सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ निळे मलम… भाग – २ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(आपल्या सहवासात माझा आत्मा आतृप्तच राहिला. माझ्या तृप्तीचा हा उपाय मी शोधला.’
‘कोणता उपाय?’
‘निळे मलम.’ ) — इथून पुढे
‘निळे मलम , वाढत्या वयाचा परिणाम तुझ्या डोक्यावरही झालाय. विचारतोय काय? आणि तू उत्तर काय देतीयस?
‘बरोबर बोलतीय मी! बस आपण समजू शकत नाही. तसंही आपण मला कधी समजून घेतलय?’
‘खूप सांकेतिक बोलायला लागलीयास आज काल.’ सोमेशने चिडून म्हंटलं.
‘स्पष्ट करते. लहानपणी गरम दूध हातावर पडल्यामुळे माझा हात खूप भाजला होता. एक तर भाजल्यामुळे होणारी जळजळ आणि द्सरीकडे ही चिंता, की हातावर फोड येऊन माझा हात खराब झाला तर? माझ्या हाताचे डाग पाहून लोक हसतील. मी ओरडून ओरडून रडत होते. तेव्हा आईने जवळ असलेल्या शाईचा दौतीतली शाई माझ्या हातावर ओतली.
‘हे काय केलंस आई? एखादं औषध लावायचं ना! आता माझ्या हातावर फोड उठले तर? त्याचे डाग किती खराब दिसतात.’ मी रडत रडत आईला म्हंटलं
‘बेटी, हे औषधच आहे. बघ. याने तुझी जळजळही थांबेल आणि तुझ्या हातावर फोडही उठणार नाहीत.’ आईने समजावलं.
‘खरोखरच त्या निळ्या शाईने मला खूप आराम मिळाला. जळजळ थांबली आणि फोडही आले नाहीत.’
तू अजूनही भरकटतच आहेस.’ सोमेश चिडून म्हणाला.
‘मुळीच नाही. तिथेच येते आहे मी. विचार करा. तुमच्याशी लग्न करून मी या घरात आले. कधी तुम्ही माझं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केलात? तुमची गरज भागवण्याचं मी केवळ साधन झाले. कधी माणूस म्हणून माझ्याकडे बघितलत, मला तरी आठवत नाही. तुमची उपेक्षा, अवहेलना, यामुळे माझंही हृदय खूप जळत होतं. मी पुन्हा घाबरले, की कुठे फोड उठू नयेत. नाही तर इच्छा नसतानाही त्यातून झरणारं पाणी समाजाच्या चर्चेचा विषय बनेल. ‘
‘म्हणजे?’
‘म्हणजे आत्तापर्यंत तरी लोकांना असं वाटतय, की आपल्यामधे प्रेमाचा झरा वाहतोय. आपण दोन शरीर आणि एक आत्मा असलेले आहोत कारण सामान्यत: आपण समाजापुढे असाच चेहरा घेऊन फिरतो. आपण दोघं म्हणजे नदीचे दोन किनारे आहोत, ज्याच्या आत एक ज्वालामुखी खदखदतोय, हे कुणालाच माहीत नाही. तुमच्याशी जोडली गेल्यावर मला खूप एकाकीपण वाटलं.’
‘तू जरा जास्तच , इच्छा, अपेक्षा बाळगल्यास… अं?’ सोमेश डोळे वाटारून म्हणाला.’
‘इच्छा, अपेक्षा बाळगणं, हा प्रत्यक माणसाचा हक्क आहे. शिवाय, प्रत्येक बाईच्या काही इच्छा, काही कामना, अभिलाषा असतातच आणि जेव्हा त्या अपूर्ण कामनांसोबत जगावं लागतं ना सोमेश, तेव्हा खूप पीडा होते. मी ते एकाकीपण भोगलय, जेव्हा तुम्ही असूनही माझ्याबरोबर नव्हतात. माझं सुख तुमचं. माझं दु:ख मात्र माझं एकटीचं होतं तेव्हा. उशीलाच साथीदार बनवून तिच्या गळ्यात हात टाकून माझं दु:ख माझ्या वेदना वाटत होते मी. तिला माझ्या आसवांनी भिजवत होते. मला माहीत होतं, की मी म्हणजे अमृता नाही, जिला सहजपणे आपलं दु:ख वेदना सांगण्यासाठी आणि रडण्यासाठीही इमरोजचा खांदा मिळेल.’
एरवी सोमेशच्या पुढे येताना सुलभाची बोलती बंद होते. आज न जाणे तिला एवढी ऊर्जा कुठून आली.
‘तर मग हा मार्ग शोधून काढलास तू, आपल्या मनातलं दु:ख बाहेर काढण्याचा?’
‘काय वाईट आहे यात? तुम्ही मला कधीच समजून घेतलं नाहीत … आताही समजू शकणार नाही. आशा स्थितीत माझ्यापुढे दोनच रस्ते होते. एक तर बाथरूममध्ये जाऊन अंतरातला लाव्हा फ्लशबरोबर वाहून टाकायचा किंवा कुणाला तरी सांगून हलकं व्हायचं. पण काळजातलं दु:ख कुणाला ऐकवणार? जिथे सात फेर्यांचं बंधन आपलसं झालं नाही तिथे कुणाकडून काय अपेक्षा ठेवणार? दुसरा रास्ता हा होता की कुणी सहप्रवासी असा शोधायचा की जो जीवनात साथ देईल, माझ्याविषयी सहानुभूती बाळगेल, माझे दु:ख, वेदना समजून घेईल.- माझीही काळजी करणारा, माझाही विचार करणारा असेल आणि विश्वास बाळगा सोमेश… मिळालाही असता. किती तरी वेळा वाटलं, शोधावा असा जीवनसाथी, जो माझ्या भावनांना समजून घेईल, माझ्यावर मनापासून प्रेम करेल, ज्याच्या खांद्याववर डोके टेकून मी आपलं ओझं हलकं करू शकेन. जसे तुम्ही माझ्याबाबतीत बेपर्वा आहात, तशीच मीही आपल्याबाबतीत बेपर्वा होईन. माझं वर्तमान जगू शकेन. ‘
‘म्हणजे आत्तापर्यंत तू मुडदा होतीस, आता जगू इच्छितेस.’
‘सोमेश केवळ श्वासोच्छवास करणं, एवढीच काही जीवंत रहाण्याची खूण नाही. जीवंत असण्यासाठी काही स्वप्न, इच्छा, अभिलाषा असणंही गरजेचं असतं. दररोज कुणी तरी माझ्या आतून ओरडून ओरडून विचारतं… तू मृत आहेस..? उठ.जागी हो. खरं तर त्यानेच माझ्या जिवंत असण्याची जाणीव कारून दिलीय. आता मी बघू इच्छिते, ती स्वप्ने, जी तुमच्या भीतीने मी पाहिली नाहीत. सगळी कर्तव्ये पार पाडूनही, जेव्हा नाराजीचा मुकुट माझ्या माथ्यावर जडला, तेव्हा वाटलं या मनाला थोडं, सुख, आराम, चैन का देऊ नये? अश्रूंमध्ये माझं दु:ख वाहवून टाकत होते, त्यापेक्षा ते कागदावर उतरवणं मला जास्त चांगलं वाटलं. प्रेमाच्या खत-पाण्याच्या अभावाने निर्जीव झालेल्या संवेदना मलाच जडवत करू नये यसाठी विचार केला की, शब्दांच्या कॉंक्रीटचा का होईना, एक महाल बनवावा. भावना-संवेदनांची जी बीजे मनाच्या मातीत नुसतीच पडून आहेत, ती खत-पाणी घालून अंकुरित करावी. एवढा तरी हक्क आहे ना मला?’ सुलभात आज एवढी ताकद कुठून आली कुणास ठाऊक? स्वत: सोमेशही हैराण झाला.
“सोमेश ! आम्हा बायकांच्यात एक कमजोरी असते. आम्ही ना, भविष्याची डोरी आधीच हातात, घेऊन ठेवू इच्छितो. यामुळे अनेकदा अर्तमानाचं टोक आमच्या हातून सुटून जातं. मीदेखील माझ्या जीवनाच्या तराजूनं माझं सुख तोलून बघितलं, तेव्हा मला वाटलं माझ्या वर्तमानापेक्षा मोठा आहे माझ्या माता-पित्यांचा अभिमान, जो त्यांना त्यांच्या लेकीबाबत आहे. माझ्या सासू-सासर्यांचा सन्मान, जो त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या वागणुकीने मिळवलाय. लोक आपल्या दोघांमधील विसंवादाचे साक्षीदार बनावे, याच्यापेक्षा, पुन्हा एकदा निळे मलमच, पुन्हा एकदा माझं दु:ख, वेदानांना कमी करण्याचं साधन बनवावं, असं मला वाटलं. माझ्या आतील दु:ख याच मलमानी बाहेर येत गेलं आणि मी समाजापुढे एक सुखद, संपूर्ण दांपत्यच्या आभासी जगाची जाणीव करून देत, चेहर्यावर हसू आणत जगत राहिले.’
सोमेश गप्प बसून सुलभाकडे बघत राहिला.
सुलभाला जाणीव झाली, की एका शिकार्याच्या पंजाच्या हातून तिने आपली स्वप्ने वाचवली आहेत.
– समाप्त –
मूळ कथा – नीला मलहम
मूळ लेखिका – सुश्रीलता अग्रवाल, मो. – 9926481878
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈