श्री मंगेश मधुकर

जीवनरंग 
☆ “दोन लघुकथा — मोबाईलडा / समेट” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
(१) “मोबाईलडा”
बरीच रात्र झाली तरी रूममधला लाइट चालू होता.
“बंटी ए बंटी,रात्रीचा दीड वाजलाय.झोप आता”ममा ओरडली.
“तू अजून जागीच”
“मी हेच विचारतेय”
“हा,पाच मिनिटं”
“दार उघड.काय करतोयेस”
“काही नाही.थोडा वेळ थांब”
“तो मोबाईल बाजूला ठेव”
“तुला कसं कळलं”
“तू आजकाल दुसरं काही करतोस का?”
“ममा,गुड नाइट,”
“फोन माझ्याकडं दे”
“ठेवला.”लाइट बंद झाल्यावरच ममा आपल्या रुममध्ये गेली.
——
सकाळी दहा वाजून गेले तेव्हा झोपलेल्या बंटीला ममानं उठवलं.
“कशाला उठवलसं”
“किती वाजले ते पाहिलं का”
“रात्री झोप म्हणून मागे लागतेस आता झोपलो होतो तर उठवलं.काय काम होतं.”
“काही नाही”
“मग झोपू द्यायचं ना.”
“लवकर झोपायला काय होतं”
“ममा,सकाळ सक्काळी सुरू करू नकोस.”
“म्हणजे,तू कसंही वागायचं अन आम्ही बोलायचं सुद्धा नाही का”
“मला यावर वाद घालायचा नाहीये”
“नीट वागलास तर कोण कशाला बोलेल”
“तुझं चालू दे.फ्रेश होऊन येतो”
“फोन घेऊन जाऊ नको”
“का?”
“जिथं तिथं फोन सोबत पाहिजेच का?जरावेळ लांब राहिला तर काही बिघडत नाही.टॉयलेटमध्ये फोन कशाला.घाणेरडी सवय.”
“मी फोन घेऊन जाणार.काय करायचं ते कर”बंटीनं ऐकलं नाही.ममा बोलत राहिली.
—-
“ममा,भूक लागलीये’” फोन पाहत ब्रश करत बंटी म्हणाला
“हsssम ”मोबाईलवरची नजर न हटवता ममानं उत्तर दिलं.
“नुसतं ‘हू’ काय करतेस.खायला दे.”
“देते”
“कधी?,मला आत्ता पाहिजे”
“देते म्हटले ना.जरा मोबाईल पाहू दे”
“माझ्यापेक्षा मोबाईल जास्त महत्वाचा आहे का?”
“येस”
“काय खाऊ”.
“मोबाईलच खा”
“उगीच डोक्यात जाऊ नकोस”बंटी खेकसला.
“ए,नीट बोलायचं”
“तू पण”
“मी नीटच बोलतेय”
“मोबाईल खा असलं बोलणं बरोबर ये.”
“का,मोबाईलनं पोट भरत नाही”
“ममा”बंटी चिडला.
“स्वतः बनवून खा.मी काहीही करणार नाही”
“मग मी ऑर्डर करतो”
“नाही.आत्ता जर ऑर्डर केलं तर यापुढे घरात स्वयंपाक बनवणार नाही.”
“तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे.”
“तुझं वागणं”
“आता मी काय केलं”
“घरात लक्ष असतं का?आमच्यापेक्षा मोबाईल जास्त महत्वाचा झालाय.धड बोलत नाही की वागत नाहीस. कायम अस्वस्थ.एकटाच हसतो,स्वतःशीच बडबडतोस.घरात असूनही नसल्यासारखा.जेवताना,आंघोळ करताना, झोपताना जळूसारखा हाताला फोन चिकटलेला.”
“माझ्यामुळे तुम्हांला काही त्रास नाही ना.मी डिस्टर्ब करीत नाही मग तुम्ही मला करू नका.एवढं सिंपल.”
“हे घर आहे.रेल्वे प्लॅटफॉर्म नाही.कोणाशी बोलणं नाही की विचारपूस नाही फक्त आपल्याच विश्वात.”
“मी माझ्या सर्कलमध्ये कनेक्ट आहे”
“हो पण फक्त व्हर्च्युली.परवा मावशी घरी आली तर काय बोलावं हे तुला समजत नव्हतं.एकदम ब्लॅंक झाला.दिवसभर बाहेर अन घरी आलास की मोबाईलच्या ताब्यात असतोस”
“तुमच्या जनरेशनला मोबाईल विषयी प्रचंड राग का?”
“आम्हीसुद्धा फोन वापरतो पण तुझ्याइतकं पागल झालो नाही.”
“मोबाईल ईज ब्रिदिंग.मोबाईल इज लाईफ!!”
“कॉलेजला गेलास म्हणजे शिंग फुटली नाहीत.दहा वर्षाचा असताना पहिल्यांदा मोबाईल हातात घेतलास आणि आता त्याच्याशिवाय दुसरं जगच नाही.चोवीस तास सोशल मीडिया आहेच फक्त स्वतःवर कंट्रोल पाहिजे.” खिडीकीतून सहज लक्ष गेलं तर रस्त्यावरून एकजण झोकांड्या खात चाललेला.त्याला पाहून ममा म्हणाली “तो बघ.एवढ्या सकाळी सुद्धा पिऊन टाईट,त्याच्यासाठी दारू ईज ब्रिदिंग,दारू इज लाईफ.मग तब्येतीची वाट लागली तर दारू सोडायची नाही.जसा तो तसाच तू ..
“म्हणजे ”
*”तो बेवडा,दारुडा अन तू…”
“मी काय?”
“मोबाईलडा” बंटीनं लगेच फोन लांब ठेवला तेव्हा ममा हसली “ पोहे केलेत.खाऊन घे आणि जे बोलले त्यावर विचार कर”
“माताजी,आत्तापासून फोन आचारसंहिता ..” अंगठा उंचावत बंटी म्हणाला.
लेखक : मंगेश मधुकर
===============================
(२) “समेट”
आजचा ऑफिसमधला दिवस शांततेत चाललेला.काही विशेष काम नव्हतं.तितक्यात ते दोघं आले.
“नमस्कार मॅडम”तो म्हणाला पण ती काहीच बोलली नाही उलट जरा वैतागलेली वाटली. खुर्चीकडे हात करत मी म्हणाले “नमस्कार,बसा.कसे आहात”
“चाललंय.”त्यानं त्रोटक उत्तर दिलं.चेहऱ्यावरची निराशा जाणवत होती.ती मात्र तुसडेपणानं म्हणाली “कधी एकदा सुटका होईल असं झालंय”
“वेळ गेलेली नाही.अजूनही विचार करा.”मी
“जितक्या लवकर वेगळं होता येईल ते बरंय.”ती
“घाई करू नका”
“उलट फार उशीर झालाय.याच्यासोबत चार वर्ष कशी काढली ते माझं मला माहिती!”ती ताडताड बोलत होती.तो मात्र शांत होता.त्याची धडपड नातं टिकविण्यासाठी तर तिला घटस्फोटासाठी घाई झालेली .
“हे नातं संपवून मोकळं व्हायचयं”ती
“मोकळं झाल्यानंतर काय?”पुढचा काहीच विचार केला नसल्यानं माझ्या प्रश्नावर ती गडबडली.
“तुमचं लव मॅरेज ना”
“तिथंच फसले”शेजारी पाहत ती म्हणाली.त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
“तू एकटीच फसलीस?”माझा प्रश्न तिला कळला नाही.
“म्हणजे”ती
“आधी प्रेम नंतर लग्न.दोघांनी एकमेकांना फसवलं”
“त्यानं फसवलं मी नाही”ती
“हाऊ कॅन बी यू सो शुअर,त्याचंही म्हणणं तुझ्यासारखचं असेल तर ..”
“तो पुरुष आहे.सगळा दोष बाईला देणारच”
“विषय भलतीकडे नेऊ नकोस.टाळी एका हातानं वाजत नाही.त्याचं अजूनही प्रेम आहे.मागचं विसरून पुन्हा सुरवात करण्याची मनापासून इच्छा आहे.”
“नुसतं म्हणायला काय जातं.बोलणं आणि वागणं वेगवेगळं असणाऱ्या माणसावर विश्वास कसा ठेवू.असे लोक फक्त स्वतःची सोय पाहतात.एक नंबरचे सेल्फीश असतात.हा पण तसाच आहे.”
“हीच गोष्ट तुला पण लागू पडतेय.आत्ता तू पण फक्त स्वतःचाच विचार करतेस.” माझं बोलणं तिला आवडलं नाही.एकदम रडायला लागली तेव्हा त्याला बाहेर जायला सांगितलं.पुढचे काही क्षण शांततेत गेले.
“सॉरी,एकदम भरून आलं”रुमालानं डोळे पुसत ती म्हणाली.
“मनात खूप गोंधळ आहे ना”
“हंssssम!!.स्वतंत्र व्हायचंय हे शंभर टक्के कन्फर्म”
“वेगळं होण्याविषयी अजूनही द्विधा मनस्थिती आहे.”
“बरोबर की चूक हेच ठरवता येत नाहीये.अनेकांशी बोलले तर गोंधळ अजून वाढला.”
“अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस.”मान फिरवून ती दुसरीकडं पाहू लागली.
“इतक्या वर्षाच्या अनुभवावरून सांगते.तुमच्यातला प्रेमाचा बंध अजूनही शाबूत आहे.नातं रिस्टार्ट करा.पुन्हा एकदा सगळ्याचा नव्यानं विचार कर.मगच निर्णय घ्या.”
“तुम्ही पुन्हा जोडण्यासाठी फारच आग्रही वाटताय.”
“करेक्ट!!माझं कामच ते आहे.तोडण्यापेक्षा जोडणं केव्हाही चांगलंचं.”
“पण प्रत्येकवेळी नाही”ती
“मान्य!!प्रयत्न करायला हरकत नाही.तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेत आहात.असं मला वाटतय.”
“असं काही नाही.आमच्यात खूप भांडणं होतात.दोन टोकाचे स्वभाव आहेत.”ती
“नॉर्मल आहे.हा सगळ्या जोडप्यांचा प्रॉब्लेम आहे.”दोघांबरोबर बऱ्याच मिटिंग झाल्या परंतु आज ती मन मोकळं करत होती.त्याचं वागणं,सवयी याविषयी बोलत होती.
“मग पसंत कसं केलंस.त्याच्या खास आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या?”माझ्या अनपेक्षित प्रश्नानं ती गडबडली.
“ईश्य!!खूप आहेत”ती चक्क लाजली.
“बघ,स्टील यू हॅव स्पेशल फिलिंग्ज् फॉर हिम”
तिनं उत्तर दिलं नाही.
“वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आल्यावर मतभिन्नता असणारच.प्रेम म्हणजे सगळं कसं छान छान तर लग्न म्हणजे परखड वास्तव.प्रेमात एकमेकांच्या आनंदासाठी धडपडणाऱ्यांना लग्नानंतर कराव्या लागणाऱ्या तडजोडीची तयारी नसते तिथूनच प्रॉब्लेम सुरू होतो.लग्नाआधी भारी वाटणाऱ्या सवयी नंतर त्रासदायक वाटतात आणि मग सुरू होतो ‘तू तू,मै मै’ चा खेळ.”
“आमचं असंच झालंय.”
“नवरा-बायकोच्या नात्यात वाद,भाडणं जरूर असावीत पण ती ताटातल्या लोणच्यासारखी,भाजीत मीठ असावं परंतु मिठात भाजी टाकली तर चव बिघडणारच.”
“किती छान बोलता.म्हणूनच ममानं तुमच्याकडंच का पाठवलं हे समजलं”छान हसत ती म्हणाली.
“आता कुठं तरी जाणवतेय की दोघांकडून चुका झाल्यात.वी नीड टू लर्न अडजेस्ट.मी तयार आहे पण तो तयार होईल का ?
“आमचं आधीच बोलणं झालंय.तो तयार आहे”मी बोलत असतानाच तो आला. नजरानजर झाल्यावर दोघं हसले.मला फार आनंद झाला कारण प्रयत्नांना यश आलं. अजून एक नातं तुटण्यापासून वाचलं.पुन्हा पुन्हा “थॅंकयू” म्हणत हातात हात घालून दोघं केबिनच्या बाहेर पडले आणि लगेचच सहकारी केक घेऊन आले.आज माझा कामाचा शेवटचा दिवस.फॅमिली कौंन्सलर म्हणून पंचवीस वर्ष काम केल्यानंतर रिटायर होणार होते.सगळे भरभरून बोलले तेव्हा वातावरण भावुक झालं.इतकी वर्ष बोलायचं काम केलं पण आजही भाषण करायचं म्हटलं की दडपण येतं.उत्सवमूर्ती असल्यानं बोलायला उभी राहिले.“सर्वांचे खूप खूप धन्यवाद!! थोडक्यात सांगते की आपण रोज दोन आयुष्य जगतो.एक खाजगी अन दुसरं ही नोकरी जिथं वैयक्तिक भावनांना बाजूला ठेवून समोरच्याला समजावून सांगायचं हे अतिशय अवघड आहे.इथं येणारे वैतागलेले,चिडलेले असतात.बऱ्याचदा आपल्यावर राग निघतो तरी शांत राहावं लागतं परंतु तेच लोक जेव्हा इथून हसत हसत बाहेर जातात.तो आनंद,समाधान हे फार मोलाचं असतं.माझी इथल्या करियरच्या पहिल्याच केसमध्ये यशस्वी समेट झाला तसाच शेवटची केसमध्ये सुद्धा यशस्वी समेट झाला. हा फार चांगला योगायोग आहे.याचं मोठं समाधान आहे.मी स्वतंत्रपणे हाताळलेल्या पहिल्याच केस मध्ये घटस्फोट टाळण्यात यश आले.तेव्हाचा आनंद अजून विसरलेले नाही.”
“मी पण नाही” केबिनच्या दारात उभी असलेली विमल म्हणाली.
“विमल,तुम्ही आणि इथं” मी विचारताच विमल येऊन घट्ट बिलगल्या.
“आज तुम्ही रिटायर होताय म्हणून खास आलेय. मॅडममुळे संसार वाचलेली मीच ती पहिली व्यक्ती. त्यांच्याचमुळे माझं आयुष्य दोनदा सावरलं”
“दोनदा”मी आश्चर्यानं विचारलं.
“मॅडम,तुम्ही माझा संसार तर वाचवलातचं आणि माझ्या लेकीचा सुद्धा..”विमलनं दाराच्या दिशेनं बोट केलं तिथं मघाचेच तो आणि ती हातात फुलांचा गुच्छ घेऊन उभे.त्यांना पाहून आपसूक डोळे वहायला लागले.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈