जीवनरंग
☆ सेवेची गोष्ट ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆
आमचे वडीलोपार्जित घर भोपाळ मध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडीलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.
समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा टि.सी. काही बोलणार नाही.
डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, “मला बसायला जागा द्या” म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, “काही हरकत नाही आपण येथे बसू शकता.”
मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला, “माझ नाव आलोक आणि मी इस्रो ( ISRO ) मध्ये शास्त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए.सी.डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”
ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”
एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”
माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.
खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, ‘जगमोहन राव ‘ हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.
काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.
रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 – 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे.”
पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”
मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले.
काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.
नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”
त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”
ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो. कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”
त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.
त्यावर छापले होते – डाॅ.जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.
आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ – मी ए.सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!
एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि.सी.च्या मदतीने खाली उतरले.
रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए.सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”
ते हसून म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?”
नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.
आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.
म्हणूनच तर, “जसे आम्ही बदलू, तसे जग ही आपोआपच बदलेल.”
__♥️__
संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈