मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तू…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “तू” ☆ प्रा. भरत खैरकर 

वेदनेची कळ अन्

लढण्यातल बळ तू

*

मुलांच रडणं अन्

मोठ्यांच भिडण तू

*

आगीचा जाळ अन्

पाण्याची धार तू

*

मायेचा पाझर अन्

दृष्टातला माजोर तू

*

कुराणातला अल्ला अन्

गीतेतला सल्ला तू

*

अनेकातला एक अन्

एकातला अनेक तू

*

अनादी तू अनंत तू

तूच तू तोच तू

*

हाही तू तोही तू

तूही तू तूही तू

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मार्जाराचे आर्जव ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

🌹 मार्जाराचे आर्जव 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आज माझी प्रिय सखी

बसे उंच मजवर रागावून,

अपराध काय घडे माझा

नकळे माझ्या हातून !

*

करुनी तुझी प्रेमाराधना

रग लागली हाता पाया,

वाकुल्या दावीत गवाक्षात

सावरून बसलीस काया !

*

मधू इथे आणि चंद्र तिथे

चालती प्रेमचाळे मानवात,

डोळे मिटून दूध पिणारी

असे आपली मार्जार जात !

*

बघता फासला दोघातला

विरह संपेल तव उडीत,

मिलन होता दोघे चाखू

गोडी प्रणयाची थंडीत !

…… गोडी प्रणयाची थंडीत !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 257 ☆ ओझी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 257 ?

☆ ओझी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 सारी ओझी जड झाली

नाती कशी निभवावी

कुणी कुणाला टाळावे

कुठे जत्रा भरवावी ?

*

 संग अंसगाशी नको

असे सांगती नावाला

जिथे जायचे नसते

येतो तरी त्या गावाला

*

जगण्याच्या असोशीला

काय समजावे आता

माथी ओझी जड झाली

यश का येईना हाता

*

 सांजवेळ आयुष्याची

रम्य असो भगवंता

डोई वरची ही ओझी

कशी उतरावी आता ?

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रस्ता… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

रस्ता ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

सायंकाळी काम संपताच घरी येतो मी

आपल्या गावच्या मातीत हर्षभरीत होतो मी

*

माहित आहे उन्हात पायाला बसती चटके

तरी मला कळत नाही का बरे तेथे जातो मी

*

बऱ्याच वेळा असहकार भांडतो मी दुसऱ्याशी

 काही वेळा माझ्या सावलीला का बरे भीतो मी

*

तसा जगतो मी जीवनात अगदीच धाडसाने

तरी ही ऐनवेळी निर्णयात का बरे चुकतो मी

*

मला जायचे ठरवतो आणि तसाच निघतो मी

हे सारे कळत असता का बरे रस्ता चुकतो मी

*

जगताना ब-याच गोष्टींनी त्रासावून जातो मी

सारे समजूनही तडजोड का बरे करतो मी

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ““फक्त तुम्ही स्वतः व्यवस्थित रहा – –…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “फक्त तुम्ही स्वतः व्यवस्थित रहा – –…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

तुम्ही एकही झाड लावू नका,

ती आपोआप उगवतात,

तुम्ही फक्त – ती तोडू नका…

 

तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका,

ती प्रवाही आहे,

स्वतः स्वच्छच असते,

तुम्ही फक्त – तिच्यात घाण टाकू नका…

 

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका, सर्वत्र शांतताच आहे,

तुम्ही फक्त – द्वेष पसरवू नका…

 

तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही,

ती क्षमता निर्सगात आहे,

फक्त – त्यांना मारू नका,

जंगले जाळू नका…

 

तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका,

सर्व व्यवस्थितच आहे,

फक्त तुम्ही – स्वतःच व्यवस्थित राहा…

— — निसर्ग…

  ☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सिंहस्थ… कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सिंहस्थ… कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

(कुंभ) 

व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर

संतांचे पुकार, वांझ झाले

*

रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग

दंभ शिगोशीग, तुडुंबला

*

बँड वाजविती, सैंयामिया धून

गजांचे आसन, महंता‌सी

*

आले खड्ग हाती, नाचती गोसावी

वाट या पुसावी, अध्यात्माची?

*

कोणी एक उभा, एका पायावरी

कोणास पथारी, कंटकांची

*

असे जपीतपी, प्रेक्षकांची आस

रुपयांची रास, पडे पुढे

*

जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ

त्यात हो तुंबळ, भाविकांची

*

क्रमांकात होता, गफलत काही

जुंपते लढाई, गोसव्यांची

*

साधू नाहतात, साधू जेवतात

साधू विष्ठतात, रस्त्यावरी

*

येथे येती ट्रक, तूप साखरेचे

टँकर दुधाचे, रिक्त तेथे

*

यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची

चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी

*

येथे शंभराला, लाभतो प्रवेश

तेथे लक्षाधीश, फक्त जातो

*

अशी झाली सारी, कौतुकाची मात

गांजाची आयात, टनावारी

*

तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद

त्यापाशी गोविंद, नाही नाही.

कवी : कुसुमाग्रज

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #269 ☆ अंधाराच्या छाताडावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 269 ?

☆ अंधाराच्या छाताडावर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कोणी नसता सोबत माझ्या सोबत करतो मला काजवा

अंधाराच्या छाताडावर आहे दिसतो मला काजवा

 *

अंधाराला घाबरते मी त्यास बरोबर कळते आहे

सामसूम ह्या रस्त्यावरती कवेत धरतो मला काजवा

 *

धरून हाती चुंबन घ्यावे असे वाटते जेव्हा जेव्हा

तेव्हा हाती लागत नाही पाहुन पळतो मला काजवा

 *

वैरी नाही मी तर त्याची हे त्यालाही माहित आहे

जवळी जाता पळून जातो का घाबरतो मला काजवा

 *

मैत्र जमवुनी कधी कधी तो चंद्रावरती करतो स्वारी

नको नको त्या खोड्या करतो आणिक छळतो मला काजवा

 *

आकाशी तो फिरतो म्हणुनी त्यास वाटते तारा झालो

दृष्टी माझी पक्की आहे सहजच कळतो मला काजवा

 *

कधी अचानक अंधारातच गायब होतो कळण्या आधी

मला एकटे सोडुन जातो भय दाखवतो मला काजवा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवीनायक… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कवीनायक… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कविच्या उरात शब्दांची वरात

कल्पना भरात विवेकशृंगार.

 *

मनाच्या माहेरी भावना दाटती

अक्षरे भेटती हृदय स्पंदनी.

 *

नाचती आनंदे ऋतूंची प्रसंगे

निसर्ग अभंगे चरण पाखरे.

 *

ऐसेही रचित प्रज्ञेच्या सेवेत

कवण कवेत विसावे प्रतिभा.

 *

जे न देखियती तेजस्वी अलोक

कृपेचा पाईक कवीचे जीवन.

 *

लेखणी प्रसन्न सत्याचे दृष्टांत

कवीचा निष्ठांत आत्माही कविता.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जरी निसटले बरेच काही… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

सौ. सुनिता जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ जरी निसटले बरेच काही… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

जरी निसटले बरेच काही…

थोडे नवे गवसत गेले…

ओंजळ थोडी रिती झाली…

तरी झरे नवे बहरून आले…

 *

असेच आले वादळ काही…

क्षणात कुणास घेऊन गेले…

नाती काही विरत गेली…

पण बीजांकुरही दिसू लागले…

 *

खरे-खोटे दिसले काही…

सत्तेपुढे झुकून गेले…

विश्वासाची साथ बदलली…

तरी डाव नवा टाकून आले…

 *

निखळ जगणे संपले काही…

स्वार्थीच सारे बनून गेले…

मानवतेची हाक हरपली…

पण नव्या जाणिवा दावू लागले…

वाईट-साईट संपावे काही…

गतवर्षाच्या संध्याकाळी…

माणुसकी ही जात उरावी…

नव्या वर्षाच्या गर्भाठायी…

© सौ. सुनिता जोशी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मकर संक्रांती… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मकर संक्रांती? श्री आशिष  बिवलकर ☆

मकर राशीत | रवीचे भ्रमण |

तेजाचे कंकण | मकरेला ||१||

*

पुत्र शनी घरी | पिता आगमन |

पंचागाचे पान | ग्रहयोग ||२||

*

मकर संक्रांती | आकाशी पतंग |

तिळगुळ संग | गोडव्यासी ||३||

*

तिळगुळ घेत | गोड बोला मुखी |

रहा तुम्ही सुखी | जीवनात ||४||

*

भारत वर्षात | अनन्य महत्व |

सांस्कृतिक सत्व | जपतांना ||५||

*

सुवासिनी करी | सुगडी पूजन |

तन मन धन | संसारात ||६||

*

निसर्गाशी आहे | सुसंगत सण |

हिंदूंच जगणं | संस्कारांनी ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares