मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाडेकरू… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? विविधा ?

☆ भाडेकरू… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

“बरे झाले साठे काका तुम्ही फोन करून आलात, नाहीतर नेमके तुम्ही यायचे आणि आम्ही कुठेतरी बाहेर गेलेलो असायचो.” सुहासने साठे काकांचे अगदी हसून स्वागत गेले. त्यांना त्यांची आवडती आरामखूर्ची बसायला दिली.

“अगं मंजिरी पाणी आणतेस का? आणि हो चहा टाक साठे काकांसाठी, कमी साखरेचा बरं का.” आतल्या खोलीत कार्यालयातले काम घरी करत बसलेल्या मंजिरीला त्याने आवाज दिला.

“तसे महत्वाचेच काम होते, म्हणून फोन करून आलो होतो.” जरा स्थिरावल्यावर व पेलाभर पाणी पोटात गेल्यावर साठे काकांनी विषय काढला.

“अगं मंजिरी आधी चहा टाक, काका किती दिवसांनी आपल्या घरी आले आहेत.” साठे काका का आले असतील या विचारांत तिथेच उभ्या मंजिरीला त्याने जागे केले.

“थांब मंजिरी, मी जे सांगणार आहे ते तूही ऐकणे महत्वाचे आहे. तर बरं का सुहास, तुझ्या वडिलांनी शेवटच्या काळात माझ्याकडे एक पत्र दिले होते. ते गेल्यावर मी ते पत्र तुला वाचून दाखवावे अशी त्यांची इच्छा होती.”

काकांनी कुठल्याशा पत्राचा विषय काढताच सुहास आणि मंजिरी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.

“इतका विचार करायचे कारण नाही, हे काही मृत्यूपत्र नाही. त्यांना फक्त त्यांच्या मनातला विचार तुला सांगायचा होता. आधी तुझ्या नोकरीच्या धावपळीमुळे तर शेवटी दवाखान्यातल्या धावपळीमुळे त्याला तुझ्याशी नीटसे बोलता आले नव्हते. पण बहुधा त्याला त्याची वेळ जवळ आल्याचे आधीच कळाले असावे, म्हणून त्याने हे पत्र खूप आधी लिहून ठेवले होते. फक्त माझ्या हातात शेवटच्या काळात दिले.” आता साठे काकांनी दीर्घश्वास घेतला. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांनी आणखी घोटभर पाणी घेतले.

“काका असे काय आहे त्या पत्रात की जे त्यांना माझ्या जवळ किंवा मंजिरीच्या जवळ बोलता नाही आले.” सुहासच्या मनात नाना शंकांचे काहूर माजले होते. मंजिरी शांत असली तरी तिचीही अवस्था फार वेगळी नव्हती. एवढ्या वेळ उभ्या मंजिरीने पटकन भिंतीला टेकत खाली बसणे पसंत केले.

काकांनी सोबतच्या पिशवीमधून पत्र बाहेर काढले. कार्यालय सुटले तरी कार्यालयातील कामकाजाची पद्धत सुटली नव्हती. आणि म्हणूनच पत्र अगदी खाकी लिफाफ्यामध्ये वरती छान अक्षरात अगदी नाव तारीख घालून ठेवले होते. काकांनी आधी पत्र सुहासला दाखवले. वडिलांचे अक्षर त्याने सहज ओळखले. ते सुबक नक्षीदार असले तरी शेवटच्या काळात थरथरत्या हातांनी नक्षी थोडी बिघडली होती.

काकांनी पत्र वाचायला सुरूवात केली. वरचा मायना वाचला तसे सर्वांचेच डोळे पाणावले. अधिक वेळ न दवडता त्यांनी पुढचे वाचायला घेतले.

“मला कल्पना आहे की, या वाड्याची वास्तू पाडून ही जागा एखाद्या व्यावसायिक इमारत विकासकाला द्यायची तुझी इच्छा अनेक वर्षांपासून आहे. तू माझ्याकडे थेट विषय काढला नसलास तरी कधी ताई तर कधी मंजिरीच्या आडून तो माझ्या पर्यंत पोहचवत राहिलास. माझ्या पाठीमागे या वाड्यावर तुझा व बहिणीचा समसमान हक्क आहे हे मी वेगळे सांगायला नको.”

“पण काका मला यातले काहीच नको आहे. माझे घर केव्हाच झाले आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने गाठीला बक्कळ पैसाही आहे. ताईने हवे तेव्हा या वाड्याचा ताबा घ्यावा, मी हसत माझ्या घराकडे निघून जाईन.”, काकांचे पत्र वाचन मधेच तोडत सुहास तावातावाने बोलला. तसा त्याचा हात दाबत मंजिरीने त्याला शांत केले.

“अरे मला पत्र तर पूर्ण वाचू देत.”, असे म्हणत काकांनी पुढे पत्र वाचायला सुरूवात केली.

“माझ्या आजोबांपासूनचा म्हणजेच तुझ्या पणजोबांपासूनचा हा वाडा. इथे काही बिऱ्हाडे पिढ्यान् पिढ्या राहात आहेत. जशी तुझी माझी नाळ जुळली आहे तशीच या बिऱ्हाडांच्या पुढच्या पिढ्यांशी माझी नाळ जुळली आहे. तू जागा विकसकाला देताना ताईचा विचार घेशीलच याची खात्री आहे पण सोबत या बिऱ्हाडांचाही एकदा विचार घ्यावा एवढीच माझी विनंती आहे, त्यांची योग्य व्यवस्था करावी एवढीच माझी शेवटची इच्छा आहे.”

पुढची पत्राच्या समारोपाची वाक्ये वाचायची गरजच नव्हती. त्यांची पत्र लिहिण्याची पद्धत, त्यातली भाषा, सुरूवात व समारोप आताशी साऱ्यांच्या परिचयाचे झाले होते. काकांनी पत्र सुहासच्या हाती सुपूर्त केले. पुढची काही मिनिटे तो नुसताच पत्रावरून हात फिरवत होता. “मी आत जाऊन चहा टाकते.”, त्यांची तंद्री तोडत मंजिरी म्हणाली आणि झपझप आत गेलीही.

बाहेर फक्त साठे काका, सुहास आणि वडिलांचे पत्र राहिले होते.

वाडा तसा खरेच जुना होता. अनेक बिऱ्हाडे आधीच सोडून गेली होती. काही खोल्या वारसा हक्क राहावा म्हणून कुलुपे आणि जळमटांसह बंद होत्या. न मागता दर महिना खात्याला भाडे म्हणून नाममात्र रक्कम जमा होत होती. पण सुहासच्या चटकन लक्षात आले की ज्यांच्यासाठी वडिलांचा जीव अडला होता किंवा त्यांनी एवढा पत्र प्रपंच केला होता, ते जोशी मास्तर वाड्याच्या मागच्या अंगणातील खोल्यांमध्ये आपल्या पत्नीसह राहात होते. पंख फुटले तशी मुले केव्हाच उडून गेली होती. पाठीमागे दोन जीर्ण देहांसह जीर्ण घरटे राहिले होते.

त्यांची जुजबी व्यवस्था करून सुहासला हात काढता आले असते, किंबहुना विकसकाने तसे सुचविले देखील होते. ना जोशी मास्तरांमध्ये लढायची ताकद होती ना त्यांच्या बाजूने कोणी लढायला उभे राहिले असते. काही शिक्षक दुर्लक्षिले जातात हेच खरे.

विकसकाला जागा ताब्यात द्यायला अद्याप पुष्कळ वेळ होता. सुहासने जोशी मास्तरांच्या मुलांशी संपर्क करून पाहिला. अपेक्षेप्रमाणे समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.आता मात्र एक वेगळीच कल्पना सुहासच्या मनात आली आणि ती त्याने आधी मंजिरीला मग ताईला बोलून दाखविली. साठे काकांना यातले काहीच सांगायचे नाही असे त्याने दोघींना बजावले होते. जोशी मास्तरांशी तो व मंजिरी स्वतः जाऊन बोलले. त्याची कल्पना ऐकून तर मास्तर ढसाढसा रडले.

इकडे साठे काका लांबूनच पण वाड्यात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. सुहास सामानाची बांधाबांध करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण त्याने जोशी मास्तरांचे काय केले याचा काही थांग पत्ता लागत नव्हता. त्याला वडिलांच्या पत्राची आठवण करून द्यावी असे काकांना खूपदा वाटले, पण त्यांनी धीर धरला. एके दिवशी वाड्याच्या दारात ट्रक उभा असल्याचे त्यांना कोणाकडून तरी कळाले आणि हातातली सगळी कामे टाकून त्यांनी वाडा गाठला.

“अरे सुहास तू निघालास वाटतं. ते जोशी मास्तर कुठे दिसत नाहीत, त्यांचे काय ठरवले आहेस? तुझ्या वडिलांचे पत्र लक्षात आहे ना?” काहीसे रागात काहीसे नाराजीने पण एका दमात साठे काका बोलून गेले.

“ते तर पुढे गेले.”, ओठांवर हसू आलेले असतानाही कसेबसे ते दाबत सुहास थोडा कर्मठपणे बोलला.

“पुढे गेले म्हणजे? कुठे गेले?” साठे काकांचा पारा चढला.

“माझ्या घरी, माझे स्वागत करायला.” सुहासने अगदी संयमाने प्रतिउत्तर दिले.

“तुझ्या घरी म्हणजे? तू मला नीट सांगणार आहेस का? हे बघं तुझ्या वडिलांची अंतिम इच्छा होती की …” साठे काकांचे वाक्य पूर्ण होऊ न देताच सुहासने त्यांना वाड्याच्या पायऱ्यांवर बसवले.

“काका मी त्यांना दत्तक घेतले आहे. लोक मूल दत्तक घेतात तसे मी आई वडील दत्तक घेतले आहेत आणि आता अगदी शेवटपर्यंत मी त्यांचा संभाळ करणार आहे.” एखाद्या मुलाने वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवावे तसे सुहासने साठे काकांच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणाला, “तसेही आई बाबांच्या पाठीमागे आम्हाला तरी आधार कोण आहे.” साठे काकांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहात होत्या आणि आज त्या पुसायचे भानही त्यांना राहिले नव्हते.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रेशमाची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रेशमाची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“गेले पंधरा दिवस भुर्रकन निघून गेले … उद्या तुम्ही पण जाल.. मग मात्र सासुबाईंशिवाय हे घर मला आणि अविला खायला उठेल हो ताई..” एवढं बोलून शरु ढसढसून रडायला लागली. ह्या पंधरा दिवसात ती बरीच खंबीर होती. खरंतर आईचं पडल्यापासूनचं दुखणं या आठ महिन्यात तिनेच काढलं होतं. आपण फक्त नावाला लेक होतो. तिच्या कर्तव्याने खरी लेक शरुच झाली होती. त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणार, पण शरुला ती जास्त प्रखरपणे जाणवेल..

… स्मिताने तिला पटकन जवळ घेतलं. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही, कारण ‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘ हे आता सगळेच अनुभवत होते. तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं. 

मग शरु अलगद उठली. कपाटातून तिने सासुबाईचे कानातले जोड आणि बांगड्या नणंदेपुढे ठेवल्या. कपाटही उघडं ठेवलं. ती स्मिताला म्हणाली, ” ताई, आईची आठवण म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या पाहिजे त्या तुम्ही घेऊन जा…”

स्मिता उदास हसत म्हणाली, “अगं माणूस आठवणींनी मनात, हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतो.. ह्या वस्तू, दागिने हे सगळं गौण आहे गं,.. मला काही नको, असू  दे तुमच्याकडेच.. आईचा एवढा दवाखाना, खर्च, तुम्ही सगळं कसं पेललं असेल ह्याची कल्पना आहे मला… हे दागिने सगळे तुमच्याकडेच ठेवा. पण एक वस्तू मात्र मी हक्काने मागेल. आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झूल शिवली होती.. ती मला दे. त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत गं माझ्या मनात.”

शरुने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झूल काढली. स्मिताने ती गच्च छातीशी धरली. तिला परत आईची खूप आठवण आली. रडणं ओसरल्यावर ती बोलू  लागली, ” एकदा मागच्या अंगणात एक गाभण गाय हंबरत होती.. आईने बघितलं आणि म्हणाली ‘अगं बाई, इथेच पाडस जन्माला घालते की काय..? हिचा मालक कुठे गेला, का ही वाट चुकुन इकडे शिरली..’ .. पण तिला आता हाकलून लावणं शक्य नव्हतं… अवि तुला आठवतं का, त्या गावी बाबांची बदली झाली होती तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ.”

त्यावर अवि म्हणाला, ” फार काही आठवत नाही, पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या आठवतात.. पोटभर खायला मिळाल्या होत्या बघ….”

स्मिता म्हणाली, ” हं, तू लहान होतास फार, मला मात्र स्पष्ट आठवतं सगळं.. आपल्याकडे कामाला येणाऱ्या शामलाबाईंना आईने लगेच बोलवलं.. त्यांना सगळी माहिती होती.. आई म्हणाली ‘ मुकं जनावर असलं तरी त्रास आणि लाज दोन्ही असतात प्राण्याला..’ 

भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हंबरत होती ती गाय. मग आईने तिला आडोसा केला.. गरम पाण्याचा शेक… अगदी जणू लेकीचं बाळंतपण केल्यासारखं केलं.. पाडस तर किती सुंदर होतं.. आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं. आई म्हणाली, ‘ देवाला काळजी सगळ्या जीवांची.. ह्या मुक्या प्राण्यांना बघा कसं मिनिटात उभं करतो तो.. आपली लेकरं वर्ष घेतात..’ 

शामलाबाई आईला म्हणायच्या, ‘ फार जीव लावू नका, कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर करमणार नाही…’ आईने तेंव्हा त्या पाडसासाठी ही झूल केली होती.. अगदी रातोरात जागून… म्हणाली, ‘आपल्याकडे नव्या लेकराला कपडे करतात, त्याला झूल तर करू….’

मला फार आवडली होती ती रेशमी झूल, सुंदर रंगांची मऊमऊ. मी पण जागी होते त्या रात्री.. सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं झालं होतं.. पण सकाळी जाग आली ती आईच्या रडण्याने… गाय, वासरू निघून गेलं होतं आपल्या वाटेने.. तू खूप रडला होतास.. ‘बांधलं का नाहीस?’ तिला विचारत होतास…

आई म्हणाली, ‘ ती आपली मालकीची नव्हती, तिची अडचण म्हणून आडोश्याला उभी राहिली. आपलं मन वेडं, लगेच गुंतलं त्यात.’

मी ही झूल छातीशी घट्ट धरून रडत होते. आई म्हणाली, ‘ रडू नकोस.. अगदी स्त्री जन्म कसा असतो ते तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला शिकवून गेली बघ. लज्जा, वेदना, मातृत्व… बघितलं ना वासराला कशी चाटत होती, आनंदाने दूध पाजत होती सगळ्या वेदना विसरून.. परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही, गेली निघून. आपल्या कर्तव्यांचं असंच असतं..  स्त्रीच जगणं…  माहेरी दोन दिवस यायचं, लाड करून घ्यायचे आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर..’

आईने झूल हातात घेतली.  म्हणाली, ‘आता येणाऱ्या प्रत्येक चैत्र गौरीला मी ही झूल घालेल.. त्यावर माझी गौर बसेल.. कारण ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात, राहिली आणि निघून गेली… पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊलखुणा सोडून गेली…’ आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं आयुष्यभरासाठी. ही तिची आठवण मात्र मला द्या..”

अविने आणि शरुने स्मिताला जवळ घेतलं. तिघेही आईच्या आठवणीने रडत होते आणि रेशमी झूल, म्हणजे आईनेच हातात हात धरलाय असं अनुभवत होते…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(1) निगेटिव रिपोर्टची कमाल – अज्ञात (2) कर्जमुक्त – श्री अशोक दर्द (3) कोरोनाची भाकरी – श्री घनश्याम अग्रवाल 

☆ निगेटिव रिपोर्टची कमाल – अज्ञात ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

दहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर एक माणूस आपला करोंनाचा निगेटिव्ह रिपोर्ट हातात घेऊन हॉस्पिटलच्या रिसेप्शनजावळ उभा होता.

आसपासचे काही लोक टाळ्या वाजावत होते. त्याचं अभनंदन करत होते. युद्ध जिंकून आला होता ना तो. त्याच्या चेहर्‍यावर मात्र बेचैनीची गडद छाया होती. गाडीतून घरी येताना त्याला रस्ताभर ‘आयसोलेशन’ च्या त्या काळातली असह्य मन:स्थितीची आठवण येत होती.

कमीतकमी सुविधा असलेली ती छोटीशी खोली, काहीशी अंधारी, मनोरंजनाचं कुठलंच साधन नाही. कुणी बोलत नव्हतं की जवळही येत नव्हतं. जेवण देखील प्लेटमध्ये भरून सरकवून दिलं जायचं.

ते दहा दिवस त्याने कसे घालवले, त्याचं तोच जाणे. 

घरी पोचताच त्याला दिसलं, त्याची पत्नी आणि मुले दारात त्याच्या स्वागतासाठी उभी आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो घराच्या एका उपेक्षित कोपर्‍याकडे वळला. तिथल्या खोलीत त्याची आई गेली पाच वर्षे पडून होती. आईचे पाय धरून तो खूप रडला आणि आईला धरून घेऊन बाहेर आला.

वडलांच्या मृत्यूनंतर गेली पाच वर्षे ती आयासोलेशन ( एकांतवास ) भोगत होती. तो आईला म्हणाला, ‘ आई, आजपासून आपण सगळे एकत्र, एका जागी राहू.’

आईला आश्चर्य वाटलं. पत्नीसमोर असं सांगण्याची हिंमत आपल्या मुलाने कशी केली? इतकं मोठं हृदयपरिवर्तन एकाएकी कसं झालं? मुलाने आपल्या एकांतवासाची सारी परिस्थिती आईला सांगितली आणि म्हणाला, आता मला जाणीव झाली, एकांतवास किती दु:खदायी असतो.

मुलाचा निगेटिव्ह रिपोर्ट आईच्या जीवनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट बनला होता. 

मूळ कथा – निगेटिव रिपोर्ट की कमाल –  मूळ लेखक – अनाम लेखक

☆ ☆ ☆ ☆ ☆

☆ कर्जमुक्त – श्री अशोक दर्द  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

एक काळ असा होता, शेठ करोडीमल आपल्या मोठ्या व्यवसायामुळे आपला मुलगा अनूप याच्यासाठी वेळ देऊ शकत नव्हते. मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आणि आपल्या व्यवसायातही व्यवधान निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला दुरच्या शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. वर्षभराने सुट्टी लागली की ते नोकराला पाठवून मुलाला घरी आणत. सुट्टी संपली की त्याला पुन्हा त्याच शाळेत पाठवलं जायचं.

काळ बदलला. आता अनूप शिकून मोठा व्यावसायिक बनला. शेठ करोडीमल म्हातारे झाले. वडलांचं अनूपवर मोठं कर्ज होतं. त्याने चांगल्या शाळेत घालून त्याला शिकवलं होतं.

वडलांचा कारभार आता मुलाने आपल्या हातात घेतला. त्यात खूप वाढ केली. कारभारात अतिशय व्यस्तता असल्यामुळे अनूपला आता आपल्या म्हातार्‍या बापाकडे लक्ष द्यायला फुरसत नसे. त्यामुळे त्याने आता वडलांना शहरातील चांगल्या वृद्धाश्रमात ठेवलं. वेळ झाला की त्यांना घरी नेण्याचं आश्वासन दिलं आणि तो पुन्हा आपल्या व्यवसायात रमून गेला. वृद्धाश्रमातला मोठा खर्च करून, त्याला आपण कर्जमुक्त झालो, असं वाटू लागलं होतं.

मूळ कथा – कर्जमुक्त – मूळ लेखक – श्री अशोक दर्द  मो. – मो. 9418248262

☆ ☆ ☆ ☆ ☆

☆ कोरोनाची भाकरी – श्री घनश्याम अग्रवाल  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

करोंनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरात शांतता पसरली. म्हातार्‍याला आयसोलेशन्समध्ये ठेवलं गेलं. सून दोन वेळचा चहा आणी जेवणाची थाळी घाबरत घाबरत खोलीच्या उंबरठ्यावर ठेवायची. मग हात सॅनिटायझराने स्वच्छ धुवायची.

म्हातार्‍याने आज तीनपैकी दोनच भाकरी खाल्ल्या. उरलेल्या तिसर्‍या भाकरीचं काय करणार? वाटलं, बाहेर जाऊन एखाद्या भिकार्‍याला किंवा गायीला घालावी. पण खोलीपुढे १४ दिवासांची लक्ष्मणरेषा ओढलेली होती. अखेर त्याने भकारी उंबर्‍यावर ठेवत सुनेला म्हंटलं, ‘भाकरी फुकट जायला नको. बाहेर कुणाला तरी देऊन टाक.’

‘हा म्हातारा म्हणजे नं…. कुणाला देणार त्याचा हात लागलेली भाकरी?….’ अखेर तिने चिमट्यात धरून ती भाकरी उचलली आणि पेपरमध्ये गुंडाळून बाहेरच्या गेटपाशी गेली कचराकुंडीत भाकरी टाकायला. पण कचराकुंडी दूर होती. अचानक तिला म्हातारा भिकारी हात पसरत येत असलेला दिसला. द्यावी त्याला? पण तोही माणूसच ना! तिने त्याला जवळ बोलावले. कागदात गुंडाळलेली भाकरी त्याला देत ती म्हणाली, ‘ ही कचराकुंडीत टाक. करोना पॉझिटिव्हवाल्याचा हात याला लागलाय याला आणि हे घे पाच रुपये तुला.’

करोंनाची इतकी भीती  आणि चर्चा होती की भिकारीदेखील त्याबद्दल काही बाही  ऐकत होते. दोन दिवसांचा भुकेजलेला असूनही त्याने विचार केला, करोंनावाल्याचा हात लागलेली ही भाकरी… नाही… नाही…मी ही खाणार नाही. ही कचराकुंडीत टाकून पाच रूपायांची भाकरी विकत घेऊन खाईन मी. भाकरी विकत घेण्याच्या विचाराने त्याच्या चालीत एकदम रुबाब आला. पहिल्यांदाच तो भाकरी विकत घेऊन खाणार होता.

कचरापेटीपर्यंत येता येता त्याच्या मनात विचार आला, त्याला भाकरी विकत कुठे मिळणार? सगळी हॉटेल्स, खानावळी बंद आहेत. त्याचे हात भाकरी टाकता टाकता थबकले.

मग त्याने भाकरी नीट निरखून बघितली. त्याला कुठे काही व्हायरस दिसला नाही. मग त्याने ती दोनदा झटकली. असला व्हायरस तर पडून जाईल. मग त्याने भाकरीकडे पाहिले. करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघेही भाकरी खातात. भाकरी पॉझिटिव्ह – निगेटिव्ह कशी असेल? भाकरी भाकरीच असते. शिवाय कुणा भिकार्‍याला कोरोना झालेला ऐकला नाही. कुणा भिकार्‍याला क्वारंटाईन झालेलं पाहीलं नाही. भुकेने सगळे सोयिस्कर तर्क केले. त्याने पुना भाकरी झटकली नि मनाशी म्हणाला, ‘ समाजा एखादा व्हायरस पोटात गेलाच, तर काय होईल? या रोटीमुळे इतकी इम्युनिटी मिळेलच, की ती त्या व्हायरसला मारून टाकेल. आता तो इतका प्रसन्न होऊन भाकरी खाऊ लागला की जसा काही तो कोरडी भाकरी खात नाही आहे, तर भाजीबरोबर भाकरी खात आहे.

मूळ कथा – कोरोना की रोटी  –  मूळ लेखक – श्री घनश्याम अग्रवाल मो. 94228 60199

☆ ☆ ☆ ☆ ☆

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘जे.बी.एल.’… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

‘जे.बी.एल.’… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

आला! काळा वड्डा! नाही नाही काळदेव! काळुराम! असं म्हणत, इश्मत, मुश्ताक आणि जेनीनं एकमेकांना टाळ्या दिल्या. त्यांच्या अचकट विचकट हसण्यानं जबीलच्या मस्तकात तीव्र सणक गेली. तेवढ्याच जोरात हातातला दगड जबीलने त्यांच्याकडे भिरकावला. इश्मतच्या डोळ्याला रक्ताची धार लागली.

प्रिन्सिपल मार्थासमोर जबील, भीतीनं, तेवढाच संतापानं आणि वेदनेनं, थरथर कापत उभा होता. आता जबरदस्त शिक्षा होणार हे त्याला कळून चुकलं होतं.

‘‘इसके पेरंट्सको बुलालो, इमिजिएट!’’ असं म्हणत, त्या जबीलच्या जवळ पोहोचल्या. एरवी प्रेमळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्था मॅडमचा जेवढा संताप, धाक अन् दरारा होता; तेवढाच जबीलच्या डोळ्यात त्वेष आणि संताप होता. हाताच्या मुठी घट्ट आवळून, त्या मागे बांधून जबील उभा होता.

लहानपणापासून काळा-काळा म्हणून चिडवणारी, हिणवणारी अनेक दृष्यं, त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होती.

‘‘हात आगे!’’

मोठ्ठी छडी, त्याच्या डोळ्यासमोर नाचवत मार्था मॅडम ओरडल्या.

ओठ घट्ट आवळून, जबील टपोरे डोळे ताणून, त्यांच्याकडे बघत राहिला.

‘‘हात आगे! सुनाई नही देता?’’

तरीही जबील तसाच!

संतापाने बेभान झालेल्या मार्था मॅडमने त्याच्या खांद्यावर सटकन् छडी मारली.

त्याबरोबर जबीलच्या उजव्या हाताची मूठ पुढे आली अन् त्याच्या चारही बोटांनी मार्था मॅडमच्या हातावर काळ्याकुट्ट, तेलकट, वंगणासारख्या पदार्थाचा फटकारा मारला. मार्था मॅडमच्या गोर्‍या धप्प हातावर जबीलचे इवल्याश्या चार बोटांचे काळे कुट्ट फटकारे उठून दिसत होते. त्या जागी मॅडमना प्रचंड झोंबू लागलं. ‘‘स्स्… हां…!’’ करून त्या चित्कारल्या. हातातली छडी गळून पडली. त्या हाताकडे बघत राहिल्या. अनपेक्षित प्रकाराने सारेच गोंधळले. मॅडमच्या भोवती जमा झाले. संधीचा फायदा घेऊन जबीलने धूम ठोकली. शाळेच्या गेटवरून उडी मारून, तो पसार झाला.

मार्था मॅडम निवृत्त होऊन बरीच वर्ष झाली, तरी त्यांच्या हातावरची खूण मिटली नव्हती. त्यासाठी त्यांनी अनेक औषधोपचारही केले. पण ती जन्माचीच खूण त्यांच्या हातावर उमटली.

मार्था मॅडमच्या हातात एक पत्र होतं.

‘‘मॅडम, मी तुमचा विद्यार्थी आहे. माझ्या संशोधनासाठी मिळालेला पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्याची इच्छा आहे…’’ असं म्हणून कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची विनंती केली होती.

खाली सही – J. B. L. अशी अक्षरं होती. जस्ट बी लव्हिंग – असा त्याचा विस्तार आणि अर्थही होता. कितीही डोक्याला ताण दिला तरी मॅडमना काही आठवेना. पण विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी कार्यक्रमाला जाण्याचं त्यांनी निश्चित केलं. कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी मॅडमसाठी कार पाठवली होती. मॅडम व्यासपीठावर येताच, एका व्यक्तीनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मॅडमने त्याच्या खांद्याला धरून उठवलं.

‘‘मॅडम माफ केलंत का मला? मी जबील. ओळखलतं का मला?’’

मॅडमने आश्चर्यानं ‘आ’ केला. त्याचवेळेस त्यांचा उजवा हात डाव्या हातावरच्या खुणेवरून फिरत राहिला. J. B. L. अक्षराचा अर्थही उलगडला.

‘‘मॅडम, माणसांच्या कातडीचा काळा रंग बदलण्यासाठी मी औषध शोधून काढलं आहे. त्यासाठी मला हा पुरस्कार मिळत आहे. त्या दिवशी तुम्ही मारलेल्या छडीमुळेच मी हा शोध लावू शकलो. हा पुरस्कार मी तुम्हाला प्रदान करत आहे.’’ असं म्हणून जबीलनं मॅडमच्या हातात पुरस्कार ठेवला. त्यावरची जे. बी. एल. अक्षरं उठून दिसत होती.

‘‘जस्ट बी लव्हिंग’’ असं म्हणत जबीलनं डबीतलं औषध, मार्था मॅडमच्या हातावर प्रेमानं, हळुवार हातानं लावलं. म्हणाला, ‘‘मॅडम रोज हे औषध लावलं तर महिनाभरात हे व्रण नाहिसे होतील. एवढंच नाही, कोणताही काळा माणूस त्यामुळं गोरापान होईल. पण एकदा माफ केलं म्हणा.’’

मॅडमच्या पाण्यानं भरलेल्या डोळ्यापुढं, छोटा जबील दिसत होता. इतक्याश्या हातानं फटका मारणारा. समोर उभं राहून जबील विचारत होता, ‘‘माफ केलंत का मॅडम? सांगा ना.’’

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“काय गं …!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी…???”

ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अत्यंत  केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापरं भरत बोलली  “….. ताय वंजळभरच पायजेती, द्या की व. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठंच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत.” …. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती.

“नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून…” असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. ‘कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का.’ असं एकटीच बडबडत होती

तेवढ्यात तिचा नवरा राघव आला. “काय झालं, कोणाला बडबडतेस ? इथे तर कोणीच दिसत नाही ?”

“अहो गेले आठ दिवस झाले, एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येतेय. देवाला पाहिजेत म्हणे. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत.”

राघव – “अनघा !!! अगं ती फुलं तर मागतेय. द्यायचीस ना. तसंही मोगरा किती लगडलाय फुलांनी.”

अनघा अभिमानाने म्हणाली – “हो, फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत. अख्ख्या गल्लीत कुणाच्याच बंगल्यात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त माझ्या दारात. आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत. खत, वेळेत कटिंग, पाणी, आणि तुम्हाला माहिती आहे ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. सगळ्या देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत मला.”

राघव – “अगं एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेसं असतं. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच पायाशी. तू वाहिली काय अन् त्या छोट्या मुलीने. देव तर एकच आहे.”

अनघा – “ओ तुमचं लॉजिक तुमच्या जवळ ठेवा. माझे कष्ट आहेत त्यामागे.”

“अनघा – एक सांगू !!!! असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कुणाला आणि काय फुलं तर मागतेय ना .. तिने कुठे तुला जेवण किंवा पैसे मागितले. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं. अनघा !!!! तुला समजवायचं काम केलंय, ऐकायचं का नाही ते तूच ठरव.”

अनघा – “बरं !!! उद्या आली मागायला तर देईन चार फुलं, तेही तुम्ही सांगता म्हणून..”

राघव – “बरं.  पण जरा प्रेमाने दे. रागे नको भरू त्या छोट्या मुलीला.”

अनघा – “हं !”

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारात ती मुलगी उभीच. राग आलेला, पण राघवसाठी देते. ” ये मुली, थांब तिथंच, देते फुलं.” छोट्या पिशवीत पंधरा वीस फुलं तोडून टाकली. तिच्याजवळ जात म्हटलं ..

” उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला !!!!!”

ती मुलगी — अडखळत अडखळत–  ” ताय, ते आठ दिस फुलं पायजेती. देशीला का ? “

अनघा – “आठ दिवस रोज !! कशाला ??”

” ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा, तिथं द्याला मायला पायजे व्हती.” तिची नजर खाली पायाकडं, चेहऱ्यावर निर्विकार भाव. ती बोलली. आवाज खूप लाघवी, हळू. ” माय देवाला बोलली हाय ‘आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन’.”

अनघा – (मनात )- ‘म्हणजे नवस’. तिला जोरात ओरडत…  ” देवाला अर्पण करायला मागून फुलं… घे जा ना विकत, देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत.”

मुलीचा चेहरा खाडकन उतरला, “ताय ….ते… पैसं रोज…… एवढं..”

अनघा – ” कळलं !! नाहीयेत ना पैसे. बोलताच कशाला गं मग असं देवाला. आपल्या कुवतीनुसार बोलावं.”

ती काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.

अनघाला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. उद्या येईल का ? नाही येणार बहुतेक. किती बोललो, ते ही फुलांसाठी. आज ताजी असणारी फुलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं, मोगराही थोडा नाराजच दिसला. ‘जावू दे, उद्याचं उद्या पाहू’ असं म्हणत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच. अनघाला मनात हुश्श वाटलं, ‘आली बाई आज परत….’

“ताय…….” तिने हाक मारली.

अनघा – “हो आले, देते फुलं. कुठं राहतेस गं ?”

ती – “गावाच्या बाहेर पडकी साळा हाय, तिथ.”

अनघा- “घरात कोण कोण आहे ??

ती – ” माय, बा, मोठी बहण, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.”

अनघा – “बरं बरं. घे फुलं आणि निघ.”

ती – “जी ताय.”

आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे… अनघाच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली. स्वतःशी हसत अनघा म्हणत होती – 

‘रोज फुकट फुलं दिली, देवही नकळत आपल्यावर खूष असणारच. मी फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झालाय, नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं ‘ —

एकटीच बोलत होती इतक्यात राघव तिथे आला. “काय एकट्याच गालात हसताय .”

अनघा – ” काही नाही रे राघव, ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येतं होती, पण आता ह्या दहा बारा दिवसात कुठे आलीच नाही.”

राघव – “अगं आता कशाला येईल, तिला आठच दिवस फुलं हवी होती ना ! तसंही तुला तिचं फुलं मागणं आवडतं नव्हतं.”

अनघा – “अरे पण एकदा परत येवून आभार तरी मानायचे तिने माझे. लोकं केलेले उपकार असे विसरतात, म्हणून कुणाला काही देवू नये. तू सांगितलेलं ना म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस. रोज ….”

राघव हसला. 

अनघा – “काय झालं ??”

राघव – “काही नाही.”

तेवढ्यात बाहेरून हाक आली–  “….ताय व ताय….!”

हा तर त्या मुलीचा आवाज. दोघंही बाहेर आली तर दारात ती मुलगी उभी.

अनघा – ” काय आज पण फुलं पाहिजेत का ? आधीच सांगते, नाही देणार. आज फुलं थोडी कमीच लागली आहेत. मला देवपूजेला पाहिजेत.”

ती – “…फुलं नको ताय ……ते…. हे….. हे….”  हातात मळकट फडकं होतं, आणि  त्यात काहीतरी गुंडाळलेले.

अनघा – “काय…. .ते….. हे……”

ती – ” ताय !!!! ते मोठी बहण बाळतपणाला आल्या. ‘ यवस्थित  बाळ हु दे ‘ म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला. तुम्ही फुलं दिली, आयचा नवस पुरा झाला. परवा दिशी मुलगा झाला बहयणीला. यवस्थित हाय सगळं. माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो. ताय, बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी. ‘तुमचं उपकार जन्मभर नाय इसरणार’ –बा बोललाय आसं… अन् माय म्हणली ‘ कुणाचबी काय फुकट घेव नी. आपल्या परीनं परत द्याव.’ म्हणून हे…. घ्या……”

अनघाने ते मळकट फडकं हातात घेतलं. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव अशी, दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती. किती तेजस्वी, आनंदी, सात्विक आहेत दोन्हीही मूर्ती. अनघा आनंदून गेली.

अनघा – त्या मुलीला म्हणाली,  “अगं ऐक !!!”

पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मूर्ती देवून निघूनही गेली. अनघाचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली ती. 

अनघाचे डोळे पाण्याने डबडबले आपण किती खुजे, संकुचित… एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे. सारा गर्व, अभिमान एका झटक्यात गळून पडला…… एखाद्याची कुवत ठरवणारे आपण कोण, का हिने न बोलता आपल्याला आपली कुवत दाखवली……  

मोगऱ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला. आज तो रोजच्यापेक्षा जास्त टवटवीत बहरलेला वाटला……

आपण पण अहंकाराला गंगेत अर्पण करावं … मग बघा संसाराचा मोगरा पण कसा बहरतो ते….. !!!

लेखक – अनामिक

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बायकोतली आई… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ बायकोतली आई… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“गप्प बैस गं, काय कटकट लावली आहेस सकाळपासून, इथे आधीच टेन्शन कमी आहे का..? तुला जी भाजी वाटते ती कर, मी काही म्हणणार नाही…” तो खेकसला तिच्यावर.

तशी आवंढा गिळून बळचं हसु चेहऱ्यावर आणत ती स्वयंपाक घरात आली. “चालेल त्यांना भोपळ्याची भाजी,” असं कापऱ्या आवाजात म्हणाली…

सासुबाईला बाहेरचा त्याचा कडाडणारा आवाज ऐकू आलाच होता, त्याचा चहा घेऊन त्याच बाहेर गेल्या. त्याच्याजवळ बसत म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक ताण आहेत ह्याची तिलाही जाणीव आहे, म्हणून तर गेल्या दोन महिन्यात तुला रुपया न मागता स्वतःच्या भिशीचे पैसे ती घरात वापरतीये. पैठणी भिशीतून तरी घेऊ म्हणत अगदी रंग देखील ठरवला होता तिने, पण तुझ्यावरचं आर्थिक संकट बघुन माघार घेतली, तो पैसा घरात वापरला. तिची छोटीशी सन्मानाची नोकरी ह्या कोरोनाने गेली, नाहितर हातभार लावतच होती ना ती संसाराला, आणि अगदी रस्त्यावर, उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती नाही झालीय आपली.. हा, सगळे शानशोक बंद झाले, पण ते तसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गरजांव्यतिरिक्त होते, मग आहे त्यात समाधान मानायचं सोडून चिडचिड करून जगण्यातली मजा का घालवतोस रे?’ म्हणत आई जरा रागावली त्याला…

तितक्यात त्याचा फोन वाजला, कामावरच्या राजूचा होता. तो उठून बाल्कनीत गेला. मिस कॉलच होता तो, आता त्याला कॉलबॅक करणं आवश्यक होतं. कारण बांधकामाच्या साईटवरचा तो अगदी खास माणूस होता, पण गेल्या दोन महिन्यापूर्वी एका साईटवर काम करताना हॅण्डग्रँडर हातातुन निसटून पूर्ण गुढघ्याला वळसा घालून गेलं होतं, रक्ताची कारंजी उडाली होती आणि राजू त्या दिवसापासून कामावर नव्हता.….

राजूच्या बायकोने फतवाच काढला होता, लंगडत, धडपडत कामावर जायचं नाही, तर पूर्ण बरं वाटेल तेंव्हाच जायचं. त्यामुळे ह्या दोन महिन्यांत भेट नव्हती त्याची. खरंतर फार गरज होती त्याची कामावर. खूप विश्वासू होता तो.

‘बहुतेक हा कामावर येईल आता म्हणूनच फोन असेल…’ असा विचार करत त्याला कॉलबॅक केला,.. “हॅलो बोल राजू,.. येतोस कामावर आज??”

तिकडून आवाज आला.. “सर, कामावर दोन दिवसात येईन पण आज मला थोडे पैसे पाहिजे होते, उद्या मदर्स डे आहे. पोरगा त्याच्या आईसाठी भेटकार्ड बनवत होता तेंव्हा मला कळलं. मला आईला साडी घ्यायची आहे. थोडे पैसे देता का,..?

त्याचं वाक्य पुर्ण होण्याच्या आत हा हसायला लागला.. “अरे राजा, तूझं डोकं आहे ना ठिकाण्यावर, अरे तुझी आई दोन वर्षांपूर्वी वारली ना, मग कोणाला गिफ्ट देतोस तू,..?”

राजू तिकडून म्हणाला, “हसू नका साहेब, ह्या दोन महिन्यात माझी बायको माझी आई झाली होती. लहान लेकरासारखं तिनं माझं सगळं केलं. अगदी खाऊ सुद्धा घातलं, तिनं पाच पाच घरं जास्त भांडी घासायची कामं घेतली. माझ्या कमाईची तिनं भरपाई केली, मला कुठलाही ताण घेऊ दिला नाही.

आता मी पूर्ण बरा झालोय सर.. आपल्या त्या साईटच काम मीच पूर्ण करीन.  पण मला थोडे पैसे द्या.. बायकोला सेमी पैठणी घेऊन देतो.. पैठणी नाही पण सेमिपैठणी तरी घालायची आहे तिला, आणि खूप फोटो काढायचं स्वप्न आहे तिचं….

माझ्या मित्राचं साड्यांचं घरगुती दुकान आहे, तो म्हणाला, ‘तू ये, देतो तुला..’ मला तीन हजार द्या सध्या,.. आपलं काम पन्नासच ठरलेलं आहे ना, मी नक्की करीन ते पूर्ण, आणि आईला नाही कधी साडी घेऊ शकलो पण आता ह्या बाईत गावलेल्या आईला तरी घेऊ द्या.. साईटवर येऊ का पैसे घ्यायला..?”

गडबडत हा म्हणाला, “हो, तासाभरात ये..” म्हणत याने फोन ठेवला आणि सहज बाल्कनीत नजर फिरवली.. छोट्या छोट्या कुंड्यात, वाफ्यात बराच भाजीपाला लावलेला होता.. वेलाला दोडकी, कारली लटकत होती.. कडीपत्ता हवेवर डोलत होता.. आपण एक दिवस ओरडलो होतो.. ‘किती खर्च करता त्या भाजीपाल्यावर,..?’ त्याचं हे उत्तर होतं, त्याकडे आपलं लक्ष पण नाही.

राजूसारखा माणुस त्याच्या बायकोची किती किंमत करतो आणि आपण हिला किती गृहीत धरतो.. आई म्हणते तसं इतकीही आपली परिस्थिती बिकट नाही, फक्त मन बाहेरच्या परिस्थितीने गडबडलं आहे.. आपण उगाच ह्या घरच्यांना धारेवर धरतोय..

तो विचार करत होता तेवढ्यात आईने हाक मारली, “डबा तयार आहे रे….”

निघताना तो हळूच आईला म्हणाला, “हिने भिशी कोणत्या रंगाच्या पैठणीसाठी लावली होती गं, आणि तुझ्याकडे होती ना एक पैठणी.”

आई म्हणाली, “अरे मला मेलीला आता ह्या कॉटन शिवाय काही सहनही होत नाही… म्हणून तुझ्या ताईने पळवली ती तुझ्या लग्नाआधीच, नाहीतर हिला दिलीच असती की मी. आणि माझी जांभळी होती रे, तिला हिरवीगार पैठणी घ्यायची आहे. आता कधी योग येतो की बिचारीला,….?”

साईटवर राजू वाटच बघत होता.. ह्याने त्याला पैसे दिले आणि म्हणाला, “राजा मलाही घेऊन चल ना त्या दुकानात.. मलाही बघू दे साडी, आईला आणि बायकोला घेतो.”

सेमीपैठणीतून राजाने लाल रंग निवडला. ह्याने पण हिरवा रंग घेतला व आईला कॉटनची साडी घेतली.. दुकानाबाहेर पडताना त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी राजाचे आभार मानले.. “आई तर आहेच माझी, पण बायकोतली आई शोधून दिलीस तू,..”

दुसऱ्या दिवशी दोघींना सोफ्यावर बसवल्ं, औक्षण करून त्यांच्या डोक्यावर फुलं टाकत म्हणाला.. “हॅप्पी मदर्स डे, मला माहित आहे आई तुला ही पाश्चिमात्य पद्धत आवडत नाही. मनात प्रेम तर असतंच, पण मला वाटतं प्रेम व्यक्त करायला ठरवला एखादा दिवस तर काय हरकत आहे ना, आणि तो ही आईसाठी आहे.. सेलिब्रेशन घरात तर करतोय..” म्हणत त्याने साड्या दोघींसमोर धरल्या… तिला खूपच आवडला तो हिरवागार रंग.. आईचे तर डोळेच पाणावले, “अरे मला कशाला आणत बसलास ॰..?”

त्याने आईला जवळ घेतलं, “आई सुनेसाठी मला समजवणारी ग्रेट आई आहेस तू.. तुला तर पाहिजेच, आणि राणीसरकारची भिशी सगळा घराचा खर्च पेलतीय तर त्यासमोर ही तर छोटीशी भेट आहे.. पण पुढच्या वेळी अगदी ओरिजनल पैठणी घेईन मी तिला.. आणि तेही मदर्स डे ला.. कारण बघ ना, ती बायको असली तरी.. मला मुलासारखं समजून तर पटकन सावरून धरलंय तिने. आपले अहंकार बाजूला सारून जी बाई नवऱ्यावर प्रेम करू शकते ना आई, ती त्याच्या बायकोतली आई असते…”

आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला…. “अरे प्रत्येक स्त्री मध्येच हे आईपण असतं रे….”

तितक्यात राजूने व्हिडीओ कॉल केला “साहेब तुमचे आभार, आमची आई एकदम खूश आहे बघा..” ती कष्टाने रापलेली त्याची बायको त्या साडीत आनंदी दिसत होती, आईने तिचं फोनवर कौतुक केलं.. नवऱ्याने आपला समाजात वाढवलेला सन्मान बघून ती आणखीनच खुलली.

फोन ठेवला तर समोर.. ही पैठणी नेसुन आली. त्याला ती आताही आपल्या आईसारखी दिसली, अगदी शांत, समाधानी, आनंदी.. गॅलरीत बहरलेल्या हिरव्यागार बागेसारखी..!

 © सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिचडी – भाग – २  ☆ प्रा. बी. एन. चौधरी ☆

प्रा. बी. एन. चौधरी

(प्रा. बी. एन. चौधरी (लेखक / कवी / गझलकार / समिक्षक / व्यंगचित्रकार / पत्रकार) यांचे ई – अभिव्यक्ती समूहातर्फे स्वागत आणि या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन.)

? जीवनरंग ?

☆ खिचडी – भाग – २  ☆ प्रा. बी. एन. चौधरी

(साहित्य संस्कृती मंडळ, बऱ्हाणपूर, म. प्र. आयोजित अ.भा. कमलबेन गुजराती मराठी कथा लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त कथा)—-  

(तोच त्यांचं लक्ष आतल्या दाराकडे गेलं. तिथं सुभाष होता. तो आत काय करतोय हे पाहण्यासाठी त्यांनी  हळूच आत डोकावलं.) इथून पुढे —- 

सुभाषनं हातातली पिशवी जवळच्या लाकडी कपाटावर ठेवली. दोन खांबांना बांधलेल्या झोळी जवळ तो गेला. झोळीत लहान बाळ होतं. ते पडू नये म्हणून त्यास साडीच्या फडक्याने बांधलेलं होतं. त्याने फडक्याची गाठ सोडली. झोळीतून चार पाच वर्षाच्या लहान मुलीला बाहेर कढलं. ती रडून रडून थकली असावी. तिचे केस अस्ताव्यस्त होते. त्याने हातानेच तिचे केस व्यवस्थित केले. हातातलं फडकं जवळ पडलेल्या तांब्यातील पाण्यात बुडवून ते त्याने त्या लहान मुलीच्या चेह-यावर फिरवलं. आता तिला हुशारी आली होती. ती भावाकडे बघून खुदकन हसली. त्याला प्रेमानं बिलगली. त्यानंही तिला ” छकूली माझी ! ” म्हणत पोटाशी लावली. मग तो तिला म्हणाला…..

“छकुली बघ मी तुला काय आणलं, ओळख ? “

लहान छकुली आश्चर्याने त्याच्याकडे पहात म्हणाली…..

” दादा, ताय आणलं तू माझ्यासाठी ? “

” छकुली, अगं तू रात्री खिचडी मागत होती नं आई जवळ ? ….. रात्री आईला खिचडी देता आली नाही नं 

तुला ! ……. म्हणून तूला खिचडी आणली बघ शाळेतून ! ….. गलम गलम खिचडी आहे.”

असं म्हणत सुभाषनं कापडी पिशवीतून डबा काढला. डबा उघडला. त्यात खिचडी होती. त्याला शाळेत मिळालेली. त्याने तिथं स्वतः न खाल्लेली. डब्यातून त्याने खिचडीचा एक घास हातात घेतला. आणि तो त्याच्या बहिणीच्या तोंडात भरवू लागला. तिनेही आनंदाने तो घास तोंडात घेतला. तो भरवत होता. ती खात होती. आनंदत होती. खाता खाता तिनं तिचा हात डब्यात घातला. डब्यातून तिनं चिमूटभर खिचडी घेतली. तो घास तिनं तिच्या भावाच्या तोंडाजवळ नेला.

” दादा, तू पण घे ना ले खिची ….. तू पन जेवला नाही ना राती.” 

सुभाषनं बहिणीच्या हातातला घास मोठ्या  आपुलकीनं तोंडात घेतला. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आणि तोही तिच्याबरोबर खिचडी खाऊ लागला.

” एक घास चिऊला, एक घास काऊला, एक घास माझ्या छकुलीला ! ” असं म्हणत तो तिला भरवू लागला. डब्यातली गरम खिचडी ओठाजवळ नेत, त्यावर फुंकर मारत तो तिला निववत होता. छकुलीला भरवत होता. गरम घासाचा चटका तिला लागू नये याची काळजी घेत होता. छकुलीही त्याच्याकडून आपले लाड पुरवून घेत होती. तो जणू तिची आईच झाला होता. तीही त्याच्याकडे आर्द्र नजरेने पहात त्याला मायेने बिलगत होती. त्याला बिलगतांना तिचे खिचडीने उष्टे भरलेले हात, तोंड  त्याच्या कपड्यांना  लागत होते. मात्र, तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. रात्री घरात खायला काहीच नसल्याने आईसह तो, त्याची बहिण उपाशीच झोपले होते. त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. आपल्या पोटात ओरडणा-या कावळ्यांमुळे नव्हे, तर…. बहिणीच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही म्हणून तो दु:खी होता. रात्रीच त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. सकाळी शाळेत खिचडी मिळेल. तीच आपण घरी आणून बहिणीला खावू घालू या विचारात त्याला रात्रभर झोपच आली नव्हती. याचसाठी सकाळ केव्हा होते याची वाट पहात त्याने भल्या पहाटे शाळा  गाठली होती. मधली सुटी झाल्यावर त्याला मिळालेली खिचडी घेवून त्याने घराकडे धूम ठोकून बहिणीला जेवू घातले होते. त्याच्या चेह-यावर समाधान पसरले होते. अचानक तो मोठा झाला होता. कर्ता झाला होता.

बहिणीला पोटभर खिचडी भरवून त्याने तिचे तोंड, हात, पाय कापडाने स्वच्छ पुसले. तिला पुन्हा झोळीत टाकून त्याने तिला कापड गुंडाळले. त्याची गाठ मारली. तिचा एक छानसा मुका घेत तो म्हणाला…..

” छकुली, झोप हं आता. मी  शाळेत जावून येतो. तोवर आई येईल हं कामावरुन. मग आपण पुन्हा जेवण करु.”

ती पुन्हा हसली निराससपणे. आताचं तिचं हसणं तृप्ततेचं होतं.

झोळीतूनच तिनं हात हलवत टाटा केलं. जणू ती आपल्या लाडक्या भावाला निरोप देत होती.

दाराआडून हे दृष्य पाहणा-या पाटील सरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. शाळेत होणा-या किरकोळ चो-या करणारा चोर सापडल्याच्या त्यांच्या आनंदावर असं अनपेक्षित विरजण पडलं होतं. चोर म्हणून ज्यावर अविश्वास दाखविला, ज्याचा पाठलाग केला तोच सुभाष नात्यांच्या व कर्तव्याच्या कसोटीवर खरा उतरला होता. परिस्थिती माणसाला खोटं बोलायला, चोरी करायला लावते हे सरांना वाटणारं मत सुभाषनं खोटं ठरवलं होतं. उलट त्याच्या आताच्या वागण्यानं  त्याने आदर्शाचं सर्वोच्च शिखर गाठलं होतं.  दिसतं, वाटतं ते सारं खरंच नसतं या गोष्टीवर पाटील सरांचा आता विश्वास दृढ झाला होता. गरीबी, कठीण परीस्थितीतही काही माणसं आपलं इमान विसरत नाहीत. आपल्या कर्तव्याला भुलत नाहीत याचं विहंगम उदाहरण त्यांना सुभाषच्या रुपानं संजयनगरच्या झोपडपट्टीत बघायला मिळालं होतं. सुभाष घरातून बाहेर पडायच्या आत त्यांनी स्वतःला लपवत बाहेरची वाट धरली. आणि ते माणसांच्या गर्दीत मिसळून गेले. थोड्याच वेळात सुभाष दार बंद करून खोपटाच्या बाहेर पडला. त्याने दुडकी घेत शाळेची वाट धरली. मधल्या सुटीनंतरची शाळा सापडावी म्हणून. त्याच्या पाठमो-या देहाकडे पहात पाटील सर स्वतःशीच पुटपुटले ” दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं ! ” आणि तेही शाळेची वाट चालू लागले. आता त्यांच्या वागण्यात ती लगबग नव्हती. ती ओढ नव्हती. होती ती एक बोच. एका प्रामाणिक मुलावर आपण उगाच अविश्वास दाखविल्याची. गरीबीची उगाच चेष्टा केल्याची. एका पराभूत मानसिकतेत ते शाळेत पोहचले. तत्पूर्वी सुभाष शाळेत पोहचला होता. त्याच्याच वर्गातून पू. साने गुरुजींची प्रार्थना ऐकू येत होती…….

खरा तो एकची धर्म,

जगाला प्रेम अर्पावे.

जगी जे दीन पददलित,

तया जाऊन उठवावे !

— समाप्त —

©  प्रा.बी.एन.चौधरी

संपर्क – देवरुप, नेताजी रोड, धरणगाव जि. जळगाव. ४२५१०५. (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिचडी – भाग – १  ☆ प्रा. बी. एन. चौधरी ☆

प्रा. बी. एन. चौधरी

(प्रा. बी. एन. चौधरी (लेखक / कवी / गझलकार / समिक्षक / व्यंगचित्रकार / पत्रकार) यांचे ई – अभिव्यक्ती समूहातर्फे स्वागत आणि या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन.)

? जीवनरंग ?

☆ खिचडी – भाग – १  ☆ प्रा. बी. एन. चौधरी

(साहित्य संस्कृती मंडळ, बऱ्हाणपूर, म. प्र. आयोजित अ.भा. कमलबेन गुजराती मराठी कथा लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त कथा)—- 

प्रगती विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते. वर्गा वर्गात विद्यर्थ्यांचा चिवचिवाट सुरु होता. सकाळची शाळा भरुन बराच वेळ झाला होता. घड्याळात ९ वा ४० मिनिटं झाली. मधल्यासुटीची वेळ झाली, तशी शिपायाने दिर्घ बेल दिली. धरणाची दारं उघडावी आणि पाण्याची लाट बाहेर पडावी तसं मुलांनी क्रिडांगणाकडे धाव घेतली. शाळेत एकच गलका झाला.  

क्रिडांगणावर एका कोप-यात शालेय खिचडी वाटप सुरु होती. विद्यार्थ्यांनी रांगा लावून आपापल्या डब्यात, ताटलीत खिचडी घेतली. सारे खिचडी खायला रांगा करुन बसले. काहींनी घरुन जेवणाचा डबा आणला होता. ते एकमेकांशी वाटावाटी करुन जेवण करु लागले. खोड्या, मस्करी करत मुलांची अंगत पंगत रंगात आली होती. त्याच गर्दीत सातवीचा सुभाष कावरा बावरा होत चिमणीने दाणे टिपावे तसा खिचडीचे बारीक, बारीक घास तोंडात टाकत होता. मित्रांची नजर चुकवत त्याने कसंतरी जेवण उरकलं. डबा बंद केला. आणि तो हात धुवायला पाण्याच्या टाकीवर गेला. हात धुवन ते त्याने आपल्या चड्डीलाच पुसले. गुपचूप,  गुपचूप तो त्याच्या वर्गाकडे गेला. मुलांवर लक्ष ठेवून असलेल्या क्रिडाशिक्षक पाटील सरांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. सारी मुलं आता कुठं जेवायला बसली असतांना सुभाषचं असं लवकर उठणं त्यांना संशयास्पद वाटलं. ते त्याच्या मागोमाग गेले.  सुभाष घाबरा घुबरा होत त्याच्या वर्गातून बाहेर पडत होता. पाटील सरांच्या मनात शंका आली. काही दिवसांपासून वर्गा वर्गातून मधल्या सुटीत मुलांच्या दप्तरातून पैसे, पेन, वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शाऴेतीलच कुणी विद्यार्थी हे काम करत असेल असा सर्व शिक्षकांचा कयास होता. ही गोष्ट पाटील सरांच्या लक्षात आली. ते सावध झाले. त्यांना असल्या भुरट्या चो-या कोण करत असावा याचा आता अंदाज आला होता. ते सुभाषवर बारकाईने लक्ष ठेवून एका कोप-यात थांबले.

सुभाष वर्गातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या हातात एक कापडी पिशवी होती. तिच्यात त्याने काही लपवले होते. आपल्याला कुणी पहात नाही नं हे बघत तो शाळेच्या मेन गेट जवळ गेला. ते बंद होते. त्याने छोट्या गेटचं दार हळूच उघडलं आणि तो शाळेबाहेर पडला. पाटील सर त्याला न दिसता त्याचा पाठलाग करत होते. सुभाष शाळेबाहेर पडला तसा त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पिशिवीकडे आनंदाने बघत, तिला छातीशी लावत त्याने धुम ठोकली.

पाटील सरांना त्याच्या सा-या हालचालींवरुन तोच ह्या छोट्या छट्या चो-या करत असावा याची खात्री पटली. त्याच्या पिशवित मुलांच्या चोरलेल्या वस्तू असतील असे त्यांना वाटले. सुभाषला रंगेहाथ पकडावं असा मनाशी निश्चय करुनच ते ही त्याच्या मागोमाग जावू लागले. सुभाषने आता वेग घेतला होता. त्याला जणू घबाडच हाती लागलं होतं. त्यात त्याला कुणीही बाहेर पडतांना पाहिलं नाही याचाही आनंद दडला होता. झपझप चालता चालता तो आता पळायला लागला. शाळेपासून निघून तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला. मुख्य रस्ता ओलांडत त्याने नगरपालीकेकडे मार्चा वळविला. आणि आता तो नव्याने वसलेल्या संजय नगरच्या झोपडपट्टीकडे जावू लागला. त्याच्या पायांना गती आली होती. तो याच झोपडपट्टीत रहात होता.

पाटील सर मनातल्या मनात खुष होते. ते शाळेत चो-या करणारा चोर सापडल्याच्या आनंदात होते. सुभाषच्या पिशवित इतर मुलांच्या वस्तू, पैशे असतील अशी त्यांची खात्री झाली होती. त्याला रंगे हात पकडून त्याच्या पालकांकडे तक्रार करावी असा मानाशी विचार करत ते चालण्याचा वेग वाढवून चालत होते. त्यांना सुभाषची पार्वभूमी आठवली.

सुभाष हा संजयनगरच्या झोपडपट्टीत राहणा-या झेंडू हमालाचा मुलगा. झेंडूला दारु, गांजा, सट्ट्याचं व्यसन होतं. दिवसभर पोती वाहणं. गाडी लोटणं हे त्याचं कष्टाचं काम. कष्ट विसरण्यासाठी दारु आली. त्यात इतर व्यसनं व्यसनं लागली. त्याचा शेवट क्षय रोग होवून मृत्यूत झाला. त्याच्या  मागे त्याची बायको कमला गावात भंगार, रद्दी, प्लॅस्टिक गोळा करायची. नव-यामागे तिच्यावर संसाराचा भार आला होता. अशिक्षित, निराधार कमलाला संजयनगरवाले जुजबी मदत करत होते. आपल्या मुलानं शिकावं अशी तिची खूप इच्छा. म्हणून ती मुलाला नियमित शाळेत पाठवत होती. त्याला वह्या, पुस्तकं, इतर साहित्याची तजविज करत होती. वेळोवेळी शिक्षकांना भेटत होती. तोच हा सुभाष आज पाटील सरांच्या नजरेत चोर ठरला होता. सुभाष असे उपद्व्याप करेल याची त्यांना पुसटशीही अपेक्षा नव्हती. मात्र, गरीबी माणसाला काहीही करायला लावू शकते याची त्यांना कल्पना होती. या विचारात तेही संजयनगर पर्यंत पोहचले.

सुभाष आता त्याच्या खोपटा जवळ पोहचला होता. खोपटाचं दार बंद होतं. त्याची आई घरी नव्हती. ती  पहाटेच भंगार गोळा करायला निघून गेली असावी. त्याने बाहेर लावलेलं पत्र्याचं दार लोटलं….. आपल्या मागे कुणी नाही हे पहात तो घराचं दार उघडून आत गेला. पाटील सरही पत्र्याचं दार लोटून आत आले. तेथले वातावरण पाहून त्यांना सुभाषच्या गरीबीची खात्री पटली. तेथे पडलेल्या भंगार, प्लॅस्टीक, रद्दीच्या ढिगा-याची त्यांना किळस आली. त्यांनी खिश्यातून रुमाल काढत तो नाकाला लावला. त्यांची भिरभिरती नजर सुभाषला शोधत होती. तोच त्यांचं लक्ष आतल्या दाराकडे गेलं. तिथं सुभाष होता. तो आत काय करतोय हे पाहण्यासाठी त्यांनी  हळूच आत डोकावलं.

– क्रमशः भाग पहिला 

©  प्रा.बी.एन.चौधरी

संपर्क – देवरुप, नेताजी रोड, धरणगाव जि. जळगाव. ४२५१०५. (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महिला दिन म्हणजे ? ☆ सुश्री शैलजा करोडे ☆

? जीवनरंग ?

☆ महिला दिन म्हणजे ? ☆ सुश्री शैलजा करोडे ☆

“ए पोरी, ऊठ ना. ऊठ गं, किती जीव खाशील माझा. बाप फुटकी कवडीही देत नाही घरात. मीच कमवायचं, तुम्हां भावंडांना आणि त्यालाही खाऊ घालायचं. वरून त्याच्या दारूलाही पैसा पुरवायचा. काय जन्म आहे माझा ? नवरा म्हणून कपाळावर लाल कुंकू आणि गळ्यात काळेमणी मिरवायचे एवढाच काय तो त्याचा सहभाग. त्यानं फक्त पोरं जन्माला घालायची. त्यांचं संगोपन नको कि जवाबदारी नको, हिच काय समाजाची रूढी परंपरा ?

मायबापाचंही हेच म्हणणं ‘बाई तुला कुंकवाचा धनी करून दिलाय, आता तू तुझं बघ.’ नवरा नावाचं लायसन माझ्या गळ्यात, तेच माझं सुरक्षा कवच म्हणे ?

ए, ऊठतेस का बर्‍या बोलानं कि घालू लाथ तुला. मी एकटी कुठे कुठे पुरे पडू. जा कचरा गोळा करायला. त्यातून काय मिळतं का बघ. थोडं उशीरा गेलीस तर तुझ्या हाती काही लागायचं नाही. आधीच सगळे घेऊन गेलेले असतील. ऊठ पोरी ऊठ, माझ्या आजच्या चुलीला हातभार लाव गं बाई. काय करू गं, मी हतबल आहे. तुमचं पालन पोषण माझी जिम्मेदारी, पण दिवसरात्र कष्ट करुनही मी नाही पूरी करू शकत गं” म्हणत माय ढसढसा रडू लागली .

“नको रडू माय, मी उठलीय,” मी चूळ भरली, पेला भरुन पाणी प्यायली, आणि कचर्‍यासाठी थैली उचलली.

“लक्ष्मी, थांब बेटा, थोडी चहा पिऊन जा आणि टोपलीत पोळी आहे, चहासोबत खाऊन घे बेटा.”

“ए संतोषी, चल ना.”

“हो ग लक्ष्मी, आलेच मी” म्हणत संतोषी बाहेर आली. दोघीजणी उकीरड्यावर कचरा शोधू लागल्या, काही मिळतं का पाहू लागल्या. जुने सेल, बॅटरी, बिसलेरीच्या बाटल्या, फटाफट त्यांच्या थैलीत टाकत होत्या. लक्ष्मीच्या हाती जुना ट्रान्झिस्टर व जुने दिवार घड्याळ लागले. जणू आज लाॅटरीच लागली. ती आनंदली, मनोमन खुलली.

या आनंदातच घरी येतांना ती शाळेजवळ थबकली. रोजच ती शाळेजवळ थबकायची. युनिफाॅर्म घातलेल्या, दोन वेण्या, पाठीवर दफ्तर घेतलेल्या मुलींचा लक्ष्मीला हेवा वाटायचा. आपल्याला का नाही शाळा शिकवत आपली आई.

“सुलोचना, तुझ्या लक्ष्मीला पाठवत जा गं शाळेत. शिक्षणा प्रगती होईल, ज्ञान वाढेल आणि जे आयुष्य तुझ्या वाटेला आलं ना ते नाही येणार तिच्या वाटेला, कारण ती शिकलेली राहील, स्वतःच्या पायावर उभी राहील, आत्मनिर्भर बनेल.” शाळेच्या शिक्षिका तिला समजावित होत्या.

“खरंय बाई तुमचं, पण आमची पण मजबुरी समजून घ्या ना. लक्ष्मी सकाळी कचरा गोळा करते ४०- ५० रूपयं सुटतात. दुपारी आपल्या धाकट्या भावाला सांभाळते. ती त्याला सांभाळते म्हणूनच मी काम करू शकते बाई, आणि मी काम करते म्हणूनच घर चालतं माझं.”

लक्ष्मीला शाळेचं दर्शन काही झालं नाही. ती रोज अशी आशाळभूतपणे शाळेकडे बघायची. आज शाळेत वेगळंच वातावरण होतं. शाळेतील मुले महिला शिक्षिकांना कर्मचार्‍यांना गुलाबपुष्प व ग्रिटींग देत होती.  “Happy women’s day . महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा” देत होते.

“ए संतोषी, महिला म्हणजे काय गं?”

“काय माहीत, पण ती मुलं बाईंना गुलाब फुलं देत आहेत, म्हणजे बाई म्हणजे महिला असेल बहुतेक,’

‘आणि महिलादिन म्हणजे ? ‘

‘ते नाही बाई मला माहित.”

दोघी घराच्या वाटेला लागल्या. लक्ष्मी ने आपल्या झोपडीचे दार उघडले. छोटा चेतन झोळीत झोपलेला होता. माय कामावर गेलेली होती. जाण्यापूर्वी तिनं वांग्या बटाट्याची भाजी करून झाकून ठेवली होती.

इतक्यात चेतन रडायला लागला. “अरे, झाली का झोप ? जागा झालास दादा. आली हं मी, म्हणत लक्ष्मीने त्याला अलगद झोळीतून बाहेर काढले आणि त्याला आपल्या छोट्याशा बाथरूमकडे (घरात केलेला छोटासा आडोसा) घेऊन गेली.      चेतनची शी शू झाली तशी तिने त्याला स्वच्छ केले, आंघोळ घातली आणि टॉवेलमध्ये गुंडाळून बाजेवर आणले. त्याला कपडे घातले. पावडर टिकली केली. बाळ खूपचं साजिरं दिसायला लागलं. ” माझा गोड गोडुला भाऊ…” म्हणत तिने त्याचा गालगुच्चा घेतला. मायनं सकाळी दूध आणून गरम करुन ठेवलं होतं. लक्ष्मीने दूध वाटीत घेऊन भावाला भरवलं. तो ही भराभर दूध पीत होता.      दूध पिऊन झाले तशी तिने भावाला खाली उतरविले, ” खेळ हं राजा आता, ताईला काम करू दे.” लक्ष्मीने घर स्वच्छ केलं, झाडून, पूसून काढलं, कपडे धुतले, वाळत टाकले, स्वतःची वेणी घातली, तोपर्यंत जेवणाची वेळ झाली. तिने भावाला वरणात पोळी चुरून बारीक बारीक घास त्याला भरविले, स्वतःचेही जेवण उरकले. 

आज कचर्‍यात तिला मूळाक्षरांचं पुस्तकंही मिळालं होतं, अन ते पाहून ती मनोमन आनंदली होती. अ अननसाचा अ सोबत अननसचं चित्र, लक्ष्मी मन लावून, भान हरपून ते पुस्तक पाहात होती. एवढ्यात आळीत शेवंता मावशी सगळ्यांना सांगत होती,

“आज आपल्या वार्डच्या नगरसेविकेने सगळ्यांना महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी बोलावलंय, चला सगळ्यांनी.”

महिला दिन ?’ लक्ष्मीला पुन्हा प्रश्न पडला. चला आपणही पाहूया महिला दिन म्हणजे काय आहे ते ? तिने चेतनला कडेवर घेतले व ती ही निघाली आळीतल्या महिलांसोबत.

सभामंडपात अनेक स्त्रिया जमल्या होत्या. व्यासपीठावरही आज समाजातील उच्चपदस्थ महिला विराजमान होत्या. आयोजिका नगर सेविकेने प्रास्ताविकात म्हटले, “स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कामाचे समान तास, समान वेतन, महिलांना मतदानाचा हक्क, अशा विविध मागण्यांसाठी हा लढा सुरू झाला आणि १९१० सालापासून ८ मार्च महिला दिन साजरा होऊ लागला व १९७७ या वर्षी युनो ने ८ मार्च जागतिक महिलादिन म्हणून घोषित केला.”

आता प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरु झालं. आपण महिला घर व नोकरी व्यवसाय अशी दुहेरी कसरत करतो. घरातील मुलांचं संगोपन, वृद्धांची सेवा, सण वार, व्रत वैकल्य, येणारा जाणारा, पाहुणा रावळा, सगळंच पाहातो. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावत स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. पण तरीही तिचं आज विविध पातळीवर शोषण सुरू आहेच, मग हे शोषण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय, सर्वच स्तरावर होत आहे, ते थांबलं पाहिजे, स्त्रियांना न्यायहक्क मिळालाच पाहिजे, ही जनजागृती व्हावी म्हणून हा महिला दिन. आज रोजच्या कामकाजातून उसंत मिळून तुम्ही क्षणभर विसावा घ्यावा म्हणून हा प्रपंच. आज महिलांसाठी विविध खेळ, विजेत्यांना बक्षिसे, पैठणीची सोडत व शेवटी स्नेह भोजन आपण करणार आहोत.”

लक्ष्मी कान देऊन ऐकत होती, समजण्याचा प्रयत्न करीत होती. माझा बाप दारू पिवून धिंगाणा घालतो, मायनं दिवसभर केलेल्या कष्टांची कमाई काढून घेतो, वरुन तिला मारहाण व शिवीगाळ, ही कसली समानता.

लक्ष्मी घरी आली. “कोठे गेली होतीस गं”

“माय महिलादिनाच्या कार्यक्रमाला आळीतल्या सगळ्या बायांसोबत गेले होते पण महिलादिन म्हणजे काय ते मला समजलं माय.”

“मोठी आली हुशार, मला सगळं समजलंय म्हणणारी….” सुलोचनाच्या डोळ्यात लेकीविषयी कौतुक होतं.

रात्री लक्ष्मीचा बाप सदा झिंगतच घरी आला. “ए, जेवाय वाढ.” त्यानं गुर्मीतच सुलोचनाला सुनावलं. सुलोचनानं कांदा घालून केलेला झुणका, लोणचं, हिरव्या मिरचीचा खर्डा वाढला.

“हे काय जेवाण आहे ?” म्हणत त्यानं अन्नाचं ताट भिरकावलं. चेतन भितीने रडायला लागला, लक्ष्मी दचकून कोपर्‍यात उभी राहिली. सदा आता सुलोचनाला मारहाण करू लागला तशी लक्ष्मी चिडली वॉर्डातील नगरसेविकेकडे गेली, “मॅडम, लवकर चला, माझा बाप मायला खूप मारतोय.”

मॅडमनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला व स्वतः लक्ष्मीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. नगरसेविकेला पहाताच सदा मारायचा थांबला, वरमला व माफी मागू लागला.     

“आता माफी मागतोय, रोज बायकोला मारहाण करायची, दारूत पैसा उडवायचा, संसाराची राखरांगोळी करायची, लाज नाही वाटत काय रे तुला. माफी कसली, तुला तर जेलची हवाच पाहिजे, तेव्हा कोठे तुझी अक्कल ठिकाणावर येईल.”

इतक्यात पोलीस आले, “घेऊन जा याला. सुलोचनाला घेऊन येते मी पोलीस स्टेशनला, कौटुंबिक हिंसाचाराखाली करा याला जेरबंद.” नगरसेविका मीनाक्षीताई बोलत होत्या.

“सुलोचना, लक्ष्मीला शिकू दे. गुणी मुलगी आहे तुझी. शाळेत तिला वह्या, पुस्तके, गणवेष, मध्यान्ह भोजनही मिळेल. चेतनसाठी पाळणाघर आहेच की. कष्टकरी, कामकरी महिलांच्या मुलांसाठी शासनाने पाळणाघराचीही योजना आणली आहे.”

“मग तर प्रश्नच मिटला ताई. पण यांना पोलिसांनी बंद केलंय.”

“राहू दे चार आठ दिवस तिथेच, येईल अक्कल ठिकाणावर, नंतर घरी येंणारच आहे तो. काही काळजी करू नकोस. येते मी.”

आज लक्ष्मीला महिला, महिलादिन, महिलांचे हक्क समजले होते. तिची शिक्षणाची वाटही मोकळी झाली होती. खर्‍या अर्थाने आज महिलादिन साजरा झाला होता.

©  सुश्री शैलजा करोडे 

संपर्क – नेरूळ, नवी मुंबई. मो.9764808391

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धाकलं काळीज काढून देताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

धाकलं काळीज काढून देताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

बापाचं काळीज! पाषाणासारखं कठीण असतं असं लोक म्हणतात. आणि तसं दिसतंही लांबून पाहणाऱ्याला. या पाषाणाच्या अंतरंगात झुळझुळु वाहणारा झरा जर स्पर्शायचा असेल तर या काळजाच्या आत हात घालावा लागतो.

देवानं माणसाला एकच काळीज दिलेलं असलं तरी आई-बापांना जितकी मुलं,  तितकी काळजं दिलेली असतात. आणि ह्या काळजांना काळजीची काजळी सतत काळवंडत असते! मुलांच्या हृदयाची स्पंदनं जितकी आनंदाची तितकी ही काळजं सुपाएवढी होतात. यांना थोडा जरी धक्का लागला ना, इजा झाली ना, तर आई-बापाच्या काळजात कळा उठतात!       

आपण गोकुळचे नंदराजा नसू, नसू आपण यशोदा… पण आपलं घर म्हणजे गोकूळ आणि या गोकुळातले तान्हे आपले कृष्ण-बलराम! ही जोडी आयुष्यातल्या संकटाच्या कंसावर एक न एक दिवस चालून जाईल, हे माहीत असतं जीवाला! त्यांच्या सामर्थ्याचा अदमास असतोच…. पण मनात भीतीचा एक अनामिक काटाही रुतत असतो…. जगात कंस एकटा नाही आणि कंस जगात एकच नाही!

कुणी सांगितलं नव्हतं बाळकृष्णाला की तुला कंसाचा नि:पात करायचा आहे, त्यासाठीच तुझा अवतार! पण गोकुळातल्या गोपांसवे गाई चारायला घेऊन जाऊ लागल्यावर कान्हाला जग समजू लागलं.

मथुरेला दूध घालायला निघालेल्या गोपिकांच्या खोड्या काढण्याचा आगाऊपणा हा केवळ दूध-दही-लोणी चोरण्यासाठी नव्हता…कन्हैयाला गोकुळातलं दूध राक्षसांसाठी देणं नको होतं!

माझा कृष्ण असाच आपल्या देश नावाच्या गोकुळाच्या शत्रूविरुद्ध, मथुरेच्या सीमेवर दंड थोपटून नुकताच उभा राहिला होता. जायचंच म्हणाला तेंव्हा त्याला मी ‘नाही’ म्हणू शकलो नाही. सिंहांचा बछडा थोडाच कुणाला विचारून झेप घेतो सावजावर?

माझा बछडा असाच निर्धास्त होता. आज आहोत तर उद्या नसूही शकतो याचा विचार पक्का असलेला. पण जोवर असू तोवर आपल्या असण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा निश्चय तर होताच त्याचा.

सैनिकाच्या काळजात गोळी सुसाट वेगाने घुसते ना… तेंव्हा त्या गोळीच्या व्यासाएवढंच छिद्र दिसतं बाहेरून… पण आतमध्ये जगणं विदीर्ण झालेलं असतं…. जीवनाला भगदाड पाडून ती गोळी जणू काहीही झालं नाही असं भासवत आरपार निघून जाते. तर कधी हट्टानं त्या काळजातच रुतून बसते. तसं होतं सैनिकाच्या बापाचं काळीज. आईचा आक्रोश सवयीचा झालाय आपल्या. पण बापाचं मूक रूदन कानांवर रेघोट्या नाही मारत कुणाच्या.

आमचा लेक, आमचा यश म्हणायचा फौजेत जायचंय, रुबाबात आणि शिस्तीत जगायचंय बिनधास्तपणे… देशाच्या दुश्मनाच्या छाताडात रायफल मधली मॅगझीन रिकामी करायचीये! दुश्मनाच्याही हाती रायफल असते,तिच्यातूनही गोळ्या सुटतात याचा विचारही त्याच्या मनात नसायचा!

तरूण रक्त असंच तर असतं… सळसळतं… स्वत:च्या प्रवाहात सारं काही वाहवून घेऊन जाण्याच्या ताकदीचं… एखाद्या त्सुनामीसारखं.

या रक्ताला थांबवणारा मी कोण? माझ्याही जवानीत माझेही हात सळसळत होतेच की. पण तो योग नव्हता. पोरगा माझ्याच डोळ्यांनी सीमेचे रक्षण करणार होता तर मग मी कशाला मध्ये येऊ. “जा,पण जपून रहा” एवढंच तर म्हणू शकतो बाप! आई “जा” असं नाही म्हणू शकत कधी. “लवकर ये… नीट ये” असं मात्र म्हणत राहते आसवांतून…. त्याला निरोप देताना.

रडण्याची परवानगी नाही बापांच्या डोळ्यांना. या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं आणि जागत राहायचं… बंद पापण्यांच्या आडोशानं!

रात्री-अपरात्री फोन येऊ शकतो म्हणून सावध झोपायची सवयच होऊन जाते सैनिकांच्या घरच्यांना. हा अनुभव घेऊ लागायला आम्हाला एकच तर वर्ष झालं होतं. थोड्याशा शेतीवर गुजराण करत होतो आम्ही. दोन मुलं आणि दोन मुली.

यश जवान झाला आणि आणखी जवान व्हायचं स्वप्न पाहू लागला. गावातले दोन जण होते फौजेत. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीन म्हणायचा. देशाला सैनिक शेतांतूनच तर मिळतात… मातीत राबणारी शरीरं प्रसंगी मातीत मिसळून जायलाही मागे-पुढे पहात नाहीत. यश शेतात काम करता करता लष्करात भरती होण्यासाठीची धूळपाटी गिरवायचा.

अठरा वर्षांचं कोवळं पोर ते…. पण खानदेशच्या भलत्या उन्हात घाम गाळायचं. झाला भरती. गेला ट्रेनिंगला. त्याला गाडीत बसवून देताना हिला तर काही सुचत नव्हतं. गावात अर्धा भाकरतुकडा मिळत होताच की. पोरगं नजरेसमोर राहिलं असतं… पण त्याच्या नजरेसमोर शौर्य उभं होतं… नोकरी नव्हती फक्त.

ट्रेनिंगवरून आला तो यश आमचा नव्हताच… देशाचा झाला होता. बारीक कुडी.. पण डोळ्यांत आणखी चमक. ताठ चालणं आणि थेट बोलणं. आमच्या घराण्यातला पहिला शिपाईगडी म्हणायचा यश! त्याच्या बोलण्यातूनच सैन्यातले शब्द आमच्या कानांवर पडले…. युनिट, बटालियन, पोस्ट, ऑपरेशन… आणि बरंच काही.

त्याची आई त्याला म्हणायची… “सांभाळून रहा…” तो म्हणायचा “देश सांभाळायला मिळालाय…. देशच आता मला सांभाळेल.”

 कश्मिरात लागली ड्यूटी पहिल्याच वर्षी. तीन महिन्यांपूर्वीच सुट्टीवर आला होता. म्हणाला एखादे दिवशी तुम्हांला फिरवून आणेन भारताचा स्वर्ग… कश्मिर!

सा-या गावाचा निरोप घेऊन गेला…. ”जातो आई!”  म्हणाला… आई म्हणाली “अरे, येतो म्हणावं.” म्हणाला, “ते काय सैनिकाच्या हातात असतं?”  गेला..!

भ्याड हल्ल्याला वाघही बळी पडतात कधी कधी. अन्यथा यश एकटा नसता गेला. समोरासमोर शत्रूशी गाठ पडली असती तर…. दोघं-तिघं अतिरेकी तर त्यानं नक्कीच सोबत नेले असते…. त्यांना नरकापर्यंत पोहोचवायला, आणि मगच ताठ मानेनं प्रवेश केला असता त्यानं स्वर्गातल्या हुतात्म्यांच्या जगात!

२६ नोव्हेंबर २०२०. दुपारी बातमी आली. गावकऱ्यांना आधी समजलं होतं काय झालं ते… आमच्या म्हाताऱ्या काळजांच्या काळजीनं लोकांनी लवकर नाही येऊ दिले ते शब्द आमच्या कानांवर. आमचं यश नावाचं काळीज जळून गेलं होतं… पण त्या ज्वाळा चंदनाच्या होत्या…. त्यातून शौर्याचा, देशभक्तीचा सुगंध पसरला होता आमच्या रानोमाळी!

“शहीद यश देशमुख अमर रहे” च्या घोषणा अजून तशा ताज्याच होत्या गावातल्या वाऱ्यात…. सारा देश उभा होता पाठीशी… यशने आमच्यासाठी खूप काही करून ठेवले होते…

दु:खाचे कढ काळाच्या फुंकरीने थोडे थंड होऊ लागले होते… तेवढ्यात दुसरं काळीज जागेवरून हललं. म्हणालं…. “दादाचं स्वप्न पुरं करायचंय… मी ही जातो!”

ही मनातून म्हणाली असेल.. “तू जाशील तर आम्ही कुणाकडं पहायचं?” आणि मग तिला आठवलं असेल की यश गेल्यानंतर देश आपल्या पाठीशी कसा उभा राहिला ते! देशसेवा, आणि ती ही सैनिक बनून करायला मिळणे हे फक्त निवडक रक्ताचं भाग्य. इतर जीव विविध कारणांनी मृत्यूमुखी पडतात पण सैनिकाच्या मुखावर मृत्यूच्या भयाचं नामोनिशान नसतं… हा तर स्वर्गाचा राजमार्ग!

धाकटा पंकज म्हणाला, “दादाचं स्वप्न पुरं करायचंय! गेलं तर पाहिजेच! कृष्ण गेला तरी बलराम आहे की अजून!”

सारं बळ एकवटलं वाणीत… म्हणालो.. .”जा…की! तुला कोण अ‍डवणार. दादाचं राहिलेलं काम भावानं नाही हाती घ्यायचं तर कुणी? कृष्णाचा नांगर बलरामच हाती घेणार ना!

“सांभाळून रहा!” आम्ही दोघंही पंकजला म्हणालो… यशला म्हणालो होतो तसं. तसबीरीतला यश बघत असावा आमच्याकडे! आता आमचं धाकलं काळीज सीमेवर उभं आहे!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव मधील सामान्य शेतकरी दिगंबर देशमुख आणि सुरेखाताई देशमुख यांचा थोरला लेक यश श्रीनगर मध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या टेरोटोरीयल आर्मीच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’चा सदस्य होता. २६ नोव्हेंबर,२०२० रोजी श्रीनगर मधील खुशीपोरा भागात ही टीम बंदोबस्तासाठी नुकतीच तैनात होत असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर लपून छपून गोळीबार केल्याने शिपाई रतनसिंग आणि शिपाई यश देशमुख धारातीर्थी पडले.

यशचे वडील दिगंबरदादा आणि मातोश्री सुरेखाताईंनी हा आघात झालेला असतानाही केवळ तिसऱ्याच वर्षी आपला धाकटा लेक पंकज यास सैन्यात धाडले… केव्हढे हे धाडस!

एकुलता एक मुलगा सैन्यात धाडलेले अनेक आई-बाप आहेत. त्यांना त्रिवार वंदन. एकुलता एक लेक गमावलेले, आपले दोन्ही लेक गमावलेले किती तरी माता-पिता आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात. त्यांचे दु:ख इतरांना समजू शकेलच असं नाही. त्यांच्या त्यागाचे मूल्य आपण कशानेही करू शकणार नाही.

हुतात्म्यांसाठी प्रार्थना करणे आणि त्यांच्या मागे राहिलेल्या त्यांच्या जीवलगांप्रती कृतज्ञताभाव ठेवणे ही एक नागरीक म्हणून आपली जबाबदारीच आहे… किमान नोंद तर आपण घेऊच शकतो!

(सदर लेखन श्री. दिगंबरदादा देशमुख यांच्या भूमिकेत जाऊन केलेले लेखन आहे. सैनिक आणि त्यांचे आई-बाप शब्दांतून सहसा व्यक्त होत नाहीत. यातील घटना, नावे मात्र खरी आहेत.)  

 © श्री संभाजी बबन गायके

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print