श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ मराठी माऊली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
भाषा मराठी माऊली मला कृपेची सावली
तिने लडिवाळपणे प्रजा मराठी जपली
पूर्वजांनी लेखनाने तिची खूप सेवा केली
लाख मराठी मुखांनी सिंहगर्जना ही केली…
*
ज्ञाना, तुका, नामा, एका, तिच्या भजनी लागले
सरस्वतीच्या मंदिरी दिव्य ज्ञान साठवले
ज्ञानसाठा पुरवाया झाली संस्कृत जननी
अनुवाद करण्याने भव्य तिजोरी भरली…
*
तेज लेवून स्वतंत्र नांदू लागली मराठी
भाषा भगिनींच्यासंगे तिच्या झाल्या गाठीभेटी
प्रगतीच्या वाटेवर खूप केली घोडदौड
झाली संमृद्ध संपन्न सा-या जगाने पाहिली…
*
प्रादेशिक वळणाची तिची खुमारी वेगळी
लळाजिव्हाळा जपतं दीर्घ बनली साखळी
तिच्या सामर्थ्याची आता झाली आहे परिसिमा
ज्ञान मिळवत तिने भारी भरारी घेतली …
*
अध्यात्माचे अंतरंग मराठीनेच खोलले
सर्व धर्म समभाव हेच तत्व जोपासले
नीतिशास्त्र सांगताना हाच मांडला आदर्श
लोकसाहित्याची धारा साध्या शब्दात मांडली…
*
ज्ञानशाखा आळवत केली स्वतंत्र निर्मिती
जागतिक आकांक्षांची केली सारी परिपूर्ती
सर्वांगीण विकासाचा ध्यास मनात जपत
जागतिक स्तरावर तोलामोलाने वाढली…
*
ग्रंथ निर्मिती कराया थोर साहित्यिक आले
त्यांना पदरी घेवून तिने आपले मानले
आता घेतलाय वसा स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा
त्याने मराठी बाण्याची गोडी सर्वत्र वाढली…
*
आपल्याच कर्तृत्वाचा जपू आपण वारसा
जगी ध्वज फडकवू माझ्या मराठी भाषेचा
एकसंध होवूनीया लावू सामर्थ्य पणाला
तेज दाखवाया घेवू हाती मराठी मशाली…
*
आहे अंगात सर्वांच्या एक बळ संचारले
माय मराठी म्हणून मन आहे भारावले
करू मानाचा मुजरा आज मराठी भाषेला
तिच्या वैभवाची स्वप्ने आम्ही मनी साकारली…
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈