मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

श्री आशिष बिवलकर   

? – एक धागा अंतरीचा गाभा– ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

गुंफल्या या मूक कळ्या 

गजऱ्याची झाल्या शोभा |

शल्य ना मनी कशाचे,

एक धागा अंतरीचा गाभा |

एक एक कळी गुंफली 

एकमेकींचे वाढवले सौंदर्य |

क्षणभंगुर या जीवनात,

जोपासले आनंदाचे औदार्य |

रंग रूप गंध लाभे,

एक दिवसाचा साज |

सुकता कुणी न पाहे,

आनंदे जगून घेती आज |

गजरा म्हणून एक ओळख,

कोणाचे कुंतल सजवती |

हातात कुणाच्या बांधून ,

मैफलीत गंध दरवळती |

प्रारब्ध होई धागा,

गुंफतो आपल्या कर्माच्या माळा |

क्षण क्षण सत्कारणी लावावा,

सार्थ करावा जीवनाचा सोहळा |

आनंद या जीवनाचा,

सुगंधापरी दरवळावा |

सार लाभल्या आयुष्याचा,

कळ्यांना पाहून ओळखावा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री ए के मराठे

? – एक धागा अंतरीचा गाभा… – ? ☆ श्री ए के मराठे ☆

( २ )

कळ्या निमूट ओवून घेतात

गजऱ्यामधे स्वतःला

दोष देत बसत नाहीत

सुईला वा सुताला ll

कारण त्यांना माहीत असतं

हेच त्यांचं काम आहे

क्षणभंगुर मिळालेलं आयुष्य

जगण्यामधेच राम आहे ll

रूप,रंग एका दिवसाचा

गंधही उद्या राहणार नाही

फुल होऊन कोमेजल्यावर

ढुंकूनही कुणी पाहणार नाही ll

म्हणून म्हणतो जसं,जेवढं

मिळालंय जीवन जगून घ्यावं

विषालाही अमृत समजून

हसत हसत चाखून प्यावं ll

कवी : श्री ए के मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तारांगण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तारांगण☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आहे तसाच कच्चा पिकलो अजून नाही

मी अंतरात माझ्या मुरलो अजून नाही

*

तपसाधना कराया विजनात वास केला

ज्ञानात पावसाच्या भिजलो अजून नाही

*

त्यांच्या धिम्या गतीने उलटून काळ गेला

काळासवे सुखाने फिरलो अजून नाही

*

बिथरून खूप राती दाऊन धाक गेल्या

भयमुक्त शांत निद्रा निजलो अजून नाही

*

काळीज जाळणारा सोसून दाह सारा

माळावरी उभा मी वठलो अजून नाही

*

पाठीवरील ओझे फेकून द्यायला मी

लांबून खूप आलो शिकलो अजून नाही

*

झोळी भरून माझी ओसंडते सुखाने

कुठल्याच वैभवाने दिपलो अजून नाही

*

कोरून कातळाला थकलोय खूप आता

स्वानंद जीवनाला भिडलो अजून नाही

*

ठरवून संकटांनी हल्ले बरेच केले

लाचार होउनी मी हरलो अजून नाही

*

निरखून भव्य सारे आकाश पाहिले मी

तारांगणी मला मी दिसलो अजून नाही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 162 ☆ हे शब्द अंतरीचे… तू आणि मी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 162 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… तू आणि मी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

अनोळखी तू,अनोळखी मी

असेच एकदा कुठे भेटलो

तुला पाहिले सखे अन्

मला मी तिथेच विसरलो

 

का आलीस समोर माझ्या

का नेत्र शर संधान केले

अबोल माझ्या बोलास

तू बोलते केले…

 

मी होतो एकटा जेव्हा

मस्त होते जीवन हे

तुझ्या येण्याने बदल होता

अडखळती पाय माझे…

 

मोगरा फुलला जैसा

तुझी कांती तैसी

चाफ्याच्या सुवास यावा

तुझी अंगकांती बहरली…

 

डोळ्यांत चमक तुझ्या

जादूगार जशी तू

ओठ जसे प्रिये

डाळिंब फुटले…

 

केस मोकळे रेशमी

गालावर बट रुळते

पाहून हे दृश्य सजने

माझी बोबडी वळते

 

पुन्हा तुला पाहावे वाटते

वेड लावले मला तू

अजूनही उभा तिथेच मी

जिथे भेटली होतीस तू…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ताळेबंद… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

😳 ताळेबंद 😀 ☆ श्री सुहास सोहोनी ☆

आयुष्याच्या ताळेबंदात

ॲसेटस् किती

नि लायबिलिटीज् किती

निरखुन पाह्यलं तेव्हा कळलं

कशी झाल्येय दारुण स्थिती …

 

ताळेबंद जुळतच नव्हता

दोन्ही बाजूत फरक होता

मालमत्तेच्या मूल्यापेक्षा

जबाबदाऱ्या जास्त होत्या …

 

पुण्यकर्मे पापकृत्ये

पुन:पुन्हा ताडून पाहिली

एकमेका छेद जाउनी

बाकी त्यांची शून्य राहिली …

 

डोके पिकले विचार करता

तोच बोलले कोणी काही

कसा जुळावा ताळेबंद

“अखेर शिल्लक” धरलीच नाही …

 

😨ओह्, अखेर शिल्लक !!!😳

 

झोळीत शिल्लक काय माझ्या

ज्याचे ओझे जड होते

आप्त स्वकीय मित्रांच्या ते

निस्सिम प्रेमाचे होते …

 

प्रेमाच्या निरपेक्ष भावना

फेड तयांची कशी करावी

बहुमोलाची ठेव जणू ही

जबाबदारी कां मानावी …

 

आनंदाच्या ऋणातून या

कधी न वाटे व्हावे मुक्त

“अखेर शिल्लक” वर्धित व्हावी

स्वकीय मित्रांच्या स्नेहात …

 

माथ्यावरती सदैव पेलिन

प्रेमाचे हे वैभव संचित

लाख लाख मोलाची ठेविन

“अखेर शिल्लक” या झोळीत …

© सुहास सोहोनी

दि. २२-२-२०२४

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्षणभर स्वतःसाठी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

 

क्षणभर स्वतःसाठी ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्याचं प्रत्येकाचं जीवनमान हे खूप धकाधकीचे, घाईगडबडीचे झाले आहे.पर्यायाने ते कसल्यातरी तणावाचे पण झाले आहे.आपल्या नित्य दैनंदिन कामकाजात आपण खूप लोकांशी संवाद साधतो.त्या संवादातून, जवळीकेतून कधी मदतीच्या भावनेने आपली कामे इतरांकडून करुन घेतो वा आपण इतरांची कामे करुन देतो.हे सगळं आपण करतो खरं पण अजूनही आपल्याला पूर्णत्वाचा,संतोषाचा,  समाधानाचा कळसोध्याय हा पूर्णच झाल्या नसल्याचे उमगते.आणि मग कारणं शोधतांना एक महत्वाचे कारण सापडते तो म्हणजे आपल्या आतील मनाचा आवाज ऐकण्याचा अभाव.आपले अंतर्मन नेहमी आपल्याला ज्या हव्याहव्याशा वाटणा-या गोष्टी सांगतं त्या खुणावणा-या गोष्टींकडं आपण कधी गरज म्हणून तर कधी संकोच म्हणून, कधी आडमुठेपणा तर कधी संस्कारांचा पगडा म्हणून चक्क कानाडोळा करतो. ह्याचे परिणाम लगेच दिसतं नसले तरी मनावर खोल दूरगामी उमटतं असतात.त्यामुळे सगळं हातातच असून वाळू निसटल्यागतं सारखा गमावल्याचा भास होतो आणि हा भासच आपल्याला आनंदी राहण्यापासून वंचित ठेवत़ो.हा विचार करतांना ह्या मला सुचलेल्या काही ओळी खालीलप्रमाणे……… 

कधी कधी मज रहावे वाटते एकटे,

स्वतःच स्वतःशी बोलावे वाटते नीटसे,

डोकवावे वाटते कधी स्वतःच्याच अंतरी,

कधीतरी न दाबता खंत करावी मोकळी ।।।

*

श्वास घ्यावा मोकळा,दडपण हे संपवावे,

ऊत्तरायणातील दिवस हे मनासारखे जगावे,

सताड उघडोनी कवाडे,स्वातंत्र्याचे वारे प्यावे,

सल मनीचा तो काढून,मुक्तमनाने बागडावे।।।

*

सगळ्यांचा विचार करतांना फार न त्यात गुंतावे,

जखम मनीची ओळखून त्यावर हलकेच फुंकावे,

आपल्यांना साभाळतांना कधी स्वतःलाही जपावे,

नुसतेच झोकून देतांना,”मी”चे महत्व पण जाणावे।।

*

काय हवे हो नेमके मनी एकदातरी पुसावे,

इतरांसाठी जगतांना थोडे आपल्यासाठी पण जगावे,

सगळ्यांना देता देता आपुले न निसटू द्यावे,

झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे

झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे।।

*

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “अथांगता…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “अथांगता– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सागराच्या अथांगतेला

न्याहाळत  बसतो

क्षितिजाशी दर्याचे मिलन

 मनी साठवतो

*

उसळत्या लाटांचे  नर्तन 

 उत्साहे पाहतो

पाहता सागर अवघा 

शरिरी भिनतो

*

शेकडो नद्यांचे मिलन 

सागराशी होता

सर्वांना तो आपल्यात

सामावूनी घेतो

*

नर्तन  करती लाटा की

नद्यांचे पाणी

नदिच्या पाण्याच्या जणू

तो लहरी करतो

*

अथांग जलनिधी पुढती

त्याची प्रचंड ताकत 

किती न्याहाळू  तरीही

तृप्ततेचा आभास न होतो ।।।। 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कोण खरं कोण खोटं ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कोण खरं कोण खोटं ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

कोण खरं कोण खोटं

जगण्यापेक्षा असतं का ते मोठं

जे जसं आहे तसं

स्वीकारलं  तर काय बरं बिघडतं  …

*

काय चूक काय बरोबर

ठरवणं महत्वाचं असतं का खरोखर

चुकातूनही शिकता येतं

बरोबर तरी नेहमीच कुठं सोबतीला राहतं…

*

बदल नेहमी चांगला असतो

तरीही नकोनकोसाच वाटतो

न बदलता कुणाला बरं रहता येतं

बदललोच नाही तर जगणंच कठीण होवून बसतं ….

*

माझं ते माझं ,तुझं ते तुझं

सगळंच सारखं सगळ्यांचं

असं का होतं कुठं

वेगळेपण प्रत्येकाचं असतं महत्वाचं …

*

नको तक्रार नको स्पर्धा

तुलनेत जीव होई अर्धा अर्धा

स्वीकारू जो आहे जसा तसा

हाच सुंदर आयुष्याचा मार्ग सोपा…

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 210 ☆ मौलिक आधार… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 210 – विजय साहित्य ?

☆ मौलिक आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

(अष्टांक्षरी रचना…)

एक धागा सुखाचा रे

पदोपदी गुंफलेला

आठवांच्या मागावर

ताना बाना सांधलेला,..! १

*

बाल तारूण्य वार्धक्य

एक धागा जरतारी

वस्त्र तीन रंगातले

आत्मरंगी कलाकारी…! २

*

आठवांचे मोरपीस

बंध हळव्या शब्दांचे

भावनांचे कलाबूत

हार काळीज फुलांचे…! ३

*

सुख नाही रे जिन्नस

त्याचा नसावा व्यापार

काळजाच्या वेदनेला

सुख मौलिक आधार…! ४

*

एक धागा सुखमय

ठेवी नात्यांना बांधून

स्वभावाचे दोष सारे

घेती आयुष्य सांधून…! ५

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवाघरी गेली आई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ देवाघरी गेली आई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

देवाघरी गेली आई नाही सांगून ती गेली

अन्यायाची परिसीमा आई अशी कशी केली..

*

हक्काचे ते माझे ठाणे असे हरवून गेले

निराधार निराधार अगदी उघडी पडले

आठवता आई तुला मनी घालमेल झाली..

                  देवाघरी गेली आई …

*

कष्ट आठवता तुझे फार कणव ग येते

खंत वाटतेच मनी काही समजत नव्हते

आली समज ग जेव्हा माझी लढाई ठाकली..

                 देवाघरी गेली आई…

*

जातांना तरी भेटायचे बोलायचे होते आई

एका श्वासाचे अंतर तुला कळलेच नाही

छप्पर उडाले बघ गार सावली ती गेली..

                 देवाघरी गेली आई…

*

आहे तोवर भेटावे मनी गुज ते सांगावे

उद्याचा ना भरवसा आज प्रेम द्यावे घ्यावे

नको नको पश्चाताप प्रिय देवाला तू झाली..

                 देवाघरी गेली आई….

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।

योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ।।११।।

*

त्यागुनी आसक्ती  अंतःकरण शुद्धीस्तव कर्मा आचरत

स्वभाव जाणुनी देहमनबुद्धीचा कर्मयोगी कर्मा आचरत ॥११॥

*

युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।

अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।१२।।

*

त्यागुनी कर्मफला कर्मयोगी शांति करितो प्राप्त

त्याग न करता फलाकांक्षेने लोभी बद्ध बंधनात ॥१२॥

*

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।१३।।

*

कर्मासी जो आचरितो समर्पित वृत्तीने 

नवद्वार नगरी स्थित  तो परमात्म स्वरूपाने॥१३॥

*

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।१४।।

*

परमेशे ना निर्मिले कर्तृत्व कर्मफल वा कर्म

प्रकृती स्वभावे घडत जाते कर्त्या द्वारे कर्म ॥१४॥

*

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।

अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।१५।।

*

ब्रह्मात्मा कधी न करतो पाप वा पुण्य

अज्ञानाने झाकोळूनी जाते जसे ज्ञान

जीवन हा निर्मल नितळ अथांगसा डोह

कर्म करिता मनुजा मात्र लोभवितो मोह ॥॥१५॥

*

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।१६।।

*

तिमीर हटता अज्ञानाचा उजळे तत्वज्ञान 

सूर्यप्रकाशाने सृष्टी जैशी येत उजळून

अनावृत होता ज्ञान झुगारुन  झापड अज्ञान

विश्वात्म्याचे स्वरूप स्पष्ट मानव घेइ जाणून॥१६॥

*

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।१७।।

*

तद्रुप बुद्धी तदाकार मन परमात्म्याशी अद्वैत

आत्मज्ञाने ते निष्पाप मोक्ष तयांना हो प्राप्त ॥१७॥

*

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।

शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।१८।।

*

विद्या-विनयाची ज्याने बाणविली अंगी वृत्ती

कुंजिर श्वा गो चांडाळाशी असते त्याची समदृष्टी ॥१८॥

*

इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता: ।।१९।।

*

इह जन्मी संसारजेता समदृष्टी जयाची स्थित

ब्रह्मासम ते दोषरहित ब्रह्माठायी असती स्थित ॥१९॥

*

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।

स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।२०।।

*

मोद नाही प्रियप्राप्तीने ना उद्विग्नता अप्रियाने

स्थितप्रज्ञ ब्रह्मवेत्ता नित्य स्थित ब्रह्मी ऐक्याने ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares