लोक, गीता, दासबोध वाचायला शिकवीत नाही आणि प्रवृत्तही करीत नाही. सध्या समाजात हे सर्व ग्रंथ साठीनंतर वाचायचे असतात असा गोड गैरसमज बेमालूमपणे पसरविला जात आहे. एकीकडे आपण अशा ग्रंथांची पारंपरिक पद्धतीने पारायणे करतो पण त्या ग्रंथातील ‘खरे ज्ञान’ अथवा ‘मर्म’ आत्मसात करुन पुढील पिढीस ते आचारण्यास उद्युक्त करीत नाही. ही खरी शोकांतिका आहे. कोणतेही तंत्र/ शास्त्र वापरात आले तर त्याचा खरा उपयोग आहे. ज्याप्रमाणे नदी म्हटली की वाहतीच असणार तसे आपले सर्व धार्मिक ग्रंथ हे लोकजीवन समृद्ध होण्यासाठी अमलात/ आचरणात आणण्याचे ग्रंथ आहे. ‘नराचा नारायण’ करण्याची क्षमता ह्या सर्व ग्रंथांमध्ये आहे असे सर्व संतांनी सांगितले आहे. तेव्हा अधिक सजग होऊन हे ग्रंथ तरुणपिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्याला हाती घ्यावे लागेल. 

वरील चिंतनातून साधकांनी / अभ्यासार्थीनी मनाचा अभ्यास अधिक तरलतेने करावा आणि अनंताच्या पंथाकडे सुरु झालेल्या जीवनप्रवासाचा ‘आनंद’ घ्यावा अशी शुभेच्छा व्यक्त करुन माझ्या लेखनास विराम देत आहे.

– समाप्त –

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

(साधकाने समर्थांच्या विचारांच्या साहायाने आपल्या मनाचे संश्लेषण….अर्थात संधारणा कशी करावी? हे नित्यपाठाने होऊ शकेल की आधुनिक मानसशास्त्रात ‘विवेकनिष्ठ उपचार पद्धती… REBT उपचाराला पूरक म्हणून त्याचा उपयोग करावा? .. हा प्रश्न एकाने विचारला.. आणि त्या अनुषंगाने… मनाचे नुसते विश्लेषण नको तर संश्लेषणही करण्याचे तंत्र साधकाला समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जे द्याल, तेच परत येईल, कितीतरी पटीने…!” – लेखक – श्री जयप्रकाश झेंडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “जे द्याल, तेच परत येईल, कितीतरी पटीने…!” – लेखक – श्री जयप्रकाश झेंडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

१८९२ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात घडलेली घटना ही सत्यघटना आहे. परंतु याची शिकवण मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. एक १८ वर्षांचा मुलगा अत्यंत कष्टानं विद्यापीठातील शिक्षण घेत होता. आपली फी भरणं ही त्याला अवघड जात होतं. हा मुलगा अनाथ होता आणि एकदा फीचे पैसे कोठून आणायचे या विवंचनेत होता. एक अतिशय चमकदार कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यानं आणि त्याच्या मित्रानं महाविद्यालयाच्या एका संगीत जलशाचं आयोजन करायचं निश्चित केलं. त्यातूनच आपल्या शिक्षणाची फी गोळा करायचं ठरवलं. त्यांनी एक मोठा पियानोवादक आय. जे. पेडरवस्की यांना भेटायचं ठरवलं. त्यांच्या व्यवस्थापकानं २००० डॉलर एवढ्या रकमेची मागणी संगीत जलशासाठी केली. या दोघा मित्रांचा संगीत जलसा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही मोठा धडाक्यानं सुरू झाले.

जलशाचा दिवस उजाडला. पेडरवस्की यांनी कबूल केल्याप्रमाणे हा कार्यक्रम पारही पडला. परंतु दुर्दैवानं तिकीट विक्रीतून फक्त १६०० डॉलरच जमा होऊ शकले. अतिशय जड अंत:करणानं दोघेही मित्र पेडरवस्की यांच्या घरी पोहोचले. त्यांनी पेडरवस्कींना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांना जमा झालेली संपूर्ण रक्कम म्हणजे १६०० डॉलर्स आणि उरलेल्या ४०० डॉलर्सचा चेक दिला. लवकरच आम्ही या ४०० डॉलर्सची रक्कम देऊ हे वचनही दिलं.

नाही, असं चालणार नाही, मला हे अमान्य आहे असं पेडरवस्की म्हणाले आणि त्यांनी तो ४०० डॉलर्सचा चेक फाडून टाकला आणि मुलांना १६०० डॉलर्सची रक्कम परत केली. त्या मुलांना सांगितलं, हे १६०० डॉलर्स घ्या. यातून तुमचा झालेला खर्च वजा करा. त्यानंतर आपल्याला भरावयाच्या फीची रक्कमही त्यातून काढून घ्या आणि त्यातून जी रक्कम उरेल तीच रक्कम मला द्या. मुलांना या वागण्याचं खूपच आश्चर्य वाटलं आणि या औदार्याबद्दल पेडरवस्कींचे मनापासून आभार मानून मुलं परतली.

ही चांगुलपणाची एक छोटीशीच कृती होती, परंतु त्यावरूनच श्री. पेडरवस्की यांच्या मोठेपणाची एक चुणूक दिसून येते, त्यांच्यातली माणुसकी प्रतीत होते. त्यांना माहीतही नसणाऱ्या परक्या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी मदत का करावी? 

आपणा सर्वांच्यात आयुष्यात हे प्रसंग येतात आणि अशा वेळी आपण मात्र विचार करतो अशीच मदत मी सर्वांना करत राहिलो तर माझं काय होईल? परंतु खऱ्या अर्थी मोठी असणारी माणसं मात्र विचार करतात की मी त्यांना मदत केली नाही तर त्यांचं काय होईल? आपल्याला त्यांच्याकडून परत काय मिळेल, याचा विचारही अशा मोठ्या माणसांच्या मनाला स्पर्श करीत नाही.

पुढे काही वर्षांनी श्री. पेडरवस्की पोलंडचे पंतप्रधान झाले. ते अतिशय उत्तम नेते होते, परंतु दुर्दैवानं जागतिक युद्ध सुरू झालं. त्यात पोलंड उद्ध्वस्त झालं. देशात जवळ १५० लाख माणसं अन्नधान्यावाचून भुकेली होती. त्यांची भूक भागविण्यासाठी पोलंडकडे पैसाही नव्हता. कोठून आणि कशी मदत मिळवावी, या विचारानं पेडरवस्की अस्वस्थ झाले होते. त्यांनी अमेरिकेतील अन्नधान्य आणि साहाय्य या सरकारी प्रशासनाकडे मदत मागितली. त्या विभागाचे प्रमुख हर्बर्ट हुव्हर हे होते. तेच पुढे अमेरिकेचेही अध्यक्ष झाले. हुव्हर यांनी मदत देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी ताबडतोब पोलंडमधील भुकेल्या लोकांसाठी हजारो टन अन्नधान्य पाठवूनही दिलं. पोलंडमधील लोकांवरचा कठीण प्रसंग टळला, संकट दूर झालं. पेडरवस्कींची मोठी चिंता दूर झाली. त्यांनी स्वत: अमेरिकेला जाऊन हुव्हर यांचं आभार मानायचं ठरवलं. 

जेव्हा पेडरवस्की त्यांना भेटले आणि त्यांचे आभार मानू लागले तेव्हा त्यांचे बोलणं मध्येच तोडून पटकन हुव्हर म्हणाले, पंतप्रधान महोदय, आपण माझे आभार मानण्याची काहीच गरज नाही, आणि ते योग्यही होणार नाही. आपल्याला कदाचित स्मरणार नाही, परंतु अनेक वर्षांपूर्वी आपण दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती आणि मी त्यातील एक विद्यार्थी आहे.

हे विश्व म्हणजे अतिशय सुंदर आहे. आपण या जगासाठी जे देतो तेच अनंत पटीनं आपल्याकडेच परत येत असतं. अनेक वेळेस ते आपल्याला कळतही नाही.

लेखक : श्री जयप्रकाश झेंडे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पोहे इंदौरी ?  की… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ पोहे इंदौरी ?  की…  ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

पडला ना प्रश्न ?  ‘ पोहे ‘ महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांचे कधी सकाळच्या न्याहरीचे, पाहुणे आले कि पाहुणचाराचे, मधल्या वेळचे खाण्याचे, मुलगी दाखविण्याच्या पारंपारिक कार्यक्रमातले, आजकाल रात्रीच्या जेवणाचे सुद्धा. पोहे आमचा राष्ट्रीय पदार्थ म्हणा न हवा तर. कारण इंदौरला गेलात तर कळेल की संपूर्ण मध्यप्रदेशात आपले हे मराठी पोहे  किती प्रसिद्ध आहेत. इंदौरचे पोहे, गरम जिलेबी आणि शेव जगभर प्रसिद्ध आहे. “हां भाई हां इसकी चर्चा दुनियाभर में है. पोहा इंदौर के जनजीवन का हिस्सा है”.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची बॉर्डर गाठलीत कि या पोह्यांचा सिलसिला सुरु होतो. ३० वर्षापूर्वी आम्ही  जळगावहून देवासला जात होतो. पहाटे पावणेपाचला बडवाहला गाडी आली. सर्व प्रवासी उतरून गरम-गरम पोहे खात होते. रात्रभराच्या प्रवासाने डोळे तारवटलेले होते. मी बसमध्ये बसल्या बसल्याच, “काय मूर्खपणा आहे हा? ” अशा अविर्भावात ते दृश्य नाईलाज म्हणून पाहत होते. या पोह्यांची प्रसिद्धी आम्हाला माहिती  नव्हती. देवासला गेल्यावर मध्य प्रदेशातील पोह्यांची महती कळली. आपण याला मुकलो असे क्षणभर दुःख झाले. त्याची भरपाई इंदौरला केली.

तीस वर्षानंतर पुन्हा इंदौरला जाण्याचा योग आला. यावेळी मांडव पाहायला जायचे होते. अचानक ठरलेल्या दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये मांडवला मुक्कामी जाण्यापेक्षा इंदौरला मुक्काम करावा म्हणून ठरले आणि खरेदी करण्यापेक्षा सराफ्यातल्या खाऊ गल्लीला भेट देऊ व जेवणाऐवजी प्रसिद्ध पोहे-जिलेबी चा आणि इतर पदार्थांचा बढीया आस्वाद लेऊ असे उद्दिष्ट ठरविले. कारण ‘सराफा – सराफा’. हा सराफा काय आहे आणि इंदौरची खाद्यसंस्कृती काय आहे हे बघायचेच होते.

इंदौर मुक्कामी पोहोचलो. हॉटेलच्या वेटरने उद्या सकाळच्या चहा व ब्रेकफास्ट बद्दल विचारले होते. त्याला फक्त चहा हवा असे सांगितले, कारण बाहेर जाऊन इंदौरी पोह्यांची चव घ्यायची होती. चक्क सकाळी उठून, चहा घेऊन, हॉटेल खालीच समोर एका गल्लीत टपरीवजा दुकाने थाटली होती. तिथे आमची टीम दाखल झाली. दुकानात इतर पदार्थही होते. पण पोहे नक्की असतात कसे? आपल्यापेक्षा काय वेगळे आहे त्यात? उत्सुकता होती. मुलांना दटावलं. वडा-पाव वगैरे काहीही घ्यायचं नाही. फक्त पोहे आणि पोहेच घ्यायचे.

सर्व मुलांची नाराजी होतीच. “पोहे काय घरी कायमच असतात. इथेही तेच का खायचे?” त्यांचं बरोबरच होतं. “वेगळं ट्राय करू”.

कोणी म्हणालं, “इथे छपन्न भोग आहेत तिथे आपल्याला जायचंय”.

“म्हणजे हॉटेलचं नाव का बाबा?”

“अरे ५६ भोग म्हणजे ५६ प्रकारची मिठाई असते”.

“नाही नाही, ५६ मिठाईंची दुकाने आहेत त्या भागात”. असा प्रत्यकाने स्वताचा अर्थ काढला होता.

पण या ठिकाणी संध्याकाळी जायचे होते. हा विषय थांबवत पोहे खायला समोरच्या टपरीवर आम्ही गेलो. बागेत भेळ खातो तसे कागदात पोहे, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू  असे प्रत्येकाने हातात घेऊन खाल्ले. गरम जिलबी ची चव घेतली. इंदौरी पोहे असं म्हटलं कि माझ्या मनात मराठी अस्मिता जागी व्हायची. पोहे ‘आमचे’ आणि नाव ‘इंदौरी’? कुठेतरी मराठीपणाची सूक्ष्म शंका वाटायची.

या पोटभर केलेल्या ब्रेक फास्ट वर सबंध दिवस निघाला. शहरात फेरफटका मारला. प्रसिध्द राजवाडा, होळकर साम्राज्याचा इतिहास असलेल म्युझियम पाहिलं. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास वाचताना आमची मान उंचावली. पण पोहे? अहिल्याबाई होळकरांकडे करत असतील नं पोहे? तुम्हाला हा प्रश्न म्हणजे मूर्खपणा वाटेल. होय, होळकर परिवारासाठी पोहे बनवले जात होते अण्णा उर्फ श्री. पुरुषोत्तम जोशी यांच्या प्रशांत उपहार गृहात.

श्री पुरुषोत्तम जोशी. लागली लिंक. मराठी माणूस जिथे जाईल तिथे आपली मराठी संस्कृती रुजते. जोशी आपल्या आत्याकडे इंदौर ला गेले आणि तिकडचेच झाले. गोदरेज कंपनीत सेल्समनशिप केली. पण स्वतःचा उद्योग  सुरु करावा असं मनात होत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांनी त्यांचे स्नॅक्स सेंटर सुरु झाले. इंदौर मधल्या मिल कामगारांसाठी पोहे सुरु झाले. महाराष्ट्रातील पोहे इथे आले आणि इंदौरच्या खवय्या रसिकांवर राज्य करू लागले. अजूनही करताहेत. इंदौरच्या ८० % लोकांची आवडती डिश पोहेच आहे. आज सुद्धा इथे तयार झालेले पोहे मुंबई आणि दिल्लीच्या अनेक कुटुंबासाठी विमानाने पाठवले जातात. ही डिश सर्व थरातल्या लोकांसाठी तेव्हढीच आवडती आहे. त्यामुळे गरीब श्रीमंत असा भेदच उरत नाही. छुट्टी हो या वर्किंग डे इंदौरच्या हजारो घरांमध्ये रोज पोह्यांचा आस्वाद घेतला जातो. आज मितीला वीस हजार किलो पोहे रोज खाल्ले जातात, असे एका पाहणीत समजले आहे. नवी जीवनशैली आणि नव्या संस्कृतीचा काहीही परिणाम न झालेले असे पोहे हे इंदौरचे आयकॉन आहे.

इंदौरच्या मिल कामगारांसाठी सुरु केलेलं हे मेस वजा पोह्याचं दुकान आज त्यांची तिसरी पिढी चालवतेय जेलरोड, ए. बी. रोड, यशवंत रोड, आणि नवरतन बाग असे चार आऊटलेट्स. इथे पोहे रसिकांसाठी रोज सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत ४० ते ५० किलो पोहे तयार होतात. जवळ जवळ ६५ माणसे हे काम करतात. १९५० मध्ये पंडित नेहरू कॉंग्रेस अधिवेशनासाठी इंदौरला आले असताना त्यांनी या पोह्यांचा आस्वाद घेतला. त्यांनी प्रभावित होऊन अण्णांना बोलावले आणि सांगितले, “यह तो अवाम का नाश्ता है”. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, माधवराव सिंधिया आणि ब-याच जणांनी याचा आस्वाद घेतला आहे. असा हा पोह्यांचा इंदौरी प्रवास.

रायपूर शहरातही जयस्तंभ चौकात कांदा पोह्याचा ठेला आहे. सकाळी सहा ते दहा या वेळेत पोहे विक्रेते साहू महिना दोन लाख रुपये कमावतात. नागपूरच्या ‘के. पी की टपरी’ वाले प्रसिध्द पोहे विक्रेते रूपम साखरे पोहे व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये कमावतात आणि दरवर्षी कुटुंब घेऊन वर्ल्ड टूर ला जातात. गेली ३५ वर्षे ते हा व्यवसाय करतात. रोज सकाळी भाजी घ्यायला आपल्या होंडा सिटी गाडीने जातात. त्यांची ‘चना पोहा डिश’ प्रसिध्द आहे. बघा आपल्या पोह्यांनी कसा बिझिनेस दिलाय. हे झालं मराठी पोह्याचं राज्याबाहेरील चित्र.

कोकणातल्या वाडीत डोकावलं तर पोह्यांची परंपरा अजून वेगळी दिसेल. परंपरेनुसार दिवाळीत फराळाच्या पदार्थांमध्ये लाडू, चकली, चिवडा, करंज्या,.. ही यादी. पण कोकणातल्या दिवाळीत म्हणजे नरक चतुर्दशी ‘चावदिस’ या दिवशी या फराळाच्या पदार्थांना स्थान नाही, तर फराळाला आलेल्या लोकांसाठी केलेले पारंपारिक पद्धतीचे पोहे याचे महत्व असते. या दिवशी सकाळी नातेवाईक आणि शेजा-यांना एकमेकांच्या घरी पोहे खायला यायचं आमंत्रण दिलं जातं. तिखट पोहे, गोड पोहे, दुध पोहे, गुळ पोहे, बटाटा पोहे असे प्रकार आणि त्या बरोबर  केळीच्या पानात सजवलेली रताळी, काळ्या वाटण्याची उसळ देतात. सिंधूदुर्गात ही प्रथा आजही पाळतात. म्हणजे घरात भातापासून तयार केलेले पोहेच या दिवशी वापरतात.

हा सिझन भाताचं नवं पीक येण्याचा असतो. हा भात, पोहे तयार करण्यासाठी आदल्या दिवशी भिजत घालतात, तो सकाळी गाळून घेऊन, मडक्यात भाजला जातो. नंतर उखळीत मुसळीने कांडला जातो. या कांडपणी नंतर तयार झालेले हे पोहे चुलीवरच शिजवले जातात. या वाफाळलेल्या अस्सल गावठी भाताच्या पोह्यांची चव असते निराळीच. या सिझनच्या पहिल्या पोह्यांचा नेवैद्य  देवाला दाखवून मग आस्वाद घायची ही परंपरा.

इंदौरी पोह्यांचे ‘उर्ध्वयू’ अण्णा उर्फ पुरुषोत्तम जोशी कोकणातलेच हो.

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋतु गाभुळताना… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

? मनमंजुषेतून ?

☆ ऋतु गाभुळताना… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ 

झोपता झोपता दूरदर्शन बातमी देतं..

मान्सून एक जूनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..

मार्च, एप्रिल… २४तास एसी, कुलर, पंख्याला आचवलेलं शरीर.. पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ, चादर, बेडशीट साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

ऐटीत झाडावरुन मोहित करणारे बहावा, पलाश, गुलमोहोर…

 वार्‍याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात. झाडावरचं कैऱ्यांचं गोकुळ रिकामं होऊन गेलेलं, एखादा झाडावरच पिकलेला आंबा, खाली पडून केशर कोय सांडतो. जांभुळ, करवंदाचा काळा, जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

आई-आजीची लोणच्या, साखरंब्याची घाई, कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग, गच्ची-गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तू आडोश्याच्या जागी हलवायची बाबा-आजोबांची गडबड…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..

साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते. उरलेल्या पापड, कुर्डया आता हवाबंद डब्यात जाऊन बसतात. डाळ, पन्हं, आईस्क्रीम, सरबतं, सवयीची होत जातात. माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

दुर्वास ऋषींच्या आविर्भावात आग ओकणारा रवी..

काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो, मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता… असाच दमुन जातो. भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो. गच्ची, दोरीवरच्या कपडे, गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

निरभ्र वाटणारं आकाश,

क्षणात आभाळ होऊन जातं,

ऊन सावलीच्या खेळात चराचर सावळं होतं.

वीज गडगडाटानं रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..

धावपळीची होते.

झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल, किलबिल न राहता,

नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..

उफाळत्या जमिनीत नांगर फिरू लागतात,

मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात,

मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात..

… खुशाल समजावं तेव्हा ऋतु गाभुळतोय.

 

उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी 

देहमनाने आपणही आतुरतो….

… तेव्हा अगदी खुशाल समजावं…

…. ऋतु गाभुळतोय… 

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

मन म्हणजे काय ? ‘मन’ कसे असते ? ते खरंच असते का ? ते असते तर नक्की कुठे असते ? मनाचे कार्य काय असते ? मनुष्याला मनाचा नक्की काय उपयोग होतो ? मन इंद्रिय आहे की नाही ? असे अनेक प्रश्न मन हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात येऊ शकतात. सामान्य मनुष्यापासून संतांपर्यंत, अरसिकांपासून रसिकांपर्यंत, बद्धापासून सिद्धापर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीने मनाचा अभ्यास करतो आहे. पण यातील प्रत्येकाला मनाचा थांगपत्ता लागला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अनेक संत, कवी, लेखक, तत्त्ववेत्ते, अभ्यासू वक्ते आदींनी ‘मना’वरील आपले विचार विविध प्रकारे शब्दबद्ध केले आहेत. आपल्याला हत्ती आणि चार आंधळे यांची गोष्ट ज्ञात आहे. त्यातील प्रत्येक आंधळा त्याच्या मतीगतीनुसार हत्तीचे वर्णन करतो. त्याचप्रमाणे इथेही प्रत्येकाने आपापल्या परीने मनाचे वर्णन केले आहे. त्याच्या त्याच्या परीने ते योग्य असेलही पण म्हणून ते पूर्ण आहे असे आपण नाही मानू शकत. ज्याप्रमाणे भगवंताचे पूर्णपणे वर्णन करणे कोणालाही शक्य झालेले नाही तसेच मनाचे देखील असावे. कारण गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मीच ‘मन’ आहे.

सर्व प्राणिमात्रांत भगवंताने मनुष्याला ‘मन’ आणि ‘व्यक्त होण्याची कला’ विशेषत्वाने प्रदान केली आहे. एका अर्थाने मनुष्याचे मन हेच मनुष्याचे प्रेरणास्त्रोत आणि त्याचवेळी शक्तीस्रोत देखील आहे.

“मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:”

मनुष्याचे मनच त्याच्याकडून सर्व काही करवून घेत असते आणि त्याचे बरेवाईट परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात. सर्व संतांनी मनाचा अभ्यास केलेला आहे. पण श्री समर्थांनी मनाचा केलेला अभ्यास अधिक सुस्पष्ट, सखोल आणि सूत्रबद्ध आहे असेच म्हणावे लागते. याला एकमेव कारण म्हणजे  समर्थांनी लिहीलेले मनाचे श्लोक !!  मनाचे श्लोक लिहिण्याआधी देखील समर्थांनी करुणाष्टकात मनाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे.

‘अचपळ मन माझे नावरे आवरीता।’ 

 ‘चपळपण मनाचे मोडीता मोडवेना।’

मनाच्या श्लोकांइतके मनाचे  सूत्रबद्ध आणि वस्तुनिष्ठ विवेचन खचितच कोणत्या अन्य ग्रंथात केले गेले असावे. म्हणून मनाचे श्लोक’ हा प्राचीन आणि आधुनिक मानसशास्त्राचा संदर्भग्रंथ ( handbook ) ठरावा. मानवाने प्रगती केली ती प्रामुख्याने भौतिकस्तरावरील आहे. मनुष्याच्या अंतरंगात बदल करणे तर दूर पण मनुष्याच्या अंतरंगाची  वस्तूनिष्ठपणे मांडणी करणे किंवा त्याचा सर्वांगीण अभ्यास करणे हे सुद्धा मनुष्याला पुर्णपणे शक्य झालेले नाही. मनाच्या श्लोकांची निर्मितीकथा तशी रंजक आहे. ती आपल्याला ज्ञात देखील असेल. पण ते एक निम्मित झाले असावे असे वाटते. समर्थांसारखा विवेकी संतमहात्मा कोणतीही गोष्ट प्रतिक्रियात्मक करेल हे काही मनाला पटण्यासारखे नाही.

मनाचा विषय आहे तर ‘मन’ म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. जरी मन मनालाही उमजत नसले तरीही मन म्हणजे एक सुजाणीव आहे असे आपण म्हणू शकतो. ज्यातून मानवी व्यक्तित्व प्रतिबिंबित होईल अशी जाणीव. मन म्हणजे व्यक्तित्वाचा सुघटित आकार आचारणात आणणे. कांद्याचा पापुद्रा काढता काढता कांदा संपतो. त्याचे ‘कांदेपण’ डोळ्यांतील पाण्यातून जाणवते. तसेच मनाच्या पापद्र्यांतून सर्वात शेवटी जी विशुद्ध निराकार जाणीव उरते, त्याला मन असे  म्हणता येईल. ह्या काही मोजक्या व्याख्या आहेत. प्रतिभावंत लेखक ‘मन’ आणखी विविध प्रकारे मांडू शकतात.

मन ह्या विषयावर किंवा त्याच्या अभ्यासावर काही तज्ञांचे मतभेद असतील किंवा नसतीलही पण एक गोष्ट मात्र सर्व संतमहंतांनी आणि आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी एकमुखाने मान्य केली आहे ती म्हणजे जर मनुष्याला खरे सुख प्राप्त करायचे असेल तर त्याचा मुख्य रस्ता हा त्याच्या मनातूनच जातो. अर्थात मन प्रसन्न केल्याशिवाय मनुष्य सुखी समाधानी होऊ शकत नाही. मग ज्येष्ठ कवी भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी सहज म्हणून जातात.

“रण जिंकून नाही जिंकता येत मन।

मन जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

(*वरील अवतरण अनुवादित आहे)

मनुष्याला कोणतेही सुख प्राप्त करायचे असेल, जीवन आनंदात जगायचे असेल त्याने प्रथम मन राजी करणे, मनाला जिंकणे अपरिहार्य ठरते. मनाला सोडून कोणतीही गोष्ट करणे शक्य नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज देखील म्हणतात,

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”.

‘मन’ हा शब्द संतांनी फक्त मनुष्यापुरता संकुचित ठेवलेला नाही. मानवीमन, समाजमन, राष्ट्रमन असे विविध आयाम त्यांनी या मनास जोडले. भारतीय संतांनी मनाची व्यक्तिशः जडणघडण करण्याचा प्रयत्न तर केलाच पण समाजमन कसे खंबीर होईल आणि पर्यायाने राष्ट्र बलवान कसे होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि त्याप्रमाणे समाजाकडून कृती देखील करवून घेतली. ज्यांच्या मनाची ‘माती’ झाली आहे अशा लोकांच्या मने  चैतन्याने भारुन, त्यांच्यात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवून त्यांच्याकडून गौरवशाली कार्य करवून एका अर्थाने इतिहास घडविण्याचा चमत्कार अनेक संतांनी आणि राजेमहाराजांनी केल्याचे वर्णन इतिहासात आहे. शालिवाहनाने ‘माती’तून  सैनिक उभे केल्याचे वर्णन आहे. छत्रपतींनी सामान्य मावळ्यांमधून कर्तव्यनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वराज्यसेवक निर्माण केले. ही दोन्ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.

समर्थांनी विपुल साहित्य लिहून ठेवले आहे. पण समर्थांची ‘प्रस्थानत्रयी’ म्हणून ज्याचा गौरव केला जातो त्या तीन ग्रंथांमध्ये ‘मनाचे श्लोक’, ‘दासबोध’ आणि ‘आत्माराम’ यांचा समावेश आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे समर्थांच्या अध्यात्माच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम म्हणून ‘मनाचे श्लोकच’ असतील यात बिलकुल संदेह नसावा. श्री. सद्गुरु गोंदवलेकर महाराज, श्री सदगुरु श्रीधरस्वामी आणि अनेक समकालीन संतांनी मनाच्या श्लोकांचा यथोचित गौरव केला आहे. आदरणीय विनोबाजी तर मनाच्या श्लोकांना ‘सोन्याची तिजोरी’ असे म्हणतात. ह्यातील कौतुकाचा आणि श्रद्धेचा भाग सोडला आणि आचरण सूत्रे म्हणून जरी ह्या मनाच्या श्लोकांकडे पाहिले तरी मनुष्याच्या अंतरंगात आणि बहिरंगात बदल करण्याचे सामर्थ्य यामध्ये निश्चित आहे.

एकूण मनाचे श्लोक २०५ आहेत. शेवटचा आणि पहिला मंगलाचरणाचा श्लोक सोडला तर उरलेल्या २०३ श्लोकांत समर्थांनी फक्त मनाला उपदेश केला आहे. तसं पाहिलं तर मनाचे श्लोकाचे मर्म पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा।

नमू शारदा मूळ चत्वार वाचा।

गमू पंथ आनंत या राघवाचा।।१।।

वरील श्लोकाच्या शेवटच्या ओळीतच सर्व पुढील श्लोकांचे सार आले आहे. अनंत राघवाच्या मार्गावर चालणे याचा अर्थ ‘मनुष्यत्वाकडून देवत्वा’कडे प्रवास सुरु करणे असाच आहे. पण मानवी मनाचे अनेक कंगोरे साधकांना समजावेत म्हणून समर्थांनी या श्लोकांचा विस्तार केलेला असावा असे म्हणायला जागा आहे. उपलब्ध संतसाहित्यातील वर्णनाप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवास ‘मनुष्यत्व ते पशुत्व’ (राक्षसत्व) किंवा ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा होत असतो. मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट हे जीवाला परमात्म्याची भेट घडवून देण्यातच आहे असे सर्व संत सांगतात. पण मनुष्य स्वभावतः स्खलनशील प्राणी आहे. म्हणून मनुष्याला जर देवत्वाकडे न्यायचे असेल तर विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि त्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे मानवी मनाला शिकवण देणे. एकदा का मन कह्यात आले की जगातील कोणतीही गोष्ट मनुष्याला असाध्य नाही.

ज्याप्रमाणे भारतीय संतांनी, तत्ववेत्त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला तसा पाश्चात्य चिंतकांनी देखील मानवी मनाच्या एकूणच पसाऱ्याचा अभ्यास केला. यामध्ये सिगमंड फ्रॉइड आणि अल्बर्ट एलिस या प्रमुख मानसशास्त्रज्ञांचा उल्लेख करावा लागेल. सध्या जगभर प्रचलित असलेली मान्यताप्राप्त मानसोपचार पद्धती म्हणून  विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र पद्धती ( Rational Emotive Behavioral Therapy ) प्रसिद्ध आहे. आयुष्य हे एक मर्यादित घटनांची मालिका असते. घटना घडत असतात आणि त्या घडतच राहणार. पण सामान्य मनुष्य घडणाऱ्या छोट्यामोठ्या घटनांना समस्येचं लेबल चिकटवून टाकतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक घटनेला समस्या मानणं हीच खरी आणि मूळ समस्या आहे. आपल्या आयुष्यात घटना घडू लागल्यावर आपल्याला वाटते की त्या घटनेतच समस्या आहे. परंतु समस्येचं वास्तव्य आपल्याच डोक्यात असते. या मूळ गोष्टीपासून मात्र सर्व अनभिज्ञ असतात. म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे  तटस्थपणे बघू शकू.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थोडा अंधार हवा आहे … – लेखक : योगिया ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ थोडा अंधार हवा आहे … – लेखक : योगिया ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागत. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.

मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑप्शन होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. “कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा.. आता हळूहळू  डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगास पेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होतं असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.

माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. “अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात.. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा”.. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ५० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिसस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त  खड्डे दिसतात हेच खरं.

पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.

लेखक : योगिया 

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares