जीवनरंग
☆ कागदपत्रे शोधता शोधता… सुश्री निलिमा क्षत्रिय ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी☆
कागदपत्रे शोधणे हा घरातील एक अतिशय तणावपूर्ण क्षण असतो. ब-याच घरांमध्ये कागदपत्रे नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी पुरूष स्वत:कडे घेतात. कारण ते महत्वाचं काम असतं. आणि अशी महत्वाची कामे करण्यासाठी जी कुशाग्र बुद्धी लागते, ती बुद्धी पण त्यांना जन्मत:च असते. बायका काय आपल्या स्वयंपाकपाणी, स्वच्छता, आलं गेलं, नेणं आणणं, पाहुणारावळा, आजारपणं.. अशी क्षुल्लक बिन महत्वाची खाती सांभाळत असतात. कारण त्यांना काय समजतं!!
तर्रर्र.. ज्यादिवशी अचानक एखादं कागदपत्र घरातल्या पुरूषाला हवं असतं..
” इथे टिव्ही पाशी मी दोन पेपर्स ठेवले होेते ते कुठे आहेत? “
” कधी ठेवले होते”?
” परवा नाही का, तुमची भिशी होती, म्हणून मी घाईघाईत गेलो, नंतर ठेवू म्हटलं कपाटात.. “
“बरं मग? “
बाईला आता पुढचा सगळा एपिसोड रंगताना दिसतो.
“बरं मग काय? सत्यनारायणाची कथा सांगतोय का मी? कागद गेले कुठे ते विचारतोय! भिशी च्या आवराआवरीच्या नादात टाकले नाही ना कुठे केरात बिरात”?
“केरात कशी टाकेन मी? तुमच्या एवढी नाही पण थोडीतरी अक्कल दिलीय देवाने मला पण”! #सरीवरसरी
“हो,विसरलो होतो,” (कंसात)
“नक्की इथेच ठेवली होती का?”
” नक्की म्हणजे काय, मला आठवतं ना चांगलं. मला एक कळत नाही, दिवस दिवस वस्तू लोळत पडलेल्या असतात, त्या जागच्या हलत नाहीत, पण महत्वाचं काही ठेवलं की लगेच दोन मिनिटात गायब.”
” ठेवायचं ना मग व्यवस्थित लगेच, इथे तिथे टाकून पळायचं, आणि वर्षभराने विचारायचं, मी हे इथे ठेवलं होतं कुठे गेलं”
“सगळ्या घरभर तुझा आणि मुलांचा पसारा असतो, मी एखादा कागद ठेवला तर तो पण नाही रहात घरात नीट”
” बेडवरचा ओला टॉवेल, कपडे बदलल्यावर ‘ळ’ आकारात पडलेला पायजमा वेळच्या वेळी उचलला जातो माझ्याकडून म्हणून तुमचा पसारा दिसून येत नाही…
उडाले असतील ते फॅनने.. काही ठेवलं होतं का त्याच्यावर?”
” हो मग, टिव्ही च्या खाली दाबून ठेवले होते, झालंच तर रिमोट ठेवला होता वर”!
कागदांच्या ठेवणुकीचं इतकं डिटेलिंग ऐकल्यावर आता बिचारी गृहिणीं जरा गांगरते..
“कुठे गेले असतील बरं… थांबा जरा सापडतील. बघते मी…”
अशी जरा पुढची बाजू ढासळायला लागली की गृहस्थांच्या अंगात दहा बुलडोझर ची ताकद संचारते… #nilima_kshatriya
” हज्जारदा सांगितलंय कागदपत्र फेकत जाऊ नका, माझ्या कामाच्या वस्तूंना हात नका लावत जाऊ.. पण नाही.. ( असा अनेकवचनी आदरार्थी उल्लेख केला की आपोआपच मुलांना पण समज मिळते, आणि ते शक्यतो घरातून काही वेळापुरते अदृष्य होतात, किंवा अभ्यासाला बसतात. )
हा हा लोकप्रभाचा अंक… गेल्या वर्षापासून इथे लोळतोय तो नाही हलला, पण दोनच कागद.. फक्त एकाच दिवसात गायब.. काय जादू आहे..”
खरं म्हणजे लोकप्रभाचा अंक ह्या महिन्याचा असतो, तो दोनच दिवसांपूर्वी आलेला असतो, पण ‘तो वर्षापासून इथे लोळतोय’ ह्या म्हणण्याला आता आडवं लावण्यात अर्थ नसतो, म्हणून गृहिणी नमतं घेत रहाते.. तसतसा गृहस्थांचा बुलडोझर सैरावैरा धावत सुटतो…
“दोन तास तहसील कचेरीत उभं राहून ते पेपर्स मिळवले होते.. सालं कशाचं गांभिर्य म्हणून नाही.. घर आहे की कबाडखाना.. “
आता गृहिणी सशाच्या काळजाने टीव्हीच्या आजूबाजूचा परिसर पिंजत सुटते. सोफ्याच्या खाली, शू रॅकखाली, टीव्हीच्या मागे, करत करत किचन बेडरूम्स.. इतकंच काय फ्रीज, बाथरूम सुद्धा बघून होतात. पण कागद पत्रं.. ‘धरती निगल गयी या आसमां खा गया’.. अशी अवस्था..
तेवढ्यात बुलडोझर डिझेल संपल्यासारखा एकदम लडखडतो. त्याला काहीतरी आठवतं. आणि तो
गृहिणीची नजर चुकवत बाहेर उभ्या ॲक्टीव्हाच्या पोटातून दोन कागद तोंड पाडून घरात आणतो.
आता गृहिणी च्या अंगात पण पोकलेन संचारतो..
“तुम्ही तर टिव्ही शेजारी ठेवले होते कागद, त्याच्यावर रिमोट पण ठेवला होता. मग ते गाडीच्या डिकीत कसे पोहोचले? सगळं घर उलथं पालथं करायला लावलं. स्वत:ला लक्षात रहात नाही आणि घरादाराला नाचवायचं. तेवढंच काम आहे का मला? घरात इकडची काडी तिकडे करायची नाही, मी एकटीनेच गाडा ओढत रहायचा.. ते कार्टे पण मेले तुमच्यावरच पडलेत. का ss ही कामाचे नाहीत. मला खरंच इतका कंटाळा आलाय ना ह्या सगळ्याचा आता. असं वाटतं निघून जावं कुठेतरी लांब.. मी म्हणून टिकले बरं, दुसरी असती ना तर केव्हाच निघून गेली असती. “
पुढील अनर्थ हसण्यावारी टोलवला जातो..
” चहा ठेव पटकन, बँकेत जमा करायचेत कागदपत्रं..
लेखिका : सुश्री निलिमा क्षत्रिय
संकलन : सुश्री नेहा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈