मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मनाची शक्ती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “मनाची शक्ती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज तुम्हाला एक सत्य कथा सांगणार आहे….

ती सोसायटीत नवीनच राहायला आली होती. येता जाता बोलून सगळ्यांशी तीची मैत्री झाली. काही दिवसातच कळलं की ती तथाकथीत सुधारणावादी मताची आहे. अध्यात्म, पूजा मंत्र, स्तोत्र काही न करणारी… सडेतोड बोलणारी आहे.

तिच्याशी गप्पा तशाच व्हायच्या. हळदी कुंकवाला बोलावलं तर साडी नेसून येऊन जायची पण नंतर तिच्या कॉमेंट्स सुरूच असायच्या… “तुम्हाला कंटाळा कसा येत नाही हे सगळं करत बसायला? तासंतास कसं ग बसता त्या पोथ्या परत परत वाचायला? तीच तीच स्तोत्र म्हणून काय मिळतं तुम्हाला ?… नवीन काहीतरी जरा वाचा…. ” आईने लग्नात दिलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा तीने डब्यात ठेवून दिली होती. हे तिनेच आम्हाला सांगितले.

पहिले काही दिवस यावरून गरमागरम चर्चा व्हायची. ती त्याला ठामपणे उत्तरं द्यायची. काही दिवसांनी लक्षात आलं त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये… मग मात्र आम्ही ठरवलं आता यावर बोलायचं नाही. मैत्रीण म्हणून ती छान आहे ना, मग झालं…. असू दे… आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं त्याप्रमाणे तो वागत असतो. अस सुरू होतं.. बरीच वर्षे झाल्यानंतर सगळ्यांना तिची सवय पण झाली..

नंतर एके दिवशी तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढवला.. ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं. नवऱ्याने प्रकरण गंभीर आहे हे ओळखलं. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं. मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. अगदी माइल्ड होता.. आणि लगेचच नेल्याने फार फायदा झाला. सुधारणा हळुहळु होईल असं डॉक्टरांनी सांगितले. बरेच दिवस ती दवाखान्यात होती. नंतर ती बरी झाली पण उच्चार इतके स्पष्ट येत नव्हते.

“बाकीचा त्रास कमी झाला आहे पण उच्चार स्पष्ट येण्यासाठी वेळ लागेल” हे डॉक्टरांनी समजावले.

तिला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी डॉक्टरांनी औषधं कशी घ्यायची, खबरदारी काय घ्यायची, हे नीट समजावले आणि सहज म्हणाले.. “अजून एक तुम्हाला सुचवु का ? घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे. त्याचा परिणाम होतो आणि शक्य होईल तितकं… प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. रामरक्षा म्हणताना ती होते हा अनुभव आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम…”

डॉक्टरांचे ते बोलणं ऐकून ती थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. डॉक्टर हे असं काही सांगतील असे तिला वाटलेच नव्हते.

“हो हो” असं त्यांना तेव्हा ती म्हणाली. ‘हे मला काही येत नाही’ हे डॉक्टरांना सांगायची तिला लाज वाटली..

घरी आल्यानंतर चार दिवसांनी तिच्या मनात काय आले कोण जाणे? डॉक्टरांनी स्वतः सांगितले आहे तर हा उपाय पण करावा असे तिला वाटले. फोन करून तिने मला हे सांगितले. “इतके दिवस मी कशी वागत होते तुला माहिती आहे, त्यामुळे… तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं… “

तिला म्हटलं, “अगं आधी आता तुला बरं व्हायचं आहे. मागचं बाकी काही बोलु नकोस. युट्युब वर सज्जनगडावर रामदासीबुवांनी म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे. ती काढुन तू ऐक. कुठल्याही दुकानात तुला रामरक्षेचे पुस्तक अगदी पाच दहा रुपयात मिळेल. ते आणून घे आणि त्यात बघून म्हण…. “

तिचा गळा दाटून आला होता. चेहरा अगदी रडवेला झाला होता. “नीता”.. एवढेच ती म्हणाली.

“राहू दे, उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस. मात्र शांतपणे, श्रद्धेने, मनोभावे म्हणत रहा. तुझा विश्वास नाही हे माहित आहे. तरी बरं होण्यासाठी तरी कर.. हा फिजीओथेरपीचा एक प्रकार आहे असं समज… थोडे दिवस करून तर बघ, मग आपण निवांत यावर बोलू” तिला म्हणाले.

तिचे आणि माझे फोनवर बोलणे होत होते. काही दिवसांनी तिने मला भेटायला बोलावले. “तुला एक गोष्ट दाखवण्यासाठी खास बोलावलेले आहे. हे बघ” ती म्हणाली.

बघितलं तर चक्क… छोट्याशा देवघरात बाळकृष्ण, अन्नपूर्णा ठेवले होते. शेजारी समई मंद तेवत होती. समोर दोन निरांजन तबकात होती. उदबत्तीचा मंद सुगंध येत होता. फुलं वाहिली होती. शेजारीच रामाचा फोटो होता. त्याला मोगऱ्याचा गजरा घातला होता. मी बघतच राहिले.

ती म्हणाली, “काय झालं माहित नाही… पण ऑनलाइन हे सगळं मागवलं. अंतरंगातूनच काहीतरी वाटलं, असं करावं.. खरंच गं… खूप शांत, समाधानी वाटत आहे. तुम्ही हे का करत होता हे आजारी पडल्यानंतर मला कळलं. इथे समोर बसून रामरक्षा म्हणताना काही तरी भारल्यासारखं, वेगळच वाटत होतं. मला ते तुला शब्दात सांगता येणार नाही. “

“राहू दे गं… तु ते अनुभवलस, बरी झालीस हे महत्त्वाचं. आता तू पण हा आनंद घे. ” तिला पसायदान, मनाचे श्लोक आणि हरीपाठ, अशी पुस्तकं दिली. तिचे डोळे भरून वहायलाच लागले होते….. “असु दे, होतं कधी असंही… “

ती पूर्ण बरी झाली याचं श्रेय डॉक्टरांनाच आहे. मात्र त्या अवघड वेळी तिला रामरायाने मानसिक आधार दिला… पूजा, जप, स्तोत्र पठण यासाठी तर करायचे असतात. प्रयत्न, कष्ट आपण करायचे असतात, पण त्याचा हात हातात असू द्यायचा. तो सांभाळतो.. कोणीतरी एका अदृश्य शक्ती आहे, तिच्यावर विश्वास ठेवायचा. जमेल तशी साधना करायची. श्रद्धेने भक्ती करायची. त्यानी मन खंबीर बनतं. दोघांचा मेळ जमला की मग शरीरही बरं होण्यासाठी साथ देतं.

डॉक्टर तर तिला म्हणाले होते.. “काहीही येत नसेल तर नुसती बाराखडी तरी म्हणा. आपल्या अ ते ज्ञ या अक्षरांनी तोंडाच्या स्नायुंची पूर्ण हालचाल होते. ” हॉस्पिटल मधले सगळ्यात मोठे डॉक्टर तिला हे सांगत होते.

आमच्या श्रीकृष्णांनी खूप वर्षांपूर्वी तेच तर सांगितले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय अठरावा, ओवी ३७३ मध्ये मराठीत असं लिहिलं आहे…

“अगा बावन्न वर्णा परता

 कोण मंत्रु आहे पांडूसुता”

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नमन नटवरा – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ नमन नटवरा – भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(थोडीफार तालीम झाली. मग घरी जाण्याआधी नरू आणि शिरीष हॉस्पिटलमध्ये गेले. सरांना सलाईन लावलेले होते. लांबून त्याना पाहून ते घरी आले.) – इथून पुढे —- 

दुसऱ्या दिवशी शिरीष आणि नरू स्टेजकडे आले, तर जयवंतसर लाईट जोडून पहात होते. नरुने शिरीषच्या हातात हात दिला. काल हॉस्पिटलमध्ये झोपलेला माणूस आज तालीम घयायला हजर होता. मग दोन दिवस रंगीत तालीम झाली. नरुने संपूर्ण नाटक पहिल्यांदा पाहिले. किती अवघड भाषा.. मोठे मोठे संवाद.. अनेक ग्रुप्स.. मुस्लिम कपडे.. लेव्हल्स.. त्यावरील हालचाली.. प्रकाश आणि संगीत सांभाळत कलाकार नाटक पुढे नेत होते. आलेले पाहुणे नाटक पाहून खूष झाले. त्यानी काही सूचना पण केल्या.

इकडे नाट्यस्पर्धा सुरु झाली होती. “तुघलक ‘नाटकाला तिसरा दिवस मिळाला होता.

नाटका दिवशी सर्वांनी स्वतः प्रॉपर्टी, स्पॉट्स उचलून आणले आणि स्टेजवर मांडले. तीन रंगीत तालमी झाल्या होत्या त्यामुळे स्पर्धेतील प्रयोग उत्तम आणि खणखणीत झाला. स्वतः जयवंतने मोहम्मद बिनतुघलक उत्तम साकारला. सर्वच कलाकारांनी चांगले काम केले. तीन परीक्षक होते. त्यातील एक स्त्री परीक्षक होती. परीक्षक आत येऊन सर्वाना विशेष करून जयवंतला भेटून गेले आणि त्यानी पण नाटकाचे कौतुक केले.

नाटकाचा प्रयोग छान झाला असे कौतुक अनेक समीक्षकांनी केले, अनेक प्रेक्षकांनी केला. खुप मेहनत करून नाटक उभे केले होते. या कौतुकाचा स्वीकार जयवंत आणि त्याची पत्नी घेत होती.

दुसऱ्या दिवशी ती दोघ आणि ग्रुपमधील इतर एका स्टॉलवर चहा पित असताना जयवंतचा छोटा मोबाईल वाजला. त्याकाळात त्या शहरात फारच थोडया लोकांकडे मोबाईल होते. नवीन नंबर पाहून जयवंतने “हॅल्लो.. हॅल्लो”केले.

पलीकडून एका बाईचा आवाज आला “नमस्कार, तुमचे नाटक आणि भूमिका उत्तम झाली ‘.

“थँक्स, कोण बोलतंय?

“, मी राधिका, या स्पर्धेची परीक्षक ‘

जयवंतला आश्यर्य वाटते. परीक्षकाचा मला फोन? का केला असेल 

“बोला मॅडम.. का फोन केला होता?

“स्पर्धेचे सिनिअर परीक्षक आहेत ना सुधीरसर त्याना तुम्हाला भेटायचे आहे. त्यानी तुम्हांला निरोप द्यायला सांगितले.. केंव्हा येऊ शकता? शक्यतो एकटे या किंवा तुमच्या ग्रुपमधील कुणी असलं तरी चालेल ‘.

 जयवंतच्या डोक्यात चक्र फिरू लागली, काही तरी गडबड आहे..

सावध राहा.

 “उद्या येतो मॅडम सकाळी अकरा वाजता ‘.

“या, आम्ही सारे असू, गेस्टहाऊस मध्ये आहोत आम्ही ‘.

“होय, येतो.. म्हणून जयवंतने मोबाईल ठेवला.

जयवंत एक मिनिट विचार करू लागला -परीक्षकांनी का बोलावले असेल? असे एवढ्या वर्षात कुठल्या परीक्षकांनी रेस्टहाऊस वर बोलावल्याचे ऐकले नव्हते, हे काहीतरी नवीन.

त्त्यांचे फोनवरील बोलणे ऐकत असलेली क्षमा म्हणाली “त्या शेखरचे पहिल्या दिवशी नाटक झाले ना, त्यालाही काल बोलावलेले म्हणे..

“बरे, आपण उद्या जायचे, शिरीष आणि नरू तुम्ही माझ्यसमवेत यायचे आणि.. जयवंतने शिरीषच्या कानात सांगितले.

शिरीषने मान हलवली. उद्या दहा वाजता ते दोघे जयवंतच्या घरी येणार होते.

दुसऱ्या दिवशी नरू आणि शिरीष जयवंतकडे आले. पण जयवंतने एक वस्तू शिरीषकडे दिली, ती त्याने पॅंटीच्या खिशात ठेवली आणि रिक्षा करून तिघे निघाले.

तिघे रेस्टहाऊस मध्ये पोहोचले आणि चौकशी करून राधिका मॅडमच्या सूट मध्ये आले, त्याना पहाताच राधिकामॅडमने बाजूच्या सूटमधील सुधीरसर आणि मोहनसरांना बोलावले. तिघे येऊन खुर्चीत बसले, मग सुधीरसर बोलू लागले 

“जयवंत, तुमचे नाटक छानच झाले. पण तशी इतर ग्रुपची पण नाटकें चांगलीच होतात. स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर आला तरच तुम्ही अंतिम स्पर्धेत जाणारं आणि ते आमच्या हातात आहे.

जयवंतने शिरीषकडे पाहिले. शिरीषने हळूच मान हलवली आणि हात खिशात घातला.

“बोलायला हरकत नाही ना, ही तुमचीच माणसे आहेत ना?

जयवंतने मान हलवताच सुधीर बोलायला लागले.

“आम्ही या आधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणूंन काम केले आहे, स्पर्धेचा निकाल आमच्या हातात असतो. तुम्हाला जर पहिला नंबर हवा असेल आम्हाला तिघांना प्रत्येकी एक लाख द्यावे लागतील.

“काय? अनपेक्षितपणे जयवन्त चित्तकारला.

“होय, दुसरा हवा असेल तर प्रत्येकी पंचांहत्तर हजार.. राधिका मॅडम मध्येच म्हणाल्या.

“आणि ग्रुप्स पैसे देतांत बरं का, तिसरे परीक्षक म्हणाले.

“काल तो स्वप्नील आला होता, त्याला पण हेच सांगितलं… आणि अंतिम फेरीत नंबर हवा असल्यास त्याची पण व्यवस्था होईल.

“मी एकटा एवढ्या पैशाचा निर्णय घेऊ शकत नाही, ग्रुपला विचारून सांगतो ‘.

“, हो सांगा आणि हे तुमच्या आमच्यात ठेवा बरं का..

“, येतो सर… म्हणून तिघे बाहेर पडले.

बाहेर पडून रस्त्यावर आल्यावर जयवंत शिरीषला म्हणाला “आता बाहेर काढ..

शिरीषने खिशात लपवीलेला पॉकेट रेकॉर्डर बाहेर काढला आणि चालू केला.. त्यात सारे सांभाषण व्यवस्थित रेकॉर्ड झाले होते.

 —सायंकाळी सहा वाजता —-

शहरातील बरेच नाट्यकर्मी, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रोफेसर जमले होते. वर्तमानपत्र वार्ताहर, टीव्हीचॅनेल रिपोर्टर कॅमेरासह हजर होते. चर्चा जोरात सुरु होत्या. आजपर्यत पैशाची मागणी करणारे परीक्षक कोणी पाहिले नव्हते, समाजाची एवढी अधोगतीचा विचार केला नव्हता.

सर्व लोकांसमोर आणि वार्ताहरासमोर जयवंतने परीक्षकासोबतचे रेकॉर्डिंग ऐकवले आणि सर्वाना धक्का बसला. सांस्कृतिक क्षेत्रात एवढे अध. पतन कोणी कल्पिले नव्हते.

दोन मिनिटात बातम्यातून ही बातमी सर्वदूर पसरली.

सर्व ठिकाणहून फोनावर फोन सुरु झाले.

कलेक्टरनी स्पर्धा रद्द केली. परीक्षकांची नाट्यकर्मिनी आणि जनतेने शी थू केले. पोलीस बंदोबस्तत त्याना शहराबाहेर हाकलले. दुसऱ्या दिवशी अनेक  वर्तमापत्रात ही ठळक बातमी होती. पुढे कधीही या परीक्षकांना कोणी बोलावले नाही.

जयवंत निराश झाला. आपण आणि आपल्यासारखे अनेक निष्टने नाटक करतो.. रात्रीचा दिवस करून सोबत्याना घेऊन स्पर्धेत उतरतो.. आपली तब्येत, संसार, पैसे याचा विचार न करता दोन दोन महिने जागरणे करून उपयोग काय? असे परीक्षक पैशासाठी हवा तसा निकाल देणार.

जयवंत मग लहान मुलांची नाट्यशिबीरे घेऊ लागला पण स्पर्धेच्या नाटकापासून कायमचा दूर झाला.  

समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपल्या झाेपेचा साैदा… — लेखक – पत्रकार विकास शहा ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

आपल्या झाेपेचा साैदा… — लेखक – पत्रकार विकास शहा ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातली घटना. बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स म्हणजेच निमहान्स या संस्थेत एका २६ वर्षाच्या बेरोजगार तरुणाने स्वतःला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं. या तरुणाला कशाचं व्यसन होतं.. ? तर नेटफ्लिक्सवरच्या निरनिराळ्या सीरिअल्स आणि सिनेमे बघण्याचं.

हा तरुण दिवसाचे जवळपास ८ तास २९ मिनिटं सलग नेटफ्लिक्स बघण्यात घालवत होता. निमहान्स संस्थेने या तरुणाला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं आहेच. शिवाय महत्वाचं म्हणजे नेटफ्लिक्सच्या व्यसनाची नोंद झालेली जगातली ही पहिली केस मानली जाते. जगभर नेटफ्लिक्सच्या व्यसनाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली असली तरी सलग नेटफ्लिक्स बघण्याचा, त्याचा जागतिक कालावधी ६ तास ४५ मिनिटांचा आहे. या तरुणाचं नेटफ्लिक्स बघण्याचं ८ तास २९ मिनिटं हे प्रमाण गेले ६ महिने असल्यामुळे अर्थातच त्याची रवानगी व्यसनमुक्तीसाठी करण्यात आली आहे.

ही बातमी वाचत असताना आजूबाजूचे नियमित नेटफ्लिक्स बघणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. विचार करत होते इतकं सतत बघण्याचा कंटाळा येत नाही का.. ? तितक्यात काही दिवसांपूर्वी वाचलेली अजून एक बातमी आठवली. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांना नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण आहे.. ? असं विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अगदीच अनपेक्षित उत्तरं दिलं. सर्वसाधारणपणे नेटफ्लिक्स आणि अमेझॉनमध्ये बाजार काबीज करण्यासाठी चढाओढ चालू असते. असा आपला अंदाज असतो त्यामुळे नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक अमेझॉन असं आपण गृहीत धरतो, पण रीड हेस्टिंग्सने मात्र वेगळाच विचार मांडला. ते म्हणाले, ‘झोप हा आमचा सगळ्यात मोठा स्पर्धक आहे. ’ सहज हसण्यावारी नेण्यासारखा हा मुद्दा नाहीये. स्वतःच्या घरात आणि आजूबाजूला बघितलं कि नेटफ्लिक्स कुणाशी स्पर्धा करतंय हे सहज दिसतं. घुबडासारखी रात्र रात्र जागून सिरिअल्सचे सीझन्स संपवणारी माणसं हे काही दुर्मिळ दृश्य राहिलेलं नाही. एक संपली कि दुसरी अशीच सलग बघणारेही अनेक आहेत. एका तरुण मुलाला आपण व्यसनी बनत चाललो आहोत याची जाणीव होऊन त्याने त्यातून मुक्तता मिळावी आणि आयुष्याची गाडी रुळावर यावी यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेतली पण उरलेल्यांचं काय.. ? 

नेटफ्लिक्स, त्याचं व्यसन या सगळ्याची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्या मनोरंजनाच्या पद्धती बदलल्या आहेत. हेही समजून घेतलं पाहिजे. एखादी सीरिअल एकत्र बसून बघणं हा प्रकार जवळपास कालबाह्य व्हायला आला आहे. कालपर्यंत मनोरंजन हा कुटुंबाचा एकत्रित वेळ होता. लोक टीव्हीवरच्या सीरिअल्स आवडो न आवडो एकत्र बसून बघत होते. त्यामुळे त्याला काही एक मर्यादा होती. आता हातातल्या स्मार्ट फोनवर सगळंच उपलब्ध झाल्यावर मनोरंजनही ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या स्क्रीन पुरतं मर्यादित झालं आहे. ‘मी काय बघते हे तू बघू नको आणि तू काय बघतोयस हे बघायला मी डोकावणार नाही. ’ असा सगळं मामला. शिवाय या सगळ्याला स्थळ, काळाचं बंधन उरलेलं नाही. अमुक एक वाजताच सीरिअल बघावी लागेल, रिपीट एपिसोड बघायचा असला तरीही अमुक एक वाजताच ही भानगडच नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा बघता येण्याची सोय क्रांतिकारी असली तरी माणसांचं मनोरंजन चौकटीत कोंबून टाकणारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची पद्धतच मुळापासून बदलली आहे. त्यातलं सार्वजनिक असणं लोप पावत चाललं आहे. आणि व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत.

शिवाय नेटफ्लिक्स काय किंवा अमेझॉन काय ही माध्यमे मुक्त आहेत. अजून तरी सेंसॉरशिप लागू झालेली नाही. त्यामुळे निरनिराळ्या सीरिअल्समधले मुक्त लैंगिक व्यवहार जे सॉफ्ट पॉर्न प्रकारातले असतात, सहज बघण्याची सोय आहे. ते चांगलं कि वाईट हा निराळ चर्चेचा मुद्दा. मुळात उपलब्ध आहे हे महत्वाचं. मनोरंजन स्वतःपुरतं मर्यादित राखण्यामध्ये हाही महत्वाचा मुद्दा असतोच, नाकारून चालणार नाही.

या सगळ्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतोय. नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय कि त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे. तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं.. ! खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे. इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे. फेसबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्स अँप उघडणारे अनेक असतात. मध्यरात्री अचानक उठून फेसबुक बघणार्‍यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्‍यांची संख्या वाढतेय. रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार डाऊनमार्केट आणि कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

रोजचा दीड जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत. ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक-मानसिक-सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे. आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते. फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्लिक्स वापरण्याचे जे पैसे देतो त्याच्या कितीतरी पट अधिक मनोरंजन आपल्या हातात असतं, ज्यामुळे ते जवळपास फुकट आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत बाजार निराळ्या पद्धतीने पैशांची वसुली करत असतो. इथे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. स्वस्तातही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. मनोरंजन अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत चाललंय कारण सध्या सौदा आपल्या झोपेचा आहे.

आपण जितके कमी झोपणार, डिजिटल माध्यमातून मनोरंजन देणार्‍या कंपन्या तितक्याच मोठ्या होत जाणार. हे भयंकर आहे. अस्वस्थ करणारं आहे. प्रत्येकजण बोली लावतोय, माणसांची झोप कमी व्हावी यासाठी तेव्हा, आपल्या झोपेचा सौदा किती होऊ द्यायचा याचाही ज्याने त्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

 ♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : पत्रकार विकास शहा,

तालुका प्रतिनिधि दैनिक लोकमत, शिराळा ( सांगली )

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नमन नटवरा – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ नमन नटवरा – भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

  नरु जोरात सायकल चालवत होता, त्याच्या पाठीमागे शिऱ्या बसला होता. शिऱ्या घड्याळ बघत म्हणाला 

“साडेसहा वाजले की रे, जोरात घे.

“घेतो रे, पन चढ हाय न्हवं..

“अरे, सात वाजले की सर दरवाजा बंद करत्यात.. जल्दी.

नरुने जोरात सायकल घेतली आणि पावणेसात वाजता सायकल हॉलच्या पायऱ्याला लावली. दोघे घाम पुशीत उभे राहिले. लहानशी वाऱ्याची झुळूक आली, त्याने त्या दोघांना बरे वाटले. मग नरुने हळूच हॉलचा दरवाजा ढकलला. हॉल मध्ये जयवंतसर खुर्चीत बसुन पुस्तक वाचत होते. त्यान्च्यासमोर बाकावर आठ मुलगे आणि चार मुली, दोन वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री पण बसली होती. नरु आणि शिरीष आत जाऊन एका बाकावर बसले.

 सात वाजले तसे जयवंतने हॉल चा दरवाजा आतून बंद केला.

मग तो बोलू लागला “यंदा स्पर्धा पंचवीस नोव्हेंबरपासून सुरु होते आहे, तेंव्हा या वर्षीच्या आपल्या नाटकाची तालीम सुरु करायला हवी. यंदा आपल्या संस्थेने गिरीष कर्नाड यांचे “तुघलक ‘हे नाटक निवडले आहे. तसे हे खर्चिक नाटक आहे कारण या नाटकासाठी ऐतिहासिक ड्रेपरी हवी, लेव्हल्स करायला लागतील, म्युझिकवर खुप मेहनत करायला लागेल. आपल्या संस्थेने मंजूर केलेल्या रकमेत हे नाटक करणे कठीण आहे म्हणून आपल्या सर्वाना अंगमेहनत करून कमीतकमी खर्चात नाटक उभे करायला लागेल.

तुमच्यापैकी सर्वांनाच भूमिका मिळेल असे नाही पण नाटकासाठी इतर कामे जास्त जास्त आव्हानदायक असतांत. बॅकस्टेज अत्यन्त महत्वाचे. कारण आपला हौशी ग्रुप आहे, व्यावसायिक नव्हे. आपल्या सर्वांनाच बॅकस्टेज पण करायला लागेल. या नाटकातील भूमिकेनुसार मी कलावन्त निवडले आहेत, त्याची लिस्ट उद्या मिळेल. प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य कोण करणार हे आपण ठरवू. त्या सर्वांना माझी आणि माझ्या पत्नीची मदत असेल. भूमिका ठरल्यानंतर कलाकारांनी पंधरा दिवसात आपले संवाद पाठ करणे अपेक्षित आहे, मग मोव्हमेंट दिल्या जातील, मग नेपथ्य लावून हालचाली, मग प्रकाश, संगीतसह मोव्हमेन्ट ठरतील. मग जयवंतने नाटकाचे थोडे वाचन केले आणि मंडळी घरी गेली.

नरु आणि शिरीष परत सायकलवरुन घरी निघाले, आता हवेत थंडी होती.

शिरीष या ग्रुपमध्ये दोन वर्षे लहान भूमिका करत होता, नरु त्यांच्याबरोबर यंदा प्रथमच येत होता. नरु बोलू लागला “शिऱ्या, हे जयवंतसर कसे आहेत, म्हणजे बरीच वर्षे नाटक करतात काय?

“होय, वीसवर्षे तरी ते नाटक करतात, सुरवातीला दुसऱ्या ग्रुपमध्ये होते पण तिथं त्यांचं बिनसलं त्यापासून ते आणि त्त्यांची बायको वेगळी झाली आणि त्यांनी हा ग्रुप सुरु केला, दरवर्षी नाटक काढतात पण म्हणावं तस यश अजून मिळालं न्हाई त्यास्नी, पण स्वतःमात्र बेस्ट काम करत्यात, त्त्यांची बायको पण बेस्ट काम करते.

“पन मला देतील काम स्टेजवर?

“, बहुतेक न्हाई, या ग्रुपमधील जुनी अनुभवी लोक हायेत, हे नाटक सरांनी काढलंय ते लय अवघड हाय, बोलताना फापलायला व्हणार, इनोदी नाटक असत तर जमतंय कसतरी, पन या नाटकात जुनीच टीम असणान, तुला बॅकस्टेजला घेनार, पन खरं नाटक बॅकस्टेज करता करता समजत.. मी पन दोन वरश बॅकला होतो, बघू यंदा स्टेजवर चान्स देत्यात काय?

दोघ सायकल चालवत घरी गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सात वाजता सर्व जमली, आज अजून बरीच लोक आली होती, वयाने मोठी लोक होती, स्त्रिया होत्या. नरु गप्प बसुन पहात होता.

कलाकारांची निवड झाली, यावेळी शिरीषला शहाबुद्दीनची भूमिका मिळाली. स्वतः जयवंतसर मोहम्मदबिन तुघलक ही कठीण भूमिका करणार होते. वाचने सुरु झाली, हे नाटक चौदाव्या शतकातील आणि इस्लामी वातावरणातील, त्यामुळे बरेच उर्दू शब्द आणि वाक्ये होती. पण जयवंतसरांनी नाटकाचा व्यवस्थित अभ्यास केला होता, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला ते व्यवस्थित मार्गदर्शन करत होते. हळूहळू कलाकारांच्या तोंडात वाक्ये बसायला लागली.

पण काही कलाकार कधी येत होते कधीं दांडी मारत होते. जयवंतची चिडचिड होतं होती. रोज कुणालाना कुणाला लेक्चर द्यावे लागत होतं. काही दिवसांनी एक स्त्री कलाकार यायची बंद झाली. तिची तात्पुरती तालीम दुसरी कलाकार करू लागली. शेवटी जयवंतसर आणि त्त्यांची पत्नी तिच्याघरी गेली, तेंव्हा तिने “मला लहान भूमिका दिली, म्हणून माझे त्या भूमिकेत मन लागत नाही ‘, असे सांगून काम करण्यास नकार दिला. पुन्हा शोधाशोध करून नवीन स्त्री मिळविली, पुन्हा तिची पहिल्यापासून तालीम सुरु, एका पुरुष कलाकारांची दुसऱ्या शहरात बदली झाली.. म्हणून पुन्हा नवीन माणूस शोधला.

एक दिवस घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला “मग दरवर्षी असच कोनी ना कोनी नाटक मधीच सोडून जातंय काय?

“होय बाबा, यालाच नाटक म्हणत्यात… पडदा वर जाई पर्यत काय काय होईल सांगता यायचं न्हाई.

“मग जयवंतसरांना लय तरास होतं असेल?

“होय, सर दिवसभर साखरकारखान्यात नोकरीला जात्यात, घरसंसार हायेच आणि रात्रीच नाटक. त्यात रोज असली टेन्शन..

“आनी त्त्यांची घरवाली?

“ती बी नोकरीं करते, यांच्या नाटकात काम करते ‘.

अनेक अडचणी, संकटे दूर करून नाटकाला आकार येत होता, कलाकारांचे पाठांतर बऱ्यापैकी झाले. मग जयवंतसर नेपथ्याच्या मागे लागले. एका सुताराला बोलाऊन लेव्हल्सची मापे दिली, मागे कमान करायला दिली. म्युझिकसाठी एका स्टुडिओत जयवंतसरांनी दोन रात्री जागून कॅसेट तयार केली. यंदा प्रकाशयोजनेकरिता ग्रुपमधील मनिषवर जबाबदारी दिली, अर्थात त्याला मार्गदर्शन जयवंतसरांचेच होते.

 जसजशी स्पर्धेची तारीख जवळ येत होती, तसतशी रात्रीची जागरणे वाढत होती, आता रविवारी पूर्ण दिवस आणि बाकी दिवशी रात्री दोनपर्यत तालीम, मग संगीताची तालीम करून जयवंत पहाटे चार वाजता घरी पोचत होता, परत सकाळी डबा घेऊन आठला बाहेर पडत होता.

नाटकाची ड्रेपरी तयार झाली, त्या दिवसापासून कलाकार आपली ड्रेपरी घालून तालीम करू लागले. घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला 

“मग आता नाटक एकदम स्टेजवर बागायचं?

“, न्हाई रे बाबा, आता कुठलं तरी स्टेज घेणार भाड्याने तीन रात्रीसाठी आनी तिथं लाईट जोडून नेपथ्य उभ करून नाटकाच्या वेळी करयचा तशी प्रॅक्टिस करायची, त्यावेळी सर त्यान्च्या नाटकातल्या मित्रमंडळींना बोलावत्यात आनी त्यास्नी सूचना करायला सांगत्यात ‘.

“एका नाटकासाठी इतकी धडपड, मेहनत करायची?

“होय बाबा, ही स्पर्धा हाय, इथं बरीच नाटक होनार, मुंबई पुन्यातून परीक्षक येत्यात, त्याना आवडायला हवं… मग स्पर्धेत पयल दुसरं आलं तर अंतिम स्पर्धेला जायला मिळतं. त्यासाठी ही धडपड ‘.

नाटकासाठी एक स्टेज मिळालं. तेथे दुसऱ्यादिवशी जमायचं ठरल. नरूआणि शिरीष तेथे पोचले तेव्हा जयवंतसरांची पत्नी धावपळ करून स्टेज लाऊन घेत होती. सर कुठे दिसत नव्हते. शिरीषने चौकशी केली तेंव्हा कळले सरांना काल रात्री उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली म्हणून डॉ गुळवणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. सर्वजणं काळजीत होते, नाटक चार दिवसावर आले आणि प्रमुख भूमिका करणारा कलाकार हॉस्पिटलमध्ये. थोडीफार तालीम झाली. मग घरी जाण्याआधी नरू आणि शिरीष हॉस्पिटलमध्ये गेले. सरांना सलाईन लावलेले होते. लांबून त्याना पाहून ते घरी आले.

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पूर्णविरामाच्या आधी – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ पूर्णविरामाच्या आधी – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

(मनात पक्क होत निघाल होत की, आता मी देखील ह्या घटनामधील प्रमुख पात्र बनत चालले आहे, सगळ्या गाॅसीपचा एक आधुनिक विषय. रसरशीत आणि मजा घेवून रंगवून सांगण्यासारखा- ऐकण्यासारखा, एक महिला प्राध्यापिका आणि एक महिला ड्रायव्हर मधील लैंगिक संबंधाची कहाणी…. आणि बरच खुप काही…) – इथून पुढे —

… तिच्या ह्या रोजच्या गुढ अर्थपूर्ण हास्याचा मी गुडार्थ लावून भयभीत होऊन जाई. तिची प्रत्येक नजर जणू माझ्या प्रत्यांगाला छेदून जाई, शरिरात एक कंप निर्माण होई जो कुठल्या अनावश्यक स्पर्शात रूपांतरित होऊन त्या फक्त कल्पनेनेच माझ शरीर थरथर कापायच. तिच्या डोळ्यात खोलवर. अस काही तरी दिसायच जे सम्मिलित होण्यासाठी जणू याचना करत आहेत. कदाचित म्हणून मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायची नाही. तिने तिकीट घेण्यास नकार केला की मी तिला असा काही ” लूक” द्यायचे की तिला समजल पाहिजे की ती जे काही करत आहे, ते चुकीचे आहे.

…मी तिच्या जाळ्यात जराही अडकणार नाही. माझ्यात अस आहे तरी काय…. काहीच तर नाही. गडद काळ्याभोर केसांच्या जागी पांढरी शुभ्र केस सगळीकडे पसरलेली त्यावर जागोजागी दिसणार केस…. गळालेल व चमकणार डोक्याच चमड. चेहऱ्यावर इथे – तिथे उन्हात जळालेली चमडीचे काळे काळे डाग आहेत. डोळ्यावर सहा नंबरचा चष्मा चढवलेला असतो. ना मी जास्त उंच आहे ना जास्त छोटी. हो… पण माझे कपडे आणि चप्पल खुप चांगले असतात कदाचित म्हणूनच मी तिला आवडली असणार. एका सर्वसामान्य महिलेच्या अंगकाठी वर दुसऱ्या सर्वसामान्य महिलेचा हा अतिरिक्त चांगुलपणाचा व्यवहार. न समजण्या पलिकडचा होता.

हा माझ्या ” स्व” चा अपमान होता, तिरस्कार होता, माझ्याच नजरेत केला जाणारा माझा अपमान होता.

… असू शकत ही ड्रायव्हर माझ्या पाठी आणि माझ्या पैशांच्या पाठी लागली असेल. हिला तिकीट घ्यायच नाही आहे पण का घ्यायच नाही ! ह्या गोष्टीचा आधी मला तपास घ्यायला हवा की ह्याच्या पाठीमागे कोणत गुपित आहे! माझ्याकडे असल्या तिकडमबाज कामांसाठी आजिबात. वेळ नव्हता पण त्या ड्रायव्हरला धडा शिकवायचा होता. माझ्या सज्जनपणाचा फायदा घेऊन माझे थोडे पैसे वाचवून कसला फायदा घेऊ पाहते ही…. ! माझ्या मार्गात माझे कथित आदर्श अगदी हट्टून उभे होते. माझा राग दिवसेंदिवस वाढतच चालला होता. प्रत्येक प्रवासादरम्यान तिच हास्य आणखीन वाढत होत व इकडे माझा राग. ती जितक्या विनम्रपणे हसायची तेवढ्याच आवेषाने माझ्या भुवया ताणल्या जायच्या. माझ्या आयुष्यात असे कितीतरी क्षण आले होते जेव्हा मला अशा पद्धतीने ब्लॅकमेल केल होत, पण प्रत्येक वेळी मी ह्या समस्यांचा सामना करून त्यातून सही सलामतपणे बाहेर पडले होते. जरी त्यावेळी माझ्या गरजा अफाट होत्या तरीही मी कोणाला माझ्या जवळ देखील येऊ दिल नाही… आणि आता तर अशी कोणती बिकट परिस्थिती ही माझ्या समोर नाही.

… आता मात्र मी तिचे ढिले स्क्रू ताईट करण्याचा चंगच बांधला होता. माझ्या प्रत्येक हरकतीतून स्पष्ट दिसून येत होत की मी ह्या षडयंत्राचा खुलासा करूनच राहणार. अंदाज लावत होते, काही जाणीवपूर्वक होते, काही काही सहजपुर्वक होते आणि काही एक – दुसऱ्याच्या गुंत्यातून नवीन गाठी बांधून उद्भवले होते.

… दिवसागणिक, माझी विचार करण्याची क्षमता आता वाढून – वाढून त्या टोकापर्यंत पोचली होती जिथून आता मला उसवण्याच काम पुर्णपणे बंद झाल होत. सहनशीलतेचा घडा आता भरला होता. आज मी तिच्या बस मधून बाहेर येताच तिला बोलण्यासाठी थांबवल. ती खूप आनंदी होती, इतकी आनंदी की तिची खूप दिवसांची इच्छा जणू पुर्ण झाली असावी. मी रागाने तीळपापड झाले होते आणि ती मस्त हसत होती. तिच हास्य आगीत तेल ओतून जणू ज्वालामुखीला भडकवण्याच काम करत होत.

… आणि मी सरळ मुद्याला हात घालून मनात कोणतीच किंतू -परंतू न ठेवता लाज – शरम न बाळगता तिला विचारल की…. ” फक्त माझ्या कडूनच तिकीट न घेण्याच कारण काय? तुम्हाला काय हव आहे?…. ती म्हणाली,…. “आपल्या जवळ पाच मिनिटाचा वेळ आहे काय?”

… मी म्हटलं,…. ” हो नक्कीच आहे, तुम्ही मला आता सांगाच…. ” माझ्या आवाजात राग होता.

… “तुम्हाला बघून मला माझ्या त्या हिरोची आठवण येते ज्याने मला माझ्याशी परिचय करून दिला होता. “

… ” म्हणजे, मी काही समजले नाही?” कारण जाणण्याची गडबडघाई तिला सरळ सरळ इशारा देत होता की… उगाच कोड्यात बोलू नकोस, काय ते स्पष्ट सांग.

… त्यानंतर ती जे सांगत होती, मी अगदी अवाक होऊन ऐकत होते…. ” लहानपणी माझ्या एका शिक्षकांनी माझी मदत केली होती त्यामुळे मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहून समाजाशी लढू शकले. मी आणि माझी आई भटक्या सारख इकडे तिकडे फिरत होतो. मी आपल पोट भरण्यासाठी लोकाच सामान सुद्धा घेऊन पळायच धाडस करू लागले होते. एक दिवस मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून कागदाचा एक तुकडा उचलून वाचत जात होते तेव्हा त्या शिक्षिका तिथे थांबल्या, आईशी बोलल्या, आईला समजावल की मला शिकव. “

… ” मग काय झाल ” मी माझे श्वास रोखून पुढे ऐकण्यासाठी अगदी आसुसले होते. “

… ” मग दुसऱ्या दिवशी त्या आल्या, एका सामाजिक संस्थेत आमच्या दोघींची रहाण्याची व्यवस्था केली शिवाय मी शाळेत जाते की नाही ह्याची वारंवार खात्री पण करत राहिल्या. जोपर्यंत मी थोडी मोठी होऊन समजू शकले की त्यांनी माझ्यासाठी काय केलं, व ते ॠण फेडायचा मी विचार करायच्या आधीच त्या कुठेतरी निघून गेल्या. मी त्यांना खूप शोधल, आपल कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला पण त्या कुठेच पुन्हा भेटल्या नाहीत. जर त्या नसत्या तर आज मी पण कुठल्या तरी चोरट्या किंवा भटक्या लोकांसारख जीवन जगत असते. तुमचा चेहरा पाहून वाटल की तुमच्यात ही ते सगळ काही आहे जे लहानपणी मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं होत, मग काय, त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ तुमच्या कडून तिकीट घ्यायच मन झाल नाही. “

… माझ्या अंगावर शहारे आले होते. ती अत्यंत जिव्हाळ्याने मला पहात होती. ” त्यांनी जे काही माझ्यासाठी केल ते ह्या तिकीटासमोर काहीच नाही, बस्स… माझ्या मनाला तेवढीच शांतता मिळत राहिली. “

… माझी दातखिळ बसायची वेळ झाली, पायाखालची जमीन सरकली होती. माझा मान – स्वाभिमान आपल्या अभिमानाच्या पायदळी तुडवला होता आणि मी स्वतःला खूप तुच्छ लेखू लागले. ती माझी गुरु होती जी गुरूमंत्र देऊन मला आपल्या शिष्यासारख घडवत होती. कितीतरी विद्यार्थ्यांच्या शिक्षिकेला एक शिक्षक पुन्हा नव्याने भेटण काही साधी गोष्ट नव्हती.

… तिची बस घेऊन जाण्याची वेळ झाली होती, ती तसच स्मित हास्य आपल्या सोबत घेऊन परत जाऊ लागली आणि मी एकटक तिला पहात राहिले. मनात आणल असत तर तिला कडकडून मिठी मारून गळाभेट केली असती जेणेकरून मनातला अपराध काहीसा कमी झाला असता… पण ती हिम्मत मी दाखवू शकले नाही. काही न बोलता, काही न समजता जेवढे आरोप कोणावर लावू शकतो, तेवढे मी लावले होते. त्याच कठोरतेने, मुर्ख विचारांनी आपल्याच नजरेत मी उतरून गेले होते, परंतु माझ्या ह्या घृणास्पद विचारांना माणुसकीच्या भोवऱ्यात गुंतवून माझ्या स्वयंस्फूर्त बेशिस्त वैचारिक वर्तणूकीला ती पुर्णविराम देऊन गेली होती.

— समाप्त —

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पूर्णविरामाच्या आधी – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ सुश्री सुजाता पाटील  ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ पूर्णविरामाच्या आधी – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

मी रोज त्या बसमध्ये चढायची जी सरळ मला माझ्या कामाच्या ठिकाणी घेऊन जायची. आमच्या संस्थेची बस होती ती ज्यामध्ये येताना व जाताना ड्रायव्हर ला तिकीटे ही द्यावी लागत. तिकीट पण बस मध्ये दिले जात नव्हते, तर ते पहिलच खरेदी करून ठेवावी लागत. सहा डाॅलर च एक तिकीट. यायच जायचे एकूण बारा डॉलर. काम आपल्या जागी आणि येण्या -जाण्याच्या तिकीटाचे पैसे आपल्या जागी. संस्थेचा प्रत्येक शिक्षक, काम करणाऱ्याला ह्या मधून प्रवास करताना तिकीट घ्यावच लागे. हो… विद्यार्थ्यांना आपल ओळखपत्र दाखवून येणजाण फुकट होत. फुकट कसल म्हणा त्यांच्या फी मधून सगळ काही वसूल केलेल असत. फरक इतकाच की, त्यांना न सांगता त्यांच्या कडून घेत आणि आमच्या कडून सांगून सवरून घेत. नाक पुढून पकडा किंवा काना मागून पकडा… गोष्ट तर एकच होती.

आज काहीतरी नवीन होत. रोज वेळेत येणारी बस पाच मिनिटे लेट होती. रोज जी ड्रायव्हर बस चालवायची ती पण आज नव्हती. चालकाच्या सीट वर आज नवीन चेहरा दिसत होता. वयाने ती माझ्या बरोबरीची वाटत होती. बस नवीन होती. नवीन बस आणि नवीन ड्रायव्हर जरी असले तरी मला त्याचा काय फरक पडणार, मला तर आत बसून आपली तयारी करायची होती, दोन वर्गांवर आज काय शिकवायच आहे हाच गुंता डोक्यात घोळत होता. आपल्या पाॅवर पाॅईंटची फाईल चेक करायची होती. इथे बसले आणि तिथे उतरले, असच काहीस माझ काम होत. ” कोई चालक होए हमें का हानि” अशी एक प्रकारची गुर्मी माझ्यात होती त्यामुळे प्रवासात मी तटस्थ होते. गाडी, ड्रायव्हर, अशा बदलामुळे माझ्यात काही फरक पडणार नव्हता, आणि पडला ही नाही.

निदान एक आठवडा भर तरी सगळ ठीकठाक चालल. आता ती मला…. रोजची प्रवासी आहे हे ओळखून होती आणि मी तिला ही ओळखून होते… म्हणजे ह्यावेळी माझ्या सोबत तीच असेल. रोज मी चढताना – उतरताना ती छानस हसायची. मी पण तिच हास्य दुप्पट करून परत करी आणि ” धन्यवाद” “आपला दिवस चांगला जावो अस बोलून निघून जायचे.

एक दिवस त्या ड्रायव्हरने विचारल… ” आपण शिक्षिका आहात का? “

मी म्हटल”हो. ” बस्स तिथूनच हे सगळ सुरू झाल, ” हे सगळ ” म्हणजेच सहानुभूतीची शृंखला. विना तिकीटाच त्या बस मध्ये बसण्याचा विचार माझ्या मनात चुकूनही कधी आला नाही. परंतु ह्या ओळखीनंतर जेव्हा पण बस मध्ये चढताना त्या महिला ड्रायव्हरला तिकीट दाखवताना “थॅन्क्स” अस बोलून ती हसायची. पहले दोन – तीन दिवस तर तिच हे हसण मला चांगल वाटलं, पेक्षा खूप छान वाटल. रोजचे बारा डॉलर वाचत होतें, का वाईट वाटेल बर. मी पण माझा प्रवास दुप्पट आनंदाने पुर्ण करू लागले. भले मी खूप पैसे कमवत होती पण फुकटातला जो आनंद असतो तो अगदी अवर्णनीय असतो. कित्येक वेळा खरेदीच्या वेळी कुठल्या ही स्टोर मध्ये पंचवीस पैशाच एक नाण चिटकवलेल मिळायच तेव्हा डोळ्यात एक वेगळीच चमक दिसून यायची, ती चमक अशी काहीशी असायची की जणू काही मोठा खजाना मिळाला असावा, मग त्यापुढे हे तर पुर्णच्या पुर्ण बारा डॉलर होते, संपूर्ण प्रवासात माझ्या चेहऱ्यावर हास्य खिळून राहिल.

ह्या आधी कधीच मी तिकीटाचे पैसे वाचवण्या बद्दल विचार देखील केला नव्हता, मीच काय कोणीही असा विचार केला नसेल. मोठ्या पदावर कार्यरत असताना अशा छोट्या – मोठ्या घोटाळ्यांचा विचार करण देखील आपल्या इज्जतीचा चकनाचूर करण होय. भाड आपल्या जागी, व नोकरी आपल्या जागी. हाच नियम कित्येक वर्षांपासून चालत आला होता.

सोमवार ते शुक्रवार पर्यंत पुर्ण आठवडा फुकटचा प्रवास करून मला अत्यानंद व्हायला हवा होता आणि मिळाला पण…. परंतु आठवड्याच्या शेवटी शेवटी हा आनंद माझ्या मनाला टोचू लागला. आठवडा संपता संपता, शुक्रवार योईतोपर्यंत माझ डोक अस ठणकल, अस ठणकल की मला वाटू लागल की…. ” दाल में जरूर कुछ काला है. ” नीट काळजीपूर्वक विचार करता अस जाणवल की काळ-बेर नाही तर मोठा सा खडा आहे जो मला टोचत आहे. तिच माझ्या कडून तिकीट न घेण मला त्रास देवू लागल. मनात कोणताही स्वार्थ न ठेवता कोण कोणावर उगाचच का उपकार करेल.

कोणी तरी आपल्याशी गरजेपेक्षा जर जास्त चांगल वागत असेल तर ते वागण निश्चितच शंकेला जन्म देत आणि शंकेने ग्रासलेल्या मनात वाईट विचारच येतात जे एक झाल की एक असा हमला करत राहतात. त्यामुळे एक झाल की एक वाईट विचार मनात येऊ लागले. शेवटी तिला ह्या बदल्यात काही ना काही पाहिजेच असणार. तो सगळा काही मी विचार केला जो माझ्या अधिकार क्षेत्राच्या हक्काखाली होत आणि ज्याची अपेक्षा माझ्या कडूनही कोणी करू शकत.

सगळ्यात मोठी आशंका मला ही वाटतं होती की माझ्या वर्गात तिचा कोणी मुलगा अथवा मुलगी आहे जिला ती चांगले मार्क्स देऊ पाहतेय. पण तिला बघून अस कधी वाटल नाही की अस काहीतरी असू शकेल. माझ्या वर्गातल्या मुलांचे चेहरे एक झाल की एक माझ्या नजरेसमोर जणू अस सांगत तरळू लागले, ” नाही, तो मी नाही ज्याबद्दल तुम्ही विचार करत आहात. “

दुसर कारण हे देखील असू शकत की माझा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी ह्या ड्रायव्हरला माझ्या मागावर पाठवल असेल. शक्यता दाट होती, परंतु अस सहा डाॅलर साठी आखलेल षडयंत्र खूप पोरकट वाटू लागल हे अस असू शकेल ह्याची चिन्ह दूर दूरपर्यंत दिसून येत नव्हती. मग अस तिला काय हव असेल, माझ्या जवळ तर अस काहीच नाही आहे. आमची सोबत फक्त पंचेचाळीस मिनिटा पुरतीच होती. त्यानंतर ना ती मला भेटायची, व मी तिला. मला माझे आतापर्यंत तिकीटाचे पैसे वाचवून गप्प बसण सुद्धा एकदम वाह्यात व मुर्खपणाच वाटल…. ” मी एवढी वाया गेलेली आहे काय…. जी एवढ्या छोट्याशा हरकतीने आनंदी राहू. “

मला तिच्या ह्या उपकाराची कोणत्या ना कोणत्या रूपाने परतफेड करायची होती. डोक्यातील असंख्य विचारांनी आपला खेळ दाखविण्यास सुरू केला…… सतत हा विचार चालू असे की ड्रायव्हरच्या ह्या दयाभावनेला ला काय नाव मी देऊ! काय ह्याचा अर्थ काढू! माझ्या एका तक्रारी ने तिची नोकरी जाऊ शकते आणि कोण्या एकाच्या तक्रारीवर माझ तिकीट वाचवण मला पण विभागीय संकटात ढकलू शकत.

आता मात्र मला माझ्या सर्व ‌आदर्शांची केली जाणारी याचना आठवू लागली की मी तिकीटाचे पैसे वाचवून एक मोठा गुन्हा करत आहे. जर ती चुकीच काम करत आहे तर मग मी तिचा साथ का देत आहे! तिला एक चेतावणीपुर्ण भाषण देण्यासाठी, माझ्या आतील शिक्षक खडबडून जागा झाला. सगळे आदर्शवादी विचार आप -आपापल स्पष्टीकरण देऊ लागले _ ” शिक्षक फक्त क्लास मध्येच शिक्षक नसतात, क्लासच्या बाहेरील ‌जगात देखील त्यांचा काही ना काही रोल असतोच. “

“कसली शिक्षिका आहेस तू, हेच शिकवतेस काय आपल्या विद्यार्थ्यांना! “

” शिक्षक म्हणण्याआधी शिक्षकाच्या भूमिकेला न्याय देण शिक. “

माझा दुसरा ‘स्व’ बचाव पक्षाच काम करत होता…. “मी थोडच तिला सांगितल होत की तिकीट घेऊ नकोस अस. “

” मी तर रोज पैसे देत होते व ती डोळ्यांनीच नाही म्हणायची. “

” हे उपकार खर तर ती का करत होती….! “

आपल्याच प्रश्न-उत्तरांच्या गर्तेत गोंधळून गेलेली मी ह्याच विचारात बस मधून उतरू लागले. आज मी तिला धन्यवाद सुद्धा केल नाही, तिच्या शुभ दिवसाकडे सरळ सरळ दुर्लक्ष केल. उपेक्षित नजरेने पाहते तर बस मध्ये मी शेवटची प्रवासी होते त्यामुळे ती पण बस लाॅक करून माझ्या सोबत काॅफीच्या रांगेत आली होती. माझ्या पाठीमागे उभ राहून मला पहात खूप विचित्र अंदाजात हसत होती. तिच्या ह्या हसण्याने माझा अक्षरक्ष: थरकाप उडाला, माझ्या डोक्यात आलेल्या वायफळ कुरापतींनी जरा जास्तच विचार केला. बापरे! मी काय तिला पसंत पडले. टापटीप दिसते, खात्या -पित्या -कमावत्या शिक्षिकेवर लाईन मारत होती ती. सामाजिक संबंधा मध्ये मी विश्वास तर ठेवायची परंतु समाजा विरूद्ध असणाऱ्या अथवा समाजाने अमान्य ठरवलेल्या संबंधांबाबत आजही मी तितकीच रूढी व परंपरावादी विचारधारा जपणारी होती. मला आतापर्यंतच्या त्या सगळ्या घटना आठवू लागल्या. मनात पक्क होत निघाल होत की, आता मी देखील ह्या घटनामधील प्रमुख पात्र बनत चालले आहे, सगळ्या गाॅसीपचा एक आधुनिक विषय. रसरशीत आणि मजा घेवून रंगवून सांगण्यासारखा- ऐकण्यासारखा, एक महिला प्राध्यापिका आणि एक महिला ड्रायव्हर मधील लैंगिक संबंधाची कहाणी…. आणि बरच खुप काही.

– क्रमशः भाग पहिला.

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नवं रुटीन” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “नवं रुटीन” ☆ श्री मंगेश मधुकर

संध्याकाळी बागेमध्ये मित्रांचा गप्पांचा फड रंगलेला.विषय तब्येत सामाजिक प्रश्न, क्रिकेट,बदललेली परिस्थिती आणि अर्थातच राजकरण, निवडणुका यावर तावातावानं चर्चा सुरू होती.काही वेळानं घरी जाताना सानपांनी विचारलं“शंकरराव,एवढी चर्चा सुरू असताना तुम्ही शांत कसे?” 

“असंच”

“मग तुमचं मत”

“मतदान करणार की.. आणि त्याविषयी सांगायचं नसतं.”

“ते मत नाही ओ,आता जी चर्चा चालू होती त्याविषयी”

“नो कॉमेंट्स”

“का ओ एकदम विरक्ती”

“तेच बरंय”

“काय झालं.काही सीरियस”

“काही नाही.सगळं व्यवस्थित आहे.”

“मग असं का बोलताय.गेले काही महीने पाहतोय नेहमी हिरीरीनं बोलणारे आता शांत असता.”

“मुद्दामच,आयुष्य वेगळ्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतोय.”

“फायदा झाला की तोटा”

“विनाकारणची अस्वस्थता, भीती,राग,फालतूचं टेंशन कमी झालं.”

“अरे वा!!मग मलाही सांगा की.”

“फक्त काही सवयी बदलल्या”

“कोणत्या”

“रोज सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर सर्फिंग नंतर चहाबरोबर पेपर”

“बरोबर’

“मी या दोन्ही गोष्टी बंद केल्या.मोबाईल पाहिला की अनेक बिनकामाची माहिती वाचून विनाकारण डोकं भंडावते.त्यापेक्षा टेरेसवर जातो.एकदम फ्रेश असल्यानं मस्त वाटतं.”

“मोबाईलचं एकवेळ ठिक आहे पण पेपर बंद म्हणजे फार कठीणय.इतक्या वर्षाची सवय आहे.”

“पण पेपर आपल्या सोयीनं जेव्हा वाटेल तेव्हाच वाचायचा.”

“अरे बाप रे,मग जगात काय चाललयं ते कसं कळणार”

“कळून करणार काय?”

“ते पण खरंच आहे”

“तसंही आजकाल पेपरमध्ये ढीगभर जाहिराती खून,दरोडे, मारामाऱ्या,लुटालूट,लाचखोरी आणि राजकारण्यांची नाटकं हेच तर असतं.आपल्या चांगल्या दिवसाची सुरवात असल्या निराशाजनक बातम्या वाचून कशाला करायची.”

“शंकरराव,खरं बोललात.सकाळीच असल्या बातम्या वाचल्या की उगीचच टेंशन येतं.इच्छा नसताना विषय डोक्यात घोळत राहतात.”

“म्हणूनच दूसरा पर्याय शोधला”

“कोणता”

“सकाळी चहाबरोबर कोणतही आवडतं पुस्तक वाचायचं म्हणजे सवय सुटत नाही.दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा पेपर चाळायचा.”

“अजून एक”

“आता काय राहिलं”

“तुमच्या आवडीचा उद्योग बघणं बंद करा”

“नाही.ते जमणार नाही.कितीही भिकार असल्या तरी सिरियलमुळे टाइमपास होतो.”

“त्याबद्दल बोलतच नाहीये.”

“मग”

“न्यूज चॅनल”

“हा ते तर फार भयंकर आहे.पाच पाच मिनटाला कुठल्याही फालतू बातमीला ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवतात.आपण घरात पण बाहेर सतत काहीतरी घडतंय असं वाटतं.”

“मग बघता का?”शंकररावांच्या प्रश्नावर सानपांकडं उत्तर नव्हतं तरी सुद्धा उसनं अवसान आणत म्हणाले 

“ते जरा राजकारणात इंटरेस्ट आहे म्हणून”

“अहो,इंटरेस्ट घेण्यासारखं राजकारण केव्हाच संपलं आणि आत्ताचा माहौल बघून एकच मत कोणाला द्यायचं हेच ठरत नाही.कोण कोणत्या पक्षात आहे हे समजणं शाळेतल्या गणिताच्या पेपरपेक्षा अवघड झालंय.”

“हा हा हा,गणिताचा पेपर हे उदाहरण भारीय.तुमचं म्हणणं पटलं.पेपर आणि न्यूज दोन्हीचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललाय”

“न्यूज चॅनलवरच्या राजकारणाच्या बातम्या तर वात आणतात.ज्यांच्याकडून पैसे मिळतात फक्त त्यांचीच बाजू दाखवतात.सामान्य जनतेच्या समस्याशी निगडीत बातम्या म्हणजे ताटातल्या लोणच्या इतक्या.. बाकी सगळ्या बातम्या म्हणजे सिरियल सारख्या….सोशल मीडिया,पेपर,न्यूज चॅनल सतत  माहिताचा फवारा सुरूच आणि आपण रिमोट कंट्रोल द्वारे वेगवेगळ्या चॅनलचे फवारे अंगावर घेत  गरज नसताना स्वतःला भिजवतो.या तिकडीत मी पण सापडलो.चित्त एकजागी स्थिर होणं कमी झालं म्हणून मग काय चुकतंय याचा विचार केला आणि त्याप्रमाणे नवीन रुटीन सुरू केलं त्याचा आज यशस्वी शंभराव्वा दिवस आहे.”

“काय सांगता,कमाल आहे”

“मन शांत झालं.विनाकारणची चिडचिड,अस्वस्थता कमी झाली.”

“ऐकायला चांगलंय पण जमायला कठीण ”

“ करून तर बघा”

“आहे काय हे नवं रुटीनं” सानप 

“सकाळी उठल्यावर मोबाईलच्या आधी पुस्तक हाती घ्यायचं.निदान पाच मिनिटं वाचन करायचं.

– नंतर फक्त महत्वाचे मेसेज मोबाईल वर चेक करायचे.

– मोबाईलचा पर्यायानं सोशल मीडियाचा कमीत कमी वापर  

– न्यूज चॅनल पाहणे एकदम बंद.

– रात्री दहा ते सकाळी सात मोबाईल पासून सोशल डिस्टसिंग  

– राजकारणाच्या चर्चेत श्रोते व्हायचं. 

या सगळ्याचा फायदा अनमोल मनशांती”

“ठरलं तर मग उद्यापासून नवीन रुटीन सुरु करतो.बघूया किती दिवस चालतंय.”

“भरपूर शुभेच्छा”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ! श्री संभाजी बबन गायके 

दादांनी काकडा ज्योती पांडुरंगाच्या मुखासमोर धरून हळूहळू ओवाळले… डोळे मिटून विटेवरी उभे असलेले ते सावळे वात्सल्यब्रम्ह खरोखरीच डोळे उघडून आपल्याकडे बघते आहे, असा तिला भास झाला आणि ती हरखून गेली ! त्यात दादांचा त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून उमटणारा आणि राऊळाच्या गर्भगृहात घुमणारा आवाज….

‘उठा पांडुरंगा.. आता दर्शन द्या सकळा…

झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ! ‘

आज पहाटे दादांची निद्रेची वेळा मात्र पांडुरंगाच्या वेळेच्या खूप आधी सरलेली अरुंधतीने ऐकली होती. काल रात्रीच अरुंधती दिवाळीसाठी म्हणून गावी आली होती. आई, वडील आणि धाकट्या बहिणीसोबत. अशोकला जास्त दिवस सुट्टी नव्हती म्हणून तो दोनच दिवसांनी परतणार होता. अरुंधतीची तिच्या कळत्या वयातली ही पहिलीच आजोळ भेट. घरात शिरताच कणग्यांत भरून ठेवलेल्या तांदळाच्या सुगंधाने ती वेडावून गेली होती. त्यात गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या गळ्यातील घंटेचा आवाज… घरामागचा ओढा…. खळाळता !.. अरुंधती आज्जीच्या पांघरुणात तिला बिलगून झोपली होती. अरुंधती म्हणजे दादांच्या एकुलत्या एका लेकाची, अशोकची लेक. तिसरीत शिकणारी.. दूरच्या शहरात. अशोक दूर गुजरातेत पोटामागे गेलेला होता पत्नीसोबत. अरुंधती त्याची धाकटी मुलगी.

दादा मोठ्या उत्सुकतेने कोजागिरीची वाट पाहत असत. त्यांच्या ओसरीवर मसाला दूध प्यायला गावातल्या सर्व माळकरी मंडळींना आवर्जून बोलवायचे आणि ‘ उद्या वेळेवर या रे काकड्याला ! ‘ असा प्रेमळ आग्रह करायचे. दिवसभर शेतात राबून रात्री अंथरुणावर पडताच झोपेच्या अधीन होणाऱ्या कष्टकरी माणसांना सकाळी लवकर उठणं कठीण… पण दादांनी त्यांना भजनाची गोडी लावली होती. त्यामुळे देऊळ भरलेले असायचे. त्यांनी स्वतः उभ्या आयुष्यात एक दिवसही काकडा चुकवला नव्हता…. वयाची पासष्टी उलटून गेली होती तरी. दादांचे कुटुंब अर्थात वनिताबाई तशा कमी शिकलेल्या, पण गावातल्या बायकांच्या आधारे घर, दार पहात. वृत्तीने शांत आणि मनाने माया करणाऱ्या. अत्यंत सुबत्ता असलेला काळ त्यांनी पाहिला आणि अनुभवला होता. पण आताच्या त्यामानाने हलाखीच्या परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले होते. अशोकला दुसरी मुलगीच झाल्याने वनिताबाई सुरुवातीला काहीशी खट्टू झाल्या होत्या मनातून. तसे दोन्ही दिरांच्या मुलांना मुलगे झाले होते. पण आपल्या मुलाचा वंश पुढे चालायचा असेल तर मुलगा हवाच अशा जुन्या पण साहजिक विचारांची ती साधी बाई.

दादांचे पाठचे दोन भाऊ पोटामागे शहरात निघून गेले होते… पर्याय नव्हता! पण मग भाताची उरली सुरली खाचरं राखायची कुणी? बरीच जित्राबं गावात कुणा कुणाला देऊन टाकली असली तरी दुधासाठी एक म्हैस आणि औतकाठीसाठी एक बैल जोडी मात्र दादांनी आग्रहाने ठेवून घेतली होती. भावांची मुलं जिकडे गेली तिकडचीच झाली. दादांच्या दोन्ही बहिणी दूर दिल्या होत्या तिकडे कर्नाटकच्या सीमेवरच्या गावांत.. त्यांची गावी ये जा अभावानेच होई. अशोकचं शहरात काही फार बरं चाललं होतं असं नाही. भाड्याच्या खोल्या आणि फिरस्तीची नोकरी. दोन्ही मुलींचं शिक्षण आणि तत्सम गोष्टींचा खर्च नाही म्हणलं तरी बराच असतो.

दादांनी उठून अंगणात चूल पेटवली. पाणी तापवायला ठेवलं. गुरांना वैरण घातली तशी म्हैस आणि दोन्ही बैल उठून बसले. त्यांच्या आवाजाने अरुंधती जागी झाली.

“आजोबा इतक्या लवकर कशाला हो उठलात? किती थंडी वाजते आहे! “ अरुंधती म्हणाली. तसे दादा हसले…” अगं काकड्याला जायचंय… देवाला उठवून न्हाऊ घालायला मग त्याच्या आधी नको आवरून व्हायला? येतेस माझ्यासोबत?” अरुंधती डोळे चोळत अंगणातल्या चुलीपाशी आली आणि हात शेकत बसली. जळणाऱ्या लाकडांचा वास तिला मोहवून गेला… चुलीच्या उजेडात तिचे आजोबा तिला आणखी छान दिसले… त्यांच्या डोळ्यांत लाल उजेड दिसला तिला. तोवर आज्जीबाई धडपडत उठल्या होत्याच. त्यांचे पाय सुजले होते पण काकड्याची तयारी तर त्याच करून द्यायच्या… वाती, उगाळलेले चंदन, फुलं, प्रसाद आणि विठोबा रखुमाईसाठी रोज नवा पोशाख. वनिता बाई मोठ्या हौसेने सारं करायच्या अरुंधतीचे आई बाबा, आणि धाकटी बहीण अजून अंथरुणात होते… ओसरीवर टाकलेल्या.

“आजोबा, मी येऊ तुमच्या सोबत?” अरुंधती म्हणाली.

“नको राजा. खूप थंडी आहे. देवळात जायचं म्हणजे आधी आंघोळ करावी लागेल. “

अरुंधती दादांच्या आधी न्हाणीत जाऊन बसली… दादांनी आज मग पाणी जास्त गरम होऊ दिले आणि आजोबा आणि नात त्या थंडीत एकमेकांच्या अंगावर पाणी घालीत न्हाऊ लागले… दादांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली होतीच… पाण्याचा आणि मंत्रांचा आवाज एकमेकांत मिसळून गेले !

अरुंधतीने दिव्याचे ताट आपल्या हाती घेतले… पहाटेच्या थंड वाऱ्याच्या झुळुकांनी ज्योत विझू नये म्हणून ज्योतीभोवती आपला इवलासा हात आडोसा म्हणून धरत ती खडबडीत रस्त्याने आजोबांसोबत निघाली. गावाच्या वाड्या, वस्त्यांवरून अशा अनेक ज्योती लुकलुकत देवळाकडे निघालेल्या तिने पाहिल्या… पहाटेच्या अंधारात त्या ज्योती घेऊन येणाऱ्या मुलींचे चेहरे त्या प्रकाशात उजळून निघालेले तिला दिसले. ” काका, नात आलीये जणू?” दादांना एका म्हातारीने विचारले. “होय, अशोकची छोकरी.” त्यावर ती म्हातारी गोड हसली 

देवळासमोर सडा रांगोळी काढून झाली होती. आज गावच्या पाटलांच्या हस्ते काकड आरती व्हायची होती त्यामुळे देऊळ जरा जास्त सजवलेलं होतं नेहमीपेक्षा आणि गर्दीही जास्त होती. एरव्ही दादा येतील त्या लोकांना घेऊन सारे काही पार पाडीत. पखवाज वाजवीत. संपूर्ण काकडा भजन त्यांना मुखोदगत. गवळणी म्हणताना सारे गोकुळ उभे राहायचे देवळात.

अरुंधती अनिमिष डोळ्यांनी सारं काही तिच्या डोळ्यांत साठवून ठेवत होती. ‘ पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली.. ’ हे शब्द तर तिला खूप भावले. दगडाची मूर्ती अशी जिवंत होऊन पुढे उभी राहते… भक्तांच्या हातून नहाते, प्रसाद घेते, तिला दृष्ट लागते आणि त्याची दृष्टही काढली जाते ! सारेच अद्भुत !

दादांनी भैरवी रागात गवळण गायली. आसपासच्या दऱ्या, डोंगर यांनी दादांचा आवाज ओळखला आणि त्यांनी प्रतिध्वनी उमटवले ! झोप आवरू न शकलेल्या लोकांनी अंथरुणातच काकडा अनुभवला… हे असंच सुरू होती गेली कित्येक वर्षे! अशोक आणि त्याची बायको मुलगी नंतर आवरून आले देवळात.

मग पाच आरत्या झाल्या.. देवळाबाहेर पाटलांच्या पोरांनी फटाक्यांची माळ लावली… प्रसाद झाला !

सर्वांच्या पूर्ण कपाळावर चंदन गंध शोभत होते… काकड्याला उपस्थित राहिल्याची ती हजेरीची खूण दिवसभर मिरवली जाणार होती. दादांचे कपाळ तर आणखीन छान दिसत होते.

दुसऱ्या दिवशी अरुंधतीला उठ असे सांगावे लागले नाही. तिला काकड्याची गोडी लागून गेली होती !

आता उद्या परतायचे म्हणून अशोकची तयारी सुरू होती. ” बाबा, मी इथंच राहू.. आजोबा आज्जीला सोबत म्हणून?” अरुंधतीने झोपायच्या तयारीत असलेल्या अशोकला विचारले.

“तुझी शाळा?” अशोक म्हणाला.

“मी जाईन की इथल्या शाळेत. गुजराथी शाळेचा कंटाळा आलाय मला. आपली मराठी किती गोड आहे. आणि इथला विठोबा किती सुंदर !” अरुंधती म्हणाली.

हे ऐकून दादा हरिपाठ म्हणायचे थांबले. त्या घरात ते दोघेच म्हातारा म्हातारी. शेजारच्या भावकीची सोबत असते पण.. ! घरात आपलं कुणी असावं!

दादांच्या एका चुलत भावाचा मुलगा गावातल्या शाळेवर मास्तर होता. शिवाय दादा जुनी सातवी पास झालेले होतेच. पोरगी राहिली इथेच तर शिकेलही चांगली असं त्यांना वाटून गेलं. अशोक बराच वेळ त्याच्या बायकोशी बोलत राहिला… शहरातला खर्च त्याच्या हिशेबात होताच. शिवाय दादा, आईंना सोबत होणार होती.

अरुंधती आज आजोबांच्या गोधडीमध्ये शिरली होती… आणि मी इथंच राहणार.. असं त्यांच्या कानात कुजबुजत होती. पण हे सोपं नाही हे दादा जाणून होते. ‘ बघू तुझा बाबा काय म्हणतोय ते ! ‘ असे म्हणून त्यांनी कुस बदलली.

अरुंधतीने दुसऱ्याही पहाटे काकड्याचे एक सुंदर आवर्तन अनुभवले. ‘ पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ‘ तिला पाठ होऊन गेले होते.

रात्री मुक्कामी असलेली एस. टी. निघायची वेळ झाली होती. ड्रायव्हर, कंडक्टर दादांच्या ओसरीवरच यायचे चहाला. अशोकचं आवरून व्हायचं होतं म्हणून ते निवांत चहा पीत बसले होते. अशोक, त्याची पत्नी, तिच्या कडेवर अरुंधतीची धाकटी बहीण.. निघायला तयार होते. अरुंधती आज काहीसे हळूहळू सर्व काही करत होती… तिने आपले कपडेही पिशवीत भरले नव्हते !

ती देवघरातून तशीच मोकळी बाहेर आली आणि ओसरीवर उभ्या असलेल्या दादांच्या मागे जाऊन त्यांना घट्ट बिलगून उभी राहिली…’ मी इथंच राहणार बाबा ! ‘ ती म्हणत राहिली… ! दादा अशोककडे पहात होते… एस. टी. ची वेळ उलटून चालली होती.

……. “अरूचा दाखला पाठवून दे पोस्टाने. गावातल्या शाळेत जाईल ती दिवाळीची सुट्टी संपल्यावर. तोवर तिचा मराठीचा अभ्यास करून घेईन मी. इथं काही खर्च लागत नाही शाळेला. सातवीपर्यंत तर नाहीच नाही !” दादा म्हणाले आणि अरुंधतीच्या मुखावर कोजागिरी उलटली… गोठ्यातून म्हैस हंबरली आणि बैलांच्या गळ्यातली घुंगरे वाजली.

जाणाऱ्यांना निरोप देऊन दादा आणि वनिताबाई परत निघाले… अरुंधती दोघांची बोटे धरून त्यांच्या मध्ये चालत होती !

…. “आजोबा, उद्या काकड्यात दृष्टीचा अभंग मी म्हणणार ! ” अरुंधती म्हणाली… तसा दादांचा चेहरा दृष्ट लागेल एवढा फुलून आला !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रसन्न वदने… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रसन्न वदने… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

“सुनीता, चहा आणतेस का जरा ? आणि येताना पाणी पण घेऊन ये, ” रमेशरावांनी बाहेरच्या पोर्चमधून आवाज दिला. दुपारी थोडा वेळ झोपायचं आणि उठल्यावर बाहेर पोर्चमध्ये येऊन बसायचं. बाहेर खुर्च्या टाकलेल्याच असायच्या. रमेशराव आपलं एखादं आवडतं पुस्तक किंवा वर्तमानपत्र घेऊन बाहेर बसायचे. हा त्यांचा रोजचा आवडता उद्योग होता.

त्यांच्या घराच्या बाहेर छोटासा पोर्च होता. आजूबाजूला छोटीशी बाग होती. बागेतील फुलझाडे सुनीताबाईंनी मोठ्या आवडीने लावली होती. बाहेरची मोकळी हवा त्यांना फार आवडायची. सुनीताबाईंनी चहा आणि सोबतच रमेशरावांना आवडणारी बिस्किटे पण आणली.

सुनीताबाई आणि रमेशरावांची मुलं पुण्याला होती. ते अधूनमधून पुण्यात जात असत. जाताना किंवा येताना ते वाटेतील सुपा गावात थांबून तेथील बेकरीत चांगल्या तुपापासून बनवलेली खास कणकेची बिस्किटे घेत. ही बिस्किटे रमेशरावांची फार आवडती.

चहा बिस्किटांचा आस्वाद घेता घेता रमेशराव म्हणाले, “मग काय प्लॅन आता ? नवरात्र जवळ आलंय. लगेच दसरा आणि दिवाळी. ” 

“अहो, खूप कामं आहेत. एवढं मोठं घर आपण घेतलं. त्यावेळी छान वाटलं. पण आता नाही आवरणं होत हो माझ्या एकटीनं. इतके दिवस केलं सगळं, ” सुनीताबाई म्हणाल्या.

“अगं, खरंय तुझं. पण तू एकटी कशाला करतेस सगळी कामं ? आपल्या त्या धुणीभांडे करणाऱ्या रमाबाई आहेत ना, त्यांना किंवा त्यांच्या मुलीला घे की मदतीला, ” रमेशराव.

“बघू या. मी विचारीन त्यांना. पण आता रमाबाईंकडून जास्त काम होत नाही. त्यांची मुलगी पण या वर्षी बारावीला गेलीय. ती तिचा अभ्यास सांभाळून त्यांना कामात मदत करते. मुलगा कोणाकडे तरी कामाला नुकताच लागलाय. पण त्याला फार काही पैसे मिळत नाहीत. नवऱ्याचेही फारसे उत्पन्न नाही. एवढ्या महागाईत चार जणांचा संसार कशीतरी करते बिचारी, ” सुनीताबाई म्हणाल्या.

“हो ना, सुनीता. अगं कमाल आहे या लोकांची. एवढ्याशा मिळकतीत कुरकुर न करता आनंदानं राहतात. आणि काही लोकांना बघ, कितीही पैसा मिळाला तरी त्यांची हाव संपत नाही, ” रमेशराव म्हणाले.

बोलता बोलता सुनीताबाईंचं मन भूतकाळात गेलं. त्या लग्न होऊन सासरी आल्या होत्या, तेव्हा अगदी छोटंसं घर होतं त्यांचं. सरळ एका रेषेत असलेल्या तीन खोल्या. घर छोटं असली तरी त्यात चैतन्य नांदत होतं. काही लोक तर त्याला आगगाडीचा डबा म्हणायचे. पण त्या घरातही त्या खुश होत्या. त्या छोट्याशाच घरात सात माणसे एकत्र राहत होती. सासू सासरे, दोन लहान दीर, एक नणंद.

परिस्थिती जेमतेमच होती. सासरे निवृत्त झाले होते. त्यांची पेन्शन तुटपुंजी होती. रमेशराव तर त्यावेळी एक साधे कारकून म्हणून काम करीत. पण सुनीताबाई कष्टाळू होत्या. त्यांनी शिक्षिकेची नोकरी करून घराची परिस्थिती सावरली. यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. शाळेतील मुलांना घडवताना या फुलांकडे देखील त्यांनी लक्ष दिले. मुलं पण हुशार आणि हरहुन्नरी होती.

काही वर्षांनी नणंदेचे लग्न होऊन ती सासरी गेली. दोन्ही लहान दिरांचे शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरीसाठी दुसऱ्या गावी निघून गेले होते. आता सासू सासरेही आता कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे असायचे. घरात आता चौघेच होते. थोडी आर्थिक सुबत्ता आली होती. रमेशरावांनी आता बँकेकडून कर्ज घेऊन एक छानसे बंगलीवजा घर घेतले होते.

दिवस भराभर जात होते. या नवीन घरात सुनीताबाईंनी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेतल्या होत्या. आता चार पाहुणे आले तरी सगळ्यांची छान व्यवस्था होत होती. पण लवकरच मुले शिकून मोठी झाली. यथावकाश लग्नं होऊन आपापल्या संसारात ती रमली. रमेशराव आणि सुनीताबाई दोघंही आपापल्या जबाबदारीतून निवृत्त झाली होती. आता पुन्हा एवढ्या मोठ्या घरात रमेशराव आणि सुनीताबाई असेच दोघे उरले.

रमेशराव मोठ्या अधिकारपदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी पासष्टी ओलांडली होती आणि सुनीताबाईंची एकषष्ठी. मुलांनी दोघांचीही पासष्टी आणि एकषष्टी नुकतीच थाटामाटात साजरी केली होती. वयाच्या मानाने दोघांचेही आरोग्य उत्तम होते. रमेशराव सकाळी योगासने, प्राणायाम करीत. संध्याकाळी नियमितपणे फिरायला जात असत. त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. महिन्यातून एकदा तरी सगळे मित्र मिळून कुठेतरी सहलीसाठी जात असत. सुनीताबाई देखील जवळच असलेल्या एका ठिकाणी योगवर्गासाठी जात असत.

 

“सुनीता, अगं कुठे हरवलीस ? चहा गार होतोय, ” रमेशरावांच्या शब्दांनी त्या भानावर आल्या. त्या कपबशा घेऊन घरात गेल्या आणि रमेशरावांनी पुन्हा आपल्या आवडत्या पुस्तकात लक्ष घातलं.

घरात गेल्यावर सुनीताबाईंना आपलं साड्यांचं कपाट दिसलं. दरवर्षी त्या आपल्या वापरलेल्या साड्या कुणाकुणाला काही निमित्ताने देत असत. तरी त्यांच्याकडील नवीन साड्यांमध्ये या ना त्या निमित्ताने भरच पडत असायची. गौरीच्या वेळी गौरीसाठी म्हणून साड्या घेतल्या जायच्या किंवा कोणीतरी गौरींसाठी भेट म्हणून द्यायचे. शिवाय वेळोवेळी कुठल्या तरी निमित्तानं साडी खरेदी व्हायचीच.

आता नवरात्रीचा सण चार दिवसांवर आला होता. नवरात्रीच्या नऊ दिवसात वेगवेगळ्या रंगांच्या साड्या हव्यातच नेसायला. तशी त्यांच्याकडे साड्यांची कमी नव्हती. पण प्रत्येक वेळी त्यांना नवीन साडी हवी असायची. आता सणासुदीनिमित्ताने दुकानांमध्ये सेलचे बोर्ड लागले होते. सुनीताबाईना नवीन साडी खरेदीची उत्सुकता होतीच. उद्या काही झालं तरी आपण साडी खरेदीसाठी जायचंच असं त्यांनी ठरवलं.

रमेशरावांना मात्र कपडेलत्ते, सोने आदी गोष्टीत फारसा रस नव्हता. पण त्यांनी सुनीताबाईंना कधी अडवलं मात्र नाही. आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतील पंधरा ते वीस टक्के रक्कम ते सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी खर्च करत.

सकाळी कामासाठी म्हणून रमाबाई आल्या. त्यांच्या अंगावर एक जुनी जीर्ण झालेली साडी होती. बहुधा त्यांना मोजक्याच दोन तीन साड्या असाव्यात. त्याच त्या आलटून पालटून वापरत. सुनीताबाईंनी मनाशी काहीतरी ठरवले. रमेशरावांना तर साडीखरेदीसाठी बरोबर जाणे फारसे आवडत नसे. त्यामुळे त्यांनी यावेळी रमाबाईंना बरोबर घेऊन जायचं ठरवलं.

“रमाबाई, आज दुपारी मी साडी खरेदीसाठी दुकानात जाईन म्हणते. यांना बहुतेक माझ्यासोबत यायला काही जमणार नाही. आपण दोघी जाऊ. याल का ?” सुनीताबाईंनी विचारले.

“तशी मला कामं हायती पण येईन म्यां तुमच्याबरोबर, ” रमाबाई म्हणाल्या.

बरोबर चार वाजता रमाबाई आल्या. ऑटो करून दोघीही एका साड्यांच्या भव्य दालनात गेल्या. साड्यांचा नवीन स्टॉक आला होता. दुकानात साड्या खरेदीसाठी गर्दी होती. कामाला असलेली मुले, माणसे साड्या दाखवत होती. साड्यांचा ढीग सुनीताबाई आणि रमाबाईंसमोर होता. त्यातून आपल्या पसंतीच्या साड्या त्या पाहत होत्या.

सुनीताबाई रमाबाईंना म्हणाल्या, “रमाबाई, यावेळी तुमच्या पसंतीच्या साड्या घ्याव्या म्हणते. त्यामुळे तुमच्या पसंतीच्या दोन तीन साड्या काढा. रोज वापरता येतील अशाच हव्यात. “

सुनीताबाई आपल्या पसंतीच्या साड्या घेणार याचा आनंद रमाबाईंना झाला. त्यांनी मोठ्या आनंदानं तीन साड्या निवडल्या. साड्यांचा रंग, पोत, किनार आदी गोष्टी सुनीताबाईंना शोभून दिसतील अशा विचाराने त्यांनी त्या निवडल्या. दुकानदाराला बिल देऊन सुनीताबाई ऑटोने पुन्हा घरी आल्या. वाटेत रमाबाईंना सोडलं. यावेळी त्यांच्या मनात काही वेगळेच विचार होते.

घरी आल्यावर त्यांनी पाहिले तर घराला कुलूप होते. रमेशराव कुठेतरी बाहेर गेले असावेत. त्यांनी आपल्या जवळच्या चावीने दार उघडलं. थोड्याच वेळात बेल वाजली. रमेशराव आले होते. त्यांच्या हातात सुनीताबाईंची जुनी सायकल होती. सुनीताबाईंनी विचारलं, “अहो, ही सायकल कुठे घेऊन गेला होतात ?” 

“सुनीता, अगं ही सायकल आता तू वापरत नाहीस ना ? तशीही कधीची पडूनच आहे. मग आपल्या रमाबाईंची मुलगी वापरेल असे वाटले. तिला कॉलेजला जायला तरी उपयोगी पडेल म्हणून रिपेअर करून आणली. तुझी काही हरकत नाही ना ?” 

“अहो, माझी कसली आलीय हरकत ? त्या सायकलीचा वापर तरी होईल. आपल्या वस्तूंचा लोभ तरी किती धरायचा! आणि ती वस्तू जर कोणाच्या तरी उपयोगी पडणार असेल तर त्यापरीस आनंद तो कोणता ?” सुनीताबाई म्हणाल्या.

“उद्या नवरात्र बसतंय. रमाबाईंबरोबर त्यांच्या मुलीला, पूजालाही सकाळी बोलावून घे. म्हणजे तिला ही सायकल देता येईल. ” रमेशराव म्हणाले.

सुनीताबाईंनी लगेच रमाबाईंना फोन करून सकाळी पूजाला घेऊन या म्हणून सांगितलं.

नवरात्रीचा आज पहिला दिवस होता. रमेशरावांनी यथासांग पूजा करून घटस्थापना केली. तेवढ्यात रमाबाई आणि त्यांची मुलगी अशा दोघीही आल्या. रमेशरावांनी त्यांच्या मुलीजवळ सायकलची चावी दिली. “पूजा बेटा, आजपासून ही सायकल तुझी. कॉलेजला जायला यायला उपयोगी पडेल. चांगला अभ्यास कर. खूप मोठी हो. ” 

पूजा घरच्या परिस्थितीमुळे आजपर्यंत सायकलही घेऊ शकली नव्हती. कॉलेजला पायी जावे लागे. आज अचानक ही भेट पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

सुनीताबाई म्हणाल्या, “रमाबाई, थोडं थांबा. ” त्या घरातून साड्यांची पिशवी घेऊन आल्या. रमाबाईंच्या हातात ती पिशवी देत म्हणाल्या, “रमाबाई, तुमच्या साड्या जुन्या झाल्या आहेत. आता या नवीन साड्या वापरा. “

रमाबाईंचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. त्या म्हणाल्या, “ताई, आपण या साड्या तुमच्यासाठी घेतल्या होत्या. त्या मला कशापायी देताय ? मला हायती साड्या रोजच्या वापरासाठी. ” 

“नाही रमाबाई, काल मी तुम्हाला सांगितलं नाही. पण तुमच्या पसंतीच्या या साड्या तुमच्यासाठीच घेतल्या. आजपासून नवरात्र सुरु होत आहे. तुम्ही या साड्या वापरा. नाही म्हणू नका. ” सुनीताबाई म्हणाल्या.

रमेशराव थक्क होऊन सुनीताबाईंकडे पाहत होते. आजपर्यंत सुनीताबाईंनी असे कधी केले नव्हते. दर वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने त्यांची नवीन साड्यांची खरेदी असायचीच. ते सुनीताबाईंना म्हणाले, “अगं, रमाबाईंना साड्या दिल्यास, छानच केलंस. पण तुझ्यासाठी काही आणल्यात की नाही ?” 

सुनीताबाई म्हणाल्या, “मला भरपूर साड्या आहेत. त्यामुळे यावर्षी नवीन नको असे ठरवलं. साड्यांची खरी गरज रमाबाईंना आहे. त्यांना साडी नेसवून यावर्षी नवरात्र साजरं करावं असं मला वाटलं. ” 

“अति उत्तम विचार! रमेशराव म्हणाले. त्यासाठी तुझं अभिनंदन! “

रमाबाई आणि पूजा भारावलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. काय बोलावं हे त्यांना कळेना. रमेशराव आणि सुनीताबाईंचं हे अनोखं रूप त्यांना नवीन होतं. अशीही माणसं या जगात आहेत ही परमेश्वराची केवढी कृपा! त्या विचार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सुनीताबाईंच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण काहीतरी चांगलं केल्याचं समाधान झळकत होतं.

बाहेर कुठेतरी देवीची आरती सुरु होती. आरतीचे सूर निनादत होते. “प्रसन्न वदने प्रसन्न होसी…. “

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्तित्व…☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

☆ अस्तित्व… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

तो जेव्हा माझ्या क्लिनीकमधून बाहेर पडला तेव्हा मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकडे एकटक बघत राहिलो. चाळीस वर्षांपूर्वी तो जसा होता तसा आजही तसाच होता. केवळ मधे दिवस, महिने वर्षं गेलीत म्हणून वय वाढलं म्हणावं इतकंच. तो यत्किंचितही बदलला नव्हता. तोच ताठ कणा, तीच दमदार चाल, तेच शरीरसौष्ठव. केवळ अधूनमधून मला भेटायची हुक्की येते, तर तेव्हा तो उगवतो. भेटल्यावर वीसेक मिनिटं ऐसपैस गप्पा मारून निघून जातो. याचं त्याला कोण समाधान. म्हणतो, “डाक्टरसाब, आप से बात करने में जो मजा आता है वो और कहीं नहीं। ” त्याची वैचारिक भूक भागवण्याची जबाबदारी जणू माझीच. तो येतो तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये दंगल ठरलेलीच. इतर पेशंट बाहेर ताटकळत असलेले, याचं भान दोघांनाही उरत नाही. बाहेर मात्र, आत फार मोठ्या गंभीर गोष्टीवर चर्चा चालू असल्याची हवा. तो बाहेर पडतो तेव्हा तो हसतमुख. मग सगळेच चाट पडतात. मीही तसा दिलखुलास. इतकी कडाक्याची चर्चा होऊनही काहीच घडलं नाही असं दिसल्यावर आश्चर्यच आश्चर्य क्लिनिकभर. स्वतःच्या कारचा दरवाजा उघडून तो आत बसला तोपर्यंत माझी नजर त्याच्यावर खिळलेली. तो गेल्यावर, मी म्हणायचो, “नेक्स्ट, ” आजही तसंच म्हटलं.

चाळीसेक वर्षांपूर्वी मध्यमवयीन आजारी आईला घेऊन तो आला होता तेव्हापासूनचा आमचा दोस्ताना. आई सतत आजारी असायची. तेव्हा एकतर तो आईला घेऊन क्लिनीकला यायचा वा मी त्याच्या आलिशान घरी व्हिजिटला. आईचा आजार हा दुर्धर असून ती फार काळ जगणार नाही हे कितीदा तरी सांगून झालं होतं. आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करतोय पण सर्व देवावरच हवाला, हेही कितीदा तरी सांगून झालं होतं, पण त्याचं उत्तर ठरलेलं व ठाम, “मी देवाला मानत नाही! तिचं आयुष्य असेल तितकं ती जगेल. निरोप घ्यावासा वाटला तर ती घेईल! ” इतकं साधं सरळ उत्तर ऐकून मी चाट पडलो होतो. देवाला मानत नाही असं त्याने म्हटल्यावर धक्काच बसला होता. म्हणजे तू नास्तिक आहेस! ! असं मी म्हटल्यावर, “असं तू म्हणतोस, मी स्वतःला नास्तिकही म्हणणार नाही. ” नंतर मी काहीसा वाद घातला पण एकूण तो मला भावला. आजारी आईच्या निमित्ताने तो सारखा भेटायचा. त्याच्या आईने व देवाने माझं भाकित खोटं ठरवण्याचा चंगच बांधला होता. ती चक्क तीस वर्षं जगली आजारासकट. मात्र आमचे संबंध सुदृढ करत गेली.

इंडस्ट्रीयल झोनमधे त्याने स्वतःचं एक छोटं युनिट टाकलं होतं स्वतःच्या हिंमतीवर. एक युनिक प्रॉडक्ट तो काढायचा. देशभर त्याची मागणी असायची, कारण ते प्रॉडक्ट त्याने पहिल्यांदा भारतात आणलं होतं. त्याची मशिनरीही विदेशातून आणली होती. चाळीस वर्षांपूर्वी तशी मशिनरी आणायची हिम्मत इतरांकडे नव्हती. याने जम बसवलाच पण बक्कळ पैसाही कमवला. मालाचा दर्जा सांभाळत नावही कमावले. सतत नवनवीन टेक्नोलॉजीच्या पाठीशी धावणारा. त्यानिमित्ताने देशविदेशाचे दौरे ठरलेलेच. निम्मं जग पालथं घातलं म्हणा ना. प्रत्येक दौऱ्यानंतर तेथल्या घडामोडी क्लिनीकमधे येऊन सांगणारच. जगात कुठे काय चाललंय याचं वेगळंच आकलन त्यामुळे व्हायचं. तो कधीही यशामागे धावला नाही. यश मात्र त्याच्यामागे धावत राहिलं.

कितीही यश मिळाले तरी ते कधीही त्याच्या डोक्यात गेलं नाही. तो आपल्या मुलुखावेगळ्या विचारांवर कायम राहिला. मूळचा तो पंजाबी. ना कधी तो मंदिरात गेला ना गुरूद्वारात. बायको, मुलांना मात्र स्वातंत्र्य दिलेलं. आपलं मत कधीही त्यांच्यावर थोपलं नाही. मुलं मोठी होऊन कॅनडात गेली. त्यांची मर्जी म्हणून याने तेही स्वीकारलं. इंडस्ट्रीच्या संस्थांमधे, त्यांचे कार्यक्रम, मिटींगांमधे हा कधीही गेला नाही. बकवास है सब! ! म्हणायचा. एकटं राहणं, पुस्तकं वाचणं, जगजीतसिंह, गुलजार जीव की प्राण. रात्री दहा वाजले की मोबाईल स्विच ऑफ. नवरा बायको दोघांच्या हाती ग्लास! एका वेगळ्या ब्रँडची व्हिस्की त्यांच्या हाती वर्षानुवर्षे. महिन्यातून एकदा मोजक्याच मित्रमंडळींना पाजायचा स्वखर्चे. मग त्या बैठकीत ही वाद ठरलेलेच. एकदा गणपतीचे सुरेख पेंटिंग त्याच्या घरी हॉलमधे लावले गेले तेव्हा मोजक्याच मित्रमंडळींमधे खळबळ उडाली होती. ते सुरेख पेटिंग आहे.. त्यापलिकडे काही नाही ही त्याची मखलाशी. त्याचं कलासक्त असणं तर खरंच बेमिसाल. एखादी कलाकृती आवडली की त्यासाठी वारेमाप उधळपट्टी करणार हे ठरलेलेच.

देवावरचा विश्वासच काय, त्याचे अस्तित्व नाकारणे यावरून मी त्याला कितीतरी वेळा छेडलंय. मी पक्का आस्तिक तर तो इहवादी. तो म्हणायचा, “ तू तुझ्या मतांवर ठाम रहा, मी माझ्या! ” त्याचं म्हणणं खोडणं माझ्या जीवावर यायचं. एकदोनदा मात्र मी बोलून गेलो होतो की “टाईम विल टीच यू अ लेसन! ” यावर तो मोकळेपणाने हसला होता.

आजही तो माझ्याशी बराच वेळ बोलत बसला होता. सत्तरीच्या जवळपास आम्ही दोघं आलेलो. आयुष्य मनमुक्त जगलेलो. कसलीही खंत वा किल्मिष नसलेले. हा नास्तिक असला तरी त्याची बायको दुप्पट आस्तिक होती हे मला ठाऊक असलेलं. त्याच्या बायकोच्या पुण्याईवरच याने आयुष्य निभावून नेलंय हे माझं ठाम मत. मात्र तसं मी सांगितल्यावर तो खळखळून हसायचा. आज त्याने रिपोर्ट दाखवायला मोबाईल उघडला तर मोबाईलच्या स्क्रीनवर शंख, चक्र, गदा, पद्मधारी विष्णू! हे चित्र तसं होतं सुरेखच! ! पण ते नेहेमी त्याच्या बायकोच्या मोबाईल स्क्रीनवर असते. आज याच्या मोबाईलमधे कसे? मी विचारात पडलो. नेहेमी तावातावाने वाद घालणारे आम्ही, पण आज तसं विचारायची माझी हिंमत झाली नाही. न विचारलेलंच बरं मनाशी ठरवलं. पाठमोरा होत तो निघून गेला तेव्हा त्याचा ताठ कणा आज ही मला खुणावत होता. तो तसाच रहावा असं आतून आतून वाटत राहिलं.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print