मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काळजी ☆ सौ. अंजली गोखले

☆ जीवनरंग ☆  काळजी ☆ सौ. अंजली गोखले ☆

काकूंचा स्वयंपाक आवरला. हुश्श्य म्हणून पदराने चेहरा पुसत त्यांनी खुर्चीवर बसकण मारली. काम करून किती दमली आहे असं त्यांना काकांना दर्शवायचं होतं. पण काका पेपर वाचण्यात दंग होते. काकूंनी आपली कॉमेंट्री सुरू केली, ” छे !किती उकडतंय.  दमले बाई मी. या पोरांना मुळे वैताग आलाय. सगळे काम करायची आणि घरातच बसायचं. बाहेर जाणं नाही, शॉपिंग नाही, भिशी नाही, गप्पा नाहीत. कंटाळा आलाय नुसता. “एवढ्यात काकांच्या मोबाईल वाजला. नाइलाजानं का पुन्हा आपल्या बोलण्याला ब्रेक लावावा लागला.फोनवरचं बोलणं काका नुसतं ऐकत होते. थोड्याच वेळात त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला. “काय बाई तरी! बोलणं नाही,गप्पा नाहीत,.”काकू मनातच म्हणाल्या. कारण काकांच्या चेहऱ्यात काहीसा बदल झाल्यासारखा वाटला त्यांना. सिरीयस म्हणाना!

खुर्चीतून उठताच काका म्हणाले. “एवढी कंटाळी आहेस ना? वैतागली आहेस ना? चल जरा गाडीतून चक्कर मारून येऊ.”. काकू एकदम हरखून गेल्या. गाडीतूनच जायचे म्हणून साडी ठीक केली आणि पटकन तयार झाल्या. काका मात्र काहीच बोलत नव्हते. कोरोनामुळे गर्दी नव्हतीच रस्त्यावर. गाडी सुसाट गावाबाहेर आली. “अहो इकडे कुठे आलो? एवढा काळा धूर दिसतो आकाशात? अहो, हे को विड पेशंट चे स्मशान आहे ना?बापरे! पत्रे मारलेत वाटतं. हे लोक बिचारी झरोक्यातून डोकावतात. कशाला आलो  इकडं? “थोडं पुढे जाऊन काकांनी गाडी थांबवली. खिडकीतून बाहेर पहात काकू म्हणाल्या, “अहो ती मुलगी पाहिलेत का? बिचारी त्या डोळ्यांमधून डोकं पाहते हो. अहो ती शरद भाऊजींची मीरा आहे ना? हे कशाला इथे आली?” काकूंचा आवाज आता फारच काळजीचा झाला होता.

गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करत काका म्हणाले, “बरोबर ओळखलस तू.ती शरीराची मिराच आहे. शरद कोरो ना मुळे गेला. निदान त्याचा चेहरा पाहायला मिळावा म्हणून मेरा आलीय इथे. बाहेर लोकांची काय अवस्था आहे, हेच दाखवायला तुला चल म्हटलं. नुसतं भिशी नाही, शॉपिंग नाहीम्हणून तुम्ही बायका त्रासून जाता.इतरांवर काय भयानक प्रसंग येतोय, किती यातना त्यांना सहन कराव्या लागतात ते बघ. तू गाडीतच थांब मी येतो पाच मिनिटात.”

काका गेल्यावर काकूंच्या छातीत अक्षरशः धडधडायला लागलं. ते भयाण भिषण दृश्य पाहणे क्लेशकारक होतं. अशी किती बळी कोरूना ने घेतले असतील? किती घरं उद्ध्वस्त झाली असतील? कसं सावरायचं यांनी? काकूंना काही सुचेना. आपण घरात राहतो ते किती सुखावह आणि प्रोटेक्टीव आहे. मीरा आणि तिच्या आईच्या आठवणीनेत्या कासावीस झाल्या. त्यांच्या काळजीने काकूंच्या मनाला घेरून टाकलं.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण (अनुवादीत कथा) – क्रमश: भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

नर्स विचारात पडली होती. इकडे रोझाला आराम वाटू लागेपर्यंत तिकडे डिरांगची बेचैनी वाढत जायची. त्याची व्याकुळता पाहून रोझा हैराण व्हायची.  दोघांच्या वयात खूप अंतर होतं. एकाएकी तिला वाटलं ‘तशीही मी शहाऐंशी पार करणार आहे. कुणी मागे नाही, कुणी पुढे नाही. आणखी जगून तरी काय करणार आहे? पण या मुलापुढे तर सारा भविष्यकाळ आहे.’ शेजारून जाणार्‍या डॉक्टरांना ती म्हणाली, ‘सर, एक निवेदन आहे.’

‘मिस रोझा, आम्हाला आपल्या त्रासाची जाणीव आहे. जितकं शक्य आहे, तितकं आम्ही आपल्यासाठी करतोच आहोत.’ त्यांना वाटलं, तिला काही तक्रार करायची आहे.

‘जी, तेच म्हणते आहे मी! मला आता व्हेंटिलेटरची गरज नाही.’

‘म्हणजे?’ ते एकाएकी मागे वळले. चष्यातून बाहेर दिसणारे डोळे काहीच न समजल्याचा संकेत देत होते.

‘मी ठीक आहे. माझ्यापेक्षा डिरांगला व्हेंटिलेटरची जास्त गरज आहे.’

‘मिस रोझा काय बोलताय आपण?’

‘जी, माझी इच्छा आहे की मला व्हेंटिलेटर लावण्याच्याऐवजी आपण त्याला लावा. तशीही मी वयाच्या मानाने जास्तच जगले आहे.’

डॉक्टर रोझाचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते.

त्यांना दुविध्यात पडलेलं बघून रोझा आपल्या अडखळत्या आवाजावर जोर देत म्हणाली, ‘मला एवढं कर्तव्य तरी पूर्ण करू दे. त्या नवयुवकाचे प्राण वाचवू देत.’

हतप्रभसे डॉक्टर डिरांगकडे पाहू लागले. त्यांना दोघांचीही चिंता वाटत होती. वय ,रंग, धर्म, जात असा कुठलाही भेदभाव न करता  जीवनाचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य होतं, पण रोझाने प्रेमाने, मानवतेच्या दृष्टीकोनातून धरलेला आग्रह स्वीकारण्यात त्यांना काहीच हरकत वाटणार नव्हती.

तरुणाची प्रकृती बिघडत चालली होती.

‘जरा घाई करा. त्याचा जीव वाचवा.’

ना कसला पेपर, ना कसली सही, ना नोकरीची चिंता. चिंता एकच होती. एक जीव वाचवण्याची.  कुठलाही उशीर न करता रोझाचा वेळही डिरांगला दिला गेला. एक असं काम तिने केलं होतं ज्याबद्दल ती स्टीव्हला सांगणार होती. अर्थात वर गेल्यावर…

तोदेखील खूश होऊन म्हणेल, ‘रोझ, तू खरोखरच रोझ आहेस. जीवनाचा सुगंध पसरवते आहेस.’

हे ऐकून रोझचे  गाल निश्चितपणे लाल होतील.

एक तास होऊन गेला होता. अर्ध जागृत, अर्ध निद्रावस्थेत ती स्टीव्हशी बोलत होती. डिरांगचे डोळे हळू हळू उघडू लागले होते आणि रोझाचे बंद होऊ लागले होते. तिच्या ओठांवर मात्र हसू होतं कारण समोर तिचा हात धरण्यासाठी स्टीव्ह उभा होता. जीवनाची देवाण-घेवाण झाली होती. मृत्यूने आमंत्रण स्वीकारलं होतं. वरचं छत धूसर होऊ लागलं होतं. क्षणभरात घेतलेला निर्णय समाधानाचा मृत्यू देऊन गेला होता.

आपला मृत्यू निवडण्याचं सुख सगळ्यांनाच मिळत नाही. रोझाला ते मिळालं होतं. लाकडाची हांडी स्वत:च चुलीवर चढली होती. कारण जाळ पेटलेला राहायला हवा होता.

 

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ५. गर्वहरण

धारानगरीच्या राजाच्या आश्रयाला दोघेजण रहात होते. त्यापैकी एक ब्राह्मण होता व दुसरा व्यापारी. तो राजा प्रेमाने दोघांनाही वेळोवेळी भरपूर धन देत असे. त्यामुळे ते दोघेही धनवान होऊन सुखाने जीवन जगत होते.

एक दिवस राजाने दोघांनाही विचारले, “कोणाच्या कृपेने तुम्ही सुखी जीवन जगत आहात?” “महाराज, आपल्याच कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय”असे ब्राह्मण उत्तरला. व्यापारी मात्र “देवाच्या कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय” असे म्हणाला. राजाने त्या दोघांच्याही बोलण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.

राजाने एका भोपळ्याला भोक पाडून त्यात मोती भरले. त्यानंतर ते भोक बुजवून तो भोपळा ब्राह्मणाला दिला. व्यापाऱ्याला दोन नाणी दिली. राजाने आपल्याला क्षुल्लक भोपळा दिला म्हणून ब्राह्मणाला खूप वाईट वाटले. भोपळ्यात मोती आहेत याची त्याला कल्पनाच नव्हती.

राजगृहातून बाहेर पडल्यावर ब्राह्मण व्यापाऱ्याला म्हणाला, “मला या भोपळ्याचा काहीही उपयोग नाही. जर तुला हवा असेल तर तू घे व तुझी नाणी मला दे.” “ठीक आहे” असे म्हणून व्यापाऱ्याने त्याला नाणी दिली व भोपळा घेऊन तो घरी आला.

जेव्हा व्यापाऱ्याने भोपळा फोडला, तेव्हा तो मोत्यांनी भरलेला पाहून त्याला खूपच आनंद झाला. तात्काळ राजाकडे येऊन त्याने सर्व वृत्तांत त्याला सांगितला. ती वार्ता ऐकताच ‘मी सर्वांचे रक्षण करतो’ या त्याच्या गर्वाचे हरण झाले व तो अधिक सुखाने राहू लागला.

तात्पर्य – परमेश्वराच्या सहाय्याविना मनुष्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात.

 

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण (अनुवादीत कथा) – क्रमश: भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

डॉक्टर, नर्सेस यांच्या सुरक्षिततेबरोबरच, घाबरलेल्या, निराश झालेल्या रुग्णांचा आक्रोश तत्परतेने हुशारीने थांबवणं हेही एक जरुरीचं काम होऊन बसलं होतं. जीव वाचवणार्‍या त्या देवदूतांनाही शिव्या दिल्या जात होत्या. एकीकडे मानव आपलं क्रूरतम रूप दाखवत होता, तर दुसरीकडे उदात्तता आणि मानवता यांची परीक्षा होती. प्रेतं उचलायलाही लोक मिळत नव्हते. जिवंत लोक उपचाराची प्रतीक्षा करत होते, तर हॉस्पिटलच्या प्रांगणात पडलेला प्रेतांचा ढीग आपल्या गंतव्याकडे जाण्याची प्रतीक्षा करत होता. पहिल्या दिवसाच्या प्रकोपानांतर व्हॅनमधून प्रेतं जात होती. आता व्हॅन छोट्या पडू लागल्या होत्या. मोठे कार्गो ट्रक बोलावले गेले. आता प्रेतं ट्रकपर्यन्त नेणं हेही मुश्किल होऊ लागलं होतं. हॉस्पिटलच्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरून  ट्रकमध्ये पोचणार्‍या प्रेतांना हॉस्पिटलच्या अनेक दरवाजातून बाहेर पडावं लागत होतं. यामुळे प्रेतं घेऊन जाणार्‍यांसाठी, रस्त्यात येणार्‍या रुग्णांसाठी, सगळ्यांसाठी धोका होता. आता उघडे कार्गो ट्रक अशा तर्‍हेने उभे केले गेले की प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली प्रेतं वरच्या मजल्यांवरून थेट ट्रकमध्ये टाकता येतील. हा कुठल्याही प्रकारे मानवतेचा तिरस्कार नव्हता. हे म्हणजे जिवंत असलेल्या उरलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होता.  जिवंत लोकांना सन्मान देण्याचा एक प्रकारचा प्रयत्न होता.

तास न तास इकडून तिकडे ढकललं गेल्यानंतर रोझाला कॅरिडॉरमध्ये ठेवलं गेलं. खोल्यांची कमतरता, बिछान्यांची कमतरता, मास्कची कमतरता, संसाधनांची कमतरता,  सगळ्यात जास्त म्हणजे व्हेंटिलेटर्सची कमतरता, अशा प्रकारे अनेक गोष्टींच्या कामातरतेमुळे प्रत्येक जण वैतागलेला होता. कामाच्या बोजामुळे, मृत्यूच्या भीतीमुळे आणि दु:खित मन:स्थितीमुळे सगळे त्रासलेले होते. सर्वसंपन्न माणसाची सारी ताकद या वायरसने खोटी पाडली होती. असं वाटत होतं, माणसाच्या विवशतेची टर उडवत कोरोंना व्हायरस खदाखदा हसतोय.

रोझाचा नंबर आला. पलंग आणि त्याचबरोबर कॅरिडॉरमध्ये जागा मिळाली, याचा अर्थ असा होता की आता उपचारांना लवकरच सुरुवात होईल. तिचा बेड आरामदायी होता. प्रत्येक बेडमध्ये आवश्यक तेवढं अंतर होतं. समोरची कॅरिडॉरची लाईनही पूर्ण भरलेली होती. रोझाच्या बरोबर समोर एक रुग्ण आपली वेळ येण्याची वाट पाहत होता. मधल्या रस्त्यातून जाणारे – येणारे डॉक्टर्स, नर्सेस जसा काही संकेत देत होते, की तिथे खूप काही चालू आहे.

या महामारीत कुणालाही आपल्या परिवारातील कुणालाही जवळ ठेवण्याची परवानगी नव्हती. रुग्णांनी घेरलेले स्वास्थ्यकर्मी जसे काही मृत्यूला आपल्या शरिरात घुसण्याचं निमंत्रण देत होते. अंतर ठेवून काम करायचं असलं, तरी जवळीक साधावी लागतच होती. ब्लड प्रेशर घेणं, रक्ताची तपासणी, व्हेंटिलेटर लावणं, ही सारी कामं स्पर्श केल्याशिवाय करणं शक्य नव्हतं. कुठे जाणार बिचारे? जीवन-भराच्या आपल्या कठोर परिश्रमाच्या बदल्यात त्यांना डॉक्टरचा सन्माननीय पेशा मिळाला होता. आज ते त्यापासून पळून जाऊ इच्छित होते. आपल्या निर्णयाबद्दल त्यांना पश्चात्तापही होत असेल कदाचित. त्यांच्या सगळ्या योग्यतेला, लायकीला नाकारत त्यांच्या पेशामुळे मृत्यू जसा त्यांच्या मागे लागला होता॰

रोझाच्या समोरच्या पलंगासमोर एक तरुण गंभीर परिस्थितीत होता. आत्तापर्यंत तिला वाटत होतं की साठ वर्षावरील लोकच या आजाराने त्रस्त आहेत.  हा तरुण तर पंचवीस – सव्वीस वर्षाचाच असेल. रोझाला पाहणारी नर्स त्याचीही देखभाल करत होती. त्याची परिस्थिती गंभीर होती. व्हेंटिलेटर रिकामे नव्हते. डॉक्टरांच्या कुजबुजीनंतर ठरवण्यात आलं की या दोघांना क्रमाक्रमाने व्हेंटिलेटरवर ठेवावं. गरजेप्रमाणे कधी रोझाला, कधी डिरांगला.

दिवसभर ती नर्स हेच करत राहिली. तिची ड्यूटी बदलल्यावर दुसरी नर्स आली. ती संगत होती, की डिरांगची परिस्थिती वाईट होत चाललीय. डॉक्टरांना बोलावलं गेलं दोघांच्या कुजबुजीतून स्पष्ट झालं की त्याला व्हेंटिलेटरची जास्त वेळ गरज आहे, नाही तर तो वाचू शकणार नाही. वस्तुस्थिती अशी होती की वारंवार व्हेंटिलेटर बदलल्याने कुणालाच फायदा होत नव्हता. रोझा आणि डिरांग व्हेंटिलेटर लावला की ठीक होत आणि काढताच त्यांना श्वास घेणं मुश्कील होत असे. डोक्टरांची अडचण रोझाच्या लक्षात येत होती. आपल्या बिछान्यावरून ती डिरांगचा चेहरा नीटपणे बघू शकत होती. मोठा मनमोहक युवक होता तो. डोक्यावरचे दाट काळे केस, हलकीशी दाढी, चेहरा कोमेजलेला असूनही आकर्षक होता.

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण (अनुवादीत कथा) – क्रमश: भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

काल स्टीव्हचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आज तो गेला. काही न बोलता त्याचं असं निघून जाणं मन स्वीकारत नव्हतं. वाटत होतं आता एवढ्यातच त्या कापडाच्या भिंतीपालीकडूनावाज येईल, ‘ हे रोझ, सगळं ठीक आहे नं? चल, फिरायला जाऊ.’

‘पाच मिनिटानंतर जाऊ या.’

त्या पाच मिनिटात ती आपले केस सारखे करेल. कोरड्या ओठांवरून चॉपस्टिक फिरवेल आणि चप्पल घालून त्याच्याबरोबर बाहेर पडेल. मग ते दोघे खाली व्हरांड्यापर्यंत जातील. हवा चांगली असेल, तर आणखी थोडे पुढे जातील. त्यानंतर त्याच्या गमतीदार गोष्टींना हसत ती पत्ते खेळत बेसल. नंतर ते पेपर वाचतील आणि मग पुन्हा आपआपल्या खोलीत बंदिवान होतील.

अशा तर्‍हेने का कुणी जग सोडून निघून जातं? रोझासाठी हे केवळ एकाकीपण नव्हतं. खूप काही कष्टदायक होतं. त्या बरोबरच पडद्याच्या त्या हलत्या भिंतींकडे पाहता पाहता वाटू लागलं होतं, उद्या कुणाचा नंबर असेल, कुणास ठाऊक? आणखी किती लोक हॉस्पिटलसाठी नाही, तर आपल्या अंतीम यात्रेसाठी इथून प्रस्थान करताहेत. तसंच झालं. दुसर्‍या दिवशी सकाळी जवळ जवळ सगळे लोक गेले तरी होते किंवा मग आपापले उरलेले श्वास मोजत होते.

कदाचित जीवनातला तो सगळ्या दु:खद दिवस असेल, त्या दिवशी आस-पासचे सगळे ओळखीचे चेहरे निघून गेले होते. रोझा ना खाऊ शकली होती, ना झोपू शकली होती. रात्र सरता सरत नव्हती. ती अंधारी होती, इतकी अंधारी की वाटत होतं आज सूर्य उगवणारच नाही. तिलाही जाणवायला लागलं होतं की शरीरात काही तरी गडबड आहे. श्वास घ्यायला त्रास होत आहे. अजब अशी बेचैनी वाटतेय.  सगळ्या प्रकारचं सामाजिक दूरत्व असतानाही सूर्य उगवता उगवता कोरोनाची सगळी लक्षणं रोझामध्ये दिसू लागली होती. तिलाही हॉस्पिटलमध्ये पाठवलं गेलं. अनेक मित्रांच्या हास्याने भरलेलं ते नर्सिंग होम आता मृत्यूचा अड्डा बनलं होतं. ते पलंग, जे दिवस –रात्र मदतीसाठी याचना करत होते, ते आता मूक होते. एकावेळी पस्तीस जणांचा झालेला मृत्यू आता छ्तीत्तीस आकडा पूर्ण करण्याच्या प्रतिक्षेत होता.

या महामारीत हॉस्पिटलमध्ये जाणं आजार्‍याला अधीक आजारी बनवण्यासारखं होतं. ती जे बघू इच्छित नव्हती, तेच तिचे डोळे बघत होते. बाहेरच्या लॉबीत कुठे उलटी करण्याचा, कुठे थुंकण्याचा आवाज येत होता. चार-पाच तासांचा वेळ साईन-इन करण्यासाठी लागणार होता. कुणी भिंतींचा आधार घेऊन उभे होते. कुणी फरशीवरच झोपले होते. पलंगासाठी कॅरिडॉरमध्ये ही प्रतीक्षा होती. रूम रिकामी नव्हती. सगळ्या जागा, मग त्या डॉक्टरांच्या बसण्याच्या असोत, वा नर्सेसच्या, रूग्णांच्या वॉर्डमध्ये बदलल्या होत्या.

संपत जाणार्‍या संसाधंनाबरोबरच हॉस्पिटलच्या प्रशासकांना एकाच वेळी अनेक मोर्चांवर लढताना, रूग्णांच्या क्रोधालाही निपटावं लागत होतं. रागाने एका रुग्णाने जवळून जाणार्‍या एका डॉक्टरचा मास्क हिसकावून घेत म्हंटलं , ‘आम्ही आजारी आहोत, तर तुम्हीही आजारी पडा. एकदमच मरू सगळे!’

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सगळीकडे गडबड-गोंधळ उडाला होता. सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. शहराच्या प्रत्येक काना-कोपर्‍यातून भयध्वनी गुंजत होता. एकापासून दुसर्‍याकडे, दुसर्‍यापासून तिसर्‍याकडे असं करत कोरोना व्हायरस एलेग्ज़ेंडर नर्सिंग होमच्या उंबरठ्यावर येऊन धडकला होता. तिथे काही वयस्क मंडळी आधीपासूनच बिछान्यावर होती. सीनियर सिटीझनच्या या केअर होम मध्ये  अधिकांश लोक पंचाहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. कुणी हिंडु-फिरू शकत होते, तर कुणी बिछान्यावर पडलेलेच असायचे. आपली दिनचर्या चालवण्यासाठी कुणाला मदतीची गरज नसे, तर कुणीकुणी पूर्णपणे दुसर्‍याच्या मदतीवरच अवलांबून असायचे. कुणी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही बाबतीत अस्वस्थ असायचे, तर कुणी फक्त मानसिकदृष्ट्या. ते चाला-फिरायचे पण असे की जसा काही त्यांच्यात जीवच नाही. त्यांच्याकडे बघताना वाटायचं जीवन तुटून-फुटून गेलय. कसे बसे ते तुकडे गोळा करून ते चालताहेत पण कुठल्याही क्षणी ते विखरून पडतील.

करोनाचा प्रहार सहन करण्याची ताकद या वयस्क मंडळींमध्ये खूपच कमी होती. त्याचा फायदा उठवून व्हायरस,    शहरातल्या अशा प्रकारच्या नर्सिंग होम्सना  आपलं लक्ष्य बनवत होता. आत्तापर्यंत सुरक्षित असलेलं हे नर्सिंग होम आता त्याच्या पकडीत सापडलं होतं. एका मागोमाग एक असे अनेक लोकांचे रिपोर्टस पॉझिटिव्ह येत चालले होते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं जाऊ लागलं होतं. चोवीस तास सरता सरता दहा जणांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या साथीदारांमध्ये निराशा आणि दहशत पसरवत भिंतींना धडकून गोंधळ निर्माण करत होती. मृत्यूचं दृश्य डोळ्यांच्या अगदी जवळ येऊन टकटक करत होतं.

भीती आणि धोके यांच्याशी झुंजत, आणि आपल्या जिवाची काळजी करत इथले कर्मचारी ही परिस्थिती हाताळत होते. कुणी पॉझिटिव्ह झाल्याने घरी एकांतवासात होते, कुणी पॉझिटिव्ह होण्याच्या शंकेने घरी राहू इच्छित होते, पण नाईलाजाने काम करत होते. एका मागोमाग येणार्‍या आशा बातम्यांनी रोझा विचलित झाली होती. आपला शेजारी स्टीव्हबद्दलच्या बातमीची उतावीळपणे वाट बघत होती.

जीवनातले शहाऐशी वसंत पार केलेल्या रोझावर मृत्यूच्या बातम्यांचा आतंक आशा तर्‍हेने पसरला होता, की टी.व्ही.च्या स्क्रीनवरून  तिची नजर हटतच नव्हती. गेली दहा वर्षे हे नर्सिंग होम हेच तिचं घर होतं. गेले काही दिवस इथले कर्मचारी आशा तर्‍हेने घाबरत घाबरत आपले काम करत होते, जसे काही बिछान्यावर पडलेले हे लोक, त्यांच्यासाठी मृत्यूचा संदेश घेऊन उभे आहेत. सगळ्यांनी आपल्याला पूर्णपणे कव्हर केलं होतं. कळतच नव्हतं कोण कोण आहे. काम करणारे त्यांच्या अवती-भवती रोबोटप्रमाणे वावरतील, अशी स्थिती आत्तापर्यंत कधीच आली नव्हती.  हलक्या निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक कव्हरमध्ये झाकलेले किंवा असं म्हणता येईल की प्लॅस्टिक गाऊन घातलेले , हातात हातमोजे, तोंडावर मास्क असे सगळे सजलेले होते. चष्म्याच्या मागे लपलेल्या डोळयांशवाय त्यांचं काहीही दिसत नव्हतं.

नर्सिंग होम ची रिसेप्शनिस्ट सूझन आली आणि तिने दिवंगत झालेल्या व्यक्तींची नावे सांगितली. त्यात स्टीव्हचं नावही होतं. रोझाच्या डोळ्यांच्या पापण्या जशा काही उघड-झाक करायच्या विसरूनच गेल्या.  अनेक स्नेह्यांबरोबर तिचा खास मित्र  स्टीव्हही तिला सोडून गेला होता. ती दोघे नेहमी गप्पा मारत. दोघांनीही इथलं जीवन खुशीने स्वीकारलं होतं. आता कुणालाही आपला परिवार, मुलं-बाळं यांची प्रतीक्षा नव्हती. दोघेजण एकमेकांचे चांगले साथीदार झाले होते.

त्या मोठ्या खोलीत चार पलंग होते. एका बाजूने दुसर्‍या बाजूपर्यंत कापडाचा पडदा होता. ती त्यांच्या खोलीची सीमा होती. त्यांचं आपलं घर होतं. कोण कुणाच्या चार भिंतींच्या आत डोकावत नसे. बसून बसून, झोपून झोपून बोलायचे. मोठमोठ्याने हसायचे. लंच-डिनरच्या टेबलवर एकमेकांची सोबत करायचे आणि फिरायलाही बरोबर जायचे.

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रूखी ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ जीवनरंग ☆ रूखी ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆ 

लघुकथा : रूखी

मी लग्न होऊन सासरघरी जेव्हा आले त्या वेळेस ती मला पहिल्यांदा भेटली, सावळा वर्ण,रेखीव नाक-डोळे आणि चुणचुणीत अंगकाठी अशी ती, ” भाभी, मैं रूखी. ”
असे म्हणत माझ्या समोर येऊन छानस हसली. रूखी, आमच्याकडे घरकामाला असलेली साधारण वीस एक वर्षाची राजस्थानी तरुणी. ” रूखी.. असले कसले नाव आहे तुझे! रूखी म्हणजे तर ओलावा नसलेली असा अर्थ होतो.” मी तिला म्हणाले. ” नाही खर तर माझं नाव रूखमणी (रुक्मिणी) असे आहे, मला पण रूखी म्हटलेले नाही आवडत पण माझी सासू मला आवर्जून ह्याच नावाने हाक मारते कारण मला काही मूलबाळ नाही आहे न… .हो, पण कोणी काही पण म्हणू दे. माझा नवरा शंकर मात्र मला रूखमणीच म्हणतो.” असे म्हणतांना नवर्‍यावरचे तीचे प्रेम तिच्या डोळ्यात दिसत होते. समवयस्क असल्याने कदाचित ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायची. शंकरचे म्हणजे तिच्या नवर्‍याचे पण तिच्यावर खूप प्रेम आहे असे तिच्या बोलण्यातून जाणवायचे.
अशीच एके दिवशी कामं करायला आली तेव्हा जरा वैतागलेलीच होती। विचारल्यावर म्हणाली ” मला न शंकरचा रागच आला आहे आज. ऐकायलाच तयार नाही आहे माझं काही॰ मी त्याला दुसरी बायको आण असे सांगते आहे. ”

“ अग..पण असे तू  असताना दुसरं लग्न कसे शक्य आहे?” मीम्हणते.

” आमच्यात पंचायत बसते तिकडे आधीच्या बायकोचा होकार असला तर दूसरे लग्न करता येते.” ती म्हणते. मी निरुत्तर होते. ती बोलतच राहिली. “माझी लांबची बहिण आहे. आई-बाप कोणीच नाहीत तिला. दिसायला सुंदर आहे कोणीही तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेईल म्हणून मी विचार केला की शंकर सारख्या चांगल्या माणसाशी तीचे लग्न झाले तर बरेच होईल आणि आम्हाला पण तिच्यापासुन मूलं होतील. मी कसेही करून शंकरची समजूत घालेनच. ”

पंधरा दिवसांनी ती गावावरून आली बरोबर एक धप्प गोरी, सुमार नाकनक्षा असलेल्या तरुणीला घेऊन.

” भाभी, ही रूपा.. शंकरने हिच्याशी लग्न केले ..तुम्हाला भेटवायलाच इथे घेऊन आले. दोन दिवसानंतर गावी परत पाठवून देऊ.’

‘तुझ्या मनासारखे झाले न.. तू  खुश आहेस न, झालं तर मग..” मी दोघींना चोळी बांगड्यांचे पैसे देत म्हणाले.

चार- पाच महिन्या नंतर रुक्मिणी खुशीतच रूपाला दिवस गेल्याचे मला सांगू लागली. ” येथेच तिचे बाळंतपण करणार आहे, तिला जूळे होणार आहे असे डॉक्टर म्हणाले आहेत, म्हणून आम्ही घरच्यांनी असे ठरवले आहे की पहिले जन्माला येईल ते मूल रूपाचे आणि दूसरे माझे… म्हणजे मी पण आई होणार आहे..”

मी तिला साखर खाऊ घातली. ठराविक वेळी रुपाला दवाखान्यात नेले, तेव्हा रुक्मिणी पण तिच्या बरोबर गेली होती, मी दोन दिवसानंतर कामाला येईन असं म्हणून गेली. ती आज पंधरा दिवस झाले तरी तिचा काही पत्ता नाही..मला काळजी वाटायला लागली तशी मी एक दिवशी जवळच असलेल्या वस्तीत तिचे घर होते तिथे गेले. दारातच तिची सासू बसलेली होती. रुक्मिणी..रूखी आहे का असे विचारले. ” ती आता ईथे नाही रहात ” असे म्हणताच मी रूपा बद्दल, तिच्या मुलांबदल विचारू लागले, तशी रूपा आतून रागातच म्हणाली ” ती अपशकुनी आहे.. माझं बाळ किती गोंडस आहे आणि तिचं असलेल मूलं मेलेलच जन्माला आलं.  मला तिची भितीच वाटते माझ्या मुलाला पण खाऊन टाकेल ती म्हणून हाकलून दिले तिला. ” तेवढ्यात शंकर तिथे आला. ” शंकर ! तुझी रूखमणी कुठे आहे..” असे विचारल्यावर तो म्हणाला ” काहे की रूखमणी..वो तो रूखी.. है रूखी..” मी जेमतेम माझे अश्रू थोपवून तिथून परतले.

© सौ. स्मिता माहुलीकर

अहमदाबाद

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆पाखंड ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ पाखंड ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

” पाखंड” श्रध्दाळु भक्तांना पुजारी उपदेश करीत होते, “उपाशी लोकांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी पाजणे, दुःखी-कष्टी लोकांना मदत करणे हाच खरा मनुष्यधर्म आहे. गरीब लोकांत ईश्वराचा वास असतो; म्हणून त्यांची मदत केल्याने ईश्वर प्रसन्न होतो.”

प्रवचन संपल्यानंतर एक अतिशय मरतुकडा मुलगा, हातापायाच्या काड्या झालेल्या, पोट खपाटी गेलेलं, डोळ्यात दया-याचना असलेला पुजार्यासमोर हात पसरत म्हणाला, “पुजारीबाबा, कालपासून काही खाल्लं नाही, फार भूक लागली आहे. थोडासा प्रसाद द्याल तर ……”

एक सणसणीत शिवी हासडत पुजारी म्हणाला, “हरामखोर तू परत आलास? आपल्या आईबापाला जाऊन विचार की पोटाला देता येत नव्हते तर जन्माला कशाला घातले!फुकटखाऊ नुसते! येऊन धडकतात रोज-रोज गिळायला …..”

ताटात झाकलेले लाडू त्यांनी चपळाईने आपल्या उपरण्यात बांधले आणि भराभरा पावले टाकीत मंदिराच्या मागे असलेल्या आपल्या खोपट्याकडे निघून गेला. देवळाच्या आवारात त्याचे प्रवचनातील शब्द वार्याबरोबर भिरभिरत होते………

 

©   सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – धूर्त मंत्रिपुत्र ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – धूर्त मंत्रिपुत्र ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ४. धूर्त मंत्रिपुत्र

अयोध्या नगरीत एक राजा होता. त्याला फुलांचे भयंकर वेड होते. त्याने त्याला आवडणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांचे एक ‘पुष्पउद्यान’ तयार करून घेतले होते. तो आपलं विश्रांतीचा काळ त्या पुष्पोद्यानातच घावलीत असे व भरपूर आनंद उपभोगीत असे.

राजाचा एक मंत्री होता. त्याचा एक पुत्र दररोज त्या उद्यानात जाऊन फुले चोरीत असे. त्यामुळे त्या उद्यानातील बरीचशी फुले नष्ट झाली होती. हे लक्षात येताच राजाने माळ्याला बोलावून “माझ्या उद्यानात उमललेली फुले कोणीतरी चोरून नेत आहे. तेव्हा तू पहारा ठेवून त्या चोराला पकडून आण” असा आदेश दिला. आदेशानुसार माळ्याने जागता पहारा ठेवला. तेव्हा मंत्रिपुत्र फुले तोडतोय हे पाहून त्याला तत्काळ फुलांसह पकडून पालखीत बसवून नगरीत नेले.

त्यावेळी तो मंत्री नगरद्वाराजवळच होता. त्याला पाहून माळी म्हणाला, “तुझा हा पुत्र पुष्पोद्द्यानात फुले चोरत होता. त्याला आम्ही राजाजवळ नेत आहोत. तेव्हा याला राजगृही जाऊन सोडविण्याचा प्रयत्न करू नकोस.” हे ऐकून मंत्री त्याच्याकडे बघून “जर जगायचं असेल तर तोंड आहे. तुम्ही जा” असे मोठ्याने बोलला.

मंत्र्याचे हे शब्द ऐकून व त्याचा अभिप्राय लक्षात घेऊन मंत्रिपुत्राने स्वतःजवळ असलेली सगळी फुले खाऊन टाकली. नंतर राजाजवळ गेल्यावर राजाने “तू फुले का तोडलीस?” असे विचारताच मंत्रिपुत्र म्हणाला, “महाराज, मी आपले उद्यान बघण्यासाठी गेलो होतो. तिथे फुले तोडण्यासाठी नाही. मला ह्या माळ्याने अन्यायाने व जबरदस्तीने पकडले आहे.”

मंत्रिपुत्राजवळ फुले मिळाली नाहीत. तेव्हा माळ्याने मंत्रिपुत्राला अन्यायाने व जबरदस्तीनेच पकडले आहे असे निश्चित ठरवून राजाने माळ्यालाच दंड केला व मंत्रिपुत्राला सोडून दिले.

तात्पर्य – बुद्धिमान लोक ओढवणाऱ्या संकटाचा विचारपूर्वक सामना करतात.

 

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-4 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-4 ☆ श्री आनंदहरी ☆

पावसाने मध्ये जरा ओढ दिली असली तरी पुन्हा पाऊस हवा तसा लागला होता. बारा आणे पीक तरी पदरात पडणार होते.. ती खुश होती.. गावंदरीचा भुईमूग काढायला आला होता. बिरोबाच्या शिवारातलं सोयाबीन काढायला आले होतं. सगळ्यांचीच सुगीची गडबड चाललेली त्यात कामाला माणूस तरी कुठून मिळणार. ती गावात फिरून आली.  दोन दिवसाने सोयाबीन काढायला यायला दोघीजणी तयार झाल्या.

घरी आल्यावर ते सारे नवऱ्याला सांगून म्हणाली,

“उद्या येरवाळचं जाऊन हुईल तेवडा भुईमूग उपटून टाकूया. उपटून हुतील ती समदं याल बांधून घरला घेऊन येऊ..”

“घरला ? ती कशापाय ?”

नवरा कावदरला… तरीही ती शांतपणे म्हणाली,

“अवो, द्वारकामावशी हाय , ती बसल शेंगा तोडत काय हुतील त्येवड्या.. तिला रानात जायाचं हुत न्हाय पर हितं ईल..”

तो काहीच बोलला नाही. ती पुढं म्हणाली,

“आन सोयाबीन काढायचं काम करून आल्याव मी बी तोडीन की पारभर.. अवो, सुगीच्या दिसात हुईल त्येवडं वडाय लागतंयच की काम.  ”

येरवाळी जाऊन दिवसभरात होईल तेवढा भुईमूग उपटला.., ,दोघांनी वेलांचं एकेक वजं सोप्यात आणून टाकलं..

जेवणं झाली.. थोडावेळ शेंगा तोडून ती आडवी झाली.. लगेच डोळा लागला.. तिला कसल्याशा आवाजाने जाग आली. उठून पाहतेय तर रप रप पाऊस सुरू झालेला..  तिने दार उघडून पाहिलं…सगळ्या पावसाळ्यात झाला नव्हता असला पाऊस पडत होता. तिचा जीव खालवर होऊ लागला.  तिने नवऱ्याला हाक मारली. आणि म्हणाली ,

“अवो, कसला पाऊस पडाय लागलाय बगा की वाईच.. भुईमूग उपटून टाकलाय त्येवडा तरी आणूया..”

नवरा या कुशीवरून त्या कुशीवर वळत म्हणाला,

“काय न्हाय हुइत त्येला.. बघू सकाळच्या पारी.. झोप आता..”

तो लगेच झोपुनही गेला पण तिला काही झोप लागली नाही.

पाऊस कोसळतच होता.झुंजूमंजू झाल्यावर  तसल्या पावसात ती भुईमुगाच्या वावराकडे निघाली,.. साऱ्या शिवारात गुडघाभर पाणी झाले होते सगळा भुईमूग पाण्याखाली गेला होता ..उपटून ढीग लावलेले भुमुगाचे वेल ..एखाद- दुसरा वेल पाण्यावर तरंगताना दिसत होता तेवढा सोडला तर बाकी सारे वाहून गेले होते.. मनात उदासीनतेचा, निराशेचा पाऊस सुरू झाला होता.. तिच्या मनात आले.. हितं पाऊस कोसळतोय तेवढा बिरोबाच्या शिवारात नसेल कदाचित.. मनातल्या विचारासारशी ती तडक बिरोबाच्या शिवाराकडे गेली.. पाऊस तिथेही कोसळत होताच.. वावराला घातलेल्या हातभर तालीवरून पाणी वाहत होतं. सारे रान भरून वाहणाऱ्या शेततळ्यासारखं दिसत होते.. जणू पावसाने सोयाबीन पिऊन टाकला होतं..

ती भान विसरून पावसात चिंब भिजत सोयाबीनच्या रानाकडे एकटक पहात होती.. निर्मितीचा नाश होत असल्याची वेदना तिच्या गालावरून आसवं होऊन ओघळत होती..  साऱ्या आसमंतात तिच्या त्या आसवांचाच पाऊस कोसळत राहिला.

◆◆◆

(समाप्त)

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print