मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांगड नव्या – जुन्याची… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ सांगड नव्या जुन्याची… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

“बाबा किती धावपळ करताय?पाच मिनिटं बसा ना जरा माझ्याजवळ!.बाबा मला बोलायचय तुमच्याशी.आधी ह्या गोळ्या घ्या बरं.!मी  विसरलेच होते पण स्नेहा मावशिने  आठवण करून दिली.” दम लागलेल्या वडिलांना प्रेमाने दम भरूनच अर्पिताने खाली बसवल. “किती थकलेत मानसिक ताणामुळे आपले बाबा. कोरोना मध्ये आई गेली आणि खचलेच आपले वडील. आई असतानाच अर्पिता चा साखरपुडा झाला होता.लग्न अगदी तोंडावर आलं होत.आणि अचानक ही कोरोना ची लाटआली.   जबरदस्त तडाखा बसला त्यांच्या घराला.संकटाची ही लाट आली आणि अर्पिता च्या आईला घेऊन गेली.  सांवरायला उसंतच मिळाली नाही. लग्न लांबणीवर पडले. पण मुलाकडच्यांना आता उसंतच नव्हती कारण अमरची वयस्कर आजी मागे  लागली होती, त्यांचं म्हणणं,’ माझा काही भरोसा नाही. माझ्या डोळ्यासमोर नातसून आणा आता लवकर ‘. त्याप्रमाणे  तिचे सासु सासरे घरी आले आणि त्यांनी बाबांना समजावलं .  दुःखाचा डोंगर बाजूला सारून प्रयासाने दुःख आवरून  लेकीच्या भवितव्यासाठी मधुकरराव लग्नकार्याच्या सिद्धतेसाठी  उभे राहयले.  नव्हे नव्हे! त्यांना उभारी धरणं भागच होत. 

बोल बोलता लग्न दोन दिवसावर आल. हीच बाबांशी  बोलायची वेळ आहे असे म्हणून अर्पिता ने मधुकररावांना जबरदस्तीने खाली बसवलं आणि म्हणाली, “बाबा उद्या मी सासरी जाणार कन्यादान करताना मी सांगते तो संकल्प सोडून एक हट्ट पुरा कराल ना माझा?” तिला जवळ घेत ते म्हणाले” काय वाटेल ते करीन मी तुझ्यासाठी बाळा !. सांग काय करू मी तुझ्यासाठी ? प्रसंगी माझ्या लाडक्या लेकीसाठी प्राण सुद्धा द्यायला तयार आहे मी”. असं नकां ना बोलू बाबा! कशाला  ही मरणाची भाषा?आधीच  ह्या कोरोनाने  आई  हिरावून घेतलीय माझी. तुम्ही आणखी पोरकं नका नं करू मला . दुर्दैवाने 21 साल खूप खूप वाईट गेले आपल्याला नवीन सालाला आपण सारे दुःख गिळून   सामोरं नको का जायला?   झाले गेले गंगेला मिळाले असे समजून मागची वर्ष  विसरूया आपण ” . अर्पिता वडिलांना कळवळून विनवत होती .दुःखाचा  उमाळा आवरत मधुकरराव तिला विचारत होते ” काय करू ग मी  अर्पू? तुझ्या आईला नाही मी विसरू शकत”. “समजतय बाबा मला.. पण असं पहा  हें ही तितकंच कटू सत्य आहे की,आपली आई तिच्या आठवणी, तिचा वियोग, ते मागचे दिवस  परत नाही येणार आता.  माणसे निघून जातात पण आपण हळवी माणसं मनाच्या तळात त्या दिवसांचे दुःख,दुरावा बांडगुळासारखं उराशी बाळगत राहतो.पण बाबा एवढ आयुष्य पडलय आपल्या  पुढे .हे बोनस डे  स्वतःला सावरून मनशांतीतच घालवायला हवेत तुम्ही ..मी सांगते तुम्हाला भूतकाळावर पडदा टाकून भविष्यकाळ कसा जगायचा ते.पण त्याआधी ऐकाल माझं? मला वचन हवय तुमच्याकडून. पुढील आयुष्य आरोग्य, सुख शांततेत जगण्यासाठी तुम्ही — तुम्ही दुसरे लग्न करा बाबा.”उरावर दगड ठेवून बाबांच्या सुखाकरीता एका दमात हे सगळं बोलतांना दम लागला तिला. पण काय करणार ? कधीतरी ह्या विषयाला वडिलांच्या भवितव्याचा विचार करून ,वाचा   फोडावीच लागणार होती . 

बाबा ओरडले तिच्या अंगावर पण आपल घोड पुढे दामटत ठामपणे ती म्हणाली,” हे सांगताना मला सुद्धा खूपच त्रास होतोय हो. पण तुमचा उदास,एकाकी भविष्य काळ डोळ्यांसमोर आला  नां की जीव घाबरा होतोय  हॊ माझा!आता तर तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला मी पण नाहीये . कसं होणार तुमच ?आजी पण आता थकलीय. मनाने शरीराने आणि तुमच्या काळजीने  खचलीय ती. मुलाचा सुखाचा संसार सुखाने पहात आरामात दिवस काढायचे दिवस आहेत तिचे.तुमचा दोघांचा विचार करूनच काय करायचं ते आधीच ठरवलय मी. मागच्या अंधाराला दूर सारून नववर्षाच्या च्या प्रकाशात पदार्पण करूया बाबा आपण .आणि हो आजी मी,तुम्ही दुःखी असलेलं आईला पण नाही आवडणार. काळाच्या पडद्या आड गेलेली आई परत नाही येऊ शकणार हे कटू सत्य आहे. पण ते उरावर दगड ठेवून पचवायला हवय आपल्याला . त्यासाठी ऊसनं  अवसान  आणून बाहेर पडायलाच हवय ना आपण!  आणि म्हणूनच आईच्या जागी दुसरी आई हवीय मला. माझं माहेरपण जपणारी, आजीची तुमची काळजी घेणारी,आणि आपलं हे घरकुल सावरून घेणारी अशी आई  कीं तिच्या जीवावर निर्धास्तपणे मी सासरी आनंदाने राहू शकेन . बाबा तुम्ही फक्त हो म्हणा! पुढचं सगळं मी आणि आजी बघून घेतो.” आता मात्र आश्चर्य करण्याची पाळी   मधुकर रावांची होती. ते म्हणाले, ” म्हणजे ? आई पण तुझ्या कटात सामील आहे की काय ? मला नाही वाटत,मलाच काय तिलाही नाही पटणार हे !”  “नाही बाबा आपली आजी समंजस, धोरणी भविष्यकाळाचा वेध घेऊन, विचार करणारी कणखर बाई आहे. सगळ्यांच्याचं सुखाचा दूरदृष्टीपणे  ती विचार करते. हॊकार फक्त तुमच्याकडून हवा आहे. ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणून या दुःखातून तुम्ही बाहेर पडा.” “नाही बाळा परिस्थितीने मी इतका  खचंलोय की मी नाही बाहेर पडू शकत   या दुर्दैवापासून”. तें निराशेने  म्हणाले. ” तुम्ही आजीच्या वयाचा  विचार करा. तिकडे बघा नं जरा.! खिडकीतून बाहेर त्या झाडाकडे बोट दाखवत अर्पिता  वडिलांना  समजावत म्हणाली, ” ते झाड पाहिलंत कां बाबा? कुणीतरी अर्धवट कापलं होतं,पण ते उन्मळून नाही पडलं अनेक पाखरांची घरटी सांवरण्याकरता ते नुसतं उभं नाही राहयलं तर नीट बघा त्याला पालवी फुटलीय. कापलं तरीही आपली उभारी नाही सोडली त्यानी. तुम्ही पण आमच्यासाठी उमेद धरा. आई मला पोरकं करून गेली. तुम्ही मला खूप वर्ष हवे आहात. तुम्हाला  आता स्पष्टच सांगतें तुमच्या बरोबर सगळ्यांची कोसळणारी  मनं संभाळणारी,  तुम्हाला साजेशी अशी बायको म्हणून मी,आजी   आणि आईकडचे आजी-आजोबा यांनी स्नेहा मावशीची निवड केली आहे.” मधुकरराव किंचाळलेच एकदम, ” कांsss य ?” “शांत व्हा बाबा तिचे मिस्टर अपघातात गेलेत, ती पण दुःखी आहे. शेवटी उरलेल्या आयुष्यात वेलीला झाडाचा आधार हा हवाच ना ? तिला पटवलय आम्ही. आता फक्त तुम्ही मदतीचा हात पुढे करा. या नव्या वर्षात तुमच्या पाऊल उचलण्याने,होकाराने तीन कुटुंब  सावरतील. आपल्या आजीला मायेची सून मिळेल, आईचे माहेरघर सावरलं जाईल. कारण त्याआजी आजोबांनाही एक मुलगी गेल्याचे दुःख आहे आणि  दुसरीही निराधार होऊन माहेरी आलीय.तिची केव्हढी मोठी काळजी उतारवयात आहे त्याना. आईच्या , जाण्याने आपण संकटात सापडलो होतो, तेव्हा आपल दुःख बाजूला सारून   स्नेहा मावशीने फार मोठी मोलाची साथ दिली आहे आपल्याला. आता तुम्ही स्वतःला सावरून तिला मदतीचा हात देण्याची हीच वेळ आहे बाबा. मला हक्काचं माहेर  मिळेल . माय गेली पण मावशी तर  उरली  आहे नां?  दुसरी आईच आहे ती माझी! आणि हो आणखी हट्ट आहे माझा . तुमचं लग्न माझ्या आधीच झालं पाहिजे आणि  ह्यांना तुमच्या दोघांकडूनच   कन्यादान हव आहे.  मग काय! हो म्हणाल ना बाबा?आता पण नाही आणि काही नाही .  हा हट्ट पुरवण्याचं वचन  दिलय  तुम्ही मला.  तेव्हा आधी  लग्न  तुमचं आणि  स्नेहा मावशीच. मग  लग्न माझ “. 

अखेर लेकीच म्हणणं मधुकररावांना मान्य करावच लागल.    शेवटी मायेनी  विणलेलं नातं इतकं घट्ट असतं की ते उसवलं जातच नाही. बाल हट्ट त्यांना पुरवावाच लागला. ठरवल्याप्रमाणे त्या घरात दोन लग्नकार्य झाली  .कन्यादानाच्या वेळी   सारं घर हंसत होत. मागील वर्षांच्या  काळोखाला ‘रामराम’ ठोकून ते घर नववर्षाच्या प्रकाशात न्हाहून निघाल होत.. अगदी शांत मनाने  शुभ  कार्य   पार पडलं.  तिन्ही घराचा डोलारा सावरला गेला. वयाने लहान असूनही अर्पिताने नव्या जुन्या विचारांची सांगड घालून माहेरघर  सावरलं होतं. माप  ओलांडून  तिच्या लाडक्या स्नेहा मावशीचा तिच्या माहेरी प्रवेश झाला.आणि आता तिचं  शुभमंगल होऊन सासरच माप ओलांडायला ती निघाली होती. रेडिओवर जुनं गाणं लागलं होतं उंबरठ्यावर माप ठेऊनी  आले तुझीया घरी… कराया तुझीच रे चाकरी…  मंडळी अशाप्रकारे आईचा आणि लेकीचा दोघींचाही गृहप्रवेश होऊन शुभकार्य पार पडले.                   

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हरवले ते गवसले कां ? – लेखक : श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हरवले ते गवसले कां ? – लेखक : श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

बरीच वर्षे झाली या घटनेला. पण अजूनही तो दिवस आठवला की अंगावर कांटा येतो. मी बहुतेक नववीत होतो तेव्हां. माझ्या वडलांची चुलत….चुलत बहिण दादरला राहत होती. तशी लांबची असली, तरी त्या काळी सर्व नातीगोती श्रद्धेने जपली जात. आमच्याकडे गोरेगांवला एक गृहस्थ घरी केसांसाठी आयुर्वेदिक औषधी तेल बनवीत. माझी  आत्या त्यांनी बनवलेली औषधी तेलं वापरत असे. 

‘त्या’ दिवशी त्या गृहस्थाकडून तेलाचा मोठा शिसा घेऊन तो आत्याकडे दादरला पोंचवण्याची जबाबदारी मला देण्यांत आली होती. त्याप्रमाणे मी आत्याकडे गेलो व तिला तो तेलाचा शिसा दिला. “किती झाले रे ?” आत्याचा नेहमीचा प्रश्न आला.

“पैशाविषयी कांही बोलू नकोस, असं काका म्हणालेत. बरं मी निघू ?” मी विचारले. 

“अरे थांब. चहा तरी घे.” मी मानेनेच ‘मला चहा नको’ अशी खूण केली. “बरं मग करंजी तरी खा” आत्याने आग्रह केला. मी करंजी-मोदकाला नाही म्हणणं, म्हणजे बगळ्याने माशाकडे पाठ फिरवण्यासारखे होते. मी तब्येतीत दोन करंज्या हाणल्या. तेवढ्यांत आत्याची मुलगी…मी तिला बेबीताई म्हणायचो ती एक पिशवी घेऊन समोर आली. अरे हो ! या बेबीताईविषयी सांगायचे राहिले. ती जन्मत:च मुकी व बहिरी होती. पण रूपाने अत्यंत देखणी. अगदी माला सिन्हाची ड्युप्लीकेट. माझ्यापेक्षा वयाने साधारण दहा वर्षांनी मोठी. बेबीताई मला खुणेने कांहीतरी सांगत होती. तेवढ्यांत आत्याच म्हणाली “अरे, ती गोरेगांवला जायचं म्हणतेय. नेशील कां व्यवस्थित तिला ?” आता या प्रश्नावर मी तरी काय बोलणार. मानेनेच ‘हो’ म्हणालो. “बेबीताई माझा हात सोडू नकोस हां !” हे वाक्य मी बोलून आणि खुणेने दोन्ही पद्धतीने तिला सांगितले आणि तिनेही मान डोलावून ‘कळलं’ अशी खूण केली. 

वेळ संध्याकाळची होती. दादर स्टेशनवर बरीच गर्दी होती. आम्हाला गाडीत चढायला मिळालं, पण बसायला जागा नव्हती.

जोगेश्वरी स्टेशन पार झालं आणि मी बेबीताईला ‘आता आपल्याला उतरायचं आहे’ अशी खूण केली. गोरेगांवला आम्ही उतरलो आणि संवयीप्रमाणे मी उजवीकडे चालायला लागलो. दोन-तीन मिनिटं चाललो असेन आणि माझ्या अचानक लक्षांत आलं, अरेच्च्या आपल्याबरोबर बेबीताईसुद्धा आहे, पण आत्ता ती कुठे दिसत नाही. मी थांबून मागे पाहिलं, पण गर्दीत कोणीच नीट दिसत नव्हतं. मी जोरजोरात हांका मारू लागलो. माझ्या हांका बेबीताईला कशा ऐकू येतील, हे सुद्धा माझ्या लक्षांत आले नाही. मी जाम घाबरलो. घसा कोरडा पडला. बेबीताई कुठे गेली असेल ? ती हरवली तर घरी काय सांगू ? शेवटी कांहीच सुचेना. मी वेड्यासारखा घराच्या दिशेने धावत सुटलो. बेबीताई माझ्याबरोबर येत होती आणि आता ती हरवली आहे, हे घरी कळल्यावर हलकल्लोळ माजला. “तू कशाला ही जबाबदारी घेतलीस ?” “थोडी तरी अक्कल आहे कां?” “अरे ती बिचारी मुकी पोर. कांही सांगू पण शकणार नाही” चारी बाजूनी माझ्यावर फैरी झडत होत्या. मी कांहीच बोलू शकत नव्हतो. तेवढ्यात आमच्या गोगटेवाडीतील दोन-तीन तरुण मुलगे आवाज ऐकून आमच्या घरासमोर आले.एकंदर परिस्थिती लक्षांत आल्यावर त्यांतला एकजण म्हणाला “काका आम्ही याला घेऊन पुन्हा स्टेशनवर जातो. तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या पोलीस मित्रालाही सांगतो. तो नक्कीच मदत करेल. आम्ही निघतो आता.” आणि माझ्या खांद्याला धरून त्यांनी जवळजवळ मला ओढतच तेथून न्यायला सुरवात केली.

 “अरे हा मूर्ख कार्टा आणि याच्या भरोश्यावर एका तरण्याताठ्या मुलीला त्यांनी पाठवलंच कसं ? अरे हा बिनडोक पोरगा शाळेत दप्तर विसरून येतो. अक्कलशून्य आहे. आणि हा ही जबाबदारी घेतो ?” ते सर्वजण माझी सालं काढू लागले. मी गप्प होतो. तोंडातून शब्द निघाला तर मार पडायचा. 

आम्ही स्टेशनच्या दिशेने येताना त्यांतल्या एकाने विचारले “तू कुठून येत होतास ? जिन्याने की रेल्वे ट्रॅकच्या बाजूने ?” मी म्हणालो “रेल्वे ट्रॅकच्या दिशेने.” 

“अरे गाढवा, रेल्वे ट्रॅकच्या बाजूने कशाला ? जिन्याने पलीकडे उतरून घासबाजारच्या रस्त्याने यायला काय पाय मोडले होते तुझे ? ती नक्कीच जिन्याच्या दिशेने गेली असणार. तुला आधी नीट सांगता आलं नाही तिला ? च्यायला मीपण  कोणत्या गाढवाला विचारतोय ?” तो वैतागाने म्हणाला. आम्ही स्टेशनवर आलो आणि त्यांनी आपसांत ठरवलं. दोघेजण प्लॅटफॉर्म दोनवर चेक करतील व मी आणि एकजण प्लॅटफॉर्म एकवर चेक करू. (त्याकाळी गोरेगांवला दोनच प्लॅटफॉर्म होते). “कोणीही एकटी तरुण बाई दिसली तर लगेच तिला खुणेने विचारा ती बीनाताई आहे कां ?” आमच्यातला लीडर म्हणाला….

“अरे पण अनोळखी तरुणीला खुणा कशा करणार ? भलताच अर्थ काढून त्यांनी आरडाओरड केली तर लेने के देने पड जायेंगे” दुसऱ्याने शंका व्यक्त केली. मग सर्वानुमते कागदावर मोठ्या अक्षरांत “ आपण बिनाताई आहांत काय ? आम्ही आपल्याला न्यायला आलो आहोत.” अशा ओळी लिहून तो कागद त्यांना दिला. मी बरोबर असल्यामुळे आम्हाला तसा कांही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही दोन्ही प्लॅटफॉर्म या टोकापासून त्या टोकापर्यंत पालथे घातले. पण उपयोग शून्य. बेबीताई कुठेच दिसली नाही. शेवटी आमच्या लीडरने स्टेशन मास्तरांकडे तक्रार नोंदवायचे ठरवले. आम्ही चौघेजण स्टेशनमास्तरांच्या केबिनचा दरवाजा ढकलून आंत गेलो आणि माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. जिला शोधण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडले होते, ती बेबीताई स्टेशन मास्तरसाहेबांच्या केबिनमध्ये ऐटीत खुर्चीत बसली होती. तिच्या हातात कॉफीचा ग्लास होता. मला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि खुणेनेच तिने स्टेशनमास्तरसाहेबांना माझ्याबद्दल कांहीतरी सांगितले. ते पुढे आले. कायरे मुला, कुठे हरवला होतास तू ? या ताई खूप घाबरल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी हा सर्व भाग चेक करायला लावला. मालाड ते बोरिवली संदेश पाठवले. गेला अर्धा तास आम्ही शोधतो आहे तुला. कुठे गेला होतास तू ?” त्यांच्या तोफखान्याने मी पुरता गारद झालो. शेवटी त्यांना मी सर्व हकीकत सांगितली. आमच्या वाडीतील मोठ्या मुलांना घेऊन मी बेबीताईला शोधायलाच आलो होतो, हे पण सांगितले. स्टेशनमास्तरसाहेबांनी त्यांच्या लॉगबुकांत सर्व नोंदी केल्या आमची नांवे पत्ता सर्व कांही लिहून घेतलं आणि आम्ही बेबीताईला घेऊन घरी आलो.

पण हा किस्सा इथेच संपत नाही, TRUTH IS STRANGER THAN FICTION (वास्तव हे कल्पितापेक्षा अद्भूत असतं) या सुभाषिताचा प्रत्यय आम्हाला यायचा होता.

वरील घटनेला चार-पांच दिवस उलटून गेले होते. आमच्या गोगटेवाडीच्या घरी सकाळीच एक पाहुणे आले. मी त्यांना लगेच ओळखले. तेच स्टेशन मास्तरसाहेब होते ते. मी त्यांची घरातल्या मोठ्या माणसांची ओळख करून दिली. स्टेशनमास्तर साहेबांचं आडनांव प्रभू होतं. ते म्हणाले “मी एका खास कामानिमित्त तुमच्याकडे आलो आहे. माझा भाचा चांगला शिकलेला आहे. **** बँकेत नोकरीला आहे. तुमच्या भाचीसाठी त्याचं स्थळ घेऊन मी आलो आहे.”

“अहो प्रभू साहेब, पण ही मुलगी बोलू शकत नाही, हे तुम्हाला माहित आहे कां ? बाकी सर्व दृष्टीने ती गृहकर्तव्यदक्ष आहे. स्वयंपाक उत्तम करते. दिसायला छान आहे. पण देवाने वाणी दिली नाही” माझ्या काकांनी थोडसं चांचरतच सांगितलं.

“काका, मला त्याची कल्पना आहे. त्या दिवशी अर्धा-पाऊण तास आम्ही खुणेनेच गप्पा मारत होतो. मध्ये मध्ये ती लिहून सांगायची. फार हुशार आहे तुमची भाची. माझा भाचा सर्व दृष्टीने चांगला आहे. फक्त त्याच्या पायांत किंचित दोष आहे. त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा किंचित तोकडा आहे. त्यामुळे तो थोडासा लंगडत चालतो. एवढा एक दोष सोडला तर लाखात एक मुलगा आहे. हुशार आहे. इंग्लीश विषय घेऊन बी.ए.ला फर्स्टक्लास मिळवला आहे. नंतर लॉची पदवी मिळवली. बँकेत ज्युनियर ऑफिसर आहे. निर्व्यसनी, रूपाने चांगला. बघा पसंत पडतो कां ?” प्रभू साहेब अगदी तळमळीने बोलत होते.

“ठीक आहे. शुभस्य शीघ्रम्. मी तुम्हाला पत्ता लिहून देतो माझ्या दादरच्या बहिणीचा. परवा रविवार. तुमच्या भाच्यालाही सुट्टी असेल. त्याला घेऊनच तिथे या. आम्ही तिथेच असू. दोघेही एकमेकांना बघतील व तुम्ही माझ्या बहिणीशी व तिच्या यजमानांशी बोलून घ्या.” काकांच्या बोलण्यावर प्रभू साहेबांनी मान डोलावली.

मग सर्व कांही चित्रपटांत घडतं तसं झालं. माझी आत्या तर घरी चालून आलेलं स्थळ पाहून आनंदाने वेडी झाली. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत पडले. विवाहाचा खर्च अर्धा-अर्धा करायचं ठरलं. हुंडा, मान-पान अशा बुरसटलेल्या पध्दतींना, दोन्हीकडच्या लोकांनी पूर्णपणे कात्री लावली. आणि पुढच्याच महिन्याचा मुहूर्त निघाला. 

“देवाच्या मनांत आलं तर तो एखाद्या गाढवाकडूनही मोठी मोठी कामे करवून घेतो.” माझी आत्या मला उद्देशून म्हणाली.  मला गाढव, अक्कलशून्य, मूर्ख, धांदरट ही सर्व विशेषणं ऐकण्याची आधीपासून संवय होती. त्यामुळे आत्याने मला दिलेल्या ‘गाढव’ या उपाधीबद्दल अजिबात वाईट वाटलं नाही. 

विवाहाच्या रिसेप्शनसमारंभाला मी स्टेजवर गेलो. “भावोजी मनापासून अभिनंदन” मी बेबीताईच्या ‘अहो’ना म्हटलं.

“अरे, तू काय अभिनंदन करतोस बाबा, मीच तुला मनापासून धन्यवाद देतो. तुझी आणि हिची त्यादिवशी चुकामुक झाली नसती, तर आमच्या भाग्यांत बीनादेवी कुठून आल्या असत्या ? तू त्या नळ-दमयंती आख्यानातल्या राजहंसासारखा आहेस आमच्यासाठी. केवळ तुझ्यामुळेच हा दिवस दिसतो आहे. तू सांगशील तिथे तुला माझ्याकडून पार्टी नक्की. शिवाय खास तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे. रिसेप्शन आटोपलं की देतो तुला.” बेबीताईचा  नवरा भलताच खूष दिसत होता. मी बेबीताईकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत अवघा आनंद दाटला होता. “बेबीताई तू खुश आहेस ना?” मी तिला खुणेने विचारले. त्यावर बेबीताई अशी बेफाम लाजली की ‘गाढव ते राजहंस’ या माझ्या व्यक्तिमत्व प्रगतीचे आईशप्पथ सार्थक झाले. 

लेखक:- श्री अनिल रेगे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-२ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-२ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

(मॅडमच्या बोलण्यानं काळजाचा ठोका चुकला.तेवढ्यात फोन आल्यानं मॅडम बिझी झाल्या आणि  मी मात्र…) इथून पुढे 

पाचेक मिनिटं झाली तरी सीईओ फोनवर बिझी आणि मी नुसताच बसलेलो.सहनही होत नाही अन सांगताही येत नाही अशी अवस्था.शेवटी एकदाचा फोन संपला.

“सॉरी!!” चेअरमन साहेबांचा फोन होता.जरा महत्वाचं काम होतं”

“मॅडम,नक्की काय झालंय?एकट्यालाच का इथं बोलावलंय”

“मि.अनिल,सगळं कळेल.जरा धीर धरा.” 

“काही चूक झाली असेल तर आधीच माफी मागतो.नोकरीची खूप गरज आहे.”मी हात जोडले तेव्हा मॅडम मोठ्यानं हसायला लागल्या.

“अरे अनिल,मला ओळखलं नाही का?” 

“खरं सांगू.नाही ओळखलं.” 

“अरे मी मीनाक्षी,‘ब’ तुकडी,नववीपर्यंत आपण एकाच वर्गात होतो.”कसं अन काय रिअॅक्ट व्हावं हेच समजत नव्हतं.टोटल ब्लॅंक.कालच डायरीतला नंबर बघितल्यावर आठवण झाली आणि आज चक्क तिची भेट.भान हरपून एकटक बघत राहिलो. “हॅलो,कुठं हरवलास”मॅडमच्या आवजानं तंद्री तुटली.

“जुनी ओळख चांगली लक्षात ठेवलीत”

“नॉर्मल बोल.मॅडम नको शाळेत म्हणायचा तसं ‘मीना’ म्हण आपण ऑफिसमध्ये नाहीये.इथं आपल्याला ओळखणारं कोणी नाही.”

“पण आपल्यामध्ये कंपनी आहे ना.मी साधा ऑफिसर आणि तुम्ही सीईओ..आपल्यातलं अंतर खूप मोठयं.”

“सीईओची ऑर्डर आहे असं समज.”

“का त्रास देता”

“अनिल,तुझ्यात काहीही फरक नाही रे.शाळेत होता तसाच आहेस.लाजरा-बुजरा,घाबरट,कायम डोक्यावर शंभर किलोचं ओझं असल्यासारखा वागणारा.”

“तू …सॉरी!!तुम्ही मात्र पार बदललात”

“खरंय,चवळीची शेंग होते आता मस्त गरगरीत दुधी भोपळा झालेय.”दोघंही खळखळून हसलो.

“किती वर्षांनी भेटतोय.”मी 

“सत्तावीस”

“अरे वा!!एवढं परफेक्ट लक्षात आहे”

“तुला कधीच विसरले नाही.”मला जोराचा ठसका लागला पण मनात आनंदाचा धबधबा सुरू झाला. 

“म्हणजे तुम्हीपण..”चेहऱ्यावरचा आनंद मला लपत नव्हता.

“तुम्हीपण म्हणजे,ए बाबा,आधी पूर्ण ऐक.प्रेमाचा वगैरे मामला नाहीये.”तिच्या परखड बोलण्यानं बटन बंद केल्याप्रमाणे आनंदाचा धबधबा बंद झाला.

“मग लक्षात रहायचं कारण ….”

“तुझा चांगुलपणा,वर्गात सगळे छळायचे,खोड्या काढायचे तरीही तू नेहमीच मदत करायचा.कधीच तक्रार केली नाहीस.माझ्या महितीतला इतकं चांगलं वागणारा पहिला तूच ..”

“थॅंक्यु”

“तुला तर माहितीये की शाळेत मी बिनधास्त होते.मुलांना त्रास द्यायला आवडायचे.त्यांच्याशी भांडायला मजा यायची.एकदा मधल्या सुट्टीत वर्गात आपण दोघंच होतो.सरांच्या खुर्चीला मी च्युइंगम लावलं ते सरांच्या लक्षात आलं.असले उद्योग नेहमी मुलंच करतात म्हणून सगळा दोष तुझ्यावर आला.सर वाट्टेल ते बोलले. वर्गासमोर अपमान केला तरीही तू गप्प राहिलास.वर्गाबाहेर काढलं.जाताना तू माझ्याकडं पाहिलंस त्यावेळच्या तुझ्या नजरेतला थंडपणा अस्वस्थ करून गेला.आजही आठवलं कि अंगावर काटा येतो/”

“जे झालं ते झालं”

“तसं नाही रे!!सुरवातीला मजा आली पण नंतर अपराध्यासारखं वाटायला लागलं.तू चूपचाप सगळं सहन केलसं पण माझं नाव सांगितलं नाहीस.ही गोष्ट मनाला भावली.तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला असं वाटत होतं.आईशी बोलले नंतर सरांची माफी मागितली.तुझीही माफी मागायची होती पण भेट झालीच नाही.”

“कारण मी शाळा सोडली.त्या संध्याकाळीच वडिलांना अपघात झाला अन चार दिवसांनी ते गेले आणि सगळं बदललं.मामाशिवाय कोणाचाच आधार नव्हता त्यामुळं त्याच्या गावी गेलो.तिथंच पुढचं शिक्षण पूर्ण केलं”

“सॉरी!!हे काहीच माहिती नव्हतं.तुझं एकदम बेपत्ता होणं खूप धक्कादायक होतं.मूळापासून हादरले.माझ्यामुळे तू काही करून तर घेतलं नाही ना या विचारानं खूप भीती वाटत होती.तुला खूप शोधलं.मनात खूप भयंकर विचार येत होते.तुझ्यासाठी रोज प्रार्थना करत होते.”

“माझ्यासाठी एवढं काही चालू होतं अन मला काहीच माहिती नाही.प्रार्थना फळाला आली अन भेट झाली”

“तेच तर!! आज अचानक तुला पाहील्यावर खूप खूप आनंद झाला.कधी एकदा भेटते असं झालं होतं.मित्रा,माफ कर.त्यावेळी खूप चुकीचं वागले.”मीनाक्षीनं हात जोडले तेव्हा डोळ्यात पाणी होतं. 

“ओके.आता सोडून दे.उगीच माफी वैगरे नको.लहान होतो.समजही कमी होती.”

“शाळेत असताना होता तसाच आताही आहेस.तुझ्याविषयी कंपनीत खूप चांगलं बोलतात.तुझा प्रामाणिकपणा, मदत करण्याच्या स्वभावामुळे खूप फेमस आहेस.”

“मदत करायला आवडतं.कामाचं म्हणशील तर ज्याच्यामुळे घर चालतं त्या कंपनीसाठी शंभर टक्के योगदान देणं यात काही विशेष नाही.”

“हेच तर खास आहे.सगळेच असा विचार करत नाही.तूझं मन मोठं अन स्वभाव खूप चांगला आहे.”

“बास आता!!इतकं कौतुक ऐकायची सवय नाही”

“पुन्हा एकदा सॉरी यार!!”मीनाक्षीनं हातावर हात ठेवला तेव्हा सर्वांग शहारलं. 

“ए बाई!!सोड ना तो विषय,जाऊ दे”

“बाई नको हं.अजून म्हातारी झाली नाहीये.काय गिफ्ट पाहिजे ते बोल.”

“पुन्हा पुन्हा आपली ‘भेट’ झाली तर तेच जगातलं सर्वात भारी गिफ्ट असेल.”

“डन,इतक्या वर्षांनी भेटलास आता तुला सोडणार नाही.भेटत राहूच.तुझ्यासाठी काय करू सांग.ईनक्रीमेन्ट, प्रमोशन,जो चाहिये वो बोल”मीनाक्षी उत्साहानं म्हणाली.

“रागावू नको पण एक विनंती आहे”

“बिनधास्त बोल”

“आपली मैत्री आणि कंपनी दोन्ही वेगवेगळे राहू दे.मला कामाच्या जोरावर पुढं जायचंय.शिफारशीवर नाही.” 

मीनाक्षी अपार कौतुकानं पाहत होती.त्यामुळे मी जास्तच संकोचलो.

“भूक लागलीयं”

“काय खाणार”

“वडा पाव?”माझ्या फर्माईशीवर मीनाक्षीचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला. 

“अगं,गंमत केली.इथल्या मेन्यू कार्डातलं काही कळणार नाही.तुझ्या आवडीचं मागव.”मीनाक्षीनं ऑर्डर केली.

“मीना,जास्त काही मागवू नकोस.मी काही पट्टीचा खाणारा नाही आणि बिल..”

“ते मीच देणार”मीनाक्षी पटकन म्हणाली.

“तेच म्हणतोय.तुलाच द्यावं लागेल.इथलं बिल परवडणार नाही कारण आमची कंपनी पगार फार कमी देते.”डोळे वटारत मीनाक्षी मनापासून हसली.  

समाप्त

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

एखादा दिवस असा उगवतो की काहीच करायची इच्छा होत नाही. फक्त कंटाळा आणि कंटाळा. सुट्टी असूनही प्रचंड बोर झालेलो. काय करावं सुचत नव्हतं. एकदम कपाट आवरायची लहर आली. पसारा बाहेर काढताना जुनी लाल डायरी सापडली. उत्सुकतेनं पानं चाळताना ‘मन’ जुन्या दिवसात गेलं. तीसेक वर्षापूर्वीच्या नोंदी,सहा आकडी लँडलाईनचे नंबर पाहून गंमत वाटली. एका नंबर जवळ नजर थबकली. त्यावर कधीच फोन केला नाही की त्या नंबरवरून कधी फोन आला नाही तरीही. . . . . . आपल्या मोबाईलमध्ये नाही का काही नंबर उगीचच सेव्ह असतात अगदी तसंच. जुन्या आठवणीत हरवलो असताना मोबाईलच्या आवजानं वास्तवात आणलं.

“कुठं आहेस”ऑफिसमधल्या मित्राचा फोन.

“घरी”

“म्हणजे तुला कळलं नाही ”

“काय झालं. मी कायम ऑनलाइन नसतो. ”

“व्हॉटसप चेक कर. उद्या नवीन सीईओची व्हिजिट आहे. आत्ता सगळ्यांना कंपनीत बोलावलयं”

“अशी एकदम अचानक व्हिजिट”

“उद्या आल्यावर डायरेक्ट विचार”मित्र वैतागला.  

“माझ्यावर कशाला चिडतोस. ”

“मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. . सोड ना लवकर ये. बाय” 

कसं असतं ना आपलं आयुष्य!!

काहीवेळा पूर्वी काय करावं सुचत नव्हतं अन आता डोक्यात कामांचा विचार सुरू झाला. गडबडीत आवरून ऑफिसला पोचलो. सीईओ येणार म्हणून सगळेच टेंशनमध्ये आणि दडपणाखाली होते. जो तो रेकॉर्ड अपडेट करण्याच्या प्रयत्नात आणि आमचे साहेब तर प्रचंड अस्वस्थ. क्षुल्लक कारणावरून चिडत होते. दिसेल त्याला झापत होते. अशा तणावपूर्ण वातावरणात काम करून रात्री उशिरा घरी आलो अर्थातच शांत झोप लागली नाही.

सकाळी नेहमीपेक्षा लवकरच ऑफिसला पोचलो. वातावरण रोजच्या सारखं  नव्हतं.  सगळ्यांच्या चेहऱ्यावर अदृश्य तणाव होता आणि तो क्षण आला. पाचच मिनिटांत सीईओ पोचत आहेत असा निरोप आल्यावर सगळे एकदम दक्ष. काही वेळातच महागडी काळ्या रंगाची कार दारात थांबल्यावर साहेब दार उघडायला धावले आणि सगळे डोळे फाडून पाहू लागलो. गाडीतून उतरलेल्या सीईओंना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.

 ऊंच,स्मार्ट,गोरा रंग,चाळीशी पार केलेली तरी देखणंपण लपत नव्हतं,काळा गॉगल लावलेल्या मॅडमना पाहून दबक्या आवजात चर्चा सुरू झाली. साहेबांनी बुके देऊन स्वागत केलं आणि टीमची ओळख करून द्यायला सुरवात केली तेव्हा मॅडमनी थांबवलं. “नो फॉर्मॅलिटीज, ओळख नंतर होईलच. लेट्स स्टार्ट द वर्क” मॅडमचा पवित्रा बघून दिवस कसा जाणार याचा अंदाज आला. अभिवादनाचा स्वीकार करत जात असताना मला पाहून अचानक मॅडम थांबल्या अन गॉगल काढून हसल्या तेव्हा भीतीची लहर सर्वांगातून गेली. विचारांच्या भुंग्याचं कुरतडणं सुरु झालं.  

“मॅडम तुझ्याकडं पाहून हसल्या का रे?”मित्रानं विचारलं. ) 

“मला काय माहिती. जा त्यांनाच विचार. . ”

“जुनी ओळख वाटतं?”

“डोंबल!!त्या कुठं मी कुठं,आज पहिल्यांदाच बघितलं. ”

“मग तुझ्याविषयी रिपोर्ट गेलेला दिसतोय. बेस्ट ऑफ लक”मित्रानं विनाकारण टेन्शन वाढवलं. मॅडम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन माहिती घेऊ लागल्या. माझ्या इथं आल्यावर साहेबांनी ओळख करून दिली तेव्हा मॅडम “येस आय नो अबाऊट हिम” एवढं बोलून कामासंदर्भातले प्रश्न विचारून पुढे गेल्या. दोनदा झालेल्या भेटीत मॅडमचं वागणं वेगवेगळं होतं. आपल्याकडून मोठी चूक झालीयं आणि त्याची दखल मॅनेजमेंटनं घेतलीय याची खात्रीच पटली. कोणत्याही क्षणी केबिनमधून बोलावणं येईल या धास्तीनं काम करत होतो पण तसं काहीच झालं नाही. दिवसभर मॅडम मिटिंग्स,प्रेझेंटेशन यामध्ये बिझी होत्या. दुपारी चार नंतर ‘ऑल द बेस्ट,किप अप द गुड वर्क’ म्हणत मॅडम कंपनीतून बाहेर पडल्या तेव्हा सगळ्यांनी मोठ्ठा सुटकेचा नि:श्वास सोडला.

“या पठ्ठ्यानं मॅडमना जिंकलेलं दिसतंय”मित्रानं पुन्हा खोडी काढली.   

“ए बाबा,गप ना. कशाला उगीच?”

“अरे गंमत केली. उगीच चिडू नकोस. ”

“तसं नाही रे. कालपासून टेन्शन होतं पण बाईंनं जास्त छळलं नाही. ”साहजिकच मॅडमविषयी चाय पे चर्चा सुरू झाली. इतक्यात फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मिस्टर अनिल”

“येस”

“धीस ईज सीईओ हियर. . . . . . ” अनपेक्षितपणे मॅडमचा आवाज ऐकून जबरदस्त झटका बसला.  

“गुड मॉर्निंग,सॉरी!!गुड इव्हीनिंग माफ करा. ”माझी त्रेधा तिरपिट उडाली.  

“घरी जायच्या आधी मला भेटा. महत्वाचं बोलायचंयं. सी यू”

“कोणाचा फोन होता रे”मित्रानं विचारलं.

“काही सिरियस नाही ना. घाबरलेला दिसतोयेस. ” 

“ नाही रे . डोन्ट वरी” घरी निघताना मघाच्याच नंबरवरुन हॉटेलचा पत्ता असलेला मेसेज आला. म्हणजे मघाशी खरंच सीईओंचा फोन होता. पोटात भीतीचा गोळा आला.

हॉटेलवर पोचल्यावर तिथला हायफायपणा पाहून आत जायची हिंमत होईना. दारातच घुटमळत होतो. परत फिरावं असं वाटत होतं. तितक्यात मॅडमचा फोन “आलात का,मी रेस्टॉरेंटमध्ये आहे. तिथ या”आत शिरताना छातीची धडधड वाढली. बावरलेल्या नजरेनं पाहताना एका टेबलावर मॅडम दिसल्या. समोर जाऊन उभा राहिलो.  

“बसा”मॅडम सांगितलं.

“नको”

“मिस्टर अनिल,बसा” मॅडम चढया आवाजात म्हणल्यावर निमूटपणे खुर्चीवर बसलो. बेचैनीमुळं उजवा पाय जोरजोरात हलायला लागला.  मॅडम फक्त एकटक पाहत होत्या त्यामुळे जास्तच अवघडलो. दोन ग्लास पाणी पिलं तरी घशाला कोरड पडली.

“रिलक्स,मी तुम्हांला खाणार नाही” 

“मॅडम,नक्की झालंय काय?माझी काय चूक ये ?इथं का बोलावलंय”

“मि. अनिल सगळं कळेल. जरा धीर धरा. ”मॅडमच्या बोलण्यानं काळजाचा ठोका चुकला. तेवढ्यात फोन आल्यानं मॅडम बिझी झाल्या आणि मी मात्र… 

— क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माणुसकी… ☆ डॉ. शैलजा करोडे

घड्याळात रात्रीच्या नऊचे ठण ठण ठण ठण टोले पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली. माझ्या समोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं, त्यांचा अंत्यविधी करायचा होता.या पंधरा मजली इमारतीत हजारों कुटुंबे होती, पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं. जो तो आपापल्या कोषात मग्न. दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल, काम्युटरवरील WhatsApp, Facebook book, Twitter, Instagram च्या आभासी जगात व्यस्त.

सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली. प्रत्येकाचे RIP, भावपूर्ण श्रध्दांजली, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती, ओम शांती सारख्या मेसेजेसनी WhatsApp फुल झालं. Vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं, केलंय आपण सांत्त्वन हीच धारणा सगळ्यांची. पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही, मदत करणे तर दूरच.

बरे माझे नातेवाईकही भरपूर, सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे. बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.

“चांगल्या डाॅक्टरला दाखवा, ट्रिटमेंट करा, काळजी करु नका,  होतील बाबा बरे, अशा संदेशांनी, होय संदेशच, आभासी जगातला. कोणी video call वरही बोलले, पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.

प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची.कोणाच्या घराचं बांधकाम, मुलांच्या परीक्षा, नोकरीतून रजा न मिळणं, कोणाचा भराला आलेला शेती हंगाम, अर्थात कोणी येणार नव्हतंच.

“अहो, काहीतरी करा ना. रात्र वाढतेय, पिंटू ही पेंगुळलाय, पण झोपत नाहीय. आजोबांना सारखं उठवायला सांगतोय, कसं समजावू त्याला.”

“होय ग, मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला”

साडेनऊचा टोला घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं, जुन्या काळातलं, ठण ठण टोल देणारं, माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं, अनेक वेळां दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं…

दुपार पासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले. जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले, “नाही जमणार हो मला यायला, माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे, त्याला आणायला जायचंय.”

चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो. अरे भाईसाहब, मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे, उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे…

तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला, “आलो असतो रे, पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी. प्रबोधनात्मक भाषण तर असतेच, पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस. धीर धर,स् वतःला सांभाळ.”

सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर, अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा अशौच (मयतीत जाणं,सुतकीय कार्य) प्रसंगी आज नाही येता येणार मला.

शेजारचा “स्वामीनाथन” नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील “सुत्रावे” वीकएंडला गेलेला….

दुसर्‍या माळ्यावरील “कोटनाके” कवी संमेलनासाठी जाणार होते. प्रत्येकाची काही ना काही कामे. घाबरू नको, येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.

काय करू..? आज पावसानेही हैराण केलेलं. दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती, आता त्याचाही जोर वाढला होता, मला तर भडभडून आलं.

मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती, पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 

शेवटी मनाचा निग्रह करून उठलो, माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता. हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.

“संतोष” माझा काहिसा कापरा, आर्त, दाटलेला, अवरूध्द स्वर ऐकून तो म्हणाला, “काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी”

अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही. मदतच नाही मिळाली रे मला कोठे.”

“ओह…बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका. माझे चार दोस्त आताच बोलावतो. करू आपण सगळं व्यवस्थित”. त्याने फटाफट मोबाईल वरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.

ये महेश, येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील ? होय आपल्या बाबासारखेच आहेत ते. या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे. दिनेश, शिवा आणि मधुकरलाही सांगशील…

सगळं कसं फटाफट झालं पाहिजे, रात्र वाढतेय, पाऊसही हैराण करतोय.

संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्या पासुन तर तिरडी बांधण्या पर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.

“मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो” “अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा, माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही, बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही.

चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली. बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला. संतोषनं मला सावरलं, माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत, मला मुखाग्नी द्यायला लावला. पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला. बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला. चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला, “चला दादानु, घरी चला… वहिनी वाट बघत्याल “संतोषनं मला घरी सोडलं. 

“येतो दादा”…

“थांब संतोष” मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या, “घे संतोष”…

हे काय दादानु, पैसे नकोत मला.” 

“अरे तुम्ही खर्च केलात, वेळेवर धावून आलात, ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती, याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे. पण शेवटी हा व्यवहार आहे. घ्या हे पैसे”

दादानु…”तुमचे बाबा आमचे बी बाबाच की. नको मला पैसे.

शेवटी काय असतं दादानु, “माणूस मरतो हो, माणुसकी नाही. इथे व्यवहार गौण ठरतो दादा, येतो मी…”

वहिनीस्नी सांभाळा. पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.

बाहेर पाऊसही आता मंदावला होता. बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती… 😥

या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती…..!

नर देह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

मोबदला… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

सरगम कुमारचा चेहरा सात्विक संतापाने लालपिवळा झाला होता. बंगाली बाबू खूप भावनाप्रधान असतात असं इन्स्पेक्टर भोसले इतके दिवस ऐकून होते, आज प्रत्यक्ष पहात होते. 

सरगम कुमार ! इलेक्ट्रिक सतार वाजवणारा, शास्त्रीय आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाप आणि मिलाफ घडवणारा आणि त्याच्या या फ्युजन शैलीने तरुणाईत लोकप्रिय असलेला – संगीत क्षेत्रातले एक अग्रगण्य नाव. आजवर पुण्यात त्याच्या अनेक मैफिली गाजल्या होत्या आणि नुकत्याच झालेल्या एका मैफिलीच्या आयोजकांविरूद्ध तक्रार नोंदवण्यासाठी आज तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता. 

“ये कॉलेज का छोकरा लोग ने मेरा प्रोग्राम arrange किया उनके कॉलेज मे. बोले भोत पब्लिक आएगा. मेरे सेक्रेटरी से पैसे का बात पक्का किया. बोले ये महाराष्ट्र मे पानी की किल्लत है, पानी का भोत लफडा हुवा है, तो जो पैसा आयेगा वो उस के लिये इस्तेमाल करेगा. मैं सोचा, बच्चे कूछ नेक काम कर रहे है, तो मैं भी हा बोला. 

प्रोग्राम तो हूवा, लेकीन पब्लिक तो आयाही नहीं. फिर भी मैं बजाया, परफॉर्म किया. बाद मे बच्चे लोग बोलते है, लोग आयेही नहीं, प्रोग्राम लॉस मे गया, और मेरा बाकीका पैसा अभी देने से इन्कार कर रहे हैं. ऐसा कैसे चलेगा ? मैंने जो कला पेश की हैं, उसका पुरा मोबदला मिलना चाहिए के नहीं ? वो कूछ नहीं, तुम मेरा कंप्लेंट लिख्खो,” सरगम भडभुंज्याच्या भट्टीतील चण्यादाण्यांसारखा तडतडत होता.

इन्स्पेक्टर भोसले शांतपणे ऐकून घेत होते. देशभरात लोकसभेच्या निवडणुका चालल्या होत्या. नेमका ज्या संध्याकाळी हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच दिवशी पुण्यात दोन ठिकाणी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांच्याही मोठ्या नेत्यांच्या सभा लागल्या. वाहतुकीचे मार्ग बदलले गेले, काहींनी सभांना उपस्थिती लावली, बरेच जण – कुठे त्या गर्दीत अडका – म्हणत घरीच थांबले, आणि त्यामुळे कार्यक्रमाचा बऱ्यापैकी फियास्को झाला. आयोजक मानधन कमी करता येईल का विचारत होते आणि पैसे उभे करण्यासाठी महिनाभराची मुदत मागत होते. आणि इथे सरगम कुमार मात्र नियमावर बोट ठेवत हटून बसला होता.

“सरगमजी, आप का कहना एकदम उचित है. लेकीन रिपोर्ट लिखने से पहले मैं आप को एक कथा सुनाता हूं, उसके बाद, आप जो कहेंगे, वैसे करेंगे,” भोसले सरांनी मखलाशी केली. 

“१८९२ साली अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठात एक अनाथ विद्यार्थी होता. त्याची फी भरायची बाकी होती, आणि पैसे उभे करण्यासाठी त्याने आणि त्याच्यासारख्याच आणखी एका गरजू विद्यार्थ्याने, विद्यापीठात, पदरेवस्की नावाच्या एका ख्यातनाम युरोपियन पियानोवादकाचा कार्यक्रम आयोजित केला,” भोसले सर सांगू लागले, “त्या काळी, पदरेवस्कीला, त्या कार्यक्रमाचे, तब्बल २००० डॉलर द्यायचे असं ठरलं होतं. पण झालं भलतंच.

तुमच्या कार्यक्रमाला जसे लोक येऊ शकले नाहीत, तसे काही ना काही कारणाने याही कार्यक्रमाला लोक आले नाहीत. तिकीट विक्रीतून जेमतेम १६०० डॉलर उभे राहिले. त्या दोन विद्यार्थ्यांनी ते सगळे पैसे पदरेवस्कीला देऊ केले आणि उरलेल्या रकमेचा पुढील तारखेचा (post dated) चेक देऊ केला.”

सरगम कुमारला कहाणीत रस निर्माण झाला. ही तर आपल्यासारखीच कथा आहे हे ध्यानात येऊन, तो पुढे काय झालं हे जाणण्यासाठी, सरसावून बसला.

पदरेवस्कीने सगळी कथा जाणून घेतली. तो एक सहृदय कलाकार होता. आपण सगळे बहुधा विचार करतो की, मी याला मदत करत बसलो तर माझं काय होईल, मला यातून काय फायदा होईल ? पदरेवस्कीने वेगळ्या पद्धतीने विचार केला – मी जर यांना मदत केली नाही, तर यांचं काय होईल ? यांना कोण मदत करेल ?

त्याने तो उर्वरित रकमेचा चेक फाडून टाकला. जमा झालेले ते १६०० डॉलर त्या दोघा विद्यार्थ्यांना परत केले, सांगितलं, आधी तुमची फी भरा, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तुमचे काही पैसे खर्च झाले असतील तर ते वजा करा आणि त्यानंतर काही पैसे उरले तरच तुम्ही ते मला द्या. 

कालचक्र सुरू राहिले. पदरेवस्की पोलंड देशाचा नागरिक होता. पहिले जागतिक महायुध्द संपल्यावर, १९१९ साली, स्वतंत्र पोलंडचा तो पहिला पंतप्रधान झाला. युद्धजन्य परिस्थितीमुळे, त्यावेळी पोलंडच्या लाखो नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. देशाकडे ना अन्न होते, ना अन्न विकत घेण्यासाठी पैसा.

पदरेवस्कीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विल्सन यांच्याकडे मदतीची याचना केली. अमेरिकेच्या अन्न आणि मदत प्रशासनाच्या हर्बर्ट हूव्हरने अतिशय तत्परतेने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य साठा उपलब्ध करून दिला (हे हूव्हर पुढे स्वतः अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झाले). पोलंडच्या नागरिकांवरील संकट टळलं.

पंतप्रधान पदरेवस्की हूव्हरला भेटले. आपल्या नागरिकांना केलेल्या समयोचित मदतीसाठी आभार मानण्यासाठी त्यांना शब्द सापडेनात. पण हूव्हर यांनी पदरेवस्की यांना थांबवलं, ते म्हणाले, सर, तुम्ही माझे आभार मानायचे काहीच गरज नाही. तुम्हाला कदाचित आठवणार नाही, पण २७ वर्षांपूर्वी, अमेरिकेतील दोन विद्यार्थ्यांना कॉलेजची फी भरायला तुम्ही मदत केली होतीत, त्यातला एक विद्यार्थी मी होतो.”

भोसल्यांची गोष्ट संपली होती. सरगम कुमार त्याच्या तंद्रीत हरवला होता. त्याने त्याच्या असिस्टंटला बोलावले, आणि म्हणाला, “तू जा, वो छोकरा लोग को बोल दे, की वो बाकीका पैसा देने का कोई जरुरी नही है. मेरे को मेरा पुरा मोबदला मिल गया. और हां, मेरी तरफ से ये चेक लेकर जाना और वो छोकरा लोग को देना. बोलना किसानोंको – गाँव में पानी के लिये मेरी तरफ से ये मदद. 

काली मां ने आजतक इस सरगम को भोत दिया हैं. उस मे से थोडा तो देना मेरा फर्ज बनता है.” 

डोळ्यातले पाणी पुसत, घशातील आवंढा गिळत, सरगम कुमारने भोसले सरांशी हस्तांदोलन केलं, आणि तो निघून गेला. आणि भोसले सर, गरमागरम चहाचा कप हातात घेऊन, कार्यक्रमाच्या आयोजकांना ही माहिती देण्यासाठी फोन करू लागले.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पसंत आहे मुलगा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ पसंत आहे मुलगा…  भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे

(मी महेशकडे पाहिले पण त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते तो जाम टेन्शनमध्ये दिसत होता. बोलण्यापेक्षा तोंडातला घास भराभर चावण्याचे नाटक तो करू लागला.) — इथून पुढे …. 

मी तर सुन्नच झालो होतो! कसं आणि काय रिऍक्ट करावं तेच मला समजत नव्हतं. तरीपण स्वतःला सावरत मी म्हणालो,” खरं सांगू मावशी, त्यादिवशी तिथे मी माझ्या स्वतः बद्दल काहीच सांगत नव्हतो. महेश, त्याचा गुणी स्वभाव, तुमचे गाव, तुमची शेतीवाडी, महेशची पुढची स्वप्न या सगळ्या बाबतीत मी भरभरून बोललो. ती पार्टी खरोखरच खूप छान होती अन मोठी सुद्धा होती. वाडा केवढा सुंदर आणि भव्य होता! आत शिरताच मी म्हटलं, ” महेशराव आता तुम्ही या भव्यवाड्याचे जावई होणार असं दिसतंय… महेश सुद्धा त्यावर खूप लाजला होता त्यावेळी, शिवाय मुलगी खूप सुंदर देखणी होती. अगदी महेशला शोभेल अशीच होती. बी.ए करते आणि अभ्यासात सुद्धा हुशार होती महेश ने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तिने खूपच छान उत्तरे दिली होती.

ते लोक सुद्धा मोठया उत्सुकतेने महेशची चौकशी करत होते, त्याच्याबद्दल चांगलं बोलत होते मला तर तिथून माघारी येईपर्यंत शंभर टक्के खात्री वाटत होती की, हे लग्न जवळपास जमलेच! महेश पण खूप खुश होता, अगदी वाड्याच्या बाहेर येऊन सगळे लोक आम्हाला टाटा बाय-बाय करत होते. पण पुढे हे भलतेच कसं झाल? मावशी, त्यांनी मला पसंत करण्याचा प्रश्नच येत नाही. मी त्यांना एवढं सुद्धा म्हटलं की, आम्ही दोघे बी.ए.स्सी करतोय. आमच्या लग्नाला अजून खूप वेळ आहे पण महेश घरात थोरला आहे त्याच्या आईवडिलांची इच्छा आहे की मोठ्या मुलाचं लग्न लवकर व्हावं. त्यांच्या त्या हौसे पोटी तर महेश मुलगी पाहायला तयार झाला आहे. शिवाय लग्नानंतरही महेशचं शिक्षण चालूच राहणार आहे. त्याला पी एस आय व्हायचं आहे. मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलं मावशी. पण हे असं घडलंच कसं?” मी माझा प्रमाणिकपणा सिद्ध करण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

” अरे तू त्यांना सगळं सांगितलंस पण जे सांगायचं ते कुठं सांगितलंस? ” महेशच्या आईने भलताच तिरकस प्रश्न विचारला त्याने मी पुरताच गांगरलो.

” म्हणजे, काय नाही सांगितलं मी मावशी? “

” आधी जेवण कर मग सांगते.

” आई…? ” महेश जवळपास आईवर मोठ्याने ओरडलाच होता.

माझं तर जेवणावरून लक्षच उडालं होतं…मी महेशकडे एक कटाक्ष टाकला तर तो लगेच खाली बघून जेवत असल्याचे मला खोटे खोटे भासवत होता.

मला जेवताना घामच फुटला होता! ” मावशी सांगा ना प्लिज मी काय सांगायचं राहिलं ते… “

” अरे काही नाही, आधी जेवण कर. “

मी अस्वस्थ झालो होतो त्यामुळे मी पटकन ताटात हात धुतला.

माझ्याकडून नकळत काय अपराध झाला होता ते मला कळेना. असं काय झालं होतं की ज्याने महेशच लग्न मोडलं होतं? असं काय माझ्याकडून त्या मंडळींना सांगितलं गेलं होतं की, ज्याने त्यांनी महेशला सोडून मलाच पसंत केलं होतं? माझा हेतू स्वच्छ होता. मित्राने सोबत मुलगी पाहिला बरोबर नेलं होतं. नवरदेव तोच होता. मी त्यांना सुरुवातीलाच नवरदेव म्हणून महेशचीच ओळख करून दिली होती. त्याच्याबद्दल जेवढं काही सांगता चांगलं सांगता येईल तेवढं मी सांगितलं होतं. ती मुलगी आपल्या मित्राची पत्नी होणार अगदी आपल्या जिवलग मित्राची पत्नी म्हणजे आपली लाडकी वहिनी असणार त्यामुळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. मग नेमके चुकले कुठे? मावशींचा रोख आणि सगळा रोष तर माझ्याकडेच होता. आत्तापर्यंत त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. महेशला आणि मला त्यांनी कधीच वेगळं मानलं नाही.

तेव्हा हा सगळा नेमका काय प्रकार आहे? ते मला काहीच समजत नव्हते…. याच विचारात हात धुवून ताट बाजूला सारून मी उठून खाटेवर बसलो. महेशने सुद्धा तसेच केले.

मावशी आमच्या दोघांची ताटे घेऊन आत गेल्या आणि बडीशेपचे तबक घेऊन बाहेर आल्या. त्यांनी चमच्याने माझ्या हातावर बडीशेप वाढताच मी अजिजीने म्हटले,  ” मावशी सांगा ना प्लिज माझे काय चुकले ते ?मी त्यांना काय सांगायला पाहिजे होतं? “

” अरे जाऊ दे बाळा ते फार महत्त्वाचं नाही आणखी दोन स्थळं आल्यात महेशला. होऊन जाईल त्यातलं एखादं फायनल. “

” नाही मावशी पण मला कळायलाच पाहिजे माझं काय चुकलं ते! तुम्ही मला आईसारख्या, महेश मला माझ्या भावासारखा आहे. “

” अरे जाऊ दे नको मनाला लावून घेऊस, होतं असं कधी कधी. लहान आहेस तू. नकळत होतं असं कधी कधी, तुझा तरी काय दोष त्यात? “

” नाही मावशी, तुम्ही मला सांगाच काय झालं ते?तुम्हाला माझ्या आईची शपथ! ” मी शे शेवटचे अस्त्र बाहेर काढले तेव्हा त्या पटकन म्हणाल्या, ” तुझी जात…! “

” आई तुला नको म्हटलं होतं ना…? ” महेश नाराजीने म्हणाला कारण त्याला मला दुखवायचं नव्हतं. लग्नापेक्षा जातीपेक्षा त्याला आमची मैत्री मोठी वाटत होती म्हणून तो आईला सुरुवातीपासून अडवत होता.

 ” माझी जात? “

” हो अरे तुझी जात तू त्यांना सांगायला पाहिजे होतीस… मग हे पुढचं काही घडलंच नसतं… म्हणजे त्यांनी तुला पसंत करण्याचा प्रश्नच आला नसता. महेशलाच पसंत केलं असतं… “

 ते ऐकताच मी महेशकडे पाहिलं तर तो माझ्या डोळ्याला डोळा मिळवू शकत नव्हता ! जे काही घडलं ते आमच्या दोघात होतं ते माझ्या लक्षात आलं होतं परंतु मी मावशींना त्याचं उत्तर देऊ शकत नव्हतो की मुलगी पाहायला जाताना रस्त्यातच महेशने मला आवर्जून सांगितलं होतं की तिथे पाहुण्यांनी काही विचारले तर तू तुझी जात सांगू नकोस.आमच्यातलाच आहे असं सांग.तुझी जात सांगू नकोस नाहीतर घोळ होईल. मलाही त्याच्या असं म्हणायचे खूप वाईट वाटले होते परंतू त्याच्या भूमिकेतून कदाचित ते योग्य असेल म्हणून मी त्याला विरोध केला नाही. जिवलग मित्राला इतकं तर सहकार्य आपण नक्की करू शकतो या भावनेने मी त्याला होकार देवून सहकार्य केले.

 आमच्या दोघांचं हे असं ठरलं होतं त्याप्रमाणेच तर मी तसे केलं होतं.तिथे पाहुण्यांनी माझा विषय काढला तेव्हा मी महेशने सांगितलं होतं तसंच सांगितले होते परंतू त्याचा परिणाम असा उलटा होईल हे त्याला बापड्याला तरी काय माहीत होतं ! त्यामुळे आमच्या दोघांच्याही ते प्रकरण चांगलच अंगलट आलं होतं…

महेशला माझी खरी जात माहीत होती परंतू त्या पाहुण्यांना कुठे माहीत होती? त्यांनी दोघांनाही सारखेच जोखले.

त्यांनी माझ्यातले चांगले गुण पाहिले, माझे वागणे बोलणे पहिले अन मला पसंत केलं.

 पण मी माझी खरी जात सांगितली असती तर त्यांनी खरेच असे केले असते काय….?

तसे झाले असते तर कदाचित आम्हा दोघांनाही नाकारलं असतं. हो ना?

खरंच, या दुनियेत माणूस मोठा की त्याची जात? हाच विचार करत महेशच्या घरून थेट एसटीत बसून मी माझ्या घरी परतत होतो…

 – समाप्त –  

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पसंत आहे मुलगा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

परिचय

नाव : प्रा. विजय काकडे (कथाकार,लेखक,वक्ते)

शिक्षण : एम एस्सी (SET),संगीत विशारद

नोकरी : विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. जि. पुणे

पद : विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स विभाग

विशेष कार्य :

१) कथाकथनाचे दोन हजार पेक्षा जास्त प्रयोग व विविध विषयावर पाचशे पेक्षा जास्त व्याख्याने

२)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल वक्ते म्हणून २००७ पासून कार्यरत आहे.

३) ९४ व्या अ.भा. साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी तसेच अंमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्ट्यासाठी निमंत्रित गझलकार म्हणून निवड झाली आहे.

४) ” के विजय ” या नावाने कविता व गझल लेखन तसेच ” विजलहरी ” या नावाने चारोळी लेखन

५) विजलहरी या गझल वृत्ताचे स्वतंत्रपणे संशोधन केले आहे.

६) नुकतेच सूलक म्हणजेच सूक्ष्म लघू कथा या कथा प्रकाराचे स्वतंत्र संशोधन केले आहे.

प्रकाशित साहित्य : सहा कथासंग्रह प्रकाशित.

पुरस्कार :

  • राष्ट्रीय पुरस्कार : (१) कोविड योद्धा, विशाखा फाउंडेशन, नवी दिल्ली (२) कोविड- १९ फायटर सन्मान, महावीर इंटरनॅशनल मेडीकल सर्विसेस, मुंबई (३) Dr. Babasaheb AmbedkarNational Exllence award 2022
  • राज्य पुरस्कार : (१) छ. शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकरंजन कला मंडळ, नाशिक (2010) (२) वपु काळे स्मुर्ती प्रतिष्ठानच्यावतीने वपु कथन गौरव पुरस्कार (2013) (३) आदर्श शिक्षक पुरस्कार, गंगाधर लोकवार्ता, कोल्हापूर(2020) (४) उत्कृष्ट स्थंभलेखक पुरस्कार, जाई फाउंडेशन, मुंबई ( २०२१ ) (५) साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, बाल संस्कार संस्था, ठाणे

साहित्य सन्मान : माझा शाळा प्रवेश दिन या ग्रंथास ५ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आगामी प्रकाशने : एक कथासंग्रह, दोन कवितासंग्रह,

चारोळी संग्रह : १) नातीगोती 2) विजलहरी

  • लेखसंग्रह व काव्य संग्रहांसाठी प्रस्तावनालेखन.
  • विविध दिवाळी अंक व वृत्तपत्र यातून सातत्याने कथालेखन चालू असते.

मराठी ॲपच्या माध्यमातून डिजिटल खालील माध्यमावर विपुल प्रमाणात लेखन केले आहे-

१) प्रतिलिपी २) स्टोरी मिरर ३) पॉकेट नॉव्हेल

स्वतःचा युट्युब चॅनेल आहे ज्यावर अनेक कथा, मिमिक्री, भाषणे उपलोड आहेत.

? जीवनरंग ❤️

☆ पसंत आहे मुलगा…  भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे

महिनाभरानंतर मी महेशच्या घरी जात होतो तो आठ ते दहा दिवसांपासून कॉलेजला आला नव्हता. त्याची तब्येत बरी नाही की काय अशी शंका सहज माझ्या मनात आली.शिवाय माझे एक पुस्तक आणि दोन टॉपिकच्या नोट्स त्याच्याकडेच होत्या त्या मला त्याच्याकडून घ्यायच्या होत्या. मी गेलो त्यावेळी महेश घरीच होता आपली जुनी एम 80 गाडी पुसत होता. मला पाहताच त्याचा चेहरा खुलला. “का रे कसा आलास? “

“सहजच, आठवडाभर झाले कॉलेजला आला नाहीस,म्हटलं गेला की काय ते बघावं…”

” असा कसा जाईन रे? तुला बरोबर घेतल्याशिवाय! ” त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो आणि हासतहासतच एकमेकांना अलिंगन दिले.

” मग?काय झालं? कॉलेजमध्ये, काही विशेष? “

” विशेष काही नाही रे पण वहिनी जरा जास्तच कावऱ्याबावऱ्या झाल्यात… मला पण काही सांगता येईना. म्हणून थेट तुझ्याकडं आलो. “

” आत्ता गप्प बसं नाहीतर उगाच मार खाशील, अन हळू बोल आई घरात हाय,चल घरात, ” तो म्हणाला तसे बोलत बोलत आम्ही घरात गेलो. घरात जाऊन खाटेवर बसलो.

“आई, पाणी दे विजू आलाय,” महेशने आईला आवाज दिला त्याबरोबर पाण्याचा तांब्या घेऊन महेशच्या आई बाहेर आल्या. मी त्यांना मावशी म्हणत असे.

“बरेच दिवसांनी आलास रे ?”

” हो मावशी हल्ली अभ्यास फार वाढलाय ना, परीक्षा पण जवळ आल्यात ना? महेश आ…चार दिवस झालं कॉलेजला आला नाही (खरेतर मी आठ दिवसच म्हणत होतो परंतू महेशच्या वटारलेलंय डोळ्याकडे पाहून मी लागलीच आठ वरून चारवर आलो)म्हटलं चला त्याला भेटून तर यावं. “

अरे त्याला बरं नव्हतं अन रानात कामं पण चालल्यात ना म्हणून म्हटलं रहा घरी चार दिवस, काय व्हत न्हाय. बरं झालं बाबाआलास. बसा जेवायला दोघं.”

” नको, नको मावशी,मी डबा खाऊन आलोय आत्ताच.”

” ये विज्या लय नाटक करू नकोस,वाढ गं आई आम्हाला,मला पण खूप भूक लागलीय, ” महेश पुढे म्हणाला.

” अरे, पण मी खरंच जेवलोय म…महेश… ” पण माझ्या तशा म्हणण्याचा काही उपयोग झाला नाही कारण खरं सांगायचं तर मी जेव्हा जेव्हा महेशच्या घरी जायचो तेव्हा तेव्हा जेवण केल्याशिवाय तिथून माझीच काय पण सोबत असलेल्या कोणाही मित्राची कधीच सुटका व्हायची नाही आणि तिथे नाही म्हणायची तर आमची बिषाद नसायची. त्याच्या आईचा स्वभावच तितका प्रेमळ होता. असे मित्र आणि अशी आई मिळायला खरंच खूप भाग्य लागतं! शिवाय आमच्या दोघांची मैत्री तर फारच दृढ होती. एकमेकांना आम्ही खूप समजावून घ्यायचो.

महेश एक चांगला स्पोर्टमन होता पण अभ्यासात मात्र सोसोच होता. लेक्चर पेक्षा मॅचेस, पिक्चर आणि स्टाईल हेच त्याचं जीवन होतं.मी लेक्चरला रेग्युलर असायचो त्यामुळे महेशला नोट्स पुरवण्याचे माझे काम असायचे. महेशचा स्वभाव खूप मनमोकळा होता. त्याचा मित्रपरिवार सुद्धा खूपच मोठा होता. त्याची पर्सनॅलिटी पण छान होती. सडसडीत बांधा,उंचपुरा, स्टायलिश केस, दिसायला सावळा असला तरी तो नाकीडोळी छान होता. त्याचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा. सगळ्यांशी छान बोलायचा. कोणाशी भांडणतंटा वगैरे असली काही भानगड नव्हती. सगळ्यांच्यात मिळून मिसळून वागायचा. त्या उलट मी मात्र शांत संयमी आणि अभ्यासू असल्याने थोडा हुशारात मोडत होतो. आमच्या दोघांच्या मैत्रीचं खरं कारण म्हणजे एसटी. आम्ही दोघे एकाच एसटीने प्रवास करायचो.माझ्या गावातून सकाळी एसटी निघायची आणि दोन गावे ओलांडून महेशच्या गावात प्रवेश करायची. तोपर्यंत गाडीत शाळेच्या मुलांची गर्दी व्हायची. पण मी बहुतेकवेळा माझ्या शेजारची जागा महेशसाठी राखून ठेवायचो. वर्गात सुद्धा बहुतेकवेळा आम्ही दोघे एका बाकावरच बसायचो कारण त्याचं लिहिण्याचं स्पीड कमी असल्यामुळे तो माझं पाहून त्याच्या वहीत लिहायचा. लेक्चर संपल्यावर प्रॅक्टिकलला लॅबमध्ये जाण्याअगोदर मधल्या ब्रेकमध्ये आम्ही झाडाखाली डबे खायचो. एकमेकांच्या भाज्याच नव्हेतर थेट डबेच एकमेकांना शेअर करायचो. डबा नसलेले मित्रही आमच्यात मिसळायचे आणि मग अवघा रंग एकच व्हायचा. मौज- मजा -मस्ती खूप व्हायची.

खरेच,आयुष्यातले ते खरे सोनेरी दिवस होते!

हे सगळं मी आठवत असतानाच अचानक महेशने आवाज दिला.

“बस खाली.” तेव्हा कुठे मी भानावर आलो!

मावशींनी लगेच दोन ताटे वाढून आमच्यापुढे आणून वाढून ठेवली. आम्ही जेवायला बसलो. जेमतेम दोन घास खाल्ले आणि माझ्या पटकन काहीतरी लक्षात आल्याने मी म्हणालो, “मावशी, परवाच्या स्थळाचं काय झालं?”

” गप्प बस ! जेव गपचिप!,” विषय टाळण्यासाठी महेश म्हणाला.

तेवढ्यात आईचा आवाज आला, ” अरे पसंत आहे मुलगा त्यांना…! लगेच फोन येऊन गेला त्यांचा. “

” अरे वा! अभिनंदन महेशराव!मावशी आता होऊन जाऊ द्या! लवकर बार उडवा भावड्याचा !”

” अरे बाबा, बार उडवायचा पण महेशचा नाही.”

” मग? “

” तुझा… “

” माझा? म्हणजे मला नाही कळलं?, ” मी हातातला घास परत ताटात ठेवत आश्चर्याने म्हटले.

” अरे त्यांनी महेशला नाही तुला पसंत केलंय. “

” काय?,” मावशींच्या तोंडचे ते शब्द ऐकून मी उडालोच!”

” अरे, ते लोक म्हणाले, आम्हाला नवरदेवासोबत आलेला तो दुसरा मुलगा पसंत आहे. त्याला आम्ही आमची मुलगी देऊ, “मावशी माहिती देत म्हणाल्या.

” काहीतरीच काय मावशी, तुम्ही माझी मस्करी करताय… हो ना? महेश तू तरी… “

” अरे बरोबर बोलतेय आई, काही मस्करी वगैरे नाही. ” महेश म्हणाला.

” अरे पण माझा काय संबंध? माझा प्रश्न येतोच कुठे? आणि हे काय माझ्या लग्नाला अजून पाच ते सहा वर्षे लागतील. मला एम एस्सी करायचंय, त्यापुढे नोकरी आणि… “

” ते खरंय, पण त्यांनी तुलाच पसंत केलय आणि मुलगी छान आहे असं तूच तर म्हणत होतास?”

” हो पण ते सगळं महेशसाठी होतं…शिवाय त्याला पण मुलगीही पसंत आहे.”

” अरे पण तिला तू पसंत आहेस ना? हाच तर मोठा घोळ आहे. “

” मावशी प्लिज तुम्ही माझी चेष्टा करू नका.”

” अरे मी खरं बोलतेय बाळा. महेश? तूच सांग बाबा काय म्हणत होते ते लोक त्यादिवशी फोनवर?,” त्या महेश कडे बोट दाखवत म्हणाल्या.

मी महेशकडे पाहिले पण त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते तो जाम टेन्शनमध्ये दिसत होता.

बोलण्यापेक्षा तोंडातला घास भराभर चावण्याचे नाटक तो करू लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सूर्य नवा दिवस नवा- भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

सूर्य नवा दिवस नवा- भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(महिन्याअखेरीस तू जमेल तेवढे पैसे माझ्या हातात टिकवले तरी चालतील. एवढंच वाटतं की माझ्या हातांची दानत शेवटपर्यंत टिकायला हवीय. आणि हे गुपित आपल्या दोघांतच असायला हवं.’) – इथून पुढे — 

वास्तविक सुमित्राकाकूंचा मुलगा मोठ्या कंपनीत आहे आणि काकूंची ही अगतिकता? मी लगेच म्हटलं, ‘ठीक आहे काकू, उद्यापासून या. मी तुम्हाला महिन्याला एक हजार रूपये देईन, चालेल?’

‘छे, अगं एखाद्या महिन्यात जास्तीत जास्त पाचशे रूपये लागतील. तेही मला लागले तरच घेईन नाही तर काहीच घेणार नाही. माझ्या लेकीसाठी काही करतेय या भावनेने मी स्वयंपाक करीन. मोबदला मिळतो म्हणून नाही. मला कधीही जेवायचा आग्रह करायचा नाही. बघ, तुला पटतंय कां, तर हो म्हण.’

शुभदा म्हणाली, ‘काकू मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. फक्त ही गोष्ट मला माझ्या नवर्‍यापासून लपवून ठेवता येणार नाही. त्यांना सांगावं लागेल, चालेल ना?’

‘बरं बाई, चालेल. आता मला शंभर रूपये देशील, सकाळी येताना काही भाज्या घेऊन येईन.’ असं म्हणत शंभर रूपये घेऊन काकू बाहेर पडल्या. किचनमध्ये गेल्यावर लक्षात आलं की काकूंनी पोह्यांची चव सुद्धा घेतली नव्हती.

एकीकडे सुमित्राकाकूंना मदत करतेय हा आनंद होता तर दुसरीकडे बॅंकेतून आल्यावर आता वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न शुभदासमोर होता. बॅंकेची शाखा जवळच असल्याने ती सव्वा पाचलाच घरी पोहोचायची.

थोड्या वेळाने सखूबाई आली. झाडलोट करून, कपडे धुऊन पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाली, ‘ताईसाहेब, आमच्या बाळूला आठवीचं गणित आणि इंग्लिश जरा अवघड जातंय म्हणे. शिकवणी लावायची म्हणत हुता. अवं आता आम्ही गरीबांनी शिकवणी फी कुठनं आणायची? कमी पैशात शिकविणारा कुणी हाय का तुमच्या ओळखीत? असंल तर सांगा.’

मुलांचं हवं नको ते पाहण्यात शुभदा कधी प्रमोशनच्या भानगडीत पडली नव्हती. मुलं दहावीला जाईपर्यंत त्यांच्या सगळ्या विषयांचा तिने स्वत: जातीने अभ्यास घेतला होता. त्यामुळे आठवीच्या मुलांची दोन विषयांची शिकवणी घेणे ही शुभदाच्या दृष्टीने अवघड गोष्ट नव्हती. शुभदाने संधी साधली आणि बोलून गेली. ‘सखू आणखी पांच दहा मुलं भेटतात का बघ. संध्याकाळी साडेपांच ते साडेसहा या वेळेत मी विनामूल्य शिकवणी घेईन.’

दुसर्‍या दिवशी सकाळी शुभदा पहिल्यांदाच फिरायला म्हणून बाहेर पडली. अजून उजाडायला बराच अवधी होता. त्यामुळे थोडे अंधुकसे दिसत होते. चालत चालत ती जवळच्या टेकडीवर पोहोचली. गार वार्‍याची झुळुक येताच तिचे मन मोहरून उठले.

फिरून येताना नुकतेच फटफटू लागले होते. पूर्व क्षितिजावर केशरी सोनेरी रंग दाटून येत होते. त्या गडद रंगांतून तेजोनिधी लोहगोल तो सूर्य हळूहळू वर येत होता. सोनेरी किरणांनी टेकडीवरील झाडे उजळून निघाली होती. जाग आलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट चैतन्य पसरवत होता. ते विलोभनीय दृश्य अनुभवताना शुभदा हरखून गेली. निसर्गाच्या या अलौकिक सौंदर्याकडे आपण कधीच कसं पाहिलं नाही? सूर्य जसा नित्य नवा असतो तसं आपणही मनांत कसलंही किल्मिष न बाळगता प्रत्येक दिवस नवा अन संधी नवी असं मानायला काय हरकत आहे, असा विचार करीत शुभदा घरी आली.

सकाळचे फिरून झाल्यावर सुमित्राकाकू सात वाजता हजर झाल्या. समोरच्याच सुपरशॉपमधून भाज्या, लिंबू, मिरची, कोथिंबिर घेऊन आल्या. खरेदीच्या रिसीट सोबत उरलेले पैसे परत देत त्यांनी शुभदाला आठवड्याचा मेनूही दिला. ‘काही बदलायचं असेल तर सांग,’ असं म्हणत किचनमध्ये शिरल्या. त्यात बदलण्यासारखे काहीच नव्हते. अगदी अर्ध्या तासात स्वयंपाक संपवून त्या बाहेर पडल्या.

साडेआठला सखूबाई आल्या. ‘ताईसाहेब, पंधरा मुलं तयार हायती. शिकवणीसाठी कम्युनिटी हॉल मिळतोय. दोन दिस थांबावं लागंल.’

शुभदाने होकार भरला आणि त्याच संध्याकाळी तिने आठवीचे गणित आणि इंग्रजी विषयाचे पुस्तक विकत घेतले.

संध्याकाळी साडेपाच वाजता बॅंकेतले काम आटोपून शुभदा डायरेक्ट कम्युनिटी हॉलवर पोहोचली. आधी या मुलांचं व्याकरण पक्कं करणं आणि गणिताचा विषय सोपा करून शिकवणे आवश्यक आहे हे तिच्या लक्षात आलं. मुलं शुभदाच्या शिकवणीत रमून गेली.

दिवसामागून दिवस सरत होते. सर्वच मुलांनी पुढच्या सहामाहीत चांगले यश मिळविले. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सर्वच पालक झटत असतात पण निरपेक्षपणे इतरांच्यासाठी काही करण्यात किती आनंद असतो हे शुभदा पहिल्यांदाच अनुभवत होती.

घरी परत जाताना शुभदानं आकाशाकडे पाहिलं. उगवतीच्या सूर्यासारखे उमलत जाणार्‍या आपल्या मुलांच्याकडे पाहून किती प्रसन्न वाटायचं. आता आपलं वय ढळत चाललंय अगदी तसं दिवस मावळतीकडे झुकत चालला होता. आकाशात एक अनोखं चित्र साकारत होतं. क्षितिजावर निळसर प्रकाश रेंगाळत होता आणि क्षणार्धातच त्यात लाल, पिवळसर, सोनेरी रंग मिसळत चालले. ‌‌अख्खे सूर्यबिंब केशरी दिसू लागले. सर्वत्र संधिप्रकाश पसरत चालला. सूर्यास्ताचं देखणं दृश्य शुभदाच्या मन:पटलावर बिंबलं गेलं. सूर्योदयाच्या इतकीच संध्याकाळसुद्धा तितकीच मनोहारी वाटत होती.

सूर्योदय असो वा सूर्यास्त, निसर्ग मात्र तेवढ्याच सुंदरतेने प्रकट होतो. मग आपणच ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असं कां म्हणावं? आयुष्याच्या संध्यासमयी आपणही निसर्गाप्रमाणे तेवढ्याच ग्रेसफुली प्रकट व्हावं. पावलापावलावर सुख आपल्याला साद घालीत असतं. त्या गोष्टीत लपलेले सुख मात्र आपल्यालाच शोधता आले पाहिजे. हळूहळू तिच्या मनावरचे मळभ दूर होत गेले.

घरी आल्यावर तिने रेडियो ऑन केला. जितेंद्र अभिषेकी समरसून गात होते. व्यथा असो आनंद असू दे / प्रकाश किंवा तिमिर असू दे / वाट दिसो अथवा ना दिसू दे / गात पुढे मज जाणे… माझे जीवनगाणे… जणू मंगेश पाडगावकरांचे शब्द पंडितजींच्या सुरांच्या हिंदोळ्यावर झुलत होते.

शुभदाच्या मुखातून ‘वा!’ शब्द उत्स्फूर्तपणे बाहेर पडला. एखादे गाणे ऐकणे हा देखील इतका अलौकिक अनुभव असू शकतो हे शुभदाला पहिल्यांदाच जाणवलं. सुख, समाधान हे आपल्याच मनोव्यापारांवर अवलंबून असतात हे तिला पटलं.

पंडितजी गातच होते. ‘गा विहंगांनो माझ्या संगे / सुरावरी हा जीव तरंगे…… माझे जीवनगाणे !’

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सूर्य नवा दिवस नवा- भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

सूर्य नवा दिवस नवा- भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी जाग येताच शुभदाने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेसहा वाजायला आले होते. बेडवरून उठून तिची पावले किचनकडे वळली. चहाचं आधण ठेवलं. बेसिनवर जाऊन ब्रश करून तिने तोंडावर पाणी मारलं. फक्कड वाफाळत्या चहाचे घुटके घेत ती बाल्कनीतल्या खुर्चीत बसली. गार वार्‍याची झुळुक तिला सुखावून गेला.

अजून सगळं आवरून स्वत:साठी जेवण बनवायचं होतं. आज जेवायला काय करायचं, हा मोठा प्रश्न असायचा. एकटीसाठी म्हणून कसली आवडनिवड असते? नवरोबा रविवारी येतो तेंव्हा त्याची कसलीच फर्माईश नसते. आपली लेक मात्र उद्याच्या ब्रेकफास्टचा, लंचचा, डिनरचा मेनू एक दिवस अगोदर सांगायची. कधी सुशांतला विचारलं तर, ‘आई तुझ्या हातचं काहीही चालेल, पण मेदूवडे करशील तर मज्जा येईल.’ असं म्हणायचा. आता सगळंच बदललं आहे.  

‘शुभदा’ या हाकेने तिचं लक्ष खाली वॉकिंग ट्रॅककडे गेले. वॉकिंगला चाललेल्या सुमित्राकाकूंनी हाय म्हणण्यासाठी आवाज दिला होता. शुभदाने त्यांना वरती येण्यासाठी खूण केली. थोड्याच वेळात सुमित्राकाकू लिफ्टने वरती आल्या. 

सुमित्राकाकू म्हणजे मध्यम बांधा, गोरा रंग, स्वच्छ सुती साडी, पिकलेल्या केसांवर मेंदी लावून सोनेरी झालेले केस, लुकलुकणारे निरागस टपोरे डोळे आणि सुरकुतलेल्या चेहर्‍यावर मधाळ हसू  ल्यालेली सुंदर मूर्ती.  

‘काकू, बसा तुमच्यासाठी चहा करते.’

‘नको ग, हे गेल्यापासून मी सकाळचा चहा सोडला आहे. बरं तुझी लेक काय म्हणतेय? सुशांतचं मेडिकल कसं चाललंय?’

‘खरं सांगू, काकू लेकीच्या लग्नानंतर माझ्या शरीराचाच एक भाग विलग झाल्यासारखं मला वाटलं होतं. माझ्या अवतीभवती मांजरीसारखी सदैव घुटमळणारी माझी लेक सासरी गेल्यानंतर मला पार विसरली आहे. गावात असून देखील तिला इकडे यायला वेळ नसतो. कधी अचानक वादळासारखी येते अन झपाट्याने निघून जाते. अधूनमधून केवळ रेसिपी विचारून झालं की ‘चल ठेवते, परत बोलू’ असं म्हणत लगेच फोन ठेवते. 

सुशांतला मेडिकलची अ‍ॅडमिशन मिळाल्यावर त्यानं घर सोडलं अन त्याच्या माघारी मी खूप रडले. तो सदैव कुठल्या ना कुठल्या सेमिनारमध्ये व्यग्र असतो. त्याच्याकडेही वेळ नसतो. माझ्याशी फोनवर चाललेलं संभाषण कधी एकदा संपेल याची त्याला घाई असते. 

पतिदेव मात्र रोज रात्री न चुकता फोन करतात. ‘जेवलीस काय? आजचा दिवस कसा गेला?’ हे आवर्जून प्रेमाने विचारतात. मुंबईलाच बदली झाल्यानं ते रविवारी किंवा मध्ये सुट्या पडल्या की येऊन जातात. एरव्ही मी एकटीच असते. दिवसभर बॅंकेत असते म्हणून बरं आहे. संध्याकाळी मात्र मला एकटीला घर खायला उठतं. 

काकू, मला आता कसलंच टेन्शन नाही. पण अलीकडेच उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालं. आता एक कायमची गोळी नियमितपणे घ्यावी लागतेय. एक वेळ गोळी चुकली तरी चालेल पण फिरायला मात्र न चुकता जायला हवे असा डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं आहे. पण अजूनपर्यंत तरी फिरायला जात नाहीये.

‘अगं, तुझी मुलं आता आईबाबांचे बोट सोडून स्वतंत्रपणे चालायला शिकली आहेत. त्यांना त्यांचं म्हणून एक स्वतंत्र विश्व निर्माण करायचं आहे. स्वत:चे निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत, यातच तुला आनंद मानायला हवा.

आपण नागपूरहून इतक्या लांब आलो म्हणून काय आपलं आपल्या आईबाबांच्यावरचं, भावाबहिणीवरचं प्रेम ओसरलं आहे काय? आपल्या पंखाखाली पिलांना ऊब देणं हा मायेचा धर्म असला तरी त्यांना पंख फुटल्यावर आकाशात स्वच्छंद उडू देणं हे देखील पालकांचं कर्तव्यच असतं. जीवनातला हा बदल अपरिहार्य असतो तो स्वीकारायला हवा. मुलं आपल्यापासून कायमची विलग झाली म्हणून उगाच चिंता करू नकोस. त्या चिंतेचाच परिणाम आहे, तुझा रक्तदाब. सकाळी फिरायला जात जा, किती प्रसन्न वाटेल पाहा.

या विश्वात प्रत्यक्ष दिसणारा एकमेव देव सूर्यनारायण किरणांच्या रथावर आरूढ होऊन आपल्या भेटीला नित्य नव्या स्वरूपात येत असतो. कधी अनुभवून पाहा. जमलंच तर संध्याकाळच्या वेळी वंचित मुलांच्यासाठी काही करता आलं तर बघ.’ 

‘काकू, बसा मी पोहे करते. तुमच्यासाठीच म्हणून नाही, मलाही खायचे आहेत.’ 

‘शुभदा, तुझी हरकत नसेल तर पोहे मी बनवू काय?’ काकूंच्या लाघवी बोलण्यात आर्जव होतं.

शुभदा रिलॅक्स होत म्हणाली, ‘ठीक आहे काकू, बनवा. मी आंघोळ आटोपून येते.’               

शुभदा तयार होऊन येताच काकूंनी पोह्यांची प्लेट तिच्या हातात दिली. ‘पोहे अगदी मस्त झाले आहेत. काकू तुमच्या हाताला केवढी चव आहे!.’

‘अग हो, कुणाला तरी खाऊ घालणं आणि कुणाच्या हातात काही ठेवणं याचंच या हातांना अप्रूप वाटत आलंय. आता ती दोन्ही कामं थांबली आहेत. माझी सून मला किचनमध्ये फिरकू देत नाही. त्यांचं ते सामिष चमचमीत जेवण बनवणं मला जमत नाही. 

तुझे काका असताना घरखर्चासाठी म्हणून मुद्दामहून जास्ती पैसे द्यायचे. हिशेब पाहायचेच नाहीत. आतापर्यंत त्याच पैश्यातून पुरवून पुरवून मी मुलां-नातवंडाना काही तरी देत होते. आता तेहि संपत आलेत. कुणाकडे मागायची लाज वाटते. तुझी हरकत नसेल तर मी तुझा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करू काय?. महिन्याअखेरीस तू जमेल तेवढे पैसे माझ्या हातात टिकवले तरी चालतील. एवढंच वाटतं की माझ्या हातांची दानत शेवटपर्यंत टिकायला हवीय. आणि हे गुपित आपल्या दोघांतच असायला हवं.’ 

– क्रमशः भाग पहिला

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares