मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

अणुशक्ती नगर मधल्या माझ्या एका मैत्रिणीला दोन्ही मुलगेच होते.आम्हा सर्वांची मुलं एकत्रच लहानाची मोठी झाली. जेव्हा आमची मुलं काॅॅलेजातही जायला लागली तेव्हा आमच्या group मधली  ती मैत्रीण आम्हाला म्हणाली की ‘ मला दोन्ही मुलगेच आहेत ग. कधीकधी ना मला, आज ना उद्या त्यांची लग्नं होऊन

घरी सुना येतील या विचाराची भीतीच वाटते. काय माहीत मला कशा सुना मिळतील….? हल्लीच्या मुलींच्या इतक्या गोष्टी ऐकतो ना आपण…. !’

आम्हाला तर तिचं बोलणं ऐकून हसूच आलं.आम्ही तिघी मैत्रिणी दोन दोन मुलीवाल्या होतो.आम्ही

म्हटलं की ‘ आम्ही मुलींच्या आयांनी घाबरायचं , त्यांना घर कसं मिळेल.. ? सासरची माणसं कशी असतील..म्हणून. तर तूच काय घाबरते आहेस… ?’ मग आम्ही सर्वांंनी तिची समजूतही 

घातली आणि चेष्टाही केली. पण तिच्या मनात या विचाराने घर केलेलं होतंच. 

एकदा आम्हाला आमच्या काॅलनीतल्या एक ओळखीच्या बाई भेटल्या.त्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.त्यांना पण दोन्ही मुलगेच होते आणि त्यांची लग्नं झालेली होती.

त्यांच्याशी गप्पा मारताना माझी मैत्रीण त्यांना म्हणाली, ‘तुम्हाला दोन सुना आहेत. तुम्हाला टेन्शन नाही का येत त्यांच्याशी बोलताना किंंवा वागताना… ?’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘ नाही हो. या मुली तशा चांगल्या असतात. फक्त त्यांच्या बाबतीत आपण काही पथ्यं पाळली ना , की  काहीच  प्रॉब्लेम येत नाही.मग सुनांचे आपल्याशी संबंध कायम गोडीगुलाबीचेच राहातात. 

माझ्या मुलांची लग्नं ठरल्यानंतर लगेेचच, ‘घरात सून आली की तिच्याशी कसं वागायचं ‘ते मी ठरवून टाकलेलं होतं.

– – पहिली गोष्ट म्हणजे तिला कधीही कुठल्याही बाबतीत टोकायचं नाही…मुुळात तिच्याकडून फार 

अपेक्षाच ठेवायच्या नाहीत..!

आता समजा मुलगा आणि सून अचानक बाहेर जायला निघाले, तर ‘कुठे जाता? कधी येणार.. ?जेवायला  असणार का….. ?’ यातलं काहीही त्या दोघांना विचारायचं नाही… !

कधी मुलाने येऊन सांगितलं की ‘ ‘आज ‘ही’ office मधून येताना परस्पर माहेरी जाणार आहे राहायला..’ 

तर त्यावर ,’ किती तारखेला परत येणार… ?’असा प्रश्न विचारायचा नाही.किंवा ‘ तिनेच का नाही मला

सांगितलं.. ? तू मध्यस्थ कशाला हवास.. ? मी काय तिला नको म्हणणार होते का..?असलं 

काहीही बोलायचं नाही. फक्त ”बरं !” एवढंच म्हणायचं.

जर मुलगा सून खरेदी करून आले आणि मुलगा म्हणाला की दुकानात नेमका सेल लागलेला होता.म्हणून हिने चपलांचे तीन जोड घेतले. तर, ‘चपलांचे चार जोड आधीचेच घरात पडले आहेत.आता हे कशाला हवे होते? आम्ही तर चपलांचा एकच जोड तुटेपर्यंत वापरायचो..!’ असं पुटपुटायचं सुद्धा नाही..काय

म्हणायचं.. ? ” हो का … बरं… !”

कधी सून म्हणाली की,’आई , आज माझ्या 5- 6 मैत्रिणी येणार आहेेत घरी. तेव्हा तुम्हालाआणि 

बाबांंना आज संध्याकाळी TV वरच्या संंध्याकाळच्या serials नाही बघता येणार. मग तुमच्या खोलीतच बसून राहाण्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही थोडावेळ गार्डनमधे जाल का..?म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि माझ्या मैत्रिणींनाही मोकळं वाटेल.’तर  ह्यावर आपण काय म्हणायचं…..? ” बरं…!”

समजा त्या दोघांचा अचानक बाहेेर जेवायला जायचा बेत ठरला तर मुलगाच सांगेल तुम्हाला.’आई 

आम्ही बाहेर जातोय.बाहेरून जेवूनच येऊ. तर ‘ अरे मग आधी सांगायला काय झालं होतं… ? बाईला चार पोळ्या कमीच करायला सांगितलं असतं ना ? आता सगळं अन्न उरणार. आणि उद्या आम्हाला सगळं शिळं खावं लागणार… !’ अशी कुरकुर करायची का…?छे …छे… ! 

मग आपण काय म्हणायचं..? ” बरं !”

आजकाल तर अगदी दिवसाआड Amazon मधून खरेदी केलेली parcels घरी येत असतात. मुलं

दिवसभर घरात नसतातच.तेव्हा आपणच ती घेऊन ठेवतो.पण ती अजिबात उघडायची नाहीत. संध्याकाळी सून घरी आल्यावर, कपाळावर अगदी एकही आठी न घालता, शांतपणे ‘ हे तुझं काय काय मागवलेलं आलंय बरं का ग ‘  असं म्हणून सगळं तिच्या ताब्यात द्यायचं.’एवढं काय काय मागवलं आहेस… ?’ असं ही विचारायला जायचं नाही.. आणि तिने दाखवलंच तर ”वा.. छान.. !”‘ म्हणायला देखील विसरायचं नाही.

अगदी, आपल्याला नातू किंवा नात झाल्यानंतर, पाच सहा महीन्यांनी कामावर हजर होताना जर सून म्हणाली की ‘आता रोज office ला जाताना मी बाळाला माझ्या आईकडेच सोडून जात  जाईन आणि संध्याकाळी येताना घेऊन येत जाईन.’ तर अशा वेळी, तुुमच्यात अगदी बाळाला सांंभाळायची आवड आणि ताकद दोन्ही असली तरीदेखील फक्त एकच  दोन अक्षरी मंत्र उच्चारायचा …! 

सांंगा कोणता….? ” बsssरं…! “

‘फक्त हा एकच ‘मंत्र’ तुम्ही सदैव जपत राहिलात, तर मग तुमचं मुलाशी नि सुनेशी असलेलं नातं अगदी निश्चित छान राहील….!’

….खरंतर हा मंत्र मुलांच्या आणि मुलींच्या, दोन्ही आयांनी पक्का लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

एकूणच मुलांच्या संसारात कोणतीच लुडबूड करायची नाही. की त्यांना सल्ले द्यायलाही जायचं

 नाही…मग कित्ती सोपं होऊन जाईल ना सगळं….?

मात्र कायम हे लक्षात असू दे की कधीकधी,अगदी सोप्प्या वाटणा-या गोष्टीच सगळ्यात कठीण असतात

लेखिका : सुश्री मंगला खानोलकर

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

वैशाली आणि गौरवचं नुकतंच एका महिन्यापूर्वी लग्न झालेलं… दोघेही मूळ अकोल्याचे. नोकरी निमित्त गौरव आधीच मुंबईमध्ये स्थाईक झालेला आणि आता लग्नानंतर वैशालीने देखील मुंबईमध्ये नोकरी बघण्याचे ठरले. वैशाली जरी अकोल्यात वाढलेली तरी एकदम स्मार्ट, प्रचंड हुशार आणि हुशार असल्याने साहजिकच थोडीशी आत्मकेंद्री.. नाही म्हणजे मित्र मैत्रीण होते तिला, पण तरीही तिचा अभ्यास वगैरे सांभाळून मगच त्यांच्या बरोबर मज्जा करायला, फिरायला जाणारी अशी होती ती. आई अनेकदा तिला सांगत, अगं असं घुम्या सारखं राहू नये.. चार लोकात मिसळावं, आपणहून बोलावं, ओळखी करून घ्याव्यात… पण तेव्हा तिला काही ते फार पटत नसे.. आई सतत तिच्या बरोबर असल्यामुळे तिलाही कधी एकटं वगैरे वाटलं नाही…

आता मुंबईमध्ये आल्यावर हळू हळू इथलं वातावरण अंगवळणी पडत होत तिच्या.. वैशालीला मुंबईला घरी येऊन १०/१२ दिवस झाले होते.. कामवाली बाईसुद्धा मिळाल्याने वैशालीचा भार एकदम कमी झाला होता… 

ती अशीच एका दुपारी पुस्तक वाचत बसली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली.. तिने थोडंसं नाराजीनेच दार उघडलं.. पाहते तो साधारण ७० च्या आसपास वय असलेल्या आज्जी उभ्या होत्या दारात… 

तिने दारातूनच विचारलं, “आपण कोण? काय हवं आहे?”

“मी, लतिका देवस्थळी.. इथे शेजारच्या फ्लॅट मध्ये राहते.” आज्जीबाईंनी माहिती पुरवली.

“बरं…काही काम होतं का??”, आपली नाराजी सुरातून फार जाणवू न देता वैशालीने विचारलं.

” १०/१२ दिवस झाले तुम्हाला येऊन , म्हटलं ओळख करून घेऊ.. म्हणून आले… आत येऊ? ” 

वैशालीने थोडं नाराजीनेच दार उघडलं… तशी आज्जीबाई आनंदाने घरात येऊन सोफ्यावर बसल्या…

“थोडं पाणी देतेस??”, आज्जी नी विचारलं.

“हो…”

वैशाली स्वयंपाक घरातून पाण्याचा ग्लास घेऊन आली…

“छान सजवलयस हो घर… निवड चांगली आहे तुझी… मला थोडी साखर देतेस.. घरातली संपली आहे… ह्यांना चहा करून द्यायचाय.. मेला, तो किराणावाला फोन उचलत नाहीये माझा.. कुठे उलथलाय देव जाणे..” आज्जी एका दमात सगळं बोलून गेल्या.

“हो आणते…”  वैशाली वाटी भरून साखर घेऊन आली….. 

“चला आज साखर दिलीस.. आपलं नातं साखरे सारखं गोड राहील हो पोरी “, असं म्हणून देवस्थळी आज्जी तिच्या गालाला हात लावून निघून गेल्या…

जरा विचित्रच बाई आहे?? असं पहिल्याच भेटीत कोणी काही मागत का.. आणि हे काय, गालाला काय हात लावला तिने.. जरा सांभाळूनच राहावं लागणार असं दिसतंय… वैशालीचं आत्मकथन सुरू होतं.. तेवढ्यात गौरव आला….. 

तिने गौरवच्या कानावर घडलेला प्रकार घातला… तो म्हणाला, ” अग म्हाताऱ्या आहेत ना वाटलं असेल तुझ्याशी बोलावं म्हणून आल्या असतील.. नको काळजी करूस..”

एक दोन दिवस गेले अन् परत दुपारी दारावरची बेल वाजली..

वैशालीने दार उघडलं तर समोर आज्जी… आणि हातात वाटी…. आज ही काहीतरी मागायला आल्यात वाटतं…

“जरा थोडा गूळ देतेस का?? ह्यांना आज गूळ घातलेला चहा प्यायचाय आणि घरातील गूळ संपलाय…” इति आज्जी

“हो.. देते…”

वैशाली वाटीतून गूळ घेऊन आली … 

“वा .. धन्यवाद हो पोरी… चांगली आहेस तू… असं म्हणून तिच्या हाताला हात लावून आज्जी घरी गेल्या..”

तिला परत असं त्यांनी स्पर्श करणं जरा खटकलं ….. 

पुन्हा एक दोन दिवस झाले आणि आज्जी दारात उभ्या आणि हातात वाटी, “जरा दाणे देतेस…”

— हे असं हल्ली दर एक दोन दिवस आड चाले… काहीतरी मागायचं आणि जाताना हाताला, गालाला, पाठीला, डोक्याला हात लावून निघुन जायचं… वैशालीला ते अजिबात आवडत नसे, अस परक्या बाईने आपल्याला हात लावणं..

ती आपली गौरवला नेहमी सांगायची पण तो काही हे सगळं फार सिरीयसली घेत नव्हता…

एके दिवशी न राहवून तिने ठरवलं आता आज आपण त्यांच्या घरी जाऊन काहीतरी मागू या… हे काय आपलं सारखं घेऊन जातात काही ना काही….. 

वैशाली ने आज्जींचं दार वाजवलं.. आजींनी दार उघडलं तशी वैशाली घरात गेली..

आज्जी, ” अरे व्वा, आज चक्क तू माझ्या घरी आलीस.. छान छान.. खूप बरं वाटलं…” 

वैशाली आपलं स्मितहास्य करत घरावरून नजर फिरवत होती आणि एका जागी तिची नजर खिळली… भिंतीवर २५/२६ च्या आसपास असलेल्या एका सुंदर मुलीचा फोटो आणि त्याला हार…

आज्जीच्या लक्षात आलं… 

” ही माझी वैशाली… काय गंमत आहे नाही… सेम नाव… काही वर्षांपूर्वी अपघातात गेली… मला कायमच पोरकं करून… जेव्हा तू इथे रहायला आलीस आणि तुझं नाव ऐकलं ना तेव्हा सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या… खूप अडवलं ग मी स्वतःला की माझी वैशाली आता नाहीये आणि परत कधीच येणार नाहीये… पण मन फार वेड असतं पोरी… बुद्धीवर मात करतंच….  

…. आणि मग मी सुरू केलं तुझ्याकडे उसनं सामान घ्यायला येणं… पण खरं सांगू, मी सामान नाही ग .. 

स्पर्श उसना घेत होते… !! ” 

लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – माझे बाबा ‘तो’ आणि मी यांच्यातला एक दुवा आहेत असं पूर्वी वाटायचं. ते गेले आणि तो दुवा निखळला याची रुखरुख पुढे बरेच दिवस मनात होती.पण ‘त्या’नेच मला सावरलं. तो दुवा निखळल्यानंतर ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर खरंतर वाढायला हवं होतं पण तसं झालं नाही.ते दिवसेंदिवस कमीच होत गेलं.)

आज मला जाणवतं ते असं की माझ्या अजाण वयापासूनच सभोवतालच्या आणि विशेषतः घरच्या वातावरणामुळे श्रद्धेचं बीजारोपण माझ्या मनोभूमीत झालंच होतं. नंतरच्या अनेक अघटीत घटना, प्रसंग यांच्या खतपाण्यामुळे ते बी रुजलं,अंकुरलं आणि फोफावलं. त्या श्रद्धेबरोबरच आई-बाबांनी त्यांचे अविरत कष्ट, प्रतिकूल परिस्थितीतही जपलेला प्रामाणिकपणा, सह्रदयता आणि माणुसकी यासारख्या मूल्यांचे संस्कार स्वतःच्या आचरणांनी आम्हा मुलांवर केले होतेच. त्यामुळे मनातल्या श्रद्धेतला निखळपणा सदैव तसाच रहाण्यास मदत झाली. ती श्रद्धा रुजता-वाढताना कधी कणभरही अंधश्रद्धेकडे झुकली नाही.अनेक अडचणी, संकटांच्यावेळीही ‘त्या’च्याकडे कधी ‘याचक’ बनून पहावंसं वाटलं नाही. त्या त्या प्रत्येक वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना ‘तो’ फक्त एक साक्षीदार म्हणून सदैव माझ्या मनात उभा असायचा. ‘कृपादृष्टी असू दे’ एवढीच मनोमन एकच प्रार्थना ‘त्या’च्या चरणी असे. त्यामुळे स्वतःची अंगभूत कर्तव्यं निष्ठेने आणि मनापासून पार पाडण्याकडेच कल कायम राहिला. नित्यनेमाचे रूपांतर त्यामुळेच असेल कर्मकांडात कधीच झाले नाही. तसे कधी घडू पहातेय अशी वेळ यायची तेव्हा या ना त्या निमित्ताने मी सावरलो जायचो. मग आत्मपरीक्षणाने स्वतःच स्वतः ला सावरायची सवय जशी अंगवळणी पडली तसा मी ‘त्या’च्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलो. ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर कमी होत जाण्याचे हे एक ‘प्रोसेस’ होते!

आणि मग वेळ आली ती माझ्या कसोटीची. पण त्यालाही माझे बाबा १९७३ साली गेल्यानंतर दहा वर्षांचा काळ उलटून जावा लागला!

बाबा नेहमी म्हणायचे, “दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळे ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकाला जमत नाही.करवून घेणारा ‘तो’च ही भावना हवी.एकदा निश्चय केला कि  मग त्यापासून परावृत्त करणारेच प्रसंग समोर येत रहातात.तेच आपल्या कसोटीचे क्षण.जे त्या कसोटीला खरे उतरतात तेच तरतात….! “

‘तो’ आपली कसोटी पहात असतो म्हणजे नेमकं काय? आणि त्या कसोटीला ‘खरं’ उतरणं म्हणजे तरी काय? याचा अर्थ समजून सांगणारा अनुभव मला लगेचच आला.

तो दत्तसेवेच्या वाटेवरचं पुढचं पाऊल टाकण्याचा एक क्षण होता. घडलं ते सगळं  अगदी सहज घडावं असं.

यापूर्वी उल्लेख केल्यानुसार १९५९ साली कुरुंदवाड सोडून किर्लोस्करवाडीला जायची वेळ आली तेव्हा आईने दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दर्शनाला येण्याचं व्रत स्वीकारलं होतं. ते व्रत जवळजवळ दोन तपं अखंड सुरु होतं. आई वय झालं तरी ते व्रत बाबा गेल्यानंतरही श्वासासारखं जपत आली होती.

माझे बँकेतले कामाचे व्याप, जबाबदाऱ्या, दडपणं हे सगळं दिवसेंदिवस वाढत होतंच. त्यामुळे रोजची देवपूजा आणि गुरुचरित्राचं नित्य-वाचन एवढाच माझा नित्यनेम असायचा.

नोव्हेंबर १९८३ मधल्या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई नृसिंहवाडीला गेली आणि अचानक माझी मावस बहिण सासरच्या कार्यासाठी या भागात आली होती आणि माझ्या आईला  भेटून जावं म्हणून आमच्या घरी  आली. थोडा वेळ बसून बोलून मग पुढे पुण्याला जायचं असं तिनं ठरवलं होतं.आई यायची वेळ होत  आली होतीच म्हणून तिची वाट पहात ती  थोडा वेळ थांबली होती.

मी नुकताच बँकेतून येऊन हातपाय धुवत होतो तेवढ्यात आई आली. त्यामुळे दार उघडायला तीच पुढे झाली. आमच्या मुख्यदारापर्यंतच्या तीन पायऱ्या चढतानाही आई खूप थकल्यामुळे गुडघ्यावर हात ठेवून सावकाश चढतेय आणि बहिण तिला हाताचा आधार देऊन आत आणतेय हे मी लांबून पाहिलं आणि कपडे बदलून मी बाहेर जाणार तोवर बहिणीने तिला खुर्ची देऊन भांडंभर पाणीही नेऊन दिलं होतं.

“किती दम लागलाय तुला. आता पुरे झालं हं. अगदी देवधर्म आणि नेम झाला तरी शरीर स्वास्थ्यापेक्षा तो महत्त्वाचा आहे कां सांग बघू. खूप वर्ष सेवा केलीस.आता तब्येत सांभाळून रहायचं” बहिण तिला पोटतिडकीने सांगत होती. दोघींचा संवाद अगदी सहज माझ्या कानावर पडत होता.

“सवयीचं झालंय ग आता.नाही त्रास होत.जमेल तेवढे दिवस जायचं. नंतर आराम आहेच की. त्याच्या कृपेनंच तर सगळं मार्गी लागलंय. मग घरच्या कुणी एकानं तरी जायला हवंच ना गं? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे व्याप आहेतच ना? इथं मी रिकामीच असते म्हणून मी जाते एवढंच” आई म्हणाली.

आईनं आजपर्यत हक्कानं, अधिकारानं आम्हा कुणावर कधीच काही लादलं नव्हतं. आज मावस बहिण आल्याचं निमित्त झालं म्हणून आईच्या मनाच्या तळातलं मला नेमकं समजलं तरी. आई आता थकलीय. घरातल्या कुणीतरी एकानं जायला हवंच तर मग ते मीच हे ओघानंच आलं. कारण तेव्हा माझा मोठा भाऊ बदली होऊन नागपूरला गेला होता. लहान भाऊ अजून शिकत होता. प्रवासाची दगदग आता यापुढे आईला जमणार नाही हे या प्रसंगामुळे मला तीव्रतेने जाणवलं होतं आणि आईचं ते व्रत आता यापुढे आपण सुरु ठेवायचं आणि त्यातून तिला मोकळं करायचं हे त्याचक्षणी मी मनोमन ठरवून टाकलं. त्यानंतरची डिसेंबर १९८३ ची पौर्णिमा दत्तजयंतीची होती.

या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई सकाळीच नृ.वाडीला गेलेली.त्या संध्याकाळी मी बँकेतून परस्परच वाडीला गेलो. दत्तदर्शन घेतलं. हात जोडून मनोमन प्रार्थना केली ,

‘दर पौर्णिमेला निदान एक तप नित्यनेमाने आपल्या दर्शनासाठी येण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आपला कृपालोभ असू दे. हातून सेवा घडू दे.” अलगद डोळे उघडले तेव्हा आत्यंतिक समाधानाने मन भरून गेलं होतं. अंत:प्रेरणेने पडलेलं दत्तसेवेच्या वाटेवरचं हे माझं पुढचं पाऊल होतं.

घरी हे आईला सांगितलं.आता यापुढे खूप दगदग करून,ओढ करुन तू अट्टाहासानं नको जाऊस.मी जात जाईन असंही म्हटलं.सगळं ऐकून आई एकदम गंभीरच झाली.

“माझ्याशी आधी बोलायचंस तरी..” ती म्हणाली.

” का बरं?असं का म्हणतेस?”

“उद्या तुझी कुठे लांब बदली झाली तर? कशाला उगीच शब्दात अडकलास?”

“नकळत का होईना अडकलोय खरा” मी हसून म्हटलं. ” तू नेहमी म्हणतेस ना, तसंच. सुरुवात तर केलीय. होईल तितके दिवस जाईन. पुढचं पुढं”

आईशी बोलताना मी हे हसत हसत बोललो खरं पण तिच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.

खरंच. देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्स्फरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण थोडेच या परिसरात रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?”

या जरतरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर

– आणि त्याने सांगितलेले  “तीन टेकअवेज

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth College नं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.

आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत. 

१. Effortless is a myth 

एफर्टलेस – एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.

२. It’s only a point

आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It’s only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.

उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.

३.‘Life is bigger than the court’

आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.

टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..! 

लेखिका : नीलांबरी जोशी 

(फेडरर यांच्या संपूर्ण भाषणाची लिंक — https://www.youtube.com/watch?v=pqWUuYTcG-o&ab_channel=Dartmouth

प्रस्तुती : स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Mandatory Overs…” – लेखक – अवि बोडस ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “Mandatory Overs…” – लेखक – अवि बोडस ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एका पाठोपाठ wicket पडाव्या तसा एक एक दात crease सोडून चाललाय! तरीही काही खायला जावं  तर घरातल्या घरात running between the wicket चालू होतं .डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं !

डोळ्यात मोतीबिंदू झाला की काय? सारखं bad light चं  appeal  करतायत ! तरीही डोळे फाडून फाडून मोबाईल मधे cheer girls पाहायला जावं  तर बायको पाठीमागे cought behind साठी तत्पर! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय, बरोबरच आहे !आता mandetory overs! विसरलात वाटतं !

आजकाल पाय वळतात म्हणून जरा बाहेर मित्र मैत्रिणीकडे जायला पाय वळतात तर ते नेमके ते wide ball पडल्यासारखे उजवी डावीकडे पडतात. रस्ता अडवून बायको दारात उभी आणि मुलगा सून नातू सारे एक सुरात leg before wicket ..  out म्हणतात. खरं  म्हणजे इन म्हणतात. डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं ! काठी ठेवत चला bat सारखी !

आजकाल कान माझं सुद्धा ऐकत नाहीत. त्यामुळे बरेच शब्द ,काही वेळा अख्खं वाक्य missfield होतं  आणि विषय पार boundry line च्या बाहेर ! हैं ना चौका देनेवाली बात ! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं !

डोक्याच्या peach वर जरा कुठे गवत राहिले असेल तर शप्पथ ! पार पाटा wicket. पोटाचा आकार  

Shape  बदललेल्या चेंडूसारखा होत चाललाय. डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय चालायचंच.आता  mandatory overs ! विसरलात वाटतं….. 

गुळगुळीत दाढी करून पँटवर ball  घास घास घासून तकाकी लकाकी कायम ठेवावी तसं सुरकुतलेल्या चेहऱ्यावर क्रीम चोळून चोळून चेहेऱ्यावरची तकाकी कायम ठेवायचा निष्फळ प्रयत्न करतोय.पण व्यर्थ! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच, mandatory overs. विसरलात वाटतं !

मनगट तर अशी दुबळी झाली आहेत की हातातली कपबशी कधी spin होउन कपाचा कान bells उडाव्या तसा उडतो ते माझे मलाच समजत नाही.डॉक्टर नावाचा umpire म्हणातोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

काहीही लक्षण नसताना सर्दी होते रुमालाची covers on होतात आणि  खेळ थांबतो नाक आणि घशाच field inspection होई पर्यंत!डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

कॉन्फिडन्स तर एवढा शेक झालाय की बारीक सारीक सरळ पडणारा ball सुद्धा bouncer वाटतो आणि विनाकारण bit होतो. hook करायला जावं तर हुकतो!डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच!आता mandatory overs! विसरलात वाटतं !

Umpire ने केव्हाच इशारा केलाय तुमच्या  Power play च्या overs केव्हाच संपल्यात.तेव्हा उगाच मोठे strok न मारता जमतील तेवढे chikki run काढून score board हलता ठेवावा हे मलाही उमगलय.पण यमराज टीम चा Power play मात्र सुरू झालाय.मोठी attacking field लावलीय. डायबेटिस,बीपी,

सांधेदुखी,कंपवात,विस्मरण हे fielder, slip, Gally,covers,point ला catch घ्यायला टपून बसलेत. यमदूत नेटाने inswing,outswing ची भेदक balling करतायत. *umpire म्हणतोय,चालायचंच!आता mandatory overs! विसरलात वाटतं !

.त्या सगळ्यांना चकमा देत गोळ्या इंजेक्शनचे  pad   बांधून इन्सुलिन चे helmet  घालून  gap काढत आपली मात्र batting चालू आहे.तरी एकदा attacking stroke  ने दगा दिलाच. mid on ला  चक्क catch out. तरीही umpire म्हणतोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

आम्ही जवळ जवळ crease सोडून निघालोच ! — 

— पण तो वरती बसलाय ना third umpire! त्यानें चित्रगुप्ताला action replay दाखवायला सांगितले परत परत !आणि फायनली तो no ball ठरून आम्ही crease वर परत दाखल !आता मात्र century मारायचीच! मगच pavilion ची वाट धरायची. मग भले त्या डॉक्टर नावाच्या umpire ला म्हणू दे ना… mandatory overs ! विसरलात वाटतं !

लेखक :  अवि बोडस

(प्रेरणा : क्रिकेट वर्ल्ड कप २०२४.– वरील घटनांशी माझा काहीही संबंध नाही. फक्त कल्पना विलास यांचा संबंध आहे.) 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोलाज… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? विविधा ?

☆ कोलाज ☆ श्री सतीश मोघे 

शाळेत’ कार्यानुभव’ हा विषय होता. त्यात कधीतरी  तुकड्या तुकड्यांचा कोलाज घरून करून आणणे, असा गृहपाठ असायचा. रंगबिरंगी घोटीव पेपर आणून ते कापायचे आणि हवे तसे चिकटवायचे. चिकटवतांना ठाऊक नसायचं की पूर्ण झाल्यावर कसे दिसेल ? वर्गात सर्वांचे कोलाज पाहिल्यावर कळायचे की आपल्याच रंगाचे कागद वापरून एखाद्याने फारच सुंदर ते केले असायचे. रंगसंगतीची जाण आणि तुकडा योग्य ठिकाणी लावणं या दोन गोष्टी कोलाज सुंदर करतात, हे समजायचं. आपण हा तुकडा इथे, तो तिथे लावायला हवा होता असं वाटायचं. हे कोलाज करायाचेच काम आयुष्यभर करायचे आहे, हे तेव्हा ठावूक नव्हतं.

दोन जीवांच्या कोलाजमधून एक नवीनच जीवाचा तुकडा जन्माला येतो. तो जन्माला आला की आईचं मातृत्वाचं कोलाज चित्र पूर्णत्वाला जातं. वयाची चार-पाच वर्ष हा ‘दिल का टुकडा’ आईचंच कोलाज विश्व आपलं समजत असतो. हळूहळू स्वतःच कोलाज तो तयार करायला सुरुवात करतो.

ही कोलाज करण्याची क्रिया अखरेच्या श्वासापर्यंत सुरुच असते.

शक्य असतील त्या वस्तू घेऊन आपण आपला संसाराच्या कोलाजचा सांगाडा उभा करतो आणि आयुष्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या भावछटांसह त्यात ठेऊन संसाराचे हे  कोलाज रंगीत करत असतो.

मनुष्य हाच मुळात एकसंध नाही, त्याचं आयुष्य एकसंध नाही.. तेही  तुकड्या तुकड्याचे…तुकडे तुकडे एकत्र येऊन तयार होणारे कोलाज. पुन्हा आयुष्यातले तुकडेही बदलणारे… बालपणाचे मित्र, कॉलेजचे मित्र, आताचे मित्र, बदलणारे. नातंवाईक, त्यांचे प्रेमसंबंध बदलणारे. कुणाला आपण नकोसे तर कुणी आपल्याला नकोसे. हवीहवीशी व्यक्ती कायम सोबत राहीलच याचीही शाश्वती नाही. या सर्व परिस्थितीत हाती जे जे आहे त्याचे सुंदर कोलाज करून त्याचा आनंद घेणं, हेच कौशल्य आहे.

अनुभव घेणारं मन, त्याला अनुभवापर्यंत नेणारा देह आणि या मन आणि देहाला विवेकाने हाकणारी बुद्धी या तिन्ही गोष्टी जागेवर शाबूत असल्या की, त्या त्या वेळी असणाऱ्या तुकडयांची जागा (Placement) योग्य ठरविली जाते. कोणाला किती महत्व दयायचं, कोणाला केंद्रस्थानी ठेवायचं, कोणाला कोणाजवळ ठेवायचं हे हळूहळू कळतं, हळूहळू आत्मसाद होतं.

काही तुकडे असे वाटतात की डोळे मिटून कुठेही ठेवा, शोभून दिसतात, आनंद देतात,असे वाटते. काही मात्र कुठेच मॅच होत नसतांनाही ठेवावे लागतात,असे वाटते.हा सगळा त्या तुकड्यांना असणारा वरवरचा रंग पाहून आपल्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या भावनेचा खेळ आहे,

ही भावनाच सकारात्मक आणि निर्मोही झाली की या कोलाजचा खरा आनंद मिळतो. समोरच्या तुकड्याने आपले केलेले ‘दिल के टुकडे’ आठवायचे की त्यांने आपल्याला कधीकाळी दिलेला  भरपुर आनंद आठवायचा ? हाच खरा प्रश्न आहे.

आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक तुकड्याला आणि आपल्यालाही एक काळी बाजू असते आणि एक रंगीत बाजू असते.रंगीत बाजू सन्मुख,डोळ्यासमोर ठेऊन कोलाज केले तरच ते सुंदर होते…सुंदर दिसते.

आयुष्याचा कोलाज म्हणजे  जोडलेल्या तुकड्यांच्या रंगीत भावछटांचा तुकड्या तुकड्यांनी घेतलेला आनंद. त्या तुकड्यांना एकसंध करून त्यात  फार गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्नही करू नये. सर्वसंगपरित्याग करून आत्म्याच्या भेटीसाठी तपसाधना करणाच्या संत‌ सत्पुरुषांची जीवने सोडली तर आपणा सर्वांची जीवने निरर्थकच. तेव्‍हा त्यात अर्थ शोधून बुद्धी झिजवा कशाला!      एका प्रसिद्ध चित्रकाराला, “त्याने काढलेल्या ॲबस्ट्रॅक्ट चित्रात काय अर्थ आहे?” असे विचारले. तो उत्तरला “या चित्रात अर्थ शोधायचा नसतो. त्यातल्‍या वेगवेगळ्या दिसणाऱ्या आकृती आणि विविध

रंगछटा केवळ भोगायच्या असतात.. त्यांचा आनंद घ्यायचा असतो.” आपलेही जीवनाचे कोलाज असेच ॲबस्ट्रॅक्ट.त्यात अर्थ न शोधता रंगांचा फक्त आनंद घ्यायचा.

हे कोलाज म्हणजे विविध व्यक्ती,त्यांच्या वेगवेगळ्या रंगछटा-भावछटांचे,स्वभाव छटांचे.. तुकड्या- तुकडयांचे जोडकाम. त्यातल्या त्यात सकारात्मक, आपल्याला भावतील, आनंद देतील असे तुकडे हाताशी घ्यावेत. त्यांच्या दोषांची  काळी बाजू

नजरेआड करून गुणांची रंगीत बाजू सन्मुख करावी. आपली समज आणि कौशल्य यानुसार ते हृदयात किंवा हृदयापासून हव्या तेवढ्या अंतरावर ठेवावेत आणि रंगीत कोलाजचा घेता येईल तेव्हढा आनंद घ्यावा, हेच बरे.

अर्थात हे करताना कागदाचे कोलाज आणि आयुष्याचे कोलाज यातला एक मुख्य फरक समजून घेतला पाहिजे.कागदाच्या कोलाजचे तुकडे एकदा चिकटले की चिकटले. त्यांना कागदाला,एकमेकांना सोडून जायचे स्वातंत्र्य नाही. पण माणसाच्या जीवनातील कोलाज मधील माणसे (तुकडे) मात्र सोडून जाऊ शकतात.  कधी त्यांच्या इच्छेने तर कधी नाईलाजाने.  या कोलाजमधले आजूबाजूचे तुकडे सोडून गेले तर फारसा फरक पडत नाही. पण मधलेच..केंद्रस्थानी असलेले,हृदयातले तुकडे सोडून गेले तर मात्र कठीण होते. संपूर्ण कोलाजची पुन्हा नवीन मांडणी करावी लागते… नवीन तुकड्यांना सोबत घेऊन… आयुष्य आहेच असे की, हा जुन्या-नवीनचा खेळ अव्याहत  सुरूच असतो.अशावेळी असे का घडले? याचा विचार करून बुद्धी शिणवण्यापेक्षा आहे त्या तुकड्यांची पुनर्मांडणी करून नव्या उत्साहाने त्याच्या रंगाचा, भावछटांचा आनंद घेणं ज्याला जमलं त्याला प्रत्येक क्षणी हे कोलाज,त्यातल्या व्यक्ती आनंद देतात,आवडतात.तुकड्या तुकड्यांच्या  खंडप्राय आयुष्यात आनंद मात्र अखंड,एकसंध राहतो.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रदक्षिणा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ प्रदक्षिणा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

यशला तर खरं म्हणजे इथे येण्याची इच्छाच नव्हती.काय तर म्हणे..हे गुरुजी तुला चांगला मार्ग दाखवतील.त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे.तसं म्हटलं तर समस्या अशी नव्हतीच.तीशी उलटुन गेली.. अजुनही यशचं लग्न जमत नाही..ही बाबांच्या मते समस्या होती..यशच्या द्रुष्टीने नव्हती.

बाबांचा खुपचं आग्रह झाला म्हणून यश आता शिखरे गुरुजींकडे आला होता.बरोबर आणलेली कुंडली त्याने गुरुजींच्या समोर ठेवली.गुरुजींनी ती कुंडली बघितली. पंचांग उघडलं.. बाजुला असलेल्या पाटीवर पेन्सिलने काही तरी आकडेमोड केली..बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी यशला सांगितलं..

“तुमच्या कॉलनीत गजानन महाराजांचं मंदिर आहे.तु गुरुवारी त्या मंदिरात जायचं.. दुर्वा फुलं वहायचं.. आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या.बघु..कसं लग्न जमत नाही ते.”

यशला ते काही पटलं नाही.त्याने तसं सांगितलं सुध्दा.गजानन महाराजांना.. किंवा कोणत्याही देवाला  प्रदक्षिणा घातल्याने नक्की काय मिळते? पण मग गुरुजींनी त्याला समजावून सांगितले. त्यामुळे आपण देवाच्या सान्निध्यात अधिक काळ रहातो.एका जागी बसुन चिंतन करणे..हा एक मार्ग झाला.आणि प्रदक्षिणा घालणे हा दुसरा.प्रदक्षिणा घालण्याने एक गोष्ट मात्र हमखास होते..ती म्हणजे चालण्याचा व्यायाम.

मग शिखरे गुरुजींनी त्याला वेगवेगळ्या प्रदक्षिणांबद्द्ल माहिती द्यायला सुरुवात केली.मंदिर लहान असेल तर कमी वेळात प्रदक्षिणा होतात..मोठे असेल तर जास्त वेळ लागतो. त्रिंबकेश्वरला ब्रम्हगिरी पर्वत आहे.हा पर्वत म्हणजे साक्षात शिवाचे रुप.श्रावण महिन्यात या ब्रम्हगिरीलाच प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविक येतात.ही प्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी साधारणपणे एक दिवस लागतोच.श्रावणसरी अंगावर झेलत..ओम नमः शिवाय चा जप करत शेतातून,नदितुन वाट काढत ही प्रदक्षिणा पुर्ण केली जाते. या प्रदक्षिणेने धार्मिक पुण्य किती मिळते हा वेगळा भाग.एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्याचा आनंद मिळतो तो खरा महत्वाचा.

देवाला आपल्या उजव्या हाताला ठेऊन फेरी मारणं म्हणजे प्रदक्षिणा.याला कोणी फेरी म्हणतात..कोणी परिक्रमा म्हणतात..तर कोणी उजवी घालणं असंही म्हणतात.प्रदक्षिणा का घालायची?त्यांचं काय महत्त्व आहे? हे विषद करणारा एक संस्कृत श्लोक आहे.

यानि कानि च पापानी

जन्मांतर कृतानी च

तानि सर्वाणि नश्यन्तु 

प्रदक्षिणे पदे पदे.

म्हणजे..

आमच्याकडुन कळत नकळत झालेली.. आणि पुर्व जन्मातील सर्व पापे या प्रदक्षिणा करता करता नष्ट होऊन जावो.

प्रदक्षिणा म्हटलं की आठवते ती नर्मदा परिक्रमा. एखाद्या नदीला संपुर्ण प्रदक्षिणा घालण्याची कल्पनाच अभिनव.मेघदुत या महाकाव्यात कवी कालिदासाने नर्मदा नदीचे वर्णन खुपच सुंदर केले आहे.तिची वळणे.. मध्ये मध्ये येणारे छोटे मोठे डोंगर ‌.काठावर डुलणारी उंच उंच झाडे.. घनदाट अरण्ये हे सगळंच परिक्रमा करणार्यांना आकर्षुन घेतं.नदीच्या किनार्यावर असलेली गावे..मंदिरे..बदलत जाणारे समाज जीवन या सर्वांच्या सोबतीने वाटचाल करणं हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

अलीकडे वाहनात बसुन नर्मदा परिक्रमा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.पण शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा करायची असेल तर त्यासाठी तीन वर्ष.. तीन महिने.. तेरा दिवसांचा कालावधी सांगितला आहे. ‌परीक्रमेला बहुधा ओंकारेश्वर येथुन सुरुवात केली जाते.पण तसा नियम नाही.बाकी नियम मात्र भरपूर आहे.परीक्रमे दरम्यान नर्मदा नदीचे पात्र ओलांडून जाता येत नाही.सोबत फारसं सामान नसावं.सदावर्तात जेवण करावं.नाही तर पाच घरी भिक्षा मागावी.त्यात मिळालेल्या शिधा घेऊन तो रांधावा.मिळेल ते पाणी प्यावं.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत ‘ओम नर्मदे हर..’ हा मंत्र जपावा.

नर्मदा परिक्रमा केल्यावर तेथील अनुभव अनेक जण शब्दबद्ध करतात.ते सर्वच वाचनीय असतात.जगन्नाथ कुंटे यांनी अनेक वेळा नर्मदा परिक्रमा केली.’नर्मदे हर हर’.. आणि ‘साधनामस्त’ या पुस्तकांमधून ते आपल्याला नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जातात.

यशला या निमित्ताने बरीच माहिती मिळाली.गुरुजींचं म्हणणं त्यांना पटलं.दर गुरुवारी तो मंदिरात जाऊ लागला.मनोभावे प्रदक्षिणा घालु  लागला.मधल्या काळात त्यानं गजानन विजय ग्रंथाचे पारायण ही केलं.

आणि खरोखरच यशच्या सेवेला यश मिळालं. आज यशचा लग्न समारंभ साजरा होत होता.आताही तो प्रदक्षिणा घालत होता..ती म्हणजे सप्तपदी.हो..ती पण एक प्रदक्षिणाच..प्रज्वलित अग्नीभोवती..देवां.. ब्राम्हणांच्या साक्षीने घातलेल्या या सात फेर्यानंतर वैवाहिक जीवनाचा प्रारंभ होतो.गजानन महाराजांना घातलेल्या प्रदक्षिणेचं फळ आज त्याला सप्तपदीच्या प्रदक्षिणेच्या रुपाने मिळालं होतं.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विठ्ठलाचे पायी… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ विठ्ठलाचे पायी… ☆ श्री संभाजी बबन गायके 

ज्यांचे काळजाचे तुकडे देशाच्या सीमांवर प्रत्यक्ष मृत्यूसमोर अहोरात्र उभे असतात, त्यांच्या डोळ्यांची आणि गाढ झोपेची ओळख खूपच पुसट झालेली असते. रात्रीचा दीड एक वाजला असेल. भाऊंना तशी नुकतीच झोप लागली होती. एखादा डुलका झाला की बाकी वेळ ते जागेच असायचे. त्यांचे चिरंजीव बजरंग आणि त्यांचे सर्वच कुटुंब,गाव त्यांना ‘ भाऊ ‘ म्हणून संबोधत असे. बजरंग फौजेत भरती होऊन तसे स्थिरावला होते. पत्नी,दोन मुलं असा संसारही मार्गी लागला होता. नोकरीची वर्षेही तशी सरत आलेली होती. लवकरच कायम सुट्टी येण्याचा, सेवानिवृत्ती पत्करण्याचा त्यांचा विचार होता.    बाकीच्या वेळी अजिबात आवश्यकता पडत नसतानाही केवळ धाकटे चिरंजीव बजरंगराव आणि बाहेरगावी नोकरीत असलेले थोरले चिरंजीव यांचेशी बोलता यावं, त्यांची  ख्यालीखुशाली कळत राहावी,म्हणून भाऊंनी घरी टेलिफोन बसवून घेतला होता.

टेलिफोन खणाणला तसे भाऊ ताडकन झोपेतून जागे झाले व उठले. वयोमानाने त्यांच्या पत्नीला ऐकायला कमी यायचे. त्यांच्या पत्नी म्हणजेच बजरंग यांच्या आईसाहेब या आवाजाने जाग्या झाल्या नाहीत. तिकडून बजरंग फोनवर होते. त्याकाळी मुळात सैनिकांसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था नव्हती. जी काही व्यवस्था होती ती पुरेशी नव्हती. सीमावर्ती भाग आधीच दुर्गम. त्यातच सीमेवर युद्धाचे काळे ढग जमा झाल्याचे दिवस. टेलिफोन करण्यासाठी काही तास लागायचे आणि अर्थातच प्रत्येकालाच घरच्यांशी बोलायचे असायचे! पत्रांतून फार काही लिहिता येत नसे. आणि लिहिलेली पत्रे घरांपर्यंत पोहोचायला उशीर तर लागायचाच! 

बजरंग यांचा फोन करण्याचा नंबर रात्री दीड वाजता लागला! एवढ्या उशीरा फोन करण्याचं कारणही तसंच होतं. बजरंग यांची पलटण अंतिम लढाईला निघायची होती. परत येण्याची शाश्वती कधीच नसते! चार शब्द बोलून घ्यावेत, निरोप द्यावा म्हणून बजरंगरावांनी घरी फोन लावला होता. त्यांची पत्नी त्यावेळी ग्वाल्हेरला असल्याने तिच्याशी बोलणे शक्य नव्हते. 

सैनिकाला घरी सर्व काही सांगता येत नाही. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गुप्तता पाळावी लागते. बजरंगराव एरव्ही खूप कठीण काळजाचे…वागण्यात कडक! कर्तव्यात वैय्यक्तिक भावनांचा अडसर येऊ न देणारे शिपाई गडी! पण आज त्यांचा स्वर कातर होत होता..त्यांच्या मनाविरुद्ध! फोनवर फार वेळ बोलताही येणार नव्हते आणि काय बोलावे ते समजतही नव्हते! फोन ठेवताना शेवटी बजरंगरावांच्या तोंडून कसेबसे शब्द निघाले… ” माझ्या पोरांना चांगलं शिकवा!”

भाऊ आता खडबडून जागे झाले होते! बजरंगराव आधी असे कधी काही बोलल्याचे त्यांना आठवेना. आजच असं काय झालं असावं, की त्यांनी ही निरवानिरवीची भाषा बोलावी? फोन बंद झाल्याने काही उलगडाही होईना! पत्नीला उठवून हे सांगावं असं त्यांना वाटेना. ती बिचारी आणखीनच काळजीत पडेल! 

भाऊंनीं डोळे मिटले…पांडुरंगाला स्मरत हात जोडले आणि स्वत:शीच काही पुटपुटले. आणि उठून ते देवघरातल्या पांडूरंगाच्या तसबिरीपाशी गेले. अबीर कपाळावर लावला आणि सकाळची वाट पहात डोळे मिटून पडून राहिले….पण डोळ्यांसमोरून बजरंग काही हलत नव्हते. तसा ते सुट्टी संपवून ड्यूटीवर जायला निघाले की, त्यांच्या काळजात कालवाकालव व्हायची. पण ते दाखवायचे नाहीत वरवर. कामाला निघालेल्या माणसाचे चित्त दु:खी करू नये, असा त्यांचा विचार असे. बाकी एकांतात किती आसवं ढाळत असतील ते विठ्ठलालाच ठाऊक! सैनिकांच्या आई-बापांची,पत्नी,मुलांची, बहिण-भावांची अशीच तर असते अवस्था! 

आषाढी वारीचे दिवस होते. एरव्ही शेतांमधल्या विठ्ठलाची सेवा करण्यात मग्न असलेल्या भाऊंनी यंदा वारीला जाण्याचे ठरवले. ते समजल्यावर गावातल्या माळकरी मंडळींनाही आनंद झाला. बघता बघता सात वर्षे गेली. इकडे फौजेत कर्तव्य बजावणारे बजरंगराव अनेक जीवघेण्या संकटांतून सहीसलामत बचावले….शत्रूने शेकडो गोळ्या डागल्या…पण कोणत्याही गोळीवर बजरंग हे नाव नव्हतं! उलट त्यांच्याच गोळ्यांवर दुष्मनांची नावे ठळक होती. घरी सुट्टीवर आले की ते दिवस कधी संपूच नयेत,असे वाटायचे सर्वांना…भाऊंना तर जास्तच! 

त्यांनी पंढरीची वारी सुरू केल्याला यंदा सात वर्षे पूर्ण होणार होती. खरे तर आधी ते आपल्या मोठ्या जिगरीने कमावलेल्या आणि राखलेल्या शेत-मळ्यातच विठ्ठल शोधायचे सावता महाराजांसारखे. गळ्यात तुळशीमाळा होतीच त्यांच्या जन्माच्या पाचवीला त्यांच्या वडिलांनी आवर्जून घातलेली. 

कालांतराने तब्येत ठीक नव्हती तरी भाऊंनीं हा नेम मोडला नव्हता. ‘कशाला पायपीट करता एवढी. खूपच वाटलं तर एस.टी.नं जात जावा की’ असं बजरंग म्हणायचे तेंव्हा भाऊ फक्त हसायचे आणि म्हणायचे…तो चालवत नेतोय तोवर चालायचं!      

यंदा भाऊंची सातवी वारी.एक तप पूर्ण करायचं होतं. चालवत नव्हतं तरी भाऊ नेटाने माऊलींसोबत निघाले. बजरंग या वर्षी फौजेतून कायमसाठी घरी यायचे होता. आणि येण्याचे दिवस जवळ आले होते. पण तरीही भाऊ वारीला निघून गेले…बजरंग आणि पांडुरंग त्यांच्यासाठी कुणी वेगळे नव्हते. 

आषाढी झाली…पालख्या माघारीच्या रस्त्याला लागल्या. गावातल्या दिंड्या मिळेल त्या वाहनांनी लगोलग माघारी निघाल्या. बजरंग त्या सकाळीच सुट्टीसाठी घरी पोहोचले होते. संध्याकाळच्या सुमारास दिंडीचा ट्रक गावात पोहोचला. भाऊ घराकडे निघाले…थोडे थकले होते, चेहरा काळवंडला होता उन्हातान्हानं, पण त्यावर समाधान झळकत होतं. एक देवाचा वारकरी आणि एक देशाचा धारकरी असे दोघे एकाच दिवशी घरी आले होते…हा योगायोग! 

बजरंगरावांनी वडिलांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवले…’देवा,विठ्ठला.. पांडुरंगा!शब्द राखला तुम्ही!’ भाऊ उद्गारले! 

रात्री भाऊंचे पाय चेपताना बजरंग म्हणाले,”भाऊ,आता तुमच्याच्यानं चालवत नाही. बास झाली आता वारी!” 

“आणखी आठ वर्षे वारी करणार काहीही झालं तरी! ‘ देह जावो अथवा राहो..पांडुरंगी दृढ भाव!’… पूर्ण होऊ दे नवस माझा! बजरंगरावांना काय किंवा घरातल्या इतर कुणाला काय, नवसाचं काही माहीत नव्हतं. “कसला नवस?” बजरंगरावांनी विचारले.  

“त्या दिवशी रात्री तुझा दीड वाजता फोन आला. नीट काही कळालं नाही. पण तू म्हणाला,”पोरांना नीट शिकवा..सांभाळा! ते तुझं बोलणं काळजाला घरं पाडून गेलं. मला माहित होतं, तुला काही उलगडून सांगता येणार नव्हतं. पण मी तर फौजीचा बाप की रे! मला सगळं समजून चुकलं! पोरं लढायला निघालीत….परत नजरेस पडतील की नाही,देव जाणे! म्हणून त्या देवालाच साकडं घातलं…आमच्या सैनिकांना सुरक्षित ठेव…लढाईत त्यांचंच निशाण उंच राहू दे…! पांडुरंगा..तुझ्या बारा वा-या करीन न चुकता! पण माझ्या लेकराच्या पाठीशी उभा रहा!” पांडुरंगाने माझं ऐकलं! आज तू माझ्यासमोर आहेस!” असं बोलताना भाऊंचे डोळे भरून आले होते…त्यांच्या डोळ्यांतून खाली ओघळणा-या अश्रूंच्या धारेत बजरंगराव न्हाऊन निघाले! 

दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली असतानाही भाऊंनी ‘ केला नेम चालवी माझा ! ‘ असं विठ्ठलाला विनवणी करीत करीत बारा वर्षांचा नवस फेडला!

(माजी सैनिक आणि पत्रकार श्री.बजरंगराव निंबाळकर साहेब यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्रातील एका प्रसंगाचे हे मी केलेले कथा रूपांतर ! मूळ पुस्तकात या आणि अशा अनेक घटना,गोष्टी आहेत. येत्या सव्वीस-सत्तावीस जुलै रोजी हे आत्मचरित्र प्रकाशित होईल.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘प्रार्थना असावी अशी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘प्रार्थना असावी अशी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

मनात येणारा प्रत्येक सकारात्मक विचार ही प्रार्थना असते. या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळत असतं. म्हणून आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर नियंत्रण असणं आवश्यक आहे.

प्रत्येक विचारानं आपल्या मनात आणि बाहेर तरंग निर्माण होतात. ते सर्वत्र पसरत असतात. प्रत्येक प्रार्थना म्हटली जाताच ती ऐकली जाते, आणि जशी ती ऐकली जाते तसं तिला उत्तरही मिळतं. यासाठी मनातला प्रत्येक विचार सकारात्मक असावा या हेतूनं प्रयत्न करणं अगत्याचेच आहे.

एका दिवाळी अंकात एका ज्येष्ठाने केलेली प्रार्थना वाचली. ” हे प्रभो… आता या वयात, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक विषयावर मी मतप्रदर्शन केले पाहिजे असे नाही. सर्वांना सरळ करण्याच्या सवयीपासून मला सावर…. मला विचारशीलतेचे वरदान दे. प्रभुत्व न गाजविता मी सेवातत्पर असावे. काथ्याकूट न करता मी नेटकेपणाने प्रश्नाला भिडावे. एखाद्या गोष्टीबद्दल दुमत होईल तेव्हा नमते घेण्याची सुबुद्धी मला दे. कधी कधी माझंही चुकतं, हा जीवनाचा मंत्र मान्य करायला शिकव. अनपेक्षित ठिकाणी चांगुलपणा पाहण्याची आणि तिऱ्हाईत व्यक्तीमधील गुणांचा गुणाकार करण्याची निर्मळ नजर दे आणि हे प्रभो, सदा सर्वांबरोबर शुभ बोलण्यासाठी प्रेरणा दे !”

आत्मचिंतनातून स्फुरलेल्या अशा प्रार्थना जीवनाचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवितात.  

“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” नामस्मरण करीत आनंदात असावे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घन सावळा आषाढ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

घन सावळा आषाढ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मिरगाने होणाऱ्या जेष्ठातल्या पेरण्यांची धांदल संपते न संपते आषाढाचे काळेभोर मेघ चोहोबाजूनी गर्दी करू लागतात. सावळे सावळे जलद पाळणारे कधी एकाच ठिकाणी हट्टी बाळासारखे थांबणारे ढग मनात वेगळीच हुरहूर उठवत राहतात.काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहते उगीचच त्या पाण्याने गच्च भरल्या नभांकडे बघून.म्हणून तर कालिदासाच्या यक्षाला वियोग झालेल्या पत्नीची आठवण अस्वस्थ करून गेली असेल.हे मेघच पत्नीला निरोप देतील आणि विरह अग्नीत तडफडणाऱ्या मनाचा तिला अंदाज येईल असे त्याला वाटले असावे.आषाढाच्या पहिल्या दिवशी ढगांकडे बघून कालिदासाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

थंडगार हवा सगळ्या आसमंतात शिरून शेत शिवाराला हुडहुडी येते.चराचर आनंदी झालेलं असतं.पाखरांचा मधूर किलबिलाट सगळ्या वातावरणात भरून राहतो.इंदिरा संतांच्या रंगरंगुल्या,सान-सानुल्या गवतफुलांवर काळी, पिवळी,पांढरी,तपकिरी फुलपाखरे रुंजी घालत असतात.उन्हाळभर माळावर खुरट्या,वाळक्या कुरणावर दात आपटून ल्याप झालेली जनावरं आता वाऱ्यावर सळसळणाऱ्या हिरव्यागार कोवळ्या लूस गवतावर अंगावरची पावसाची सर झिंझाडत तुटून पडतात.किती खाऊ न किती नको!हावऱ्यासारखी नुसती हुंदडत गवतात मस्ती करत राहतात.

कुळवाची पाळी देऊनही मागे उरलेल्या चुकार तणाला खुरप्याच्या टोकाने उचलणाऱ्या शाला, माला, मंदा ,नंदाला सभोवतीच्या काळ्याकुट्ट ढगात पंढरीचा विठोबा दिसतो आणि वारीची आठवण येऊन त्यांना आनंदाचे भरते येते.आपला हात सरसर हलवत “अगं वारीला कवाशी जायाचं?”म्हणत मनातच वारीच्या वाटेवर टाळ मृदुन्गाच्या गजरात गाऊ-नाचू लागतात.

कृषिवलाना बेंदराच्या सणाची चाहूल लागलेली असते.जाता येता वाघाटीच्या वेलावर पानाआड दडलेल्या वाघाटया काढून घरधणीनीला

बारशीला कालवण करायला द्यायच्या असतात.हुनंगा झाला की खिचडा. वेळात वेळ काढून बैलांना ,गुरांना धुवून कांती तुकतुकीत करायची असते.चांगला खुराक घालून बैलांचा लाड करायचा असतो.मागच्या बेंदराला आणलेले कंडे विरून गेलेले असतात, दिष्टीचे मणी पण फुटलेले असतात.शिंगांचा रंग उडालेला असतो.येत्या बाजारातून सगळं सगळं न चुकता आणायचं असतं. फाटकी झूल शिवायला टाकायची असते.गोंडे ऐनवेळी कुठं सापडत नाहीत,तेही यावर्षी नवेच घ्यायचा विचार असतो.झालंच तर लेकीच्या पहिल्या करीवर नवे कासरे, कंडे ठेवायचे असतात.

घरधणीनींना खिचडा कांडायचा असतो,आकाडाची कर तळायला कापण्या-दामट्याचं दळण दळून आणायचं असतं.आकाड पाळायला आलेल्या लेकी हातातला चुडा अन अंगभर दागिने मिरवत सगळ्या आळीत चहा पाण्याला फिरत असतात.

देवळात  मागच्या वर्षी सप्ता झाल्यावर कपाट बंद केलेले तबला,पेटी,मृदंग बाहेर येतात.पथाऱ्या टाकल्या जातात.एकादशी होईपर्यंत आता दररोज विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन रंगणार असतं.

अ ss आ  अवघे गरजे पंढरपूर

चालला नामाचा गजर,चालला नामाचा गजर..कोणतरी सूर लावत असतो,ताल धरायला मग एकेकजण येऊन बसतो.पोराठोरांचा पाय देवळातून निघत नाही.जेवण करून धोतराची खोळ अंगभर पांघरून भजनात तल्लीन झालेल्यांच्या अंगातला गारठा कधीच पळून गेलेला असतो.

आषाढ एकादशीचा तो पवित्र दिवस येतो.दिवसभर देवळाला जत्रेचे रूप आलेले असते.घंटा खणखणत राहते.भोळा भाबडा जीव फक्त विठूच्या जीर्ण शिर्न चरणांवर लीन होतो.मागत काहीच नसतो,त्याच्या आत्म्याशी फक्त क्षणभर एकरूप  होतो.अबीर बुक्का कपाळावर लावून थोड्याशा नकळत केलेल्या पापाची वजाबाकी करतो.

अध्यात्मातल्या सत्शील लोकांचा चातुर्मास आताशा सुरू झालेला असतो.श्रावणाला पवित्र महिना मानत असले तरी आषाढ सुद्धा त्याचा सख्खा भाऊच असतो.त्याच्याइतकाच तो शुद्ध अन पवित्र असतो म्हणूनच अवसेच्या दिवे उजळून आषाढ जणू त्याचे स्वागत करतो.नव्हनाच्या लाह्या याचदिवशी भाजल्या जातात.

वर्षभर ज्ञान देणाऱ्या गुरूंच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची गुरुपौर्णिमा असो,अवघ्या महाराष्ट्राचा आषाढी एकादशीचा उपवास -वारी असो,बेंदूर असो,म्हसोबा ताई आईचा गोडा-खारा निवद असो,की तेजोमय दिव्याची पूजा असो,आषाढ गुंग असतो आपल्याच तालात,धांदलीत,नव्या नवरीच्या पैंजनाच्या तालात, लाजऱ्या नजरेत,कापऱ्या वाऱ्यात,भुरभुरत्या पावसात,अवसेच्या दिव्याच्या प्रकाशात आणि त्या

‘और ना डरा दे मुझको

ए काले काले घन..’वाल्या मनाला विव्हळ करणाऱ्या घनसावळ्या पाण्याने ओथंम्बलेल्या दाटीवाटीच्या मेघात…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares