मराठी साहित्य – विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मला लग्न जमवायची आवड बरीचशी नात्यांतली लग्न मी जमवली.

मी आणि ती जोडपी पण यशस्वी झाली.आनंदी सुखी समाधानाने नांदतात. हे मैत्रिणीकडून कळल्यावर मीराताई त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो, जुजबी माहिती घेऊन माझ्याकडे आल्या

म्हणाल्या, “आमच्या मधुरासाठीं चांगलेसे स्थळ सांग बाई. माझी लाडांत वाढलेली लेक, करियरवाली, हुशार आहे थोडी गहुवर्णी आहे. पण स्मार्ट आहे. उंचीला कमी आहे पण बुटक्यातली नाही. हिल्स घालून काय चालते ती टकाटक. आमच्या फार काही अपेक्षा नाहीत. पण तिला अनुरुप, हुशार, तिच्यापेक्षा जास्त शिकलेला. जास्त मिळकत असलेला. ह्या तर किमान सगळ्याच मुलींच्या अपेक्षा असतात. पण मुख्य म्हणजे त्याचा स्वतःचा मोठा फ्लॅट पाहिजे. घरी माणसांचा त्यातून वयस्कर माणसांचा फाफट पसारा नको. सासू सासरे असतील तर चालतील. पण कसे दुसरीकडे रहाणारे असले तर बरे म्हणजे वेळा काळाला एकमेकांना उपयोग होतो हो. पुढे बाळंतपण, लहान मुलांच्या कुरबुरी, आजारपण हल्लीच्या आईवडिलांना कुठे जमतयं त्यांच्या नोकरीधंद्यात. शिवाय नातंवंडावर प्रेमं, संस्कार आजीआजोबाच चांगले करतात. पुन्हा दोन्ही पिढ्या वेगळ्या रहात असल्या की बरं. बरं आपापल्या घरी आनंदात रहातील. एकमेकांना बंधन नाही. भांड्याला भांडं नको लागायला. असं आपलं मला वाटतं.

माझ्या मधुरेनी साडी कधीच नेसली नाही आणि नेसणार पण नाही म्हणते जीन्स आणि टॉप कसे सोईस्कर वाटतात. तशाच मॉड विचाराची माणसं पाहिजेत बाई. मग वाद नकोत. तसेच तिला रोजच्या स्वयंपाक बनवण्याची आवड नाही. आणि येत पण नाही. कारण आमच्याकडे स्वयंपाकाच्या काकू आज किती वर्ष तरी आहेत. त्यामुळे हिच्यावर कधी वेळच आली नाही. आता सासरी हल्ली काय सगळ्याकडेचं नोकरचाकर असतात. आणि हल्ली मुलांना काय ग पिझ्झा, बर्गर झिंदाबाद. मधुराचे डीटेल्स तुला सांगितले. अनुरुप असाच मुलगा बघ बाई माझ्या मधुरासाठी”.

“बरं तिचा फोटो, डिटेल्स मला व्हाट्सेप वर फॉरवर्ड करा. मी बघते.” मी म्हटलं

“बरं आता दुसरं म्हणजे माझ्या मानस साठी पण एक चांगलीशी मुलगी बघ. तिच्याबद्दल पण आमच्या काही फार अपेक्षा नाहीत. अगदी चार चौघांसारख्या माफक.

माझा मानस तू बघितला आहेस. हँण्डसम, शिकलेला, नम्र. तशीच सुंदर, शिकलेली, मनमिळाऊ, समजूती, स्मार्ट मुलगी त्याला बायको आणि आम्हाला सून म्हणून हवी.

आम्हाला माणसांची आवड आमच्याकडे माणसांचं येणंजाणं, असते. त्यांचं हसतमुखानं स्वागत, त्यांची उठबस करणारी पाहिजे. बरं माझ्या सासूबाई आता 80 वर्षाच्या आहेत. घरांत त्यांच्यासमोर तरी ती साडीत वावरली पाहिजे. बाहेर मानसबरोबर फिरताना काहीही घालू दे. माझं काहीही बंधन नाही. सासूबाईंच सोवळंओवळं कडक आतापर्यंत मी सांभाळले. पण आता बाई माझ्याच्यानं झेपत नाही. माझी सून आली म्हणजे कसं मी सुटले. ती हाताळेल ना सासूबाई प्रकरण. आणि त्याचं सोवळ॔ओवळं. हो आणि एक, अगदी सुगरण नसली तरी चालेल. पण रोजचा स्वयंपाक कधी, सणावारी गोडधोड करायला तिला आलं पाहिजे. ह्यांना,  मानसला स्वयंपाकीण काकूंच्या हातचं आवडत नाही. दोघेही ते खाऊन खाऊन  कंटाळले.सूनबाई आल्यावर कसं ती करेलच की शिवाय काकू हाताखाली आहेतच ग.मग काय मुख्य स्वयंपाकाला कितीशी मेहनत आणि वेळ लागतो. कधी संकष्टीला मोदक तर सणावाराला कधी पुरणपोळी. रविवारी चिकन किंवा चिंबो-या केल्या म्हणजे झालं. आता बाबा माझा किचनला रामराम.

तर अशी दोन माणसं जावई आणि सून मनासारखी मिळवून द्यायची जबाबदारी तुझी.

पाहिलंत ना. हे चित्र आणि ते चित्र.

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

डोक्यावर पदर,मोठं रुपयाएव्हढ कुंकू, झळझळीत दागिने असं एकूण ‘आमदार सौभाग्यवती’छाप व्यक्तिमत्व.ओळखपरेड पुढे चालुच होती.सरांचं अख्खं कुटुंब शाळेशी अगदीं एकरूप झालेलं.शाळा ही मुख्याध्यापकांच्या आयुष्यात कशी मुरवता येते याचे धडे सरांच्या बोलण्यातून मला मिळत होते खरे, पण मी तर पुरस्काराच्या ‘प्रयत्ना’साठी आले होते.मी घाईघाईने म्हणाले, “मला ती कागदपत्रं दाखवताय ना सर?”

“हो. या. हिथच आहेत कपाटं. तीन आहेत बघा.” गोदरेजच्या तीन कपाटांकडे बोट दाखवत सर म्हणाले.

“बापरे! इतकी कागदपत्रं?” मी आश्चर्यचकित.

“तर हो. हे जिल्हा, हे राज्य नि तिसरं राष्ट्रीय साठी. आता ते सुद्धा भरेल” सरांनी जिल्हा पुरस्काराचं लाल कपाट उघडलं. “हा मँडम, घ्या फायली बाहेर.”

“बापरे! इतक्या जाडजूड फायली?” मी त्या काढताना थक्क झाले म्हणजे थकले. “अहो, त्यात घटनांचे पुरावे आहेत. म्हणजे पंधरा नंबरची माहिती, त्याचा फोटो पंधरा नंबरला. पुरावा पायजेल की. फायली नीट लावलेल्या होत्या. त्यावर विषयांची नांव होती. एकूण  सोळा विषय होते.”

“सर, तुमच्या कार्याचा अफाट सागर पुढे पसरलेला, माझ्या कार्याचा झरा सुद्धा नाही. कशाला मी नसती आशा धरू! हे चाळायला सुद्धा आठ दिवस लागतील. मी फक्त खात्यांची नांव लिहून घेऊ शकेन.”

“काय असतं कार्याचा पसारा आपणच वाढवायचा. कार्य मूठभर, पसारा हातभर. एखादी फाईल उघडून बघा. एव्हढ्या आलायसा, तर चिकाटी पायजे.”

मी काव्यलेखनाची फाईल उघडली. अल्बम मध्ये साताठ लग्नांचे फोटो होते. सर कोटबिट घालून हसऱ्या चेहऱ्याने वधुवरांना आशिर्वाद देत होते.

“सर, ही लग्न शाळेतल्या अनाथ मुलींची वगैरे —”

“त्या नंबरची  फाईल बघा.”

मी पाहिलं तर तिथे काव्याक्षतांची छापील प्रत डेकोरेशन करून लावलेली.

कवी–शी.आर. ढेकळे. पुढे लांबलचक अनाकलनीय पदवी.”मंगलाष्टकं लिहितो.

गावात कुणाचं लग्नं ठरलं की नावांच्या याद्या घेऊन माणसं येतात. मग चालीवरच मंगलाष्टकं रचतो. काव्य तेच, नांवं बदलायची. सरस्वती प्रसन्न आहे. लग्न अटेंड करायचं मग फोटो नि काव्य. फायली तुडुंब भरतात. प्रयत्नांती परमेश्वर.”

मी पुढची पानं पलटत गेले. आसपासच्या नेतेमंडळींचे वाढदिवस, ‘जीवेत् शरदाः शतम्’ नि खाली त्यांच्या अफाट कार्याबद्दलची, शुभेच्छांची शब्दाला शब्द जोडून केलेली काव्य. कवी–शी.आर्. ढेकळे सर. त्या नंबर च्या अल्बममध्ये त्या I नेत्याबरोबरचा सरांचा नतमस्तक फोटो. एकूण सरांच्या काव्यलेखनाचा पसारा माझ्या लक्षात  आला.

मग पुढची ‘देशसेवा’ ही फाईल उघडली. त्यात ध्वजारोहण, एन.सी.सी. कँप्स. मुलांना समुहगीतांच्या स्पर्धाना पाठविण्याचे फोटो, त्याच्या बातम्या, आणि अनेक देशभक्तीपर सुभाषितं— ‘जिंकू किंवा मरू’, ‘सदैव सैनिका, ‘यशवंत व्हा, खचू नका, मुलं सैनिकांच्या वेशात, त्यांच्या बरोबर सर, भिंतीवर मोठा भारताचा नकाशा —- फोटो आणि बातमी. “ही सगळी आमच्या ड्राईंग टीचरची किमया बरका.” असं म्हणत सरानी आणखी एक फाईल उचलली. ती व्रुक्षारोपणाची होती. तो सोहळा आल्या आल्या पाहिलाच होता. शाळेसमोर बरीच झाडं,  त्यांचा वरचा संभार सरांच्या बंगल्यासमोर आलेला. मुलांची समाजसेवा, शिपायांची पगारी सेवा, शाळेचं कचरा खत, मुलांचं डबे धुतलेलं पाणी त्यामुळे झाडं भराला आली होती. तिथे गीतेतला संदेश मराठीत लिहिलेला मुलांसाठी. “कर्म करीत रहा, फळांची आशा धरू नका” ही फाईल हिरव्यागार चित्रानी सजवलेली .

क्रमशः ……

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

 

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“अलीकडे रात्री बराच वेळ झोप लागत नाही.वेड्यासारखे विचार मनात येतात. वाटतं की काळ पंधरा वीस वर्षांनी मागे जावा.किती छान स्थळं येत होती तेव्हा मानसीसाठी. हुशार, स्मार्ट, पाच आकडी पगार घेणारी एकुलती एक लाडकी लेक आमची. काहीतरी निमित्त काढून चांगली चांगली स्थळं तेव्हा नाकारली मानसीने. ठाण्याचा  एक मुलगा तर अगदी परफेक्ट मॅच होता मानसीला.  पण ‘त्याची माझी उंची जवळजवळ सारखीच आहे’ असलं खुसपट काढून मानसीने त्यालासुद्धा नाकारलं. यांनी किती समजूत काढली होती तिची.त्यावेळी  मानसीची बाजू घेण्याचा मूर्खपणा मी केला नसता तर……” उषाच्या मनातली खदखद बाहेर पडत होती.

उषाच्या हातावर हलकेच थोपटल्यासारखं करीत नलू म्हणाली  ” जॉर्जबद्दल तर तुला माहितेय.  चंदाच्याच ऑफिसमधला हुशार, सालस मुलगा. केवळ दुसर्‍या धर्माचा म्हणून यांनी टोकाचा विरोध केला. तो लग्न करून, अमेरिकेला जाऊन चांगला सेटल झाला. आणि ‘आता मला लग्नच करायचं नाही’ म्हणून चंदा हट्ट धरून बसलीय.”

“आजचा जमाना असता ना तर आधी लग्न करून नंतर त्यांनी तुम्हाला कळवलं असतं.”

“ते परवडलं असतं. हे गेल्यानंतर कधी नाही इतकं एकटं  वाटतं आताशा”. नलू खिन्न होऊन  म्हणाली.

“मला तर हल्ली जवळच्या नात्यात सुद्धा कुठल्या कार्याला जावसं वाटत नाही. तिकडे आडवळणाने गाडी शेवटी मानसीच्या लग्नावर  येते.”

“परवा मुंजीला  गेले होते, तेव्हा ओळखीच्या  एका बाईंनी चंदा साठी घटस्फोटित स्थळ सुचवलं. धीर करून घरी बोलले मात्र, चंदा एखाद्या वाघिणीसारखी चवताळली. तिने घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायला जाते म्हणाली.”

“अगबाई,मग? अरुणाने समजुत काढली का तिची?”

“काढणारच. सगळ्याच स्वार्थी आणि मतलबी झाल्येत आजकाल. चंदा सढळपणे घरात खर्च करते. मग तिची मर्जी सांभाळत अरुणा सगळं तिच्या हातात आयतं देते. ‘आत्या आत्या’ करत मुलं चंदाकडून हॉटेलिंग, उंची कपडे, गेम्स वसूल करतात. शिवाय चंदा तिच्या भाड्याने दिलेल्या फ्लॅटचं उत्पन्न थोडंच  सोडणारेय? कधी लाडीगोडी लावून अरूणा  मुलांना चंदाच्या खोलीत झोपायला लावते. राजा-राणीचं  दार लागलं की मलाच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतं.” नलूने मनातली खंत  व्यक्त केली.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

“रिटायरमेंट तीन वर्षांवर आली. ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते’ अशी पदवी घेऊनच निव्रुत्त व्हायचं बघा. त्याचंबी लई फायदे असतात बरका. चाललीय खटपट.”

“खटपट?म्हणजे?”

“घ्या. तुम्हाला ठाऊक नाही?”

“म्हणजे  अर्ज करायचा, कागदपत्र सादर करायची हे माहितीय की.”

“तुम्ही नाही केला प्रयत्न?”

“नाही हो. हेडसरांची शिफारस लागते ना. ते देतील अशी खात्री नव्हती. कुठे नाकदुऱ्या काढायच्या! कधी वळलेच नाही तिकडे. विचारच नाही केला.”

“बाई, पुरस्कार मिळवायचा म्हणजे आधी सगळ्यांशी गोड रहावं लागतय्. पण आता जाऊदे मागचं. आता तर तुम्हीच हेड. कुणाची ‘ब्र’काढायची हिंमत न्हाई. मात्र तुम्हाला  संस्थेच्या सेक्रेटरींची नाही तर अध्यक्षांची शिफारस लागणार.”

“बापरे! म्हणजे आणखी अवघड.”

“तुमचा सही, शिक्का बगितला की लगेच सह्या ठोकतात. शिफारस क्लार्ककडून लिहून घ्या. त्यांना पाठ असते. आता सहा म्हयन्यांत ग्रँट सुटेल. चेक घेऊनच सेक्रेटरींकडे जावा. मग आनंदात गप सह्या ठोकत्यात.”

“कागदपत्रं म्हणजे आपण शाळेसाठी, मुलांसाठी काय काय केलं कोणते उपक्रम राबवले वगैरे ना?” मी विचारलं. मला तेव्हढच माहिती ना!

“ते मात्र इतकं सोपं न्हाई बरका मँडम. इतक्या थोड्या वेळात ते कसं सांगणार?

तुम्ही असं करताय का? आमच्या घरीच या एकदा. माझी कागदं तुम्हाला समक्षच दाखवतो. तुम्ही पहिल्याने जिल्हा पुरस्कारासाठी प्रयत्न करा. मग एकेक पायरी चढायची. रिटायर्ड व्हायला सहा सात वर्ष आहेत ना? तेव्हढ्यात सगळं उरकावंप लागेल. आत्ता पासून कामाला लागा.”

ढेकळे सर निरागसपणे म्हणाले. तेच मला गमतीशीर वाटत होत. पुरस्कारासाठी आपण प्रयत्न केले हे निःसंकोचपणे सांगत होते. उगीच आपलं मला माहीतच नव्हतं असा मानभावीपणा नव्हता.

आणि खोटं कशाला बोलू, माझ्याही मनात पुरस्कार चकचकायला लागला होता. अरे, आजपर्यंतच्या नोकरीत मी मुलांसाठी काय काय केलं होतं. रिझल्ट साठी कष्ट घेतले, गरीब, कच्च्या, अपंग मुलांसाठी झटले, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलांचे कार्यक्रम केले, बालसाहित्य लिहिलं, नाटकं बसवली, त्यातून शाळेसाठी निधी जमवला, एव्हढं काम केल्यावर कमीतकमी जिल्हा पुरस्कार मिळायला हरकत नव्हती ना? आता मुख्याध्यापक म्हणून आणखी काम, मग राज्यपुरस्कार. निव्रुत्तीपर्यंत एव्हढे सोपान चढता येतील. शिक्षकांच्या जीवनात पुरस्कार म्हणजे मानाचं पान. हवेत तरंगल्यासारखं झालं. ढेकळे सरांकडे जाऊन कागदपत्र बघण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. एक दिवस निवांतपणे गेलेच त्यांच्या घरी.

“या, या,”म्हणून सर्वांनी माझं स्वागत केलं. एक शहरातल्या बाई आपल्याकडे मार्गदर्शनासाठी येतात ह्याचं सरांना अप्रूप वाटत होतं. ‘पुरस्कारासाठी प्रयत्न’ यातला विनोद, खोच, खंत  असं त्यांच्या निष्पाप स्वार्थी मनाला काही वाटत नव्हतं.

शाळेच्या डोक्यावरच त्यांचा बंगला म्हणजे बंगल्याच्या तळघरातच शाळा. गेल्यावर बाल्कनी कम् शाळेचं ऑफीस. सर म्हणाले, “हे माझे सासरे कम् संस्थेचे अध्यक्ष आणि ह्या संस्थेच्या कार्यवाह कम् माझ्या सुविद्य पत्नी.”

क्रमशः ……

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हुशारी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ हुशारी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा:   विषयाचे बंधन / वयाची अट नाही.

—-ही ठळक जाहिरात वाचली आणि मन एकदम शाळेत पोहोचलं. निबंधाचा  प्रश्न मराठीच्या पेपरात हमखास पहिला असायचा, आणि हमखासच तो शेवटी लिहिण्यासाठी ठेवला जायचा.   फार कष्ट घ्यावे लागायचे ना त्यासाठी  आणि तो पूर्ण होणारच  नाही,  या बेतानेच वेळ साधण्याची हुशारी केव्हाच जमलेली होती. कारण मजकूर सुचायचाच नाही.  मग लो. टिळकांवरचा निबंध, “त्यांचा मृत्यू १९२० साली झाला” या वाक्याने सुरु व्हायचा  कारण त्यांच्याबद्दल वाचलेलं ते  शेवटचं वाक्य असायचं.  अर्थात ‘निबंध पूर्ण का झाला नाही’ या  प्रश्नाला, ‘बाकीचे सगळे प्रश्न अगदी  व्यवस्थित लिहीत बसलो,  म्हणून पुरेसा वेळ उरला नाही’  हे उत्तर देतांना  हुशारी पुन्हा उफाळून आल्याचा आनंद व्हायचा.

“युरेका”…. स्पर्धेसाठी विषय सापडला … “हुशारीचे नाना प्रकार”. लगेच दीडशे रुपये भरून नाव नोंदवलही.

दहा दिवसांची मुदत होती.  पण पूर्वानुभवावरून शहाणं होत, लगेच लिहायला बसले.. {हेही  हुशारीचे लक्षण}.  सवयीने हातात मोबाईल होताच.  लगेच गुगलकाकांना पाचारण केलं,  कारण सगळी भिस्त त्यांच्यावरच तर होती.  टाईप केलं–“हुशारीचे प्रकार”–पण १०-१५ वेळा पापणी लवली तरी स्क्रीन कोराच. -मग “प्रकार हुशारीचे”, “हुशारीचे विविध प्रकार”, “वेगवेगळ्या प्रकारची हुशारी” — असं  काय काय टाईप केलं,  तरी तेच.  इतकं गुगलून बघताबघता  उत्साहही कमी होतोय अशी शंका वाटायला लागली.  पण प्रश्न दीडशे रुपयांचा होता हो. —

“गुगलून बघण्यात”?– अरेच्चा– हा शब्द गुगलकाकांचा नक्कीच नाही.  असे आगळे-वेगळे वाक्प्रचार रूढ करणं ही तर जन्मजात भाषाप्रभूंच्या हुशारीची कमाल —

“पुन्हा  हुशारी”? —  अचानक माझ्या अंगभूत {?} हुशारीला कोंब फुटायला लागले की काय … मी एकदम सरसावले —-“हुशारीचे नाना प्रकार” ——–

‘अभ्यासातली हुशारी ‘  हा जगन्मान्य पहिला प्रकार.   ज्ञानाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असावाच लागतो, असे मुळीच नाही. पण याबद्दल इथे न लिहिणेच उत्तम.  हुशारीचा याहून सरस प्रकार म्हणजे,  खूप मन लावून अभ्यास करत असल्याचा  बनाव  रचण्यातली हुशारी—म्हणजे रात्री जागणे— {थर्मासात भरून ठेवलेला चहा संपेपर्यंत,  किंवा बाकी सगळे गाढ झोपल्याची खात्री पटेपर्यंत-}—तरीही पहाटे लवकर उठून, कौतुक करून घेणे इ.इ.  यात “ मन नक्की कुठे लागलं होतं” हा प्रश्न निरागस पालकांना  पडतच नाही.  अपेक्षित मार्क मिळाले नाहीत, की “ सर  कशी पार्शालिटी करतात ”  हे पटवून देण्याची हुशारीही असतेच…पण हा वापरून गुळगुळीत  झालेला प्रकार.

याहून परिणामकारक प्रकार,  दुसऱ्यांच्या वस्तूंवर डल्ला मारतांना वापरण्याचा  —- भुरटी चोरी, पाकीटमारी, किंवा  थेट दरोडा–. या कानाचे त्या कानाला कळू न देता चोरी  करायला  शिकवणारी हुशारी– डोळे मिटून दूध पिणारी— पण हा प्रकार फशी पाडणारा.

भीक मागायला  हुशारी कशाला ?  असा समज तर साफ चुकीचा आहे.  स्वतःला लुळापांगळा  दाखवायचं, की आंधळा, हे ठरवणं अक्कल हुशारीचं काम.  सोंग बेमालूम जमावं लागतं.  हिंदी चित्रपटात याची बरीच प्रॅक्टिकल्स शिकवतात..

एक प्रकार, दुसऱ्याबद्दलच्या ऐकीव बातम्या तिसऱ्याला सांगतांना लागणाऱ्या हुशारीचा–  त्रयस्थ वृत्तीने,  केवळ दुसऱ्याच्या काळजीपोटी बोलत असल्याचे बेमालूम नाटक साधण्यासाठी   हुशारी तर लागतेच.  चहाड्या,  काड्या,  कागाळ्या,  यासाठी हा प्रकार उपयोगी.. याचा उपप्रकार म्हणजे,  स्वतःचा मोठेपणा इतरांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतांनाची हुशारी  पण हाही तोंडघाशी पाडणाराच  प्रकार.

तुलनेने सोपी हुशारी लागते –उंटावरून शेळ्या हाकण्यासाठी– यात स्वतःला फरक पडतच नाही— “ जनहो, खादी वापरा “  —  सामाजिक पातळीवर वापरण्यासाठी उत्तम प्रकार –.. . याहून धूर्त हुशारी लागते ती  दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतांना- असो.  याच   पातळीवरून  “ चोर तो चोर, वर शिरजोर “ असे वागतांनाही हुशारी लागते ? बहुतेक नाहीच. पण काहींना मात्र तसे ठामपणे वाटते.

हुशारीचे मॉडर्न प्रकारही खूप आहेत सांगण्यासारखे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

बाप रे;  हुशारीचे किती प्रकार सांगितले ना मी —— गुगलकाकांच्या  ज्ञानात भर घालू का?–  नकोच.– जगभरातून माहिती गोळा करून,  ती आपल्याच नावावर खपवण्याची  हुशारी,  हेच तर त्यांचं भांडवल आहे  आणि  त्यांना न कळवण्यातच माझं शहाणपण——

-बघा-असं होतं —  “ज्ञानयुक्त शहाणपणमिश्रित हुशारी” हा विशेष प्रकार सांगायचाच राहिला.  मला तो माहितीये.  पण हा प्रकार  सर्रासपणे वापरतांना  दिसत नाही ना कुणी, म्हणून नजरेआड झाला इतकंच ——

आज इतकंच —थांबायचं कुठे हे कळणं, हा तर फार महत्वाचा प्रकार … ते कळायलाही हुशारी हवीच की….

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

बागेत बाकावर बसलेल्या नलूने समोरून येणाऱ्या उषाला बघून हसून हात हलविला. उषा येऊन बाकावर बसण्याआधीच तिला विचारलं ,”अगं कुठे होतीस काल? किती वाट पाहिली तुझी. शेवटी चार फेऱ्या मारून मी घरी गेले.”

“सॉरी ,सॉरी अगं, मानसीची एक मीटिंग रद्द झाली म्हणून आयत्यावेळी तिनं आम्हाला  मालला यायला सांगितलं. अवेंजर्स सिनेमा बघायला ”

“बरं -बरं. आवडला का?”

“डोक्यावरून गेला” हसल्यासारखं करत उषा म्हणाली.” काय ते वेडेवाकडे एलियन्स ,त्यांची विचित्र वाहनं, शस्त्रास्त्र,सारेच अगम्य! मला तर अधून-मधून  डुलक्याच येत होत्या.”

“आणि आता आपल्याला मॉल मधलं ते हिंडणं, खाणं,खरेदी काहीच नको वाटतं. त्यात सिनेमा असा असला म्हणजे…..”नलूने उषाच्या सुरात सूर मिळविला.

“आपल्या या कर्तृत्ववान, ऑफिस मध्ये बॉस असलेल्या लेकी, यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला गृहीत धरतात. शिवाय घरीदारी सगळीकडे बॉस सारख्याच वागतात.”उषा नाराजीच्या स्वरात म्हणाली.

“आमची चंदा “सेव्हन सिस्टर्स” ला जायला निघालीय. ते सांगायचं होतं तुला”. नलूच्या स्वरातून काळजी डोकावत होती.

“कुणाबरोबर जातेय?”

“एकटोच जातेय. नागालँड, त्रिपुरा पासून एकटीने महिनाभर हिंडणारेय. तिच्या एनजीओतर्फे तिथल्या स्त्रियांच्या आरोग्याचा सर्व्हे करायचा आहे म्हणे. मला तर खूप टेन्शन आलंय.”

“साहजिकच आहे. तरण्याताठ्या मुलीने तिथल्या अशांत वातावरणात एकटीने वावरायचं म्हणजे काळजी वाटणारच”. नलूला दुजोरा देत उषा म्हणाली.

“हो. पण घरात तसं काही बोलायला गेले तर चंदाने मोबाईल मधून डोकं वर काढून, ‘कू–ल, आई कू–ल’ म्हणत माझ्याकडे’ जग कुठे चालले आहे आणि मी कुठल्या युगात वावरतेय’  अशा नजरेनं पाहिलं”

“अरुणा काही म्हणाली का?” उषाने नलूच्या सुनेचं मत आजमावयाला विचारलं.

म्हणाली माझी समजूत काढल्यासारखी ‘अहो आई ,तुम्ही व्हाट्सअप वापरता. आपल्या फॅमिली ग्रुपवर चंदा रोज मेसेज करीन ना. फोटो सुद्धा पाठवील.  काळजी नका करू.’

“फक्त तिथलं इंटरनेट कनेक्शन चालू असायला हवं.” ही माझी शंका मग मी मनातच ठेवली.”  नलूच्या बोलण्यात नाराजी होती.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

ढेकळे सर. मुख्याध्यापकांच्या एका मिटिंग मध्ये माझी त्यांच्याशी ओळख झाली. मी नुकतीच मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. साधी शिक्षिका असताना ज्या गोष्टी खटकल्या होत्या त्या सुधारायच्या अशी सुरसुरी मनात होती. नव्या योजना  मांडायची संधी होती. म्हणून मी मिटिंगला जायला उत्सुक होते.

“नवे  एच.एम.सुरवातीला दुधासारखे उतू जातात नि मग फ्रीजमधल्या सायीसारखे घट्ट खुर्चीला चिकटून बसतात.” ही ढेकळे सरांची लेखकी वाणी.

मिटिंग मध्ये नेहमीचेच विषय होते. नेमणुकितल्या कटकटी, खात्याची  हुकूमशाही, अनुदान कपात वगैरे सगळे तावातावाने  मांडत होते. “अहो राखीव उमेदवार मिळाले नाहीत तर जागा पाच वर्षं मोकळी ठेवा म्हणतात. माणसं लिंपायचीत का? तुमचा सामाजिक न्याय वगैरे ठीक आहे हो, मुलांना शिक्षकच नाही, त्याचं काय करायच?”

माझ्याच मनातला मुद्दा कोणीतरी मांडला होता मग मीही चर्चेत भाग घेतला. “कोणाला नोकऱ्या मिळाव्यात म्हणून शाळा स्थापन झालेल्या नाहीत. मुलांसाठी शाळा आहेत. शि.म.परांजपेंच्या निबंधातलं वाक्य आहे. “राज्यकर्त्याना राज्यावर बसता यावं म्हणून राज्य निर्माण झाली नाहीत, प्रजेसाठी राजा, राजासाठी प्रजा नाही. तसंच आहे हे.”

ढेकळे सरांना माझा मुद्दा पटला. ते म्हणाले, “बाई, तुमचं म्हणणं महत्वाचं आहे, पण मी तुम्हांला त्यातली वाट म्हणजे पळवाट सांगतो. पाच वर्ष जागा भरु नका म्हणतात ना त्या जागांवर दोन तीन म्हयन्यांसाठी शिक्षक भरायचे. अर्ध्या पगारावरबी काम करतात पुढल्या आशेवर. लाख देऊ की दोन लाख देऊ, स्पर्धा लागती. त्यांच्या अर्ध्या पगाराचा शाळेला उपयोग. खोल्या आपसुख वाढत्यात. शाळा काय बिनपैशाच्या चालवायच्या? पैशाचे सोर्स शोधावे लागतात.”

मला माणूस मोठा इंटरेस्टिंग वाटला. “नांव काय म्हणालात सर तुमचं? मी विचारलं.

“शी.आर.ढेकळे. पाकुर्ड्याच्या कोडाबाई हायस्कूलचा मुख्याध्यापक. तसे आम्ही कर्नाटकातले. पर आता हिथच स्थायिक झालो. घरबिर बांधलय्. डेरी हाय चौघापाच जणात.

“अरे वा! तुमचं नांव ऐकल्यासारखं वाटतय् हो.” मी म्हणाले.

“पेपरात वाचलं असाल. परवा राज्यपुरस्कार मिळाला नाही का? फोटोसकट बातमी आली होती की.”

“वा! अभिनंदन. राज्यपुरस्कार म्हणजे किती महत्त्वाचा.”

“आता राष्ट्रीय पुरस्कार. पुढची पायरी. मिळेल की.” सर आत्मविश्वासाने म्हणाले.

क्रमशः ……

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – परदुःख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – परदुःख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“एका विवाहित महिलेची,आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या….. नवऱ्याचे दुसऱ्या कोणा बाईशी अनैतिक संबंध हे या आत्महत्येचे कारण असल्याचे समजते “…….. सकाळी सकाळी वर्तमानपत्रात ही बातमी वाचल्यावाचल्या आभाची बडबड सुरु झाली……..

“वेडी होती ही बाई….. एक नंबरची मूर्ख होती…… जरासाही विचार केला नसावा तिने. एवढा एकच मार्ग उरला होता का तिच्याकडे…. सोडून द्यायचं होतं तिने असल्या नवऱ्याला. किंवा मग मुलांना घेऊन निघून जायचं कुठेतरी… नोकरी करायची…… सन्मानाने रहायचं….. मुलांना सांभाळायचं. एका दोषी माणसाला असा स्वतः मरुन शह दिला, आणि एक आई असूनही, स्वतःच्या मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या शक्यता तिने स्वतःच्या हाताने संपवून टाकल्या….. त्यांचं भविष्यच हिरावून घेतलं……..”

…….. “ तू तरी करू शकली होतीस का असं काही”?…….जेव्हा तुझा पंचेचाळीस वर्षांचा नवरा, त्याच्या ऑफिसमधल्या चोवीस वर्षांच्या दामिनीच्या प्रेमात पार गुरफटला होता तेव्हा ?’…..’येता जाता तुला ‘ म्हातारी – शिळी होत चालली आहेस तू’ असं म्हणत तो तुझा अपमान करत होता तेव्हा?’……’ती दामिनी नावाची आग स्वतःच्या आयुष्याला लागू नये म्हणून तू विझवू शकली होतीस का त्या आगीला?’…..’ तू तर शिकली – सवरलेली होतीस, सक्षम होतीस ना? मग तू का नाही केलास कुठे नोकरी करण्याचा विचार?’……’त्यावेळी हाआत्मसन्मानाचा धडा तुझ्या आयुष्याच्या अभ्यासक्रमासाठी का नाही निवडलास तू ?’ “…………

……. आभाच्या अंतर्मनात दुसऱ्याच क्षणी असे कितीतरी प्रश्न उभे ठाकले, आणि त्यांनी चारही बाजूंनी तिला जणू घेरून टाकलं …….  आणि  एखाद्याला उपदेश करणं अगदी सोप्पं असतं, पण दुसऱ्याचं दुःख मनापासून समजून घेणं फार फार अवघड असतं, हे आता तिला कळलं होतं…..आणि मनापासून पटलंही होतं.. ….

मूळ हिंदी कथा : डॉ. लता  अग्रवाल

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ आनंद ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये

सौ. राही पंढरीनाथ लिमये

 

 ☆ जीवन रंग ☆ आनंद ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆ 

कालच नाम्याने गणवेश स्वच्छ धुऊन ठेवला होता. चड्डी ला ठिगळं होती पण आज ती त्याला टोचत नव्हती. आज तो आणि त्याची आई आनंदात होते. त्याच्या चेह-यावर बाबा विषयी अभिमान आणि माया ओसंडून वहात होती.

आई सारखे डोळे पुसत होती. आज त्याला बाबा देशासाठी शहीद झाला म्हणजे किती मोठा आहे हे कळलं होतं. देशासाठी त्याने मोठं काम केलं होतं. आज शाळेत झेंडा वंदना ला कोणत्या नेत्याला बोलावलं नव्हतं तर त्याच्या आई ला बोलावलं होतं. आई ठेवणीतली साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन तयार झाली. नाम्याने बाबा चा फोटो छातीशी घट्ट पकडला.

दोघं ही आनंदाने मान ताठ करून शाळेकडे निघाले.

© सौ. राही पंढरीनाथ लिमये

मो  नं 9860499623

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-5 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-5 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

आज मी परत घरी एकटी पडले  डोळ्यासमोरुन सुखी, समाधानी, आनंदी प्रतिक्षा हलत नव्हती. त्यामुळे हा एकटेपणा आज तरी मला त्रासदायक वाटत नव्हता.

आता मी नोकरी सोडली होती. गाण्याचा क्लास जाॅईण्ट केला होता. न चुकता जवळच्याच अनाथाश्रमांत एका दिवसा आड जात होते. त्या मुलांना शिकवत होते. त्यांच्या गोकुळात माझे मन रमत होते.ती मुलं पण माझ्या वाटेकडे डोळे लावून बसायची.

मधे मधे प्रतिक्षा नितीन येऊन भेटायचे. कधी मी त्याच्याकडे जायचे. मी, प्रतिक्षा, नितीन त्याचे पप्पा चौघेजण नाटक, सिनेमा, कधी छोटीशी पिकनिकला जात होतो. मस्त मजेत दिवस चालले होते. आणि एक दिवस माझ्याकडे रात्री ही जोडीअचानक आली. इकडच्यातिकडच्या  गप्पा झाल्या. त्यांना  माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मला काहीतरी सांगायचे होतं. पण ते सांगायला कचरत होते. शेवटी मीच म्हटलं “जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा माझी ऐकायची तयारी आहे”

प्रतिक्षा चाचरत सांगू लागली म्हणाली,”आई, नितीनला परदेशी जाण्याची संधी आली आहे. माझ्या कंपनीची पण तिकडे शाखा आहे. तू आणि नितीनचे पप्पां इकडे एकटे रहाणार म्हणून ती संधी स्विकारायची कि नाही अशा द्विधा मनस्थितीत आम्ही आहोत. आई तू फार सोसलं ग. मला एकटीनेच वाढवलसं. आपलं सोन्यासारखं आयुष्य आमच्यासाठी घालवलसं. दोन्ही आजी आजोबांची दुखणी, खुपणी म्हातारपण म्हातारपणाची त्यांची चिडचिड, हे मुकाट्याने सहन केलंस. आता मला म्हणजे नितीनला, म्हणजे मलाआणि नितीनला”

“अग बोल ना प्रतिक्षा काय ते एकदाच सांगून टाक”

“म्हणजे तू आणि नितीनच्या पपानी लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? एक तर तुमचे विचार जुळतात.ते पण एकटे रहाणार आणि इकडे तू पण. आम्ही usला  तिकडे  गेल्यावर आम्हाला तुमची काळजी पण नाही.”

“नाही प्रतिक्षा तुम्ही तिकडे बिनधास्त जा. मी इकडे माझी काळजी व्यवस्थित घेईनच पण नितीनच्या पपांची पण घेईन. तुम्ही आमच्या दोघांची थोडी सुद्धा  चिंता करु नका.निश्चिंत मनाने जा. पण आता ह्या वयांत मला हे स्विकारण्यास सांगू नका. जे मी ऐन तारूण्यात सुध्दा स्वीकारले नाही.”

रात्रभर विचार केला. सकाळी लगेचच मी माझ्या जवळपास राहणारी माझी एक जिवलग मैत्रिण विनीता सध्या सुनेच्या जाचाला कंटाळून वृध्दाश्रमात जायचा विचार करत होती. तिला माझ्याकडे कायम रहायला येण्याबद्दल विचारले. ती एका पायावर तयार झाली.नितीनच्या पप्पांना पण एखाद्या मित्राला घरी रहायला बोलावण्यासंबंधी सांगितले. ते म्हणाले, “मित्र कशाला ? भाऊच माझा येईल की. भावजय हल्लीच वारली आहे. आणि पुतणी सासरी. आम्ही दोघं भाऊ मजेत राहू. खरं म्हणजे तोच मला पुण्याला बोलावत होता. पण नितीनला सोडून जायला मन तयार होत नव्हते. आता त्यालाच इकडे बोलावतो.

मग मी कामाला एक जोडपं शोधलं. ती बाई माझ्या घरी स्वयंपाक करेल. आणि नितीनच्या पपाना आणि काकांना डबा पोचवेल. दोन्ही घरचे घरकाम पण करेल. आणि तिचा नवरा दोन्ही घरची बाहेरची कामें, बाजारहाट आणि इतर सटरफटर  कामे करतील. दोघंही आमच्याच घरी रहातील. कारण माझं घर तसं भरपूर मोठं होतं. एक गच्ची होती.  त्याला जोडून एक खोली पण होती. तिकडे ती दोघं आरामात राहू शकत होती. मी माझा प्लॅन  प्रतिक्षा, नितीन आणि पप्पांनी सांगितला. माझ्या ह्या प्लॅनवर तिघेही  खुष.. त्याना पण ते पटलं. वेळा काळाला आपण आहोतच.  एकमेकांना.

नितीन आंणि प्रतिक्षा बिनधास्त  usला गेले. आता मला अजिबात एकटं वाटत नाही. माझी मैत्रीण सुनिता 24 तास बरोबर असते. मग काय मनसोक्त भटकणं खाणंपिणं. आम्ही अनाथाश्रमांत जातो. त्या मुलांना शिकवतो. गाणी गोष्टी सांगून त्याचं मनोरंजन करतो. नितीनच्या पप्पांना कधी बोलावतो. कधी आम्ही तिकडे जातो. कधी वॄध्दाश्रमांत जातो. आमच्यापेक्षा वृध्द आहेत त्यांची जमेल ती सेवा करतो. त्यांना पुस्तके वाचून दाखवतो. मनोरंजन करतो. आता मी अजिबात एकटी,एकुलती एक नाही.

माझा परिवाराचा परीघ खूप रुंदावला आहे. गोकुळाची कक्षा वाढली आहे. एकुलतं एकपण त्या गोकुळात कधीच विसरुन गेले.

! समाप्त !

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares