मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं – खूप काळ पसरलेल्या गडद धुक्यानंतर जसा काही नहुषाच्या चेहर्‍यावर सूर्य उगवला होता. आता इथून पुढे )

`हो बेटा, नक्कीच येईन. वेळ तेवढी कळव.’

`अकरा वाजताचा मुहूर्त आहे, पण आपण साडे दहापूर्वी हजर राहायला हव!’ नहुषाचा आत्मीयतापूर्ण आग्रह बघून मी समारंभाला जायचं ठरवलं. गेलोही. पण खूप उशीर झाला होता. मी कार्यालयाच्या बाहेर पडणार,  एवढ्यात बाहेर गावचा एक परिवार कार्यालयात येऊन दाखल झाला. त्यांच्या दोन मुली होत्या. पोस्ट गरॅज्युएट. दिसायला सुंदर पण दोघी अपंग. जन्मापासून. कुणी तरी कार्यालयाचा पत्ता दिला आणि ते इथे पोचले होते. मुलीही बरोबर होत्या. मी टाळू शकलो नाही.

मी हॉलवर पोचलो, तेव्हा साखरपुड्याचा विधी संपून गेला होता. मला ओळखणारं तिथे कुणीच दिसलं नाही. एकदा वाटलं, आपण परत फिरावं. एवढ्यात नहुषानं मला बघितलं. पाहुण्यांमधून वाट काढत ती माझ्यपर्यंत पोचली.  चेहर्‍यावरून नाराजी स्पष्ट झळकत होती.

`मला माफ कर पोरी! इच्छा असूनही मी वेळेवर येऊ शकलो नाही! असं झालं की…’

`काही हरकत नाही काका. जे झालं ते झालं! या. मी पाहुण्यांशी आपली ओळख करून देते.

माझे डोळे आतुरतेने नारायणभाऊंचा शोध घेत होते. मी नहुषाला विचारलंसुद्धा, `नारायणभाऊ कुठे दिसत नाहीत?’

`हो. त्यांची पण भेट घालून देते, पण आधी पाहुण्यांना तर भेटा.’  एवढ्यात नलिनी आली. मी तिला खूप दिवसांनी बघत होतो. ती आल्याबरोबर नहुषाने `नलिनीआक्का ‘ म्हणून तिला हाक मारली नसती,  तर मी कदाचित् तिला ओळखलंही नसतं. मला पाहताच ती म्हणाली, `आजच्या समारंभात आमच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती होतात, पण तुम्हीच उशीर केलात. ठीक आहे. आलात ना! या. मी आपली पाहुण्यांशी ओळख करून देते.` आता नहुषाचा चार्ज नलिनीने आपल्याकडे घेतला. बहिणींमध्ये सगळ्यात मोठी असल्याने तिने उचललेली ही जबाबदारी माझ्या मनाला कुठे तरी स्पर्श करून गेली.

एकेक करत आठ-दहा पाहुण्यांशी तिने माझी ओळख करून दिली. ओळख करून देताना `आमचे काका म्हणजे आमचे लोकल गार्डियनच, अशा स्वरुपात ओळख करून दिली जात होती. माझ्यासाठी `काका’ हे संबोधन ठीक होतं,  पण लोकल गार्डियन’ ऐकताना काहीसं असहज वाटत होतं. पण त्यावेळी गप्प राहण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. वास्तविक नारायणभाऊ असताना या बहिणींनी मला लोकल गार्डियन बनवण्याची काहीच गरज नव्हती. माझे डोळे सतत नारायणभाऊंचा शोध घेत होते. परिचयानंतर सगळ्यांसाठी फराळाचे पदार्थ आले. ही जबाबदारी नमिता आणि नहुषा मोठ्या कौशल्याने पार पाडत होत्या. थोड्या वेळात निरोप घेऊन गाड्यांमध्ये बसून पाहुणे निघून जाऊ लागले. त्यावेळीही नारायणभाऊ न दिसल्याने माझ्या मनात अनेक शंका घर करू लागल्या. मला वाटलं, की हा विवाह नारायणभाऊंना मान्य नसणार किंवा मग काही तरी कौटुंबिक कारण असणार, की ज्यामुळे ते या समारंभाला हजर राहू शकले नसणार. त्याचबरोबर असंही वाटून गेलं,  की या सगळ्या बायकांमध्ये परिवाराच्या वतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणी ना कुणी पुरुष हवा,  म्हणून मला पुढे केले असणार.  मी तिथून निघण्याचा विचार करतच होतो,  एवढ्यात घुंघट घेतलेल्या एका मुलीला घेऊन तिघी बहिणी माझ्यापुढे हजर झाल्या. माझ्या लक्षात आलं, घुंघट काढलेली ती मुलगी नारायणीच असणार. तिने मला चरणस्पर्श केला. मी `शुभं भवतु’ म्हणत शंभर रुपयाची एक नोट तिच्या हातात दिली. नमिता आणि नहुषाबरोबर नारायणी परत गेली. नलिनी मागे माझ्याजवळ थांबली. आता नारायणभाऊचा विषय काढणं योग्य झालं नसतं. मी नलिनीचा निरोप घेतला, तेव्हा दबक्या आवाजात म्हणाली,

`काका, नारायणभाऊंना नाही भेटणार?’

मी चकित होऊन नलिनीकडे बघू लागलो.  दोन-तीन पाहुणे परत जाण्याच्या तयारीत, शेजारीच  उभे होते. नलिनीने डोळ्यांच्या इशार्‍यानेच मला `या’ म्हंटलं आणि रस्ता काढत ती पुढे निघाली. एका खोलीत प्रवेश करत ती म्हणाली, `काका, हे बघा नारायणभाऊ. आपण भेटा त्यांना.’ एवढं बोलून ती पुन्हा बाहेर उभ्या असलेल्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी मागे वळली. मी खोलीत बघितलं. दोन खुच्र्यांवर नमिता आणि नहुषा बसल्या होत्या. दिवाणावर नारायणी बसली होती. तिला मी आत्ता आत्ताच बाहेर भेटलो होतो. एक खुर्ची रिकामी होती. तिच्यावर बसत मी विचार केला,  बहिणी बहिणींनी माझी थट्टा करण्याचं ठरवलेलं दिसतय.  मी खिन्न झालो. काय बोलावं, मला कळेचना. एवढ्यात नारायणीकडे लक्ष वेधत नहुषा म्हणाली, `काका अजूनही आपण आपल्या नारायणभाऊंना ओळखलं नाहीत?’

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं– साड्यांच्या व्यवस्थित घड्या करून दुसर्‍या दिवशी पुन्हा गिर्‍हाईकांना दाखवण्यासाठी नीट ठेवून द्याव्या लागत. या कामाला बर्‍याचदा वेळ लागायचा. मग रात्री सेल्समन तिथेच झोपत आता इथून पुढे)

एका रात्री नारायणभाऊला तिथे काही विचित्र अनुभव आला. मग त्याने तिथली नोकरी सोडून दिली. त्यानंतरचे काही दिवस खूप वाईट गेले. घर चालवण्यासाठी नारायणभाऊने किती किती, काय काय केलं! आता हळू हळू आम्ही तिघी बहिणीदेखील छोटी छोटी काम करू लागलो होतो. नारायणभाऊने आम्हा बहिणींना आई-वडलांची कमतरता कधीच भासू दिली नाही. पण हे करताना त्याने स्वत:वर खूपच अन्याय केला. विवाहाची वेळ निघून गेली, की खूप कठीण होऊन जातं. आता नाही, तरी थोडं आणखी वय झालं,  की सगळं आयुष्य एकट्याने काढायचं म्हणजे घनदाट जंगलात एकट्याने रात्र काढण्यासारखं होऊन जातं.’

`एकट्याने का?  आपण तिघी तिघी बहिणी आहात की!’

`आम्ही आहोत खर्‍या, पण लग्नानंतर कोणतीही बहीण भावासाठी काय करू शकणार? त्यावर आणि पुन्हा आम्ही तिघी बिना आई-बापाच्या. मी निदान छोटीशी का होईना, नोकरी करते. नमिता आणि नलिनी तर पूर्णपणे हाउसवाईफ आहेत. दोघींची जॉर्इंट फॅमिली. बारा-चौदा लोकांचं कुटुंब. दोघींच्या घरात भांडी घासायलासुद्धा बाई नाही. सर्व कामं दोघींच्याच शिरावर. दिवसभर खपत असतात,  तरी घरातले लोक पैज लावून जसे त्यांना टोचायला तयार असतात. कारण का,  तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हुंडा मिळाला नाही. तरीही आम्ही लग्न ठरताना सुरुवातीलाच आमच्या आर्थिक स्थितीची पूर्ण कल्पना त्यांना दिली होती. नारायणभाऊच्या पासबुकात जे जमा असायचं, ते सगळं आम्हा बहिणींच्या राखी-दिवाळीत खर्च होऊन जायचं. किती तरी वर्षं असंच चाललय. अशा परिस्थितीत त्यांना स्वत:बद्दल विचार करायलाच वेळ मिळाला नाही. आम्हा बहिणींच्या सासरी तो जेव्हा येतो,  तेव्हा काही ना काही घेऊन येतो आणि परत जाताना,  टोमण्यांमुळे चाळणी झालेलं मन,  अश्रूंनी भिजलेले डोळे आणि दु:खाच्या ढगांनी जड झालेलं काळीज घेऊन परत जातो.’

`आपल्या चुलत बहिणीच्या विवाहाला नारायणभाऊ येणार नाहीत?’ मी जसा काही लांबच लांब चाललेल्या ट्रॅजिडी सीनला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतो.

`येणार का नाहीत? काही दिवसांसाठीच तो कलकत्त्याला गेलाय. फॅशन डिझाईनिंगचं ट्रेनिंग तिथे आहे. पण या विवाहात तो जास्त इन्व्हॉल्व होणार नाही…. आता आपल्यापासून काय लपवायचं काका! या विवाहाची सगळी जबाबादारी आम्ही तिघी बहिणींनी उचलायची ठरवलीय. नारायणभाऊ केवळ उपस्थित राहील. करणार काहीच नाही. पैशानेही नाही आणि कष्टानेही नाही. पैसे तर आम्ही आपल्यालाही खर्च करायला लावणार नाही, पण बाकी सगळ्याबाबतीत आपण असं समजा,  की आपल्या मुलीचंच लग्न आहे आणि तिच्या साखरपुड्यात आपण यायलाच हवं. येणार नं काका?’  खूप काळ पसरलेल्या गडद धुक्यानंतर जसा काही नहुषाच्या चेहर्‍यावर सूर्य उगवला होता.

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं – `तसं नाही बेटा, मलाही वाटतं ना, पण हे कामच असं आहे, की मी नसलो, तर सगळं एकदम ठप्प होऊन बसतं.’ आता इथून पुढे )

खरं सांगायचं,  तर मला काही तरी वेगळंच सांगायचं होतं, पण सांगू शकलो नाही. मी आणि माझी पत्नी कौसल्या, आम्हा दोघांना असे काही अनुभव आले आहेत, की लग्न-बिग्न अशा समारंभाला जाणं आम्ही टाळू लागलोय.

`या वेळी मात्र असं चालणार नाही. आम्हा भावंडांच्यातलं हे शेवटंचं कार्य. आपल्याला केवळ साखरपुड्यालाच नाही, तर लग्नालासुद्धा यायचय आणि गरज पडली,  तर कन्यादानसुद्धा करायचय. आमचे पालक आता नाहीत. या परमुलखात आपल्याइतकं  जवळंचं आम्हाला दुसरं कुणीच नाही. नात्यामध्येसुद्धा आमची ही चुलत बहीण नारायणी आम्हा बहिणींच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे.’

`नारायणभाऊ तर आहेत ना! आपल्या तिघा बहिणींचं कन्यादान तर त्यांनीच केलय ना!’

`आपण तर लग्नाला आला नव्हतात, मग आपल्याला कसं कळलं?’

`अग मुली, डोळे-कान उघडे असले, की जगात काय चाललय, हे घरबसल्यासुद्धा कळू शकतं. मी भले आलो नाही, पण अनुमान तर बांधू शकतो नं? नारायणभाऊंनी तुम्हा तिघी बहिणींसाठी जे काही केलं, तसं आज-काल क्वचितच बघायला मिळतं.’

`होय काका,  नारायणभाऊ आमच्यासाठी भाऊच नाहीत,  आमच्या वडलांसारखेच आहेत ते आम्हाला. आमच्या घरी दरोडा पडला,  तेव्हा आम्ही अहमदाबादला राहत होतो. आमच्या आईला दरोडेखोरांनी सुरा भोसकून मारलं. बाबांचं डोकं कुर्‍हाडीच्या वाराने फुटलं होतं. दरोडेखोरांना विरोध करताना शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. हॉस्पीटलमध्ये अनेक दिवस मरणाशी झुंज घेत शेवटी ते मरण पावले. दरोडेखोरांनी आम्हा चौघा भावंडांना एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. नंतर आम्हाला बाहेर काढलं गेलं,  तेव्हा आमचे आई-वडील काही आम्हाला दिसले नाहीत. सगळं घर रक्तरंजित झालं होतं,  जशी काही रक्तानेच होळी खेळलीय. मी आणि नमिताताई ते दृश्य बघून बेशुद्धच पडलो. नारायणभाऊ तेव्हा सहावीत शिकत होता. बाबांना खूप वाटायचं की शिकून-सवरून नारायणभाऊ मोठा माणूस बनेल. तो खूप हुशारही होता. पण सगळं राहून गेलं.

घरमालकांची बेकरी होती. त्यांनी नारायणभाऊला ब्रेड विकण्याचं काम दिलं. काही दिवसानंतर तो दुधाच्या पिशव्या टाकू लागला. नंतर वर्तमानपत्रही. सकाळची ही काम उरकल्यानंतर नारायणभाऊ दिवसभरात आणखीही काही काही कामं करू लागले. तथापि त्यांनी ब्रेड विकणं मात्र सोडलं नाही,  कारण बेकरीतून आम्हाला शिळा ब्रेड फुकट आणि भरपूर मिळत असे. काही दिवसानंतर त्याला एका लेडीज गारमेंट शॉपमध्ये सेल्समनची चांगली नोकरी मिळाली. पगारही चांगला मिळू लागला. आम्हा बहिणींचं शाळेत जाणं पुन्हा सुरू झालं. कधी कधी त्याला रात्रीही दुकानात थांबावं लागत असे. त्यांचा तयार कपड्यांबरोबरच साड्यांचाही मोठा विभाग होता. शहरातलं बहुतेक सगळ्यात मोठं दुकान त्यांचं होतं. दिवसभर गिर्‍हाहाईकांना उघडून दाखवलेल्या साड्यांचा ढीग लागलेला असायचा. त्यांच्या व्यवस्थित घड्या करून दुसर्‍या दिवशी पुन्हा गिर्‍हाईकांना दाखवण्यासाठी नीट ठेवून द्याव्या लागत. या कामाला बर्‍याचदा वेळ लागायचा. मग रात्री सेल्समन तिथेच झोपत.

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

‘काही नवीन पत्ते आलेत?’

`होय बेटा, म्हणून तर तुला फोन केला.’

`मला मेसेज मिळाला, पण मी काल येऊ शकले नाही. माझी सासू आणि नणंद घरी आल्या आहेत. कोण आहेत हे…’

`बाकी सगळं तुम्हाला हवं तसंच आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे, की ज्याबद्दल आपल्याला विचार करायला हवा. ‘

`त्यांचा पहिला विवाह झाला होता. म्हणाले, `डिलिव्हरीच्या वेळी बायको गेली. सहा वर्षाची मुलगी आहे.

`वय किती?’

`अठ्ठेचाळीस लिहीलं आहे.’

`स्वत: येऊन माहिती देऊन गेले, की दुसर्‍या कुणी तरी फॉर्म भरलाय?

‘`स्वत: आले होते.’

`कसे वाटले?’

`सावळे… थोडे मोठे. ‘

`मला स्वभावाबद्दल विचारायचं होतं. ‘

`पाच मिनिटाच्या बोलण्यावरून, कुणाबद्दल काय सांगणार? ‘

`नोकरी कुठे?’

एम.आय.डी.सी. मध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना आहे, तिथे सुपरवाईझर आहे.’

`फोन नं. दिलाय?’

`हो. हा घ्या.’

`ठीक आहे. मग सगळे डिटेल्स लिहून घेते.’  नहुषाने रजिस्टरमधून सगळे डिटेल्स लिहून घेतले. पुन्हा एकदा ती ते वाचू लागली. `अंकल,  डोडा आडनाव कुणाच्यात असतं?’

`मला तरी असं वाटतं, की ते तुम्हा लोकांच्यातच असतं.’

`कुणास ठाऊक, आज-काल आडनावावरून काही कळत नाही. फोटो दिलाय?’

`नाही. फोटो आणला नव्हता.’

`काही हरकत नाही. मी आपल्याला कळवीन. निघते… आज शाळेतून निघायलाही जरा उशीर झालाय. रस्त्यात काही खरेदी करायची होती. त्यातही थोडा वेळ गेला. सासू आता काय म्हणेल कुणास ठाऊक?’

नहुषा तिघी बहिणींमधली सगळ्यात धाकटी. लग्नाला दोन वर्षं झाली. गेल्या वर्षापासून आपल्या चुलत बहिणीला योग्य स्थळ मिळावं,  म्हणून इथे येते आहे. अनेकदा रजिस्टर बघितलय. साधारण नोकरी असलेलाही चालेल,  कारण बहीण फॅशन डिझाइनिंगमध्ये चांगले पैसे मिळवते. अडचण एकच आहे,  मुलीला अडतीसावं उलटून गेलय. एवढ्या वयाच्या मुलीला मुलगी म्हणणं म्हणजे `मुलगी’ या शब्दाची अप्रतिष्ठा करण्यासारखं आहे.

नहुषापेक्षा मोठी नमिता. दोघींमध्ये दोन वर्षांचं अंतर आहे, पण विवाहात मात्र सहा महिन्याचं. दोघींचे विवाह एकदम होऊ शकले असते, पण नहुषाचा विवाह जिथे ठरला, त्या लोकांची इच्छा होती, की विवाह चांगला थाटा-माटात व्हावा. त्यामुळे नमिताचा विवाह आधी घाईने केला गेला. नारायणभाऊ म्हणाले होते,  की नमिताचा विवाह निश्चित करण्यात नलिनीची हुशारी आणि भूमिका दोन्ही महत्वाचे होते. नलिनी तिघी बहिणींच्यात सगळ्यात मोठी. जेव्हा नारायणभाऊ नलिनीसाठी योग्य वर शोधायला माझ्या मॅरेज ब्युरोत आले,  तेव्हा माझा त्यांच्याशी परिचय झाला. नलिनी तेव्हा अठ्ठावीस वर्षाची होती. नारायण भाऊंची काळजी मी समजू शकत होतो. त्यांना वाटत होतं,  कशाही प्रकारे का होईना,  नलिनीचा विवाह व्हावा. त्यामुळे बाकीच्या दोघींची लाईन क्लिअर होईल. त्यावेळी फारसा काही परिचय झाला नव्हता,  पण एवढंच कळलं होतं, नारायणभाऊंचाही अद्याप विवाह झालेला नाही.

दोन आठवड्यानंतर मला नहुषाच्या चुलत बहिणीच्या साखरपुड्याचं निमंत्रण मिळालं. नहुषा स्वत:च निमंत्रण द्यायला आली होती. मी लगेचच `होय’ म्हणून टाकलं,  तेव्हा म्हणाली,  `काका आपल्याला नमिताताईच्या वेळी पण बोलावलं होतं आणि नलिनीआक्काच्या वेळेलाही. पण आपण एकदासुद्धा आला नाहीत. आपल्याला हे जाणून घ्यावसं नाही का वाटत,  की आपल्या मुलींचं घर वसवण्यासाठी आपल्या मॅरेज ब्युरोद्वारा आपण महत्वाची भूमिका बजावलीय,  त्या मुली आज कोणत्या परिस्थितीत आहेत?’

`तसं नाही बेटा, मलाही वाटतं ना, पण हे कामच असं आहे,  की मी नसलो, तर सगळं एकदम ठप्प होऊन बसतं.’

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-5 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-5 ☆ श्री आनंदहरी 

आपल्या परागंदा झालेल्या नवऱ्याबद्दल माहेरी जाऊन गोदामावशीला  विचारावे असे एक-दोनदा तिच्या मनात येऊन गेले होते पण तिने एखाद्या असहाय्य क्षणी मनात आलेला तो विचार मनातून काढून टाकला होता कारण तिचा त्या साऱ्यावर जराही विश्वास नव्हता पण माणूस हताश झाला की कुणावरही आणि कशावरही विश्वास ठेवतो हे तिला ठाऊक होते.. ती हताश झाली होती, असहाय्य होती पण तरीही तिचा त्यासाऱ्यांवर, कशावरंच विश्वास नव्हता.

तिला हताश होऊन, रडत राहून चालणार नाही याची तिला जाणीव झाली आणि तिने डोळे पुसले. तिची, तिच्या आयुष्याची लढाई तिलाच एकटीला लढावी लागणार आहे हे तिला कळून चुकले होते. ती स्वतःला सावरून विचार करत राहिली. विचारात, रात्र सरुन कधी उजाडले हे तिलाही उमगले नाही. उजाडले तेंव्हाची ती, आधल्या रात्रीची ती राहिली नव्हती.

दोन दिवसांनी मंगळवारी ती कोतमाईच्या शिवारात भांगलायला निघाली होती. एरवी जाताजाता बाहेरूनच हात जोडून लगबगीनं नमस्कार करणारी ती कोतमाईच्या देवळात गेली. तिने भक्तिभावानं नमस्कार केला. देवीपुढे असलेल्या करंड्यातले हळद-कुंकू देवीला वाहिलं , स्वतःच्या कपाळाला लावलं आणि देवीजवळ काहीतरी मागणं मागत असल्यासारखी दोन-तीन मिनिटे हात जोडून, डोळे मिटून शांत उभी राहिली. थोडावेळ देवीसमोर डोळे मिटून बसली आणि उठून, पुन्हा एकदा नमस्कार करून शांत मनाने बाहेर आली. ती बाहेर आली तेव्हा ती स्वतः अंतर्बाह्य शांतता अनुभवत होती. तिचा चेहराही काहीसा वेगळाच दिसत होता.

ती झपाझप चालत कोतमाईच्या शिवारात आली. बायका भांगलणीला पातीवर बसत होत्या . त्या बायकांच्या पलीकडल्या कडेच्या पातीवर ती भांगलायला बसली. नेहमीप्रमाणे तिचं खुरपं भराभर चालत होतेच पण यावेळी हाताबरोबर  मनात विचारही चालू होते. दुपारची सुट्टी झाली . सगळ्या बायका बांधावर आंब्याखाली भाकरी खायला गोळा झाल्या. भाकरीच्या धडप्याची गाठ सोडता सोडता खालच्या आळीच्या रखमाक्का तिला म्हणाल्या,

“काय गं आज लईच येगळी दिसतीयास ? “

स्वतःच्या भाकरीचा तुकडा मोडता मोडता ती काहीच न बोलता नुसतीच हसली.

जेवणाच्या सुट्टीनंतर परत भांगलणीला जुपी झाली. दिवस मावळतीला गेला तशी भांगलणीच्या पुठ्ठयातील दोन-तीन बायकांनी ‘ कुणाची पात भांगलून लवकर होतेय ‘ याची गंमतीगंमतीत स्पर्धा लावली . प्रत्येकीचा हात झपाझप चालत होता. कुणाला बोलायलाच काय पण इकडेतिकडे बघायलाही सवड नव्हती. रखमाक्काचं लक्ष सहज तिच्याकडं गेलं अन त्यांच्याही नकळत त्या जरा मोठ्यानं बोलून गेल्या,

“आगं बया ss हिला आनी काय झालंया ?”

त्यांच्या त्या बोलण्यानं सगळ्यांचे हात थांबले आणि तिच्याकडे लक्ष गेलं. ती घुमायला लागली होती.

तिच्या अंगात देवीचं वारं आलंय, शिवकळा आलीय हे म्हाताऱ्या, अनुभवी रखमाक्कांच्या लगेच लक्षात आले होते. त्यांनी पुढे होऊन तिला नमस्कार केला तसा सगळ्यांनीही नमस्कार केला. बऱ्याच वेळाने वारं गेल्यावर रखमाक्का तिला घेऊन तिच्या घरी गेल्या होत्या. ती घरात परतेपर्यंत साऱ्या गावात तिच्या अंगात शिवकळा आल्याची बातमी पोहोचली होती,

मंगळवारी आणि शुक्रवारी तिच्या घरात बाया -माणसांची गर्दी होऊ लागली. घरात देवीचं ठाणं आले आणि तिला हवे होतं तसे सारेच बदलत गेले. तिच्या कपाळावरची कुंकुवाची जागा  मळवटाने घेतली. वेणी-अंबाड्याऐवजी तिचे केस मोकळे झाले .या साऱ्यामुळे  तिचे गोरेपण जास्तच खुलले  पण तिच्या अंगात देवीचा वास असल्याने तिच्याकडे बघणाऱ्या बऱ्याचशा लोकांची नजर बदलली होती. काहीतरी कारण काढून घरी येणाऱ्या आणि उगाच रेंगाळणाऱ्या बापयांना आपोआप पायबंद बसला होता . तिच्याकडे बघणाऱ्या लोचट नजरा कमी झाल्या होत्या. तिच्याबद्दल काहीसा भक्तिभाव, काहीसं भय निर्माण झालं होतं आणि तिच्या मनात असणारे  भय मात्र खूपच कमी झाले होते. तिच्या अवतीभवतीचा आणि घरातला बायकांचा वावर वाढला होता. तिला सुरक्षित वाटू लागले होते. ती निर्धास्थ आणि निश्चिन्त झाली होती.

ज्याच्यावर तिचा विश्वास होता तो नवरा तिला एकटे टाकून निघून गेला होता पण ज्यावर तिचा कधीच विश्वास नव्हता ती देवीच्या  शिवकळा, तिचा विश्वास नसला तरी, तिच्या मदतीला धावून आली होती .

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-4 ☆ श्री आनंदहरी 

ती सारंकाही  मनोमन ओळखून होती पण कुणाला थेट झिडकारता, तोडता येत नाही गरिबाला. अशावेळी त्या माणसांना न बोलून किंवा गोड बोलून दूर कसं ठेवायचं याचं बाळकडू तिला आईकडून मिळालेलं होतं.. तरीही लांडग्यांच्या जंगलात राहून त्यांच्या कळपापासून आपण किती काळ स्वतःला वाचवू शकू ? ह्या प्रश्नानं तिच्या काळजाचा थरकाप होत असे. भीतीने तिची झोप उडाली होती. मामा-मामींना सांगावा धाडावा, त्यांना सारं सांगावं आणि सोबतीला बोलवावं असे कितीतरी वेळा तिच्या मनात येऊन गेले होतं..पण त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या जीवांना उगाच कशाला ताप ? आणि हे सारे नित्याचेच झाले होते, ते तरी किती काळ आयुष्याला पुरणार ? असा विचार करून ती गप्प राहिली होती.

मामा-मामी सारखेच तिचे आई-वडीलही वयस्करच. तिने त्यांना कधीच, काहीच सांगितले नव्हतं. त्यांना जरा जरी कळलं असते तरी काळजी वाटून ते बिचारे सगळं सोडून धावत आले असते आणि तिला माहेरी घेऊन गेले असते. तिला त्यांना कुणालाच तापही द्यायचा नव्हता आणि स्वतःचं घर सोडून दुसरीकडं कुठं जायचंही नव्हतं. आपण गेलो आणि इकडे नवरा आला तर.. ? असाही विचार तिच्या मनात येत होता. ती नवऱ्याची वाट पहात, सारं काही देवाच्या हवाली सोडून देऊनही, मनातून घाबरत घाबरतच दिवस कंठत होती.

भांगलणीची पात  उरकून घरी परतायला रोजच्यासारखाच उशीर झाल्याने ती झपाझप चालत घरी येत होती. चांगलंच अंधारुन आलं होतं पण वाट पायाखालची होती त्यामुळे अदमास घेत चालायची गरज भासत नव्हती. चालता चालता, अचानक कुणीतरी वाटेत आडवे आल्याचं तिला जाणवल्यानं ती दचकली… थबकली… दोन पावलं मागे सरकली. ती मागे सरकताच आडवी येणारी व्यक्ती एक पाऊल पुढे आली… मग मात्र ती गडबडली, घाबरली.

“ कोन हाय ? वाटत कशापाय हूबाय ? सरा बाजूला..”

मनात दाटून आलेली भीति स्वरात डोकावू नये म्हणून तिने थोडे दरडावणीच्या सूरात म्हणाली.

समोरच्या व्यक्तीने तिच्या दरडावणीला भीक न घालता, काहीही न बोलता तिचा हात धरला . हात धरल्याने ती जास्तच घाबरली.

‘हात सोडा आदी..’ म्हणत ती हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तशी हातावरची पकड आणखी घट्ट होऊ लागली.

 “ कोन हायसा ती सांगाय काय हुतंय ?”

हात सोडवण्याची धडपड थांबवत ती म्हणाली. तिने सुटण्याची धडपड थांबवल्याने, ती तिची शरणागतता वाटून तिच्या हातावरची पकड सैलावली आणि याच क्षणाची वाट पाहत असल्यासारखी, सारे बळ एकवटून  हाताला हिसडा देवून स्वतःचा हात सोडवून घेत ती जी पळत सुटली ते घरात आल्यावरच तिने सुटकेचा श्वास सोडला आणि पटकन घराचं दार लावले. अगदी आतून कडी लावून दार घट्ट लावले.  लावलेल्या दाराला पाठमोरे टेकत पायातले त्राण गेल्यासारखी ती खाली बसली आणि तिला रड़ू कोसळले. ती दैवाला आणि देवाला कोसत होती. तिला नवऱ्याचा आणि स्वत:चाही राग आला होता. ती तशीच बसून राहिली. ना तिला जेवावे वाटले ना तिला झोप आली.

रात्रीच्या प्रकारापासून ती मनोमन खूप घाबरली होती. आपण आपल्या गावातच नव्हे तर घरातही सुरक्षित नाही याची खात्रीच तिला वाटू लागली होती. नवऱ्याची आठवणही आली आणि असं एकटं टाकून गेल्याबद्दल प्रचंड रागही आला होता. तिला एकटे, एकाकी, हताश वाटू लागलं होतं. तिला सारं सोडून देऊन आईकडे जावं असं वाटू लागलं होते. आईच्या कुशीत शिरून रडावं असे वाटत होते.

तिला आईची, माहेरची आठवण आली तशी तिला गोदामावशी आठवली. गोदामावशींच्या अंगात शिवकळा म्हणजे देवीचं वारे यायचे. अंगात शिवकळा आल्यावर गोदामावशीला लोक  त्यांच्या अडचणी, समस्या सांगत, काही हरवले, पडले तर त्याबद्दल विचारत असत. गोदामावशीच्या तोंडून देवीच कारण, उपाय सांगत असते असा लोकांचा विश्वास होता.  लोक श्रद्धा ठेवून ते उपाय करत असत. देवीस्वरूप मानून तिच्या पाया पडत. गोदामावशी त्यांची देवी बनली होती, त्यांचं श्रद्धास्थान झाली होती हें तिने पाहिलं होतं, तिला ते चांगलंच ठाऊक होतं आणि चांगलं आठवतही होतं.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-3 ☆ श्री आनंदहरी 

मामा- मामी त्यांच्या गावी गेले आणि तिला घर सूनं सूनं वाटायला लागलं.. आई-वडिलांची आठवण येऊ लागली. माहेरी तरी घरात खूप माणसं कुठं होती ? आई-बाबा, धाकटा भाऊ आणि ती अशा  चौघेजणांचं चौकोनी कुटुंबच होते…पण तिला ते माहेरचं घर, घरात दुसरं कुणी नसतानाही कधी सूनं सूनं वाटले नव्हते. त्या घरात तिला कधी एकटेपणा जाणवला नव्हता.

लग्नानंतर काही दिवसातच ती सासरच्या घरात रुळूून गेली. त्या घराबद्दल मनात आपलेपणा निर्माण झाला. घराच्या कणाकणाशी एक नाते निर्माण झालं… माहेरच्या, आई-वडिलांच्या घरासारखीच त्या घराशीही तिची नाळ जुळली. घर झोपड़ी का असेना, तिच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत तिचा स्वतःचा असा निवारा होता आणि त्यात ती खूप खुश होती.

नवरीचा नवेपणा नऊ दिवसही नव्हता .  लगेचंच नवऱ्याबरोबर कामाला जायला सुरवात झाली. दोघांच्या राबत्या हातांनी काडी काडी जमवत ती आपले घरटे आकाराला आणत होती. साध्याशा झोपडीतही सुखाचं, स्वप्नांचं चांदणे पसरत होती, बरसत होती. लहानपणापासून कष्टणाऱ्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागले होते. स्वतःच्या घरट्यात स्वर्ग निर्माण करण्याचे डोहाळे.

गावच्या शिवारात मिळेल ते काम नवऱ्यासोबत जावून ती करत होतीच पण तिथे काम नसले तर शिवधडीच्या गावांच्या शिवारात काम करायला जाण्यासाठी नवऱ्याला विनवायची, तयार करायची. तो सुरुवातीला कुरकुरायचा पण ती त्याची समजूत घालायची. त्याला तितकासा कामाचा उरक नसला तरी तिला कामाचा उरक असल्यानं आणि तिचं कामही खूपच चांगले, नीटनेटकं असल्याने लोक त्यांना आवर्जून बोलवायला लागले. तिला त्याचा खूप आनंदही व्हायचा.

हळूहळू कधी सहज म्हणून तर कधी रानात भांगलणीला बोलावण्याच्या निमित्ताने तर कधी उसाचं पाचट काढ़ायच्या कामाला बोलवण्यासाठी कुणाकुणाचं घरी येेणं -जाणं वाढलं, तेही नेमकं नवरा घरात नसताना. कधी नवरा येईपर्यंत थांबून राहणं. काहीतरी विषय काढून बोलत राहणं.. ती घरातलें काम करत असताना न्याहाळत राहणं..  हे सुरुच असायचं. तिला हे सारे जाणवत होते, उमगत होते पण तिला काहीच बोलता यायचं नाही. ती मुकाट सारे सोसत राहायची . गरीबाची गरीबी हीच किंमत असते, तीच त्याची ओळख असते. कितीही अन्याय होत असला तरी त्याविरुद्ध बोलायला त्याला तोंड नसते हे तिला लहानपणापासून, अगदी कळायला लागल्यापासूनच ठाऊक होतं.

रानात कामाला गेले, भांगलणीला गेले की भांगलण करताना पातीमागे उभं राहून तर कधी पुढे उभं राहून पातीत तण राहिलंय काय हे पाहण्याचं निमित्त करून तिला न्याहाळत बसणारे, निरखणारे डोळे, कोणतंही काम करतेवेळी आणि एरवीही रोख़ून पाहणाऱ्या, अंगावरुन रेंगाळत फिरणाऱ्या, थबकणाऱ्या भुभुक्षित, लोचट नजरा कुठंही गेलं तरी असायच्याच. कधी काम करत असताना तर कधी काहीही कारण नसताना, काहीतरी कारण काढून सलगी करणारे, उगाचच जाता-येता स्पर्श करायला हपापलेले हातही होतेच.. तिला हे जाणवत होते.. राग ही येत होता पण गरीबाला ना रागावता येते ना चिडता येतं. ती सर्वांशी सारखेच अंतर राखून स्वत:ला सुरक्षित ठेवत होती. ती सारेच मुकाट सोसत होती. नाही म्हणलं तरी नवऱ्याच्या अस्तित्वाचं असणारं कवच अशा लोकांना काहीसा पायबंद घालून तिला काहीसं सुरक्षित ठेवत होतंच.

अक्षरशः डोळ्यांत प्राण आणून ती नवऱ्याची वाट पहात होती पण जावून खूप दिवस लोटले तरीही, न सांगता- सवरता गेलेला नवरा परतला नाही .दिसागणिक तिची अस्वस्थता वाढतच होती. तिला काय करावे काही सुचत नव्हते. जरासं  कुठं खुट्ट झालं की साऱ्या गावाला कळत असते.  कुणी काही तिच्यासमोर बोलत नसले, तिला विचारत नसले तरी तो घरात नाही आणि ती एकटीच आहे हे कळायला कितीसा वेळ लागणार ?  साऱ्या गावाला ते ठाऊक झालं होते.

तिला कामाला बोलावण्याच्या निमित्ताने घरी येणे,  ठाऊक नसल्यासारखं त्याची चौकशी करणं, तिच्या कामाची स्तुती करणं.. कधी आडून आडून तर कधी थेट तिची, तिच्या रूपाची स्तुती करणं असे प्रकार व्हायचे.. ‘अडनड असल्यावनं हाळी मार.. अनमान करू नगं.. आपुन काय परकं न्हाय..’ असे बोलून जवळीक दाखवायचा , तिच्याबद्दलची काळजी, आपलेपणा दाखवायचा प्रयत्न व्हायचा.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-2 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

ती लग्न होऊन या घरात येऊन तीन-चार महिनेच झाले होते आणि एके दिवशी रानात कामाला गेलेला तो रात्री घरी परत आलाच नाही. खूपच उशीर झाला तसं ती अस्वस्थ झाली. मनात नाना विचार येऊ लागले. तिला रडू येऊ लागलं. घरात ती एकटीच आणि गावातही तशी ती नवीनच होती. ‘काय करावं ?…’ तिला तर काहीच सुचेना. शेवटी न राहवून ती शेजारच्यांकडे गेली.

शेजारच्या म्हातारीने मायेनं तिला जवळ बसवून घेतलं. धीर देत राहिली. म्हातारीने घरातल्या बापयगड्याना त्याची चौकशी करायला, त्याला शोधायला गावात धाडलं. गावात कुठं त्याचा पत्ता लागला नाही. शेजार- पाजाऱ्यांना तरी तसं त्याच्याबद्दल फारसं काय माहीत असणार? लहानपणापासून तो मामाकडे असल्याने त्यांनाही तसा नवखाच होता आणि तसंही जाणाऱ्याची एक वाट असते आणि शोधणाऱ्याच्या दहा वाटा असतात. ते तरी त्याला कुठे कुठे शोधणार? तरीही त्यांनी शेजारधर्म पाळला होता. दोन दिवस त्याला शक्य तिथे, सगळीकडे शोधत होते.

पहिल्या दिवशी रात्रभर ती नुसती रडत होती. तिला समजवायला, सावरायला, सोबतीला शेजारची म्हातारी आली होती..पण कितीही झालं तरी शेजाऱ्यांनाही काही मर्यादा असतात. कुणीतरी त्याला शोधायला, चौकशी करायला म्हणून त्याच्या मामांकडे गेले होतं.  तो गायब झालाय हे कळताच मामा-मामी लगेच आले होते. ते आल्यावर तिला काहीसं हायसं वाटलं होतं, तरीही मनात शंका-कुशंकांच वावटळ भिरभिरत होतंच. अचानक मनात  संशयाच्या भुतानेही जन्म घेतला होता. त्याचं बाहेर कुठं काही असेल काय? ही शंका लाकडातल्या किड्यासारखी तिचं मन पोखरू लागली होती.  ती आपले मन कुणाजवळ मोकळं करणार ? मनातली शंका कुणाला विचारणार? कुणाशी बोलणार ? नाना विचार मनात येऊन ती अस्वस्थ होत होती. आतल्या आत सोसत होती, जळत होती.

दोन दिवसांनी रात्री उशीरा, तो जसा गेला होता तसाच परत आला होता. ‘ कुठं गेलावता?’ म्हणून विचारलं तर त्यानं ‘असंच फिरत फिरत गेलोतो..’ असे सांगितले होते. मामांना त्याचे असे वागणे माहीत होते. त्यांनी पुढं फारसा विषय वाढवला नाही. मामा- मामीं दोघांनीही त्याला खूप समजावून सांगितले. तिलाही काळजी घ्यायला सांगितली. दोन दिवस राहून ते निघून गेले .

काही काळाने पुन्हा तो तसाच गेला तेव्हा मात्र तिने फारसे कुणाला सांगितलेच नाही. ‘ मामा-मामींना तरी या वयात कशाला उगाच त्रास द्यायचा ? ’ असा विचार करून त्यांनाही कळवले नाही. अस्वस्थतेत दिवस आणि रात्री काढल्या. स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत- खडत त्याच्या येण्याची वाट पाहिली. चार दिवसांनी त्याचा तो आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला होता. ती त्याला खूप बोलली, त्याच्याशी भांडलीही होती. त्याच्यावाचून तिची होणारी अवस्था तिने त्याला सांगितलीही होती पण आपलं सारं बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावरचं पाणी आहे हे तिलाही जाणवलं होते, ठाऊक झाले होते.

आता तो पुन्हा कुठंतरी गेला होता. तिला त्याचं असे वागणे, अचानक जाणे ठाऊक झालं होतं तरीही तिने त्याची वाट पाहिली. महिना होत आला तरी तो परतला नाही तशी ती जास्तच अस्वस्थ झाली. मनात एकटेपणाच्या भीतीनं घर केलेलं होतंच. तिला खूप असुरक्षितही वाटू लागलं होतं. आधीचं बाईपण, त्यात तारूण्य आणि देवाने दिलेले सौंदर्य. जाता येता खाऊ की गिळू करणाऱ्या लोचट नजरांनी जीव नकोसा व्हायचा पण मोलमजुरी केल्याशिवाय दोन वेळची भाकर मिळणार नाही अशी श्रीमंती. रोज कुणा ना कुणाचं वावर पूजायला जायला लागायचंच..

गरीबाला सौंदर्य हा शापच असतो..  कळत्या वयापासूनच तिला हा शाप भोगावा लागत होता. आईबापाची पांघर होती पण तिला गरीबीची ठिगळं होती. तरीही ती पांघर खुपच बरी असं वाटण्यासारखी सासरची अवस्था होती. लग्न होऊन ती नांदायला आली ते गवताने शाकारलेल्या, पांढऱ्या मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या झोपड़ीवजा घरात.. सासरी घरात ना कोणी मोठं होते ना धाकटं. आई-बापामागे मामानं सांभाळ करून मोठा केलेला नवरा आणि ती.. झाले कुटुंब. लहानपणापासून सांभाळलेल्या आपल्या भाच्याचं लग्न करून देवून त्याच्या गावी त्याचा संसार थाटून दिला आणि लगेचच मामा-मामी स्वतःच्या गावाला गेले.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-1☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-1☆ श्री आनंदहरी 

नेहमीप्रमाणे कोंबड्याच्या पहिल्या आरवण्याला तिला जाग आली. नवरा ढाराढूर घोरत पडला होता. तिने काही त्याला उठवलं नाही. पटापट स्वतःचं सारं आवरलं आणि चुलीवर चहा ठेवून भाकरीचं पीठ मळायला घेतलं आणि त्याला हाक मारली. दोन तीन हाका मारल्या तेव्हा तो उठला. दारातल्या रांजणातून डिचकीभर पाणी घेऊन तोंड धुतलं आणि चुलीपाशी येवून बसला.तिने वैलावरचा चहा उतरून पुढयातली कपबशी भरली आणि त्याच्यापुढे ठेवत त्याला म्हणाली,

“ येरवाळीच पाळकातल्या सदानानाकडं कोळपाय जायाचं हाय… ध्येनात हाय न्हवं ?”

“ व्हय. हाय की ध्येनात. “

“ आवरा बिगीबिगी. तंवर भाकरी बांदून द्येत्ये.” तो आवरुन भाकरी घेऊन सदानानाकडे कोळपायला निघुन गेला. तिने स्वतःचे सारं आवरलं. आपली भाकरी बांधून घेतली आणि घराचे दार लावलं. बाहेरच्या बाजूला दिवळीत ठेवलेले खुरपं घेवून, भांगलायला उशीर होऊ नये म्हणून ती लगबगीनं निघून गेली.

घरी येईपर्यन्त दिवेलागण झाली होती. तो परत आल्याचं काहीच चिन्ह दिसेना. तिला आश्चर्य वाटलं. ‘ कोणीतरी भेटलं असेल, बसलं असतील बाण्या हाणत ..’ असा विचार करून तिने हातपाय धुवून चूल पेटवली. चहाचं भुगूनं चुलीवर ठेवलं आणि ती घरातली इकडची-तिकडची आवराआवर करायला लागली. चहाला चांगली उकळी आल्यावर चुलीजवळ बसून चांगला कपभर चहा प्याल्यावर तिला जरा बरं वाटलं. चांगली तरतरी आल्यासारखी वाटली. ‘आता ईतीलच ही..कुटंसं ऱ्हायल्यात कुणास ठावं ? आतापातूर याला पायजेल हुतं .’ असे मनोमन म्हणत ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

भाकरी झाल्या, कालवण झालं तरी त्याचा पत्ताच नव्हता. तो अजून आला कसा नाही ? या विचाराने ती मनोमन अस्वस्थ झाली. काय करावं ते तिला सुचेना. एकदा वाटलं सदानानाकडं जावून चौकशी करून यावं… पण एवढ्या रात्रीचं एवढ्या लांब पाळकात जाणे शक्य नव्हते. ती त्याची वाट पहात बसून राहिली.

मनात नाना विचार येत होते. काळजी वाटत होती. दिवसभरच्या कामानं अंग आंबून गेलेलं होते. दोन घास खाऊन केव्हा एकदा पाठ भुईला टेकतोय असे तिला झालेलं होते पण तिला काही खावंसं वाटेना. सारा स्वयंपाक तसाच होता. ती दाराकडे नजर लावून विचार करत, काळजी करत भिंतीला टेकून बसून राहिली होती.

तिला बसल्या जागीच बऱ्याच वेळाने कधीतरी डोळा लागला होता. जाग आली तेंव्हा चांगलेच फटफटलं होते. तो परत आलेलाच नव्हता. ‘ मागल्यावानी कूटंतरी ग्येलं नसतीली न्हवं ? ‘ तिच्या मनात आलं आणि तिला रडूच आलं .

मनाला कसंबसं सावरत तिने पटकन स्वतःचं आवरलं. कुणाकडे जावून अशी चौकशी करणे तिला बरे वाटत नव्हतं पण दूसरा पर्याय नव्हता. ती झपाझप चालत पाळकात सदानानाकडं गेली. सदानानांनी जे सांगितले ते ऐकून तिने डोक्यावर हातंच मारून घेतला. तिचा नवरा सदानानांनी बोलावूनही आणि तिने सांगूनही सदानानाकडं कोळपायला गेलाच नव्हता.

तिच्या मनातली भीती खरी ठरली होती. तिचा नवरा पुन्हा एकदा तिला एकटीला सोडून कुठेतरी गेला होता, परागंदा झाला होता. तिला ते जाणवले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तिच्या कुवतीनुसार शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे तिलाही चांगलंच ठावूक होते.

पहिल्यापासून तसा तो चंचलच होता. एके ठिकाणी फार काळ रमायचाच नाही. आपण कुठं जातोय? कशासाठी जातोय? हे घरात कुणालातरी सांगावं, आपल्यामागे कुणीतरी आपली काळजी करत बसतील हे कधीच त्याच्या गावीही नव्हतं. कापलेल्या पतंगासारखा तो कुठंतरी भरकटायचा. निदान लग्न झाल्यावर तरी त्याच्या वागण्यात सुधारणा व्हायला हवी होती, जबाबदारीची जाणिव यायला हवी होती पण तसं काहीच घडलं नव्हतं.

तो कितीतरी वेळा असाच अचानक, न सांगता-सवरता कुठंतरी गेला होता आणि कधी दोन-चार दिवसांनी, कधी आठ-दहा दिवसांनी आला होता. एकदा तर चक्क महिन्याभराने आपला आपण परत आला होता. तिने प्रत्येकवेळी त्याला सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला होता. तो ही समजून घ्यायचा, ‘चूक झाली..’ असे म्हणायचा. ‘ पुन्हा कधी असे जाणार नाही..’ असे आश्वासन द्यायचा.. पण ते तेवढ्यापुरतंच असायचं.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षा….. भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षा….. भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

(आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला.) इथून पुढे —- 

सीमा बाहेर जाण्यासाठी तयार व्हायला गेली आहे हे बघून सुषमानं विचारलं,

” काकू, तुम्ही सीमाचं लग्न करणार नाही वाटतं?”

या अनपेक्षीत प्रश्नानं  आई  गोंधळून गेली. 

“का ग, तुझं ठरलंय वाटतं.” 

“हो तर. . . 

मग ती किल्ली दिल्यासारखी बोलायला लागली. . . .  स्वतः चं लग्न ठरलं हे सांगण्याची ही कुठली अनोखी पद्धत!! कदाचित संकोच वाटला असेल. . . . पण हे काहीतरी भलतंच. . . आपल्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीला तिनं ही गोड बातमी सांगू नये याचं आईला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. एक विषाद दोघींच्या मनात भरून राहिला.

दिवस थांबत नाहीत. सीमाचं ही लग्न झालं. पाठची  भावंडं, आई-वडील, मध्यम वर्गीय परिस्थिती हा सगळा विचार करून सीमा नोकरी, मुलं, सासू सासरे, यात  गुरफटत गेली. नोकरीत वरिष्ठ पदावर गेली. लाघवी स्वभावामुळं माईंची; सासुबाईंची, मदत मिळवली. सासऱ्यांची कौतुकाची थाप होतीच. सुधीरचं प्रेम साथीला होतंच. पण . . एक सल रुतत होता, सतत टोचत होता.अशातच एक दिवस आईचा फोन आला. तिला रमाकाकूंकडून समजलं होतं. सुषमा कोल्हापुरात परत आली होती. विजयची सरकारी नोकरी. तो चांगला एवन ऑफिसर होता. त्याची तीन चार वर्षांनी बदली होत असे. सुषमाला वाटे एकाच गावात राहिलो तर आपली चांगली करिअर होईल. तिनं विजय बरोबर बदलीच्या गावी जाण्यास नकार दिला. पियूला, लेकीला घेऊन ती परत आली. एका खाजगी शाळेत काम करु लागली.

सीमा धावतच गेली सुषमाला भेटायला. रमाकाकू काळजीत होत्या.

 “सीमा, बाई, तू समजाव ग तिला. बघ तुझं तरी ऐकते का. सोन्यासारखा संसार करायचा सोडून कसलं हे करिअरचं खुळ डोक्यात धरलंय.”

 छे ! ऐकेल तर सुषमा कसली ! तिच्या उत्तरानं उलट सीमा मोडून गेली. 

“तुला मुळी महत्त्वाकांक्षाच नाही.” या वाक्यानं आपली मैत्रीण हरवल्याची खंत घेऊन सीमा तिथून बाहेर पडली होती. पुढं सीमा कधीच विजय सोबत राहिली नाही. तोच बिचारा अधेमधे येत असे रजा काढून. दोन दिवस राहून पियूला भेटून जात असे. नंतर नंतर पियू आजीकडं म्हणजे रमाकाकूंकडंच राहू लागली. आपल्या मामीत आईला शोधू लागली. सुषमाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र पियूनं पूर्ण केलं. चांगले मार्क्स मिळवून तिनं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.

रमाकाकूंच्या घरी पोहचेपर्यंत सीमाच्या डोळ्यासमोरून हा सगळा जीवनपट तरंगत गेला. 

काकू तिची वाटच बघत असाव्यात. सीमाला बघताच त्यांनी डोळ्याला पदर लावला.

“काय झालं काकू? असा त्रास कशाला करुन घेताय?”

“मग काय करु? तूच सांग. ही मूर्ख मुलगी, स्वतः च्या हातानंच धोंडा पाडून घेतला बघ या बयेनं.”

“काकू, सुषा कुठंय?”

“जाऊ दे, जाऊ दे तिला कुठंतरी.” 

“मला समजलं नाही काकू. असं झालंय तरी काय?”

“अगं विजयराव येऊन गेले परवा. राहिले होते आठवडाभर. हिला म्हणत होते, चल आता, सगळे मिळून राहू. काही दिवसांनी पियूचं लग्न होईल. चल ग माझ्याबरोबर.”

“मग? काय म्हणाली सुषमा?”, उत्तर माहिती असूनही सीमानं विचारलं.

“कुठलं काय. ही काही ऐकत नाही जावईबापूंचं.”

“पियूनं नाही का समजावलं?”

“नाही कसं. तिलाही वाटतच ना गं ,आपण आपल्या आईबाबांबरोबर आपल्या घरात राहावं.”

“पियूसाठीसुध्दा तयार नाही झाली ती?”

“कसलं काय. शेवटी कडाक्याचं भांडण झालं दोघांत.”

“भांडण? बापरे!”

पियूनं तर निक्षून सांगितलं तिला, ‘आई तू नाही आलीस तरी मी आपल्या घरीच जाणार.’

” आता तरी ऐकेल म्हणावं तर ते ही नाही.”

पियूच्या अल्टिमेटमला बधली नाही ही. सीमा विचार करत होती.

” काकू आहे कुठय ती? बाहेर गेलीय का?”

“कायमची बाहेर गेली म्हण.”

“काय?”

“अग मी मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी सुध्दा भांडली बघ. मला म्हणाली,

‘एवढी जड झाले असेन तुम्हाला तर वेगळं घर करून राहीन मी एकटीच.’

मी गप्पच बसले मग.

दोन दिवसांनी खरंच सगळं सामान घेऊन गेली. कुठंतरी गगनगंगा अपार्टमेंट आहे बाराव्या गल्लीत, तिथं फ्लॅट घेतलाय म्हणे. . . ”  थोडं थांबून त्या म्हणाल्या, ” पियू गळ्यात पडून रड रड रडली आणि गेली तिच्या बाबांच्या बरोबर.”

सुन्न होऊन सीमा काकूंकडं बघत बसली. 

‘ तुला मुळी कसली महत्त्वाकांक्षाच नाही ‘,असं म्हणणारी सुषमा ! हुषारी, जिद्द याबरोबरच थोडासा विवेक किती गरजेचा आहे. स्वातंत्र्य मिळवून सुखी झाली– की आनंद गमावून दु:खी झाली? आपल्याला सापडलेलं समाधान तिच्यावर एवढं का बरं रुसलं?–

फुलेवाडीच्या बसमध्ये बसून घरी परतताना सीमा अस्वस्थ होती—– 

समाप्त.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print