सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ वाळा….भाग 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(ताईच्या यशस्वी गीतरामायणानंतर)
‘भक्तीचा ठेवा ‘ या कार्यक्रमानंतर ताईला ओळख मिळू लागली.ही कल्पना पात्रे सरांचीच.
“तुमच्यावर संत वाङमयाचे संस्कार आहेत.तुमच्या गळ्यात भजन, ओव्या छान उतरतात.
भावपूर्ण. श्रद्धायुक्त. अगदी मंदीराच्या गाभार्यात डोळे मिटून बसावं इतकं छान! आवडेल लोकांना.
या बाबतीतहीताई साशंकच होती. अजुन जाहीररित्या कार्यक्रम करण्यास मन धजावत नव्हतं.
नको. उगीच हसं व्हायचं. मी आहे तिथेच बरी आहे.
मला इतकंच पुरे. पण कार्यक्रमाची सगळी जबाबदारी सरांनी उचलली. अगदी वर्तमानपत्रातल्या जाहिरातीपासूनते छोट्या अॉडीओ व्हिडीओ क्लीप्सच्या माध्यमातून आॅनलाईन प्रमोशन पर्यंत.
आणि खरोखरच कार्यक्रम जनमानसात ठसला.
लोकांना प्रचंड आवडला. लोक ताईशी कनेक्ट व्हायला लागले. कार्यक्रम संपल्यानंतर श्रोते पडद्यामागे आवर्जून भेटायला येत.
एकदा एका वृद्ध स्त्रीने ताईच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले,”तुझ्या गळ्यातून संतांची वाणीच उतरते.
देव तुझं भलं करो! “
तर कधी कुणी म्हणत,”साक्षात् गिरीधराची मीराच उभी राहिली.”
मनात खूप समाधान होतं. काहीतरी मिळवल्याचा. गवसल्याचा हर्ष होता.
पण विश्वास बसत नव्हता.
यशाच्या पहिल्या पायरीवरही ताई गंभीर होती.
शिडी चढायची तिला घाई नव्हती.
सकाळीच हर्षलशी फोनवर बोलणे झाले होते.
“आई पीट्सबर्गच्या महाराष्ट्र मंडळात तुझा कार्यक्रम त्यांना ठेवायचा आहे. डेट्राॅईट, सॅनहोजे, फ्लोरीडा वरुनही विचारणा झाली आहे. तुझ्या तारखा कळव. इथले लोकल वादक तुला साथ देतील. तरीही तुझ्याबरोबर कितीजणं येणार ते सांग. मंडळच स्पॉन्सर करेल. बाकीचं मी पाहतो. लवकर निर्णय कळव. सगळ्यांचे व्हीसा वगैरे व्हायला वेळ लागेलच.”
सगळंच अविश्वसनीय वाटत होतं. हे सगळं आपल्याबाबतीत घडतंय् हे पचत नव्हतं.
आज मन गच्चं भरलं होतं. भावनांचा कल्लोळ झाला होता. डोळे सारखे भरुन येत होते.
मंचावर नारळ फुटला. फुलं उधळली. ऊदबत्यांचा सुवास दरवळला. वाद्ये जुळवली जात होती. निवेदन संपले.
अन् हळुहळु पडदा वर सरकत गेला. सभागृह स्तब्ध झाले. टाळ्यांचा गजर झाला. स्वागत, प्रास्ताविक झाल्यानंतर ताई पोडीअमजवळ आली.
तिने नम्रपणे रसिक श्रोत्यांना अभिवादन केले.
सुरेख हिरव्या काठांची क्रीम कलरची रेशमी साडी. गळ्यात ठसठशीत मोत्यांची माळ. कानात कुड्या. चेहरा प्रसन्न, हसरा, शालीन. साक्षात् सरस्वती.
“जोहार मायबाप!! जोहार मायबाप!!”
तिचा गळा दाटला होता.तिनं एक आवंढा गिळला.
“माझे पपा नेहमी म्हणायचे, “साहित्य संगीत कला विहीन:। साक्षात् पशुपुच्छ विषाण हीन:।। पण आपल्यातल्या कलागुणांची ओळख व्हावी लागते. वाळा म्हणजे तसं पाहिलं तर शुष्क गवतच ना? पण त्यावर पाणी शिंपडताच शीतल सुगंध दरवळतो.”
मग ताई बोलतच राहिली. आठवणींच्या लडी ऊलगडत राहिल्या. तिच्या अवघड न्यूनगंडातून
चाचपडत सुरु झालेल्या संगीत प्रवासाची कहाणी श्रोतेही मनापासून ऐकत राहिले.
पपांच्या आठवणींने ताईचे मात्र डोळे अखंड झरत होते.
मिटल्या डोळ्यासमोर दोन तेज:पुंज डोळे नजरेनेच तिला आशिर्वाद देत होते. ढगातल्या किरणांच्या साक्षीनं एक स्वप्न साकारत होतं.
समाप्त.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈