श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
गाडी पार्क करून निघालो तो नेहमीप्रमाणे तुकाराम शिपाई ब्याग घ्यायला धावत आला, त्याला ब्याग देऊन चेंबर मध्ये खुर्चीवर स्थानापन्न होऊन समोरील फाईल्स चाळतो तो तुकाराम वर्दी द्यायला आला, सर… कुणी. नामदेव शेरकि नावाचे पालक भेटू इच्छितात पाठवू का आत.
फायलीतून नजर उंचावून मी केबिन च्या काचातून बेंचावर बसलेल्या त्या पालकांकडे नजर फिरविली त्याच्यासोबत एक स्त्री बसली होती वयावरून ती त्याची मुलगी असावी याचा मी अंदाज बांधला. डोक्याला तान देऊन त्याव्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो, कधीतरी त्याला भेटलो असल्याचे जाणवत होते पण ओळख पटत नव्हती….. सर पाठवू का आत तुकाराम च्या आवाजाने मी भानावर आलो. टेबलावरची बेल वाजवुन मी क्लार्क ला बोलावून घेतले व त्या पालकाचे काही कार्यालयीन काम असेल तर करून देण्याचे सांगितले.
थोड्या वेळाने क्लार्क परत आला म्हणाला सर ते तुम्हालाच भेटायचं म्हणतात. काय समस्या असेल बुवा…..थोड्याशा नाखुशिनेच मी पाठवून दे अशी मानेनेच खुण केली. येवू का आत सर…. या आवाजाने मी नजर वर केली एक पन्नाशीच्या वयातील गृहस्थ समोर उभा होता. मळलेला पांढरट पायजामा बंगाली खांद्यावर दुपट्टा बोटबोट दाडी वाढलेली उन्हात काम केल्याने रापलेला चेहरा. प्रयत्न करूनही ओळख पटेना. सोबत असलेल्या मुलीकडे नजर टाकली चेहरा ओळखीचा वाटला पण साडी घालण्याची सवय नसावी हे तिच्या साडी घालण्याच्या पद्धतीवरून दिसून येत होते. मी मानेनेच या अशी खुण केली. आत येताच त्या दोघांनी माझे पाय केंव्हा पकडले कळलच नाही अरे…. अरे…. हे काय लावले, पाया कशाला पडता. म्हणत मी उठून उभा राहिलो. सर तुम्ही मला ओळखले नाही, ती मुलगी म्हणाली सर मी बेलसनी गावची सुषमा, सुषमा शेरकी सर. एका डोळ्याने आंधळी सुषमा सर. आणि आता चकित होण्याची पाळी माझी होती. अरे शूषमा म्हणत मी तिला उचलून उभे केले आता ती माझ्या छातीवर डोके टेकवून रडायला लागली मी तिला शांत हो ग. असा धीर देत तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत खुर्चीवर बसण्याचा संकेत केला.तिचे वडील भाऊक होऊन पाहत होते त्यांनाही बसायला सांगितले.सुषमा सावरून बोलायला लागली.सर हे अश्रू आनंदाचे होते. सर मी शिक्षिका झाले,माझ्या पायावर उभी झाले.तुमचे स्वप्न पूर्ण केले. तिच्या डोळ्यातून दोन आसवे पुन्हा चमकली. आता मी विचारमग्न झालो आणि सुषमा चा भूतकाळ. डोळ्यासमोरून सरकू लागला…….. जवळपास पाच वर्ष झालीत. त्यावेळेस मी प्राध्यापक होतो तीन दिवसापासून वर्गात मागे बसलेल्या मुलीचे लेक्चर मध्ये लक्ष नसल्याचे जाणवत होते.चवथ्या दिवशी मी तिच्याजवळ जाऊन विचारले,ती काही बोलत नव्हती,काही नाही सर म्हणून अबोल झाली,मी सुध्धा अधिक ताणले नाही. दुपारी अचानक ती तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन स्टाफ रूम मध्ये माझ्या समोर येऊन उभी झाली, मी प्रश्नार्थक नजरेने दोघींकडे पाहिले, सुषमाचा एक डोळा पूर्ण पांढरा होता हे मला पहिल्यांदाच दिसले. तिच्या चासम्यामुळे कधी जानवलेच नाही. आता तिची तिची मैत्रीण बोलू लागली. सर हीचा प्रॉब्लेम आहे, मी नजरेनेच काय म्हणून विचारले. आता सुषमा बोलू लागली, सर माझे वडील शिक्षण सोडण्यासाठी मागे लागले आहे,रोज घरी यासाठी भांडण होत आहे.उद्यापासून कॉलेजला जाशील तर कुलूप लावून बंद करून ठेवीन, असा वडिलांनी दंम दिला आहे सर मला शिकायचे आहे पायावर उभे व्हायचे आहे. काय करू सर. ती रडायला लागली. तिला समजावून मी धीर देत सांगितले मी तुझ्या वडिलांशी बोलतो, संध्याकाळी मी तुझ्या वडिलांना भेटायला येतो गावाला,चिंता करू नको. दोघीही मान हलवून परत वर्गात गेल्या.
क्रमशः भाग-2….
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈