२७ फेब्रुवारी हा मराठी भाषेला गौरवान्वित करणारा सुवर्णदिन! २०१३ पासून हा दिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, ही एकुलती एक बहीण सर्व भावांना जीव की प्राण सर्वांची लाडकी, म्हणून कुसुमचे अग्रज अर्थात ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.समाजाभिमुख लेखन करणाऱ्या मराठी लेखकांमधील हे शिखरस्थ नाव! बहुउद्देशीय आणि बहुरंगी लेखनकलेचे उद्गाते असे कुसुमाग्रज जितक्या ताकदीने समीक्षा करीत इतक्याच हळुवारपणे कविता रचित. रसिकांच्या मनात ज्या नाटकाचे संवाद घर (उदाहरण द्यायचे तर ‘कुणी घर देता का घर) करून आहेत, असे ‘नटसम्राट’ नाटक, ज्याच्या लेखनाने कुसुमाग्रज ज्ञानपीठ विजेते (१९८७) ठरले! शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे केल्या गेले आहे. वि.स. खांडेकर (त्यांना ययाती कादंबरीकरता हा १९७४ मध्ये हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला) यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. संतसाहित्यात तर संत ज्ञानेश्वरांनी (१२९०) वरीलप्रमाणे मऱ्हाटी भाषेचे केलेलं हे कौतुक! आपली मराठी भाषासुंदरी म्हणजे ‘सुंदरा मनामधिं भरलि’ अशी रामजोशींच्या स्वप्नातील लावण्यखणीच जणू! अमृताहुनी गोड अशा ईश्वराचे नामःस्मरण करतांना मराठीची अमृतवाणी ऐकायला आणि बोलायला किती गोड, बघा ना: ‘तिन्ही लोक आनंदाने आनंदाने भरुन गाउ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे!’
या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात. या अभिजात साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! म्हणूनच प्रश्न पडतो की मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून सरकारदरबारी मान्यता मिळायला आणखी किती समृद्ध व्हावे लागेल? पैठणीसारखे महावस्त्र नेसल्यावर आणखी कुठले वस्त्र ल्यायचे तिने?
मराठी भाषेचे पोवाडे गायला, तिच्या लावण्याच्या लावण्या गायला आणि तिच्यावरील भक्ती दर्शवण्याकरता अभंग म्हणायला मराठीच हवी. तिचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी करणारे महान साहित्यिकच नाही तर सामान्य माणसे कुठे हरवली? शब्दपुष्पांच्या असंख्य माळा कंठात लेऊन सजलेली आपली अभिजात मायमराठी आज आठशे खिडक्या नऊशे दारं यांतून कुठं बरं बाहेर पडली असावी? ‘मराठी इज अ व्हेरी ब्युटीफुल ल्यांगवेज!’ असे कानावर पडले की संस्कृतीचे माहेरघर अशी मराठी असूनही, तिच्या हृदयाला घरे पडतील अशी मराठी ऐकून! सगळं ‘चालतंय की’ असे म्हणत म्हणत ‘ती मराठी’ शासकीय आदेशांत बंदिस्त झाली.
‘मी मराठी’ चा गजर करणारे आपण मराठी साहित्य विकत घेऊन मुलांना ते वाचण्याकरिता किती प्रवृत्त करतो? मराठी सिनेमे घरीच बघत का आनंद मानतो? मराठी नाटकसुंदरीची खरी रंगशोभा रंगमंचावर! कुठलीही भाषा शिकण्याचा प्रारंभ पाळण्यातून होतो. (गर्भसंस्कार विचारात घेतले तर गर्भावस्थेतच) बाळ जन्माला आल्यावर त्याच्या कणावर जे पडते ते अति महत्वपूर्ण शिक्षण! हे बाळ भाषेचा पहिला उच्चार ‘आई’ म्हणून करते का ‘मम्मी’ म्हणून? थोडा मोठा झाला की ते ‘nursary rhymes’ शिकते की रामरक्षा अथवा शुभंकरोती?
बरे, मराठी माध्यमात आपल्या मुलांना शिकवण्याची उर्मी कुणात आहे? मराठी माध्यमातील शाळेत मुलाने जावे हे बऱ्याच पालकांना पटणार नाही. मात्र एक भाषा म्हणून मराठीची निवड करणे अत्यावश्यक आहे. सरकारी पातळीवर हे कार्य सुरु आहेच. मराठी भाषेची गोडी निर्माण होईल असे मराठी भाषेतील साहित्य, नाटके, सिनेमे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना उपलब्ध करून द्यावेत. मला याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा असा वाटतो की, पालक, आजी, आजोबा आणि शिक्षकांनी यांनी मुलांशी मराठी भाषेतून संवाद साधावा. प्रत्येक मराठी घराघराने किमान एक तास आपल्या भाषेला समर्पित करावा. त्यात अस्खलित मराठी बोलणे, अभिजात मराठी साहित्य वाचणे, सुंदर मराठीत जे असेल ते श्राव्य साहित्य ऐकणे, हे उपक्रम राबवावेत. यात टी व्ही/ ओ टी टी या माध्यमातील मराठी सिरीयल/ सिनेमे इत्यादींचा समावेश नसावा. रोज रोज ती भाषा कानावर पडल्यावर अथवा नजरेखालून गेल्यावर मुलांना आपोआपच ‘मराठी भाषेतून विचार करण्याची’ सवय लागेल. मराठी शुद्धलेखन शिकायचे तर कुठल्याही (शाळेतील पाठ्यक्रम सोडून) अवांतर विषयावर मुलांनी रोज पानभर मजकूर लिहावा किंवा रोजनिशी लिहिण्यास मराठीचा वापर करणे अत्युत्तम!
मात्र यात पालक कुटुंबातील सदस्य, समाजातील व्यक्ती आणि महाराष्ट्र सरकार, या सर्वांच्या सहकार्याशिवाय मराठी भाषेचे संस्कार मुलांवर होणार नाहीत. यासाठी हृदयातून साद यायला हवी ‘माझी माय मराठी!’
या लेखाची सांगता कविवर्य सुरेश भटांच्या प्रेरणादायी मराठी गौरव गीताने करते.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी,
आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी,
आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी, येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
सुरेश भट
प्रिय वाचकांनो, मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याला नटवणाऱ्या आणि सजवणाऱ्या काना, मात्रा अन वेलांट्यांची शप्पथ, माझी अमृताहुनी गोड मराठी मला अतिप्रिय आणि तुम्हाला?
☆ आला किनारा… कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆
२७ फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने
कुसुमाग्रज म्हणजे शब्दांची, कल्पनांची मुक्त उधळण करणारा अवलिया! मराठी वरचं प्रेम, देशावरचं प्रेम, समाजावरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम अशा अनेक अंगांनी वाहणारा कवितांचा अखंड झरा! समाजातील विषमता, जाती – जातीतले भेद, अस्पृश्यतेचा कलंक यावर कवितांतून कोरडे ओढणारा समाजवादी! हा तर सरस्वतीच्या मुकुटातला लखलखणारा हिरा!
अशा या शब्दप्रभू च्या स्मृती जागविण्याचा आजचा दिवस! अर्थात कधी एखाद्या दिवसासाठी सुध्दा विस्मरणात जावा, असा हा माणूसच नाही.किमान पक्षी रोज त्यानं पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणावं, असं तरी प्रत्येकाला वाटतंच. मी आज त्यांच्या विस्मरणात चाललेल्या सुंदर कवितेची आठवण करून देणार आहे.विस्मरणात चाललेली असं म्हणायचं एकच कारण, मला ही कविता गुगल गुरू कडे मिळाली नाही, त्यावरचा एकही लेख, आठवण काहीही मिळालं नाही. आठवणीतील गाणी यावर सुध्दा मिळाली नाही. शेवटी ती मला टाईप करावी लागली.
मी कधीच ही कविता विसरू शकणार नाही. आम्ही मैत्रिणी सांगलीतील गायिका स्मिता कारखानीस यांच्याकडे गाण्याच्या क्लासला जात होतो.रिटायरमेंट नंतर सुचलेली कला असल्यामुळे त्या सोपी सोपी गाणी शिकवतील आणि निदान गुणगुणण्या एवढं तरी गाणं यायला लागेल अशी माफक अपेक्षा होती. त्या जरा धाडसी शिक्षिका निघाल्या. त्यांनी आम्हाला ही कुसुमाग्रजांची कविता, आम्ही कुठेही कधीही न ऐकलेली, त्यांनी स्वतः चाल लावलेली, शिकविली.तशी चाल अवघड होती, त्यामुळं गाणं चांगलं म्हणायला जमलं नाही, पण इतकी सुंदर कविता कळली, गुणगुणता आली, त्यामुळे पाठ झाली, याचा प्रचंड आनंद होता. त्यासाठी स्मिताला मनापासून धन्यवाद!
कुसुमाग्रज हे स्वातंत्र्य संग्रमाचा दाह सोसलेले आणि नंतर स्वातंत्र्याचा आनंद अनुभवलेले होते. त्यांच्या बऱ्याच कविता या विषयावरच्या आहेत. त्यांनी हताश होवून सुवर्ण महोत्सवाच्या वेळी लिहिलेली ‘स्वातंत्र्य देवीची विनवणी ‘ ही कविता आज अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी वर्तमानाला साजेशीच वाटते. कवितेमधून सत्य परखडपणे मांडण्याचं कसब आणि तो सच्चेपणा त्यांच्यात होता.
मी घेतलेली आजची कविता स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित असली तरी आनंद घेऊन आली आहे. ज्या क्षणाची सगळे वाट पहाट होते तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, हे सांगणारी ही कविता आहे.भारतमातेच्या सुपुत्रानी एक खूप मोठ्ठं स्वप्न पाहिलं. त्याच्या पूर्ततेसाठी लाखो लोकांनी अनेक तपे अथक परिश्रम केले. या मार्गात असंख्य अडचणी, अगणित वेदना आहेत हे ठाऊक असूनही, मार्ग सोडला नाही. कारावास भोगला, प्राणांची आहुती दिली, कुटुंबाची होळी केली. जीवाची पर्वा न करता या खवळलेल्या सागरात उडी घेऊन आयुष्य पणाला लावलं. आता किनारा जवळ आला आहे, तो स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. आता सगळे श्रम संपणार आहेत. ज्यांच्या समर्पणाने आजच्या या क्षणाला आकार दिला त्यांच्या स्मृतीला गौरवाने वंदन करुया आणि किनाऱ्यावर जयाचे झेंडे उभारुया. या अर्थाची सुंदर कविता तुम्हाला स्मिताच्या You tube channel वर त्यांच्या गोड आवाजात ऐकायला मिळेल.
आज मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने मराठीचे अवलोकन करताना त्यातील बाराखडी व मुळाक्षरांच्या वेगवेगळ्या दर्शनानी भावली आणि मराठी असल्याचा आनंद झाला. पहा तुम्हालाहि मिळ्तोय का? आणि खरच आवड्ल्यास कॉमेन्ट्स द्यायला,शेअर करायला,लाईक करायला विसरू नका.
ऐका मंडळी सुजाण। मराठीचे हे पुराण।वर्षा तुम्हा समजावूनी सांगतसे॥
मराठी भाषेसी ना तोड। तया नाही कशाची जोड।अमृताहूनी गोड, देववाणी॥
३६ मुळाक्षरांची मुळे। बाराखडीची बारा पाने।हलवूनी कल्पवृक्ष साकार होई॥
आता सारे आपण। बाराखडीचे करू अवलोकन।ठेवूनी ध्यान,कान देऊनी ऐका॥