श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 269
☆ अंधाराच्या छाताडावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
कोणी नसता सोबत माझ्या सोबत करतो मला काजवा
अंधाराच्या छाताडावर आहे दिसतो मला काजवा
*
अंधाराला घाबरते मी त्यास बरोबर कळते आहे
सामसूम ह्या रस्त्यावरती कवेत धरतो मला काजवा
*
धरून हाती चुंबन घ्यावे असे वाटते जेव्हा जेव्हा
तेव्हा हाती लागत नाही पाहुन पळतो मला काजवा
*
वैरी नाही मी तर त्याची हे त्यालाही माहित आहे
जवळी जाता पळून जातो का घाबरतो मला काजवा
*
मैत्र जमवुनी कधी कधी तो चंद्रावरती करतो स्वारी
नको नको त्या खोड्या करतो आणिक छळतो मला काजवा
*
आकाशी तो फिरतो म्हणुनी त्यास वाटते तारा झालो
दृष्टी माझी पक्की आहे सहजच कळतो मला काजवा
*
कधी अचानक अंधारातच गायब होतो कळण्या आधी
मला एकटे सोडुन जातो भय दाखवतो मला काजवा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈