मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्षाच्या स्वागताला… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

नववर्षाच्या स्वागताला… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

उभारून उंच गुढी अंगणी

नाविण्याची आरास झाली

आंब्याचे तोरण चौकटीला

नववर्षाच्या स्वागताला

*

पानगळीचा शिशिर गेला

देठ कोवळा चैतपालविला

रानोमाळी गुलमोहर फुलला

नववर्षाच्या स्वागताला

*

नववर्षाच्या सुवर्ण पहाटेला

सोनकिरणांची होते उधळण

नवा संकल्प मनी धरीला

नववर्षाच्या स्वागताला

*

मान कळकाच्या काठीला

शौर्य आणि विजयी ध्वजाचा

नवचैतन्याचा साज गुढीला

नववर्षाच्या स्वागताला

*

जपूनी आपली परंपरा

गुढीपाडवा करू साजरा

नाविण्याचा साज आयुष्याला

नववर्षाच्या स्वागताला

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “मर्यादेचे वर्तुळ…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “मर्यादेचे वर्तुळ– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

मर्यादेचे वर्तुळ भवती

तोल सांभाळीत चालते

मागुन येणारांच्यासाठी

दिवा घेऊनी वाट दावते —

*

वाटेवरचे खाचखळगे

येणारा चुकवत येईल

वेळ, इच्छा असेल जर

खड्डे सारे मुजवून घेईल —

*

 दगड काटे दूर सारतील

तया कोणी नष्ट करतील

त्यांच्या मागून येणारे मग

वेगे मार्गक्रमणा करतील —

*

 प्रकाश देणे मानसिकता

 मागच्यांना गरज ठरते

 समोरच्याला नजरेने अन्

 शब्दाने सुचविताही येते —

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊलखुणा ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊलखुणा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

नको नको म्हणताना

असा उगवतो क्षण

आणि पाझरती डोळे,

उगा भारावते मन

*

कोण कोठले प्रवासी ?

असे भेटती वाटेत,

आणि वाटेत चालताना,

जीव गुंतती जिवांत 

*

दुःख सांगावे, ऐकावे,

सुख वाटीत रहावे,

अंतरीचे भावबंध,

नकळत जुळवावे

*

असा प्रवास चालतो,

वाट थकते भागते,

ताटातुटीची चाहूल,

उगा मनात सलते

*

मन चरकते आणि

दिशा आडव्या वाटेला,

सुटे हातातला हात

आणि वारु उधळला

*

आता भिन्न, भिन्न वाटा,

आणि कारवा निराळा,

आठवणींच्या झारीत,

उरे स्नेहाचा ओलावा

*

आता पुन्हा कधी भेट ?

नको विचारूस कोणा,

आम्ही न्याहाळीत येऊ,

तुझ्या पाऊलांच्या खुणा…

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संधीप्रकाश… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संधीप्रकाश… – कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

निवृत्ती हा आयुष्यातील अवघड कालखंड असतो. शरीराने ज्येष्ठत्वाकडे झुकलेला पण मनाने अजूनही कार्यक्षम अशा अवस्थेत मनाची कुतरओढ होते. डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या “संधीप्रकाश” या कवितेत याच अवस्थेतील मनस्थिती मांडली आहे. आपण या कवितेचा आता रसास्वाद घेणार आहोत.

☆ संधीप्रकाश ☆

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशांनं 

अन् बावरून गेलो मी एकदम

*

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टीच होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

*

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप …..

पहाटेचा की कातरवेळेचा ….. ?

*

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे;

अन्  मग काय …..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

*

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो ….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

*

 मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून ?

छातीचा भाता फुटेल ना !

*

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात …..

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात …..

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशाबरोबरच …..

नेमकं उलट्या दिशेने ?

©️ डॉ‌. निशिकांत श्रोत्री

९८९०११७७५४

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशानं

अन् बावरून गेलो मी एकदम

पूर्ण रूपकात्मक असणारी ही कविता मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचल्यावर प्राप्त परिस्थितीने गांगरलेला कवी आपली मनोव्यथा सांगतो आहे. अखंड कार्यरत असणारा कवी कालपरत्वे निवृत्तीच्या वयावर येऊन ठेपला. वय विसरून काम करताना अचानक सामोऱ्या आलेल्या निवृत्तीने तो कावराबावरा होतो. मनाला एक प्रकारची मरगळ आल्याने गोंधळून जातो.

इथे संधीप्रकाश हे निवृत्तीसाठी योजलेले रूपक आहे. त्यावेळी उजेड मंदावतो. एक विचित्र उदासी मनाला घेरून टाकते. इथे तशीच अवस्था निवृत्त होण्याच्या विचाराने कवीची झालेली आहे.

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टी होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

इथे कवीने सूर्यप्रकाश, दिव्यांचा पिवळा उजेड ही रूपके वापरली आहेत ती उमेद म्हणजे जोम असणे आणि क्षमता कमी होणे यासाठी. तरुणपणात अंगात जोम असतो, मनात उमेद असते. आता वाढत्या वयाबरोबर तेवढी क्षमता राहिलेली नाही. आता आपली ताकद कमी पडेल अशी जाणीव व्हायला लागल्याने कवी बावचळून जातो आणि आता कसे होणार ही भीती त्याला सतावू लागते.

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप…..

पहाटेचा की कातरवेळचा…….?

कवी आपल्या कामकाजात इतका गढून गेलेला होता, यशोमार्गावर चालण्यासाठी अगदी झोकून देऊन कार्यरत होता की त्याला संधीप्रकाश दाटून आलेला कळलेच नाही आणि म्हणूनच क्षणभर त्याला हे लक्षातच येईना की हा संधीप्रकाश पहाटेचा आहे का संध्याकाळचा ?

पहाटे आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला संधीप्रकाश पसरतो. पहाटेच्या संधीप्रकाशा नंतर लख्ख सूर्यप्रकाश पसरतो आणि आपण मोठ्या उमेदीने कामाला लागतो. तेच संध्याकाळच्या संधीप्रकाशाने हळूहळू उजेड कमी होत जाऊन अंधार वेढून येतो आणि आपोआप काम थंडावते. नेमकी अशीच अवस्था वाढत्या वयाच्या निवृत्तीमुळे होते. पण कामाच्या तंद्रीत ही गोष्ट कवीला वेळेवर लक्षात येत नाही.

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे ;

अन् मग काय…..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

 

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

अजून सकाळ आहे, अजून खूप काम करायचं आहे असं मनात असतानाच संध्याकाळ झालेली जाणवल्यामुळे कवीची दोलायमान अवस्था होते. मग तो ही निवृत्ती, हा संधीप्रकाश पुढे ढकलण्यासाठी जीवतोड मेहनत करायच्या मागे लागतो. जिद्दीने काम करून निवृत्ती टाळायचा प्रयत्न करू लागतो. पण त्यामुळे आणखीन आणखीनच थकू लागतो. इथे सुवर्णकन्या हे मेहनती तरुणांचे रूपक आहे.

कवी सुध्दा तरूणांना लाजवेल इतकी मेहनत घेतो. पण त्यामुळे त्याची ताकद आणखी कमी होऊ लागते. वयाचा आणि कामाचा मेळच बसत नाही. कारण मनाची उभारी अजून शाबूत आहे पण शरीरच त्याला साथ देत नाही ही अवस्था म्हणजेच संधीप्रकाश. त्यामुळे कितीही जरी प्रयत्न केले तरी ही निवृत्ती कवीला किंवा कुणालाच टाळता येत नाही हेच सत्य आहे.

मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून

छातीचा भाता फुटेल ना !

कवीने कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्वीच्या जोमाने काम करू शकत नव्हता‌. निवृत्तिचा संधीप्रकाश टाळू शकत नव्हता. त्यामुळे आता नेमके काय करावे हा त्याला प्रश्न पडला होता. सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा जसा खाली उतरत नाही, चिकटूनच बसतो. तशीच ही निवृत्ती पण आता लोचटासारखी कवीच्या मानगुटीवरच बसली आहे. कितीही झटकली तरी ती खाली उतरत नाही, दूर होत नाही. त्यामुळे कवी भांबावून गेला आहे. अती धावाधाव केल्याने त्याची पूरती दमछाक झाली आहे. या नादात काही विपरीत घडू नये अशी त्याला आशा आहे.

सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा ही उपमा या निवृत्तीला चपखल लागू पडते आहे.  कितीही प्रयत्न केला तरी कवीची त्यापासून सुटका होत नाही.

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशा बरोबरच…..

नेमकं उलट्या दिशेने ?

बेसावध कवीला निवृत्तीने गाठले. त्याचे मन ते स्वीकारायला तयार नाही. मग तो जास्ती जोमाने राहिलेली कामे करायला लागतो आणि जास्तच थकून जातो. हे पाहिल्यावर तो सावध होतो आणि त्याला आपली चूक लक्षात येते. ‘आपल्या या आततायी वागण्याने निवृत्ती पासून दूर जायच्या ऐवजी आपण जास्त कमजोर बनत निवृत्तीच्या बाजूला धावतो आहोत ‘ हे पाहून मनाने ठरविलेल्या मार्गाच्या उलट आपण धावतोय हे त्याच्या लक्षात येते.

सर्वसामान्यपणे आपण योग्य वयात आपल्या कामधंद्याला लागतो. संसार सुरू होतो. असंख्य जबाबदाऱ्या, योजना, ध्येयं, उद्दिष्टे साध्य करण्यात आपण पूर्णपणे गढून जातो. पण पुढे जाणारा काळ त्याचे काम करीत असतो. यथावकाश आपले वय वाढत जाते. कार्यक्षमता कमी होत जाते आणि एक दिवस या कामातून आता निवृत्त व्हायला हवे असा क्षण येऊन ठेपतो. कामाच्या नादात आपल्या कार्यकाळाची संध्याकाळ समोर दाटून आली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.

अजून कितीतरी गोष्टी करायचे बेत आखलेले असतात. काही कामे अर्धवट असतात. मनातली उभारी अजून तशीच असते पण शरीर पूर्वीसारखे आता नीट साथ देत नाही ही वस्तुस्थिती असते. कामे अजून व्हायचीत अन हाताशी वेळ कमी आहे या परिस्थितीत मनाची ओढाताण होते आणि अट्टाहासाने मन पुन्हा नेटाने काम करायला लागते. पण त्यामुळे निवृत्ती पुढे जायच्या ऐवजी आपली आणखी दमछाक होते. शरीर आणखीनच थकल्याने उलट निवृत्तीला आपणच जवळ ओढल्यासारखे होते. आयुष्यभर उत्तम रीतीने कार्यरत असणाऱ्यांची ही सर्व घालमेल कवीने इथे अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.

कवितेची सौंदर्यस्थळे :– ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. आयुष्याच्या संध्याकाळी येणारी निवृत्ती म्हणजे मळभ दाटवणारा संधीप्रकाश हे रूपक त्या वेळची परिस्थिती अचूकपणे स्पष्ट करते. ‘सूर्यप्रकाश ‘हे रूपक तरुणवयातला जोम, उमेद तर ‘दिव्यांचा पिवळा प्रकाश’ हे क्षमता कमी होण्याची स्थिती उलगडतात.

‘सुवर्णकन्या’ हे अव्याहतपणे ध्येयासाठी कार्यरत तरुणांचे रूपक आहे. कितीही प्रयत्न केला तरी लोचटासारखी चिकटलेली निवृत्ती कितीही झटकली तरी दूर होत नाही. यासाठी ‘सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा’ ही उपमा अगदी अचूक ठरते. ‘धूसर मन’ म्हणजे नीट दिसत नाही अशी बावचळलेली मनाची अवस्था.

ही सर्व रूपके, उपमा प्रत्येकाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचे अचूक वर्णन करत त्या अनुभवाचा पुन:प्रत्यय देतात.

प्रत्येकाच्या आयुष्यातील निवृत्तीचा काळ म्हणजे जेव्हा मनाची उभारी अजून पूर्वीसारखीच आहे पण त्याला वाढत्या वयातील शरीर तेवढी साथ देत नाही‌ तो कालखंड. अशावेळी अजून बरीच स्वप्नं खुणावत असतात पण ती पूर्ण होतील की नाही या शंकेने उलघाल होते. वाढत्या वयाचा आणि कामाचा ताळमेळ न बसण्याची ही कातरवेळेची अवस्था कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘संधीप्रकाश’ या कवितेत अतिशय सुंदर समर्पक शब्दांत सांगितलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “माणुसकीची गुढी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “माणुसकीची गुढी…” ☆ श्री सुनील देशपांडे

गुढी उभारू सत्कार्याची

गुढी उभारू शुभकार्याची

मनामनावर पूल बांधुया

गुढी उभारूया  स्नेहाची

*

चालत राहो कार्य निरंतर

मृत्युंजय हो कार्य खरोखर

तना मनाच्या अंतर्यामी

गुढी उभारू उंच ढगावर

*

आत्मानंदासाठी उभारू

आत्मोन्नतिचा मार्ग पत्करू

नका विचारू गुढी कशाला

कशास जगणे नका विचारू

*

मना मनावर राज्य मराठी

वर्ष मराठी हर्ष मराठी

मराठमोळ्या भाषेसंगे

अमृतपैजा लावू मराठी

*

उंच काठीसम विचार उभवू

शालू सम समृद्धी नांदवू

कलश संयमाचा त्यावरती

माणुसकीची गुढी उभारू

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 217 ☆ मधुमास… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 217 – विजय साहित्य ?

 

मधुमास ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

ग्रीष्म ऋतूने, होई काहिली

चराचराने, उरी साहिली.

चैत्र पालवी, देई चाहूल

ऋतू राजाचे, वाजे पाऊल.

*

आला मोहर,आम्र तरूंला

रान फळांचा, घोस सानुला

कडे कपारी जांभूळ झाडे

करवंदाने, सजले पाडे.

*

हिरव्या चिंचा,चिमणी बोरे

शोधून खाती,उनाड पोरे.

फुले बहावा,पळस कधी

गुलमोहरी, चळत मधी.

*

फुलली झाडे,‌ झुकल्या वेली

गुलाब जाई, फुले चमेली

लक्ष वेधुनी ,घेई मोगरा

सुवर्ण चाफा,द्वाड नाचरा.

*

कोळीळ कंठी, सुरेल साद

वसंत आला, करी निनाद.

मंजूळ गाणी,मंजूळ पावा

कुठे दडूनी, बसला रावा.

*

गुढी पाडवा,आनंद यात्रा

कडूलिंबाची,हवीच मात्रा

पुरण पोळी, आगळा थाट

श्रीखंड पुरी, भरले ताट.

*

मशागतीची कामे सरली

तणे काढता,चिंता हरली.

उरूस जत्रा, गाव देवीची

निघे पालखी, आस भेटीची.

*

चैत्र गौरीची,गोकुळ छाया

वसंत कान्हा,उधळी माया

हळदी कुंकू,सजती नारी

मधुमासाची,करती वारी…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच :

मय्यासक्तमना: पार्थ योगं युंजन्मदाश्रय: ।

असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ।।१।।

कथिय श्री भगवंत 

ऐश्वर्या विभूती सामर्थ्य गुणांनी पार्था तू युक्त 

माझ्या ठायी अनन्य भावे मत्परायण तू भक्त

सकल जीवांचा आत्मरूप मी सर्वांचा प्राण

चित्त करुनी एकाग्र ऐकुनी स्वरूप माझे जाण ॥१॥

*

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।

यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ।।२॥

*

अतिगहन हे ज्ञान सांगतो तुजला पूर्ण विश्वाचे

यानंतर ना काही  उरते ज्ञान जाणुनी घ्यायाचे ॥२॥

*

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।।३।।

*

सहस्रातुनी एखादा असतो यत्न करी मम प्राप्तीचा

मत्परायण होउनी एखाद्या आकलन मम स्वरूपाचा ॥३॥

*

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।

अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।४।।

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।

जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ।।५।।

*

पृथ्वी आप वायु अग्नी व्योम बुद्धी मन अहंकार

मम अपरा प्रकृतीचे हे तर असती  अष्ट प्रकार

सामग्र विश्व जिने धारिले जाण तिला अर्जुना

परा प्रकृती माझी तीच शाश्वत जाणावी चेतना ॥४,५॥

*

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।

अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा ।।६।।

*

उत्पत्ती समस्त जीवांची प्रकृतीतूनी या उभय

जगताचे मी कारण मूळ निर्माण असो वा प्रलय ॥६॥

*

मत्त: परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।

मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।७।।

*

जग माझ्यात ओवलेले सूत्रात ओवले मणि जैसे 

माझ्याविना यत्किंचितही जगात दुसरे काही नसे॥७॥

*

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।

प्रणवः सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।८।।

*

हे कौंतेया जाणी मजला जलातील प्रवाह मी

चंद्राचे चांदणे मी तर  सूर्याचा प्रकाश मी

गगन घुमटाचा शब्द मी वेदांचा ॐकार मी

पुरुषांचे षुरुषत्व मी विश्वाचा तर या गुण मी ॥८॥

*

पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।

जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ।।९।।

*

पवित्र सुगंध मी वसुंधरेचा पावकाचे  तेज मी

सकल तपस्व्यांचे तप मी जीवसृष्टीचे जीवन मी ॥९॥

*

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।

बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।।१०।।

*

धनंजया हे भूतसृष्टीचे बीज जाण मज 

विद्वानांची मी प्रज्ञा मी तेजस्व्यांचे तेज ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवस – ☆ डाॅ. ए. पी. कुलकर्णी ☆

डाॅ.ए.पी.कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवस – ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी

सप्तवारूंचा रथ घेवुनी

आला पहा नारायण

उजळल्या दाही दिशा

फुलू लागले अंगण.!!

*

थोडे वटारले डोळे

फेकू  लागले आग

सुरू जाहलीआता

सर्व जीवांची तगमग !!

*

उन्ह तावून निवाली

थोडी शिरवळ आली

गार वा-याची झुळूक

तन-मना सुखावून गेली !!

*

लांबलांब टाकित ढांगा

धावू लागल्या   सावल्या

दमून  भागून बिचाऱ्या   

पूर्वेकडे  विसावल्या !!

*

निळ्या सोनेरी रंगाने

गेले भरून आभाळ

थोड्या वेळातच आता

होईल सायंकाळ !!

*

दिलं येण्याच वचन

पांघरले काळोखाला

दिशा घेऊन उशाला

सूर्यदेव कलंडला

© डाॅ. ए. पी. कुलकर्णी

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “दरी डोंगरी वसंत फुलला…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “दरी डोंगरी वसंत फुलला…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

दरी डोंगरी वसंत फुलला 

पक्षांच्या रंगात

झुळझुळणारा झरा गातसे

मंजुळ गाणे त्यात

*

हिरवाईवर जणू भासती

रंगबिरंगी फुले

पारंब्यावर हिंदोळत पक्षी

उंच घेतसे झुले

*

शुभ्रधवल ते खळखळ पाणी

वनराई फुलली त्यात

नील गगनी त्या रविकर येऊन

किरणांची बरसात

*

अविरत चाले मंजुळ खळखळ

जणू कृष्णाची मुरली

निर्झरास त्या मोहित झाली

राधा वनराई मधली

*

सप्तरंग सांडले चराचरी

जलधारांचे चौघडे

पोपट रावे विहग देखणे

नयनरम्य बागडे

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 225 ☆ नवीन वर्षा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 225 ?

नवीन वर्षा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुखसौख्याचे, तोरण दारी ,नवीन वर्षा,

रांगोळीही, सज्ज जाहली,ये उत्कर्षा !

*

हर्षभराने  ,सजले अंगण, गंध दरवळे

कडूलिंबही,फुले ढाळितो,धरा हिरवळे!

*

भगवा झेंडा, असा फडकला, भल्या सकाळी ,

चैत्रामधली ,सुरू जाहली, जणू दिवाळी !

*

श्रीरामाच्या, आगमनाने , पावन धरती

स्वागत करण्या, नर्तन करती साऱ्या गरती!

*

नवीन वर्षा, टाळशील का, या  संघर्षा,

हिंदुराष्ट्र तू बनविणार ना, भारतवर्षा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares