श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिलं, – पुस्तक छापून झालं. सुबोध म्हणाला, ‘‘प्रकाशन समारंभ अगदी शानदार झाला पाहिजे!” आता इथून पुढे )
‘‘करेक्ट! त्याशिवाय लेखकाचं नाव होणार कसं? आणि त्याचा वणवा जगभर पेटणार कसा?” हे तारे नकुलने तोडले.
‘‘नाही तरी पुस्तक छापण्यासाठी इतका खर्च केलाहेस, त्यात आणखी थोडी भर… म्हणजे भरल्या गाड्यावर फक्त आणखी एक सूप…” इति सुबोध.
‘‘खर्च मी कुठे केलाय. शऱ्यानं केलाय. मी त्याला फक्त पैसे उधार दिले.”
‘‘उधार… वाट बघ… पैसे परत मिळतील! नाही… ते परत मिळतील… नक्की मिळतील… पण मग तुला फक्त सुपाचाच खर्च… म्हणजे प्रकाशन समारंभाचा. पण तो झाला की तुझं नाव सुपाएवढं… सॉरी… आभाळाएवढं होईल की नाही? म्हणजे नाव आभाळाएवढं आणि काळीज सुपाएवढं…”
आता नाव आभाळाएवढं होईल, की सुपाएवढं, जेवढं केवढं व्हायचं असेल, तेवढं होऊ दे… पण विचार केला, तीस तिथे चाळीस आणि मित्रांच्या सूचनेला मान्यता देऊन टाकली.
प्रकाशन समारंभ करायचे नक्की ठरले, तेव्हा आमचे सारे दोस्त… सख्खे चुलत, मावस, मामे, आत्ये इ. इ. समारंभाचं स्वरुप नक्की करण्यासाठी पुढे सरसावले. खूपशी चर्चा, वाद, खडाजंगी, बरेचसे कप चहा, भजी, वडे आणि अन्य उपहार रिचवून झाल्यावर कार्यक्रमाचं स्वरुप निश्चित करण्यात आलं. समारंभाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, पुस्तक ज्यांच्या हस्ते प्रकाशित करायचं ते पाहुणे यांच्या नावांबद्दल दोस्त मंडळींच्यामध्ये खूप मतभेद झाले. अखेर खडकमाळ साखर कारखान्याचे चेअरमन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष ठरले. या संदर्भात, सरस्वती ही लक्ष्मीची बटीक असून, लक्ष्मी ज्याच्या घरात पाणी भरते, त्याच्या घरात सरस्वती ही आपोआपच पाणी भरते, हा संबंध एका दोस्ताने स्पष्ट करून सांगितला आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ख.सा.का. चे चेअरमन नक्की करण्यात आले. पुढे-मागे परिसरातील एक होतकरू लेखक म्हणून गणपती बिणपती उत्सवात छोटा-मोठा सत्कार निदान ख.सा.का. च्या वतीने होईल, हा विचार अगदी मनात आला नाही, असं नाही. विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकाच्या बॉडीवर असलेल्यांपैकी एका मेंबरला प्रकाशनासाठी बोलवावं, ही वश्याची सूचना. त्यामुळे कादंबरीचा निदान पक्षी त्यातील एखाद्या उताऱ्याचा क्रमिक पुस्तकात अंतर्भाव होण्यास मदत होईल, असे त्याचे मत. स्वागताध्यक्ष म्हणून एखाद्या खासदाराला बोलवावं, म्हणजे त्यांच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लव्याजम्यामुळे थोडासा का होईना मॉब वाढेल, असं आपलं मलाच वाटलं. अखेर त्या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ख.सा.का. चे चेअरमन आबासाहेब पाटील, स्वागताध्यक्ष खासदार नरदेव व प्रमुख पाहुणे म्हणून निर्मीती मंडळाचे सभासद प्रा.डॉ. कळंबे यांची अत्यल्प बहुमताने निवड करण्यात आली.
सकाळच्या सत्रात पुस्तक प्रकाशन, दुपारच्या सत्रात ‘‘आजची कादंबरी दशा नि दिशा” या विषयावर परिसंवाद हे नक्की झालं. निमंत्रण पत्रिकेत मात्र ‘‘दशा न् दशा” असे छापले गेले. रात्रीच्या सत्रात कविसंमेलन घ्यावे. कवी अनेक असतात. त्यामुळे अनेक जण समारंभास उपस्थित राहतील, अशी सूचना कवी म्हणून थोडंफार नाव मिळवू लागलेल्या नकुलने मांडली, पण अन्य मित्रांनी ती कल्पना फेटाळून लावली. कादंबरीचे प्रकाशन आहे, तर रात्रीच्या सत्रात कादंबरीचे अभिवाचन करावे, असे ठरले. कादंबरीवाचन परिणामकारक व्हावे, म्हणून आमच्या गावातील सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदक मनवापासून ते सुधीर गाडगीळ, तुषार दळवी, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, श्रीराम लागू यांच्यापर्यंत नावे पुढे आली. आता ही माझी जानी मानी याने की जान घेऊन मान मोडू घातलेली दोस्त मंडळी मला केवढ्या खड्ड्यात पाडणार, की पाताळात गाडणार याचा अंदाजच मला बांधता येईना. कादंबरी वाचन मीच करेन, अगदी परिणामकारक… अगदी सुचवण्यात आलेल्या नावांपेक्षाही परिणामकारक, असं म्हणून मी चर्चेला पूर्णविराम दिला. अखेर कादंबरीचा जन्मदाता मी होतो ना… माझ्याइतका न्याय तिला दुसरं कोण देऊ शकेल?
प्रकाशन समारंभ पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला. मी एका संध्याकाळी सुबोधला म्हटलं, ‘‘समारंभाची रुपरेषा तशी ठीक आहे… पण?”
‘‘आता कसला पण?”
‘‘सगळ्या सत्रात श्रोत्यांची चांगली उपस्थिती असेल, तर समारंभ शानदार होणार ना? आज-काल असल्या सांस्कृतिक उपक्रमासाठी वेळ कुणाला आहे? जवळचे नातेवाईक, दोस्तमंडळी सगळ्यांच्या अडचणी त्याच वेळेत निघतात. कुणाच्याकडे अचानक पाहुणा टपकतो. कुणाकडे अगदी त्याच वेळी जवळचा कुणी तरी आजारी पडतो. श्रोतेच नसले, तर समारंभ शानदार होणार कसा?”
‘‘मी आहे ना! तू कशाला काळजी करतोस?”
‘‘तू एकटा काय करणार? त्या एखाद्या जादुई सिरिअलप्रमाणे एका सुबोधचे शंभर खुर्च्यांवर शंभर सुबोध बसवशील का?”
‘‘नाही! तसं नाही मी करू शकणार! पण शंभर खुर्च्यांवर शंभर श्रोते बसवण्याची व्यवस्था मी करू शकतो.”
‘‘असं? ते कसं?” आणि सुबोधने त्याची योजना विस्ताराने मला समजावून दिली. सुबोधचा एक दोस्त होता. त्याने म्हणे अलीकडेच एक एजन्सी उघडली होती. या एजन्सीद्वारे भाड्याने श्रोते पुरवले जायचे. ‘‘आपण आपल्या समारंभापुरते भाड्याने श्रोते आणूयात.” सुबोध म्हणाला.
‘‘झक्कास!” मी म्हटलं.
मी आणि सुबोध दुसऱ्या दिवशी एजन्सीत पोहोचलो. एजन्सीचं नाव होतं, ‘‘हेल्पलाईन फर्म.” सुबोधच्या मित्राची काही तिथे भेट झाली नाही. पण त्या फर्मच्या पी.आर.ओ. ने मोठ्या आदराने आणि विनम्रतेने आमचे स्वागत केले. सुबोध आमच्या समस्येबद्दल त्यांच्याशी बोलला. त्याने एक निवेदनपत्रवजा जाहिरात आमच्या हातात ठेवली आणि आम्हाला आत जाऊन सुशीलाजींना भेटायला सांगितलं. इंटरकॉमवरून आमच्या येण्याची सूचनाही दिली.
क्रमश:…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈