श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ देवदासी लक्ष्मीपूजन …भाग 1☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या वादविवाद स्पर्धेत त्याला मी पहिल्यांदा बघितले आणि मी बघतच राहिले. त्याच्या दिसण्याने नाही तर त्याच्या बोलण्यावर मी भाळली होते. त्या स्पर्धेत त्याच्या हुशारीची चमक, त्याच्या विचारांची झेप तर दिसलीच पण जास्त जाणवले तो त्याचा शांत आणि विनम्र स्वभाव. त्या वर्षी स्पर्धेचे पहिले पारितोषिक त्यानेच मिळवले आणि माझ्यातल्या वेडीने ठरविले, नाही त्याची आजच ओळख करून घ्यायची आणि माझी पावले आपोआप त्याच्याकडे वळली.
” हाय…. मी…..सखी… “.
” हाय , मी अजय. “
” अभिनंदन…. छान मुद्दे मांडलेस.. तू… म्हणजे तुम्ही.”
त्याने माझा गोंधळ ओळखला होता. त्याने हसूनच आभार मानले आणि अजून काही बोलायच्या आत त्याला त्याच्या मित्रांनी बोलावले आणि तो गेला. मी हिरमुसले पण थोड्याच वेळेसाठी कारण त्याने माझ्याशी अजून काही बोलण्याएवढी आमची ओळख नव्हती. तो पूर्ण दिवस माझ्या मनात तोच घुटमळत होता. मला जाणवले मी त्याच्या प्रेमात पडले होते. हो खरंच, चक्क मी त्याच्या प्रेमात पडले होते पण त्यामुळेच मी घाबरली. मला प्रेमात पडायचा अधिकार आहे का ? आपल्या समाज व्यवस्थेमध्ये मला सामील करून घेतले जाईल का ? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात नुसते उभे राहिले नाही तर त्या प्रश्नांनी माझ्या डोक्यात थैमान घातले.
दुसऱ्या दिवशी मी भानावर आली कारण माझ्या अस्तित्वाची मला जाणीव झाली. मी एक देवदासी घराण्यातली मुलगी आणि माझी आई देवदासी होती. तिलाच मला त्या दलदलीतून बाहेर काढायचे होते म्हणून तिच्याच सांगण्यावरून मला मुंबईला शिक्षणासाठी पाठविले गेले. कला विभागातली पदवी घेऊन मी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मला माझ्या त्या अस्तित्वापासून लांब पळायचे नव्हते तर त्या माझ्या ओळखीनुसार स्विकारणार जोडीदार मला पाहिजे होता आणि तो …. अजय भेटला. त्याची माझी अजून ओळख नसली तरी मला तो मनोमनी खूप आवडला होता. मी एकतर्फी त्याच्या प्रेमात पडली होते. वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने ‘सामाजिक रूढी आणि बदल’ ह्या विषयावर त्यांनी मांडलेले त्याचे उच्च विचार मी ऐकले असल्याने त्याच्या कडून मी देवदासी घराण्याची असल्यामुळे विरोध होईल असे वाटत नव्हते.
काहीही झाले तरी अजयशी दोस्ती वाढवायची मी ठरविले आणि त्याचा बहुतांश वेळ हा लायब्ररीत जातो हे समजल्याने मी ही लायब्ररीत जायला लागली. एका महिन्यातच आमची व्यवस्थित नाव लक्षात राहण्याएवढी ओळख झाली. ती ओळख दुसऱ्याच महिन्यांत कॉलेजच्या कँटीन मध्ये बसून कॉफी पिण्यापर्यंत पोहचली. त्याच्या स्वभावानुसार त्याचे बोलणे कमी होते. दोन महिन्यांच्या आमच्या ओळखीत त्याने एकदाही मला माझ्या घरच्यांबद्दल कधी विचारले नाही आणि त्याने त्याच्याही घरचा विषय काढला नाही. माझ्या एकतर्फी प्रेमात मी हळूहळू सावधतेने एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्याकडून तसे काहीच दिसत नव्हते. खरं सांगायचे झाले तर त्याच्या मनाचा अंदाज घेता येत नव्हता. त्याला माझ्या देवदासी घराण्याची माहिती असेल म्हणून तो प्रेमाच्या दिशेने पुढे पाऊल टाकत नसेल अशी मला शंकाही आली पण हे सगळे माझे मनाचे खेळ चालले होते. जसजसे दिवस जात होते तसतसे मला ह्या विचारांचा त्रास व्हायला लागला आणि मी एक दिवस ठरविले येत्या दिवाळीच्या आधी त्याला सगळे खरे सांगून प्रपोज करायचे.
कॉलेज कँटीनच्या आमच्या नेहमीच्या टेबलावर आम्ही बसलो होतो. तो एका कोणा ‘सिटाव्वा जोडट्टी’ ह्या देवदासी बाईला पदमश्री अवार्ड मिळाल्या बद्दलची माहिती मला सांगत होता. पूर्वी त्याने वसंत राजस ह्यांनी लिहिलेले ‘देवदासी शोध आणि बोध’ हे पुस्तक वाचल्याचे ही मला सांगितले आणि तोच धागा पकडून मी त्याच्याकडे माझ्या प्रेमाचा विषय काढायचे ठरविले.
क्रमशः….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈