मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “वळीव —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

 

☆ “वळीव —” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

घन घनदाट की दाटे मळभची

धरित्रीच्या जे आर्त मनातील

वणवा वैशाखी जाळतसे

जाळे किंवा ग्रीष्म मनातील….

*

काहूर माजे मनात त्याला

एकलीच मी कशी शांतवू

तहानले मन पावसास त्या

त्याला परि कैसे बोलावू ?….

*

आले जणू पाडाला ढग हे

सुचवून जाई रेघ विजेची

घेऊन या हो कुणी आता ती

मस्त धुंद सय मृद् गंधाची….

*

सोसेना मुळी ताण आता हा

घन हे तांडव नाचू लागले

बघता बघता बेबंदपणे

आर्तताच नी बरसू लागले….

*

वाहून गेले मळभही सारे

झंकारे अन् तार तृप्तीची

मनमोरांना नवे पिसारे

टपटपतांना सर वळवाची……

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गजलेची गजल…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “गजलेची गजल” ☆ श्री सुनील देशपांडे

 उला नि सानी मिसरा यांना घेऊन आली होती, मज गजल चावली होती‌.

रदिफ, काफिया यांना बिलगुन सुंदर हसली होती, मज गजल चावली होती.

*

सुंदर सुंदर शब्दांचा तो मतला माथ्यावरती घेऊन चालली होती,

शेर पांघरून अंगावर सामोरी आली होती, मज गजल चावली होती.

*

शब्दरूप ती फुले सुगंधित उधळित आली होती मन मोहुन टाकत होती,

तालावरती मनमोहक ती ठुमकत आली होती, मज गजल चावली होती.

*

धुंद धुंद बेभान होऊनी शुद्ध हरपली होती, तिज ‘बहर’ली पाहिली होती,

शुद्धीवरती आलो तेव्हा मनात भरली होती, मज गजल चावली होती.

*

हळुच सारुनी बुरखा मी तिज नीट पाहिली होती, जी कोण चावली होती,

सुंदर बुरखा ल्यालेली अति सुंदर कविता होती, मज गजल चावली होती.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 218 ☆ श्री स्वामी समर्थ… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुन्हा नव्याने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘पुन्हा नव्याने…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(वृत्त ~अनलज्वाला ८+८+८ मात्रा)

वेलीवरचे फूल अचानक गळून पडले

तसेच काही जीवनातही माझ्या घडले

*

ग्रहण लागले अकस्मात का आनंदाला

काळाने का हिरावले मम प्राणसख्याला

*

हताश वाटे उजाड झाले भरकटले मन

काय करावे सुचतच नव्हते कंपित हे तन

*

अंगणातल्या ताटव्यावरी नजर रोखली

गुलाबपुष्पे उमलत होती धरा बहरली

*

निघून गेला शिशीर आता वसंत आला

पुन्हा नव्याने सृष्टीला या बहार आला

*

जीवन सुंदर ध्यानी धरुनी उठले मी तर

शोक कोंडला अंतर्यामी जगायचे जर

*

मैत्री केली ताल स्वरांशी धुंद जाहले

नादब्रम्ही पूर्ण रंगले पुन्हा बहरले

*

नियतीचे हे विविध रंग मी असे पाहिले

दूर सारुनी दुःखाला या उभी राहिले

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।

धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ।।११।।

*

काम आसक्ती विरहित बल बलवंतांचे मी

भरतश्रेष्ठा जीवसृष्टीचा धर्मानुकुल काम मी ॥११॥

*

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।

मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ।।१२।।

*

सात्विक राजस तामस भाव उद्भव माझ्यापासून 

त्यांच्यामध्ये नाही मी ना वसती माझ्यात ते जाण ॥१२॥

*

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।

मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ।।१३।।

*

त्रिगुणांनी  मोहविले आहे सर्वस्वी या  जगताला 

तयापार ना जाणत कोणी मजला या अव्ययाला॥१३॥

*

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।।१४।।

*

मम माया ही त्रिगुणांची दुस्तर तथा महाकठिण  

भक्त मम उल्लंघुन माया जाती भवसागरा तरून ॥१४॥

*

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।

माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ।।१५।।

*

मायाग्रस्त अज्ञानी नराधम करिती दुष्कर्म 

ना भजती मजला मूढ त्यांसि ठाउक ना धर्म ॥१५॥

*

चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।

आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।।१६।।

*

चतुर्विध पुण्यशील अर्जुना मज भजणार

आर्त पीडित अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानातूर ॥१६॥

*

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।

प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय: ।।१७।।

*

तयातील ज्ञानी मज ठायी एकरूप नित्य 

अनन्य माझ्या भक्तीत  तोच श्रेष्ठ भक्त 

प्रज्ञेने माझिया तत्वा जाणे तयास मी बहु प्रिय 

ऐसा ज्ञानी भक्त मज असे हृदयी अत्यंत प्रिय ॥१७॥

*

उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।

आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ।।१८।।

*

निःसंशय जे मजला भजती थोर सकल भक्त

ज्ञानी भक्त जो माझा जाणतो ममस्वरूप साक्षात

मनबुद्धीचा मत्परायण ज्ञानी उत्तम गतिस्वरूप

मम ठायी तो सदैव असतो आत्मरूप सुस्थित ॥१८॥

*

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ।।१९।।

*

बहुजन्मांनंतर ज्या झाले प्राप्त ज्ञान पूर्णतत्व

दुर्लभ ऐसा महात्मा जया वासुदेव विश्व समस्त ॥१९॥

*

कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।

तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ।।२०।।

*

भोगकामात हरपता ज्ञान स्वस्वभावे होवोनी प्रेरित 

धारण करुनी नियम तदनुसार भिन्न देवतांना पूजित ॥२०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तूच तू… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ तूच तू… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

निष्क्रियता की विधायक,

तूच कर्ता नि करविता.

तूच दाता,तूच ज्ञाता,

निर्गुण तू , तू विधाता .

उच्चार तू ,अनुच्चार तू.

तू माैनाची मूकसंहिता.

तू उदासी,हास्य तू,

तमस तू ,तू सविता.

उसळता दर्याच तू,

तू प्रवाही संथ सरिता .

तूच कागद, शब्द तू,

कलम तू, तू प्रतिभा.

बद्ध तू,मुक्त तू,

व्यापून रिक्त मन,अवघे सनातन ,

तूच तू, तू कविता,तू कविता.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गं सखे चैत्रपालवी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ गं सखे चैत्रपालवी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

गं सखे चैत्रपालवी! 

केलीस चैतन्याची उधळण  

तुझ्या केवळ चाहुलीने 

जर्जरतेला मिळे संजीवन  

*

तुझ्या स्वागता सज्ज जाहली 

हिरव्या मखमलीची पखरण 

आमराईच्या छायेखाली 

होई सोनकवडश्यांचे नर्तन  

*

इवली इवली रानफुलेही 

पाखरांसवे करिती गुंजन  

गुलमोहर ही फुलून येतो 

देऊ पाहतो तुला आलिंगन  

*

मोगऱ्याचा फाया  करतो 

भोवताली सुंगंधी पखरण 

सृष्टीचे हे रूप विलोभनीय 

पाहण्या ते रेंगाळे दिनकर  

*

तुझ्या स्पर्शाने खुलतो, फुलतो 

हर प्रहर अन् हर एक क्षण क्षण  

*

गं सखे चैत्रपालवी, 

केलीस चैतन्याची उधळण  

तुझ्या केवळ चाहुलीने 

जर्जरतेला मिळे संजीवन  

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 226 ☆ स्वप्ननगरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 226 ?

स्वप्ननगरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

परवाच एका मित्रानं,

बोलवलं सगळ्या मित्रमैत्रिणींना,

त्याच्या घरी,

खूप आपुलकीनं आणि आग्रहानं !

 

पाठवलेल्या गुगल मॅपवरून,

साधारण कल्पना आली होती,

त्याच्या  उच्च – उच्चभ्रू सोसायटीतल्या,

आलिशान घरकुलाची,

मित्र वर्तुळात सारेच श्रीमंत,अतिश्रीमंत…

काही स्वकर्तृत्वावर ऐश्वर्य मिळवणारे…

तर काही “बाॅर्न रिच…”

गर्भश्रीमंतच!

बरोबरचे सारेच “मल्टीमिलीओनर”

धनाने आणि मनानेही !

 

 पण जुना बंगला सोडून,

नव्या आलिशान सदनिकेत,

नुकतंच रहायला  आलेलं

 हे सारं कुटुंबच किती नम्र

आणि विनयशील !

 

थक्कच व्हायला झालं,

आदरातिथ्य पाहून!

सारं कुटुंबच उच्च शिक्षित,

शारदेच्याच वरदहस्ताने प्राप्त झालेली लक्ष्मी!

 

 कुणाच्याच वागण्यात,

कुठलाचं अॅटिट्युड नाही …

जेवताना आग्रहाने वाढणारे,

तरूण हात, बाल हात,

किती सुंदर, सुसंस्कारित!

 

म्हटलं त्या मित्राला,

लहानपणी एक सिनेमा पाहिला होता,

“एक महल हो सपनों का”

ते स्वप्न साकारंलस तू !

 

संध्याकाळ ते रात्रीपर्यंतचा …

त्या वास्तूतला,

काळ खूपच सुंदर आणि सुखाचा!

 

ती मंतरलेली संध्याकाळ अनुभवत,

त्या स्वप्ननगरीतून बाहेर पडताना…

 

वाटलं पृथ्वीवरील स्वर्गच आहे हा ,

 

आणि

 

तो स्वर्ग मित्राच्या घरातहीआहे,

समृद्धीत आणि संस्कारातही !

“शुभम् भवतु”

हेच शब्द  सर्वांच्याच ओठी,

त्या कुटुंबासाठी !

© प्रभा सोनवणे

१६ एप्रिल २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनात चालत राहायचं… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ जीवनात चालत राहायचं…  ☆ सौ. वृंदा गंभीर

ना कधी थकायचे

ना कधी हरायचे

सुंदर विचार ठेवून

नेहमीच जिंकायचे

 

        ना कधी झुरायचे

         ना उदास रहायचे

           स्वतःवर विश्वास ठेवून

             स्वकष्टाने मिळवायचे

 

ना कधी रडायचे

ना कधी घाबरायचे

इतरांचे सुख बघून

आनंदाने हसायचे

 

     ना कधी लपायचे

      ना काही लपवायचे

      संकटांना दोन हात करून

        जीवन प्रवासात चालायचे

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #233 ☆ मोगलाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 233 ?

☆ मोगलाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दार उघडाया आता घाबरते चिऊताई

कावळ्याच्या रुपामध्ये नराधम दिसे बाई

*

रात्र झाली खूप होती झोपत का पिल्लू नाही

चिऊताई पिल्लासाठी गात होती गं अंगाई

*

पडताच अंगावर सूर्य किरणं कोवळी

झटकून आळसाला फुलल्या या जाई जुई

*

पाखरांची चिव चिव उठताच ही सकाळी

चारा शोधण्याच्यासाठी झाली साऱ्यांचीच घाई

*

तुला पाहताच घास बाळ आनंदाने खाई

साऱ्या बालंकांची तेव्हा असतेस तू गं ताई

*

चिमण्या ह्या गेल्या कुठे दिसायच्या ठायी ठायी

अचानक आली कशी त्यांच्यासाठी मोगलाई

*

नातं भावाचं पवित्र सांगा निभवावं कसं

आता तर गुंडालाही म्हणू लागलेत भाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈