मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “स्मरणाचं गच्च जावळ…” – भाग – १ ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील ☆

श्री संजय जगन्नाथ पाटील 

“स्मरणाचं गच्च जावळ… – भाग – १ ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील 

“धनगरी मेंढराच्या कातडीनं दर्पाळून मुलुखभर पसरलेली धुंदावली कुत्री, एकटाक गोळा व्हावीत अन् मेंढराच्या मागं मेंढरं बनून जावीत अशी अंगचटी आसक्ती बेताल..”

 माझ्याच एका कवितेतल्या या ओळी माझ्या नजरेसमोर थबकलेल्या..

धुरळा झटकत, जुन्या वह्या तपासत बसलेलो.. कधीकाळी काहीतरी कसंबस कुठंतरी खरडलेलं…

पिवळी पडलेली पानं.. बरीच शिवण सोडत असलेली.. कुबट वासाची.. जर्जर..

त्यावर आडवंतिडवं लिहिलेलं..

रात्री उशाला वही पेन ठेवायचो.. इतरांना लाईटचा डोळ्यावर त्रास नको झोपताना म्हणून अंधारातच अदमासानं चाचपडत लिहायचं..

त्याला आकार नव्हता..

काहींचे संदर्भ अजूनही लागत होते..

काही फक्त शब्द उभे त्रयस्थासारखे.. न देणं.. न घेणं अशा थाटात..

तशात या ओळी समोर आल्या…

आणि कैक वर्षात विस्मृतीत गेलेला शाल्या ‘ समोर आला.. तरी शाल्याला मातीआड करून चाळीस वर्षं झाली..

इथंच घरापाठीमागच्या नारळाच्या झाडाखाली पुरलेला..

वरनं सुप्पानं पाऊस..

खड्डा मारताना, चिखलाच्या पाट्या उपसताना चित्त उडालेलं..

खाली पोतं अंथरलं.. ओलं कीच्च..

नुसती हाडं राहिलेली.. रया गेलेली..

अलगद झोपवला.. मनाचं भाबडं समाधान.. कुठं त्रास होऊ नये अंतिम प्रवासाला..

चिखल ओढला..

कितीतरी वेळ मातीच्या ढिगावर ठिबकत राहिलेलो…

 

शाल्याचं नाव शाळीग्राम.. अण्णांनी ठेवलेलं..

एवढंएवढंसं गोजीरवाणं कुत्र्याचं पिल्लू.. भलतंच केसाळ.. सगळ्या अंगभर पांढऱ्या भू-या केसांची लव.. ती ही फणीनं विंचरल्यागत.. एखादी गोंडस झिपरी पोरगीच वाटायची..

डोळे एकदम घारे.. रात्रीच्या अंधारात डोळ्याच्या कडा हिरव्या गार दिसायच्या. त्यातला कनवाळूपणा काळजाला भिडायचा..

कुत्र्याच्या जन्माला येऊन इतकं निष्पाप दिसावं ? गाईच्या समजूतदार डोळ्यागत.. खोल खोल..

 

एसटीतनं उतरलो..

रात्री साडेआठ नऊची वेळ असावी,..

रस्त्यापुरतं अंधाराला भेदत एसटी टेकाड उतरत अस्पष्ट झाली..

हातात जेवणाचा डबा.. अण्णांचा…

माळ तुडवंत बांधकामाकडं निघालेलो.. एकटाच.. आभाळ भरून आलेलं.. गार वारा झोंबायला लागलेला.. गावाच्या बाजूकडं असलेल्या खिलाऱ्याच्या रानातल्या उसाचा गारवा माळभर लहरतेला.. दीड दोन किलोमीटरचं अंतर होतं, जागेवर पोहोचायला.. खरबुड्या माळावरनं आडवंतिडवं पावलं उचलत होतो.. दूरवर मुल्लाच्या माडीवरच्या पेंगुळल्या चाळीसच्या पिवळ्या बल्बचा दुम धरून निघालेलो..

मध्ये निर्मनुष्य वाट.. सरत नव्हती..

चुकून अंधाराच्या गचपणात पाय पडला तो एका कुत्र्याच्या पिल्लावर.. जमिनीत खोबणी धरून बसलेलं पिल्लू व्हिवळलं तसा पटकन पाय काढला..

वाटलं कुठूनही अंधारात पिल्लाची आई माझ्या मांडीचा अवचित लचका तोडणार…

अंदाज घेत भरारा पावलं उचलू लागलो… भ्यालेलो..

लांबून येणारा पिल्लाचा आवाज बंद झाला तसं हायसं वाटलं.. मटकन जमिनीवर बसलो.. धपापत..

जेवणाचा डबा तिथंच खाली टेकवलेला…

अंधारात पायाजवळ काहीतरी हुळहुळलं. सापाकिरडाच्या भयानं पटकन उठून उभारलो.. पुन्हा पिल्लाचा आवाज.. कणव यावा असा..

पाहतो तर, कुत्र्याचं पांढरंधोप कापसावानी मऊशार पुंजका असावा असं पिल्लू.. डबा हुंगतय..

सारा प्रकार लक्षात आला..

डब्यातली चतकोर भाकरी तोडून समोर टाकली..

तसं ते चघळू लागलेलं.. बोळक्या तोंडानंं…

दातलून झालं आणि ते पायाशी लगट करायला लागलं.. मी अलगद त्याच्या जावळातून हात फिरवला..

मऊशार कोवळं अंग..

बोटांना हवाहवसं वाटणारा स्पर्श..

लुसलुशीत…

मोह आवरला.. हळूहळू पावलं टाकत पुन्हा माळाच्या उताराला लागलो..

लिंबाबुडी अण्णा बसलेले.. पाहताच उठले.. डबा घेऊन खडीच्या ढिगावर सप्पय जागा बघून बसले..

मी बांधकामाच्या भवती फेरी मारू लागलो..

” अरे कुण्या पावण्याला घेऊन आलायस.. “

अण्णांची हाक ऐकू आली.. बघतो तर कुत्र्याचं पिल्लू… तेच….

माझ्या मागं कधी आलं ते कळलंच नव्हतं..

आता दिव्याच्या प्रकाशात ते अधिकच उजळून आलेलं..

” माझ्याच मागनं आलेलं दिसतंय.. “

ते अधिकच घसटीला आलं.. कमालीचं निरागस भाबडं..

अण्णा म्हणाले.. “मया लागली.. असूदे.. माळावरंच असंल.. यील आई वासानं हुडकत.. “

आई काही आली नाही….

 

कुत्र्याचं ते इवलसं पिल्लू तिथंच आमच्याभवती रमलं…

“अय.. शाळीग्रामा.. “

अधेमधे अण्णा हाक मारू लागले..

शाळीग्रामाचा दगड म्हणजे देवळातल्या मूर्तीचा काळाकरंद दगड.. आणि हा तर गोरापान.. परदेशच्या पोरापोरीं सारखा..

कलंदर.. नेहमी फकीर मस्तीत…

पुढं शाळीग्रामाचा झाला तो.. शाल्या ‘..

 

शाल्यानं घर ताब्यात घेतलं.. उन्हाळ्यात पसरायचा न्हाणीत.. हिवाळ्यात कुणाच्याही अंथरुणात उब धरून… हक्कानं..

सकाळी माणूस अंथरून सोडताना हा फक्त मान उचलून बघायचा.. पुन्हा तारवटून पाय पसरून निजायचा… रातपाळी करून आल्यागत…

शाल्यावरची नजर हटायची नाही.. इतका देखणा.. कुणी म्हणायचं…

” कुत्री आहे का ?”

“नाही.. गंडय.. “

” कसलं चिकनाट.. “

रोज दृष्ट काढली जायची.. माणसासारखी..

शाल्या इतका माणसाळला की लहान मुलासारख्या त्याला सगळ्या सवयी लागलेल्या… लाड करून घ्यायचा.. जसा मोठा होत गेला तसं त्याचं रूप आणिकच साजरं झालं..

कधीच त्याच्या गळ्याला दोरी बांधली नाही..

पाळीव आहे हे कळावं म्हणून पट्टा फक्त…..

 

माळावर नेहमी पाण्याच्या टाकीजवळ आडोसा धरून धनगराची पालं पडायची… भटकंतीतली….

बरोबर शे पाचशे मेंढरांचा जत्था….

कुत्री घोडी.. मोठा बारदाना.. दिवसभर इकडं तिकडं करून रात्री विश्रांतीला माळावर यायची.. संध्याकाळी शेळ्या मेंढरांच्या कलकलाटानं माळ गजबजायचा… दोन-चार दिवसाचा मुक्काम आवरून मेंढपाळ खालतीकडं सरकायचे..

असाच एकदा शाल्या गायब झाला..

 दुसऱ्या दिवशी आजूबाजूला चौकशी केली तर कळलं तो मेंढ्यांच्या कळपातल्या कुत्र्यांबरोबर खेळत होता…. घरी सगळे हवालदिल झालेले..

घरात तर सुतक पडल्यागत.. कुणाच्याच तोंडात घास गिळवला नाही..

मेंढपाळानी माळ सोडलेला…

पुढचा मुक्काम कुठं असंल कुणास दखल… ।

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संजय जगन्नाथ पाटील
9422374848

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याग… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ त्याग… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

(मी हे कदापि सहन करु शकलो नसतो…. की आज तिच्या जाण्यान जे दुःख मी सहन करतोय ते दुःख, ती तळमळ माझ्या जाण्याने तिला सहन करावी लागली असती.) – इथून पुढे — 

मी एकटक आश्चर्याने पप्पांकडे पहात बसलो…. जस की कुठल्यातरी रहस्यावरचा पडदा हटवावा. पप्पांचे शब्द कानावर पडत होते…. ” मी तिला माझ्या पश्चात सुद्धा दुःखी पाहू शकत नव्हतो. माझ्या जाण्याने ती रडून रडून अर्धमेली झाली असती, आणि हे मी सहन करू शकलो नसतो. कमीतकमी तिच अस पहिल्यांदी निघून जाण्याने ‌ती ह्या एकटेपणाच्या दुःखातून तरी वाचली. तिच्या ह्या आनंदात मी सहभागी होऊ इच्छित आहे. ते बोलत जात होते…. आणि माझ्या आत जी पप्पांची पाषाणाची मूर्ती होती ती बर्फासारखी वितळत माझ्या डोळ्यावाटे अश्रुंच्या रूपाने वाढत निघाली होती.

तुला माहित आहे, तुझ्या आईसोबत माझा दीर्घ प्रवास 

राहिला. कितीतरी पहाट आम्ही आमच्या एकत्रित डोळ्यांनी पाहिल्या. ; अगणित संध्याकाळी आम्ही एकत्र फिरलो. आज निवांतपणे एकांतात जेव्हा गतकाळातील आठवणींना वाकून बघतो, कधी भविष्यातील योजना बनवत सुंदर भविष्य रंगवत‌. ह्या लांब टप्प्याच्या प्रवासात आम्ही कित्येक घर बदलली, देश बदलले. न जाणो कित्येक वेळा सोबत आम्ही पॅकिंग व अनपॅकिंग केली. प्रत्येक नवीन घराला अशाप्रकारे आम्ही सजवत राहिलो जस की हे घर आता आमच आयुष्यभराच सोबती असेल. जेव्हा नवीन घरात गेलो की त्या घराला ही मन लावून सजवायचो, पण तरीही मागच्या घराला मनापासून आठवत रहायचो. प्रत्येक नव्या घरासोबत आमचा एक टप्पा नावासहित जोडला जायचा.

भारतापासून न्युयॉर्क, आणि न्युयॉर्क पासून टोरंटो चे बदलणारे जग, ‌बदलणारे लोक पण आम्हाला व आमच्या एकसंध विचारांना ही बदलू शकले नाहीत. आम्ही दोघ ठेठ झाबुआई ला राहिलो, जराही बदललो नाही. आमच राहण -खाण नक्कीच बदलल. वर्षानुवर्षे एकत्र रहात, भांडत -झगडत, प्रेम करायचो, खायचो -प्यायचो, आयुष्याचा लेखा -जोखा नमूद होत राहिला की कोणी कितीवेळ काम केल, आराम केला. सगळी पसरलेली काम विकून -सावरून मुलासाठी कमीतकमी झझंट ठेवून त्याच्या संगोपनाची योजना आखली होती. वृद्धापकाळात चिंतेची गरज नव्हती, सरकारी सोय होती. जर चिंता होती ती फक्त एकच की, कोण पहिल जाईल, जो पाठीमागे रहाणार, त्याच्यासाठी आपल्या आयुष्यातील उरलेले दिवस व्यतीत करण कठिण होणार.

सहज व स्पष्ट स्वरात पप्पा आज बोलत होते व मी ऐकत होतो. कोणत्या उपदेशापलीकडची दोन लोकांची जीवनगाथा होती ही. मी पप्पांचा वाढीस लागलेला मुलगा हा विचार करत होतो की ह्या सगळ्यात कुठेतरी विषयवासना किंवा फक्त सेक्शुअल डिजायर ची झलक तर दिसत नाही. इथे फक्त दिसत आहे तर तो आहे…. दोन व्यक्तींचा आपापसातील ताळमेळ, कटिबद्धता. ही एकप्रकारे पाहता दोन व्यक्तींची कंपनी होती. एक घरंदाज -खानदानी कार्पोरेशन सारख, जिचा जिवनकाल सतत पुढे सरकत राहिला. मध्ये अडथळा आणण्यासाठी कोणी नव्हतं. परिवार आणि समाज निश्चितच त्या बंधनात होते, पण त्या दोघांमध्ये कोणी नव्हतं.

पप्पांनी ‌माझी अव्यक्त भाषा समजली…. “एका स्त्री सोबत पंचावन्न वर्ष आयुष्याची भागिदारी करण काय असत, ह्याची आपण फक्त जाणीव करू शकतो. शरीराच्या गरजा तर क्षणिक असतात पण त्याव्यतिरिक्त प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक वर्षाचा, हिशेब शब्दात कसा काय व्यक्त होऊ शकतो. विनारक्ताची नाती कशी जुळली होती, त्या हजारो क्षणांची गहनता समजण्यासाठी हजारो ग्रंथाची गरज लागेल. “

पप्पा दोन मिनिटे थांबले होते. आपल्या कपाळावर दरदरून आलेल दोन थेंब हाताने पुसत सांगू लागले, ” खूप साऱ्या संकटात आम्ही एकत्र राहिलो. मंदिरात एकत्र प्रार्थना केली, एकाचवेळी एका टेबलावर कित्येक वेळा जेवतो… ब्रेकफास्ट, लंच, डिनर. ती माझ्या सोबत माझ्या कामात बरोबरीची भागिदार होती, आनंदात व दुःखात ही. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट होती की मला जाळण्याची जीवघेणी पीडा तिला सहन करावी लागली नाही. मी तिला एकट सोडू शकलो नसतो. आता जेव्हा पण मी ह्या जगातून जाईन तेव्हा मनात कुठली चिंता न बाळगता जाईन. आणि तेव्हा तिच्या सोबत घालवलेले, तिच्या शिवाय जगलेल्या क्षणांची आठवण माझ्या सोबत राहणार. उद्या, आज आणि काल च्या बाबतीत हा विचार करणच माझ्यासाठी दिलासा देणार आहे. तिच जाण ह्यासाठी एक चांगला दिवस होता. खरच मी खूप आनंदी आहे की मी तिला माझ्या हातून स्वर्गापर्यंत पोहचवल. तिच्या शिवाय फक्त मीच अपूर्ण नाही तर ह्या घरातील प्रत्येक वस्तू अपूर्ण आहे. ह्या अपूर्णतेसोबत मी जगेन, परंतु कदाचित ती जगू शकली नसती. “

अस बोलत ते दोन क्षण तिथे बसले, भोळ्याभाबड्या मुलासारख तसच हास्य चेहऱ्यावर लेवून जो आपल वचन पूर्ण करून आनंदी होतो.

मी आज त्या पतीला बघत होतो, त्याच्या आनंदाला, आनंदाच्या पाठीमागे लपलेल्या त्या दुःखाच्या गडद छायेला. त्या वडिलांना ही अपुर्णतेची जाणिव असूनही एक संपूर्णतेने परिपूर्ण होते. दुःखातून बाहेर आल्यानंतर एखाद्या पाषाण मूर्ती समान शांतता. कदाचित पप्पा आपल्या मनातील व्यथा -व दुःखाच बलिदान देऊन मुर्ता कडून अमुर्ताच्या प्रवासाकडे निघाले होते. त्यांच हे मौन आता माझ्या आत खोलवर कुठेतरी वर्णित होत होत.

पप्पा उभे राहिले. फुले हातातून खाली पडली. स्मारकावर आईचा चेहरा हसताना परावर्तित होत होता. तिचा चेहरा म्हणजे दोन किनाऱ्याचे अंतर एकजूट करणारा सेतू. घरी परतताना मी पप्पांचा हात पकडला, कदाचित आता त्यांना माझ्या सहाऱ्याची, सोबतीची खऱ्या अर्थाने गरज होती.

♥♥♥♥

मूळ हिंदी कथा : उत्सर्जन

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याग… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ त्याग… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

माझ्या पप्पांना जेव्हा -जेव्हा मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा -तेव्हा त्यांच्यापासून मी खूप लांब गेल्याच जाणवल. इतक्या दूर, जिथपर्यंत माझी पोच कधी पोचू शकत नाही. जेवढ मी माझ्या आईच्या जवळ होतो, तेवढच वडिलांपासून लांब. एक अभेद्य अशी लक्ष्मणरेषा होती, जी कधीच आम्ही दोघांनी पार करण्याचा विचार केला नाही. आई आईस ब्रेकींग चा प्रयत्न करायची. परंतु… ना कधी माझ्याकडून, व ना पप्पांच्या कडून असा उत्साह पहायला मिळाला की आमच नात सहजासहजी साकार होऊन नात्याआड येणाऱ्या भिंती तोडल्या जावू शकत.

मी हे देखील ओळखून होतो, समजून होतो, की पप्पा माझी खूप काळजी घेतात. त्यांनी आईला ताकीद देऊन ठेवली होती की माझा प्रत्येक हट्ट अथवा गरज पूर्ण कर. ह्यात पैशांची कमतरता कधीच आड आली नाही पाहिजे. माझे छंद, माझ्या प्रत्येक गरजेच्या वस्तू माझ्या जवळ असाव्यात. रोज रात्री जेव्हा मी झोपायला जाई तेव्हा कोणी तरी आल्याचा हलकासा भास होई. दरवाजाच्या बाहेरून म्हणजे उंबरठ्यावरूनच कोणीतरी आत वाकून बघून तिथूनच परत जात असे. त्या अज्ञात सावलीला मी ओळखत असे. पण ते मौन मला बोचत असे. पण बरोबर त्यानंतर आई आत येऊन माझी गादी व्यवस्थित करी, गुड नाईट बोलायची… आणि मग रात्रीच्या गडद अंधारात पुर्ण घर झोपून जायच. माझ्या सगळ्या गरजा, खाण्या-पिण्यापासून ते भावनात्मक सपोर्ट ही मला माझ्या आईकडूनच मिळत असे. म्हणूनच कदाचित ह्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर ही मी कधी महत्व दिल ‌नाही. तस पण आता मी युनिव्हर्सिटी मध्ये जात होतो. कुटंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आई तर होतीच.

पण, आता जेव्हा आई निघून गेली तेव्हा मी त्या व्यक्तीच्या बाबतीत सखोल विचार करण्यास मजबूर झालो जे माझे वडील होते. त्यांच्या व्यतिरिक्त ह्या घरात दुसर अस कोणी नव्हतं ज्याच्या सोबत मी बोलू शकत होतो. त्यांनी मला एकट वाऱ्यावर सोडून दिल होत. मी आईला आठवताना आसव गळायची आणि मी जाणूनबुजून दुर्लक्ष करायचो. अस वाटायच, जणू आई आता येईल, माझी गादी ठीक करेल आणि मी झोपून जाईन. पप्पांच घरात असण म्हणजे माझ्यासाठी घरात नसण्यासमान होत. सिमेंट आणि वाळूने बनलेल घर एक अस घर बनल होत, जिथे हसण -ओरडण तर दूर, साधे दोन-चार शब्दांच आदान प्रदान ही होण कठिण होत. मृत्यूच्या छायेत बुडालेल घर एवढ शांत होत की बाहेरून साय साय करत वाहणारी हवा भिंतींच्या सीमारेषांना, विनाकारण दरवाजे व खिडक्यांच्या हालचालींना ही रोखठोक करत होती.

मी पप्पांना वाद विवाद घालताना जरूर पाहिल पण भांडताना बघितल नव्हत. आई मला कधी -कधी जरूर सांगायची…. ” तुझ्या पप्पांना प्रेम दाखवता येत नाही. ” मी समजू शकत नव्हतो, की माझ बोट पकडून मला चालवणारा, मला खांद्यावर बसवून फिरवणारा मनुष्य, हळूहळू माझ्याशी बोलायला कचरायला का लागला? काहीतरी बोलताना नेहमी उपदेश देण्याची पप्पांची सवय मला त्यांची उपेक्षा करण्यास मजबूर करत होती. आमच्या दोघांमधील नात हळूहळू जुन्या कापडासारख फाटत दूर होत गेल.

त्या दिवशी जेव्हा आईने शेवटचे श्वास घेतले, मी धायमोकलून ‌रडलो होतो. जवळपासच्या लोकांनी तेव्हा मला खूप धीर देण्याचा प्रयत्न केला परंतु पप्पा तेव्हा देखील माझ्या जवळ आले नाहीत. एक दीर्घ श्वास घेऊन ते निघून गेले होते. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू देखील ओघळला नव्हता. आणि इकडे आईच्या जाण्याने माझ्या दुःखाला पारावार उरला नव्हता. खर सांगू, मी आतल्या आत खदखदत होतो. क्रोधाच्या अग्नित जळत होतो. ते क्षण आज देखील मला टोचणी देत राहतात. सगळ क्रिया -कर्म एकदम शांततेत झाल. मी त्यांना उदास झालेल पाहू इच्छित होतो. अस वाटत होत की ‌हा मनुष्य खोटनाट का होईना एकदा तरी खोटखोट रडू दे. दोन -चार आसव तरी आईच्या प्रेतावर झाकलेल्या त्या कोरड्या कापडावर पडू देत. ती दुसरी -तिसरी कोण नव्हे तर ती त्यांची पत्नी होती, रात्रं- दिवस ती त्यांची सतत सेवा करायची. आईसाठी नको रडू देत, कमीतकमी एकट्याने ‌आता आयुष्य घालवाव लागणार ह्या दुःखापोटी तरी रडू देत. त्यांच हे अस गप्प राहण्याचा मी कितीतरी वेगळे अर्थ लावले होते. वाईट विचांरानी तर डोक्यात गर्दी केली होती.

आमच्या दोघांमध्ये पसरलेली जीवघेणी शांतता आणखीन गडद होत निघाली होती. जेवण -खाण सगळ अशा रितीने होत होत जशी दोन मशीन विनाआवाजाची घरात चालत आहेत. काळानुसार मी जुळवून घेतल. आईच्या इच्छेनुसार ‌मी माझ सगळ लक्ष शिक्षणात घालू लागलो.

एक महिना यंत्रवत संपून गेला. आजच्याच दिवशी आई आम्हाला सोडून गेली होती. आईच्या आठवणीत दुःखी व आळसावलेली पहाट उजाडली. पहाटे – पहाटेच एक गंभीर आवाज ऐकू आला… ” आईच्या स्मारकावर ‌फुल वाहण्यासाठी तू माझ्या ‌सोबत येणार का?”

“हो”

“नाही” अस म्हणू शकलो नाही. जायच काय ते तर मी एकटा ही जाऊ शकलो असतो. परंतु आईला दाखविण्यासाठी पप्पां सोबत जायच होत. बाप व मुलगा सोबत तिच्या जवळ आलीत की तिला खूप आनंद होईल. आणि आज जेव्हा आईच्या स्मारकावर फूल वाहत होते तर ते हसत होते. ते पाहून माझ मन अगदी व्याकूळ झाल. इतक्या दिवसांपासून आत साचलेला राग एकदम उफाळून बाहेर आला…. “पप्पा तुम्ही आईच्या जाण्यान आनंदी आहात!” 

“हो, बाळा मी खूप आनंदी आहे. “

मी तिरस्काराने त्यांना पाहू लागलो. नाकपुड्या आपोआप फुलून आल्या. त्यांच्या ह्या वक्तव्यावर माझ्या शरीरातला प्रत्यांग क्रोधाग्निने पेटून उठला. त्यांना ते समजल आणि म्हणाले,…. ” मी ह्यासाठी आनंदी आहे कारण मी तुझ्या आईवर जीवापाड प्रेम करायचो आणि मी हे कदापि सहन करु शकलो नसतो…. की आज तिच्या जाण्यान जे दुःख मी सहन करतोय ते दुःख, ती तळमळ माझ्या जाण्याने तिला सहन करावी लागली असती.

– क्रमशः भाग पहिला.

मूळ हिंदी कथा : उत्सर्जन

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कृष्णा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “कृष्णा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

पहिली नोकरी लागली, ती पुण्यात. सरकारी नोकरी. नवा गाव. रहायची जागा नव्हती.

बाबांचे एक मित्र होते… आप्पा कुळकर्णी. नारायण पेठेत, त्यांचा भलामोठा वाडा होता.

बाबांनी चिठ्ठी दिली. मी बॅग घेवून आप्पांच्या घरी. शब्दाला किंमत असायची तेव्हा.

आप्पांनी चिठ्ठी वाचली. प्रसन्न हसले.

“वेळेवर आलास. कालच डोईफोड्यांची जागा रिकामी झालीय. तीन खोल्या आहेत ऐसपैस.

रहा निवांत. बापुसास सांग तुझ्या, आप्पाने आठवण काढलीय म्हणोन. “

जगी सर्व सुखी.. मीच होतो. सहज जागा मिळाली. सोन्यासारखी जागा. सोन्यासारखी माणसं.

भरपूर जागा. वाड्यात सहज रूळलो. प्रत्येक घराची दारे उघडी. साधी माणसं… आपली माणसं.

मनात घर करून राहणारी… 

वाड्यात तीन चार बिऱ्हाडं होती. आणि मालक… मालक, मालकांसारखे वागलेच नाहीत कधी.

सगळं एक कुटुंब. वाड्याला भला मोठ्ठा दरवाजा. डाव्या बाजूला तीन बिऱ्हाडं… उजव्या बाजूला मालक आणि आणखीन एक. दरवाज्यासमोर एक छोटंसं मंदिर. राधाकृष्णाचं. दरवाजातून थेट दिसायचं.

मंदिराशेजारी प्राजक्त आणि सोनचाफा… मध्यभागी भलं मोठ्ठं आंगण.

माझा नोकरीचा पहिला दिवस. आप्पांच्या पाया पडलो.

राधाकृष्णाच्या मंदिरात. ‘ परमेश्वरा, अशीच कृपा राहू देत. ‘

मंद उदबत्तीचा वास. मूर्तीला प्राजक्त आणि सोनचाफ्याचा हार घातलेला… समईची स्थिर ज्योत.

मंद उजेडात देवाकडे बघितलं… मनोभावे हात जोडले.

आणि..

देव हसला. खरंच. मला तरी तसंच वाटलं. वाटलं, देव पाठीशी आहे. सगळं व्यवस्थित होणार.

मी निघालो.

“अहो देवा… प्रसाद तरी घेवून जावा. अंगारा लावा कपाळी. “

कृष्णाशी माझी पहिली भेट.

…. वाड्यातल्या मूळ पुरूषानं स्थापिलेला हा देव. कृष्णा या मंदिराचा पुजारी.

मूळ कोकणातला. मालकांनी येथे आणलेला. साधारण माझ्याच वयाचा. मंदिराशेजारीच दोन खोल्यांची जागा दिलेली त्याला. लहान वयात सरकारी नोकरी लागली, म्हणून वाड्याला माझं फार कौतुक. कृष्णालाही तितकंच..

कृष्णा पळतपळत मंदिराबाहेर आला. प्रसाद दिला. कपाळी अंगारा लावला. मनापासून आशीर्वाद दिला.

खूप छान वाटलं….. पहिला दिवस आनंदात गेला.

हळूहळू नोकरीत रमलो. ऑफीसमधून घरी आलो की, फारसं काम नसायचं. वाड्यातल्या पोरांना गोळा करायचो. मंदिराच्या छोट्या गाभाऱ्यात बसायचो. अभ्यास घ्यायचो. अगदी स्कॉलरशीपचाही. कविता पाठ करून घ्यायचो. इंग्लिश पेपर वाचून घ्यायचो. कृष्णाबरोबर शुभंकरोती… शेजारती… प्रसाद.

खरं तर खाणावळ लावलेली. सकाळी तिथंच जेवून, ऑफीसला जायचो. रात्री तिथं जेवायचा कंटाळा यायचा. तशी वेळही फार यायची नाही. कुठल्या तरी बिऱ्हाडातनं बोलावणं यायचंच.

“आज रात्री, आमच्याकडे जेवायला यायचं बरं का !”.

मला तेच हवं असायचं. वार लावल्यासारखा, वाड्यात प्रत्येक बिऱ्हाडी जेवायचो.

कधी कधी कृष्णाकडेही. कृष्णाकडचा मेनू एकच… मु. डा. खि… लोणचं, पापड आणि ताक.

पण अमृताची चव. जोडीला कृष्णाच्या गप्पा. मन आणि पोट भरून जायचं.

कृष्णाला माझं फार कौतुक वाटायचं. माझं ‘कौस्तुभ’ नाव त्याला जड वाटायचं. तो मला कौतुक म्हणायचा.

सगळ्या पोरांचा मी कौतुकदादा झालेलो. मला आवडायचं.

हळू हळू कृष्णाविषयी समजत गेलं. लहानपणी आई गेलेली. भिक्षुकाचं घराणं… पंधराव्या वर्षी वडिलही गेले… तोवर पोटापुरती पूजा सांगता यायची. पंचांग पहाता यायचं. मूहूर्त काढून देता यायचा. मालकांच्या नात्यातला. मालकांनी येथे आणला. मंदिराला पुजारी मिळाला. रहायला जागा. पुरेसा पगार.

कृष्णा सुखात होता. सुखातच राहिला… पुढे मागे कोणी नाही. तरीही सगळ्या वाड्यासाठी, कृष्णा देवाईतकाच मोठा होता. देवाकडे जायचा रस्ता व्हाया कृष्णा जायचा.

मला बढती मिळाली. कृष्णाकरवी देवाला अभिषेक करविला. कृष्णा मनापासून खूष.

जांभळ्या रंगाचे कद… खांद्यावर उपरणे… गळ्यात जानवं… कानात भिकबाळी. पाठ आणि पोट एकत्र आलेले. तरीही काटक… तोंडी हरिनाम….. कृष्णा देव आणि आमच्यामधला दुवा वाटायचा.

परीक्षेचा सीझन… कृष्णाची विशेष पूजा. सगळ्या पोरांना धो धो मार्क. पोरं अभ्यासू खरी.

पण कृपा, आशीर्वादाचं डिपार्टमेंट, कृष्णा सांभाळायचा.

मालकांचा तन्मय… त्याला झालेला ऍक्सीडेन्ट. तो सिरीयस.. आय. सी. यू. मध्ये.

कृष्णाच्या डोळ्याला डोळा नाही. दोन दिवस मंदिरात कोंडून घेतलं स्वतःला. तो शुद्धीवर आला.

मालक धावत धावत मंदिरात आले. कृष्णाला मिठी मारली. कृष्णा अश्रूंच्या घनडोहात बुडाला.

मला बढत्या मिळत गेल्या. क्वार्टर्स मिळाले. वाडा सोडणार होतो. सगळ्यांना भेटलो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी. निरोप घेताना गलबललो. तरीही वाड्यात चक्कर व्हायची.

माझ्या लग्नाचा मुहूर्त, कृष्णानेच काढून दिला. पत्रिका त्यानेच बघितल्या… हिची आणि माझीही.

आमचं छान चाललंय. कृष्णाची कृपा.. राधेकृष्णाचीही.

नुकताच रिटायर्ड झालो. मुलगाही नोकरीत आहे. मोठ्ठा बंगला बांधलाय सहकारनगरात.

एकदम कृष्णाची आठवण झाली. तडक वाड्यात गेलो. कृष्णा आता थकत चाललाय. मंदिरात जाताना सुद्धा पाय थरथरतात. मंदिरात गेलो. कृष्णा बाहेर आला. गाभाऱ्यात बसलो.

कृष्णाशी गप्पा झाल्या… निवांत … खूप दिवसांनी.

कृष्णाला म्हणलं. “बास झालं. आता रिटायर्ड हो. कुणीतरी नवीन पोरगा आणू. तुझ्याच्यानं होत नाही आता. “

कृष्णाचा चेहरा एकदम उतरला. काय बोलावं कळेना. डोळे भरून आले त्याचे. मला कसंसंच झालं.

“तू आता तिथं राहू नकोस. नव्या पोराला लागेल ती जागा. तू माझ्याकडे ये. नातू लहान आहे माझा.

त्याला अथर्वशीर्ष शिकवायचंय. तुलाच शिकवावं लागेल. “

कृष्णा गळ्यात पडून रडायलाच लागला. “नक्की शिकवेन. थकलो की नक्की तुझ्याकडेच येईन.

माझी वाट बघणारं कुणीतरी आहे, हे ऐकलं… नवं बळ मिळालं जगायला. आता हातपाय थरथरणार नाहीत माझे. “

कृष्णाने एकदम मिठी मारली

आणि मी…

माझा..

माझा एकदम सुदामा झाला.

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हार्मोनल फेन्सिंग… (अनुवादित कथा) हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हार्मोनल फेन्सिंग… (अनुवादित कथा)  हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆  भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. रसबाला कोड्यात पडल्या होत्या. त्यांच्या एकवीस वर्षाच्या करियरमध्ये अशी एकही केस आली नव्हती. ना भारतात, ना जमैकामध्ये. त्यांच्या पतीचा पोस्टिंग जमैकामध्ये झाल्यानंतर त्याही तिथे राहिल्या होता आणि जवळ जवळ सात वर्षे त्यांनी तिथे प्रॅक्टीस केली होती. कुठल्याही पेशंटशी बोलताना आत्तापर्यंत त्यांनी पावणे चार तासांपेक्षा कधीही जास्त वेळ घेतला नव्हता. आणि आता या देखण्या युवकाबरोबर चार तास बोलल्यानंतर त्या गोंधळात पडल्या होत्या, की याला पेशंट म्हणावं की न म्हणावं.. नो ही इज नॉट ए पेशंट. ही कांट बी. या पेशंटबरोबर चाललेल्या चार तास चौकशीच्या दरम्यान, त्यांनी नऊ वेळा तरी डॉ. सनालीला फोन केला होता. डॉ. सनाली त्यांची बॅचमेट होती आणि प्रत्यक्षात तीनेच ही केस रिफर केली होती. सनालीने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रसबालाकडे या युवकाला पाठवण्यापूर्वी चार-पाच वेळा स्वत:च या युवकाची तपासणी केली होती.

युवकाला असं वाटू नये, की डॉक्टरांचं एखादं रॅकेट पैसे उकळण्यासाठी त्याच्या भावनांशी खेळतय, या भीतीने सनालीने त्याच्याकडून फक्त एकाच वेळचे पैसे घेतले होते. नंतर तिच्या मनात असंही आलं की एकदा घेतलेली फीदेखील परत द्यावी. पण यामुळेदेखील त्याच्या मनात संदेह निर्माण झाला असता, म्हणून तिने सगळ्या गोष्टी रसबालाला सांगून त्याला तिचाकडे पाठवले.

त्या युवकाचा नाव सौरभ होतं. डॉ. सनालीकडे येण्यापूर्वी जवळ जवळ दोन महीने तो जिममध्ये जात होता. ही जीम सनालीच्या नर्सिंग होमच्या परिसरात होती आणि तिचे पतीच ती चालवत होते.

सौरभने जेव्हा ती जीम जॉइन केली, तेव्हा पहिले दोन आठवडे सगळं ठीक ठाक चाललं. या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच सौरभनेदेखील तिथे ठेवलेल्या उपकरणांची माहिती घेतली आणि प्रॅक्टीस सुरू केली. पण हळू हळू जीमचे संचालक, जे कोचही होते, त्यांनी नोट केलं, की सौरभ इतर मुलांप्रमाणे एक्सरसाईज करत नाहीये. त्याचे लक्ष केवळ आपली छाती फुगवण्याच्या एक्सरसाईजवर केन्द्रित झालेलं आहे.

सौरभ एका कंपनीत नोकरी करत होता. विवाहित होता. आपल्या ऑफीसनंतर बाईकवरून जिमला येत होता. वय होतं जवळ जवळ चोवीस. कोचाला वाटलं, याला बहुतेक सैन्यात किंवा पोलीसमध्ये नोकरी करायची असावी. म्हणून चेस्ट इम्प्रुमेंव्हेंटसाठी प्रयत्न करतोय. कोचने एकदा त्याला सांगितलं, ‘पळण्यासाठी मजबूत पिंढर्‍या आणि स्नायुंची मजबुती आवश्यक आहे. इकडेही लक्ष दे, नाहीतर असंतुलीत ग्रोथ होईल.

सौरभने यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो आपल्या आभ्यासाला लागला. एक दिवस मसाज करणारा मुलगा संचालकांना म्हणाला की हा सौरभ लेडीज क्रीमने मसाज करण्यावर जोर देतोय. तेव्हा त्यांचं डोकं ठणकलं. त्यांना नंतर असंही कळलं, की महिलांसाठीची ही महाग क्रीम सौरभ स्वत:च विकत आणून देतो. संचालकांनी एकदा सौरभला आपली डॉक्टर पत्नी सनालीला भेटायला सांगितलं. तिने सौरभची इच्छा जाणून त्याला हार्मोन ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. तिने सौरभला सांगितले, की कधी कधी मुलांच्या शरिरात हार्मोन्सच्या असुंतलनामुळे मुलींसारखा लुक आणि इच्छा दिसू लागतात. त्यामुळे त्याला औषधे आणि इंजक्शन्स घेऊन आपले शरीर पुष्ट करायला हवे. पण तिला जेव्हा कळले, की सौरभ स्वत:च आपली छाती महिलांप्रमाणे वाढवू इच्छितो, तेव्हा ती थक्क झाली.

तिने सौरभला वक्ष वाढवणारी औषधे आणि इंजक्शन्स दिले, मात्र तिच्या मनाला ही गोष्ट पटली नाही. अखेर ती डॉक्टर होती. तिला वाटलं आपल्या पेशाची जबाबदारी यापेक्षा किती तरी मोठी आहे. एका रोग्याला एका रोगातून बाहेर काढून दुसर्‍या रोगाकडे जाणून बुजून ढकलण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही. त्यांनी सौरभला समजावलं की त्याने आपल्या व्यक्तिमत्वाशी असे खेळ करू नयेत. तो चांगल्या उंचीचा – बांध्याचा, चांगल्या परिवारातला स्वस्थ युवक आहे. तो का आपली छाती बायकांप्रमाणे वाढवू इच्छितो? मुलं जेव्हा छाती वाढवतात, तेव्हा सार्‍या शरीराची मजबुती आणि स्वास्थ्य इकडे लक्ष देतात कारण त्यांना सेना, पोलीस यासारख्या सुरक्षेसंबंधीच्या सेवाकार्यात जायचे असते. छत्तीस इंच छाती पुरुषोचित पद्धतीने वाढलेलीच चांगली दिसते. त्याबरोबर पुरं शरीर तंदुरुस्त वाटू लागतं.

डॉक्टर सनाली म्हणाली, ‘आपल्याला माहीत आहे शरीरातील हार्मोनल गडबडीमुळे ज्या युवकांची छाती आशा पद्धतीने वाढते, त्यांना किती शरम वाटते. घट्ट कपडे घालून ते ती लपवण्याचा प्रयत्न करतात. ’

सौरभ काहीच बोलला नाही, पण त्याने असाही संकेतही दिला नाही की डोक्टरांचं बोलणं त्याला समजलय आणि तो त्याच्याशी सहमत आहे. डॉक्टरांनी ही गोष्ट निसर्गाचा प्रकोप आहे, असं मानलं. तिला आठवलं मागे एकदा एक पोलीस अधिकारी बघता बघता स्त्रीची वेशभूषा धारण करून तिच्याप्रमाणे वागू लागला होता. शरिराची ही विचित्र माया कुणाला कळणार? त्यांनी सौरभला अनुभवी मनोचिकित्सक डॉ. रसबालाकडे पाठवलं. एका युवकाला जाणून बुजून आजारी मानसिकतेच्या रस्त्याने जाऊ दिलं, या अपराधबोधाचं ओझं ती वागवू इच्छित नव्हती.

डॉ. रसबालाला हे ऐकून आश्चर्य वाटलं, की तो आई – वडलांच्या बरोबर रहातोय आणि त्याला एक दीड वर्षाची मुलगी आहे. त्याच्या पत्नीबद्दल विचारताच तो एकाएकी गप्प बसला. त्याचे डोळे भिजलेल्या हिर्‍याप्रमाणे चमकून सजल होऊ लागले.

‘इज शी नो मोअर…. ’ डॉटरांनी विचारले.

…………..

‘हं… बोला ‘

‘गेल्या वर्षी एका दुर्घटनेत ती गेली. माझे आई-वडील माझा दूसरा विवाह करू इच्छितात. पण मी माझ्या मुलीचं पालन पोषण करू इच्छितो. ’ सौरभ म्हणाला.

‘मग आई-वडीलांचं ऐका. ते बरोबर बोलताहेत. ’

‘पण मी माझ्या मुलीला काहीच नकली किंवा दुय्यम दर्जाचं दिलेलं नाही. जर मी तिला योग्य आई देऊ शकलो नाही, तर माझी दिवंगत पत्नी मला मुळीच माफ करणार नाही. ’

डॉ. रसबाला म्हणाली, पण यासाठी आणखीही मार्ग आहेत. तुम्ही विवाह करू नका. मुलीचं पालन पोषण करा. तिला शिकवा, पण तुम्ही आपली पर्सनॅलिटी का बादलू इच्छिता?… इट्स स्ट्रेंज… ’

‘आपल्याला माहीत नाही डॉक्टर, रात्री माझी मुलगी माझ्याजवळ झोपते. झोपेत प्रेमाने ती आपला हात माझ्या छातीवर ठेवते. त्यावेळी मला स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण…. ’

‘पण काय?’ डॉ. रसबालाने विचारलं.

‘पण कधी कधी ती झोपेत अतिशय घाबरते. माझ्या छातीवर हात ठेवताच कधी कधी तिला याची जाणीव होते की तिची आई तिच्याबरोबर नाही. ती घाबरते आणि झोपेत ती माझ्यापासून दूर जाते. मी तिच्या भावी जीवनासाठी तिच्या मनात एक हार्मोनल फेंसिंग बनवू देऊ इच्छितो. एक कुंपण, जिच्या आत ती स्वत:ला सुरक्षित समजेल……

डॉ. रसबाला आपल्या सीटवरून उठली आणि तिने सौरभला हृदयाशी धरले आणि दुसरीकडे तोंड फिरवून रुमालाने आपले डोळे टिपले.

सौरभ जेव्हा केबीनचं दार उघडून वेगाने बाहेर पडला, तेव्हा बाहेर बसलेला सहाय्यक हे पाहून आश्चर्याने थक्क झाला, की चार तास डॉक्टरांकडून इलाज करून घेऊन, पैसे न देताच हा माणूस निघून जातोय आणि डॉक्टरांनी निळा दिवा लावला नाही, जो डॉक्टर नेहमी फी घेण्यासाठी संकेताच्या स्वरुपात लावतात.

मूळ हिन्दी कथा – ’हार्मोनल फेंसिंग‘

मूळ लेखक – श्री प्रबोध कुमार गोविल

मो. 9414028938

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ V. R. S. ची किमया… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ V. R. S. ची किमया…☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

जय माता की.. अंबामाताकी जय.. दुर्गामाताकी जय…

बाल्कनीत उभा राहून मी रस्त्यावरची मिरवणूक पहात होतो. नवरात्र चालू होतं. दररोजच रात्री अशा छोट्या मोठ्या मिरवणुकीने लोक टेकडीवरच्या देवीच्या दर्शनाला जातात.

आज का कोण जाणे, पण हा देवीचा जयजयकार ऐकून, मला आमच्या शाखेतल्या श्री. मानमोडे साहेबांची एकदम आठवण झाली. काहीही कारण नसताना.

अगदीच काही कारण नाही असंही म्हणता येणार नाही म्हणा. त्याचं काय आहे की, हे आमचे मानमोडे साहेब, वय ५४ वर्षे ७ महिने, हे आमच्या शाखेतले एक जबाबदार अधिकारी. अतिशय साधे, शांत, सज्जन, पापभिरू, आनंदी गृहस्थ. गेली ३१ वर्षे, अगदी मनापासून नोकरी करत आलेले.. काळाच्या ओघात मिळत गेली ती प्रमोशन्स स्वीकारत आता डेप्युटी मॅनेजर पदापर्यंत पोहोचलेले…

दर गुरुवारी बँकेतल्या दत्ताच्या फोटोला, चतुर्थीला गणपतीच्या फोटोला हार आणि नैवेद्याला नारळ मानमोडे साहेबांचाच, हा जणू Book of Instructions मधला भाग, एवढे हे देवभक्त. अगदी टेबलाच्या ड्रॉवरमध्येही देवादिकांचे छोटे फोटो कायम ठेवलेले, अगदी सहज दिसतील असे. त्या देवाच्या कृपेनेच आत्तापर्यंत सर्व आलबेल आहे ही त्यांची गाढ श्रध्दा.

असं सगळं अगदी व्यवस्थित शांतपणे चालू होतं. आणि अचानक बँकेत एक झंझावात आला. V. R. S. नावाचा… अधिकाऱ्यांसाठी वय वर्षे ५५ च्या पुढे असण्याची अट होती. त्याचे फायदे, तोटे, घरच्या गरजा, सर्वांचा आपापल्या परीने सारासार विचार करून अनेकांनी त्यासाठी अर्ज केले. मानमोडेसाहेबही त्यात होते.

सर्वांची सहनशक्ती पुरेशी ताणून झाल्यावर, बँकेने retire होणा-या लोकांची यादी जाहीर केली. पण इथे मात्र देवाने मानमोड्यांची प्रार्थना कबूल केली नाही. जन्मायला काही महिने उशीर केल्याचे कारण देवून त्यांचा अर्ज reject झाला. आणि ते retire होऊ शकले नाहीत.

आणि इथूनच बँकेतल्या वातावरणाला, प्रत्येकाच्या कामाला, कामाच्या ताणाला वेगळंच परिमाण मिळालं. आमच्या शाखेतले ११ पैकी ७ अधिकारी V. R. S. मध्ये निवृत्त झाले. सुखाने-आनंदाने- बरंच मोठं डबोलं घेऊन घरी गेले. आणि कामाचं डबोलं मात्र इतरांच्या डोक्यावर अलगद ठेवून गेले. आधी एक नवीन आव्हान म्हणून.. किंवा खरं तर दुसरा काही पर्यायच नाही म्हणून, राहिलेल्यांना काम करणं भागच होतं. काळ हेच सर्वांवर औषध या नियमाने, राहिलेल्या लोकांमध्येच कामकाजाची घडी बसवावीच लागत होती. हळूहळू सगळेच जण या बदलालाही सरावले. इतके की, काही बदललंय हेही विस्मरणात जावं लागलं.

पण आमचे मानमोडे मात्र हळूहळू जणू आमूलाग्र बदलू लागले. शारीरिक कुवतीपेक्षा खूपच जास्त काम करावं लागत होतं त्यांना. त्यांच्या आवडत्या देव-देवतांसाठीही त्यांना पुरेसा वेळ देता येईनासा झाला त्यांना. ते सतत अस्वस्थ वाटू लागले. हळूहळू शरीरही त्रास देऊ लागले. सर्व अवयव आपले महत्त्व पटवून देऊ लागले. मानदुखी, पाठदुखी, बी. पी. आणि काय काय… रोज नवीन नवीन भेटीगाठी होऊ लागल्या. डॉक्टरांकडचे हेलपाटे वाढले.

आणि काही दिवसातच, V. R. S. मुळे झालेल्या बदलानेही तोंडात बोट घालावे असा एक आश्चर्यकारक बदल आमच्या मानमोडेसाहेबांमध्ये झालेला दिसू लागला. ड्रॉवरमधल्या देवांच्या फोटोंवर हळूहळू गोळ्यांच्या स्ट्रिप्स साठत होत्या. वाढत होत्या. आता देव पूर्ण झाकले गेले. मानमोडे वारंवार सगळ्या गोळ्या, मलमं जागेवर आहेत की नाही पाहू लागले. जणू नाही पाहिलं तर अचानक लुप्त होतील ती. हळूहळू तर, पूर्वी देवाला करायचे, तसा त्या औषधांनाच येता-जाता नमस्कार करू लागले ते. इकडे देवांच्या फोटोंचे हार पार वाळून वाळून गेले. प्रसाद-बिसाद तर लांबच. मानमोड्यांच्या डोक्यावर काही परिणाम वगैर तर झाला नाही ना अशी कुशंका भेडसावू लागली आम्हाला ! नाही म्हटलं तरी, आम्हा सर्वांचा, आमच्याही नकळत जीव होता ना त्यांच्यावर !

शेवटी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंच की त्यांच्याशी बोलायचं. त्यांना मन मोकळं करायला लावायचंच. आणि एका शनिवारी आम्ही ३-४ जण काही ना काही निमित्त काढून त्यांच्या टेबलाशी जमलो. काम उरकत आणल्याने मानमोडेही जरा relaxed वाटत होते.

आणि आम्ही बोलता बोलता विषय काढला. आमची काळजी बोलून दाखवली. विचारू लागलो की ते एवढे बदललेत कसे? का? त्यांची देवभक्ती गेली कुठे? देवांची जागा औषधांनी घेऊन सुध्दा, ते परत पूर्वीसारखे शांत कसे वाटायला लागलेत हल्ली? ते मनाने तर खचले नाहीत ना? देवावरचा त्यांचा विश्वास तर उडला नाही ना? तसं असेल तर हे सगळं कशामुळे? V. R. S. मध्ये नाव नाही म्हणून? की दुप्पट तिप्पट काम पडतंय ते झेपत नाहीये म्हणून? की अनेक शारीरिक व्याधी साथीला आल्यात म्हणून?

आम्ही आमची खंत बोलून दाखविली मात्र, मानमोडे जोरजोरात हसायलाच लागले. आम्ही नुसतेच एकमेकांकडे बघत राहिलो. हसणं थांबल्यावर साहेब शांतपणे पण आत्मविश्वासपूर्ण बोलू लागले…

‘‘अरे, तुम्हाला माझी इतकी काळजी वाटते हे पाहून माझं मन अगदी भरून आलंय. आता मला सांगावंच लागेल तुम्हाला सगळं…” आम्ही जिवाचे कान करून ऐकू लागलो.

‘‘काही दिवसांपूर्वी मला साक्षात्कार झाला. असे दचकू नका. स्वप्नात येऊन देव बोलला माझ्याशी स्वत:! अहो खरंच. आमच्या बोलण्याचा सारांश सांगू का तुम्हाला? ऐका. आपण पूर्वीपासून ऐकत आलोय ना की देव वेगळ्यावेगळ्या रूपात आपल्या भक्तांच्या हाकेला धावतो ते. एकनाथांसाठी तो श्रीखंड्या झाला. जनीबरोबर दळणं दळली त्याने. कबिराचे शेले विणले. अरे पण या कलियुगात भक्तांच्या हाका इतक्या वाढल्या की देव जरी झाला तरी किती रुपं घेणार तो? नाही का! सांगा की. मग त्यानं अशी वेगवेगळी रुपं घ्यायचं आणि माणूस म्हणून भक्तांना मदत करण्याचं थांबवलंच आहे आताशा. निदान क्षुल्लक गोष्टींसाठी कुणी धावा करत असेल तर तो स्वत: नाहीच धावून येऊ शकणार यापुढे. अरे, असं आSSS वासून काय पहाताय माझ्याकडे? खरंच सांगतोय मी. आता माझंच उदाहरण घ्या ना. मी पूर्वीसारखा देवभक्त राहिलो नाही असं वाटतंय ना तुम्हाला? पण तसं काही नाहीये रे! मी पूर्वीचाच आहे. तसाच देवभक्तही आहे. फक्त देवाचं रूप बदललंय हे माझ्या लक्षात आलंय आणि तुम्हाला वाटतंय की मी बदललोय. ”

आता मात्र आम्ही पारच बुचकळ्यात पडलो. मानमोड्यांना भ्रम तर झाला नाही ना ही आमच्या मनातली शंका बहुदा आमच्या चेहे-यावर दिसत असावी. कारण आम्हालाच समजावत मानमोडे साहेब पुढे बोलू लागले… ‘‘अरे खरंच सांगतो मी नाही बदललो. पण माझ्या देवाचं रूप मात्र बदललंय ! या नव्या रूपात देव क्षणोक्षणी माझ्या हाकेला धावून येतोय. म्हणून मी निश्चिंत आहे आता. नाही ना कळत? अरे असे घाबरू नका. मी पूर्ण शुध्दीवर आहे म्हटलं. थांबा, आता मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो सविस्तर…”

आता साहेब जरासे सावरून बसले आणि आम्हालाच भांबावल्यासारखं वाटायला लागलं. आम्ही ऐकू लागलो…

‘‘असं पहा, गेल्या ५-६ महिन्यांपासून, माझं मानमोडे नाव सार्थ व्हावं या सद्हेतूने, खरंच माझी मान मोडेपर्यंत बँक मला कामाला लावतीये! पण माझी त्याबद्दल तक्रार नाही. हल्ली वरचेवर पाठ, कंबर दुखते. पण तरीही माझी तक्रार नाही. इतकंच काय, अहो तीन तीन assignments सांभाळता सांभाळता माझं बी. पी. ही वाढू लागलंय, रोज डोकंही दुखतंय. पण तरी मी चिंता करत नाही. अधूनमधून साखर वाढते, छातीचे ठोके अनियमित होतात पण तरीही मी.. माझं मन शांत रहातं ! का? कारण मला साक्षात्कार झालाय ना! अहो कसला काय? थोडं डोकं चालवा कधी तरी! अरे आता माणसांमध्ये देव शोधण्याचे दिवस नाही राहिले पूर्वीचे. आता देव निर्जीव वस्तूंच्या रूपानेही भेटतो म्हटलं ! सतत, आणि पूर्वीपेक्षा जास्त वेळा भेटतो मला तर तो. कुठे? अहो कुठे काय? त्याची किती रूपं गच्च भरलीयेत माझ्या ड्रॉवरमध्ये….. या गोळ्यांच्या, मलमांच्या रूपात ! आता तरी आलं की नाही काही ध्यानात?”

ड्रॉवर पुढे ओढून मानमोड्यांनी आतल्या देवदेवतांना एक उडता नमस्कार केला आणि ते पुढे बोलू लागले…

‘‘अहो, इतके महिने, काय वाट्टेल ते झालं तरी हा कामाचा गाडा मी ओढू शकतोय तो कोणाच्या जीवावर! आं! सांगा ना, या माझ्या कलियुगीन देव-देवतांचा तर धावाही नाही करावा लागत. उलट माझ्या दिमतीलाच जणू ते तयारच आहेत माझ्या ड्रॉवरमध्ये. या औषधांच्या रूपात! मग आता मला कसली काळजी? आता आणखी परत V. R. S. येऊ दे, परत त्यात मी reject होऊ दे. काही problem नाही. काम सहापट वाढू दे. No problem at all, कितीही काम पडू दे, कितीही दुखणी येऊ देत. चिंता नाही. माझा हा देव माझ्या मदतीला already धावून आलेलाच आहे. आणि सर्व संचारी आहे ना तो! माझ्या ड्रॉवरमध्ये राहतोय, माझ्या बॅगेत रहातोय. घरातल्या औषधाच्या पेटीत तर रहातोयच – अगदी ‘घरजमाई’ असल्यासारखा. आणि हो, माझ्या original देवात आणि माझ्यात आणखी एक गुपीत आहे बरं का! पण आता सांगूनच टाकतो तुम्हाला…

त्या देवाने मला promise केलंय, की जेव्हा मी त्याच्या या वर्तमानरूपांना कंटाळेन ना तेव्हा तो स्वत: येऊन, अगदी गुपचुप मला त्याच्या घरी घेऊन जाईल. मी जेथे असेन तेथून, अगदी on duty असलो तरीही. आणि अगदी या कानाचं त्या कानालाही कळू न देता… तेव्हा आता बोला. आणखी काय पाहिजे मला. तेव्हा हे पहा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी पूर्वीसारखाच आता शांत आहे, आनंदी आहे आणि हो, देवभक्तही आहे. पटली ना खात्री?”

हे इतकं सगळं ऐकून बहुधा आम्हालाही जाणवलं की, अरेच्चा, असं असेल, तर मग आपल्यालाही भेटतोच आहे की देव अधून मधून, या नव्या रूपात !

आमच्या चेहे-यावरचे झरझर बदलणारे भाव आणि नकळत ‘हो-हो’ म्हणणारी आमची हलती मान पाहून मानमोडे खूष झाले. त्यांच्या या देवाला आणखी भक्त मिळाले, मिळतच रहाणार याची खात्री वाटण्यासारखीच परिस्थिती होती ना !

आमच्या या असल्या अवस्थेत, मग हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवून, मानमोडे साहेबांनी जणू order च सोडली. हं, आता म्हणा माझ्या बरोबर…

मान दुखतेय? जय moov… जय Voreran

डोकं दुखतंय? जय जय झंडू बाम… जय डिस्प्रिन…

पाठ दुखतेय? जय ब्रूफेन

ताप आलाय? जय क्रोसीन

बी. पी. वाढतंय? जय जय स्टॅमलो… जय कार्डोज

साखर वाढली? जय इन्सुलिन, जय जय Glynase 

पित्त वाढलं? जय जय जेल्युसिल, जय भोले सूतशेखर

कंबरदुखी? जय जय लम्ब्रील

आणि हो… विसरू नका…

देवाची ही इतकी रूपं एकाचवेळी अनुभवण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल…

बोला V. R. S. की जय…

स्टेट बँक माता की जय…

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दत्तू… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ दत्तू… ☆ श्री सुनील शिरवाडकर

दत्तुला मी पहिल्यांदा पाहिलं ते कसारा लोकल मध्ये. ढगळ पॅंट.. कधीकाळी ती चॉकलेटी रंगाची असावी.. पण आता विटलेली.. पांढरा मळका शर्ट.. पायात चपला.. उंच.. शिडशिडीत अंगयष्टी.. तांबुस गोरा रंग.. दोन तीन दिवसाची दाढी वाढलेली.. दरवाज्याशीच उभा होता तो. पाठीवर सॅक.. पायाशी दोन तीन पिशव्या.

संध्याकाळची वेळ होती, साहजिकच ट्रेन गच्च भरली होती. मी मुंबईहून येत होतो. आसनगाव स्टेशन जवळ आलं.. उतरणारे दरवाजा पाशी गोळा झाले. त्या गर्दीत दत्तु होता.. अर्थात त्या वेळी मी त्याला ओळखत नव्हतो. दत्तु जवळ खुप सामान होतं. त्या गर्दीतून सामानासकट बाहेर पडणं म्हणजे तसं कठीणच. ‌त्याच्या त्या सामाना मुळे बाकीचे प्रवासी चिडचिड करत होते.. त्याला शिव्या घालत होते.. पण दत्तुला त्याची सवय असावी. त्याचं त्या लोकांकडे लक्षच नव्हतं.

स्टेशन आलं. प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर दत्तुही बाहेर प्लॅटफॉर्मवर फेकला गेला.. त्याच्या सामानासकट. पण एक पिशवी आतच राहीली.. तो गाडीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, पण लोकल सुटली. ती पिशवी आतच राहीली.

नंतर कधीतरी असंच मुंबईहून येताना तो दिसला. त्या दिवशीच्या घटनेनं तो लक्षात राहीला होता. आणि आज तर तो शेजारीच होता. तश्याच पिशव्या घेऊन. त्याला मी विचारलं.. त्या दिवशी लोकलमध्ये राहीलेल्या पिशव्या मिळाल्या का?

तर नाही.. असं होतं म्हणे कधी कधी. ती गोष्ट त्याने हसण्यावारी नेली. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. दत्तुचं छोटंसं किराणा दुकान होतं आसनगावात. दत्तु पाच वर्षाचा असतांनाच त्यांचे वडील गेले. आई आणि दत्तु उघड्यावर पडले. चार घरचे धुणे भांडी करुन आई बिचारी संसाराचा गाडा ओढत राहीली.

दत्तु शाळेत जात होता, पण अभ्यासात जेमतेमच. दहा बारा वर्षाचा असतांनाच शाळा सुटली. एका किराणा दुकानात काम करायला लागला. झुंबरशेठचं हे किराणा दुकान स्टेशन रोडवरच होतं. सकाळी आठ पासुनच उघडायचं.. ते रात्री नऊ पर्यंत. एवढा पुर्ण वेळ दत्तु त्या दुकानात असायचा. सकाळी साफसफाई करण्यापासून त्याचं काम सुरु व्हायचं.

गेली चाळीस वर्षे दत्तु त्या दुकानात काम करत होता. तसा आता तो दुकानाचा मालकच झाला होता. कारण झुंबरशेठला मुलंबाळं नव्हती. चार पाच वर्षांपूर्वी झुंबरशेठ गेले, आणि दत्तु दुकानाचा मालक झाला. त्या दिवशी ट्रेनमध्ये आमची ओळख झाली. मग ट्रेनमध्येच वरचेवर भेटी होत गेल्या.

तो नेहमी त्याच्या दुकानात बोलवायचा. पण मी टाळायचो. आसनगावला उतरायचं.. त्याच्या दुकानात जायचं.. पुन्हा कसारा लोकल पकडायची.. हे नकोसं होतं.

पण किती वेळा टाळणार ना! एकदा आसनगावला उतरलो, आणि त्याच्या दुकानात गेलो. दुकान छोटंसं होतं, पण गिर्हाइकं चांगली होती. दत्तुला बोलायला फारसा वेळ मिळाला नाही.

तेवढ्या वेळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली. कितीतरी किरकोळ गिर्हाइकं उधारीवर माल नेत होते.

“मांडुन ठेवा दत्तु भाऊ”

असं म्हणून सामान घेऊन जात होती. पण दत्तु ती उधारी कुठेच लिहुन ठेवत नव्हता. मला आश्चर्य वाटलं. मधुन जेव्हा त्याला उसंत मिळाली, तेव्हा मी त्याला विचारलंच.

“दत्तु.. तु उधारी कुठेच लिहून ठेवली नाही.. हे सगळं लक्षात बरं रहातं तुझ्या. “

“देतात हो आणुन लोकं. आणि जरी नाही आणुन दिली उधारी.. बुडवले माझे पैसे.. मला काही वाटत नाही”

“असं कसं?”

“काय होतं माझ्याजवळ एकेकाळी? दिले.. दिले.. नाही दिले.. नाही दिले. मी नाही विचार करत. जे राहील ते आपलं. “

दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हाच दत्तुचा स्वभाव होता. वास्तविक त्यालाही संसार होता.. बायको होती, एक मुलगा होता. पण दत्तु म्हणायचा..

“पोटापुरतं मिळतंय ना ! बस्स.. “

तेवढ्यात एकजण बारीक तोंड करून दत्तुच्या दुकानात आला.

“दत्तु भाऊ.. पोराच्या उलट्या थांबतच नाही ओ.. “

“मीठ पाणी द्यायला सांगितलं ना तुला?

“दिलं वं.. सगळं केलं.. “

दत्तुने आतल्या खोलीत डोकावून बायकोला हाक मारली..

“सुमे.. जरा वेळ बस.. आलोच मी.. “

आणि घाईघाईत तो त्या माणसासोबत निघून गेला. त्याची बायको दुकानात आली. मी तिला विचारलं..

“आता हा दत्तु तिथं जाऊन काय करणार?”

“हे असंच असतं त्यांचं.. दुकानात बुड काही ठरत नाही.. आता ते त्या पोराला दवाखान्यात घेऊन जातील.. सलाईन बिलाईन.. औषधं.. सगळं मार्गी लावतील.. आणि मगच दुकान आठवेल त्यांना. “

दत्तुला यायला बराच वेळ लागणार.. म्हणून मग मी त्याच्या बायकोचा निरोप घेऊन निघालो.

दुकानातील माल आणण्यासाठी दत्तु वरचेवर मुंबईला जायचा. अनेकांची मुंबईत कामं असायची. ते लोक बेलाशक दत्तुला सांगायचे.. दत्तु, येताना हे आणि.. ते आण.. आणि दत्तूही त्यांची ती कामं करायचा.

दत्तुचा माझा परीचय वाढला.. त्याला भेटलं की मला पु. लं. चा परोपकारी गंपु आठवायचा. गंपु जसा उठसूठ याला त्याला सल्ले द्यायचा.. तसंच दत्तुचं. मुंबईला तो वरचेवर जायचा. त्यामुळे साहजिकच एक जाणतेपण त्याच्याकडे आलं होतं. गावात कुणाकडे लग्न निघालं की दत्तुची धावपळ बघावी.

मंगल कार्यालयाच्या बुकिंग पासुन दत्तुचं मार्गदर्शन सुरु व्हायचं. केटरर कोणता निवडावा.. आदल्या दिवशी काय मेनु निवडायचा.. लग्नाच्या दिवशी ताटात कोणते पदार्थ असावेत हे दत्तुचं ठरवायचा.

साड्या घ्यायच्या ना.. हं ते कल्याणचा रूपसंगम आहे ना.. तिथुनच घ्या…. शालुची खरेदी? ती मात्र दादरला करा….. असं सुचवणं चालू व्हायचं.

बरं हे सगळं निरपेक्ष वृत्तीने. दुकान सोडून तास तास दुसऱ्यासाठी भटकायचा.. पण या सगळ्यात एक रुपयाची अपेक्षा त्यानं कधी ठेवली नाही. उलट आपल्या माणसाचे पैसे कसे वाचतील हीच त्याला चिंता.

आणि अशा या चिरतरुण दत्तुची पन्नाशी आली हे मला कधी कळलं.. तर त्याच्या बायकोचा फोन आल्यावर. गावातल्या लोकांनी आपल्या दत्तुचा पन्नासावा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. दत्तुला याची अजिबात कल्पना दिली नव्हती. त्याच्या बायकोला आणि मुलाला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम ठरवला होता. मला फोनवरून आमंत्रण आले.. जाणं आवश्यक होतं..

त्या दिवशी मी दत्तुची खरी श्रीमंती पाहीली. गावातले सगळ्या थरातले लोक घरचा कार्यक्रम असल्यासारखे जमले होते. स्टेजवर मोठं होर्डिंग.. त्यावर दत्तुचा फोटो.. त्याखाली गावातील कोणत्या तरी कवीने अभिष्टचिंतनाच्या चार ओळी लिहिल्या होत्या. स्पीकरवर सनई चालु होती.. मध्यमागी असलेल्या गुबगुबीत सोफ्यावर दत्तु आणि त्याच्या बायकोला बसवलं होतं. दोघांच्याही गळ्यात फुलांचे जाडजूड हार होते. दोघं बिचारे बुजुन गेले होते. लोक येत होते.. शुभेच्छा देत होते.. कोणी भेटवस्तू देत होते.. कोणी पाकिट देत होतं.. बुफेसाठी लागलेली रांग कमी होत नव्हती.. सगळीकडे आनंदीआनंद होता.

एक व्यक्ती गावासाठी काय करु शकते..

आणि गाव एखाद्या व्यक्तीसाठी काय करू शकतं..

याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ही खंत.. की सल ??… (अनुवादित कथा)  हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆  भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

ही खंत.. की सल ??… (अनुवादित कथा)  हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆  भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

नव्वद वर्षांच्या म्हातार्‍या डोळ्यात चमक आली. काठी धरून चालताना हाताला जाणवणारा कंप कमी होत गेला. ‘हे इकडे… ते तिकडे… ती ओळच्या ओळ… ’ म्हणत म्हातारा उदास हसू, हसू लागला. सुरकुतलेल्या तोंडात केवळ एकच कुदळीसारखा टोकदार पिवळट तपकिरी दात, एकछत्री राज्य करीत होता. बोलताना थुंकीचे दोन-चार शिंतोडे उडले. मुलाने कानाशी माशी उडताना जसे पंख्यासारखे हात हलवतो, तसे हात हलवले.

दूर कुठल्या तरी गावात रहाणारा तो मुलगा, सहा महिन्यापूर्वी या महालासारख्या लांब-रुंद बंगल्यात माळी म्हणून कामाला लागला होता. याच बंगल्यात याच कामासाठी त्याचे आजोबा, त्याच्यापूर्वी पन्नास वर्षे झिजले होते. पन्नास वर्षांनंतर या सेवकाची क्षीण होत चाललेली दृष्टी आणि कमकुवत होत जाणारी हाडे-फासळ्या यांनी त्याच्या शरिराला रिटायर होण्याची धमकी दिली, तेव्हा मालक मंडळींनीही त्याला माळी कामातून मुक्त केले.. पण अनेक वर्षे केलेले काम फुकट गेले नाही. त्याने विनंती करून करून आपल्या जागी आपल्या नातवाला काम द्यायला लावले होते, म्हणून आज म्हातारा, कुणा येणार्‍या – जाणार्‍या बरोबर नातवाची खबरबात घ्यायला आणि आपल्या मालकाचा उंबरठा पुजायला, आणि नातवाचा खांदा पकडून, त्या विराट बगीचाला न्याहाळायला आला होता. त्या बगीचामध्ये तो तन-मनाने, नखशिखांत खपला होता.

आपल्या नातवाला आपण केलेलं महत्वाचं काम दाखवता दाखवता, तो अगदी उत्तेजित झाला होता. कोणकोणत्या जमिनीचा त्याने कसा कायापालट केला. कोणकोणती झाडे वृक्ष लावले, कोणत्या फुलांनी मालक-मालकिणीचं मन कसं जिंकलं, कुठल्या मातीत त्याचा किती घाम जिरला, सगळं आपल्या नातवाला सांगण्यात दाखवण्यात तो मग्न झाला. मुलाचा चेहरा मात्र अगदी सपाट, भावहीन होता.

मालक मंडळी आता बंगल्यात नव्हती. नातू आपल्या खांद्याचा आधार देऊन बागेत फिरवत होता. म्हातारा आपल्या जुन्या स्मृतींच्या पोत्यातून टपकणार्‍या आठवाणी गोळा करत सांगत होता, कुठली काटेरी झाडे-झुडुपे काढून त्याने तिथे वटवृक्ष उभे केले होते. विपरीत परिस्थितीतही परिश्रम करून फुले फुलवली होती. पन्नास वर्षे म्हणजे काही थोडी-थोडकी नाही. इतक्या दिवसात तर प्रदेशाची नावे बदलतात. रंगरूप बदलतं. म्हातार्‍याजवळ तर एका-एका वितीच्या, त्याने केलेल्या काया-पालटाचा लेखा-जोखा होता. पण यातून त्याच्याकडे काही जमा-जोड झालेला नव्हता. या सगळ्या उपटा-उपटीत आणि नव्याने लावालावीत त्याच्या जीवनाचे काय झाले? त्याचं शरीर, त्याचं वय कसं, कधी मातीमोल होत गेलं, त्यालाच कळलं नाही.

तरुण नातवावर या गोष्टीचा खास असा काही परिणाम झाला नाही. तो आजाच्या गोष्टी ऐकता ऐकता, पुढल्या खेळाडूप्रमाणे भविष्याच्या पटावर आपलं मन गुंतवत होता. तो गावात काही वर्षं शाळेत गेला होता. त्याला पुस्तक वही-मास्तर- दफ्तर-घंटा याची पुसटशी आठवण आहे. तिथे त्याला सांगण्यात आलं होतं की थेंबा-थेंबाने घडा भरतो आणि ज्ञानसागराच्या काठाशी बसलं की जवळच्या कमंडलूत गंगा सामावली जाते. पण त्याच्या भूतकाळात काही सामावले गेले नाही. सामावले गेले, ते फक्त यार-दोस्तांबरोबर घेतलेले विडीचे झुरके, गुटख्यांच्या पिचकार्‍या, मास्तरांचा मार आणि शाळेच्या परिसरातून, बंगल्याच्या बागेत गवत काढण्यासाठी केलेली उचलबांगडी.

आजाने नातवाला संगितले, की त्याला इथे दरमहा चौदा रुपये मिळायचे आणि तो गाव, आजी, घर-दार, कुटुंब सगळं विसरून एकाग्रतेने तन-मन ओतून काम करायचा. वाळवंटात तो नंदनवन फुलवायचा प्रयत्न करायचा. बगीचा सुंदर, मोहक करण्याची स्वप्ने बघायचा.

खूप दिवसांनंतर आपल्या घरातील कुणाला तरी बघण्याचा मुलाचा उत्साह हळूहळू कमी होऊ लागला होता. पण त्याच्या उदासीनतेमुळे आजोबांचा उत्साह जराही कमी झालेला नव्हता. ते अजूनही उत्साहाने थबथबत, खुशीने बोलत होते. जसा काही त्यांनी तिथे काम करताना आपला घाम गाळला नव्हता, उलट वयावर चढलेली चांदी मातीला भेट दिली होती.

चालता-बोलता दोघेही मागच्या बाजूच्या खोलीत आले. ती खोली आता आजोबांच्या नातवाला, म्हणजे नव्या माळ्याला रहाण्यासाठी दिली होती. आजोबा थोडे हैराण झाले. ‘तुला खोली? मी उन्हाळा, थंडी, पाऊस, सदा-सर्वकाळ त्या झाडाखाली एका बांबूच्या खाटल्यावर झोपत होतो. कधी कधी पाऊस जोराचा असेल, तर चौकीदारही तिथेच यायचा… खोलीतल्या भिंतीला असलेल्या एका खुंटीवर दोन-तीन जीन्स टांगलेल्या बघून आजोबांना आश्चर्य वाटले. ते नातवाला म्हणाले, ‘इथे तुझ्यासोबत आणखी कोण रहातं?’

‘कुणीच नाही. हे माझेच कपडे आहेत. ’ मुलगा बेपर्वाईने म्हणाला. आजोबांनी खाली वाकून एकदा आपले गुढग्यापर्यंत वर गेलेले मळके धोतर पाहिले. पण त्यांना रहावले नाही. ‘काय रे हे घट्ट विलायती कपडे घालून तू झाडातील तण कसे काढतोस?’

मुलाला त्यांचं बोलणं नीट कळलंच नाही. ‘ते तर नर्सरीवाले करूनच जातात. बिया, झाडं तेच लावतात. ’ हे ऐकून आजोबा अन्यमनस्क झाले.

मुलाने एक चमकदार काचेच्या बाटलीतून आज्याला पाणी दिले. आजा हैराण झाला. ‘ बेटा, मालकांच्या कुठल्याही गोष्टीला न विचारता हात लावता कामा नये. ‘.. आता हैराण होण्याची पाळी मुलावर आली. तो त्याच सपाट चेहर्‍याने म्हणाला, ‘हे सगळं मालकांनीच दिलंय. ‘ आजोबांना आता खोलीच्या खिडकीतून एक शुष्क, निष्पर्ण झाड दिसले. ‘बघ. बघ. हे झाड. याला पहिल्यांदा फळे लागली, तेव्हा मला त्यावर्षी होळीला घरी जाता आले नाही. माझ्या मागे कुणी झाडावर फळे टिकू दिली असती का? मी घरी जाऊ शकलो नाही, तेव्हा मग तुझ्या आजीने दोन शेर जौ ( एक धान्य- याची भाकरी करतात. ) आणि गुळाचा तुकडा कुणाच्या तरी हाती पाठवला होता.

मुलाला हे सगळं बोलणं असंगत वाटलं. त्याच्या खोलीत असलेल्या जुन्या सोफ्यावर, कागदात गुंडाळलेला अर्धा पिझ्झा होता. सकाळी नाश्त्याच्या वेळी मालकिणीने तो त्याला दिला होता. म्हातार्‍याचे डोळे डगमगत्या नावेसारखे झालेले पाहून मुलगाही नाही सांगू शकला, की त्याला दर दोन-चार दिवसांनी डायनिंग टेबलावर उरलेली मासळी मिळते आणि त्याचबरोबर अधून –मधून जूसचा डबाही मिळतो.

मुलाला आपल्या शाळेतल्या मास्तरांची आठवण झाली. ते म्हणायचे, ’रोज रोज कुणाला मासे देण्यापेक्षा त्याला मासे पकडायला शिकवा. ’ आपल्या आजोबांच्या तोंडावरील सुरकुत्या पाहून तो विचार करू लागला, की या सुरकुत्या केवळ मासे पकडत रहाण्याचाच परिणाम आहेत.

आजोबा जेव्हा-तेव्हा उत्साहाने बोलू लागत. ‘ही तुझी मालकीण सून बनून या घरात आली, त्यानंतर मी वर्षभर तिला पाहिलेही नाही. आम्हाला चहा, पाणी देई कोठीचा आचारी. खुरपी, कुदळ काढून द्यायचा घरचा नोकर. घरातील बाल-बच्चे षठी-सहामासी मोटारीच्या काचेतून जरूर दिसायचे. ’

यावर मुलाने गप्प रहाणंच पसंत केलं. त्याच्याजवळ बोलण्यासारखं काही नव्हतंच. त्याने कधी खड्डा खणला नव्हता. कधी शेतात बियाणं रुजत घातलं नव्हतं. रोपे लावली नव्हती. तण काढले नव्हते. नर्सरीचा माणूस येऊन हे सगळं करून जात होता. दिवसभर पाण्याचे फवारे सोडत स्प्रिंकलर चालू असायचे. हां धाकटी आणि मधली मुलगी अनेकदा छोट्या-मोठ्या कामासाठी त्याला बोलवायची. हाताचा अनेकदा स्पर्श व्हायचा, पण या गोष्टी काय आजोबांना सांगण्यासारख्या आहेत? नातू बराच वेळ काही बोलला नाही. ते पाहून आजोबा काहीसे खजील झाले, पण पुन्हा म्हणाले, ‘टोपल्याच्या टोपल्या फळे झाडांवरून निघायची. सगळ्या वस्तीत वाटली जायची. घरात महिनो न महीने खाल्ली जायची. ’

.. यावेळी मुलाच्या भात्यातून बाण निघाला. म्हणाला, ‘आता हे असलं काही खात नाहीत. घरात मॉलमधून सगळी इंपोर्टेड फळे येतात. ‘

मुलाने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि आपल्या नव्यासारख्या दिसणार्‍या रंगीत गंजिफ्रॉकच्या खिशात ठेवला, तेव्हा आजोबांना राहवलं नाही. ‘किती देतात रे हे तुला?’ मुलाच्या लक्षात आलं, आजोबांच्या डोक्यात कसला तरी किडा वळवळतोय. छोट्याशा गोष्टीचा गाजावाजा होऊ न देण्याच्या गरजेपोटी मुलगा म्हणाला, ‘घरात इतके लोक आहेत, सगळे काही ना काहे देत असतात. माझा हा मोबाईल मालकिणीच्या धाकट्या मुलीने काही दिवसांपूर्वी जुना झाला, म्हणून मला दिला होता. ’ आजोबांनी आपल्या नातवाच्या धष्ट-पुष्ट, कमावलेल्या शरीराकडे नजर टाकली. त्याला आपल्या घरच्या शाश्वत गरिबीची आठवण झाली.

आजोबांचे मन खोलीतून बाहेर पडून बागेत विहरू लागलं. अखेर त्या बागेची माती त्यांच्या घामामुळेच ओलसर झाली होती. बागेतील पानापानावर, झाडा-झुडपांवर त्याचा इतिहास विखुरलेला होता. त्याने आपली दिवस-रात्र, , तारुण्य-म्हातारपण, आपली सुख-दु:खे, आपला घर-परिवार, सगळं मन मारून, धुळीप्रमाणे या जमिनीवर शिंपडली आणि बदल्यात मिळालं जीवन हरवल्याचं सर्टिफिकेट. आज त्यांच्या जीवनभराच्या पिकाला भोगणार्‍या आळ्या लागल्या आहेत. त्यांचा इतिहासच कुणी खातय.

खोलीचा दरवाजा उघडून मुलगा बाहेर आला. त्याने सफेत झक्क बूट घातले होते. आजोबादेखील जाण्यासाठी चुळबुळ करू लागले. मालक लोकांचा काय भरवसा? रात्रीर्यंत येणार नाहीत.

मुलगा मेन गेटपर्यंत आजोबांना पोचवायला आला. बाहेर रस्त्यावर आजोबांना, त्याने एका दुकानात शिरताना पाहिले. त्याने पाहिले, ते औषधांचे दुकान होते. मुलाला आश्चर्य वाटले – आजोबा आजारी आहेत? त्यांनी सांगितलं का नाही? मुलगा त्यांना काही विचारणार, एवढ्यात दुकानदाराचे पैसे देऊन तो परतला. त्याने एक छोटसं पाकीट मुलाला दिलं. मुलगा शरमेने पाणी पाणी झाला. आजोबा म्हणाला, ‘आज-काल अनेक तर्‍हेचे आजार पसरलेत. तू तर परगावी. कुठल्या अडचणीत सापडू नको. ’

मुलाला संकोच वाटतोयसं बघून आजोबा पुन्हा किलबिलले, ‘विचार कसला करतोयस? आजोबा आहे मी तुझा. घे ! हे पाकीट घे.’

मूळ हिन्दी कथा – ’इतिहास भक्षी‘

मूळ लेखक – श्री प्रबोध कुमार गोविल

मो. 9414028938

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आणि… कविता जिवंत राहिली…भाग – २ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

?जीवनरंग ?

☆ आणि… कविता जिवंत राहिली…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆ 

(रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.) 

माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.

स्पर्धा संपली. पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं. मंचावर ते उपस्थित होते. सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला, आणि छातीत धडधड सुरू झाली. त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला. टाळ्या सुरू झाल्या. तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला. त्याच्या हातात ट्रॉफी, गळ्यात शाल, पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं. त्याला तिथेच थांबवला. माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती.

सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला. माझं नाव नव्हतं. पोटात अजून गोळा आला. तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता. मी डोळे गच्च मिटून घेतले. पोटात कळ यायला लागली होती. छातीत धडधड वाढेलेली होती. दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती, आणि कानावर आवाज आला. “आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे, ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे. “

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं ‘मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे. होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे. ‘

टाळ्या थांबत नव्हत्या. आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो. बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली. मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो. फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता. मी खिशातला मोबाईल काढला आणि दिपालीला फोन केला. पहिल्या रिंगमध्ये तिने फोन उचलला आणि म्हणली, “चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर, ” ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती. मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं, “दिपाली पहिला नंबर आलाय. ” 

मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी. पण ती तसलं काही बोलली नाही. ती पटकन म्हणाली, “ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी. ” आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली. ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती. इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती. माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं.

मी कसलाच विचार केला नाही. ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं. सगळेजण तोंडाकडे बघत होते. मला काहीच वाटत नव्हतं. मी स्टेजवर ते पाकीट फोडलं. दोन बोटं आत घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या. दहा नोटा होत्या आणि मी फोन कानाला लावून म्हणलं, “दिपाली, पाच हजार रुपये आहेत. ” हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली.

त्यावर दिपाली काहीच बोलली नाही. तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो. मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही, पण आयुष्यातला तो पंचवीस सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला. आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं.

नंतर हातात ती ट्रॉफी आली. गळ्यात शाल पडली. फुलांचा तो गुच्छ घेतला आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा. त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते. फोटोवाला ही रागानेच बघत होता. मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.

घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली. तिला समोसे आवडतात म्हणून गरमागरम समोसे ही घेतले. तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं. मी अक्षरश: पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो. दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं आणि म्हणाली, “कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे. ” 

हुंदका दाटून आला. मला स्पर्धा जिंकल्याचा, पाच हजार मिळाल्याचा, आनंद नव्हताच. मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो. कवी म्हणून जिवंत राहणार होतो, याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो. तिने माझे पाणावलेले डोळे पुसले. तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं.

आम्ही दोघेही खायला बसलो आणि ती म्हणाली, “चंदनशिवे, आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं. कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता. तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती. तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. ” 

सगळी मिठाई दोघांनी खाल्ली. तिने कागद आणि पेन घेतलं आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली. तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली अशी….

माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,

माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात

किराणा मालाची यादी लिहिते,

ती यादीच माझ्यासाठी जगातली 

 सर्वात सुंदर कविता असते…

 आणि यादीची समिक्षा फक्त आणि फक्त

तो दुकानदारच करत असतो

तो एक एक शब्द खोडत जातो

पुढे आकडा वाढत जातो

आणि कविता तुकड्या तुकड्याने 

पिशवीत भरत जातो

आयुष्यभर माहीत नाही

पण, कविता आम्हाला

महिनाभर पुरून उरते

कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते”

 मित्रहो, संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात. बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात. पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की, संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही. आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक, वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे. यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे. कारण, आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.

 चालत राहा, आयुष्याचे आनंदगाणे हसत हसत गात राहा.

– समाप्त  

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आणि… कविता जिवंत राहिली…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

?जीवनरंग ?

☆ आणि… कविता जिवंत राहिली…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता. निर्भय तिच्या पोटात वाढत होता. माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता. मी कंत्राटी कामगार होतो, आणि वेळ अशी आली होती, घरातलं सगळं राशन संपलं होतं. गॅस संपून आठ दिवस झाले होते. स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती. टीव्ही चा रिचार्ज संपला होता. त्यामुळे टीव्ही ही बंद होता. रोजचं येणारं दूध बंद केलं होतं. घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.

तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते. तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता. गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे. तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे. दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती आणि माझ्यासोबत लढत होती.

परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते. एका वेळची सोय होणार होती. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो. पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं. कारण त्यांना माहीत होतं, हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला “नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना, ” मी काहीच उत्तर दिलं नाही, फोन कट केला आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.

तिची अंघोळ झाली होती. आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे” हे गाणं गुणगुणत असायचो. मी गाणं गायला सुरवात केली, पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती. तिने लक्षच दिलं नाही. माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा, तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं. मी मान खाली घातली. घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही हे कळलं.

आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही. ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक. सात महिन्याची गरोदर असणारी, एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी, आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी. मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो.

ती स्वत:ला सावरत हळूहळू उठली आणि दार उघडून बाहेर गेली. मी काहीच बोललो नाही. तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला. कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती. रविवार होता. पेपरला पुरवण्या होत्या. तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.

मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती पेपरची पाने चाळू लागली. आणि अचानक ती जोरात ओरडली. “ओ चंदनशिवे, हे बघा काय आलंय पेपरला. “

मी म्हणलं “काय दिपाली”? 

तर तिने मला विचारलं “काय ओ चंदनशिवे, तुम्ही कवी आहात ना?”

मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं, “हो आहे, पण काय करणार कवी असून, आणि कविता तरी काय करणार आहे माझी” 

तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय. !! ‘अंशुल क्रियेशन प्रस्तुत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा. !! रोख रकमेची तीन बक्षिसे. ‘ खाली पत्ता होता चिंचवड, पुणे, आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता.

मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नावनोंदणी केली आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती. ती म्हणाली, “चंदनशिवे, घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत. ते मी तुम्हाला देतेय. या स्पर्धेत जा. आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या. पण एक सांगते, आज जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल. कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे. ” तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.

ती पुढे म्हणाली, “जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय. ” सात महिन्याची गरोदर असणारी, सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी ते तिचं आवाहन स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला. मी अंगात कपडे घातले. तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.

मी चिंचवडला आलो. बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते. तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती ती भरली. ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार. परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते. मी ते जपून ठेवले. बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. मला खावंसं वाटलं नाही, कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा पण, आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती. कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती, आणि हरलो तर, फक्त शरीर घेऊन मेलेल्या मढ्यागत जगणं समोर दिसत होतं.

स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या, कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती, आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली “ओ चंदनशिवे” ही हाक ऐकू येत होती.

माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो. तेव्हा मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना, स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला. अंगावर काटा आला. अंग थरथर कापलं. विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं. रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.

– क्रमशः भाग पहिला

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares