मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शबरी – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ शबरी – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(पोलिसांनी ऍम्ब्युलन्स बोलावली आणि तिला उचलून आत ठेवले आणि ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने पळाली.) – इथून पुढे — 

तिच्या घरी फोन गेले, आई वडील घाबरत हॉस्पिटल मध्ये आले.

दुसऱ्या दिवशी मेधाला जाग आली तेंव्हा तिचे अंग कमालीची दुखतं होते. पाय तुटून गेला की काय असे तिला वाटले. रात्री डॉ नी गुंगीचे इंजेकशन दिल्याने तिला झोप लागली होती. आजूबाजूला आई बाबा, मावशी सगळे काळजीत उभे होते.

पुन्हा नर्स आली तिने इंजेकशन दिले.

दोन दिवसांनी तिच्या पायावर प्लास्टर चढवळे होते, एका हातावर प्लास्टर होते. कम्बर कमालीची दुखतं होती.

आणि दोन दिवसांनी ती घरी आली. तिच्या असिसिडेन्ट ची बातमी कळताच हेमंत, लेखक अश्विन, निर्माते वसंतराव आणि नाटकातले तिचे सहकारी सतत येत जात होते.

सुरवातीचे चार दिवस अनेक माणसे, नातेवाईक तिच्या चौकशीला येत होते, जात होते. शेजारी, नातेवाईक, मित्र मैत्रिणी तसेच नाट्य सिनेमा क्षेत्रातील मंडळी.

हेमंत, आशिष येत होते. त्याचे चेहेरे काळजीने भरले होते, मेधाच्या लक्षात येत होते, शूटिंग तारीख जवळ येत होती, इतर कलाकारांच्या डेट्स घेतल्या होत्या, आणि मुख्य अभिनेत्रीचा हात आणि पाय प्लास्टर मध्ये होता.

मग एकदा आशिष, हेमंत आणि वसंतराव तिच्या घरी आले आणि तोपर्यत कोल्हापूर मध्ये जाऊन इतर शॉट्स जे मेधा खेरीच होते, ते पुरे करून मग तिचे शॉट्स घेऊया असे म्हणाले.

मग सर्व युनिट कोल्हापूर मध्ये गेले आणि घरी मेधा आणि तिचे आईवडील एवढेच राहिले. सतत कामात, नाटकाच्या तालमीत, प्रयोगात, मित्र मैत्रिणी मध्ये अडकलेली मेधा एकटी पडली. आई बरोबर गप्पा तरी किती मारणार. हेमंत तिला शूटिंग मधले फोटो पाठवत होता, त्यामुळे तिला शूटिंग ची प्रगती कळत होती.

खुप कंटाळवाणा काळ तिच्या आयुष्यात आला होता. वेळ जाता जाता जात नव्हता,रात्री झोप येत नव्हती, जेवणं जात नव्हते.

दीड महिण्यानंतर तिचे प्लास्टर काढले, मग फिजिओ सुरु झालं.

मग एकदा अश्विन आणि हेमंत तिच्या घरी आले, आणि जे शॉट्स खुर्चीवर बसून आहेत, ते घेऊया अशी त्यानी विनंती केली आणि मग मेधा तिच्या आईवडीला सामावेत कोल्हापूर मध्ये आली.

पहिल्याच दिवशी तिचे शॉट्स तिची आई झालेली सुकन्या बरोबर होते. नाटकात काम करायची मेधाला सवय. तिला कॅमेरा समोर काम करायची सवय नव्हती पण सुकन्याने तिला कॅमेऱच्या समोर येण्याच्या टिप्स दिल्या आणि मग तिला जमले.

कोल्हापूर मध्ये सकाळी तिथे फिजिओ येऊन तिचे व्यायाम घेत होता, त्यामुळे हळूहळू ती चालू लागली.

आता तिचे भराभर शॉट्स ओके होऊ लागले. या असिडेन्ट च्या गडबडीत तिच्या लक्षात आले, अजून वसंतराव यांनी आपल्याशी करार केलेला नाही किंवा पैसे दिलेले नाहीत.

तिने तसें हेमंत कडे बोलताच दुसऱ्या दिवशी कराराचे कागद तिच्यापुढे आले आणि तिला पंधरा लाख देण्याचा करार झाला आणि पाच लाखाचा चेक तिला मिळाला.

तिच्या समवेत असलेल्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी चेक बँकेत जमा केला.

मेधाचे बरेच शॉट्स सुकन्या आणि हेमंत बरोबर होते. अपघाता नंतर शबरी पांगळी होते, तेंव्हा नितीन तिला सांभाळतो, तिला मॉरल सपोर्ट करून पुन्हा तिला व्यवस्थित करतो, असा नाटकाचा आणि फिल्मचा विषय होता. हेमंत नितीनची भूमिका करत असल्याने, त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम असल्याने मेधाचें नितीन म्हणजेच हेमंत बरोबरचे शॉट्स उत्तम व्हायचे.

म्हणता म्हणता मेधाला कोल्हापूर मध्ये येऊन बावीस तेवीस दिवस झाले, तिची तब्येत पण आता बऱ्यापैकी सुधारली होती, आता ती व्यवस्थित चालत होती, तिला जेवणं जात होते आणि मुख्य म्हणजे अनेकजण आणि मुख्य म्हणजे तिचा प्रियकर हेमंत आजूबाजूला असल्याने तिची मनस्थिती पण उत्तम होती.

आणि अचानक तिला ती भेटली…

कोल्हापूर मधील पर्ल हॉटेलवर मेधा तिच्या आई सह मुक्कामाला होती. तिची आई कधी स्टुडिओ मध्ये येई कधी नाही. त्या दिवशी तिची आई तिच्यासामवेत नव्हती. सायंकाळी सहा वाजता तीची गाडी हॉटेल जवळ आली, तेंव्हा एक अंदाजे साठ वर्षाची बाई तिची वाट पहात वेटिंग रूममध्ये बसून होती.  

काउंटर वरील मुलीने कोणीतरी बाई तुमची वाट पहात आहेत असे संगितल्यावर वेटिंग रूम मध्ये आली, तेंव्हा तिला पाहिल्यावर ती स्त्री उभी राहिली.

स्त्री –नमस्ते.

मेधा –नमस्ते, काय काम होत? कोण तुम्ही?

स्त्री –हो, मी शबरीची आई, खऱ्या शबरीची आई.

मेधा –काय?खरी शबरी?

स्त्री –तू जी नाटकात भूमिका करतेस आणि आता तुमचे शूटिंग सुरु आहें, ती गोष्ट शबरीची म्हणजे माझ्याच मुलीची.

मेधा –काय बोलताय तुम्ही? खरी शबरी आहें?

स्त्री –होय, खरी शबरी आहें, त्या जीवघेण्या वेदना गेली चार वर्षे सहन करतेय. त्या नाटकात तुम्ही दाखवले आहें, अपघातानंतर शबरी बरी होऊन तिला प्रियकर मिळतो म्हणून. पण खरी शबरी डॉक्टरचा खर्च झेपत नाही म्हणून अजून मरनप्राय वेदना सहन करतेय.

मेधा –पण ती आहें कुठे?

स्त्री याच कोल्हापूर मध्ये.तुम्हांला तिला भेटायचे असेल तर माझ्याबरोबर यावे लागेल. तुम्ही प्रत्यक्ष तिची परिस्थिती पहा.

मेधा –मला तिला भेटायचे आहें.

स्त्री –मग चला माझ्याबरोबर, येथून अर्ध्या तासाच्या अंतरावर माझे घर आहें. गाडी आहेना तुमची.

मेधा –हो, आहें ना. पण मी आईला फोन करुंन सांगते, थोडा वेळ होईल म्हणून.

मेधाने आईला फोन करून आपण बाहेर जात असून थोडा वेळ लागेल, ड्रायव्हर सोबत आहें, असे सांगून ती त्या स्त्री बरोबर बाहेर पडली.मेधा त्या बाई बरोबर गाडीत बसली. तिला वाटतं होत, हेमंत जो अजून सेट वर होता, त्याला कळवावे. ती त्या स्त्रीला म्हणाली 

“मला या नाटकाचा आणि फिल्म दिग्दर्शक हेमंत याला कळवावे लागेल.

स्त्री –त्याला माहित आहें सर्व.

मेधा एकदम आश्रयचकित झाली.

मेधा –त्याला माहित आहें? कस? त्याचा काय संबंध? मग मला कस माहित नाही.

ती स्त्री दाखवत होती, त्या रस्त्याने ड्रायव्हर गाडी चालवत होता. शेवटी उचगाव रस्त्यावर गाडी थांबली.

त्या वसतीत छोटी छोटी घर होती. एका अशाच घरा समोर गाडी थांबली. ती स्त्री बाहेर पडली, तिच्या मागोमाग मेधा बाहेर पडली.त्या स्त्रीने दरवाजा उघडला आणि ती मेघाला म्हणाली 

“या, या आत ‘.

तिच्या मागोमाग मेधा घरात शिरली, तीन खोल्यांचं घर होतं. छोटा हॉल, लहान किचन आणि बंद असलेले बेडरूम. त्या बाईंनी बेडरूमचा दरवाजा उघडला, बेडवर एक अत्यन्त कृष मुलगी उताणी झोपलेली होती.

त्या बाईंनी तिला थोपटले आणि ती मेधाला म्हणाली 

“ही शबरी, माझी मुलगी ‘., त्यानी झोपलेल्या शबरीला जागे केले. त्या मुलीने डोळे उघडले. तिच्याकडे पहात त्या बाई म्हणाल्या 

“शबू, ही बघ मेधा, नाटकात आणि सिनेमांत तुझी भूमिका करणारी ‘

त्या मुलीने अत्यन्त कृश हात वर केले.

तिचा हात हातात घेत मेधा म्हणाली 

“काय झाले हिला?

“हे सर्व तुला सांगावे लागेल. तुमच्या नाटकाचा आणि फिल्मचा लेखक अश्विन हा माझा भाचा.

“काय? परत मेधा किंचाळली.

“होय, माझ्या मुंबईच्या बहिणीचा मुलगा. तो अधूनमधून माझ्याकडे यायचा. त्याचापेक्षा माझी मुलगी शबरी एका वर्षाने लहान. अकरावीत असताना सुट्टीत तो आला, पण येताना या वेळी त्याचा मित्र हेमंतला घेऊन आला ‘.

“कोण हेमंत? म्हणजे आमचा दिग्दर्शक?

“होय, तोच हेमंत. मी येथील एका हॉस्पिटल मध्ये नर्स होते. माझे यजमान स्कुटर अपघातात शबू लहान असताना वारले, मी तिला वाढवले.

हेमंत आणि शबू हे जवळ येत होते, हे माझ्या लक्षात येत होते. तसे मी अश्विन आणि शबू दोघांनाही बजावले होते. पण अश्विन मला म्हणाला, हेमंत हा एका सज्जन कुटुंबातील मुलगा आहें आणि चांगला कलाकार आहें, तू काळजी करू नकोस.

त्यानंन्तर पुढील वर्षातील सुट्टीत सुद्धा अश्विन आणि हेमंत आले, या वेळी मुंबई हुन मोटर सायकल घेऊन आले. मी कामावर गेले की ही तिघ गाडीवरून फिरायची. स्विमिंगला जायची, सिनेमा पाहायची.

– क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शबरी – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ शबरी – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

दीनानाथ नाट्यगृह, शनिवारी सायंकाळी “शबरी ‘नाटकाचा प्रयोग. या नाटकाचा हा पाचशेवा प्रयोग. नाटक नेहेमीप्रमाणे फुल्ल. नाटकाच्या मध्यंतरात शबरी नाटकाने पाचशे प्रयोग केले त्याचा कौतुक सोहळा ठेवला होता.

पहिल्या अंकाचा पडदा खाली गेला आणि पाच मिनिटात पुन्हा वर गेला. स्टेजवर मुंबईचें महापौर, नाट्य परिषदचे अध्यक्ष तसेच नाटकाचे लेखक अश्विन, दिग्दर्शक आणि या नाटकात भूमिका करणारा हेमंत आणि शबरीची भूमिका करणारी मेधा होती. 

प्रास्ताविक नंतर महापौरानी सध्याच्या काळात एका नाटकाचे पाचशे प्रयोग होतात यासाठी नाट्यनिर्माता जाधव, लेखक अश्विन आणि दिग्दर्शक हेमंत यांचे कौतुक केले आणि विशेष करून अपंग शबरी ची भूमिका करणाऱ्या मेधा चें कौतुक केले.

नाट्यनर्माता अध्यक्ष यांनी बोलायला सुरवात केली आणि ते शबरी ची भूमिका करणाऱ्या मेधा चें तोंड भरून कौतुक केले. शबरी ची भूमिका रंगभूमीवर करणे हे खूपच आव्हान होते, आणि एका अपंग मुलीचा अभिनय तिने अचूक केला आहें. तिचे कौतुक करावे तेवढे थोडे, अशी भूमिका आणि असे नाटक लिहिणारा अश्विन याचे पण कौतुक.

मग या नाटकाचा दिग्दर्शक आणि भूमिका करणारा हेमंत उभा राहिला “रसिकहो, आमच्या वझे कॉलेज मधून उन्मेष एकांकिका स्पर्धे साठी एकांकिका शोधत होतो, त्यावेळी अश्विन यांची ही एकांकिका वाचनात आली. या एकांकिकेने भारावून गेलो आणि करायला घेतली. शबरी च्या अत्यन्त कठीण भूमिकेसाठी माझ्याच वर्गातील मेधा हिची निवड केली आणि मी जिंकलो. कारण एका अपंग मुलीचे बेअरिंग तिने पूर्ण पन्नास मिनिटे उत्तम निभावले. ती एकांकिका अनेक ठिकाणी पहिली आली आणि मेधा प्रत्येक ठिकाणी विजयी ठरली. त्या एकांकिकेचा खूपच बोलबला झाला आणि मग अश्विन ने त्याचे दोन अंकी नाटक केले

हेमंत पुढे म्हणाला “रसिकहो, आजच्या पाचशे प्रयोगादरम्यान एक आनंदाची बातमी जाहीर करतो ती म्हणजे हे नाटक पाचशे एकावन्न प्रयोगानंतर बंद करण्यात येईल ‘.

अशी घोषणा होताच प्रेक्षक उभे राहिले “नाही नाही,हे नाटक बंद करायचे नाही, आम्ही पुन्हा नाटक पाहायला येणार, याचे हजार प्रयोग करायचे,’

हेमंत त्यांना शांत करत म्हणाला “शांत व्हा, शांत व्हा, प्रयोग बंद करायचे आहेत कारण या नाटकावर सिनेमा करायचा आहे आणि त्याचे दिग्दर्शन पण मीच करणार आहे आणि शबरी कोण करणार सांगा?

प्रेक्षक ओरडत राहिले “मेधा.. मेधा.. मेधा..

हेमंत प्रेक्षकांना समजावत म्हणाला ‘होय होय.. मेधा शिवाय कोण? आणि म्हणूनच प्रयोग थांबवावे लागणार. पण शूटिंग संपले की पुन्हा प्रयोग सुरु करू ‘

अशी घोषणा होताच प्रेक्षक शांत झाले.

नाटक पुढे चालू झाले आणि मग संपले. दुसऱ्या अंकात शबरी अपघातात सापडते आणि ती अपंग बनते, ते प्रसंग पहाताना प्रेक्षक नाटकाशी समरस होतात आणि कधी रडू लागतात हे त्यांनाच कळत नाही, अशा वेळी तिच्या शेजारी रहाणारा मनोज तिच्या मदतीला येतो आणि ती त्यातून बाहेर पडते.

नाटक संपले, प्रेक्षक भारावलेल्या स्थितीत आत येऊन मेधाला भेटायला येतच असतात. त्याची तिला सवय झालेली होती.

नाटक संपल्यावर मेधा आणि हेमंत कॅन्टीन मध्ये शिरली. त्यांना नेहेमी आवडणारी जागा कोपऱ्यातील. त्या कोपऱ्यातुन तलावाचे पाणी आणि पाण्यातील फिरणाऱ्या नौका दिसत. संध्याकाळी मंद लाईट सोडलेले असत. छोटी छोटी मुले आपल्या आई वडिलांसोबत नौकेतून फिरत. मेधाला हे दृश्य फार आवडे.ती एका खुर्चीवार येऊन बसली, तिच्यासमोर हेमंत येऊन बसला.

हेमंत -बोल, काय मागवू ?

मेधा -कॉफी आणि टोस्ट.

हेमंतने वेटरला ऑर्डर दिली.

हेमंत -प्रयोग छान झाला.

मेधा -एवढी तालीम मग एवढे पाचशे प्रयोग. प्रयोग बरा होतोच पण रोज तेच तेच करून मेक्यानिकल व्हायला होत.

हेमंत -आणखी पन्नास प्रयोग. मग शूटिंग सुरु.

मेघा गमतीने म्हणाली, “मला घेणार ना फिल्ममध्ये?

हेमंतने तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला “काय गम्मत करतेस ग, तूझ्याशिवाय शबरी कोण करणारे आहें काय?तलावातील फिरणाऱया होडीकडे पहात मेघा म्हणाली 

मेघा -हेमंत, मग मुलुंडच्या जागेच काय झालं?

हेमंत -अजून थोडे पैसे भरावे लागतील, तू मागे दिलेले तीन लाख आणि माझे दोन मिळून पाच भरलेत.हौसिंग करायला पाहिजे.

मेधा -मी वसंतरवाकडून ऍडव्हान्स मागते. पण फिल्मचे मला किती मिळतील?

हेमंत -आता वसंताकडे पैसे आलेत. आणि सिनेमा करणार म्हणजे तो कर्ज काढणार. बाकी इंडस्ट्रीत बाकी नट्या अंदाजे दहा लाख घेतात. तू पंधरा माग.

मेधा -एवढे पैसे देतील मला?

हेमंत -दयायलाच लागतील त्यांना.तूझ्या खेरीच शबरी कोणी उत्तम करू शकणार नाही, आणि दुसऱ्या नटीना प्रेक्षक पसंत करणार नाहीत. कारण या नाटकामुळे तुला सोशल मीडिया वर कमालीची पसंती मिळाली आहें.मेधा मग उठली. ती निघताना हळूच हेमंतने तिचा हात हातात घेतला. निघता निघता ती म्हणाली “साईट वर केंव्हा जाऊया?’.

“नुकत प्लॉट सफाई सुरु आहें, जरा बांधकाम वर येउदे, मग जाऊ, तसा तुला प्लॅन पाठवलाय मी व्हाट्सअपवर ‘.

हो, मी निघते ‘

म्हणत मेधा बाहेर पडली आणि आपल्या स्कूटरकडे गेली. तिने हेल्मेट डोक्यावर चढवले आणि सफाईदार वळण घेत ती नाट्यगृहाच्या बाहेर पडली.

या नंतर नाटकाचे दौरे नागपूर पासून संभाजीनगर पर्यत आणि पुणे पासून कोल्हापूर, कोकण ते गोवा असे सुरु झाले.

दौऱ्यावर असताना ती दोघे फिरून घ्यायची. विशेष करून कोकण गोव्यातील बीच, देवळ आणि वेगवेगळी हॉटेल्स चवदार जेवणासाठी. आता दोघांना एकमेकांशिवाय चैन पडायची नाही. नाट्य सिनेमा वर्तुळात आणि मासिकत आणि सोशल मीडिया वर त्याच्या प्रेमाची चर्चा आणि खबरबात चर्चली जात होती.

अशात प्रयोग सुरू होते. फिल्म करण्याच्या दृष्टीने पण धावपळ सुरु होती. फिल्म साठी इतर कलाकार निवडले जात होते. कॅमेरामन, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, एडिटर असे अनेक माणसे जवळ येत होती.शूटिंग साठी कोल्हापूर सांगली या भागातील लोकेशन्स निवडली गेली होती.

मेधाचें कपडे तयार होत होते. तिच्यासोबत तिच्या आईची भूमिका सुकन्या ही मोठी अभिनेत्री साकारणार होती. वडील मोहनराव, मोठा भाऊ अजिंक्य, हेमंत तिच्या प्रियकराचा रोल करणार होता आणि त्याच्या आई वडिलांसाठी निलीमा आणि जयंत हे मोठे कलाकार करणार होते, सर्वांनी आपल्या डेट्स या फिल्म साठी दिल्या होत्या, आणि…

“शबरी ‘

प्रयोग क्रमांक 549

आज मुलुंड मधील कालिदास नाट्यगृहात प्रयोग. आता शेवटचे दोन प्रयोग आणि मग पंधरा दिवसांनी शूटिंग साठी कोल्हापूर भागात निघायची सर्वांनी तयारी केलेली. जून महिन्याचा पाऊस सुरु झालेला.

     आज मेधाच्या आईचा वाढदिवस म्हणून प्रयोग संपल्यावर मेधा झटपट बाहेर पडली. बाहेर थोडा थोडा पाऊस होता म्हणून तिने रेनकोट चढवला आणि डोक्यावर हेल्मेट चढवून तिने स्कुटर चालू केली, तिची स्कुटर मुलुंड चेकनाक्यावरून पुढे गेली आणि तिथून टर्न घेऊन तिला मुख्य रस्त्याला लागायचं होत म्हणून तिने गाडी वळवली पण काही कळायचंय आत गाडी स्लिप झाली आणि मेधा रस्त्यात पडली, तिच्या अंगावर स्कूटर पडली.

मोठा आवाज झाला,

” गिर गयी.. गिर गयी.., अशी ओरड पडली, मागच्या गाड्या करकचून ब्रेक दाबत थांबल्या.

कोणी तरी  धावलं, पोलीस धावले आणि तिच्या अंगावरची गाडी ओढून बाजूला घेतली, मेधा जोरात जोरात ओरडत होती, रडत होती. पोलिसांनी ऍम्ब्युलन्स बोलावली आणि तिला उचलून आत ठेवले आणि ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने पळाली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन मोहाचे घर — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मन मोहाचे घर — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(माझीच दोन मुलं पण किती वेगळी निघावी?दैव तुझं, दुसरं काय !  बघायचं आता काय होईल ते. आपल्या हातात तरी दुसरं काय आहे.”) इथून पुढे —

त्यादिवशी सहज म्हणून शशांक प्राजक्ताच्या  क्लिनिक मध्ये गेला. या सगळ्या भानगडीत तिच्या क्लिनिकचं काय झालं असेल हे तो विसरूनच गेला होता.

सहज कुतूहलाने आत गेला तर डॉ राही तिथे पूर्वीसारखीच काम करताना दिसली .शशांकला बघून ती गोंधळूनच गेली. “ ये ना शशांक,” तिने स्वतःला सावरून त्याचे स्वागत केले. दवाखान्यात पूर्वीसारखीच गर्दी होती आणि राही अगदी समर्थपणे सगळं संभाळत होती.  ”.दोन मिनिटं हं शशांक.एवढं संपलं की मग मी फ्री होईन “ राही म्हणाली. हातातले काम संपवून राही म्हणाली,”आज इकडे कुठे येणं केलंस?” 

“ राही,तुला वेळ असला तर आपण कुठेतरी कॉफी प्यायला जाऊया का? दवाखान्यात नको बोलायला.”

“हो चालेल की “ म्हणून राही तयार झाली.

एका चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यावर शशांक म्हणाला, “राही, हे सगळं इतकं अनपेक्षित घडलंय की मी अजूनही त्यातून वर आलो नाही. मला एकच सांग,हे तुला माहीत होतं का?” राहीने हातांची अस्वस्थ हालचाल केली. “काय सांगू मी शशांक? प्राजक्ता काही दिवस खूप अस्वस्थ होती,.पण तिने मलाही हे काहीच सांगितलं नाही.  पण अगदी जायच्या आधी म्हणाली ‘ राही,हा दवाखाना आता तूच संभाळ.मी इथे परत येणार नाही.’ खूप रडली ती आणि मग मला सगळं सांगितलं. म्हणाली, ‘ शशांक फार सज्जन आणि चांगलाच आहे. पण मला सलील जास्त कॉम्पीटंट वाटतो. कसं ग सांगू राही,पण माझं मन सलीलकडे जास्त ओढ घेतंय. हे चूक आहे हे समजतंय मला पण मी मनाला फसवून शशांकशी संसार नाही करू शकणार.’ .खूप रडली प्राजक्ता आणि म्हणाली ‘ मी सगळी माणसं दुखावली. सासर माहेरही तोडलं.  पण माझा इलाज नाही.’ प्राजक्ता मग गेलीच घर सोडून आणि ती usa ला पोचल्याचा मेसेज आला मला. मलाही फार वाईट वाटलं शशांक. माझी इतकी जवळची मैत्रीण मला हे सगळं जायच्या आधी एक दिवस सांगते..“

शशांक स्तब्ध बसून हे ऐकत होता. ” राही, सोडून दे. नको वाईट वाटून घेऊ. हे विधिलिखित होतं असं समजूया आपण.” शशांक मग राहीला पोचवून घरी निघून गेला.

सलीलचे शशांकला मेसेज येत होते. ‘आम्ही छान आहोत, प्राजक्ता तिकडच्या परीक्षा देतेय, त्याशिवाय तिला इकडे जॉब मिळणार नाही’ असं  लिहायचा तो.  शशांकने कधी त्याला उत्तर नाही दिलं. हे म्हणजे जखमेवर आणखी मीठच नव्हतं का सलीलचं? शशांक आणखी आणखी शांत होत गेला आणि त्याने या गोष्टीकडे दुर्लक्षच करायचं ठरवलं.  आयुष्य पुढे चाललं होतं आणि शशांकला मुली बघण्यात आता काहीही रस उरला नाही. आई कळवळून म्हणायची, “ अरे त्या नालायक भावासाठी तू का आयुष्य बरबाद करतोस शशांक?तू पुन्हा लग्न कर बाळा. झालं ते होऊन गेलं. ते दोघे तिकडे मजेत आहेत आणि तू का  संन्याशाचं आयुष्य जगतोस ? कर छान मुलगी बघून लग्न आणि तूही हो सुखी ! “

त्या दिवशी ऑफिसमधून येताना त्याला राही दिसली. एका नव्या कोऱ्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसत होती ती. कुतूहलाने शशांक तिथेच थांबला आणि लांबून बघायला लागला पुढे काय  होते ते. राही सीटवर बसली आणि सफाईदारपणे तिने कार सुरू केली आणि ती भुर्रर्रकन गेली सुद्धा. शशांकला अतिशय कौतुक वाटले राहीचे. ती पायाने थोडी अधू आहे आणि तिचा डावा पाय अशक्त आहे हे माहीत होते त्याला. मनोमन तिच्या जिद्दीचं कौतुक करत शशांक घरी आला. मुद्दाम, पण राहीला सहजच वाटेल असा तो तिच्या  क्लिनिक वर गेला. ” वॉव राही,तुझी कार?कित्ती मस्त  आहे ग! मला आण ना राईड मारून.” कौतुकाने शशांक म्हणाला. “ओह शुअर. थांब माझे  पेशंट संपेपर्यंत.” राहीने मग काम संपल्यावर  क्लिनिक बंद केलं आणि शशांकला म्हणाली “चला, बसा.” 

ती ड्रायव्हिंग सीटवर बसली.  शशांकने बघितलं की ही कार फुल्ली ऑटोमॅटिक आहे. तिला डाव्या पायाने  ऑपरेट करण्याची गरजच नाहीये. मार्केटमध्ये अगदी नुकतीच आलेली ब्रँड न्यू नवीन टेक्नॉलॉजीची ही उत्कृष्ट कार घेतली होती राहीने.  जणू काही ही आपल्या टू व्हीलर ऑटोमॅटिक ऍक्टिव्हा सारखीच झाली की नाही? शशांकने तिला गाडी एका रेस्टोरॉपाशी थांबवायला सांगितलं. राही हसत खाली उतरली.

” ओह,मी ट्रीट देऊ का तुला?डन,” असं  म्हणत ती खाली उतरली. शशांक आणि राही हॉटेलात शिरले. एक छान जरा कोपऱ्यातले टेबल त्यांनी निवडले. ” राही,आता सांग. तुला अवघड वाटत नसेल तरच सांग हं. तुझ्या पायाला काय झालं होतं ग?रागावली नाहीस ना? “ “ नाही रे. त्यात काय रागवायचे?अरे मी लहान तीन वर्षाची असताना मला  एक अपघात झाला. माझ्या  डॅडींची नेहमी बदली होत असे.  त्या खेड्यात माझ्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर नीट उपचार झाले नाहीत. आणि मग ती कोवळी हाडे  वेडीवाकडी कशीतरीच जुळली. मग मला डॅडी मुंबईला घेऊन आले, पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. तिथेही निष्णात सर्जनने माझी आणखी दोन ऑपरेशन्स केली म्हणून इतका तरी चांगला झाला पाय.पण मला तो वाकवता येत नाही आणि कमजोर राहिला तो.म्हणून मला थोडे लिम्पिंग आले. पण माझं काहीच अडू दिलं नाही मी त्यामुळे. पण मी त्यावर  सहज प्रेशर देऊ शकत नाही. मग डॅडीनी मला ही  स्पेशल , नवीन टेक्नॉलॉजीची नुकतीच लॉन्च झालेली जरा महागडी कार माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून दिली.मी एकुलती एक लाडाची लेक आहे त्यांची.” राहीने हे अगदी हसत सहज  सांगितलं. शशांकच्या डोळ्यात पाणी आलं. आत्ता हसत सांगतेय ही पण त्या लहान मुलीने हे कसं सोसलं असेल याची कल्पना येऊन त्याचे डोळे पाणावले.  अपार प्रेम वाटलं त्याला तिच्याबद्दल. किती सुंदर.. सुशील आणि हुशार डेंटिस्ट होती राही.  आपल्या कमीपणाचं भांडवल न करता किती पॉझिटिव्हली या मुलीनं आपलं करिअर घडवलं. 

त्या दिवशी राहीने त्याला घरी सोडले.आणि सफाईदार वळण घेऊन ती घरी गेली सुद्धा. शशांक तिच्या घरी गेला. तिचे आई बाबा, राही सगळे घरात होते. शशांक म्हणाला,”काका काकू, तुम्हाला सगळं माहीत आहेच. माझा कोणताही दोष नसताना प्राजक्ता मला सोडून निघून गेली. आमचा रीतसर  डिव्होर्स झाला आहे. मी अजून राहीलाही हे विचारलं नाहीये. तुमच्या समोरच विचारतो, ‘ राही, मी तुला पसंत असलो तर आणि तरच माझ्याशी लग्न करशील? मला फार आवडलीस तू. आणि तुझा पाय  असा आहे म्हणून मी तुला विचारतो आहे असं समजू नकोस. या घटनेनंतरच मी तुला जास्त नीट ओळखायला लागलो राही. होतं ते बऱ्यासाठीच. कदाचित प्राजक्तापेक्षा उजवी मुलगी मला मिळावी असं देवाने ठरवलं असेल पण तुला हा असा लग्नाचा डाग लागलेला नवरा चालेल का?  तुला माझं कोणतंही  कम्पलशन नाही. विचार करून सांग सावकाश.’ “

काका काकू थक्क झाले. राही शशांकच्या जवळ येऊन बसली. “ अरे वेड्या,असं काय म्हणतोस? मी तुला काही आज ओळखत नाही. प्राजक्ता अशी वागली म्हणून मलाच जास्त दुःख झालं तुझ्यासाठी. तुला चालणार असेल तर करू आपण लग्न.. “ आणि पुढच्याच महिन्यात राही आणि शशांक विवाहबद्ध झाले. 

शशांकच्या आईबाबांना तर अस्मान ठेंगणे झाले ही गुणी मुलगी बघून. राही  शशांकचा संसार दृष्ट लागण्यासारखा चाललाय. छोट्या  इराने  त्यांच्या सुखात भरच घातली आहे.दोन्हीकडच्या आजीआजोबांना इराला संभाळताना आणि तिचे कौतुक करताना दिवस पुरत नाही. त्यांच्या घरात सलील प्राजक्ताचा विषयही कोणी काढत नाही. मध्यंतरी राहीला प्राजक्ताचे मेल येऊन गेले,पण राहीने तिला उत्तर द्यायचे नाही असेच ठरवले. त्या विषयावर शशांक, राही, आणि सगळ्यांनी कायमचा पडदा टाकला आहे..

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन मोहाचे घर — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मन मोहाचे घर — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आज प्राजक्ताचं लग्न.. दोन्ही घरात आनंद आणि उत्साह अगदी भरभरून ओसंडून वहातोय

प्राजक्ता तिच्या मनापासून आवडलेल्या मित्राशी, शशांकशी आज लग्न करतेय. किती खुशीत आहेत हे दोघेही.  खरं तर प्राजक्ता आणि शशांक  एकाच शाळेत  होते. दोघेही चांगले मित्र, एकाच गल्लीत बालपण गेलं त्यांचं. पण पुढे प्राजक्ताच्या वडिलांनी लांब फ्लॅट घेतला आणि मग तसा त्यांचा आता जुन्या घराशी संबंध राहिला नाही फारसा. शशांक  सी ए झाला आणि एका मोठ्या कंपनीत त्याला छान जॉबही मिळाला. त्या दिवशी तो मित्रांबरोबर हॉटेल ध्ये गेला होता. समोरच्या टेबलजवळ बसलेली मुलगी त्याच्याकडे एकटक बघत होती.मग  ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, “ तू  शशांक का रे? मी  प्राजक्ता. आठवतेय का ?सायकल शिकताना मला ढकलून दिलं  होतंस ते? ”  शशांक हसायला लागला. “ बाई ग,अजून तशीच आहेस का ग?भांडखोर?झिपरी?” दोघेही हसायला लागले. एकमेकांचे सेल नंबर घेतले आणि  प्राजक्ता मैत्रिणीबरोबर निघून गेली.  प्राजक्ता डेंटिस्ट झाली आणि तिने एका  मैत्रिणीबरोबर  क्लिनिक उघडले.. त्या दोघींना खूप छानच रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांचे क्लिनिक मस्तच चालायला लागले. दिवसभर प्राजक्ता अतिशय व्यस्त असायची आणि तिला बाकी काही करायला वेळच नसायचा. त्यादिवशी अचानकच शशांक तिच्या क्लिनिक वर आला.” हॅलो,प्राजक्ता, किती वेळ लागेल तुला फ्री व्हायला? “ .. 

“ तरी अर्धा तास लागेलच..बसतोस का तोपर्यंत? “ प्राजक्ताने विचारलं. ‘ ओह येस ! ‘ म्हणत शशांक तिथेच टेकला.आत प्राजक्ताची पार्टनर राही काम करत होती. किती सुरेख होती राही दिसायला..

ती  डेंटल चेअरवरून बाजूला झाल्यावर शशांकला दिसलं..राही एका पायाने  लंगडत चालतेय.खूप नाही पण तिच्या पायात दोष दिसत होता. काम संपवून प्राजक्ता बाहेर आली .” बोल रे.काय म्हणतोस?” 

“ काही नाही ग,म्हटलं वेळ असेल तर तुला डिनरला न्यावे.मस्त गप्पा मारुया ..मग मी पोचवीन तुला घरी.” ’प्राजक्ता हो म्हणाली आणि राहीला सांगून दोघेही बाहेर पडले.  त्या  दिवशीची डिनर डेट फार सुंदर झाली दोघांची. शशांक म्हणाला, “ तुला माझा  धाकटा भाऊ माहीत आहे ना? सलील? फक्त दीड वर्षानेच लहान आहे माझ्याहून.आम्ही दोघेही लागोपाठ शिकलो .मी सीए  झालो आणि सलील इंजिनीअर.  सलील यूएसए ला एम.एस.  करायला गेला तो गेलाच. खूप छान आहे तिकडे नोकरी त्याला.मी जाऊन आलोय ना तिकडे. मस्त घर घेतलंय आणि खूपच पैसे मिळवतोय तो. म्हणाला मला, तू येऊ शकतोस इथे. पण मलाच नाही तिकडे जाऊन सेटल व्हायची हौस.  माझं काय वाईट चाललंय इथं? मस्त नोकरी आहे, मोठे पॅकेज आहे. मला फारशी हौस नाही परदेशात जाऊन कायम सेटल व्हायची. “ 

यावर प्राजक्ता म्हणाली, “ हो तेही बरोबरच आहे आणि इथे छानच चाललंय की तुझं.” 

त्या दिवशी प्राजक्ताची आई  म्हणाली,”अग रोज भेटताय,हिंडताय मग आता  लग्न का करून टाकत नाही तुम्ही?ठरवा की काय ते. पण आता  उशीर नका करू बर का.” .. प्राजक्ताने शशांकला त्या दिवशी  भेटून आपली आई काय म्हणते ते सांगितले.शशांक म्हणाला, “ बरोबरच आहे की. सांग,कधी करायचं आपण लग्न?मी एका पायावर तयार आहे.”  

प्राजक्ताचे आईबाबा शशांकच्या घरी जाऊन भेटले आणि  लग्न ठरवूनच परतले. पुढच्याच महिन्यात थाटात साखरपुडा झाला आणि आज  शशांक- प्राजक्ताचं लग्न सुमुहूर्तावर लागत होतं . लग्नासाठी खास रजा घेऊन अमेरिकेहून सलील  मुद्दाम आला होता. सगळं घरदार अगदी आनंदात होतं. प्राजक्ताचं लग्न झालं आणि चार दिवसांनी शशांक आणि प्राजक्ता हनिमूनला आठ दिवस बँकॉकला जाऊन आले. सगळ्यांना तिकडून करून आणलेली खरेदी दाखवली, हसत खेळत जेवणं झाली आणि  दुसऱ्या दिवशी शशांकचे ऑफिस होते. प्राजक्ता म्हणाली, “ मलाही क्लिनिकवर जायला हवं. बिचारी राही एकटी किती काम करणार ना? मीही उद्यापासून जायला लागते दवाखान्यात.’’ 

त्यादिवशी घरात कोणीच नव्हते. शशांक ऑफिसला गेला आणि काकाकाकू मुंबईला  गेले होते. प्राजक्ता अंघोळ करून आली  आणि तिला कल्पनाही नसताना अचानक सलील तिच्या बेडरूममध्ये काहीतरी विचारायला म्हणून आला. प्राजक्ता त्याला बघून गोंधळूनच गेली.टॉवेल गुंडाळूनच ती बाथरूम बाहेर आली होती.सलील तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघतच राहिला आणि त्याने तिला मिठी मारली. न कळत नको ते दोघांच्या हातून घडले. सलीलचा तो उत्कट स्पर्श, धसमुसळा राकट शृंगार प्राजक्ताला आवडून गेला. 

“सॉरी प्राजक्ता  मला माफ कर.पण मला फार आवडलीस तू.’” .. सलील तिथून निघून  गेला. त्या रात्री शशांकचा नर्म मृदु शृंगार तिला नकोसा झाला. हे अतिशय चुकीचे घडतेय हे समजत असूनही सलील आणि प्राजक्ता स्वतःला थांबवू शकले नाहीत..  सलील आणि प्राजक्ता बाहेर भेटायला लागले कोणाच्याही नकळत. लग्नाला अजून महिनाही झाला नव्हता.सलीलची यूएसए ला जायची तारीख जवळ आली.त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर सगळे जमले असताना प्राजक्ता म्हणाली ”मला तुम्हा सगळ्यांशी महत्वाचं बोलायचंय. तुम्ही अत्यंत रागवाल हेही मला माहीत आहे. शशांक सॉरी. मी सलीलबरोबर अमेरिकेला जाणार आहे.मला इथे रहायचे नाही. मी तुला बिनशर्त घटस्फोट देईन. मला काही नको तुझ्याकडून. पण मी सलीलशी लग्न करणार तिकडे जाऊन. तुझा यात काहीही दोष नाही पण मला सलील योग्य जोडीदार वाटतो ”.सलील मान खाली  घालून हे ऐकत होता. हे ऐकल्यावर सगळ्या कुटुंबावर तर बॉम्बस्फोटच झाला.

” अग काय बोलतेस तू हे?अग तुझं शशांकशी लव्ह  मॅरेज झालंय ना? अर्थ समजतो ना त्याचा?आणि काय रे गधड्या सलील? वहिनी ना ही तुझी? कमाल झाली बाबा.आम्ही हताश झालो हे ऐकूनच. प्राजक्ता,अग नीट विचार कर.हे फक्त शरीराचे आकर्षण नाहीये, आणि ते खरेही नसते.नातिचरामि ही लग्नातली शपथ तुलाही बांधील नाही का?” सासूबाई कळवळून म्हणाल्या. सलील म्हणाला “सॉरी शशांक.पणआता आम्ही मागे फिरणार नाही. तुझ्याशी लग्न ही चूक झाली प्राजक्ताची. ती माझ्याबरोबरच येणार आणि आम्ही तिकडे लग्न करणार हे नक्की.” त्याच रात्री प्राजक्ताच्या आई वडिलांनाही बोलावून घेतले आणि हे सगळे सांगितले.  ते तर हादरूनच गेले हे ऐकून.” अग कार्टे,हे काय  चालवलं आहेस तू?काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा की.  या बिचाऱ्या शशांकचे काय चुकले ग? कमाल आहे खरंच. शशांक, आम्हीच तुझी माफी मागतो रे बाबा ! “  आईबाबा  तळतळ करत बोलत होते. “ हे जर केलंस ना प्राजक्ता तर तू मेलीसच आम्हाला म्हणून समज.” बाबा उद्वेगाने म्हणाले. सलील आणि प्राजक्ता गप्प बसून सगळे ऐकून घेत होते. काहीही न बोलता प्राजक्ताने घर सोडले आणि ती सलील बरोबर हॉटेलमध्ये  रहायला गेली. 

सासूसासरे थक्क झाले, ‘ हे इतके यांनी ठरवलं कधी आणि पुढे काय होणार? ‘त्यांनी सलीलशी बोलणेच टाकले. त्यानी विचारलेही नाही की तू कधी परत जाणार आहेस. शशांक सुन्न होऊन गेला होता. काय तोंड दाखवणार होता तो जगाला? महिन्यांपूर्वी लग्न झालेली आपली बायको,जी आधी प्रेयसीही होती,ती आपल्या सख्ख्या भावाबरोबर अमेरिकेला निघून गेली? शशांकची झोपच उडाली. या मुलीने व्हिसा कधी केला,तिचे जायचे कधी ठरले काही काही पत्ता नव्हता कोणालाही.  ठरल्या वेळी सलील प्राजक्ता निघून गेले अमेरिकेला .. 

शशांक तर उध्वस्त व्हायचा शिल्लक राहिला. जगाच्या डोळ्यातली कीव सहानुभूती आश्चर्य त्याला सहन होईना.पण त्याने स्वतःला सावरले. त्या दिवशी तो आई बाबांना म्हणाला,”आई बस झालं. ती निघून गेली हा तिचा निर्णय होता. आपण का झुरत आणि जगापासून तोंड लपवत बसायचं?आपण काय पाप केलंय? तुम्हीही आता आपलं नेहमीचं आयुष्य  जगायला लागा. मीही हे विसरून नवीन आयुष्य सुरू करीन, अगदी आजपासूनच. अग, यातूनही काहीतरी चांगलं घडेल आई! “ त्याचे समजूतदारपणाचे शब्द ऐकून गहिवरून आलं आईला. .. ” शशांक,बाळा,माणसाने इतकेही चांगले असू नये रे की आपलं हक्काचंही आपल्याला सोडून द्यावं  लागावं! मला अभिमान वाटतो रे तुझा .माझीच दोन मुलं पण किती वेगळी निघावी?दैव तुझं, दुसरं काय !  बघायचं आता काय होईल ते. आपल्या हातात तरी दुसरं काय आहे.”  

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ वाटणी ☆ श्री सुनील शिरवाडकर

रोडच्या एका बाजुला जरा मोकळी जागा दिसली तशी किसनने आपली कार तेथे पार्क केली.रस्त्यावर तशी शांतताच होती. एखाद दुसरी रिक्षा,स्कुटर जात येत होती.पलिकडे असलेल्या मार्केटमध्ये त्यांचे नेहमीचे सराफी दुकान होते. पण तिकडे कार लावायला जागा मिळत नाही. म्हणून मग त्याने दुसरीकडे कार पार्क केली आणि चालत मार्केटमध्ये आले.बरोबर त्याची मोठी बहिण होती.

“चल ताई..आलं सुवर्ण लक्ष्मी ज्वेलर्स”  किसन म्हणाला.

“अनिलशेठ आहे का बघ.आपण फोन केलाच नव्हता त्यांना”

“असतील.या वेळी ते असतातच”

काचेचा जाड दरवाजा ढकलुन ते दुकानात आले.रणरणत्या उन्हातुन ते आल्यामुळे त्यांना दुकानातली एसीची थंडगार झुळुक सुखावुन गेली. मंगलने पदराने घाम पुसला. जवळच्या पर्समधून पाण्याची लहान बाटली काढली.खुर्चीत टेकत दोन घोट घेतले.

दुकानात अनिलशेठ तर होतेच..पण त्यांचा मुलगाही होता.समोर लावलेल्या टीव्हीवर कुठला तरी चित्रपट पहात होते.

“या किसनभाऊ.आज काय बहिण भाऊ बरोबर. काय काम काढलंत?”

” शेठजी आम्ही आज  एका वेगळ्याच कामासाठी आलोय. तुम्हाला तर माहीतीच आहे. आमचे अण्णा गेले दोन महीन्यापुर्वी”

“हो समजलं मला. बऱच वय असेल ना त्यांचं?”

“हो नव्वदच्या आसपास होतच.तर आम्ही हे दागिने आणले होते. जरा बघता का!”

किसनने पिशवीतून पितळी डबा काढला. काऊंटरवर असलेल्या लाल ट्रे मध्ये ठेवला. त्यात त्यांचे पिढीजात दागिने होते.

अनिलशेठनी ते बाहेर काढले.मोहनमाळ, पोहेहार,बांगड्या, पाटल्या, काही अंगठ्या,वेढणी,आणखी तीन चेन होत्या.

“आम्ही तिघे भावंडं. याचे तीन भाग करायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे आलोय.”

अनिलशेठनी ते दागिने पाहिले. कसोटीवर त्याचा कस उतरवुन शुध्दतेचा अंदाज घेतला.काही दागिने तापवुन घेतले.२२ कैरेटचे दागिने बाजुला ठेवले. चोख सोन्याच्या बांगड्या, पाटल्या आणि काही वेढणी होती.ते एका वेगळ्या डिशमध्ये ठेवली. वजने वगैरे करुन ते आकडेमोड करत होते.

“तु सांग ना त्यांना..”

“नको.तुच सांग..”

अनिलशेठनी मान वर करुन पाहीले.दोघा बहिण भावात काहीतरी कुजबुज चालु होती.

‘काय.. काही प्रॉब्लेम आहे का?”

किसन आणि मंगल दोघे एकमेकांकडे पहात होते. कसं सांगावं..नेमकं कोणत्या शब्दात सांगावं त्यांना समजत नव्हतं.

“बोला किसनभाऊ.निःसंकोचपणे बोला.पैसे करायचे का याचे?का फक्त तीन भागच करायचे आहे?”

मग शेवटी मंगलच पुढे झाली. शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली..

“तीन भाग तर करायचेच आहे हो,पण..”

“पण काय..?”

“दोन भागात ते चोखचे सगळे दागिने टाका.आणि उरलेल्याचा तिसरा भाग करा”

“असं कसं?तिसऱ्या भागात  सगळे २२ कैरेट दागिने? अहो त्यातले काही डागी आहेत.त्याला बऱ्यापैकी घट येणार आहे”

“हां..पण तुम्ही टाका ते तिसऱ्या भागात.”

“असं कसं? मग सारखे भाग कसे होतील?”

“ते आम्ही बघू. मी सांगते तसं करा”

अनिलशेठनी मग मंगलने सांगितल्याप्रमाणे भाग केले.खरंतर ते असमान वाटप होते.पण तसं सांगण्याचा अधिकार त्यांना नव्हता. तीन डिशमध्ये तीन भाग झाले. आणि मग किसनने बहिणीला विचारले..

“ताई,बोलवू का रमेशला?’

“हांं..लाव फोन त्याला.लवकर ये म्हणावं.वेळ नाहीये आमच्याकडे”

तोवर किसनने फोन लावलाच होता.

“हैलो रम्या कुठे आहेस तु? हां..गैरेजवरच आहे ना.. लगेच ये..अरे अनिलशेठच्या दुकानात.. नाही नाही.. लगेच.वेळ नाहीये आम्हाला. थांबतोय आम्ही”

“हातात काम आहे म्हणत होता तो.”

“हो..आम्हीच बसलोय बिनकामाचे.ये आणि घेऊन जा म्हणावं तुझा वाटा”

रमेश म्हणजे त्यांचा तिसरा भाऊ.जवळच्याच एका गैरेजमध्ये काम करायचा.वयाने बराच लहान. त्याचं आणि किसन,मंगलचं फारसं पटायचं नाही. पटायचं नाही म्हणजे तोच यांच्यापासून बाजुला पडल्यासारखा झाला होता. आणि त्याचं कारण म्हणजे त्याची परीस्थिती.किसन,मंगलच्या तुलनेत तो कुठेच नव्हता.

थोड्या वेळात तो आलाच.अंगावर कामाचेच कपडे होते. काळे.. ऑईलचे डाग पडलेले. हातही तसेच.आत आल्यावर तो जरा बावरला.अश्या एसी शोरुममध्ये येण्याची त्याची ही पहीलीच वेळ.आल्या आल्या त्याने दोघांना नमस्कार केला.

” काय गं ताई..तु पण इथे आहे का? कशाला बोलावलं मला दादा?”

“हे बघ,अण्णा तर गेले. आता हे दागिने. त्यांच्या कपाटातले… त्याची वाटणी केलीय. अनिलशेठनीच वजनं वगैरे करुन तीन भाग केलेत. त्यातला हा तुझा वाटा”

असं म्हणून किसनने ती तिसरी डिश त्याच्या समोर ठेवली. आता त्याची काय प्रतिक्रिया होते याची उत्सुकता दोघांच्या.. आणि हो..अनिलशेठच्या चेहऱ्यावर पण… 

रमेशने त्या डिशमध्ये ठेवलेले दागिने पाहिले. इतरही दोन वाटे तेथेच होते. तेही त्याने पाहीले.अशिक्षित होता तो..पण तरी त्याच्या लक्षात आले..ही वाटणी असमान आहे. बोलला काही नाही तो..फक्त मनाशीच हसला.

“काय रे..काय विचार करतोस? दिला ना तुला तुझा वाटा?मग घे की तो.आणि जा.घाई आहे ना तुला?”

“हो जाणारच आहे मी.ताई..दादा, तुम्ही मला आठवणीने बोलावले.. माझा वाटा दिला. खुप आनंद वाटला. पण मला तो नकोय”

किसन,मंगल,आणि अनिलशेठही थक्क झाले. त्या सगळ्यांनाच वाटलं होतं की तो आता चिडणार..जाब विचारणार. पण हा तर म्हणतोय..मला काहीच नको.

“का रे..का नको?कमी  पडतयं का तुला?अं..तुलनेत काय वाटतंय.. तुला कमी दिलंय आणि आम्ही जास्त घेतलयं?”

“कमी आणि जास्त..काय ते तुमचं तुम्हाला माहीत. पण दादा, ताई खरं सांगु का? तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय”

“अरे असं का बोलतोस रमेश..” मंगलचा सूर जरा नरम झाला होता.

“नाही ताई..आई गेली तेव्हा  मी लहान होतो. तुच माझं सगळं केलं. तुझ्या, दादाच्या लग्नात मी काही देऊ शकलो नाही. कारण मी कमवतच नव्हतो ना तेव्हा. तर हाच माझा आहेर समजा तुम्हाला “

असं म्हणुन त्याने त्याच्या वाट्याची डिश त्यांच्याकडे सरकवली.

” गरीबी आहे माझी.. पण मी समाधानी आहे. हे सोनं नाणं..नाही गरज मला याची.जे मिळतं त्यात सुखानं माझा संसार चाललाय. घ्या तुम्ही हे खरंच. निघतो मी.कामं आहेत मला आज जरा”

असं बोलून दरवाजा ढकलुन तो बाहेरही पडला. किसन,मंगल अवाक झाले. काय झाले.. रमेश काय बोलला हे समजेपर्यंत तो निघूनही गेला होता.

आत्ता आत्तापर्यंत लहान असलेला त्यांचा भाऊ आज त्यांना आपल्यापेक्षा मोठा वाटून गेला. गरीब असलेला रमेश त्या सर्वांपेक्षा एका क्षणात श्रीमंत ठरुन गेला.

सत्य घटनेवर आधारित

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वारस… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वारस… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(८०टक्के माणसं जेवणाच्या हाॅलकडे पळाली. ज्यांना जेवायला जागा मिळाली नाही अशी उरलेली २० टक्के बुकस्टाॅलकडे वळली.) – इथून पुढे — 

अरुण कलेक्टरसाहेबांशी बोलत असतांनाच त्याचे साहेब समोर आले.

“अरे अरुण आम्हांलाही पैसे द्यावे लागणार आहेत का पुस्तकाचे?”त्यांनी विचारलं.

“काय साहेब तुमच्याकडून कोण पैसे घेईल?मी सांगतो स्टाँलवरच्या मुलाला पुस्तक द्यायला ” अरुण म्हणाला पण महिन्याला दिड लाख पगार घेणाऱ्या आणि पंधरा लाखांच्या गाडीत फिरणाऱ्या साहेबाला तिनशे रुपयेही जड व्हावेत याचा त्याला राग आला.

थोड्यावेळाने त्याच्या मेव्हण्या आल्या.

“पंत आम्हालाही तुमच्याकडून गिफ्ट म्हणून हवंय पुस्तक “अरुणच्या बायकोनेे त्याच्याकडे डोळ्यांनी इशारे केले’नाही म्हणू नका’ असा त्यांचा अर्थ होता.

“आणि आम्हांलापण” जवळच उभे असलेले त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक म्हणाले. अरुण नाही म्हणणं शक्यच नव्हतं.

“अभिनंदन अरुण. अरे सगळ्यांना फुकट पुस्तकं देतोय आणि आम्ही मात्र पैसे देऊन घ्यायचं?बहुत नाइन्साफी!ऐसे नही चलेगा अरुण. अरे एवढ्या जीवलग मित्रांपुढे तीनशे रुपये कुठे लागतात?”अरुणच्या मित्रांचा घोळका अरुणच्या भोवती जमा झाला. फुकट पुस्तकांच्या मागणीने अरुण अस्वस्थ झाला. पुस्तक लिहितांना आपण घेतलेल्या मेहनतीचं जरासुद्धा मोल या लोकांना जाणवू नये या विचारांनी तो बैचेन झाला.

जेवणं झाली. बरेचसे पाहुणे अरुणचं अभिनंदन करुन निघून गेले. अरुण पुस्तकांच्या स्टाॅलवर आला. स्टाॅलवर अगदी मोजकी पुस्तकं दिसत होती.

“वा बरीच पुस्तकं गेलेली दिसताहेत”त्याने आनंदाने स्टाॅलवरच्या मुलाला विचारलं.

“हो साहेब आपण तीनशे पुस्तकं ठेवली होती त्यातली फक्त पंचवीस उरली आहेत. पण त्यातली फक्त पन्नास पुस्तकं लोकांनी विकत घेतलीत. बाकीची दोनशेपंचवीस पुस्तकं फुकट वाटण्यात गेली आहेत”

“काय्यsssकुणी नेलीत एवढी फुकट पुस्तकं?”अरुणने संतापाने विचारलं

“साहेब मी कुणाला ओळखत नाही पण बऱ्याच जणांनी तुमचं नाव सांगून पुस्तकं नेली. मग मॅडमच्या मैत्रिणी आल्या होत्या. या दादाचेही मित्र आले होते. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी दिली पुस्तकं”

अरुणने रागाने बायको आणि मुलाकडे पाहिलं. बायको म्हणाली

“हो मग! तुम्ही तुमच्या मित्रांना फुकट दिली. मग माझ्या मैत्रिणींनी काय घोडं मारलंयं?त्या नेहमी मला काही ना काही गिफ्ट देत असतात मग मला त्यांना काही द्यायला गिफ्ट द्यायला नको?”

“हो ना. माझे मित्रही तसेच आहेत. दहाबारा  पुस्तकं त्यांना दिली तर बिघडलं कुठे?”मुलाने विचारलं

“अरे बाबा प्रश्न असा आहे की ही माणसं पुस्तक वाचणार आहेत की फक्त शोकेसमध्ये ठेवणार आहेत?”

“ते आम्ही कसं सांगणार?नेलं तर वाचतीलच ना?”

“तसं नसतं रे. खरा पुस्तकप्रेमी पुस्तक विकत घ्यायला मागेपुढे पहात नाही. या फुकट्या लोकांना साहित्यप्रेमी कसं म्हणणार?”

पुस्तकविक्री झाली म्हणजे छपाईकरता केलेला खर्च काही प्रमाणात तरी वसुल होईल हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू साध्य न झाल्याने अरुण अत्यंत नाराजीनेच घराकडे निघाला.

घराजवळ येऊन पहातो तर एक बाई आणि एक तेराचौदा वर्षाचा मुलगा गेटजवळच उभे होते. कपड्यांवरुन तरी ते गरीब दिसत होते. अरुण गाडीखाली उतरताच ते त्याच्याजवळ आले. अरुणने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं.

“साहेब ते पुस्तक पाहिजे होतं” तो मुलगा घाबरत घाबरत म्हणाला.

“पुस्तक? कोणतं पुस्तक?”

तशी त्या मुलाने घडी केलेलं वर्तमानपत्राचं कटींग खिशातून काढून दाखवलं. अरुणच्या “संघर्ष” या पुस्तकाचा एका लेखकाने करुन दिलेला परीचय होता तो. कालच्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला.

” हो मिळेल ना! पण फुकट नाही मिळणार. पैसे लागतील त्याचे” त्याची चिडलेली बायको पुढे येत म्हणाली.

“किती लागतील ताई पैसे?”त्या बाईने विचारलं

“पाचशे रुपये”अरुणचा मुलगा म्हणाला. त्याचा हा आगाऊपणा अरुणला मुळीच आवडला नाही.

त्या बाईने कसलीही चर्चा न करता कमरेला लावलेली पिशवी सोडली. त्यातुन बऱ्याच दहा वीस रुपयांच्या चुरगळलेल्या नोटा काढून मुलाजवळ दिल्या.

“मोज रे सुशा”

मुलगा नोटा मोजू लागला. तशी ती बाई अरुणला म्हणाली

“दादा पोराला लई आवड आहे पुस्तक वाचायची. जे मिळेल ते वाचीत बसतो. पेपरमध्ये तुमच्या पुस्तकाचा फोटो पाहिला तवापासून मागे लागलाय हे पुस्तक घ्यायचं म्हणून”

“कुठे रहाता तुम्ही ताई आणि काय करता?”अरुणने उत्सुकतेने विचारलं

“ती बिल्डींग दिसती नव्हं का?”थोड्याशाच अंतरावरील बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींगकडे बोट दाखवत ती म्हणाली”तिथंच म्या बांधकामावर मजुरी करते. पोरगाबी शाळा सुटली की तिथंच मजुरी करतो. बिल्डींगजवळ त्या झोपड्या दिसतात ना त्याच्यात आमी रहातो”

“या मुलाचे वडील काय करतात?”

“बाप नाही त्याचा. मेलं ते मागच्याच वर्षी. लय दारु प्यायचं”

तेवढ्यात मुलाने पैसे मोजून त्याच्या हातात दिले.

“मोजून घ्या साहेब, पाचशे आहेत”

“काय नाव बेटा तुझं?”

“सुशांत”

“कोणत्या शाळेत जातो आणि कितवीत आहेस?”अरुणने विचारलं

“नगरपालिकेच्या शाळेत जातो. नववीत आहे”

त्याचं शुध्द बोलणं ऐकून अरुण आश्चर्यचकित झाला.

“अजून कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत?”

“अरे सुशा जा पुस्तकं घिवून ये आणि दाखीव साहेबाला ” सुशा पळतपळत झोपडीकडे पळाला.

“साहेब लई हुशार पोरगं हाय. नेहमी पयल्या नंबरने पास होतं”बाईच्या डोळ्यातून पोराचं कौतुक ओसांडून वहात होतं. सुशा चारपाच पुस्तकं घेऊन आला. चेतन भगत, राँबिन शर्मा, पु. ल. देशपांडे आणि इतर अनोळखी लेखकांची जुनी फाटलेल्या अवस्थेतली पुस्तकं होती ती.

“कुठून मिळवलीस ही पुस्तकं?”अरुणने विचारलं

“ते भंगारवाले येतात बघा. त्यांना सांगून ठेवलंय. रद्दीत पुस्तकं आली की ते आणून देतात. एका पुस्तकाचे वीस रुपये देतो त्यांना. बरेच जण पैसे घ्यायला नाही म्हणतात पण फुकट कशाला घ्यायच?त्यांनाही पोट आहे ” सुशा म्हणाला. अरुणला लाखांच्या गाड्यांमध्ये फिरणारे, वीसपंचवीस हजाराचा फोन बाळगणारे आणि तरीही फुकट पुस्तक मागणारे आठवले आणि त्याचा संताप झाला. त्याने सुशांतला जवळ घेतलं आणि विचारलं

” बेटा तुला रोज नवीन पुस्तक वाचायला आवडेल?”

सुशांतचा चेहरा आनंदाने केवढा तरी फुलला

“हो साहेब”

अरुणने गाडीतून त्याचं नवीन पुस्तक आणि मागे प्रकाशित झालेली दोन पुस्तकं काढून सुशांतच्या हातात ठेवली. सुशांत त्याकडे गोंधळून पहात असतांनाच अरुणने पाचशे रुपयातले साठ रुपये काढून बाकीचे पैसे त्याला परत केले.

“तुला फुकट पुस्तकं घेणं आवडत नाही म्हणून प्रत्येक पुस्तकाचे वीस असे तीन पुस्तकाचे साठ रुपये फक्त मी घेतलेत”

“पण साहेब… तुमी इतकी मेहनत घेऊन लिहिलेलं पुस्तक… “

“नाही ताई. तुमचा मुलगा खरा पुस्तकप्रेमी आहे. त्याच्याकडून मला जास्त पैसे नकोत. आणि सुशांत, माझ्या घरातल्या लायब्ररीत हजारो पुस्तकं आहेत. तू रोज येऊन त्यातलं पुस्तक वाचू शकतो. एखादं नवीन पुस्तक बाजारात आलं तर मला सांग. कितीही महागडं असलं तरी मी तुला ते वीस रुपयातच  देईन. “

त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. पदराने ते पुसता पुसता ती सुशांतला म्हणाली

“सुशा पाया पड साहेबाच्या”

सुशांत पाया पडायला खाली वाकला तोच अरुणने त्याला वरच्यावर उचलून छातीशी धरलं

“ताई आता हे वर्ष जाऊ द्या. दहावीला आपण सुशांतला चांगल्या शाळेत टाकू आणि घाबरु नका त्याच्या शिक्षणाचा खर्च मी करेन”

दोघां मायलेकांच्या तोंडावरुन आनंद ओसंडून वाहू लागला. अरुणलाही खुप आनंद झाला होता. त्याच्या पुस्तकांच्या संपत्तीला वारस मिळाला होता.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वारस… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वारस… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

“आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी उपस्थित सर्व मान्यवर,आजचे सत्कारार्थी आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री.अरुण नाईक यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं” सुत्रसंचालिकेने अशी विनंती करताच अरुण, जिल्हा साहित्य संघाचे अध्यक्ष आणि कलेक्टर साहेबांसोबत व्यासपीठावर जाऊन बसला.समोरच्या प्रेक्षागृहाकडे त्याने पाहिलं.प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं.एकही खुर्ची रिकामी नव्हती.”हे सगळे खरोखरच पुस्तकप्रेमी आहेत की पत्रिकेत जेवायचंसुध्दा निमंत्रण आहे  म्हणून फक्त जेवायला आलेले लोक आहेत?” त्याच्या मनात विचार आला.मागे त्याने पुस्तक प्रकाशनाचे दोनतीन कार्यक्रम बघितले होते.फारच कमी उपस्थिती होती.त्याच्या स्वतःच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनावेळीही अगदी मोजकी डोकी हजर होती.अर्थात आजचा कार्यक्रम वेगळा होता.त्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या जीवनावर आधारित कादंबरी “संघर्ष”ला साहित्य अकादमीचा राष्ट्रीय  पुरस्कार मिळाला होता.त्यानिमीत्त जिल्हा साहित्य संघातर्फे आज त्याचा सत्कार आणि मुलाखत असा दुहेरी कार्यक्रम होता.पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक आणि मित्रपरीवार त्याला सतत पार्टी मागत होते.म्हणून मग अरुणने स्वखर्चाने कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था केली होती.

या कादंबरीसाठी अरुणला खुप मेहनत करावी लागली होती.आदिवासींच्या जीवनाच्या अभ्यासासाठी त्याला गडचिरोलीच्या जंगलात कित्येक वेळा रजा घेऊन जावं लागलं होतं.बऱ्याचदा तर त्याला १५-२० दिवस जंगलातच मुक्काम करावा लागला होता.दोन वर्षाच्या अथक मेहनतीतून कादंबरी तयार तर झाली पण तिला पुण्यामुंबईतला कोणताही प्रकाशक छापायला तयार होईना.सध्याच्या व्हाॅटस्अप आणि फेसबुकच्या जमान्यात एवढी मोठी ३०० पानांची कादंबरी विकत घेऊन वाचणार कोण?हा त्यांचा प्रश्न होता आणि तो रास्तही होता.

त्याच्या स्वतःच्या घरात तो स्वतः सोडून कुणालाच पुस्तक वाचण्याची आवड नव्हती. एक लाखांहून जास्त रुपये किंमतीची पुस्तकं त्याच्या स्टडीरुममध्ये होती पण त्याची मुलं आणि बायको त्यांच्याकडे ढूंकूनही बघत नव्हती.मुलं व्हाॅटस्अप आणि फेसबुकमध्ये हरवून गेली होती तर बायकोला टिव्ही सिरीयल्सशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं.आपल्या पश्चात या बहुमोल खजिन्याचं काय होणार?त्याला वारस कुठून आणणार?की अशीच रद्दीमध्ये त्याची विल्हेवाट लागणार? याची अरुणला सतत काळजी लागलेली असायची.घरची ही परिस्थिती. बाहेरच्यांकडून काय अपेक्षा करणार?पण अरुण त्या कादंबरीने झपाटला होता. पुण्यामुंबईतल्या प्रकाशकांनी नकार दिल्यावर त्याने स्थानिक प्रकाशकांशी संपर्क साधला.बरीच फिरफिर केल्यानंतर एक प्रकाशक तयार झाला.मात्र अट ही होती की पुस्तक विक्रीला येईपर्यंतचा सगळा खर्च अरुणने स्वतः करायचा.नाईलाजास्तव पदरचे सत्तर हजार रुपये खर्च करुन अरुणने पुस्तक प्रकाशित केलं.योगायोग म्हणा,नशीब म्हणा की पुस्तकाचा उच्च दर्जा म्हणा,अरुणच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

आपल्या देशात चमत्कार केल्याशिवाय कुणी नमस्कार करत नाही.या अगोदरही अरुणची दोन पुस्तकं प्रकाशित झाली होती.तीही चांगली दर्जेदार होती पण वाचक,समाज,मिडियाने त्यांना नगण्य प्रतिसाद दिला होता.पुस्तकांची विक्रीही यथातथाच झाली होती.त्यामुळे ती पुस्तकं छापण्याचा खर्चही अरुणच्याच बोकांडी बसला होता.मात्र “संघर्ष”ला पुरस्कार मिळाला आणि अरुण एकदम प्रकाशझोतात आला.अनेक पुस्तकं लिहुनही पुरस्कार मिळवू न शकणाऱ्या जुन्या लेखकांना या बातमीने जबरदस्त धक्का बसला तर नवीन लेखकांना हुरुप आला.”संघर्ष” वर चर्चा झडू लागल्या.बऱ्यावाईट प्रतिक्रिया मिळू लागल्या.खुप जणांना ते फालतू पुस्तक वाटलं तर काही जणांना वास्तव!पण पुरस्कार सगळयांची तोंड बंद करत असतो.शेवटी उशीरा का होईना अरुण नाईकचे सत्कार समारंभ सुरु झाले.आजचा सत्कार समारंभही जिल्हा साहित्य संघात बराच काथ्याकूट झाल्यानंतरच ठरला होता.कारण  अरुणसारख्या नवोदित लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळावा हेच प्रस्थापित साहित्यिकांच्या पचनी पडलं नव्हतं.

वक्त्यांची भाषणं सुरु झाली.अरुणने पाहिलं समोरच्या सोफ्यावर बसलेला त्याचा मुलगा आणि मुलगी मोबाईलशी खेळण्यात गुंतून गेले होते.बापाच्या सत्कारसमारंभचं त्यांना सोयरसुतक नव्हतं.बायको जांभया देत बसली होती.अधुनमधुन तिचेही हात आणि डोळे मोबाईलमध्ये गुंतत होते.

बाहेरच्या बाजुला असलेल्या स्टाॅलवर प्रकाशनाच्या इतर पुस्तकांबरोबर अरुणचीही पुस्तकं होती.वाचक ती चाळत चर्चा करत होते.

“काय रे घेतोय का पुस्तक?”एकाने आपल्या मित्राला विचारलं

” नाही रे बाबा.फार महाग आहे”

“अरे महाग कसलं!फक्त पाचशे रुपयांचं आहे.शिवाय ४० टक्के डिस्काऊंट धरुन फक्त तीनशेला पडतंय ते पुस्तक!”

” अरे बाबा ते ठिक आहे पण तीनशे पानाचं पुस्तक वाचायला कुणाला इथं फुरसत आहे?व्हाॅटस्अप आणि फेसबुकवरचे मेसेजेस पहातापहाताच दिवस निघून जातो.शिवाय हे पुस्तक आदिवासींच्या जीवनावर आहे.आपला काय संबंध आदिवासींशी?”

” हो तर ते सिडने शेल्डन आणि आयर्विंग वँलेस यांची पुस्तकं तू नेहमी वाचायचास. त्यांच्याशी तुझा फार जवळचा संबंध आहे वाटतं?”समोरचा हसत म्हणाला ” आणि संबंध नाही म्हणतोयेस तर फोटो का काढतोय पुस्तकाचा?अरे!व्वा!मोबाईल नवीन घेतलास वाटतं!”

“हो मागच्याच आठवड्यात घेतलाय.तो मागचा मोबाईल होता ना त्याचा कॅमेरा इतका खास नव्हता”

“अच्छा!फक्त तेवढ्याच कारणाकरीता बदललास होय!कितीचा आहे?”

“फक्त पंचवीस हजाराचा.आणि फोटो याकरीता काढतोय की हे पुस्तक काही दिवसांनी लायब्ररीत येईलच त्यावेळी पुस्तकाचं नाव आठवावं म्हणून!म्हणजे पुस्तक खरेदी करायची गरज नाही.फुकट वाचता येईल.बरं आज तू कसा काय इकडे?”

“काही नाही रे.या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं.यायची इच्छा नव्हती.आपण कुठे एवढे पुस्तकप्रेमी!पण बायको म्हणाली जेवणही ठेवलंय म्हणून आलो तेवढीच बायकोला स्वयंपाकापासून फुरसत.तू कसा काय आलास?”

“माझंही तुझ्यासारखंच सेम सेम”

दोघांनी जोरात हसून एकमेकांना टाळी दिली.

वक्त्यांची भाषणं झाली.अरुणचा सपत्नीक सत्कारही झाला.प्रकट मुलाखतही संपण्यात आली होती.

“अरुणजी आता शेवटचा प्रश्न!”मुलाखतकार म्हणाले ” प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हंटल्या जातं.तुम्ही याबद्दल काय सांगाल?”

अरुण या प्रश्नासाठी तयार होता. क्षणभरात दोन वर्षाचा काळ त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला.या दोन वर्षात त्याच्या बायकोने या पुस्तकासाठी कसलीही मदत तर केली नव्हतीच उलट त्यात अडथळेच आणण्याचा प्रयत्न केला होता.तिला अरुणचं असं वारंवार गडचिरोलीला जाणं अजिबात पसंत नव्हतं.मुळात ती त्याच्या पुस्तक लेखनाला रिकामे उद्योग म्हणायची.या विषयावरुन तिने त्याच्याशी अनेकदा भांडणंही केली होती.त्यामुळे ती प्रेरणा असणं शक्यच नव्हतं.त्याच्या आईलाही त्याचं सदोदित पुस्तक वाचणं आवडायचं नाही.ती त्याला पुस्तकी किडा म्हणायची.त्याला प्रेरणा मिळाली होती त्याच्या वडिलांकडून.त्यांनीच त्याला पुस्तकांचं वेड लावलं होतं आणि लिहायला उद्युक्त केलं होतं.” मनातल्या भावना कागदावर उमटत गेल्या की सुचत जातं ” असं ते म्हणायचे.त्यांच्यामुळेच अरुण वर्तमानपत्रातून लेख,कथा लिहू लागला होता.

पण या भावना जगासमोर मांडणं शक्य नव्हतं.तशा त्या  मांडल्या तर तो समस्त  स्त्रीजातीचा अपमान ठरला असता.अनिच्छेने का होईना अरुणने जगरहाटीसोबत जायचं ठरवलं.

” अर्थातच माझी आई आणि माझी पत्नी यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी लेखक होऊ शकलो.आज आई हयात नाही पण माझ्या पत्नीने तिची उणीव मला कधी जाणवू दिली नाही.तिचं सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळेच आज हे पुस्तक पुर्ण होऊ शकलं.माझ्या या पुरस्काराची अर्धी वाटेकरी ती आहे”

सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर फोटोग्राफर्सचे फ्लँश चमकू लागले.बायको खुश झाली.अरुणला मात्र आपण वडिलांवर अन्याय केला असं प्रकर्षांने जाणवून गेलं.

कार्यक्रम संपला.सूत्रसंचालिकेने अरुणचं पुस्तक सभागृहाबाहेरच्या स्टाॅलवर सवलतीत उपलब्ध असल्याचं जाहीर केलं त्याचबरोबर जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जावू नये अशी सुचनाही केली. ८०टक्के माणसं जेवणाच्या हाॅलकडे पळाली. ज्यांना जेवायला जागा मिळाली नाही अशी उरलेली २० टक्के बुकस्टाॅलकडे वळली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(अरे मैत्रीत अहंकाराची भावना तर सोड, तरतम भाव देखील नसतो. अर्थात अशा गोष्टींवर तुझा विश्वासच नाहीये तर तुला अशा गोष्टी सांगूनही काही उपयोग नाही म्हणा. येतो गड्या, स्वत:ला सांभाळ.!’) इथून पुढे 

केशवची आणि माझी ती शेवटचीच भेट होती. त्यानंतर मनातून दुखावलेल्या केशवने माझ्याशी कधीच संपर्क साधला नाही. माझ्यातल्या अहंकारामुळे मीदेखील त्याच्याशी पुन्हा कधी संपर्क साधला नाही. मी केशवला दिनकरच्या लग्नातही बोलावले नाही. मी आपल्याच धुंदीत होतो.”

“काका, बाबांनीसुद्धा माझ्या लग्नात तुम्हाला कुठे निमंत्रण दिले होते? द्या सोडून तो विषय. आता दिनकर काय करतोय?”

“अरे मीच केशवशी संबंध तोडले होते, तर तो मला कशाला बोलवेल? माझ्या कर्तृत्वाने जर आमचे मालक एवढे कमावत असतील तर मी स्वत:चा व्यवसाय केला तर किती कमवीन असा विचार करून नोकरी करता करता मी स्वत:चा एक कारखाना सुरू केला. दिनकरला मध्येच शिक्षण सोडायला लावून त्याच्यावर मी कारखान्याची जबाबदारी सोपवली.

व्यवसायात गुंतवलेल्या तुटपुंज्या भांडवलीमुळे मी लवकरच अडचणीत आलो. कधीतरी चव चाखणाऱ्या केशवला मी व्यसनी म्हणवून हिणवले होते. एकेकाळी निर्व्यसनी असलेला मी दारूच्या व्यसनाच्या गर्तेत पुरता सापडलो. चांगल्या पगाराच्या नोकरीला मुकलो. लवकरच माझी भणंग अवस्था झाली. नियतीचे फासे उलटे पडत गेले. शनि महाराजांनी कधी माझा अहंकार तुडवून मला रसातळाला आणले होते ते कळलं देखील नाही. मला पाचही पुत्रच आहेत हा माझा अहंकार माझ्या मुलांना भोवला. विधात्याने माझ्या मुलांच्या पोटी केवळ कन्यारत्ने देऊन त्याची कसर भरून काढली.

माझ्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर वा चार्टर्ड अकाउंटट करीन अशी मी दर्पोक्ती केली होती, ते राहूनच गेले. पाचही बोटे एकत्रपणे एक मूठ बनून राहतील असे वाटत असतानाच माझी मुले वाट फुटेल तिकडे निघून गेली. मी त्यांना एकत्रही ठेवू शकलो नाही. माझ्या कर्माची फळे मला इथेच भोगावी लागली. असो.

आज केशवच्या वार्षिक श्राद्ध दिवशी तरी माझ्या मनात साठलेले हे दु:ख मोकळे करावे म्हणून मी आलोय. दिलदार मनाच्या केशवने मला कधीच माफ केले असेल.” असे म्हणत केशवांच्या तसबिरीला हात जोडून रामदास ह्यांनी नमस्कार केला.

“काका, बराच उशीर झाला आहे, आलाच आहात तर आता इथे जेवूनच जा.”

अविनाशच्या बोलण्याकडे काणाडोळा करीत ते एवढेच म्हणाले, “औक्षवंत हो बाळा.” आणि काही कळायच्या आतच पायऱ्या उतरून ते निमूटपणे बाहेर पडले.

अविनाश पप्पांच्या तसबिरीकडे पाहत राहिला. ‘मी नोकरीवर रूजू होताना पप्पांनी काडीचीही मदत केली नाही ही अढी किती वर्षे उराशी बाळगून होतो. त्यामागचा उद्देश्य आज कळला. खरंच, माझं पिलू माझं बोट सोडून दुडूदुडू चालताना मला कोण आनंद झाला होता. माझ्या पप्पांनी देखील, मी नोकरीला लागताना केलेल्या धडपडीत अगदी तोच आनंद अनुभवला असणार ! रामदास काकांनी सांगितलं नसतं तर माझ्या मनांत ती अढी कायम राहिली असती.’

अविनाशने सुस्कारा टाकला. आईकडे पाहत सहज म्हणाला, “आई, रामदास काका काय म्हणत होते ते ऐकलंस ना? लेकी असोत वा सून किंवा नातवंडांवर असलेले पप्पांचे प्रेम अगदी स्पष्टच दिसून यायचे. परंतु मी कधी पप्पांच्या तोंडून माझ्याविषयी कौतुकाचा शब्द ऐकल्याचे मला आठवत नाही. माझ्यावर ते कित्येकदा ओरडायचे. मी मोठा भाऊ असून देखील तिघी बहिणींना कधी एका शब्दाने बोलू द्यायचे नाहीत.”

सुमित्राबाई काहीशा गंभीर होत म्हणाल्या, “डेबू, तुला खरं सांगू? तुझ्या माघारी ते तुझा उल्लेख अविनाश किंवा डेबू असं केलेलं मी कधीच ऐकलं नाही. ‘साहेबांचं जेवण झालं का? साहेबांना हे सांगितलंस काय, ते सांगितलंस काय?’ असे विचारायचे. आपला डेबू साहेब आहे याचे त्यांना प्रचंड कौतुक होते. तुझ्याशी ते कोडगेपणाने वागायचे आणि तुझ्या बहिणींना मात्र लाडाने वागवायचे. हे आजवर तू कधी बोलून दाखवलं नाहीस परंतु ते त्यांच्या लक्षात आले होते. एकदा बोलता बोलता ते म्हणाले होते, ‘मुलगा आणि मुलगी यांच्यात मी भेदभाव करतो असं तुम्हा सगळ्यांना वाटत असेल. तसं मुळीच नाही. या उलट बहुतेक घरात वंशाचा दिवा म्हणून मुलाला ‘लाटसाहब’ सारखी वागणूक देतात आणि मुलगी परक्याचे घरचे धन आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करतात. याबाबत माझा दृष्टीकोन थोडासा वेगळा आहे. मुली उपवर झाल्या आहेत. त्यांची शिक्षणे होताच त्या कधी सासरी जातील याचा नेम नाही. मुलींना नवरा कसा मिळेल, सासर कसं मिळेल हे माहित नाही. जोवर कन्या आपल्या घरांत आहे तोवर आपल्या ऐपतीनुसार तिला एखाद्या राजकुमारीसारखे वागवावं. तिला काही कमी पडू देता कामा नये. तिचे करता येतील तेवढे लाड करावेत, असं मला वाटतं, या घरची लेक असल्याचा तिला अभिमान वाटला पाहिजे.

सुमित्रा, अगं ह्या चिमण्या कधी घरटं सोडून भुर्र्कन उडून जातील याचा नेम नाही म्हणून माझं बापाचं काळीज धडधडतं. हे मी कुणाला सांगू? पोरींना जप हो.’

भावुक होत गेलेले तुझे पप्पा लगेच स्वत:ला सावरत मला म्हणाले, “डेबू मोठा झाल्यावर त्याच्यात जोपासल्या गेलेल्या पुरूषी अहंकारामुळे त्याने स्त्रीला कधी दुय्यम लेखण्याची चूक करू नये म्हणून मी त्याच्याशी थोडा फटकळ वागतोय हे मला मान्य आहे. आपल्या मुलींनी जी घरकामे करावीत अशी तू अपेक्षा करतेस ना, ती सर्व कामे तू डेबूकडूनही करवून घे. ही तुला विनंती आहे.’ त्यांनी असं स्पष्टच सांगितल्यावर मी काय बोलणार सांग?

डेबू, तुला सांगते, २६ जुलै २००५ चा तो काळाकुट्ट दिवस मी विसरूच शकत नाही. मुंबईतल्या त्या प्रलयकारी पावसानंतर रस्ते पाण्याने भरून वाहतूक खोळंबली होती. माणसे जागच्या जागी अडकली होती. आम्ही टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. तुझ्याशी संपर्क होत नव्हता. खूपच चिंता वाटत होती. अचानक फोन घणघणला. तुझे पप्पा लगेच ओरडले, ‘सुमित्रा, साहेबांचा फोन आला असेल बघ.’ मी फोनवर तुझ्याशी बोलले. त्यांनी देवाचे आभार मानले. पहाडासारख्या असणाऱ्या तुझ्या पप्पांच्या डोळ्यांत मी पहिल्यांदाच आसवं दाटलेली पाहिली. भीतीने हादरल्याचे आणि चिंतेतून सावरल्याचे असे ते ऊन पावसासारखे बरसणारे सुखदुःखाचे अश्रू होते. डेबू, आईबाबांना मुले आणि मुली सारखेच प्रिय असतात रे.”

अविनाश केशवच्या तसबिरीपुढे हात जोडून साश्रु नयनांने पुट्पुटला, “पप्पा, तुमच्या धाकामागे लपलेले तुमचे अपार प्रेम मी पाहू शकलो नाही. तुमच्या या पिलाला माफ करा. आय लव्ह यू पप्पा.”

— समाप्त —

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

संध्याकाळचे साडे सात वाजले असतील. रस्त्यावरचे दिवे मंदपणे जळत होते. रिक्षातून उतरून तो घरात पाऊल टाकतच होता, तेवढ्यात कुणीतरी ‘अविनाश’ अशी हाक मारल्याचं त्याने ऐकलं. मागे वळून पाहिलं. घराशेजारच्या वळचणीखाली दाढीचे खुंट वाढलेला एक खंगलेला वृद्ध गृहस्थ उभा होता. अविनाशने त्यांना ओळखलं नाही.

ते गृहस्थ दोन पावले पुढे येत क्षीण आवाजात म्हणाले, “तू मला ओळखलं नसणार. मी रामदास काका. तुझा मित्र दिनकरचा बाबा..” 

“काका, तुम्ही? माफ करा. खरंच मी तुम्हाला ओळखलं नव्हतं. या आत या.” अविनाशने असे म्हटल्यावर ते हळूच आत येऊन खुर्चीवर बसले आणि संथपणे म्हणाले, “कसा ओळखशील?….. मला पाहून तीस वर्षे तरी लोटली असतील. अंगात पांढरा शुभ्र शर्ट, स्वच्छ पांढरे मर्सराईज्ड धोतर नेसलेला, डोक्यावर काळी टोपी आणि कपाळावर तिरूमानी रेखलेला काकाच तुझ्या स्मृतीपटलावर असणार. त्यात तुझी काहीच चूक नाही. 

मीच कर्मदरिद्री आहे. केशवसारख्या माझ्या सत्शील आणि नि:स्वार्थी मित्राला मी ओळखू शकलो नाही. माझा स्वत:विषयीचा फाजील आत्मविश्वास नडला. मी अहंकाराच्या नशेत इतका चूर झालो होतो की मला कुणाचीच तमा बाळगावीशी वाटली नाही. त्यामुळे माझं सगळंच नुकसान झालं. सारासार विवेकबुद्धीच नष्ट झाली होती म्हण हवं तर. राखी बांधण्यासाठी, भाऊबीजेला ओवाळण्यासाठी म्हणून येणाऱ्या माझ्या सख्ख्या बहिणींना यापुढे असले थोतांड घेऊन माझ्या घरी येऊ नका म्हणून त्यांना दूर लोटलं होतं.” 

“काका, आता ते सगळं विसरा. इकडे कसं येणं केलंत?”

“अविनाश, मी अजूनपर्यंत केशव आणि माझी झालेली अखेरची भेट विसरलेलो नाही. माझ्या डोळ्यांसमोर तो भेटीचा प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा तरळतो आहे. मध्यंतरी केशव गंभीर आजारी असल्याचे मला कळलं होतं. एकदा भेटून त्याची माफी मागावी असं मनात होतं पण दुर्दैवाने ते अखेरपर्यंत जमलं नाही. असो.”

तितक्यात आतून चहा आला. चहा घेतल्यानंतर काकांना बोलायला थोडंसं त्राण आलं. ते परत बोलायला लागले.   

“अविनाश, त्या दिवशी साधारण रात्रीचे नऊ वाजले असतील. त्यावेळी आजच्यासारखी फोन किंवा मोबाईलची सुविधा नव्हती. मला कामावरून यायला खूप उशीर होतो हे माहित असल्यानं, केशव मला त्यावेळी भेटायला आला होता. माझ्या हातात पेढ्याचा बॉक्स देत तो मोठ्या उत्साहाने म्हणाला, ‘रामदासा, आज दुपारीच अविनाशला ‘क्लार्क कम टायपिस्ट’ म्हणून नेमणुकीचं पत्र मिळालं आहे. आधी तुलाच ही आनंदाची बातमी सांगायला आलोय. दिनकरनेही लेखी परीक्षेत आणि इंटरव्यूत नक्कीच बाजी मारली असती बघ.’ 

त्यावर मी कुत्सितपणे हसत म्हणालो, ‘केशव तुझं अभिनंदन करतो. परंतु मी काय सांगतो ते ऐक. तू आता माझ्या दिनकरबद्दल बोललास ना ते खरं आहे, तो ही स्पर्धा परीक्षा नक्कीच पास झाला असता. परंतु त्याचा जन्म  बॅंकेतला कारकून होण्यासाठी झाला नाहीये. माझा मुलगा दिनकर आणि सर्वच मुलं डॉक्टर, इंजिनियर वा चार्टर्ड अकाउंटट होण्यासाठी जन्माला आली आहेत. माझी मुलं हुशारच आहेत आणि मी देखील त्यांना शिकवायला समर्थ आहे हे लक्षात ठेव.’  

केशव मला मध्येच तोडत बोलला, ‘रामदासा, तुझा काही तरी गैरसमज होतोय. अरे मी दिनकरची हुशारी पाहूनच तो ह्या स्पर्धा परीक्षेत सहज पास होऊ शकला असता अशा अतिशय सदहेतूने बोललो, बाकी काही नाही.’ 

मी त्याला तुच्छपणे म्हणालो, ‘केशव, तुझ्या तुटपुंज्या पगारातून त्याला उच्च शिक्षण देणे शक्यच होणार नाही. त्यात तुला दारूचे व्यसन. तुझ्या हाताशी दोन पाचशे रूपये कमावणारा का होईना एक मुलगा हवाच. दुसरं असं की तुझ्या उरावर तिघा मुलींच्या लग्नाची जबाबदारी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. मला पांडवांच्यासारखे पाचही मुलेच आहेत. मला त्यांच्या लग्नाची चिंता नाही.’  माझा प्रत्येक शब्द केशवच्या काळजाला कापत गेला असणार आहे.           

आपल्या अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवत केशव एवढेच म्हणाला, ‘रामदासा, तुला एकच सांगतो की एवढा अहंकार बरा नव्हे. अहंकार आणि स्वाभिमान या दरम्यान एक अत्यंत अस्पष्ट सूक्ष्म अशी पुसट रेषा असते. तुझी मुलं खूप हुशार आहेत हे तू गर्वाने सांगतानाच, माझा मुलगा अविनाश किती सामान्य कुवतीचा आहे, हे तू सुचवायचा प्रयत्न केला आहेस. तुझ्या मुलांना शिकवायला तू समर्थ आहेस हे सांगताना, माझ्या असमर्थतेची जाणीव करून दिलीस. तुझं म्हणणं खरेही आहे कारण मला तुझ्याइतका पगार नाहीये. दुसरं असं की एक अहंकारी व्यक्तीच दुसऱ्याला कायम कमी लेखत असते. असो.’ 

‘हे तुला सगळं कबूल आहे ना? मग मी जे बोललो आहे त्यात काय चुकलं माझं?’ मी फटकळपणे बोलून गेलो.  

‘रामदास, एक लक्षात ठेव, तुझी मुले अगदी लहानशी गोष्ट देखील तुझ्या मदतीशिवाय करू शकत नाहीत. परंतु माझ्या अविनाशला मी प्रत्येक वेळी समर्थ आणि स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज अविनाशने जी नोकरी मिळवलेली आहे ती त्याच्या स्वत:च्या हिंमतीवर मिळवली आहे. त्यात माझा वाटा शून्य आहे. वर्तमानपत्रातली जाहिरात पाहून मला न विचारताच त्याने अर्ज केला. पुण्याला लेखी परीक्षेला येण्या-जाण्यासाठी लागणारे वीस रूपये रेल्वे भाडे त्याने एका मानलेल्या मामाकडून उसने मागून घेतले. लेखी परीक्षा देऊन पुण्याला मुलाखतीला जाताना देखील कुणाकडे तरी पैसे उसने घेऊन गेला. सिलेक्शनचे हे सगळं दिव्य पार पाडल्यानंतर, अविनाशला ओळखणाऱ्या दोघा प्रतिष्ठितांची नावे आणि सह्या हव्या होत्या. त्या सह्याही त्याने स्वत:च्या हिमतीवर मिळवल्या.’ 

‘माझ्याकडे पाठवलं असतंस तर मी सही केली असती, त्यात काय?’ मी गुर्मीतच म्हणालो.

‘अरे, त्याने मला विचारलं असतं तर तुझ्याकडे पाठवलं असतं ना? आज त्या एकोणीस वर्षाच्या पठ्ठ्याने सिव्हील सर्जनकडून फिटनेस सर्टिफिकेटही आणलं आहे. मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. माझ्या वयाच्या एकेचाळीसाव्या वर्षी मी माझ्या मुलाला स्वत:च्या पायावर उभा राहताना पाहतोय. भले तो आज क्लार्क कम टायपिस्ट का असेना, परंतु भावी आयुष्यात तो स्वत:च्या जिद्दीवर यशाचे शिखर गाठेल याची मला खात्री आहे. माझ्या मुलाच्या कर्तृत्वावर असलेला हा आत्मविश्वास आहे. हा माझा अहंकार नव्हे, कारण अहंकार कधीही घातकच ठरतो. असं म्हणतात की जिथे कुठे अहंकार उफाळून वर येतो तिथे शनी महाराज शीघ्रपणे पोहोचतात आणि त्या अहंकारी माणसाला तुडवूनच ते पुढे जातात. रामदास, एकदा कृष्ण सुदाम्याची मैत्री आठवून पाहा. अरे मैत्रीत अहंकाराची भावना तर सोड, तरतम भाव देखील नसतो. अर्थात अशा गोष्टींवर तुझा विश्वासच नाहीये तर तुला अशा गोष्टी सांगूनही काही उपयोग नाही म्हणा. येतो गड्या, स्वत:ला सांभाळ.!’

  – क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इंदू… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ इंदू….  ☆ सौ. वृंदा गंभीर

“भालचंद्र पाटील”बोरगावचे पाटील. घरची परिस्थिती उत्तम. गावात नव्हे पंचक्रोशीत त्यांच्या शब्दाला मान होता. गावासाठी सतत धावणारे, उत्तम प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. गरिबांसाठी माया, ममता होती त्यांच्याकडे. गावात शिस्त होती. आदरपूर्वक दरारा होता त्यांचा त्यांना सगळे प्रेमाने आप्पा म्हणायचे … सगळं होतं पण मुलगा नव्हता. एकच मुलगी होती तिचं नावं “इंदू” होतं.

“इंदू, शाळेत जात होती गावात बारावी पर्यंत शाळा होती. पुढचं शिक्षण शहरात घ्यावं लागणार होतं. तिची दहावी झाली आता अकरावी, बारावी झाल्यावर काय असा प्रश्न पडला, तिला पुढे शिक्षण घायचं होतं खूप इच्छा होती.

कॉलेज सुरु झालं इंदू खूप अभ्यास करायची तिचा अभ्यास बघून आप्पांना वाटायचं पोरीचं स्वप्न पूर्ण करावं व तिला शिक्षणाला पाठवावे. इंदू बारावीला तालुक्यात पहिली आली तिचा पुढचा प्रवास सुरु झाला. तिला इंजिनियरिंग ला ऍडमिशन मिळालं,,, इंदू अभ्यासात हुशार असल्यामुळे ती लगेच सर्वांची लडकी झाली.

“इंदू ” दिसायला खूप सुंदर होती, उंच सडपातळ बांधा, गोरीपान, सरळ नका, धनुष्या सारखे  गुलाबी ओठ, काळेभोर पाणीदार डोळे, रेशमी मुलायम दाट आणि लांबसडक केस, बघताच कुणीही प्रेमात पडावं अशीच होती.

इंजिनियरिंगचे दोन वर्ष झाले होते, इकडे आप्पांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले… आता आई एकटीच होती. तीही फार खचून गेली होती. कधी दोघे  एकमेकांना सोडून राहिले नव्हते, त्यामुळे त्या खूप उदास झाल्या होत्या. इंदू म्हणाली ‘ मी कॉलेज सोडून गावी येते ‘. पण आई नको म्हणाली, इंदुची एक मावस मावशी होती, तिचा नवरा लोकांच्या शेतात काम करून घर चालवत असे, इंदूचे मामा तिच्या आईला म्हणाले, ”आक्का सखुला राहू दे तुझ्या जवळ. तुला सोबत होईल आणि दाजी शेती बघतील,”  ते सगळ्यांना पटलं व सखू व बबन तिथे राहायला आली…

आता सगळी जबाबदारी पाटलीणबाई वर आली होती. गावातील लोक मदत करत होते, सखू, बबन छान काम करत होते सगळं कसं सुरळीत चालू होतं.

इंदूच इंजिनियरिंग पूर्ण झालं व ती M. S साठी ओस्ट्रेलिया ला गेली.

 इकडे बबनची आई त्याला भेटायला म्हणून आली आणि एवढं वैभव बघून तिच्या लालच निर्माण झाली. तिने बबनला सांगितलं “ तू बघतो सगळं याला कोणी वारस नाही. मुलगी तर परदेशात गेली ती काय परत येते. तू हे सगळं तुझ्या नावावर करून घे. किती दिवस गरिबीत काढायचे.. आता हे आयत हाती लागलं आहे हे सोडू नको, , , , ”, बबन ने सखुला विश्वासात घेतलं, तिला सगळं सांगितलं. तिला पण श्रीमंतीचे स्वप्न पडायला लागले. ती त्याला हो म्हणाली, आणि, त्यांनी प्ल्यान तयार केला.

पाटलीणबाईकडून हळूहळू गोड बोलून वेगवेगळे कारणं सांगून सह्या घेतल्या. काही गावातील लोकांना स्वतःकडून करून घेतलं आणि सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतली. त्यांचं वागणं बदलू लागलं लोकांची ओरड येऊ लागली. पाटलीणबाई बबनला म्हणाल्या “आमच्या जिवाभावाची लोकं आहेत असं त्रास देऊ नका. नाहीतर तुम्ही जाऊ शकता, ”  सखू म्हणाली “ होय आक्का जावंच लागेल.. पण तुला. आता हे सगळं आमचं आहे आणि तूच आमच्या नावावर केलं आहे. ” 

पाटलीणबाईला धक्का बसला व त्या जागेवरच गेल्या. पै पाहुणे जमा झाले गावाला हुरहूर लागली होती. काही लोकं बबनने फसवलं म्हणून पाटलीणबाई गेल्या असं म्हणत होते, तर काही लोकं त्यांनीचं सगळं बबनला दिलं असं म्हणत होते.

इंदू आली.. अंत्यसंस्कार झाले, ती तेरा दिवस राहिली व परीक्षा होती म्हणून निघून गेली.

आप्पांचे एक मित्र होते त्यांना आप्पा सगळं सांगत होते. ते इंदुच्या मामांना भेटले व त्यांनी एका वकिलाचा फोन नंबर त्यांना दिला. त्यांच्याकडे जायला सांगितलं. तेव्हा इंदूचे मामा म्हणाले “तुम्ही चला आपण जाऊन येऊ “ त्यांनी एक दिवस ठरवलं व वकिलांना भेटायला गेले.

बबन व सखू सातव्या अस्मानावर होते. फुकटच मिळालं होतं. पैशाची, माणसांची किंमत राहिली नव्हती. उग्रट, टाकून बोलणं होतं. माणसं तुटली होती……

मामा वकिलांकडे गेले, वकिलांना सगळं सांगितलं. त्यांनी मामाला सांगितलं की असं होऊ शकतं नाही कारण प्रॉपर्टी सगळी इंदुच्या नावावर आहे आणि ती जेव्हा लग्न करेल तेंव्हाच तिला मिळेल.. असं मृत्यूपत्र केलेलं आहे. आता कुठे मामाच्या जीवात जीव आला होता.

दुसऱ्या दिवशी पोलीस व वकील गावात आले. बबन कुठे आहे? असा कडक आवाज दिला, सखू बाहेर आली, पोलीस बघून घाबरली व ते शेतात गेले असं सांगितलं, ‘ जा बोलून आणा त्याला ‘ वकील म्हणाले, सखुने एका मुलाला बबनला बोलवायला पाठवलं.

बबन आला, “ पोलीस?  मी काय केलं.. तुम्ही इकडं कसे, ”  असं बोलल्यावर वकील म्हणाले 

“ आम्हाला इथे दुसरा केअर टेकर ठेवायचा आहे. तू घर खाली कर, ”  तेंव्हा बबन म्हणाला “ हे माझं आहे पाटलीणबाईने माझ्या नावावर केलं आहे. ” असं म्हणत त्याने पेपर वकिलांच्या अंगावर फेकले, वकील व पोलीस हसायला लागले व “ खोटे कागदपत्र तयार करून धमकी देऊन सह्या घेतल्या आहेत, पण ही प्रॉपर्टी ज्याची आहे तिची सही कुठे आहे. ”

बबन गडबडला व म्हणाला म्हणजे, तस वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून वाचायला सुरवात केली तशी बबनच्या पायाखालची जमीन सरकली. खोटे कागदपत्र व फसवणूक केली म्हणून बबन सखुला अटक झाली. गावातील लोकांनी साक्ष दिली. पाटलीणबाई याच्या त्रासाने गेल्या त्या जाण्यासारख्या नव्हत्या तोही  आरोप झाला व जन्मठेपेची शिक्षा त्यांना मिळाली.

वकिलांनी केअर टेकर ठेवला व प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात दिली,,, 

इंदूच M. S पूर्ण झालं. ती भारतात आली. एका कंपनीत तिला जॉब मिळाला. तिचं काम हुशारीने ती CEO झाली. तिच्याच कंपनीत एक हँडसम मुलगा मॅनेजर होता. त्याच नावं ” राहुल “. तो इंजिनियर होता, खूप हुशार आणि टॅलेंटेड होता. घरची परिस्थिती नाजूक होती. त्याची खूप मोठी स्वप्न होती. त्याला एका मोठ्या कंपनीचा मालक व्हायचं होतं. तो न थकता काम करत होता.

इंदूला पण तो आवडायला लागला. दोघं मीटिंगला बरोबर असायचे, विचार जुळत होते. त्यांना एका  मिटिंगला जायचं होतं दिल्लीला. दोन तीन दिवस लागणार होते. दोघेही गेले. त्या कपंनीने त्यांची राहण्याची सोय एका आलिशान हॉटेलमध्ये केली होती. ते तिथे पोहचले व फ्रेश होऊन मीटिंगला गेले, मिटिंग छान झाली. दुसऱ्या दिवशी डील  फायनल झालं, त्या कंपनीने पार्टी ठेवली.

राहुल व इंदू पार्टीला गेले, तिथे खूप लोकं आले होते. त्यांना हे दोघं कपल आहे असं वाटतं होतं त्यातल्या काहींनी विचारलं देखील पण इंदू हसून शांत राहिली. राहुलला पण इंदू आवडत होती, पण परिस्थितीमुळे तो बोलत नव्हता.

मामा इंदुला भेटायला आले. इंदूबरोबर बोलतांना त्यांना राहुल दिसला. मामांना तो आवडला दोघांनाही विचारलं.. ते हो म्हणाले, पण राहुल म्हणाला “ माझी परिस्थिती नाजूक आहे, माझे स्वप्न खूप मोठे आहेत. ”  तेंव्हा मामा म्हणाले “ तुम्ही दोघं हुशार होतकरू आहात, एकमेकांना ओळखता.. प्रेम आहे, पुढे अजून चांगलं होईल.”

मामा राहुलच्या आई वडिलांना भेटले व लग्न ठरवलं, राजेशाही थाटात लग्न पार पडलं…

कष्टाने त्यांनी स्वतःची कंपनी उभी केली, गुण्यागोविंदाने संसार करत होते. इकडे सगळं राहुलचे आई वडील सांभाळत होते.

वाईट परिस्थितीत संयम ठेवला व कष्ट करायची तयारी ठेवली म्हणून ते एका कंपनीचे मालक झाले. फक्त श्रीमंत मुलगा हवा म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या मुलींनी इंदूचा आदर्श घ्यावा. दोघांची साथ असेल तर जग जिंकता येत हेच खरं,,, 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print