मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही म्हणाल तसं… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही म्हणाल तसं…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(या उलट ती मला समजून घेत शांत करत आलीय. मुलांच्यावर संस्कार करण्याचं काम आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा तिनं एकटीने सांभाळली आहे. ती नसती तर..?’) – इथून पुढे —

भावनावश झालेले गंगाधरपंत हलक्या आवाजात म्हणाले, “सुलु, बरं वाटत नाहीये का तुला? डोकं दुखतंय का?”

तिनं हळूच डोळे उघडत विचारलं, “फिरून आलात का? चहा करून देऊ का तुम्हाला?” आणि उठून बसली.

गंगाधरपंत पटकन म्हणाले, “नाही, नको. मानसीने आताच करून दिलाय.” असं म्हटल्यावर सुलोचना तोंडावर पाणी मारून देवघरात निरांजने पेटवून हात जोडून बसली.

संध्याकाळी काहीच न घडल्यासारखं रात्रीची जेवणं उरकली. शतपावली करून आल्यावर टीव्हीवरच्या बातम्या न ऐकताच गंगाधरपंत बेडरूममध्ये शिरले. उशीला पाठ टेकून विचारमग्न स्थितीत बसले. सुलोचना स्वयंपाकघरातील आवराआवर करून आली आणि शेजारी बसत म्हणाली, “काय पंत, आज मूड बिघडलेला दिसतोय. अहो, एवढे विचारमग्न व्हायला काय झालंय?”

त्यावर गंगाधरपंत काय बोलणार? सुनेनं जे सुनावलं, ते सांगायचं का सुलोचनेला? सूनदेखील काय चुकीचं बोलली? तिनं फक्त आरसा दाखवण्याचं काम केलं होतं. गंगाधरपंत पटकन म्हणाले, “अं, कुठं काय? काहीच नाही. असाच बसलो होतो.”

सुलोचना त्यांचं अंतरंग ओळखून होती. ती हसत हसत म्हणाली, “आता जास्त विचार करत बसू नका. लवकरच आपल्या कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडणार आहे, आहात कुठे आजोबा? झोपा आता.” ही आनंदाची बातमी ऐकून गंगाधरपंतांना त्या रात्री शांत झोप लागली. 

एक नवी सकाळ. गंगाधरपंतांना अंतर्बाह्य बदलून गेली. ते सकाळच्या प्रहरी फिरायला जायला लागले. लवकरच त्या भागातल्या प्रभात मंडळाचे सदस्य झाले. वेगवेगळ्या मतांचे विचारमंथन त्यांच्या कानावर पडत होते. कित्येक दिग्गज लोकांच्या अनुभवाचा खजिना त्यांच्यासमोर रिता होत होता. आत्ममग्न झालेल्या गंगाधरपंतांना नकळत स्वत:चं खुजेपण जाणवत होतं, त्यामुळे हळूहळू ते विनम्र होत चालले होते. 

एके दिवशी सकाळी मंडळाच्या बैठकीत एक तरुण आला आणि हात जोडत म्हणाला, ‘मी विनय. माधवरावांचा मुलगा. बाबा काल पुण्याला गेले आहेत. येत्या सहा डिसेंबरला आईबाबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे. आम्ही त्या निमित्ताने हॉटेल ओपलमधे एक सोहळा आयोजित केला आहे. कृतज्ञता सोहळाच म्हणा हवं तर. सर्वांचेच आईबाबा मुलांच्या भवितव्यासाठी झटत असतात. माझे आईबाबा मात्र आजही आमचं जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते दोघे आमच्यासाठी आधारवड बनून ठामपणे उभे आहेत. तुम्हा सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्या दिवशी अवश्य उपस्थित राहून आईबाबांना सरप्राइज द्यावं, अशी विनम्र प्रार्थना. मंडळाच्या नावे हे निमंत्रण.’ 

निमंत्रण अगत्याचं होतं. वेळ दुपारची होती. मंडळाचे सदस्य एका ठिकाणी जमले. दोन जाडजूड पुष्पहार घेऊन हजर झाले. माधवरावांच्या मुलाने आणि सुनेने त्यांचं अगत्याने स्वागत केलं. माधवरावांना मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती अनपेक्षित होती. ते हरखून गेले. कार्यक्रमात मुलगा-सून, कन्या-जावई, नातवंडं यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रीतीभोजनाचा आस्वाद घेऊन सगळेच जण घरी परतले.

दुसऱ्या दिवशी माधवराव सकाळी मंडळाच्या मीटींगला हजर झाले. सगळ्याच सदस्यांनी त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं कौतुक केलं. गंगाधरपंत म्हणाले, “माधवराव, तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा आणि सून खूपच चांगले आहेत.”

माधवराव काहीसे गंभीर होत म्हणाले, “होय. ते दोघे खूप चांगले आहेत. आपण जन्मदात्या मातापित्यांचा प्रत्येक शब्द झेलत होतो. आता तो जमाना संपला. आजचं एक कटु सत्य सांगू का? आज प्रत्येक नात्यात तुम्हाला ‘युटिलीटी’ म्हणजे तुमची उपयोगिता सिद्ध करावी लागते. आपण त्यांच्याशी चांगले वागलो तरच ते आपल्याशी चांगले वागतात. जुनं फर्निचर जास्त कुरकुर करायला लागलं की आजकाल लगेच मोडकळीत टाकतात. तसंच जास्त कुरकुर करणाऱ्या आणि उपयोगिता नसलेल्या आईवडिलांना देखील नाईलाजाने वृद्धाश्रमात पाठवलं जातं.”

माधवरावांच्या बोलण्याने सगळेच जण गंभीर झाले. माधवराव पुढे म्हणाले, “मित्रांनो, आजकाल मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात. आजच्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांना तिमाही टार्गेट्सच्या चक्रात अक्षरश: पिळून निघावं लागतं. लठ्ठ पगार मिळतो पण त्यांना तणाव नावाच्या राक्षसाशी दोन हात करावे लागतात. ऑफिसातल्या ताणतणावाने ते पार थकून जातात. घरी आल्यावर तुमच्यामुळे कटकटी होत असतील तर ते कसे सहन करतील? 

त्यांना पोटापाण्यासाठी ऑफिसातले ताणतणाव टाळता येत नाहीत. मग नाईलाजाने तुम्हाला दूर करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. एवढंच सांगतो, सावध व्हा. त्यांच्यावर बोजा बनून न राहता शक्य असेल तेवढी मदत करा. घरी कामवाल्या बायका असतात त्यांच्या कामावर लक्ष ठेवा. सांसारिक कटकटीतून त्यांना मुक्त करा. बाजारहाट करायचं काम आनंदाने करा. नातवंडांना सांभाळा. घरातलं वातावरण शक्य तेवढं आनंदी ठेवा. मग बघा, हे जुनं फर्निचरच ते अ‍ॅंटिक पीस म्हणून अभिमानाने जपतील. कधीच वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही.” त्यावर सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

हल्ली घरात लागणारं सामान गंगाधरपंत ऑनलाईन ऑर्डर करून घरपोच मागवून घेत होते. संध्याकाळी सुलोचनेसोबत समोरच्या बागेत फिरायला जात होते. माघारी येताना ताज्या भाज्या आणि फळे घेऊन येत होते. ऑफिसातून सून घरी येताच, तिला फळांचा बाऊल देवून दूध पिण्यासाठी आग्रह करत होते. ‘मानसी बेटा, आपल्या तब्येतीची काळजी घे, ’ असं वारंवार सांगत होते.

 गंगाधरपंतांचं हे नवं रूप पाहून सुलोचना हरखून गेली. गंगाधरपंत त्या रात्री भावविवश होत सुलोचनेला म्हणाले, “सुलु, या जगात तुझ्या इतकं मला समजून घेणारं कुणीही नाही. तू मला कधीही सोडून जाणार नाहीस म्हणून वचन दे, अगदी देवानं बोलवलं तरी!”

सुलोचना पंतांच्या हातावर हात ठेवत म्हणाली, “पंत, वचन देते. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मग तर झालं?” 

सुलोचनेचा हातात असलेला हात दाबत गंगाधरपंत हळूच म्हणाले, “सुलु, आजपासून अख्खं राज्य तुझंच ! यापुढे सगळं काही तू म्हणशील तसंच होईल.”

त्यावर सुलोचना खळखळून हसली आणि खट्याळपणे म्हणाली, “पंत, तुम्ही म्हणाल तसं….!”

— समाप्त —

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही म्हणाल तसं… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही म्हणाल तसं…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

गंगाधर पदवीधर झाले. मूळ गावापासून दूर, जिल्ह्याच्या सरकारी कचेरीत कारकून म्हणून रुजू झाले.

मुळात गंगाधर यांचं बालपण कडक शिस्तीत गेलं होतं. त्यांचे वडील म्हणजे जमदग्नीचा अवतारच होते. नोकरीचं निमित्त झालं आणि एका अर्थाने गंगाधर वडिलांच्या दडपणातून मुक्त झाले. यथावकाश लग्न उरकलं. पत्नी म्हणून सुस्वरूप, संस्कारी सुलोचना लाभली. राजाराणीचा संसार होता. गंगाधर ‘सुलु, सुलु’ करत तिच्या मागे मागे असायचे. तिच्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही. हे जरी खरं असलं तरी पित्याकडून मिळालेला एकमेव वारसा, ‘एकाधिकारशाही’ ते कसे विसरणार? त्यांच्या शब्दाला नाही म्हटलेलं त्यांना अजिबात खपायचं नाही.

 सुलोचना मात्र एकत्र कुटुंबातील आणि चारचौघात वावरलेली व्यवहारी कन्या होती. तिने गंगाधरांच्या कलानेच घ्यायचं असं ठरवलं. गंगाधराच्या प्रत्येक निर्णयाला ‘पंत, तुम्ही म्हणाल तसं.. ’ ह्या नमनानेच ती सुरुवात करायची. ‘पंत’ म्हटलं की गंगाधर खुलून जायचे. त्यानंतर, ‘पण मी काय म्हणते.. ’ असं म्हणत ती त्यावरचे पर्याय सुचवायची. विविध फायदे सांगून झाल्यावर तिचं शेवटचं पालुपद असायचं, ‘पंत, मी फक्त सुचवायचं काम केलं. माझा आग्रह नाही. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच. ’ ही मात्रा लागू पडली.

 घरातल्या कुकरपासून फ्रीजपर्यंत सगळ्याच वस्तु सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घेतल्या गेल्या. एवढंच काय, तर मुलांच्या अ‍ॅडमिशन कुठल्या शाळेत घ्यायच्या, इथपर्यंतचे सगळे निर्णय कसलाही वादविवाद न होता सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घडत गेले. सुलोचनेची ही शिताफी मात्र गंगाधरांच्या कधीच लक्षात आली नाही.

 गंगाधरपंतांना सदासर्वदा साहेबांच्या समोर मान खाली घालून ‘हांजी हांजी’ करत निमूटपणे सगळं ऐकावं लागायचं. त्यामुळे कचेरीत दाबून ठेवलेले मानापमानाचे कढ घरातल्या लोकांच्या समोर उफाळून यायचे.

 मुलं मोठं होत गेली तसं त्यांना गंगाधरपंतांचे वागणं खटकत राहायचं. सुलोचना मात्र वडील आणि मुलांच्यामधे एक सुंदर दुवा बनून राहिली. त्या नात्यांत कुठलीच कटुता येऊ नये म्हणून ती काळजी घेत राहिली. ‘हे बघा, बाबा तुम्हाला रागावत असतील, पण तुमच्याविषयी त्यांना खूप कौतुक आहे. प्रसंगी ते स्वत:कडे दुर्लक्ष करतात, पण सदैव तुमच्या भवितव्याचा विचार करत असतात. तुम्हाला ते कधी काही कमी पडू देत नाहीत ना? मग जास्त विचार करू नका. तुम्ही फक्त अभ्यासात लक्ष घाला. ’ असं ती मुलांना सांगत राहायची.

 अधूनमधून ती गंगाधरपंताना ऐकू जाईल असं पुटपुटायची, ‘माझं नशीबच थोर म्हणायचं बाई. मुलं ह्यांच्या बुद्धिमत्तेवर गेली म्हणून बरं आहे. उत्तम गुणांनी तर उत्तीर्ण होताहेत. माझ्यावर गेली असती तर… ह्यांनी काय केलं असतं, ते देवच जाणे!’ हे ऐकल्यावर, पंतांचा मुलांवरचा राग थंड व्हायचा.

 गंगाधरपंत असंच एकदा मूडमध्ये असताना म्हणाले, ‘बरं का, सुलु. माझे सगळेच मित्र एकजात जोरू के गुलाम आहेत साले. मी त्यांना सांगतो, लेको माझी बायको सुलोचनेकडे बघा. ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी सांगेल त्याला ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत असते. ’ त्यावेळी सुलोचना गालातल्या गालात हसली. तिला पंतांचा भ्रमाचा भोपळा फोडायचा नव्हता.

 बघता बघता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लेक सुचेता लग्न होऊन सासरी गेली. दिल्या घरी सुखी होती. कारण सुचेताचे सासू सासरे गाव सोडून शहरात यायला अजिबात तयार नव्हते. तीच त्या घरची राणी होती.

 यथावकाश मुलगा अमेय उत्कृष्ट गुणांनी इंजिनियर झाला. चांगली नोकरी मिळाली. लवकरच कंपनीतल्या एका स्वरूप सुंदर मुलीशी विवाहाचा त्यांने प्रस्ताव मांडला. त्या स्थळात जागा ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. लग्न यथासांग पार पडले.

 त्याच महिन्याभरात गंगाधरपंत हेडक्लार्क म्हणून सेवानिवृत्त झाले.

साहजिकच सुलोचनेचं लक्ष गंगाधरपंतावरून अमेय आणि सून मानसीकडे केंद्रित झालं. ती सकाळी त्यांच्यासाठी न्याहरीच्या तयारीत असायची. अमेय आणि मानसी दुपारचं जेवण कंपनीच्या कॅन्टिनमधेच घेत असत. सदैव केंद्रस्थानी असलेल्या गंगाधरपंताना आपल्याकडे उपेक्षा होत असल्याच जाणवत होतं.

 एके दिवशी गंगाधरपंत कुठल्यातरी कारणावरून अमेयला आणि सुलोचनेला डाफरत होते, तेव्हा मानसीने त्या दोघांची बाजू घेऊन त्यांना तिथंच गप्प केलं. गंगाधरपंत संध्याकाळी नुकतेच फिरून येऊन कोचवर बसले. आजूबाजूला कुणीही नसल्याचं पाहून, मानसी त्यांना चहाचा कप देत म्हणाली, “बाबा, सकाळी मी जे काही बोलले होते त्याबद्दल मला माफ करा. ” हे ऐकताच गंगाधरपंतांचा राग निवळला.

 मानसी लगेच पुढे म्हणाली, “बाबा, खरं तर त्यात तुमची काहीच चूक नाही. खरी चूक सासूबाईंची आहे. मुळात तुमच्या एकाधिकारशाहीला आणि एककल्ली प्रवृत्तीला त्याच जबाबदार आहेत. तुमच्या प्रत्येक गोष्टीला ‘तुम्ही म्हणाल तसं.. ’ असं म्हणत त्या तुमच्या अहंकाराला वारा घालत गेल्या. त्यामुळे कधीकाळी या घरात वादळ उठेल ह्याची त्यांना कल्पनाही नसावी. सासूबाईंनी इतकी वर्ष तुम्हाला खपवून घेतलं असेल. जर काहीही चूक नसताना, तुम्ही कुणाला काही बोललात तर मी ते खपवून घेणार नाही. आताच सांगून ठेवते, तुम्ही सुखात राहा, आम्हालाही सुखाने राहू द्या. “

 सुनेचं असं अनपेक्षित बोलणं ऐकून गंगाधरपंत क्षणभर चक्रावून गेले. त्यांच्या तोंडातून एक ब्र शब्दही फुटला नाही. गार झालेला चहा त्यांनी तसाच घशात ओतला. दाराआडून संभाषण ऐकत उभ्या असलेल्या सुलोचनेला मनस्वी आनंद झाला. गंगाधरपंत खोलीत यायच्या आतच ती कपाळाला बाम चोळून झोपेचं सोंग घेत बेडवर जाऊन पडली.

 गंगाधरपंत बेडरूममधे आले. आजवर दिवेलागणीच्या वेळी कधी सुलोचना झोपल्याचं त्यांना आठवत नव्हतं. त्यांनी हळूवारपणे तिच्या कपाळाला हात लावला आणि बराच वेळ तिथल्या खुर्चीत विचार करत बसून राहिले. ‘माझ्यासारख्या एककल्ली माणसाला सुलोचनेनं इतकी वर्षे कसं सहन केलं असेल? स्वत:चं मन मारून ‘तुम्ही म्हणाल तसं’, असं म्हणत, दुसरं कुणी माझ्याशी संसार केला असता का? कसल्याही गोष्टीचा त्रागा नाही. आदळआपट नाही. या उलट ती मला समजून घेत शांत करत आलीय. मुलांच्यावर संस्कार करण्याचं काम आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा तिनं एकटीने सांभाळली आहे. ती नसती तर.. ?’

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ब्रेकअप…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ब्रेकअप…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

“हॅलो… हॅलो… बाबा, मी संजय ! झोपला होतात का?”

लंडनवरून संजयचा आबांना फोन. “नाही, आत्ताच डोळा लागला होता पुस्तक वाचताना. बोल तू. आत्ता कसा काय फोन केलास? तुझ्याकडे रात्र असेल ना?”, आबा मनगटावरील घड्याळात बघत म्हणाले. “आबा, अहो तुम्ही परत विसरलात. मी आता अमेरिकेत नाही, लंडनला आहे. इथे सकाळचे ११. ३० वाजलेत. तुमच्याकडे साधारण चार वाजले असतील बघा”, संजयचं स्पष्टीकरण.

“अरे हो की. बरं बोल, आणि फोन केलास तर जरा थोड्या वेळाने तरी करायचास. तुला माहिती आहे ना की आई रोज तीन ते पाचमध्ये पेटीच्या क्लासला आणि मग भजनाला जाते ते. उगाच डबल डबल फोन कशाला करता? पैसे वाया जातात”…

आबांचा टिपिकल मध्यमवर्गीय कोकणस्थीपणा मध्येमध्ये उचल खायचा. ब्याऐंशी वर्षांच्या आबांना खरंतर पैशाची काही ददात नव्हती. वडिलोपार्जित घराच्या जागी आता एव्हाना मोठी बिल्डिंग झाली होती. त्यात पूर्ण मजलाभर प्रशस्त फ्लॅट त्यांच्याच नावावर होता. त्यातही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे चांगलं भरभक्कम पेन्शन होतं. पण हे सगळं ज्यांनी उपभोगायचं ती त्यांची मुलं देशाबाहेर. धाकटा कनिष्क कुटुंबासहित ऑस्ट्रेलियात आणि संजय बायको-मुलांसहीत लंडनला. एवढा मोठा फ्लॅट अंगावर यायचा. कधी कधी ते जुनं घरंच बरं वाटायचं. निदान तिथे आजूबाजूला बोलायला भाडेकरू तरी होते. नाही म्हटलं तरी वर्दळ असायची. अगदी कुणाकडेही पाहुणे आले तरी ओटीवर एकत्र बसून गप्पागोष्टी होत. आता त्यातलं काही राहिलं नाही. भाडेकरूंनाही स्वतःचे फ्लॅट मिळाल्यामुळे त्यांच्या घरांची दारं पण आताशा बंद राहू लागली होती…

“आबा, अहो पैशांचं काय घेऊन बसलात? आणि मी तुमचीच चौकशी करायला फोन केलाय. कशी तब्येत आहे?”, संजयने विचारलं.

“मला काय धाड भरली आहे? मी ठणठणीत. रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जातो. मालतीच्या प्रकृतीची जरा कुरकुर चालू असते. पण ऐकणार कोण नव-याचं? फिरायला चल म्हंटलं तर येत नाही. जाऊ दे, चालायचंच. बरं तू कधी येतो आहेस?”, आबांचा प्रश्न.

“आबा, अहो आत्ताच सहा महिन्यांपूर्वी नाही का येऊन गेलो? विसरलात? आता लगेच सुट्टी नाही मिळायची”, संजयचं उत्तर.

“बरं, बरं. बघा जमलं तर यायला. कनिष्कलाही दोन वर्षं झाली येऊन. मालती फार आठवण काढते त्याची… “, आबांचा स्वर जडावला होता. “बरं, संजया, बेल वाजते आहे. तू मालती आली की फोन कर रात्री. ठेवतो आत्ता फोन”,

आबांनी घाईघाईत निरोप घेतला आणि दार उघडायला उठले. की-होल मधून त्यांनी पाहिले, मधुकररावांचा नातू अक्षय दार वाजवत होता. मधुकरराव हे पूर्वीच्या भाडेकरूंपैकीच, आता कुटुंबासह वरच्या मजल्यावर रहायला गेले होते. त्यांचा मुलगा, अक्षयचे वडील इन्शुरन्स कंपनीत होते. आबांनी दार उघडलं… “बोला अक्षयकुमार! आज आमची आठवण कशी काय आली?”, आबांनी हसत हसत विचारलं.

“काही नाही, मालती आजींच्या काही एफ. डी. मॅच्युअर होताहेत, तर बाबांनी त्याची आणि इन्शुरन्सच्या कामाची कागदपत्रं.. “, त्याचं वाक्य अर्धवट ऐकतच आबा वळून आत गेले. त्याला घरात जाणं भाग होतं आता. जराश्या नाखुषीनंच तो आत शिरला.

“अरे ये ये. जरा बसून बोल. दारात उभं राहून बोलणं आवडत नाही मला”, आबांनी त्याला जरा बळंच बसायला लावलं होतं. तो परत काही बोलणार इतक्यात आबाच म्हणाले, “बरं अक्षयकुमार तू चहा घेणार का ? मालतीआजी आता येईलच थोड्या वेळात. आमच्यासाठी करणारच आहे, तू घेणार असशील तर तुझ्यासाठी पण टाकतो. थांबच ! माझ्या हातचा चहा पिऊनच जा कसा?”, अक्षयला जराही बोलण्याची संधी न देता आबा चहा करायला उठले.

अक्षयचा नाईलाज झाला. काही न बोलता तो टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला. अक्षय इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षाला होता. गेले काही दिवस तो जरा अस्वस्थ होता. त्याचा आणि मयुरीचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. अक्षय फार दुखावला होता त्यामुळे. या सेमिस्टरची परिक्षा पण त्याने दिली नव्हती. राहून राहून त्याला मयुरीची आठवण यायची की मग तो असा घुम्यासारखा वागायचा.

“अक्षयकुमार, अहो कसल्या विचारात गढला आहात? होईल सर्व ठीक. प्रेमभंगाचा विचार जितका जास्त कराल तितकं दुःख जास्ती होतं”, आबा बोलून गेले.

‘आयला, म्हातारा बेरकी आहे. एरवी या म्हाता-याला काल काय घडलं आठवत नाही.. माझं प्रेमप्रकरण बरं लक्षात राहिलं’.. अक्षय या विचाराने सटपटला. “नाही आबा, तसं काही नाही. मी ठीक आहे”, अक्षयने मनातले विचार लपवत म्हंटले.

आबा धूर्तपणे हसले. “कसं आहे ना अक्षय की काही काही गोष्टी माझ्या नेमक्या स्मरणात राहतात. आणि मी तिला पाहिलंय तुझ्याबरोबर अनेक वेळा. अरे आमचा पेन्शनर कट्टयाचा मार्ग तुमच्या त्या अड्डयावरूनच तर पुढे जातो. प्रेमात पडलेले सगळेजण मांजरासारखे असतात बघ. डोळे मिटून दूध पिणारे. त्यांना वाटतं त्यांना कुणी बघतच नाही”, आबा बोलत होते. अक्षयला तिथून कधी एकदा सुटतोय असं झालं होतं. “आणि बरं का अक्षयराव, प्रेमात असं हरायचं नसतं. एकदा फेल झालं तर परत परत प्रयत्न करायचा. आणि त्यातून प्रेभभंग झालाच तरी त्यापायी आपलं आयुष्य वाया नसतं घालवायचं”, आबा समजावणीच्या सुरात म्हणाले.

खूप दिवसांनी अक्षयशी बोलताना कुणीतरी थेट विषयाला हात घातला होता. त्याला न ओरडता, आकांडतांडव न करता कुणीतरी मित्रासारखं त्याच्याशी बोलत होतं. आबांनी त्याच्या समोर चहाचा कप ठेवला. “अरे कधी कधी काही वाईट गोष्टी घडतात ना आपल्या आयुष्यात त्या तेव्हा जरी क्लेशकारक वाटल्या तरी पुढे जाऊन अनेकवेळा फायदेशीर ठरल्याचा अनुभव येतो. तुझा बाप एवढा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमधला, तुझ्याशी काही बोलत नाही वाटतं?”, आबांनी जरा खोचकपणे विचारलं.

अक्षय गडबडला या प्रश्नाने. “म्हणजे? मला समजलं नाही आबा”, अक्षय.

“अरे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट नेहमी अशा माणसांत आणि नात्यांत करावी जी पुढे जाऊन तुमचा इन्शुरन्स बनतील. अशी माणसं आणि नाती काय उपयोगाची की जी मॅच्युरिटीच्या आधीच भांडवल काढून घेतील? मान्य की माणसांची पारख एकदम नाही करता येत. पण म्हणून सहा महिन्यांचं प्रेम सर्वस्व मानून त्यापायी आपल्या आयुष्याची, जवळच्या लोकांची आणि मुख्य म्हणजे करिअरची फरफट करायची नसते. आयुष्य हे या चहासारखं आहे बघ ! अति गोड कराल तरी बेचव, अगोड तरी बेचवच ! चहावरून आठवलं, रिटायर झाल्यादिवशीच मी सांगितलं मालतीला की आता सकाळ, संध्याकाळचा चहा मी करणार. गेली जवळपास चोवीस वर्षं हा नेम मोडला नाहीये, आहेस कुठे? आता मालती येत असेल. आली की लगेच गरमागरम चाय समोर हजर! बरं ते तू कागदपत्रांचं काय बाबा म्हणत होतास? गप्पा झाल्या, चहा झाला तरी मुख्य काम विसरायला नको”, आबा हसत हसत म्हणाले.

चहाचा कप ठेवत अक्षय उठला. “आबा, खूप दिवसांनी कुणीतरी छान बोललंय माझ्याशी. थँक यू! मी लक्षात ठेवीन तुमचा सल्ला… इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स… माणसं… नाती… आणि हो कागदपत्रांचं बाबा संजय दादाशी बोलतील नंतर. आता येतो”, म्हणून अक्षय उठला आणि दाराबाहेर पडला.

…. मालती आजी सहा महिन्यांपूर्वीच वारली, ती कधीच परत येणार नाही हे फिरून आबांना सांगावं वाटलं त्याला. ज्या आभासी, कल्पित जगाच्या भिंती त्यांनी उभ्या केल्या होत्या, त्या पाडून त्यातून त्यांना बाहेर काढावं असं देखील वाटून गेलं क्षणभर… पण पुढच्याच क्षणी विचार आला की सहा-आठ महिन्यांच्या अफेअरचं ब्रेकअप झालं तर एवढा त्रास होतोय आपल्याला… साठ वर्षांचं सहजीवन जिथे अचानक संपलं तो धक्का पचवायला वेळ लागेलच ना… आपल्या पाठीमागे दरवाजा ओढून अक्षय निघून गेला, एक नवी उमेद घेऊन!

की-होल मधून अक्षयला गेलेलं पाहून आबा मागे वळले…

बेडरूममध्ये जाऊन उशीखालचा मालती आजींचा फोटो समोर ठेवला आणि स्वतःशीच बोलू लागले, “मालती… आपली इन्व्हेस्टमेंट चुकली का गं पोरांमधली ? पैशाचा इन्शुरन्स नको आहे या वयात… माणसांचा हवाय… आपल्याशी बोलणारी माणसं, आपली विचारपूस करणारी माणसं, प्रत्यक्षात भेटून काय हवं नको विचारणारी माणसं… लोकांना वाटतं म्हातारा वेडा झालायं… बायकोच्या जाण्याचा धक्का सहन न होऊन ती आहे असं मानून जगतोय… जाता येता एकटाच बडबड करतोय… पण तसं करतो म्हणून तरी चार लोक चौकशी करतात. बाप विसरभोळा झालायं… न जाणो, उद्या पोरं आहेत हेच विसरला तर इस्टेटीमध्ये वाटा मिळणार नाही या भावनेतून का होईना रोज फोन करून चौकशी करतात. असो, त्यांना काय कळणार म्हणा या वयात एकटं पडण्याचं दुःख? चल, मी चहा ओततो… आज गॅलरीत झोपाळ्यावर बसून सूर्यास्त पाहत चहा पिऊ…

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “रिकामेपण…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “रिकामेपण…” ☆ श्री मंगेश मधुकर

आभाळ भरून आलेलं, संध्याकाळी चार वाजताच प्रचंड अंधार झाला होता. पांघरून घेऊन झोपलेले अप्पा जागे झाले.

रोजच्या सवयीने त्यांनी आवराआवर सुरु केली. तोंड धुतल्यानंतर दुधाचा चहा पिला.

गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर पूजा केली आणि पेपरची वाट पाहत बसले.

दुपारची झोप काढून रमेश हॉलमध्ये आला.

“अप्पा, कसली वाट पाहताय”

“पेपरची, ”

“पेपर, आत्ता???”रमेश अप्पांकडे पाहत विचारले.

“असं का विचारतो आहेस??”

“अप्पा, संध्याकाळचे पाच वाजले आहेत”

“काय!!” अप्पांच्या चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह??त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. रडवेला चेहरा करून म्हणाले “मला वाटलं सकाळ झाली म्हणून नेहमीप्रमाणे…… सॉरी सॉरी”

“अप्पा, आज दोनदा आंघोळ आणि पूजा, भारी” राहीने अप्पांना चिडवले.

“अजून चिडव, चूक माझीच आहे, तुला काय बोलायचे??डोकं काम करत नाही, आता तर वेळ काळ सुद्धा कळत नाही. ”अप्पा

रमेश काही बोलला नाही पण रंजना, राही मोठमोठ्याने हसायला लागल्या. वाद नको म्हणून रमेशने त्यांना गप्प राहण्यास सांगितले.

चिडलेले अप्पा नेहमीप्रमाणे भिंतीकडे तोंड करून पडून राहिले. मनात विचारांचे काहूर उठले. सिगरेट पिण्याची अतिशय इच्छा झाली पण घरात सगळे होते आणि पावसामुळे बाहेर जाता येत नव्हते. तळमळत अप्पा पडून राहिले. टीव्ही चालू होता पण अप्पांना त्यात इंटरेस्ट नव्हता.

रात्री रंजनाने वाढून दिल्यावर जेवण करून, औषधे घेऊन पुन्हा अप्पा पांघरून घेऊन झोपले पण मनातील अस्वस्थता वाढली, झोपही येत नव्हती, काय करावे तेच सुचत नव्हते. सारखी सारखी कूस बदलून सुद्धा कंटाळा आला होता. घरातले सगळे झोपले तरी अप्पा मात्र टक्क जागे होते, मनातील खदखद बाहेर काढायची होती पण सोबत कोणी नव्हते. अचानक त्यांना कल्पना सुचली, अप्पा उठले. कपाटातून कागद काढला आणि लिहायला सुरवात केली…..

“ प्रिय अगं,

पत्रास कारण की,

तुला कधी नावाने हाक मारली नाही, कायम “अगं” म्हणायचा अवकाश की लगेच तू उत्तर द्यायची. म्हणून त्याच नावाने सुरवात केली. चाळीस वर्ष संसार केला आणि आज पहिल्यांदा तुला पत्र लिहितो आहे. सात वर्षापूर्वी तू गेलीस आणि संसार संपला. आधी स्वतःचाच विचार करताना तुला कायम गृहीत धरले आणि तुझ्यानंतर परावलंबी झालो. तडजोडी करताना खूप त्रास झाला पण आता सवय झाली. हे सगळं आजच लिहिण्याचे कारण, आज तुझी खूप खूप आठवण येते आहे. रिटायर होऊन आता पंधरा वर्षे झाली. परमेश्वराचा आशीर्वाद, उत्तम तब्येत, घरच्यांचे प्रेम आहे, सांभाळून घेतात, कसलच टेन्शन नाही, पेन्शनमुळे पैशाचीही काळजी नाही. स्वतःला जपण्याची सवय त्यामुळे वयानुसार झालेले आजार सोडले तर तब्येत उत्तम आहे. लौकिक अर्थाने सगळे व्यवस्थित आहे तरीसुद्धा काही दिवसांपासून फार एकटं एकटं वाटतयं, कसलीतरी हुरहूर वाटते, सारखी भीती वाटते. मन मोकळे करावे असे कोणीच नाही त्याला कारण सुद्धा मीच.

….. रिटायरमेंट नंतर आरामाच्या नावाखाली फक्त झोपाच काढल्या, बाकी काहीच केले नाही. आत्मकेंद्री स्वभाव, मुखदुर्बळ, कसलीच महत्वाकांक्षा नाही, स्वप्ने नाहीत वडिलांच्या ओळखीने मिळालेली सरकारी नोकरी आयुष्यभर केली. भरपूर कष्ट केले, तडजोडी केल्या त्यामुळे रिटायर झाल्यानंतर फक्त आराम करायचा हे मनाशी पक्के केले होते आणि तसेच केले. स्वतःला पाहिजे तसे वागलो, कधी दुसऱ्यांचा विचार केला नाही, प्रसंगी हेकेखोरपणाही केला. सकाळी लवकर उठायचे, आवराआवर करायची, तासभर पेपरवाचन, मग दोन तास बसस्टॉपच्या कट्ट्यावर गप्पा, एक वाजता जेवण, दुपारी झोप, संध्याकाळी चार वाजता दूध मग पुन्हा कट्ट्यावर गप्पा, सात वाजता घरात मग नऊ वाजेपर्यंत सिरियल्स मग पुन्हा झोप. गेली अनेक वर्षे हाच दिनक्रम ठरलेला.

पण………

वर्षानुवर्षे त्याच त्या रुटीनचा आता कंटाळलो आहे. दिवसेंदिवस बेचैनी वाढत आहे. सतत पडून राहणे आता नको वाटते आणि दुसरे काही करण्याची इच्छा नाही तसे कधी प्रयत्न केले नाहीत. खास आवड, छंद वैगरे नाही. दहा मिनिटांची देवपूजा आणि तासभर पेपरवाचन सोडले तर दिवसभरात फक्त आरामच केला. तू नेहमी सांगायचीस कशाततरी मन गुंतवून घ्या, फिरायला जा, मित्र जोडा पण ऐकले नाही. रिटायर झाल्यानंतर काय करायचे याचे नियोजन करायला पाहिजे होते असे आता वाटते पण खूप उशीर झाला आहे. नोकरी असताना घडयाळाकडे बघायला वेळ मिळत नव्हता आणि आता घड्याळाकडे पहायचीच इच्छा होत नाही कारण वेळ पुढे सरकतच नाही. आख्खा दिवस मोठठा आ करून समोर असतो, जसा शुक्रवार, शनिवार तसाच सोमवार, काहीच काम नाही त्यामुळे रविवारच्या सुट्टीचे कौतुक नाही. रोजचा दिवस एकसारखा, नवीन घडत नाही. सणांच्या बाबतीत तेच. घरातले आपापल्या व्यापात, एकमेकांशी संवाद होतो तो कामापुरता. कोणी जाणीवपूर्वक वागत नाही पण मीच कमी बोलतो त्यामुळे आपसूकच संवाद कमी आहे. कट्ट्यावर जावे तर जे सोबत आहेत त्यांची परिस्थितीसुद्धा फार वेगळी नाही. सगळ्यांचीच नजर शून्यात असते. वेळ खायला उठतो. मला खरंच आता नक्की काय करावे हे समजत नाही. सिगरेटचे प्रमाण वाढले आहे. घरातले सारखे सांगतात सिगरेट कमी करा पण माझाच स्वतःवर ताबा नाही. खूप अपराध्यासारखे वाटते पण मी हतबल आहे. खूप सारे प्रश्न पडले आहेत. आलेला दिवस ढकलणे एवढेच करतो आहे. ” डोळ्यातले थेंब कागदावर पडले. अप्पा लिहिण्याचे थांबले नंतर बराच वेळ छताकडे पाहत पडून राहिले. विचारांचे चक्र चालू असताना त्यांना झोप लागली.

पक्षांच्या किलबिलाटाने जाग आल्यावर अप्पांनी खिडकीबाहेर पाहिले तर उजाडायाला सुरवात झाली होती. घड्याळात वेळ पाहून सकाळ झाली आहे याची खात्री अप्पांनी करून घेतली आणि स्वतःवरच हसले. रेडिओ सुरु करून किचनमधून भांडे घेऊन दुधवाल्याची वाट बघत दारात उभे राहिले त्याचवेळी एफ एमवर भूपिंदर गात होते “दिन खाली खाली बर्तन है और रात अंधेरा कुवां, एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में….. ” गाणे ऐकून अप्पांचे लक्ष सहज हातातल्या रिकाम्या भांड्याकडे पाहत भकासपणे हसले.

..

रोजच्या वेळेत दुधवाला येऊन गेला. अप्पांच्या हातातले रिकामे भांडे दुधाने भरून गेले. सहज लक्ष दारातल्या कुंडीकडे गेले. तिथल्या सुकलेल्या एका रोपट्याला नवीन पालवी फुटत होती. निराश अप्पांना दुधाने भरलेले भांडे आणि फुटत असलेली पालवी पाहून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. स्वतःला बदलायला हवे, पुन्हा नवीन सुरवात करायची. आता रिटायरमेंट मधूनच रिटायर व्हायचे असे म्हणत अप्पा दिलखुलास हसले. भांड्यामधील थोडे दुध रोपट्यावर ओतले आणि नवीन उमेद घेऊन प्रसन्न, टवटवीत मनाने घरात गेले आणि पहिल्यांदाच सगळ्यांसाठी चहाचे आधण ठेवले त्याचवेळी एफएम वर किशोरदा गात होते..

“थोडा है.. थोडे की जरुरत है.. , जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है…” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुतम कथा… – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुतम कथा… – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर

 

१. आई कधी रिटायर होते का !

मूळ हिंदी कथा : क्या माँ भी कभी रिटायर होती है!

दहा वाजायला काहीच मिनिटं बाकी होती. सगळ्यांच्या नजरा मुख्य दारावर खिळल्या होत्या. आणि मिसेस अनिता जोशींनी ऑफिसात प्रवेश केला. काचेचा दरवाजा उघडून त्यांनी आत पाय ठेवताच सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यांना कुंकू लावलं, ओवाळलं, हार घातला आणि त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. सर्वांनी त्यांना सुखी, संपन्न, निरोगी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस विशेष आहे, हे त्यांना जाणवून द्यायचा सगळेच जण प्रयत्न करत होते. अगदी क्षणक्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते.

कितीही प्रयत्न केला, तरी त्या आपल्या भावना अडवू शकल्या नाहीत. डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंना पदराने पुसत त्या पुढे गेल्या. एका कर्मचाऱ्याने खाली वाकून त्यांच्या पुढ्यात मस्टर ठेवलं. मिसेस जोशी सही करू लागल्या. मस्टरवरची ही त्यांची शेवटची सही होती. सहीच कशाला, ऑफिसचा प्रत्येक क्षणच त्यांच्यासाठी शेवटचा होता. भावुक होऊन प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाच्या कॅमेऱ्यात कैद करत प्रत्येक क्षण जगायचा त्या प्रयत्न करत होत्या.

मिसेस जोशींना माहीत होतं, की उद्यापासून हे ऑफिस त्यांच्यासाठी परकं होणार आहे. नोकरीचा हा शेवटचा दिवस त्यांना उलटसुलट झटके देत होता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून मुक्तीचा आनंद की खुर्ची जाण्याचं दुःख.. ! द्विधा मनःस्थिती.. !

” मॅडम, आज तुम्ही काम करू नका. सगळ्यांशी बोला आणि फक्त निरोपसमारंभाची तयारी करा. ” असा नियम नाही. पण मॅनेजरसाहेबांनी सहृदयता दाखवली. टार्गेटच्या या काळात ती दुर्मिळच झालीय!

मिसेस जोशींनी मोबाईल उघडताच त्यांच्या डोक्यात भविष्यातल्या योजनांचा प्रवास वेगात सुरू झाला. त्या विचार करू लागल्या – नोकरी करता करता चाळीस वर्षं कशी निघून गेली, कळलंच नाही. मुंबईचं हे वेगवान आयुष्य, रोजची ट्रेनची धावपळ…. दुसऱ्याच क्षणी त्यांच्या डोळ्यांसमोर घर-संसाराचं दृश्य तरळलं. ते तर त्यांना यापुढेही निभवायचं होतंच. मुलीचं डोहाळजेवण, मुलगे, सुना, नवरा, सासूच्या जबाबदाऱ्या, नंतर नातवंडांशी खेळायचं स्वप्न, त्यांना सांभाळणं, त्यांच्या अभ्यासाची काळजी, वयपरत्वे येणारी दुखणी, स्वयंपाकाची जबाबदारी…. हे सगळं तर निभवायचंच आहे. सेवानिवृत्ती म्हणजे ऑफिसातून मिळणाऱ्या पगारातून निवृत्ती! आई कधी रिटायर होते का?

आणि मोबाईल बंद करून त्या पुन्हा वर्तमानात आल्या.

मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

२.  तुझं तुलाच अर्पण

मूळ हिंदी कथा : ‘तेरा तुझको अर्पण ‘

शहरातल्या सुप्रसिद्ध उद्योगपती अगरवालजींचा 75वा वाढदिवस होता. त्यांच्या हवेलीत होम -हवन, पूजा-पाठ आणि मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबातील सर्व लहान -मोठे सदस्य भटजींबरोबर पूजाविधीत सहभागी झाले होते. यावेळी भटजींनी जीवनाचं मर्म सांगणाऱ्या कथेद्वारा जीवनात आनंद व सुखाचा ताळमेळ कसा साधावा, त्याची युक्ती सांगितली. कथा संपताच भटजी होमाकडे वळले.

अगरवालजी आपल्या स्वभावानुसार हात राखून समिधा समर्पित करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच समिधा उरल्या होत्या. शेवटी भटजींनी होम -हवनाची सांगता झाल्याचं सांगत अंतिम मंत्र म्हटला आणि म्हटलं, ” आता जी काही उरली असेल ती सर्व सामग्री हवनकुंडात एकदमच समर्पित करा आणि मोठ्याने बोला, ” स्वाहा!”

हवनकुंडात समिधांचं प्रमाण जास्त झाल्याने सगळीकडे धूर पसरला. अगरवालजी डोळे चोळू लागले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे त्यांचा भूतकाळ तरळू लागला. त्यांच्या डोक्यात विचार आला – ‘ अरे ! हात राखून खर्च करत पैसे वाचवण्याच्या नादात मी माझ्या जीवनातही भरपूर समिधा वाचवल्या आहेत. जीवनाचा आनंद घ्यायचं तर राहूनच गेलं. आता तर एकदमच सर्व समर्पण करायची वेळ आली आहे. इथून फक्त डोळ्यांत पाणी आणि समोर धुरळाच धुरळा दिसत आहे. याचा अर्थ, आपल्या जीवनातही समिधासमर्पणाचं संतुलन चुकलं होतं. ‘

‘तुझं तुलाच अर्पण’ म्हणत त्यांनी डोळे उघडले आणि संकल्प केला की यापुढे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने गरीब, असाहाय्य, विकलांग तसंच गरजवंतांच्या सेवेसाठी ते आपल्याजवळील जास्तीच्या पैशांचा उपयोग करतील. लगेचच निराशेचे ढग विरून गेले आणि नव्या जोशाने ते आनंदाचे क्षण उपभोगू लागले.

 मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

३. ऑक्सिजन लेव्हल

 

मोबाईलची रिंग वाजली. त्याने नाव बघितलं आणि तो चकित झाला. घेऊ की नको, या द्विधेत फोन बंद झाला. ते नाव बघून त्याचं मन विचलित झालं. त्याच्या डोळ्यांसमोर ते दृश्य आलं, ‘ त्या घटनेला मी एकटाच जबाबदार होतो का? आम्हा दोघांमध्ये एवढा चांगला ताळमेळ होता, एवढं चांगलं बॉण्डिंग होतं, तर ऑफिसात सगळ्यांसमोर असा तमाशा करण्याची गरज होती का? ‘

हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्यापडल्या, आशा-निराशेच्या गर्तेत गोते खाताखाता तो विचार करत होता. तशी त्याची स्थिती तेवढी गंभीर नव्हती. पण ऑक्सिजन लेव्हल 70-75 मध्येच अडकली होती. सगळीकडून येणाऱ्या बातम्या भीती आणि दहशत निर्माण करत होत्या. महामारीचा काळ होता तो.

संध्याकाळ होताहोता पुन्हा फोनची रिंग वाजली. तेच नाव दिसत होतं. पण यावेळी त्याने फोन घेतला.

“हॅलो प्रकाश, मी नीलिमा बोलतेय. तुझी तब्येत कशी आहे आता?”

” आधीपेक्षा सुधारलीय. पण ऑक्सिजन लेव्हल अजूनही कमी आहे. “

” तुला हॉस्पिटलात ऍडमिट केल्याचं कळलं, तेव्हा मी स्वतःला फोन करण्यापासून थांबवू शकले नाही. दोनदा फोन केला, पण तू उचलला नाहीस. अजूनही नाराज आहेस माझ्यावर? जे घडलं, तो अपघात होता, असं समजून विसरून जा. मीही विसरले आहे. “

सुटकेचा श्वास सोडत तो म्हणाला, ” मॅडमजी, तुमच्याशी बोलायची हिंमतच होत नव्हती. किती मोठं आहे तुमचं मन ! आय ऍम सॉरी, मॅडमजी ! चूक माझीच होती. “

” ए… ! मॅडमजी नाही. नीलू मॅडम म्हण. मला तेच आवडतं. फक्त तुझीच नाही, तर माझीही चूक होतीच की. आपण दोघंही विवाहित आहोत, हे माहीत असूनही आपल्या घरच्या गोष्टीही आरामात एकमेकांना सांगायचो. तुझ्याशी बोलल्यावर माझ्या मनावरचं दडपण कमी व्हायचं. तू ह्याला माझा स्वार्थही म्हणू शकतोस. पण त्या दिवशीच्या घटनेनंतर मला जाणवलं की माझा एका मर्यादेपलीकडचा मोकळेपणा आणि चंचल स्वभाव हेच मुख्य कारण होतं. त्यामुळेच तुझा गैरसमज झाला आणि तू बहकलास. “

” हो, मॅम. खरं आहे हे. मी माझं संतुलन घालवायला नको होतं. “

” प्रकाश, तेव्हा माझ्या मनात हा विचार आला नाही, की पुरुषांच्या मनात स्त्रियांविषयी असणारं आकर्षण जास्त असतं. आणि ही निसर्गदत्त, स्वाभाविक प्रक्रिया आहे. तू माझा फक्त सहकारी नव्हतास, तर माझा जवळचा मित्र झाला होतास. “

“मॅम, माझ्याही नंतर लक्षात आलं की मी माझ्या मर्यादेत राहायला हवं होतं. तुमचा स्वभाव फ्री होता, त्यामुळे मी एकतर्फी… प्रेम… “

“बस, बस… नो मोअर डिस्कशन… ! टॉपिक क्लोज्ड नाऊ. आणि हो, जेव्हा केव्हा तुला गरज पडेल, तेव्हा निःसंकोच मला फोन कर. मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन. उद्या पुन्हा याच वेळी कॉल करीन. ओके. बाय! टेक केअर. “

फोन बंद होताच त्याला वाटलं, की त्याचे हात स्वर्गाला टेकले आहेत. आता तो पूर्णपणे तणावमुक्त झाला होता. आपल्या आत एका नव्याच ऊर्जेचा संचार झाल्यासारखं त्याला वाटत होतं.

मॉनिटरवरचा ऑक्सिजनचा ग्राफ बघत प्रकाशने सावकाश डोळे मिटले.

मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

मूळ तीन हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–☆ श्री जगदीश काबरे ☆

(3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त)

अपवाद वगळता आजच्या अनेक शिक्षित-अशिक्षित स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईनी शिक्षण दिलं त्यासाठी अंगावर दगड माती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, संत्संगला जायला, पोथीपुराणे वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत याच्यासाठी सावित्रीबाईनी तुम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त केलं का? याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती खाल्ले? याच्यासाठीचं का सावित्रीबाईंनी वाटेल तसा मान-अपमान सहन केला? कशासाठी केला त्यांनी हा उपद्व्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावे म्हणून? ह्या शिक्षित स्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापुर्वीही स्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासऱ्याला न्याय देत होती की. न शिकताच सर्व करीत होती तर मग तुम्ही नवीन काय केलं?

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या, हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रकाशक – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ प्रकाशक – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दोन महीन्यानंतर मी लंडनहून आलो.मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिर्‍हाड केले होते.हा मला मोठा धक्का होता.) – इथून पुढे — 

अनघा जयंताशी लग्न करेल असे मला अजिबात वाटत नव्हते किंबहुना अनघा आणि मी एकमेकांसाठी अनुरूप आहोत असाच माझा कयास होता. माझे आई-बाबा सुद्धा अनघाने असा का निर्णय घेतला आणि माझे तिच्याशी वादभांडण झाले होते की काय अशी विचारणा केली.

खरतर या दोघांनी मला कसलीच कल्पना दिली नव्हती .

मी मुंबईत आलो पण या दोघांना भेटायला गेलो नाही. 

मला या दोघांचा खूप राग आला होता.मनस्ताप झाला होता.कशातही लक्ष लागत नव्हते .याच काळात माझ्या मनात कली शिरला.

या दोघांचा संसार कसा मोडेल याची मी वाट पाहू लागलो.

अनघाला सांस्कृतिक जगाची भूक होती. त्यामुळे तिला त्या जगात अडकवावे असा विचार मनात आला.

त्याच सुमारास मुंबई दूरदर्शन सुरू होत होते. त्या करीता विविध विभागात निर्माते, सहनिर्माते शोधणे सुरू होते. मी माझ्या कविमित्राकडे अनघाची निर्मात्याच्या पदासाठी शिफारस केली.

अनघा मुळातच हुशार त्यामुळे तिला निर्मात्याच्या पदाची नोकरी मिळाली.

या मायावी दुनियेत तिचा प्रवेश झाला आणि वेगवेगळे कलावंत तिच्या आयुष्यात येऊ लागले.

तिला मुलाखतीसाठी प्रसिद्ध साहित्यीक, नाटककार, संगीतकार हवे असायचे. त्यामुळे ती मला भेटू लागली.

त्यामुळे दोघा नवरा बायकोत खटके उडायला लागले.मला हे लांबून कळत होते आणि मनातून आनंद होत होता.

शेवटी अनघाने जयंताबरोबर काडीमोड घेतला आणि एका मराठी नटाची ती पत्नी झाली.

या सर्व प्रकाराने जयंता सैरभैर झाला आणि वारंवार माझ्याकडे येऊ लागला,त्याची नाटके छापूया आणि प्रकाशीत करूया असे सांगू लागला.पण मी काहीन काही कारणे सांगून ते टाळू लागलो.

मला जयंताचा सूड घ्यायचा होता.त्याचे कवितासंग्रह  आणि कथासंग्रह पूर्वी आम्ही छापले होते.त्याचे अधिकार आमच्याकडे होते. 

त्याच्या आवृत्या काढूया असे तो सांगत होता. मी त्याच्या कडे दुर्लक्ष केले.

आमच्या प्रकाशनाकडून नाटकांची छपाई होत नाही म्हणून तो मुंबईतील इतर प्रकाशकांकडे खेपा घालू लागला.पण सर्व प्रकाशकांना जयंता हा माझा मित्र असल्याचे माहीत होते,

त्यामुळे मुंबईतील एकही प्रकाशक त्याचे पुस्तक छापण्याचे धाडस करू इच्छीत नव्हता .म्हणून नाईलाजाने त्याने पुण्याचा नवीन प्रकाशक गाठला,पण पुस्तक छपाईची क्वालिटी अगदी खराब होती आणि त्या प्रकाशकाला मार्केटिंग ची माहीती नव्हती,त्यामुळे ती पुस्तके दुकानात  उपलब्ध झाली नाहीत.

त्यानंतर च्या काळात मी अत्यंत व्यस्त होत गेलो.आमच्या शाखा दिल्ली,बंगलोर,अहमदाबाद  या शहरात निघाल्या आणि आम्ही इंग्रजी पुस्तके प्रकाशीत करू लागलो.

त्यामुळे मी मुंबईत फार कमी असायचो.पण जयंता माझ्या मोठ्या भावाला येऊन भेटत होता हे मला कळत होते.

या नंतरच्या काळात जयंताने कविता लिहील्या. कथा लिहील्या पण त्याच्यातला स्पार्क कमी होत गेला कारण अनघा त्याची स्फुर्ती होती.त्याने त्याच्या कविता,कथा माझ्या मोठ्या भावाला दाखविल्या पण त्याला त्या आवडल्या नाहीत.

जयंताचे त्याच्या नोकरीवर कधीच लक्ष नव्हते. जो पर्यंत त्याचे फडके साहेब होते तो पर्यंत सहन केले,पण फडके साहेब निवृत्त होताच नवीन साहेबा बरोबर याचे पटेना, शेवटी जयंताने नोकरीचा राजिनामा दिला.

एकंदरीत यामुळे त्याची सर्वबाजूने कोंडी झाली असावी.

या काळात जयंताने मला काही पत्रे लिहीली.मुंबईतल्या मुंबईत त्याची पत्रे मला मिळत.त्याचे म्हणणे असे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याची पुस्तके लागावित म्हणून मी प्रयत्न करावेत,त्यामुळे त्याला अर्थप्राप्ती झाली असती.अर्थातच मी त्याकडे दुर्लक्ष केले.

माझ्या मुलाच्या अ‍ॅडमिशन च्या संबधात मी आणि पत्नी अमेरीकेत गेलो असताना जयंताला मृत्यू आला,शेवटची काही वर्षे तो मधुमेहाने त्रस्त झाला होता. मी अंत्ययात्रेत नव्हतो म्हणून साहित्यीक वर्गात खळबळ उडाली,पण माझा मोठा भाऊ अंत्ययात्रेत होता.

त्याच्या मृत्यू नंतर आमच्या प्रकाशनाने त्याची पुस्तके छापली आणि ती हातोहात खपली.

दोन महिन्यांनी मी अमेरीकेतून आलो आणि पुण्याच्या प्रकाशकाकडे जाऊन त्याच्या नाटकाच्या पुस्तकांचे हक्क विकत घेतले आणि जयंताची सर्व नाटके प्रकाशीत केली.आमच्या प्रकाशनाने त्याच्या नाटकाची पुस्तके सर्वत्र उपलब्ध केली. त्यामुळे ती चांगलीच खपली. एवढेच नव्हे तर मुंबईतील प्रतिष्ठीत नाट्य संस्थानी त्याची नाटके  रंगभूमीवर आणली.जयंताच्या एका नाटकात अनघाने मुख्य भूमिका केली.

या नाटकाचा प्रयोग पहायला मी पत्नीसह शिवाजी मंदिरात गेलो तेव्हा त्या नाटकात अनघाला पाहताना जयंताची खूप खूप आठवण आली.

त्याच्या नाटकाचे प्रयोग त्याने पहायला हवे होते असे मला वाटले आणि भर नाट्यगृहात मी रडू लागलो.

या नंतर माझ्या आयुष्यात सतत बेचैंनी आली.माझ्या पत्नीला कॅन्सर झाला,मुलीने माझ्या मना विरूद्ध लग्न केले,माझा मुलगा अमेरीकेत स्थायीक झाला.

आमची पुढची पिढी आमच्या व्यवसायत येईना. माझा मोठा भाऊ सतत आजारी पडु लागला.

थोडक्यात आमचे वाईट दिवस आले.माझी फिरती बंद झाली.नवीन पुस्तके प्रकाशीत करण्याची ईच्छा नाहीशी झाली,मी दुकानात बसु लागलो.आता हळू हळू ही प्रकाशन संस्था बंद करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत आहे.

या आयुष्यातील कातर वेळी जयंता,मला तुझी आठवण येते .तुझ्या सारख्या प्रतिभावान लेखकावर अन्याय झाला. लोकांना वाटते ही साहित्यीक मंडळी म्हणजे हुशार मंडळी, सुसंस्कृत मंडळी यांच्यात कसली राजकारणे असणार .

पण पुण्यातील श्रोते हो! तुम्हाला सांगतो,राजकारण्यांची राजकारणे , वाद,भांडणे तुम्हाला कळतात दिसतात. पण ही पुस्तके लिहीणारे आणि छापणारे ,प्रकाशित करणारे यांच्यातील घाणेरडी राजकारणे तुम्हाला कळत नाहीत.

आणि अशा हेव्यादाव्यामुळे जयंतासारख्या साहित्यकावर अन्याय होतो.त्याला आयुष्यातून उठवले जाते. निरनिराळे पुरस्कार ठराविक लोकांनाच मिळतात आणि साहित्यकातील कंपू इतरांना वर चढू देत नाहीत.

साहित्यिक जीवन या पुण्यातील कार्यकर्ते हो,आम्हा साहित्यीक लोकांचे हात असे बरबटलेेले असतात. 

माझा प्रिय मित्र जयंता त्याच्या लेखनाला मी न्याय देऊ शकलो नाही. उलट मी त्याचा व्देश केला .याचे मला वाईट वाटते.खेद वाटतो 

कॉलेज मधील आम्ही तीन मित्र जयंता मी आणि अनघा. अनघाने त्याला मधेच सोडले.मी त्याचा तिरस्कार केला.त्याचे लिखाण कुजवलं.मित्रा, जयंता कुठे असशील तेथून या तुझा मित्रास माफ कर , असं म्हणून एवढ्या श्रोत्यांसमोर मी ओक्साबोक्सी रडू लागलो.

समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रकाशक – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ प्रकाशक – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(”तुझे काय मत आहे? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय”? 

”होय’ !

त्याच क्षणी मी रागाने जयंताच्या घराबाहेर पडलो ) — इथून पुढे —

अशी घटना घडली त्यामुळे ती पुस्तके दुसर्‍याने प्रकाशीत केली.

प्रश्न – अलेक्झांडर सारखे सुंदर नाटकाचे पुस्तक असूनही त्या पुस्तकाची विक्री फारशी झाली नाही असे म्हणतात, कां?

मी – नुसते पुस्तक छापून चालत नाही, त्याचे मार्केटिंग करावे लागते, त्या पुण्याच्या प्रकाशकाला मार्केटिंगचा काहीच अनुभव नव्हता.

प्रश्न – मुंबईत मराठी पुस्तकांसाठी तुमची दोन दुकाने असताना आणि त्या काळी वाचक मराठी पुस्तकांसाठी तुमच्याच दुकानात येत असताना जयंतरावांची नाटके तुमच्या दुकानात मिळत नव्हती, हे खरे काय?

मी- हे खरे आहे, याचे कारण पुण्याच्या त्यांच्या प्रकाशकाने आमच्या दुकानात पुस्तके ठेवली नाहीत, आमची पुस्तकांची ऑर्डर त्यांनी पुरी केली नाही.

प्रश्न – कॉलेजमधील तुमची मैत्रिण अनघाताई यांनी जयंतरावांशी लग्न केलं, त्यांच्या प्रेम विवाहा बद्दल तुम्हाला कल्पना होती?

मी – मला कल्पना नव्हती.

प्रश्न – अनघाताई मग दूरदर्शनवर निर्मात्या झाल्या त्यांनी ही नोकरी स्विकारताना तुमचा सल्ला घेतला होता काय?

मी- नाही.

प्रश्न – मग अनघाताई दूरदर्शवर गेल्यानंतर तुमचे त्यांच्याबरोबर अनेक फोटो कसे काय दिसतात?

मी – अनघा ही साहित्यीकांच्या आणि कलावंताच्या मुलाखती घ्यायची, तिला साहित्यीकांच्या भेटी घाटी होण्यास माझी मदत व्हायची कारण माझा प्रकाशन व्यवसाय असल्याने या मंडळीत माझी उठबस असायची.

प्रश्न – अनघाताई जयंतरावांना वर्षभरात सोडून गेल्या, त्या सोडून जाणार हे तुम्हाला माहीत होतं का?

मी- नाही.

प्रश्न – अनघाताईनी जयंतरावांशी स्वत:हून लग्न केलं होतं, मग असं काय झालं, की त्या वर्षाच्या आत त्यांना सोडून गेल्या?

मी – याची मला कल्पना नाही, ते तुम्ही अनघाला विचारा.

एवढ्यात त्या मुलाखत घेणार्‍या दोन मुली पैकी दुसर्‍या मुलीने सोबतच्या बॅग मधून एक जूना पेपर बाहेर काढला, ती मुलगी बोलू लागली.

“वसंत सर, जयंतरावानी १९९५ साली कोल्हापूरच्या पुढारीस मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत जयंतराव म्हणतात 

– वसंताने म्हणजे तुम्ही माझी म्हणजे जयंतरावांची नाटके प्रकाशीत करायला नकार दिला, खरं तर वसंताचे पब्लीकेशन हे त्या काळी मराठीतील सर्वोत्तम प्रकाशन होते. शिवाय त्यांची मुंबईत स्वत: ची दोन दुकाने होती, म्हणून मला ती पुस्तके पुण्याच्या नवीन प्रकाशकाकडे द्यावी लागली 

आणि येवढ्या चांगल्या पुस्तकांची त्यांनी वाट लावली, ती खपली नाहीत, लोकांपर्यंत पोहचली नाहीत.

मी ओरडलो- हे खोटं आहे. जयंता खोटे बोलत आहे.

पुन्हा तीच मुलगी बोलू लागली.

वसंत सर, जयंतरावांच्या निधनानंतर दुरदर्शच्या प्रतिनिधीने तुमच्या मोठ्या भावाची म्हणजेच जे तुमची दोन्ही दुकाने सांभाळतात, त्या प्रभाकर रावांची मुलाखत घेतली होती, त्याची कॅसेट माझ्या कडे आहे.

त्या मुलाखतीत तुमचे मोठे भाऊ प्रभाकरराव म्हणतात 

जयंतराव हे उच्च दर्जाचे कवी होते, कथा लेखक होते, आम्ही त्यांची पुस्तके सुरवातीस छापली, पण काय झाले कोण जाणे, माझा धाकटा भाऊ वसंत हाच त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्या काढायला विरोध करू लागला.

मला दरदरून घाम सुटला. एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर या दोन मुली मला उघडं पाडत होत्या,

मी ओरडलो – कोण आहात तुम्ही ? मला पाहुणा म्हणून बोलावलत आणि मलाच खोटारडा ठरवता ? माझा अपमान करता?

“तुमचा अपमान नाही करत सर, आम्ही दोघीनी जयंतरावांच्या साहित्यावर पी. एच. डी केली आहे. त्यांच्या साहित्यात जसजसं खोल जाऊ लागलो, तसें लक्षात आले, एवढ्या ताकदीचा लेखक त्याची तुम्ही काढलेली कविता संग्रह किंवा कथासंग्रह कुठेच उपलब्ध नाही, अगदी वाचनालयात सुद्धा, ज्यांची कुवत नाही. अशा लेखकांच्या तुम्ही तीन चार आवृत्या काढता 

आणि जयंतरावांसारख्या असामान्य लेखकांची पुस्तके मिळत नाहीत. त्यांची पुस्तके खपत नव्हती. मग जयंतराव गेल्यानंतर त्यांच्या साहित्याच्या दरवर्षी आवृत्या कां काढता?आणि त्यांची पुस्तके आता खपतात कशी?

माझा आरोप आहे जयंतरावांच्या पुस्तकांचे अधिकार स्वत:कडे ठेऊन तुम्ही जयंतरावांची फसगत केलीत. असं नाही वाटत? 

त्या दोन मुलींच्या एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरी झडत होत्या. मी केविलवाणा होऊन ऐकत होतो.

मी खजील होऊन व्यासपीठ सोडले आणि बाहेर येऊन माझ्या गाडीत बसलो. मी गाडी स्टार्ट केली, एव्हढ्यात माझ्या मनात आले ज्या चुका माझ्या हातून झाल्या त्याची कबूली देण्याची हीच वेळ आहे.

मी गाडी बंद केली आणि पुन्हा हॉल मध्ये आलो. हॉलमध्ये येऊन माझ्या खुर्चीवर बसलो. मी बाहेर पडताच हॉलमधील लोक खुर्च्या सोडत होते, त्या दोन मुली पण आपले कागद, लॅपटॉप आवरून निघायच्या बेतात होत्या.

मी स्टेजवर येऊन खुर्चीवर बसताच आयोजकाने माझ्या हातात माईक दिला आणि मी बोलू लागलो.

साहित्य जीवन या ग्रुपने माझ्या मित्राच्या स्मृतिदीनानिमीत्त येथे मला आमंत्रित केले त्या बद्दल आभार.

मंडळी, आयुष्यात काही चुका होतात. मी माझ्या मित्राशी जे वागलो त्याबद्दल माझ्या मनात खंत आहे. जे मनात आहे त्याची कबुली देण्याची या व्यासपीठा सारखे उत्तम व्यासपीठ कदाचीत मला मिळणार नाही.

माझी मुलाखत घेणार्‍या या दोन हुशार मुलींना जयंताच्या साहित्यावर डॉक्टरेट करावीशी वाटली. यातच त्याचे साहित्य काय उंचीचे आहे ते लक्षात येईल.

मंडळी, आता तुम्हाला माझ्याकडून जयंताच्या साहित्याकडे कानाडोळा का झाला किंवा मी जयंताचा द्वेष का केला हे सांगावे लागेल.

यासाठी सुमारे चाळीस वर्षापूर्वीचा काळ आणि त्यानंतर ची दहा वर्षे डोळ्यासमोर आणावी लागतील 

मी, जयंता आणि अनघा एका कॉलेज मध्ये होतो. तिघांनाही लेखन, नाटक, संगीत यांची आवड, जयंता उत्तम कविता करायचा तसेच उत्तम लिहायचा.

अनघा गायिका, उत्तम वाचक, नाटकामध्ये काम करणारी अभिनेत्री, दिग्दर्शिका. मला सर्वच कलांमध्ये उत्तम गती होती.

अनघा वरच्या आर्थिक परिस्थितीत, मी मधल्या आणि जयंता कनिष्ठ. आम्ही तीघे एकत्र संगीत मैफली ऐकायचो, नाटके पहायचो, प्रायोगिक नाटके करायचो.

मला अनघा आवडायची. ती कधी कधी आमच्या घरी यायची. आमच्या दुकानात यायची, माझ्या आई-बाबा बरोबर गप्पा मारायची. माझ्या घरच्यांना वाटत होते की बहुतेक माझं अनघा बरोबर लग्न होईल.

माझ्या व्यवसाया निमित्त मला दोन महीन्यासाठी लंडन ला जावं लागलं. जाण्याआधी जयंताला त्याची नाटके मी आल्यावर छापूया असे सांगून मी लंडन ला गेलो.

दोन महीन्यानंतर मी लंडनहून आलो. मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिर्‍हाड केले होते. हा मला मोठा धक्का होता.

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रकाशक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ प्रकाशक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

जयंतरावांचा पाचवा स्मृतीदिन जवळ आला तसा साहित्यिक विश्वात त्यांच्याविषयी लिहून यायला लागलं.  जयंतरावांचे फॅन्स सर्वत्र, मुंबई, पुण्यात जास्त.  पुण्याच्या साहित्य जीवन या गृपने मला प्रमुख म्हणून आमंत्रित केलं.  तसे दरवर्षी मला कुठे ना कुठे बोलावलं जातंच.  पण यंदा पुण्याच्या गृपने एक महिना आधी माझा होकार मिळविला.  मी जयंताचा प्रकाशक..  त्यापेक्षा जवळचा मित्र म्हणून मला जास्त मागणी.

गेले महीनाभर जयंताच्या आठवणी पिंगा घालत अवतीभवती फिरत होत्या.  नेहमी प्रमाणे त्याच्या कवितासंग्रहाच्या आणि कथा पुस्तकांच्या आवृत्या माझ्या प्रकाशन संस्थेमार्फत काढल्या.  या सुमारास त्याची पुस्तके खपतात हा अनुभव.  प्रत्येक आवृत्तीची छपाई झाली की त्यातील एक पुस्तक माझ्याकडे येत होते.

प्रत्येक पुस्तक म्हणजे जयंताच्या आठवणींची एक लाट.  लाट अंगावर येवून मला चिंब भिजवत होती.

पुण्याच्या कार्यक्रमासाठी मी आधल्या दिवशी पुण्यात पोहचलो. सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला.

व्यासपीठावर जयंताचा मोठा फोटो लावला होता.  टेबल, चार खुर्च्या आणि समोर जयंताच्या साहित्याचे चाहते.  त्यामुळे हॉल त्याच्या चाहत्यांनी भरला होता.  सुरूवातीस स्वागत झाले. माझ्या हस्ते जयंताच्या फोटोस हार घातला गेला आणि माझ्या भाषणाऐवजी जयंताच्या आठवणीसाठी माझी मुलाखत घेण्यासाठी दोन मुली समोर येवून बसल्या.  आणि प्रश्नोत्तरे सुरू झाली….  

प्रश्न- “सर, जयंतराव हे तुमचे मित्र आणि लेखक सुद्धा.  तुम्ही त्यांचे चार कविता संग्रह आणि तीन कथा संग्रह प्रकाशित केलेत, मग तुमचे जास्त जवळचे नाते काय? मित्र की लेखक ? “

मी – मैत्री पहिली. आम्ही दोघे मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये शिकत होतो.  लेखन, वाचन, नाटक, संगीत या आवडीने जवळ आलो.

प्रश्न – मग तुम्ही प्रकाशन व्यवसायात कसे आलात ? 

मी – प्रकाशन हा माझ्या कुटुंबाचा व्यवसाय.  त्या वेळी आमची मुंबईत दोन पुस्तकांची दुकाने होती, आता सहा आहेत.

प्रश्न – जयंतराव केव्हापासून लिहू लागले? कॉलेजमध्ये असताना की नंतर ?

मी – तो कॉलेजमध्ये असताना कविता करायचा.  आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला प्रसिद्ध लेखक, कवी होते.  त्यांचे पण संस्कार त्याच्यावर झाले.  कॉलेजनंतर तो म्युनिसिपालटीमधे नोकरीला लागला. लेखन सुरूच होते.

प्रश्न- जयंतरावांना संगीताची पण समज होती असं म्हणतात.

मी- समज होती नाही..  तो उत्तम गायचा, आमची खरी मैत्री गाण्यामुळे झाली.

प्रश्न – सर, जयंतरावांची पत्नी ही तुमची वर्गमैत्रीण ना? त्यांना अनेक कलांची देणगी होती असे म्हणतात.

मी – ती उत्तम अभिनेत्री, लेखिका, गायिका होती 

प्रश्न – सर, कॉलेज मध्ये असताना तुम्हा तिघांचा गृप होता असे म्हणतात हे खरे आहे काय?

मी – हे खरे आहे, मी, जयंता आणि अनघा नेहमी एकत्र असायचो.  तिघांच्या आवडीनिवडी सारख्या, त्यामुळे आमचं मस्त जमायचं.

प्रश्न – त्या काळात तुम्ही नाटके पण फार बघायचात ? 

मी – होय.  आम्ही विजया मेहतांच्या रंगायन गृपमध्ये होतो.  विजया मेहता अल्काझींच्या विद्यार्थीनी.  त्यांनी मराठी नाटकात नाविन्य आणले.  लहान हॉलमध्ये नाटके व्हायची, आम्ही लहान-लहान भूमिका करायचो, तसं नाटकाचं सारच करायचो, नेपथ्य लावायचो, लाईट जोडायचो, मेकअप करायचो, सतत बाईंच्या बरोबर असायचो.

प्रश्न – आणि तुमचा व्यवसाय?

मी – व्यवसाय सांभाळायचोच, कॉलेजमध्ये असतानाच मी पुस्तक प्रकाशन व्यवसायात आलो.

माझ्यापेक्षा तिप्पट, चौपट वयांच्या लेखकांची पुस्तके मी प्रकाशित करत होतो.  

प्रश्न – तुम्ही जयंतरावांची पण पुस्तके प्रकाशित केलीत?

मी – त्याचे कवितासंग्रह, कथासंग्रह मीच प्रकाशित केले.

प्रश्न – आणि त्यांची नाटके? विशेषत: त्यांचे प्रसिद्ध नाटक अलेक्झांडर? 

मी – त्याची नाटके दुसर्‍या प्रकाशकाने प्रसिध्द केली 

प्रश्न – तुम्ही एवढे जवळचे मित्र असताना ती पुस्तके दुसर्‍यांकडे का गेली ?

मी- ते आता मला तुम्हाला सविस्तर सांगावे लागेल.  कॉलेज काळात मी, जयंता आणि अनघा कायम बरोबर असायचो.  जयंता मध्यमवर्गीय गिरगावातला मुलगा, दहा बाय दहाच्या जागेत आठ जण राहायचे, अनघा ही फायझरच्या ऑफिसरची मुलगी.  त्या काळी वडीलांची गाडी वगैरे असलेली.  मी ग्रॅन्टरोड भागातील उच्च मध्यम वर्गीय.  आमचे कुटुंब पुस्तक व्यवसायात. अनघा मला आवडत होती.  विजयाबाईंच्या रंगायनमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायचो, नाटकाच्या तालमीला जाताना अनघा आपली गाडी घेऊन यायची, माझ्या घराजवळ येवून मला गाडीत घ्यायची, पुढे जयंताला ठाकूरव्दारच्या कोपर्‍यावर घ्यायची.  तालमी संपवून येताना आम्ही तिघे गिरगाव चौपाटीवर बसायचो.  जयंता त्याच्या कविता म्हणायचा, अनघा त्याला चाल लावायची आणि गाणं म्हणायची.  अनघा जयंताला म्हणायची – “चांगल्या इंग्लीश नाटकांची भाषांतरे कर, तू कवि मनाचा आहेस, आपण बाईंना सांगू नाटक बसवायला. ” अनघाने ब्रिटीश लायब्ररीमधून सात -आठ इंग्लीश नाटके आणून दिली. जयंताने मनापासून त्यांची रूपांतरे केली. अलेक्झांडर त्यातील एक, बाईंनी अनघाला हे नाटक बसवायला सांगितले.  नव्या जुन्या कलाकारांना घेवून अनघाने हे नाटक बसविले. त्याचा प्रयोग मी पाहीला.  आणि जयंताला म्हटले- ” हे नाटक मी छापणार”. , त्यावर जयंता म्हणाला – ” तूच छाप, तूझ्याशिवाय दुसरं कुणाला देणार ?” त्या नाटकाचा बराच बोलबाला झाला, जयंताचे खूप कौतुक झाले. अनघाने नाटक बसवले म्हणून तीचे कौतुक झाले.  पुस्तक मी प्रकाशित करणार या आनंदात होतो.  सहा महीने झाले तरी जयंताने त्या पुस्तकांची हस्तलिखीते दिली नाहीत, अचानक मला समजले की ही पुस्तके पुण्याचा एक प्रकाशक छापत आहे. मी आश्चर्यचकित झालो.  आणि जयंताच्या घरी गेलो.

“जयंता, तुझी नाटकाची पुस्तके पुण्याचा प्रकाशक छापतो आहे हे खरे काय”?

”होय, हे खरे आहे”

”पण मी तुला तुझी सर्व नाटके छापणार हे सांगितलं होतं. आणि मी हस्तलिखीते मागत होतो ”.

“अनघाने या प्रकाशकाला माझ्याकडे आणले. ”

“अनघाने? मग तिने मला कां नाही सांगितले”?

“अनघाचे म्हणणे तू जे माझे कवितासंग्रह छापलेस, त्याचे मानधन फारच कमी दिलेस, त्याच्या डबल पैसे मिळायला हवे होते. ”

“अरे, पैशांचा व्यवहार माझा मोठा भाऊ पाहतो, मी नाही आणि मला जर हे अनघा बोलली असती तर मी भावाकडे बोललो असतो”.  

“अनघा म्हणते, तू जी पुस्तके छापलीस त्याची क्वॉलीटी चांगली नव्हती.  इतर प्रकाशक पुस्तके छापतात त्या मानाने काहीच नाही. “

“हा आरोप मला मान्य नाही. मी तुझी पुस्तके मुंबईतील सर्वोत्तम प्रेसमधून छापून घेतलीत आणि अनघा म्हणते…..  हे काय आहे..  तुझे काय मत आहे? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय”? 

”होय’ !

त्याच क्षणी मी रागाने जयंताच्या घराबाहेर पडलो  

– क्रमशः भाग पहिला  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – २ –  लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – २ –  लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(ही बहिणही रडत भेकत माहेरी आली. तर सगळे तिला म्हणाले, ” हे बघ, एकदा नीट पाहून तुझे आम्ही लग्न लावून दिलं होतं. आता तू आणि तुझं नशीब. ” ) – इथून पुढे — 

” असं कसं, असं कसं ? आता तिच एकटीचच नशीब कस?

त्या नव-याचही नशीब नाही का ?आणि तिची सासू आमच्या

मरून गेलेल्या आईचा काय म्हणून उद्धार करते ? मोठ्या ताईला आणि दुस-या माईला दोन दोन मुलगे कसे झाले मग आधी ? त्या नाहीत का याच आईच्या लेकी. “

” पुरे ग, तुझी अक्कल नको पाजळू. प्रसंग काय, ही बोलतीय काय ? “

” काय चुकीचं बोलले ? अं, खरं तर हे तुम्ही तिच्या सासरच्या माणसांना ठणकावून सांगायला हवं होतं. आणि तिचा नवरा एवढा शिकला सवरलेला हिला काडीमोड न देताच असं कसं दुसरं लग्न करतो ? बेकायदेशीर नाही का ते ? ही आपली रडत भेकत इथं आली. तिथं नव-याला आणि सासूला नाही का जाब विचारायचा. लग्नाच्या आधी माहित होतं ना त्यांना आम्ही चौघी बहिणीच आहोत म्हणून. “

“अग पण तुला विचारलय का कुणी ? अं? आम्ही मोठी माणसं आहोत ना ? तिला त्यांनी घटस्फोट दिला आणि उद्या ही पोरींच्या सकट माहेरी पाठवून दिली तर सांभाळणार कोण त्यांना ? “

” मग काय त्याच घरात राहणार काय ही सवती बरोबर ? “

” काय करणार मग? त्याच्याशी बोलणं झालंय आमचं. तो हिलाही नांदवायला तयार आहे. हा मोठेपणाच की त्याचा. “

” डोंबलाचा मोठेपणा. मुलगा किंवा मुलगी होण्यात बाईचा काहीच दोष नसतो, असला तर पुरुषाचाच असतो हे शास्त्रानं सिद्ध झालय. तुम्हालाही हे माहित आहे आणि त्यालाही हे माहीत आहे. “

” अग पण त्यांच्या वंशाला मुलगा हवा असला तर त्यांना ? “

” कशाला पण ? मुलगी नाही का वंशाचं नाव मोठं करीत ? आणि मुलगा व्यसनी, मठ्ठ, गुन्हेगार झाला आणि एकुलता एक म्हटलं की हमखास अती लाडानी तो तसाच होतो, तर मग त्या वंशाचं नाव काय कोळश्यानं लिहीणार आहेत का हे लोक ? “

” अग बाई, काय तोंडाला हाड आहे का नाही तुझ्या ? जरा शुभ बोलायला काय होतं तुला ? “

” तुम्ही सगळी करणी अशुभ करा. “

” जाऊ दे, मरु दे. आता हिचचं एकदा लग्न करून द्या. मग हिची चुरुचुरू बोलणारी जीभ काय करते ते दिसेल “

अखेर वडीलच म्हणाले 

” हिने आजवर माझं काहीच ऐकलं नाही. ” ते ही थकले होते आता.

” काॅलेजला जाऊ नको म्हटलं, गेली. मैदानावर मुलांच्या बरोबर खेळू नको म्हटलं तर अर्धी चड्डी घालून उंडारतीय. तोंड सुटल्यासारखी कुठे कुठे भाषण करतीय. कोण हिच्याशी लग्न करणार? सज्जन घरात तर हिचा निभाव लागणं कठीण! “

” कुणी सांगितलं तुम्हाला माझं लग्न करा म्हणून. आणि यांना सगळ्यांना जी सज्जन घरं पाहून दिली होती त्यांनी काय दिवे लावलेत ? “

खरंतर तिचं म्हणणं सगळ्यांना मनातून पटत होतं. पण कबूल करवत नव्हत. घरातला विरोधही दिवसेंदिवस बोथट होत गेला होता.

तिला जे जे करावसं वाटत होतं ते ते ती करतच होती. पण वडिलांच्या कडून पैसे घेणे तिने कधीच बंद केलं होतं. हायस्कूल मध्ये ती सतत वरच्या वर्गात होती. त्यामुळे तिला फी पडत नव्हती. शिवाय किरकोळ खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. सतत कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत तिला बक्षीस मिळत होती. इतकं करून कॉलेजला इतर मुलींच्या सारखे तिचे नखरे नव्हते. नटण्या मुरडण्याची, दाग दागिन्यांची तिला आवड नव्हती. मोजके पण व्यवस्थित कपडे आणि नीटनेटकी स्वच्छ रहाणी. तरी अशी काय भणंगासारखी राहते ? मुलीच्या जातीला शोभेसं राहू नये का? बांगड्या नाहीत, गळ्यात नाही. काही नाही. घराण्याची अब्रू काढते नुसती. अशा कुरबुरींच्याकडे तिने कधीच लक्ष दिल नाही. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासूनच तिने एका कारखान्यात अर्धवेळ नोकरी धरली होती. एक श्रीमंत सेवाभावी गृहस्थानी केवळ बायकांना स्वावलंबी होता यावं म्हणून हा कारखाना सुरू केला. तिचं कामातलं कौशल्य, लोकसंपर्क साधण्याची कला, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा याची नोंद वरिष्ठांनी कधीच घेतली होती. तिचं काॅलेजच पदवीचं वर्ष संपलं आणि मालकांनी तिला मुद्दाम बोलावून घेतल.

“आता काय करणार आहेस ?”

“तसं काही ठरवलं नाही. पण काहीतरी कायमची नोकरी, कामधंदा करायचा आहे हे निश्चित. “

” आहे हेच काम वाढवायला आवडेल तुला?”

” म्हणजे ?”

“एक नवीन युनिट सुरू करायचय. खास ग्रामीण महिलांसाठी. इथं कोणती 

उत्पादन करायची, महिलांना प्रशिक्षण कसं द्यायचं, दर्जा कसा वाढवायचा, बाजारातला खप कसा वाढवायचा अशा सर्वांगीण जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मी आहे. तुझी इच्छा असेल तर ही जबाबदारी घेण्यासाठी मी तुला निमंत्रण देतोय असं समज. “

क्षणभर ती गोंधळली. पण दुस-याच क्षणी तिच्या नजरेत आणि अविर्भावात असा भाव होता की हे असच व्हायला हवं होतं. मला प्रथम विचारलं याच्यात काहीच आश्चर्य नाही. तरी मृदूपणाने ती म्हणाली 

” तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. “

आणि आता ? आता ती कारखानामय झाली. घरात राहणं जवळजवळ संपलं. आवश्यक कामासाठीही घरी जायला वेळ मिळेना. अखेर मालकांनीच कारखान्याजवळ तिच्या निवासाची चांगली व्यवस्था केली. एक दिवस शिपाई काम करणारी तिची सहकारी बाई सांगत आली, “बाहेर दोघीजणी तुम्हाला भेटण्यासाठी केव्हाच्या थांबल्या आहेत. तुम्ही मिटींग मधे होतात म्हणून सांगितल, “थांबा”. पण तरीही त्या थांबूनच राहिल्या. आता यातही तिला नवीन काहीच नव्हतं. तिची आणि तिच्या कारखान्याची कीर्ती, व्याप वाढतच होता. कोणी कोणी माणसं अखंड तिच्या भेटीसाठी खोळंबून असत. कधी व्यापारी, छोटे उद्योजक, कधी कुठल्या संस्थेच्या

कार्यक्रमासाठी तिला पाहुणे म्हणून निमंत्रण करणारे आणि कधी कधी काम मागणारे. आता केवळ स्त्रियांसाठी यापेक्षा गरजू आणि पात्र कामगारांसाठी मग त्या स्त्रिया असोत की पुरुष. तिचा कारखाना चालू होता. त्यातून तरुण तरुणी नवनवीन कल्पना घेऊन ताज्या उत्साहाने तिच्या कारखान्यात काम करत होते. माणसातल्या कष्टाळूपणाला आणि प्रामाणिकपणाला तिथे जास्त किंमत होती. दिखाऊ दिमाख त्यांना वर्ज्य होता.

“बाईसाहेब, पाठवू का त्या दोघींना आत ? “

खरंतर आता तिला थोडी शांतता हवी होती. खूप वेळ कामात राहिल्याने शीण आला होता. तरी ती म्हणाली “हो पाठव ” 

दोन ओढलेल्या प्रौढा समोर खालमानेने उभ्या होत्या. फाईल मध्ये पाहतच, अंदाज घेत तिने विचारलं “हं, काय काम होतं ?”

त्रयस्थ स्वर ऐकून त्या आणखीनच काव-या बाव-या झाल्या. तिची मान अजून फाईलमध्येच होती.

” काम हवं होतं. “

हे ही नेहमीचचं.

कसलं काम? काय करायची तयारी आहे ? “

” काहीही “

” कधीपासून येणार? “

” अगदी आजपासूनही. फार गरज आहे हो. “

सलग दोन वाक्य कानावर पडली तेव्हा ती काहीशी चमकली. हळूच नजरेच्या कोपऱ्यातून दोघींच्याकडे तिने पाहिलं. अंदाज खरा होता. क्षणभर ती विमनस्क झाली. आपल्याला वाईट वाटतंय की संताप येतोय हे तिचं तिलाच कळेना. पण आपल्या भावनांच्या वर नियंत्रण ठेवणं आता तिचा स्वभाव झाला होता. त्याखेरीज हा एवढा मोठा व्याप जबाबदारीने सांभाळणं शक्य नव्हतं.

पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलंस करुन तिनं शिपाई बाईला तिच्या हाताखालच्या व्यवस्थापकांच्याकडे न्यायला सांगितलं आणि त्या बाहेर पडताच व्यवस्थापकांना फोनवरून आवश्यक त्या सूचना दिल्या. दोन महिने गेले. दोन-तीन दिवस कारखान्याला दिवाळीची सुट्टी होती. रितीप्रमाणे सर्वांना दिवाळी भेट दिली गेली.

कारखाना आता शांत वाटत होता.

त्या दोघींच्याकडं तिचं नकळत लक्ष होतं. आता त्या रुळल्या होत्या. बुजरेपणा कमी झाला होता. सुरुवातीला संध्याकाळी थकल्यासारख्या दिसायच्या. आता उत्साही दिसत. दिवाळीची भेटवस्तू घेऊन जाताना आज त्या ताठ मानेने ब

बाहेर गेल्या. दिवाळीची सकाळ. तिने निरोप दिल्याप्रमाणे ठरल्यावेळी त्या दोघी तिच्या घरी गेल्या. आज तीच काहीशी कावरी बावरी झाली होती. आपण केलं ते बरं की वाईट तिचं तिलाच ठरवता येत नव्हतं. तरी समाधान होतच. दारातून प्रसन्नपणे तिने दोघींना हात धरुन आत आणलं. कोचावर बसवत म्हणाली, ” या, ताई, माई. खूप बरं वाटलं. “

” तुम्ही ओळखलतं? “

“तूच म्हणा. मी प्रथमच तुम्हाला ओळखलं होतं. तुमची परिस्थिती माझ्या कानावर येत होती. पण मी जाणीवपूर्वक घराकडे पाठ फिरवली होती. आपली विश्वं एकमेकांच्या पासून फार दूर होती. रोज खाणाखाणी करत एकमेकांना घायाळ करत जगण्यातनं काय निष्पन्न होणार होत? तुमची पिढ्यान पिढ्यांची चाकोरी, विशेषतः मनांची, माझ्या बोलण्या वागण्याने बदलणार नाव्हती. उलट कटूता वाढणार होती. म्हणून मी शांतपणे घर सोडलं. पण तेव्हाही मला माहीत होतं, एक दिवस नक्की तुम्ही माझ्याकडे येणार आहात. “

” मग आम्ही आलो त्यावेळी ओळख का नाही दिलीसं?”

” फार अवघड गेल मला तेव्हा दुरावा दाखवणं. पण तुमची तुम्हाला नीट ओळख व्हावी म्हणून दूर राहणं मला गरजेचं वाटलं. “

“नाही, खरं आहे. त्यावेळी तू ओळख दाखवली असतीस तर आम्ही परत ऐदीपणानं तुझ्याकडूनच मदतीची अपेक्षा करत राहिलो असतो. त्याचा सर्वांनाच त्रास झाला असता. “

“मुख्य म्हणजे तू म्हणतेस तशी आमची आम्हाला ओळखच पटली नसती. खऱ्या अर्थाने तुझी ही ओळख झाली नव्हती. कामातला आणि स्वावलंबनातला आनंद या दोन महिन्यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ कळला. बळ कळलं. हो, नाहीतर पूर्वीसारखच म्हणत राहिलो असतो, स्वातंत्र्याच्या नावावर ही भरकटतीय. खरंतर केवढी मोठी जबाबदारी तू पेलतीयेस. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. त्यात बळही आहे. आनंदही आहे. वेगळ्या नशिबाची गरजच काय. “

कितीतरी वर्षांनी सगळ्या बहिणी खऱ्या अर्थाने मायेने जवळ आल्या होत्या. सगळे तपशील त्यात वाहून गेले होते.

— समाप्त —

लेखिका : डाॅ. तारा भवाळकर 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares