मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप लेकाचा अनोखा खटला !!… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ बाप लेकाचा अनोखा खटला !!… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

आपल्या मुलाबद्दल तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला.

न्यायाधीशांनी विचारले की तुमची काय तक्रार आहे.

वृद्ध वडील म्हणाले, मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे.

न्यायाधीश म्हणाले की, हा तुमचा अधिकार आहे. यामध्ये सुनावणीची गरज नाही. तुमचा सांभाळ तुमच्या मुलाने केलाच पाहिजे. ते त्यांचं कर्तव्यच आहे.

वडील म्हणाले की मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. पण तरीही मला माझ्या मुलाकडून दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे.

न्यायाधीश आश्चर्यचकित झाले,ते त्या वृद्ध वडीलांना म्हणाले “जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या पैशांची काय गरज आहे ?”

यावर त्या वृद्ध वडीलांनी आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता सांगितला. वडील न्यायाधीशांना म्हणाले, माझ्या मुलाला कोर्टात बोलावलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल.

न्यायाधीश त्या मुलाला कोर्टात बोलावून घेतात आणि सांगतात की, तुमच्या वडीलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे,मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल.

न्यायाधीशांचं बोलणे ऐकून मुलगा गोंधळून जातो आणि म्हणतो, माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही मग त्यांना माझ्या पैशांची काय गरज आहे ?

न्यायाधीश म्हणतात, ही तुमच्या वडीलांची मागणी आहे आणि त्यांचा हक्क पण आहे.

मग वडील म्हणतात, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या मुलाला सांगा की, त्याने मला दरमहा फक्त १०० रुपये द्यावे, परंतु अट अशी आहे की त्याने स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये.

न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या मुलाला सांगतात की, तुम्ही दर महिन्याला १०० रुपये तुमच्या वडिलांना विलंब न करता हातात आणून देत जावे आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा !

खटला संपल्यावर न्यायाधीश त्या वृद्ध वडिलांना आपल्याकडे बोलवतात. तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या मुलावर हा खटला का दाखल केला आणि मुलाकडून फारच तुटपुंजी किंमत का मागितली ? असे का ??

आता मात्र त्या वृद्ध वडीलांचे डोळे पाणावले. न्यायाधीश साहेब,मला माझ्या मुलाचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती, तो त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की, मला त्याला भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच पण मोबाईलवर ही कधी आम्ही बोललो मला खरच् काही आठवत नाही.

माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे.म्हणूनच मी त्याच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरुन दर महिन्याला तो माझ्यासमोर येईल, त्याला पाहून माझ्या मनाला आनंद होईल.

वृद्ध वडीलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही जर हे मला आधी सांगितले असते तर वडीलांना दुर्लक्षित केल्याचा आणि सांभाळ न केल्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी तुमच्या मुलाला सुनावली असती.

यावर ते वृद्ध वडील हसतमुखाने न्यायाधीशांकडे बघतात आणि म्हणतात, माझ्या मुलाला शिक्षा झाली आणि ते ही माझ्यामुळे या सारखे वाईट काय ! कारण माझा त्याच्यावर खूप जीव आहे आणि माझ्यामुळे त्याला शिक्षा किंवा त्रास झालेलं मला कधीच सहन होणार नाही.

हे सर्व तो मुलगा लांबून ऐकत असतो. आता मात्र त्याच्याही डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो. तो धावत येतो आणि वडीलांना मिठी मारतो. बस्स ! अजून काय हवं असतं म्हातारपणी आईवडीलांना….

मित्रांनो हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाहीत… हो ना !!!

लेखक – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 2 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆  लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 2 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

(त्यासाठी सोप्या इंग्रजी बोलीतून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो इतकंच.  तेवढं तर शिक्षकानं करायलाच हवं ना?”) इथून पुढे. 

काय बोलावं हे न सुचल्यानं मी शांत. मला माझे बांधव दिसू लागले होते. दुसरी-तिसरीच्या पाठ्यपुस्तकातले मराठी शब्दही योग्य तऱ्हेनं न लिहिणारे. तरीही प्रसवोत्सुक. रोज नवं नवं साहित्य जन्माला घालण्याची घाई झालेले. त्यासाठी ‘कळा’ही न सोसणारे. ‘अभिनंदन’ कधी करावं आणि ‘शुभेच्छा’ कधी द्याव्यात हेसुद्धा न कळणारे. अशी माणसं जर ‘मराठीचे अध्यापक’ म्हणून मिरवत असतील तर ते इंग्रजीचं काय करत असतील? घरात एकही शब्दकोश न ठेवणाऱ्या अशा माणसांना इनसायक्लोपिडियाचे सगळे खंड उशाशी ठेवणाऱ्या या बाई समजणार तरी कशा? बरं त्या काही महाविद्यालयात शिकवत नव्हत्या. त्या शिकवत होत्या माध्यमिक शाळेत. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या मुली आज आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे मळे फुलवत आहेत यात नवल काय? 

श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई

“अहो हे शब्दकोश, हे खंड जसे मला उपयोगी पडत होते, तसे नकाशे आणि माझे हे कात्रण-पुठ्ठेही.”

“तुम्ही गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर अध्यापन केलं ते इंग्रजीचं. मग नकाशाचा संबंध आला तरी कुठे?”

“आपण विषय असे तोडतो हेच चुकतं. सगळे विषय एकमेकांच्या मदतीनं शिकवले तर विद्यार्थ्यांच्या गळी चांगले उतरतात, हा माझा अनुभव.”

“पण नकाशा?”

“तुम्हाला मी उदाहरणच देते. तेव्हा दहावीला एक कविता होती फ्लॉरेन्स नाइटिंगेलवरची. ‘लेडी विथ द लॅम्प’. ही बाई परिचारिका, लेखिका आणि संख्याशास्त्रज्ञ. १८५३च्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची शुश्रूषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ म्हणूनच जग ओळखू लागलं. आता हे सारं मुलींना समजावून द्यायचं तर ते युद्ध, ती युद्धभूमी दाखवायला नको का? नुसते कवितेतल्या शब्दांचे अर्थ सांगून कुठं कविता समजते का? तेव्हा मला हे खंड आणि नकाशा उपयोगाला आले. दोन दिवस नकाशा वर्गात टांगून मी आधी ते युद्ध समजावून दिलं आणि मग ती कविता. तेव्हा कुठं ती फ्लॉरेन्स माझ्या मुलींच्या काळजात उतरली. कविता जर काळजात उतरली नाही तर मग काय उपयोग?”

काय बोलणार यावर? आमच्या भूगोलाच्या मंडळींनीही नकाशाला हात न लावण्याची शपथ घेतलेली. तिथं या बाई इंग्रजीच्या तासाला नकाशा वापरत होत्या. अशा बाई आम्हाला लाभल्या असत्या तर आमचं इंग्रजी निदान ‘बरं’ झालं असतं असं मला राहून राहून वाटत होतं. 

“पण तुम्ही तर गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर शिकवलं इंग्रजी. मग गणिताचं काय झालं? तुमची गणिताची आवड?”

“ती आवड मला स्वस्थ बसू देते थोडीच?  इंग्रजी मला शिकवावी लागली म्हणून मी शिकले. सर्वस्व पणाला लावून त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं. पण माझा जीव गणितातच अडकलेला. मग मी अकरावी, बारावीच्या मुलांसाठी गणिताचे वर्ग घेऊ लागले. पैसे कमावण्याची हौस नव्हतीच. माझा पगार मला नियमित मिळत होता. पुरेसा होता. हे वर्ग घेतले ते केवळ माझ्या हौसेसाठी. गणिताची नाळ टिकून राहावी म्हणून.”

पुन्हा माझ्याभोवती माझेच बांधव. खाजगी शिष्यवृत्ती परीक्षांना सक्तीनं  मुलं बसवून पालकांकडून फी आणि परीक्षा घेणाऱ्यांकडून कमिशन घेणारे. परीक्षार्थींच्या संख्येच्या प्रमाणात आधीच निकाल वाटून घेणारे. दोन-चार जिल्ह्यांत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेतील आधीच ठरलेल्या निकालाचे फलक मात्र ‘जिल्ह्यात… राज्यात… देशात पहिला’ असे. तेही चौकाचौकांत लावणारे. यांना बाई समजतील? गंमत म्हणजे हे ‘जिल्ह्यात… राज्यात पहिले’ शासकीय शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत का चमकत नाहीत, हे कोडं न सुटणारं. 

बाईंचं आजचं वय ९५. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा कात्रण-गठ्ठ्यांचा उद्योग नियमित सुरू होता. आता त्या थकल्या असल्या तरी अजूनही तितक्याच उत्साहानं ‘शिकणं आणि शिकवणं’ यावर बोलत असतात आणि फक्त यावरच बोलत असतात. गुढीपाडव्यादिवशी बऱ्याच दिवसांनी त्यांच्याशी गप्पा झाल्या. दुसरा विषय त्यांच्या बोलण्यात आलाच नाही. मी अजूनही त्यांच्यातला ‘शिक्षक’ समजून घेण्याच्या प्रयत्नात. सहज विचारलं परवा त्यांना. 

“एकटं राहण्याचा त्रास नाही झाला? शाळेत… समाजात?”

“आपण आपल्या कामात व्यग्र आणि विचारांवर ठाम असलो की कुणी नादाला लागतच नाही. त्यातूनही कुणी लागलं तर आपली इवलीशी तर्जनीसुद्धा कामी येते.”

“म्हणजे? मी नाही समजलो.”

“सांगते. वार्षिक तपासणी सुरू होती. विस्तार अधिकाऱ्यांसोबत उपशिक्षणाधिकारीही आलेले. त्यांनी माझं इंग्रजी शिकवणं पाहिलं. त्यांना ते आवडलंही. चहापानावेळच्या शिक्षकांच्या बैठकीत त्यांनी माझं कौतुकही केलं त्याबद्दल. आणि नको तो प्रश्न विचारला. म्हणाले, ‘बाई तुम्ही लग्न का नाही केलंत?’ 

त्यांच्या मनात काही नसेलही, त्यांचा हेतूही चांगला असेल. पण मला ते खटकलं. त्यांच्याकडं तर्जनी रोखत मी म्हटलं, ‘इटस् नन ऑफ युवर बिझनेस सर’. आणि बैठकीतून बाहेर पडले. अशी गंमत.”

बाईंच्या हसऱ्या चेहऱ्यावर खट्याळपणाची एक हलकी रेषा.

बाई हे ठामपणे बोलू शकल्या कारण त्यांना कसलाही मोह नव्हता. ना कुठल्या पुरस्काराचा, ना ‘अत्युत्कृष्ट’ शेऱ्याचा. अशा शेऱ्यासाठी नळावरच्या भांडणासारखं वचावचा भांडणाऱ्या मला नव्या नव्हत्या. पण या बाईंचं पाणी वेगळंच होतं. त्यांनी रोखलेली ‘ती’ तर्जनी ताठ होती ती त्याच पाण्यामुळं. त्यांच्या चोख कामामुळं. त्याच बळावर त्यांची सारी वाटचाल दिमाखात झालेली. त्यांचा हाच बाणेदारपणा सोबत घेऊन त्यांच्या अनेक मुलींची वाटचाल सुरू आहे, तशाच दिमाखात.  

धवल चारित्र्य, निष्कलंक हात, आपलं काम उत्तमच व्हायला हवं याचा ध्यास आणि विद्यार्थ्याविषयीची तळमळ या शिदोरीवर सांगलीच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेत सुमती बाबुराव फडकेबाईंनी आपला कार्यकाळ गाजवला. यथावकाश त्या निवृत्त झाल्या तरी त्यांच्या मुलींच्या काळजात त्यांचं स्थान आजही कायम आहे. ते कायम राहील यात कसलीच शंका नाही. 

कारण काळजात जागा मिळते ती आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या दिव्यांनाच. मेणबत्त्या काय घरभर असतातच. 

— समाप्त —

लेखक :  श्री सदानंद कदम 

मो. ९४२०७९१६८०

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ऊपरवाला देता है तो … ☆ हिन्दी-रूपांतरण – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

☆  कथा-कहानी  ☆ ऊपरवाला देता है तो … ☆ हिन्दी-रूपांतरण – सौ. उज्ज्वला केळकर

 एना और जोसेफ एक सुखी दंपति है। जोसेफ का इंपोर्ट-एक्सपोर्टका व्यवसाय है। वह व्यवसाय सम्हालता है और एना अकाउंट्स देखती है। उनके सुख में एक ही मलाल है, काँटे की तरह चुभनेवाला। विवाह के पाँच साल हो गये किंतु अब तक उन्हें कोई इश्यू नहीं है। अब यह काँटा निकालने की भी उन्होंने ठान ली।  

दोनों शहर के नामी डॉक्टर के पास गए। डॉक्टर ने दोनों की बारीकी से जाँच की और बताया, बच्चा पैदा करने में जोसेफ सक्षम है किंतु एना कभी माँ नहीं बन सकती।

अब क्या करें? दोनों विचार-विमर्श करने लगे। एना ने कहा, ‘‘किसी अनाथालय से बच्चा गोद लेंगे और उसे पाल-पोस कर बड़ा करेंगे। बच्चा बढ़ता जाएगा और हमें आनंद, सुख मिलेगा।’

जोसेफ ने कहा, ‘मैं बाप बन सकता हूँ, तो क्यों न मैं अपना बच्चा पैदा करूँ? हम सरोगेट मदरके बारे में  सोचेंगे। वह बच्चा दोनों का ना सही, कम से कम मेरा तो होगा ना!’

थोड़ा विचार-विमर्श करने के बाद एना ने अपनी सहमति जताई।

जोसेफने दैनिक न्यूज बुलेटिन में सरोगेट मदरके बारे में एड दे दी। इस एड को मैरी की ओर से प्रतिसाद मिला।

मुलाकात के वक्त मैरीने बताया, ‘उसके दो बच्चे और एक बच्ची है। बच्ची छोटी रोझेलिना। वह पेट में थी, तब उस का पति जॉन, हार्ट अटैक से स्वर्गवासीहुआ।

रोझेलिना अब डेढ़ साल की है। उस का बडा भाई एरिक तीन साल का और उस से बडा लेस्ली पाँच साल का है।’

मैरी कुछ घरों में साफ-सफाई का काम करती है और बच्चों को पालती है। मैरी ने सोचा, सरोगेट मदर की जिम्मेदारी निभाई, तो अच्छे पैसे मिलेंगे।

बच्चों का पालन-पोषण और अच्छी तरह से कर सकूँगी। उन्हें अधिक सुविधा दे सकूँगी।

मैरी के हामी भरने के बाद डॉक्टर साहब ने उसकी बारीकी से जाँच की। मैरी थोड़ी दुबली थी किंतु उसका गर्भाशय सशक्त था। थोड़ी पौष्टिक खुराक, ताजे फल,

टॉनिक मिल जाय, तो उसकी प्रकृति सुधारने में ज्यादा दिन नहीं लगेंगे, यह डॉक्टर साहब की राय थी। आखिर सर्व संमतिनुसार डॉक्टर साहब ने टेस्ट ट्यूब द्वारा

मैरी के गर्भाशय में बीज रोपित किया।

उस के बाद डॉक्टर साहब ने जब पहली बार मैरी की जाँच की, तब वे कुछ हद तक हड़बड़ा गए। उसके गर्भाशयमें दो नहीं, तीन बच्चे पल रहे थे।

तीन-तीन बच्चों का गर्भ में पलना उसके लिए जानलेवा हो सकता था क्योंकि वह बहुत दुबली थी।

डॉक्टर साहब ने मैरी से कहा, ‘तीन में से एक भ्रूण एबॉर्ट करेंगे, लेकिन सीधी-सादी, सदाचारी, पापभीरू, श्रद्धालू मैरी ने कहा,

‘ये नहीं हो सकता डॉक्टर साहब! ये तीनों बच्चे मेरे अपने भी तो हैं। इनमें से किसी एक को मैं कैसे मरवा सकती हूँ?’

डॉक्टर साहब ने मैरी को समझाने की बहुत कोशिश की, लेकिन मैरी नहीं मानी।

दिन बीतते गए। मैरी के पेट में बच्चे पलते रहे। अब उस की डिलिव्हरी का समय समीप आ गया। एक दिन मैरी पेट के दर्द से कराहने लगी।

उसे हॉस्पिटल में एडमिट किया गया। बाहर एना और जोसेफ बहुत ही उत्साहित थे। आखिर प्रतीक्षा का क्षण समाप्त हुआ। बाहर आते-आते डॉक्टर साहब ने कहा,

‘काँग्रेचुलेशन! तीन बच्चे हुए हैं। तीनों बच्चे गोल-मटोल, स्वस्थ, सुदृढ़ हैं।’ उन के पीछे-पीछे एक नर्स बच्चों को लेकर बाहर आयी। बच्चों को देखते हुए एना बोली,

‘देखो जोसेफ, तुम्हें अपना एक बच्चा चाहिये था। प्रभू येशू ने तुम्हें तीन-तीन बच्चे दिये। चलो, अब मैरी से मिल कर आते हैं।

इतने में असिस्टेंट डॉक्टर बाहर आए। उन्होंने मैरी का ब्लड प्रेशर शूट हो जाने के कारण उसके गुजर जाने का शोक समाचार सुना दिया। समाचार सुनने के बाद दोनों स्तब्ध थे।

इस स्थिति से थोड़ा उबरने के बाद जोसेफ ने कहा, ‘अब मैरी के बच्चे भी अपने ही हैं।’

‘हाँ! मैरी के कोई नजदीकी रिश्तेदार नहीं है। हम उन्हें अनाथाश्रम में नहीं भेज सकते। हमारे बच्चों को जन्म देते हुए मैरी का देहांत हो गया है।’ एना का गला भर आया।

‘देख, तू अनाथाश्रम से एक बच्चा एडॉप्ट करने का सोच रही थी। मैरी माय ने तुझे तीन-तीन बच्चे दिये।‘

एक ओर मैरी के दु:खद निधन का शोक, दूसरी ओर बच्चों की प्राप्ति का आनंद और तीसरी ओर इन छ: बच्चों को अच्छी तरह से पाल-पोस कर बड़ा करने की चिंता में डूबे  वे दोनों छ: बच्चों को गाड़ी में रखने लगे।

मूल कल्पना – डॉ. मिलिंद विनोद   

स्वैर संक्षिप्त रुपांतर – सौ. उज्ज्वला केळकर

सम्पादिका ई-अभिव्यक्ती (मराठी)

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सख्खे भाऊ… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  जीवनरंग ?

☆ सख्खे भाऊ… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

सखाराम वायाळ  मुंबईत कापडाच्या मीलमध्ये कामाला होता.ती बंद पडल्यावर आपलं बिऱ्हाड घेऊन तो गावी आला .  गावातल्या एका किराणामालाच्या दुकानात काम करून तो आपलं घर चालवत होता.त्याची बायको हौसाबाई कुणाच्याही शेतात कामाला जाई.एका पावसाळ्यात कामावरून येताना ती नदीच्या पाण्यात वाहून गेली होती.त्यानंतर सखारामनं सुरेश आणि शशिकांत या आपल्या दोन मुलांना आईची पोकळी जाणवून दिली नाही. शिकून शशिकांत त्या गावच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता.सिनिरीऑरिटी,

कामाचा अनुभव,मेहनत आणि  अंगभूत गुणांमुळे  तो तिथेच मुख्याध्यापक झाला.सुरेशनं गावातील शेतकऱ्यांच्या भाज्या,फळे विकत घेऊन त्यांचे पॅकिंग करून मुंबईत विकण्याचा धंदा सुरू केला.दोघांचीही आपापल्या क्षेत्रात होणारी प्रगती पाहून सखाराम आनंदी होता.वयोमानानुसार तो आता थकला होता.त्याचा ७५ वा वाढदिवस दोन्ही मुलांनी गावात थाटामाटाने साजरा केला.गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रातील अनेक मोठी माणसं या सोहळ्याला उपस्थित होती.कार्यक्रमानंतर रात्री जेवताना शशिकांत आपल्या वडीलांना म्हणाला,” दादा,आम्हा दोघा भावंडांची इच्छा आहे की,उद्यापासून तुम्ही कामावर जाणं थांबवावं”.

” पण बाबांनो, घरी बसून मी काय करू ? घर खायला उठंल रे मला” सखाराम उत्तरला.

” मग सुरेशच्या धंद्यात त्याला मदत करा” शशिकांत म्हणाला.

दुसऱ्या दिवसापासून सखाराम सुरेशच्या कामात मदत करू लागला.

सुरेशचं काम हलकं झालं.  गावाकडील सगळी कामं सखाराम पाहू लागल्यानं सुरेश मुंबईला  वारंवार जाऊ लागला.तिथल्या रंगीबेरंगी जीवनाकडे तो आकर्षित झाला.तिथल्या मित्रांसोबत तो दारू पिऊ लागला,बारमध्ये जाऊ लागला.धंद्यावरचं त्याचं लक्ष कमी होऊ लागलं. त्याला पैशाची चणचण भासू लागली.आपले नाद पुरवण्यासाठी तो कुणाकडूनही हातउसने पैसे घेऊ लागला. गावाकडं शशिकांतला 

उत्कृष्ट काम केल्याबद्दल मोठे पारितोषिक जाहीर झाले.राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते हे त्याला मिळणार होते.सुरेशने हे आपल्या मित्रांना सांगितलं.त्यांनी सुरेशचे कान भरले.” अरे तू इथं हाडाची काडं करतो आणि तुझा भाऊ तिकडं काहीच काम न करता मोठमोठी बक्षीसं मिळवतो “.सुरेशला हे पटलं.तो गावी दारू पिऊन आला.शशिकांत घरी नव्हता. सखारामपुढं तो शशिकांतला शिव्या देत राहीला.सखारामनं त्याला आडवलं.” अरे, दारू पिऊन तू काय बडबडतोस ? काय अवदसा तुला आठवली आज ? ” ” तू थोबाड बंद कर थेरड्या ” असं म्हणून त्यानं आपल्या बापाला कोपर्‍यात ढकललं. या घटनेनंतर सखारामनं हाय खाल्ली. त्यानं अंथरूण धरलं.सुरेशचे पायही खोलात चालले.त्याचा धंदाही बसला.आपले चेकने घेतलेले पन्नास हजार रुपये परत केले नाही म्हणून कुणीतरी त्याच्यावर पोलीसात तक्रार केली.त्याला शोधत पोलीस त्याच्या घरी आले आणि त्याला अटक करून घेऊन गेले.हे झालं तेव्हा शशिकांत घरी नव्हता.संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की,सखाराम अंथरूणावर रडत होता.

शशिकांतला त्यानं घडलेलं सगळं सांगीतलं.वडीलांना शशिकांतनं धीर दिला आणि तो तडक पोलीसचौकीत गेला.शशिकांतला पहाताच ड्युटीवरचा हवालदार म्हणाला,” सर  ,तुमच्या भावानं एकाचे पन्नास हजार रुपये घेऊन ते परत दिले नाही अशी कंप्लेंट आली म्हणून त्यांना

आणलंय “.शशिकांतच्या विनंतीवरून ते गृहस्थ चौकीत आले.शशिकांतनं त्यांना पन्नास हजारांचा चेक दिल्यावर त्यांनी केस मागं घेतली.सुरेशला घेऊन शशिकांत घरी आला.

शशिकांतच्या मागोमाग सुरेश घरात आला.मात्र आपल्या वडीलांच्या नजरेला नजर देण्याचं टाळत  होता.अपराधी भावनेनं तो एका कोपर्‍यात उभा राहिला.त्याला असं अवघडलेलं पाहून सखाराम अंथरूणावर कसाबसा उभा राहिला.शशिकांत आणि सुरेशला त्याने आपल्या कुशीत घेतलं.तिघेही रडू लागले.

सखारामच्या पायावर कोसळत सुरेश म्हणाला, ” आबा,चुकलो मी.तुम्हा दोघांना मी दारूच्या नशेत टाकून बोललो.”

” बाळा,आता आसं नको बोलू.तूच म्हंला ना दारू प्युन बोल्ला”

” हा आबा” असं म्हणून त्यानं घरात कुठंतरी ठेवलेली दारूची बाटली दूर फेकून दिली.

” आबा,शशिकांतनं माझे डोळे उघडले.आता तसला मूर्खपना मी कर्नार नाही.माजा धंदा मी पुन्ना  चालू करीन. तुमी काई पन करू नका.फक्त तुमचा आशिरवाद द्या “.

” बाळा,तू परत काम चालू कर्नार. आनी मी काय पडून राहू काय?”

असं म्हणून सखारामनं अंथरूण  बाजूला सारलं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुसरी बाजू (पाच अ.ल.क.)… सौ. स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

?जीवनरंग ?

☆ दुसरी बाजू (पाच अ...)… सौ. स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

.

आदित्य…आमच्या Society मधला एक उमदा, हरहुन्नरी तरुण…घरच्या उत्तम संस्कारात वाढलेला….

सहा महिन्यापासून अचानक केस वाढवायला लागला.. साहजिकच  लोकांच्या चर्चेला विषय….

हल्ली मुलेही मुलींसारखे केस वाढवतात… छान Bow बांधतात… नवी Fashion आहे… असे काहीबाही कानावर पडत असेच..

परवा  अगदी रात्री उशिरा  भेटला… 

“Hello काकू, कशी आहेस ?”

” मी ठीक.. पण तुला मात्र पटकन ओळखले नाही. .. नव्या रुपात..”

” हो.. सध्या एका संस्थेशी जोडला गेलो आहे… केस दर सहा महिन्यांनी कॅन्सर रुग्णांना दान करतो …

… अजून खूप कमावता नसल्याने आर्थिक लगेच शक्य नाही….. तर जे शक्य आहे तेवढे तरी !!

.

परवा मी बसमधून गावात निघाले होते…

बसला तुफान गर्दी होती… अगदी खचाखच भरलेल्या बसमध्ये नीट उभेही राहता येत नव्हते…

अशातच एक आजोबा S.N.D.T. ला चढले… साहजिकच ते उभेच होते…. 

दहाच मिनिटे झाली आणि एक बाई उठल्या… एका College युवकापाशी गेल्या आणि  जोरात भांडायला लागल्या..

” काय रे, काही समजते का…हे आजोबा उभे आहेत आणि तू आरामात बसला आहेस?… कॉलेज, घरात हेच शिकवतात का तुला ? तुला नाही का उभे राहता येत? “ ….. झालं…सगळी बस त्याच्यावर तुटून पडली…बसच्या वेगापेक्षा लोकांच्या फटकाऱ्याचा वेग खूप जास्त होता ! तो बिचारा निमूटपणे उभा राहिला…..  

थोड्या वेळाने त्याचा स्टॉप आला व जाता जाता त्या बाईंना म्हणाला, ” काकू , पंधरा दिवसांपूर्वी माझे Appendix चे Operation झालेय… आज माझी महत्वाची परीक्षा होती, की जी बुडली असती तर माझे पूर्ण Semester वाया गेले असते… सहज उभारणे शक्य नव्हते म्हणून बसून होतो ! “

एवढे बोलून झरकन उतरून गेला…… 

.

तिच्या आईच्या मते ही पिढीच काहीशी अलिप्त… स्वतःमध्येच गुंग, थोडीशी मतलबी अशीच….. 

तिचा नवीन नोकरीचा पाहिला पगार हातात आला… आज ती घरी आली ती थिरकत्या पायानेच !!

” मावशी, रविवारी सगळया कामावर सुट्टी सांगा.”

” का ग बयो? काय आहे रविवारी?”

“अहो माझा पाहिला पगार झालाय…. तुम्ही , आई आणि मी मिळून मस्त आख्खा दिवसभर लोणावळा फिरून , धमाल करून येऊयात.  माझ्या या यशात तुमच्या दोघींचीही खूप मोठा वाटा आहे !!”

.

तो पक्का नास्तिक… त्यामूळेच ‘ देवपूजेशी ‘ त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही….

ती ३०…३२ वर्षांची तरुण विधवा…एक ३-४ वर्षांचे छोटे बाळ पदरात… रोज एका ठराविक ठिकाणी ‘ फुले  विक्रीचा ‘  धंदा करत असे…. रोज बाजारातून फुलांची खरेदी करणे, आणलेल्या वेगवेगळ्या फुलांचे ढीग, 

फुलांचे हार, गजरे करणे. सोबतच बाळालाही सांभाळणे या सर्वात गुंतलेली असे….तिचा रोजचा  ‘ One Woman Show ‘ चालू असे…..

संध्याकाळी गिऱ्हाईकं येत असत.. पण हिची जरा सुकलेली, मरगळलेली, तजेला नसलेली अशी फुले, हार बघून दुसरीकडे जात असत.. … हिला बरेचदा गिऱ्हाईकांकडून  फक्त सहानभूती, चुचकारे मिळत असत … शेवटी तिचा  फुलविक्रीचा धंदा हा तिच्या रोजी-रोटीचा प्रश्न होता !

 ….  त्या दिवशी तो तिच्या स्टॉलवर आला… उगीचच थोडी फुले विकत घेतली…. जरासा रेंगाळला आणि पिशवीतून एक स्प्रे बॉटल काढून तिला देत म्हणाला ,” मावशी, यातील थोडे थोडे पाणी  दर दोन तासांनी फुलांवर, हारांवर मारत जा म्हणजे फुले छान टवटवीत राहतील…. सुकणार नाहीत !!”

… आता तिला विक्रीसाठी वेळ अपुरा पडतो…

.

ती नववीमधील गोड मुलगी… जरा खेडेगाववजा गावात राहणारी…

सुधारणेचे वारे कितीही जोरात असले तरी ते शहरी भागात….निमशहरी, खेडेगावात वातावरण थोडे वेगळेच.. तसेच जगतानाचे नियमही…

ही रोज शाळेच्या वेळी शाळेच्या Uniform मध्ये.. तर इतर वेळी अगदी  ठरलेल्या नियोजित पोशाखात… अगदी  चाकोरी आखून घेतल्यासारखे…तिला नातेवाइकांचे सततच टोचून शेरे असत…’ Fashion हा शब्द माहितीच नाही..’, ‘ काकूबाई आहे अगदी..’

परवा गाठ पडल्यावर सहज बोलतांना यावर बोलणे झाले…” काकू , मी पण सगळी Fashion करते.. फक्त ज्यावेळी आम्ही महित्यातून एकदा शहरगावात जातो ना तेव्हा… आई बाबा सोबत असताना…

कारण इथे गावात मी तशी राहिले तर त्याचा त्रास माझ्यापेक्षा आई बाबांना जास्त होईल !! “

लेखिका : – स्मिता कुलकर्णी, पुणे.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अति लघु कथा…. (अलक)… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? जीवनरंग ❤️

☆ अति लघु कथा… (अलक)… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

लघु कथा  – – १

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

लघु कथा – -२.

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.

लघु कथा  – -३.

आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.

लघु कथा  – – ४.

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.

लघु कथा  – -५.

ऑफिसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.

लघु कथा  – -६.

वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय.

लघु कथा  – -७.

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .

लघु कथा  – -८.

खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनीला म्हणाली, “ वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे. “  तर वहिनी म्हणाल्या, “ अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की. सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते. “ 

— रिमोटने tv केव्हाच बंद केला होता.

लघु कथा  – -९.

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये…. तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच ५००० चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला “ लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.” …… त्या पाकिटापुढे आज सारी प्रेझेंट्स फेल वाटली तिला.

लघु कथा  – -१०.

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला. ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने. स्वैपाक खोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या. “ हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.”

लघु कथा  – -११.

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय, मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

—  सकारात्मक रहा…सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय. अश्यावेळी अश्या सकारात्मक लघुकथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे. जगात सगळेच इतके वाईट नाहीयेत.

—चांगल्या माणसांची संख्या वाईटांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे हे जग सुंदर झालं आहे —

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : शामसुंदर धोपटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मृगाचा पाऊस… लेखिका : सुश्री कुसुमावती देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ?

☆ मृगाचा पाऊस… लेखिका : सुश्री कुसुमावती देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे

चार दिवसांपासून दुपारचे ढग येत. खूप अंधारी येई. पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे व पावसाचें सर्व अवसान कुठल्याकुठे निघून जाई. तिनें दोन दिवस वाट पाहिली. तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार. घरांतला दाणादुणा संपत आला. उद्यांला खायला कांही नव्हतें, म्हणून ती जिवाचा धडा करून बाजाराकडे निघालीच.

झोंपडीच्या छपराच्या एका झरोक्यांतून मधून मधून उजेडाची एक तिरीप येई. तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात तिचा तान्हा कितीतरी वेळ पडून राही. नेहमीप्रमाणे तिनें त्याला टोपलीत घालून त्या ठिकाणी ठेवला. त्याच्या भोवती गुंडाळलेले फडके आणखी नीटनीटकें केलें व ती बाहेर पडली. तिनें झोंपडीला कडी घातली व एकवार घराच्या भोवताली नजर फेंकून ती झपाझप निघाली. तिनें पोराला एकटें टाकले, पण वादळ झाले तर त्याच्या अंगावर घालण्याइतका तिचा पदर तरी कुठे धड होता ?

बाजार गच्च भरला होता. वादळाच्या भीतीनें सर्वांची एकच धडपड चालली होती. आपल्याजवळ छत्री आहे, आपण टांग्यांतून जाऊं – ही चार पैशाचा दाणा घेणारी दुष्काळांतली भुतें कशाच्या आसऱ्याला उभी राहतील, असा विचार कोणाच्या मनांत येणार ? एकच धांदल व एकच कोलाहल उडून गेला होता. तशांत रोजचा वारा सुटला. पण तो आज एकटाच आला नाहीं. पश्चिमेच्या बाजूला पसरलेल्या प्रचंड काळ्याकुट मेघांच्या बाजूने तो आला व त्याची साक्ष म्हणून त्याच्याबरोबर तडातड् मारणारे टपोरे थेंबही आले.

पांच मिनिटांत सर्व जलमय होऊन गेले. मग पहिले अवसान ओसरलें, पण उघाडीचा प्रश्नच नव्हता. पाऊस पडतच राहिला. दोन अडीच महिने जिवाचे रान करून धरणीने वाट पाहिली. पर्जन्यरायाने पहिलीच भेट इतक्या अलोट प्रेमाने दिली. त्यामुळे तिचें मुख प्रसन्नतेनें खुलून गेलें. झाडांना टवटवी आली घरें छपरें स्वच्छ धुवून निघाली. रस्त्याच्या बाजूंनी लहान लहान ओहळ धावूं लागले. मुले बाळे ‘पाऊस- पाऊस’ करीत आपल्या ओसऱ्यातून, खिडक्यांतून गंमत पहात उभी राहिली. मोठ्यांचीही कविहृदये पावसाच्या त्या प्रसन्न, उदात्त दृश्याने फुलून गेली; पाण्याच्या निनादांत तन्मय होऊन गेली.

पण ती ? ती कुठे होती? तिचा बाजार झाला का? वादळाचा पहिला थेंब अंगावर पडतात ती त्या सरी इतक्याच वेगाने धावत निघाली . तिचे छबडे त्या झरोक्याखाली होते ना? एवढ्या प्रचंड झंजावाताने एकादे कौल उडवून दिले तर ? कुठेतरी थोडेसे छिद्र सांपडले की तिथे भगदाड पाडणें हे या राक्षसी वादळाचे कामच . तिला वाटू लागले एखादे कौल ढासळले तर बाळाच्या अंगावर पडायचे. तो रडूं नये म्हणून केवडा मूर्खपणा केला मी ?

तिला घर किती दूर वाटू लागले! जातांना तिला वेळेची जाणीवही झाली नव्हती. आतां तिच्या पायाखालची वाट सरेना. त्यांतच रस्त्यावर पाणी साचलेले. ‘ माझा बाळ निजला असेल का ? झरोक्यांतून गळणाऱ्या पाण्याने भिजला तर पडसें येईल त्याला. ‘

ती विचार करीत होती का चालत होती – रस्त्यावर होती का झोंपडीत बाळापाशी होती हे तिलाच कळत नव्हते. यंत्राप्रमाणे तिचे पाय रस्त्यावरचें पाणी तुडवीत धांवत होते. डोक्यावरचा पदर भिजून चिंब झाला. गालांवर केसावरचे ओघळ वाहू लागले. पाठीवर सारखा पावसाचा मारा बसत होता. झपझप पावलांनी उडणाऱ्या चिखलांनी पोटऱ्या, पाठीकडले लुगडें भरून गेले.

दुरून तिला झोपडी दिसली. दार लागलेलेच होते. बाहेरून तर सर्व व्यवस्थित होतें. जवळपासचे वृक्ष डोलून डोलून थकले होते. पण एकदा गति मिळाल्यावर त्यांच्या लहान फांद्या व पानें अजून नाचतच होती. त्यांचा तो हिरवा नाच तिच्या बाळाला किती आवडे !

तिने दार उघडले. झोपडीत उजेड जास्त झाला होता. एक कौल पडलें होतें. पण तें पलीकडे. बाळापासून दूर चार हातावर त्याचे तुकडे तुकडे झाले होते. तिचा जीव खाली पडला. “निजलं आहे गुणाचं,” असें म्हणून ती चटदिशी जवळ गेली. झरोक्यांतून येणाऱ्या पाण्याने बाळाची टोपली ओली चिंब झाली होती. गारठ्यानें मुठी घट्ट आवळून खूप रडल्यानंतर थकून तो पडला होता. तिनें त्याला चटकन उचलून पोटाशी धरले व ती खाली बसली. किती उत्सुकतेनें तो तिच्या उबेत शिरला ! तिच्या डोळ्यांतूनही आनंदाच्या मृगधारा सुरू झाल्या.

जून १९३१

लेखिका – सुश्री कुसुमावती देशपांडे  

संग्राहिका – सुश्री  माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कारावास… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ कारावास… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

‘होणार सून मी या घरची’ सीरियल संपली.साडेआठचा भोंगा झाला.दारावरची बेल वाजली.टी.व्ही.चे बटण बंद करून काठीचा आधार घेत विमलबाई उठल्या.सावकाश पावले टाकत दारापर्यंत गेल्या.दार  उघडले.जेवणाचा डबा डबेवाल्याकडून घेतला आणि पुन्हा सावकाश जेवणाच्या टेबलापर्यंत गेल्या.डबा ठेवला.काॅटवर झोपलेल्या श्रीधरपंतांना त्यांनी उठवून बसवले.थोडे पाणी प्यायला दिले.

” बरं वाटतं का आता? चार घास भरवू का?” हातानेच बरं वाटतंय.जेवण नको.अशी खूण केली.त्यांचे डोळे खोल गेले होते.औषधाने सारखी ग्लानी येत होती.शरीरापेक्षा मनाने ते जास्त खचले होते.

‘अहो! गोळ्या घ्यायच्या आहेत.चार घास खा ‘ असे म्हणत वरणभाताचे चार घास लहान बाळासारखे बळजबरीने भरवले.तोंड पुसले.पाणी प्यायला  दिले.

स्वत:ला जेवण्यासाठी ताट वाढून घेतले.डोळे भरून आले.समोरचे दिसेनासे झाले.मन भूतकाळात गेले.

सातवी पास झालेल्या विमलाबाई वयाच्या चौदाव्या वर्षी श्रीधरपंताशी लग्न करून सासरी आल्या.घरची श्रीमंती.येण्याऱ्या जाणाऱ्यांचे घर.सासू- सासरे थकलेले.नव्या सुनेच्या हातात घरच्या किल्ल्या देऊन सासूबाई मोकळ्या झाल्या.विमलाबाईचे जबाबदारी पेलण्याचे वय नव्हते.दिल्या घरी असेल तसे रहावे.पडेल ते काम करावे ही माहेरची शिकवण.दुसऱ्या पर्यायच नव्हता.पडेल ते काम आनंदाने करायचे.सासऱ्यांना कुकरमध्ये तयार केलेले जेवण आवडत नसे.चुलीवर किंवा शेगडीवर त्यांच्यासाठी जेवण करावे लागे.रोज घरात वीस-पंचवीस माणसांचे जेवण तयार करावे लागे.तेही सकाळी-संध्याकाळी ताजे. सणवार ,उत्सव,समारंभ, असेल तर शंभर माणसांचा स्वयंपाक विमलबाईनाच करावा लागे.साक्षात अन्नपूर्णा त्या.त्यांनी अनेक जीवांना तृप्त केले.

आपली चार मुले सांभाळत दोन नंदांची लग्ने केली.त्यांची बाळंतपणे झाली.मुले मोठी झाली.जावई आले.सून आली.नातवंडे झाली.

यात किती काळ लोटला हे कळलेच नाही.स्वंयपाकघर मात्र सुटले नाही.

घरचे काम आवरून झाले की त्या घरच्या दुकानदारीत लक्ष घालीत.झोपेचे सहा-सात सोडले तर बाकी सर्व वेळ या बाईचा कामात जाई.आपली मुले शहाणी व्हावीत, सुसंस्कृत व्हावीत, म्हणून त्याबाबत कुठेही तडजोड केली नाही.सगळे आनंदाने सहन केले.घर एकत्र राहावे.घरात सदैव सुख नांदावे म्हणून बऱ्याच गोष्टी निमुटपणे सहन केल्या.त्यांच्या लग्नाला ५६ वर्षं झाली.सून येऊन पंधरा- सोळा वर्ष लोटली. घरात सूप वाजू नये म्हणून बऱ्याच ठिकाणी समजूतदार दाखवला.सुनेला लेकीप्रमाणे वागवले. तिला काय हवे नको ते पाहिले.तिच्या आवडी- निवडी सांभाळल्या. तरी भांड्याला भांडे लागेच.टी.व्ही.बघण्यावरून, मुलांना वळण लावण्यावरून,विकतचे खाद्यपदार्थ मुलांना देण्यावरून,काम करण्यावरून कुरबुर सुरू झाली.विमलाबाईच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला.त्यात श्रीधरपंतांना  अर्धांगवायूचा झटका आला.सत्तरी पार केलेल्या गुडघ्याच्या दुखण्याने बेजार असलेल्या विमलबाईना नवऱ्याची उसाबर करणे शक्य नव्हते.रजा काढून चार दिवस मुलाने सेवा केली.पण आता कायमची सेवा आपल्या करावी लागणार हे जाणून सुनेने भांडण काढले.

दुनियेची रीत आहे.म्हतारपण तरुणपणाला नको असते.म्हतारपणाचा अनुभव हवा असतो,पैसा हवा असतो,मदत हवी असते,सोबत हवी असते.पण नको असते ते म्हाताऱ्यांचे आजारपण,त्यांची सेवा,त्यांचे बोलणे,त्यांचे शहाणपण,शिकवणे.

युज  अॅड थ्रो’ च्या जमाण्यात म्हातारपण म्हणजे केवळ कर्तव्य पूर्ती. सेवा विकत घेणे, आई-वडिलांसाठी केअरटेकर ठेवणे ,औषध-पाण्याचा खर्च करणे त्यांच्या राहण्याची,जेवणाची सोय करणे म्हणजे कर्तव्य संपले असे वाटते.आम्ही त्यांना काही कमी पडू देत नाही.ही त्यांची भावना.

खरं तर म्हातारपणी अन्नाच्या भुकेपेक्षा भुक असते चार प्रेमळ शब्दांची,हवा असतो माणसांचा सहवास, आपुलकीच्या चार शब्दांची हाक आणि आपण कुणाला तरी हवे आहोत ही जाणीव.याचा आज वणवा आहे.

जिथे केवळ कर्तव्य पूर्ती असते तिथे म्हातारपण फुलत नाही.तर जिवंतपणी मरते.

विमलबाई विचार करत होत्या,आपण कुठे चुकलो? इतक्या वर्षात आपण आपल्या आवडीची एक गोष्ट केली नाही,कधी हौसमौज केली नाही,कधी मला हे पाहिजे असा हट्ट केला नाही.सर्व घराचा विचार केला. प्रत्येक वेळी मन मारले.नवऱ्याला साथ दिली.संसार हेच आपले विश्व झाले. तरी मी कुठे कमी पडले?आज चार मुले असूनही मी अनाथ का झाले? मुलांनी वृध्दाश्रमात घातले असते तरी चालले असते.तिथल्या समदुःखी माणसांच्यात मन रमले असते.

सर्व सोयीनियुक्त असलेल्या या एका स्वतंत्र खोलीत आमचा जीव घुसमटतोय.एकटेपणा खायला उठतोय.इथे मरणप्राय यातना भोगतोय, हा कारावास असह्य होतय.कोणत्या न केलेल्या चूकीची शिक्षा भोगतोय? यात दोष कुणाचा?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(“आई, मी खूप शिकेन, मोठा होईन, मग बघ. तुला काही कमी नाही पडू देणार! “– नयनाच्या डोळ्यात पाणी आले.) — इथून पुढे —

त्या वर्षी नयना रोहितला आपल्या बरोबर घेऊन आली.

वसुधाने हळूच विचारले, “ नयना,रोहितला सांगितलंस का कारखानीस साहेबांबद्दल?”

“अजून नाही ग. पण मी साहेबांनाही,’ एक वर्ष  द्या मला,’असं म्हटलंय. मी हळूहळू सांगेन रोहितलाही .”

 त्या दिवशी संध्याकाळी  पेढे आणि फुले घेऊन कारखानीस नयनाच्या वाढदिवसाला आले. अचानक ते घरी आल्यामुळे नयना गोंधळून गेली. रोहित घरी होता. नयनाने रोहितशी त्यांची ओळख करून दिली.

“ हॅलो रोहित ! मी सुधीर कारखानीस ! तुझ्या बाबांच्या आणि आता आईच्याही बँकेत  आहे. कसा आहेस तू यंग मॅन? “– त्याच्याशी शेक हॅन्ड करत मोकळेपणाने साहेबांनी विचारले.–“ काय करतोस? पुढे काय करायची इच्छा आहे ? असेही त्यांनी त्याला विचारले.

रोहितने खुलून जाऊन मनमोकळेपणाने उत्तरे दिली— “ मला आर्मीत जायचंय.” तो ठामपणे म्हणाला.

नयना हे बघत होतीच., तिला साहेबांचे आश्चर्य वाटले. काहीही कल्पना न देता ते तिच्या घरी आले,आणि किती छान बोलले रोहितशी.– असे जर झाले,तर गोष्टी सहज आणि सुरळीत होतील,असे वाटले तिला.

 त्या दिवशी  शाळेतून येताना, अचानक कारखानीससाहेब भेटले रोहितला. “ चल रे रोहित,सोडू का तुला मी घरी?” 

” काका,पण हा माझा मित्र पण आहे बरोबर!” संकोचून रोहित म्हणाला,

“ अरे,मग  त्यालाही सोडूया की घरी. येरे… बस.” 

एवढ्या मोठ्या आलिशान कारमधून जाताना रोहितला मजाच वाटली.

“ काका,  थँक्स हं ! रोहित म्हणाला. “ काका,वर येता का, मला चहा मस्त येतो करता ! येता? “

कारखानीस अगदी सहजपणे,” हो, येतो की “ म्हणाले, आणि रोहित त्यांना  घेऊन वर आला. त्याने मस्त चहा केला, आणि आईसाठी थर्मासमध्ये ओतून ठेवला. कौतुक वाटले  कारखानीसांना ! 

ते गेल्यावर बऱ्याच वेळाने नयना घरी आली. तिला चहा ओतून देत रोहित म्हणाला, “आई’ आज  गंमतच झाली अगं.

आम्हाला काकांनी लिफ्ट दिली, आणि मग मी त्यांना चहा पण करून दिला.

नयनाला कौतुकच वाटले,कारखानीसांचे ! एका लहान मुलाच्या मनात शिरायचं कसब किती सुंदर जमत होतं त्यांना ! 

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वसुधाला हे सांगताना नयनाला अगदी भरून येत होते. 

वसुधा म्हणाली, “अग, साहेब आहेतच खूप चांगले ! त्यांची बायको माझी  मैत्रीणच होती. मूल नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटायचे ग ! म्हणून ते बिल्डिंगमधल्या  सगळ्या पोरांवर मायेचा अक्षरशः वर्षाव करायचे ! ते रोहितशी वागतात ते मुद्दाम नाही ग. अतिशय सहृदय आहेत ते. “

रोहित हळूहळू काकांकडे आकर्षित होऊ लागला .“आई,आज  मला काकांनी त्यांच्या घरी बोलावलेय, त्यांच्याकडे  मोठी टेलिस्कोप आहे ना, ती बघायला ! आम्ही चार मित्र जाणार आहोत,जाऊ? “

“ अरे जा की !चांगलेच दोस्त झालेत की काका तुझे ! “

“ हो ग आई!  कित्ती चांगले वागतात ते आमच्याशी. आपले बाबा असेच होते ना ग? “ रोहितचे डोळे गढूळले !

नयनाने रोहितला जवळ घेतले.

नयना आता,कारखानीससाहेबांना,सुधीर म्हणण्याइतपत जवळ आली होती.

“ सुधीर, किती छान वागता हो तुम्ही मुलांशी. रोहित हल्ली फार कौतुक करतो तुमचं. “

“ नाही ग नयना ! फार गुणी आहे तुझा मुलगा. तो ना,आपल्या वडिलांना फार मिस करतोय,म्हणून माझ्यात फादर फिगर बघतोय ग बिचारा. तू  निश्चिन्त रहा. मी रोहितला कधीही अंतर देणार नाही.”

त्या दिवशी रोहित शाळेतून आला, तो  तापाने फणफणूनच. नयना घाबरून गेली. तिने जवळच्या डॉक्टरांचे औषध आणले, पण ताप कमी होईना.

डॉक्टर म्हणाले, “आपण रोहितला ऍडमिट करूया.  हे पहा, तुम्ही घाबरू नका. पण फक्त सगळ्या तपासण्या एकदा करून घेऊ या. “ —- रोहितला ऍडमिट केले. नयनाने बँकेतून रजाच घेतली. तिने रोहितबद्दल फक्त वसूला सांगितले. कारखानीसना हे काहीच सांगितले नाही. ‘ उगीच किती त्रास द्यावा, ते अतिशय सज्जन आहेत म्हणून? आपले त्यांचे काय नाते आहे अजून तरी? ‘ 

– रोहितचा ताप टायफॉईडचा ठरला होता. हळूहळू त्याचा ताप खाली येऊ लागला. रोहित एक दिवस ग्लानीतच होता तापाच्या. त्याने डोळे उघडले तेव्हा समोर कारखानीस काका खुर्चीवर बसलेले दिसले.

“ रोहित,उठू नकोस. काय हवेय?”  त्यांनी त्याला हळूच उठवून बसवले. गरमगरम कॉफी पाजली.

 त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. रोहितच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले….. “ काका,काका ! “ त्याने  त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली !

“ अरे वेड्या, हे काय !आता बरा होशील तू पटकन ! साधा टायफॉईड तर आहे हा ! रडतोस काय? आर्मीत जायचंय ना तुला?” काकांनी रोहितचे डोळे पुसले.  

“ काका, एक विचारू?रागावणार नाही ना?” 

“ अरे वेड्या, मी कधीतरी रागावलोय का तुझ्यावर? विचार ना …” 

“ काका, माझी आई खूप एकटी पडलीय हो. कोणी नाही तिला. कित्ती वेळा एकटी रडताना बघतो मी तिला. माझे बाबा तर मी पाचच  वर्षाचा असताना देवाघरी गेले.– काका,तुम्ही माझे बाबा व्हाल? माझ्या आईशी लग्न कराल? मी लहान आहे, पण इतकाही लहान नाही, की तिचा विचार मी करू नये. मी उद्या आर्मीत गेलो, तर ती खूप एकटी पडेल.” एवढं बोलून रोहित खिन्न होऊन पडून राहिला. तेवढ्या श्रमाने त्याला दमायला झाले. काकांनी त्याला  थोपटले आणि पांघरूण घालून ते हळूच निघून गेले.

चार दिवसांनी रोहितचा ताप पूर्ण उतरला. रोहित घरी आला. घरी वसुधा मावशी आली होती.

“ काय रोहित?बरा आहेस ना राजा? “

मावशीने रोहितला जवळ घेतले. नयना,कारखानीस त्याच्या जवळच उभे होते.

“ रोहित, मी यांच्याशी लग्न केले तर तुला आवडेल? तुझी इच्छा असेल तरच हे होईल, नाहीतर  नको.”   

“ रोहित ! तुझ्या बाबांची जागा मी घेऊ नाही शकणार ! पण तुझा आवडता काका तर आहेच ना मी ?

तू तुझे आडनावही बदलू नकोस. मग तर झालं ना?” कारखानीस म्हणाले. 

“ मला तू एकटा बास आहेस रे जगायला. “ नयना कशीतरी स्वतःला सावरत म्हणाली. 

“ नाही ग आई. मला काका कायम आपल्या घरी राहायला हवेत ! फार आवडतात ते मला. पण काका, मी आवडतो का तुम्हाला? “

काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “ अरे वेड्या,हे काय विचारतोस?  माझ्या मित्राचा मुलगा तू ! आणि आता तर माझाच मुलगा आहेस.”

रोहितने काकांना मिठीच मारली. “ काका,  रत्नागिरीला होतो ना मी,आजीआजोबांकडे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे की आपल्याला बाबा नाहीत .सगळे कीव करून बघायचे माझ्याकडे. पण आता असे नाही होणार. मला बाबा म्हणून तुम्ही हवे आहात. “

— नयना, वसुधा आणि कारखानीस…. तिघांच्याही डोळ्यातून अविरत वाहणारे अश्रू त्या सगळ्यांच्या एकमेकांशी  घट्ट झालेल्या  नात्याचीच साक्ष देत होते.

 

— समाप्त —

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“ रोहित,अंगणात  खेळत बसू नकोस रे.,केवढे ऊन झालंय बाळा ! आत ये,आणि आत येऊन खेळ. चल आपण पत्ते खेळूया.” रोहितला आजीने हाक मारली. शेजारची मुलं केव्हाच घरी गेली होती. वैशाखातले ऊन नुसते भाजत होते.

रोहितला घरी जावेसे वाटेना. त्याला सारखी त्याच्या आईची आठवण येत होती आज.

नकळत्या वयाचा रोहित. जेमतेम आठ वर्षाचा ! आजीआजोबा,आई बाबांबरोबर  किती सुखात आयुष्य जात होते.

मजेत शाळेत जावे, आईबाबांबरोबर मजा करावी, शाळेतही खूप मित्र होते रोहितला. त्याचे बाबा बँकेत आणि आई मात्र घरीच होती. बाबांना तिने नोकरी केलेली आवडायची नाही. आई किती सुगरण होती रोहितची. त्याच्या मित्रांना रोहितचा मधल्या सुट्टीतला डबा फार आवडायचा—- आत्ता पायरीवर बसून रोहितला हे सगळे आठवले.

पुण्यात राहिलेल्या रोहितला हे रत्नागिरीसारखे गाव मुळीच आवडले नाही. हे गाव बाबांच्या आईवडिलांचे.

त्याचे आजी आजोबा इथेच रहात. किती मोठी वाडी, नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा,…. खूप मोठे घर होते आजोबांचे. आणि राघवमामा आणि मंजूमामी…  त्यांची मुलगी सई… सगळे खूप खूप प्रेम करत रोहितवर.

रोहित होताच शहाणा मुलगा. रत्नागिरीला रोहित आईबरोबर आला, तेव्हाचे दिवस आठवले त्याला. दर सुट्टीत रोहित आई बाबांबरोबर यायचा. आजीआजोबा खूप लाड करत. मामा, सई, समुद्रावर खेळायला घेऊन जात. सुट्टी संपली की पुन्हा पुण्याच्या घरी सगळे परतत… आजीने दिलेला खूप खूप खाऊ घेऊन.

रोहितच्या बिल्डिंगमध्येही खूप मित्र होते रोहितला.  त्या दिवशी रोहितचा वाढदिवस होता. ते सगळे मित्र आले होते मजा करायला. आईने कित्ती सुंदर पदार्थ केले होते. खूप छान साजरा झाला रोहितचा वाढदिवस.

दुसऱ्या दिवशी बाबा बँकेत गेले,आणि अचानकच खूप पोट दुखायला लागले त्यांचे. मित्रांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि आईला घरी  कळवले…..  त्या दिवसापासून रोहितच्या घरातले सुख जणू हरवून गेले.

बाबांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, आणि तो बरा न होणारा आतड्याचा कॅन्सर….. 

बाबांना नोकरीवर जाणेही अशक्य झाले आणि  बँकेतली सगळी पुंजी भराभर संपत आली. रोहितचे आजीआजोबा आले, आणि म्हणाले, “ नयना, आम्ही रोहितला घेऊन जातो काही दिवस. तिकडच्या शाळेत घालू त्याला. तू इकडे  एकटी काय काय काय बघणार? तू फक्त उमेशकडे लक्ष दे. तो  बरा होऊ दे. “

सगळ्या बाजूनी गोंधळून गेलेल्या रोहितच्या आईने उमेशला विचारले. तो आधीच इतका अशक्त आणि दुबळा झाला होता. हतबल झाल्यासारखा तो म्हणाला, “ नेत आहेत, तर नेऊ देत रोहितला आई बाबा.!.तू एकटी कुठेकुठे बघणार ग? मला माहित आहे,मी यातून बरा होणार नाहीये.पण निदान तुमचे हाल नकोत.” ……  आणि रोहित रत्नागिरीला आजी आजोबांबरोबर आला. तेव्हा तो फक्त पाच वर्षांचा होता !

दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. रोहितचे बाबा कालवश झाले आणि आईला बँकेत नोकरी मिळाली.

“ आई,मला कधी ग नेणार तू पुण्याला आपल्या घरी?”

“ रोहित, माझी नोकरी अजून नवीन आहे रे. अजून आपल्या फ्लॅटचे हप्ते भरायचे आहेत, आणि मला  बाबांच्या इतका पगार नाही रे राजा ! तुला तिकडे नेऊन तुझ्याकडे कोण लक्ष ठेवणार रोहित? थोडासा थांब ! मला तरी कुठे करमते रे तुझ्या शिवाय? “ आईने रोहितला जवळ घेतले आणि डोळे पुसत ती म्हणाली. 

रोहित समजुतीने म्हणाला “ बरं आई. पण लवकर ने हं मला ! नेहमी मला तुझी, बाबांची खूप आठवण येते.आणि माझ्या शाळेची, मित्रांची पण.”

त्या सुट्टीत आईने रोहितला पुण्याला नेले. रोहितला खूप आनंद झाला. तो सगळ्या मित्रांना भेटला, बिल्डिंगमध्ये जाऊन सगळ्यांना भेटला. काही दिवसांनी आईने मग भरल्या डोळ्यांनी रोहितला पुन्हा रत्नागिरीला पोचवले.

अशी चार वर्षे गेली.

नयनाच्या बँकेत कारखानीस म्हणून एक साहेब होते. त्यांची बायको नुकतीच कॅन्सरने वारली होती. त्यांना मूलबाळ  नव्हते. त्यांनी एक दिवस नयनाला विचारले, “ नयना,जरा वेळ आहे का तुम्हाला ? लंच ब्रेकमध्ये कॉफी घ्यायला याल  बाहेर?” 

“ हो ,येईन ना सर !”  नयना म्हणाली.

—  कारखानीस साहेब अतिशय  सभ्य, सुसंस्कृत होते. उमेशला ते ओळखत होते,आणि उमेश असताना काही कारणास्तव नयनाच्या घरी येऊनही गेलेले होते. नयना सहजपणे गेली कॉफी प्यायला.

कारखानीस म्हणाले,’,वेळ न घालवता मुद्द्याचेच बोलतो.माझ्याशी लग्न कराल का?—–

“ मी तुम्हाला परका नाही, आणि माझी बायको  कॅन्सरने गेलेली तुम्हाला माहित आहेच ! मी वयाने थोडा जास्त मोठा आहे तुमच्याहून, पण तुम्ही ठरवा काय ते “ त्यांनी थेट विषयाला हात घातला– “ मला माहित आहे तुम्हाला एक मुलगा आहे ते ! मला मुलांची खूप आवड आहे, पण दुर्दैवाने आम्हाला मूल झाले नाही. मी तुमच्या मुलाला नक्की  छान आपलेसे करीन. बघा, विचार करा.”

नयनाने शांतपणे हे ऐकून घेतले. “ मला विचार करायला वेळ हवाय सर. आता आपण नवथर तरुण उरलो नाही.

हे लग्न म्हणजे ऍडजस्टमेंटच असणार– हो ना? माझा मुलगा हे कसे घेईल मला माहीत नाही. मी विचार करून सांगते तुम्हाला.” 

नयना ऑफिसमध्ये परतली. तिच्या शेजारीच वसुधा– तिची बँकेतली जिवलग मैत्रिण बसली होती.

“ काय ग नयना, अशी चिंतेत का दिसतेस? काही झालंय का? मला सांगण्यासारखे नाही का? “

“ वसू, तसं काही नाही ग !” असं म्हणत हॉटेलमध्ये काय घडले ते नयनाने वसुधाला सविस्तर सांगितले.

“ नयना,उत्तम आहे खरंच ही संधी ! मी बघतेय ना,किती ओढाताण होतेय तुझी. कर्जाचे हप्ते, रोहितचा खर्च, सगळं काही तुला बघायला लागतं आहे. आणि ते अवघड जातेय तुला. साहेब फार सज्जन माणूस आहे. मला वाटतं तू 

याचा जरूर विचार करावास  आणि त्यांना ‘ हो ‘ म्हणावं. “ 

“ अग पण रोहितचं काय ? किती अडनिडं वय आहे गं त्याचं. आधीच आजी आजोबांकडे नाईलाजाने राहतोय तो.

पुढच्या शिक्षणासाठी मला तिकडे नाही ठेवायचंय त्याला.” 

यावर वसुधा म्हणाली, “ हे बघ नयना, असा किती दिवस तो तिकडे राहणार ग? आता त्याला तुझी खरी गरज आहे .

तू त्याला आता तुझ्या घरी आण यंदापासून… ऐक. हळूहळू मग होईल ग सगळं सुरळीत.” 

नयना  त्या मे महिन्यात रत्नागिरीला गेली. रोहितला म्हणाली, “ रोहित,तू आता माझ्याबरोबर पुण्याला चल.

आता तुझी सगळी महत्वाची  वर्षे सुरू होतील शिक्षणाची. तुला मी पूर्वीच्या शाळेत ऍडमिशन घेऊन देईन.

मी भेटून आलेय सरांना. मग काय म्हणतोस?” 

रोहितने आनंदाने उडयाच मारल्या. “आई खरंच? पण तुला सगळा खर्च झेपेल ना ग? इथे आजीआजोबा सारखे म्हणतात,‘ का राहिलीय तिकडे एकटी कोणास ठाऊक. यायचे की इथे. जळ्ळी मेली ती नोकरी, .! लेकरू इथे  ठेवलंय आणि राहिलीय तिकडे  एकटी.’ “ –रोहितने आजीची नक्कल केली.नयनाला हसू आले. “ रोहित,काळजी पोटी बोलते आजी तसे. पण तू नक्की आनंदाने येशील ना रे?” 

रोहितने आईला मिठी मारली. “आई, मी खूप शिकेन, मोठा होईन, मग बघ. तुला काही कमी नाही पडू देणार !”

नयनाच्या डोळ्यात पाणी आले.

— क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares