मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनातल्या वनात मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मनातल्या वनात मी ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मनातल्या वनात मी तुलाच खूप शोधले

समोर पाहता तुला मलाच वेड लागले

 *

लपूनको उगाचतू ढगात चांदणी परी

हवीसतू मला इथे हळूच भेट अंतरी

तशीच ये समोर तू हळूच टाक पावले

समोर पाहता तुला मलाच वेड लागले

 *

दिसेल का मला तुझा तसाच शांत चेहरा

विचारतो तुलाच मी बनून आज बावरा

मनातल्या मनात हे धुके बरेच दाटले

समोर पाहता तुला मलाच वेड लागले

 *

भिजून पावसात तू अजून कोरडी कशी

नकोच लाजणे तुझे बनून वाग धाडसी

जगासमोर यायचे नवीन देत दाखले

समोर पाहता तुला मलाच वेड लागले

 *

विचार खुंटतो तिथे गती कुठून यायची

वियोग सोसला तरी मने कशी तुटायची

मिळून जायचे पुढे म्हणून दीप लावले

समोर पाहता तुला मलाच वेड लागले

 *

जुळून यायला पुन्हा सुरेख योग यायचा

दबून राहिल्यामुळे तसाच व्यर्थ जायचा

रुकार घ्यायचा तुझा म्हणून मौन सोडले

समोर पाहता तुला मलाच वेड लागले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्षितिज नमते तेथे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ क्षितिज नमते तेथे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

क्षितिज नमते तेथे मजला जावे वाटते रोज

काय ते गूढ लपले त्याचा घ्यावा वाटतो शोध

खुणावते मज रोज रोज ती धुसर संध्याकाळ

किती मजेने बुडती रोजच अजस्र असे पहाड..

*

लपेटून ते धुक्यात बसती चंदेरी सोनेरी

छटा गुलाबी निळी शेंदरी काळपट काटेरी

उन्हे चमकती कनक लपेटून शुभ्र कापसापोटी

लालचुटूक ती छटा मधूनच क्षितिज हासते ओठी..

*

ढग पालख्या हलके हलके वाहून नेतो वारा

रंगांची सांडते कसांडी धवल कुठे तो पारा

मध्येच दिसती खग पांथस्थ क्षितिजाकडे धावती

संध्याछाया लपेटून ते निवासस्थानी जाती…

*

निरोप घेता रविराजाने क्षितिज येते खाली

धरती हासते प्रियकर येता गाली उमटते लाली

विसावते मग क्षितिज धरेवर निरव शांतता होते

मिलन होता क्षितिज धरेचे विश्वच सारे गाते..

*

विश्वशांतीचे दूत असे ते बाहू पसरून घेती

वसुंधरा मग झेलत बसते दवबिंदूंचे मोती

रात्रीच्या निशांत समयी दोघे ही नि:शब्द

असा सोहळा पहात बसती चंद्र चांदण्या अब्ज…

*

मंजुळवात ते पहाटसमयी घेऊन येती गंध

हळूहळू मग दिशा उजळती क्षितिजी भरतो रंग

लाल तांबडा रथारूढ तो भास्कर ये प्राचिला

निरोप देते धरती मग त्या आवडत्या क्षितिजाला…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जागे होई सारे विश्व… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ जागे होई सारे विश्व ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

रविराजाच्या रथाला

प्रकाशाचे शुभ्र अश्व

रथ जाई पुढे तसे

जागे होई सारे विश्व

*

गोपुरात घंटानाद

घराघरातून स्तोत्र

किरणात चमकते

सरितेचे शांत पात्र

*

कुणब्याचे पाय चाले

शेत वावराची वाट

झुळुझुळू वाहताती

पिकातुन जलपाट

*

सुवासिनी घालताती

माता तुळशीला पाणी

सुखसौख्य मागताती

 वैजयंतीच्या चरणी

*

 शुभ शकुनाने होई

 दिन सनातनी सुरू

 रविराजाला वंदता

 पंचमहाभूता स्मरू

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “धुके…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “धुके…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

झाली पहाट आली जाग हळूहळू साऱ्या सृष्टीला

थंडी गुलाबी लपेटलेल्या तरुण निसर्गाला… 

*

किलबिल चिवचिव करीत सारे पक्षीगण ते उठले

किलकिल डोळे करीत आणि जागी झाली फुले… 

*

पहाटवारा गाऊ लागला भूपाळी सुस्वर

पानांच्या त्या माना हलवीत दाद देती तरुवर… 

*

मिठी परी साखरझोपेची, निसर्गराजा त्यात गुंगला

गोड गुलाबी पहाटस्वप्ने जागेपणी अन पाहू लागला… 

*

बघता बघत चराचर आता धूसर सारे झाले

आपल्या जागी स्तब्ध जाहली वेली वृक्ष फुले… 

*

स्वप्नांचा तो मोहक पडदा धुके लेवुनी आला

कवेत घेऊन जग हे सारे डोलाया लागला… 

*

फिरून एकदा निरव जाहले वातावरणच सारे

धुके धुके अन धुके चहूकडे.. काही न उरले दुसरे… 

*

परी बघवेना दिनकरास हे जग ऐसे रमलेले

स्वप्नरंगी त्या रंगून जाता.. त्याला विसरून गेले… 

*

गोड कोवळे हासत.. परि तो लपवीत क्रोध मनात

आला दबकत पसरत आपले शतकिरणांचे हात… 

*

दुष्टच कुठला, मनात हसला, जागे केले या राजाला

बघता बघता आणि नकळत स्वप्नरंग उधळून टाकला… 

*

 स्वप्न भंगले, दु:खित झाला निसर्गराजा मनी

दवबिंदूंचे अश्रू झरले नकळत पानोपानी… 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घडो ऐसे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ घडो ऐसे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

विग्रहा समोर

बसता डोळे मिटून

येते अबोल उत्तर

तिच्या हृदयातून…

 

न लगे शब्द

नच स्पर्श वा खूण

मौनात मी, मौनात ती

संवाद तरी मौनातून…

 

न मागणे न देणे

व्यवहार नाहीच मुळी

मी तू गेले लया

जन्मलो तुझिया कुळी..

 

सुटली येरझार

चक्रव्यूही भेदला

आई तूझ्या कृपे

सार्थक जन्म झाला…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 239 ☆ संस्कार सावली… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 239 – विजय साहित्य ?

संस्कार सावली ☆

(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)

अनाथांची माय

करुणा सागर

आहे भोवताली

स्मृतींचा वावर…! १

*

ममतेची माय

आदर्शाची वाट

सुख दुःख तिच्या

जीवनाचा घाट..! २

*

परखड बोली

मायेची पाखर

आधाराचा हात

देतसे भाकर…! ३

*

जगूनीया दावी

एक एक क्षण

संकटाला मात

झिजविले तन…! ४

*

पोरकी जाहली

माय ही लेखणी

आठवात जागी

मूर्त तू देखणी…! ५

*

दु:ख पचवीत

झालीस तू माय

संस्कार सावली

शब्द दुजा नाय..! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खरे-खोटे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

खरे-खोटे☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

माझ्या सभोवताली स्वार्थांध लोक जमले

त्यांना पुरून उरण्या जगणे तसेच शिकले

 *

परके कधी न माझे का त्यास दोष देऊ

अपुलेच शत्रू झाले त्यांनी मलाच लुटले

 *

जो दुर्जनास आधी वंदेल तो शहाणा

ही रीत ज्यास कळली जीवन तयास कळले

 *

ज्यांच्या घरात आहे साम्राज्य मंथरेचे

तुटतील खांब तिथले पक्के खरेच असले

 *

नाना कळा मनी पण दिसतो वरून भोळा

त्याने दिले जरीही खोटेच शब्द खपले

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान्‌ । 

वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्‌ ॥ २१ ॥ 

*

सकल जीवांत भिन्न भाव भिन्नतेने जाणणे

राजस या ज्ञानासी मनुष्यातून पार्था जाणणे ॥२१॥

*

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्‌ । 

अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ २२ ॥ 

*

एकाच कार्यदेही सर्वस्वी आसक्त जे ज्ञान

तामस ते अहेतुक तत्वशून्य अल्प ज्ञान ॥२२॥

*

नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम्‌ । 

अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३ ॥ 

*

नियत कर्म अभिमान रहित

रागद्वेषासम भावना विरहित

निरपेक्ष भाव निष्काम कर्म

हेचि जाणावे सात्विक कर्म ॥२३॥

*

यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः । 

क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्‌ ॥ २४ ॥ 

*

जरी बहुप्रयासाचे कर्म भोगासक्तीने युक्त 

राजस जाणावे कर्म असते अहंकारयुक्त ॥२४॥

*

अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम्‌ । 

मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५ ॥ 

*

परिणती हानी हिंसा सामर्थ्य नाही विचारात

अज्ञाने कर्मा आचरिले तामस तयासी म्हणतात ॥२५॥

*

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः । 

सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६ ॥ 

*

संगमुक्त अहंकाररहित धैर्योत्साहाने युक्त

कार्यसिद्धी वा अपयश मोदशोक विकार मुक्त

कर्तव्य अपुले जाणून मग्न आपुल्या कर्मात

सात्त्विक कर्ता तयासी म्हणती अपुल्या धर्मात ॥२६॥

*

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः । 

हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ २७ ॥ 

*

लोभी मोही कर्मफलाशा मनात जोपासतो

अशौच आचरण दुजांप्रति पीडादायक असतो

हर्षाने शोकाने कर्माच्या परिणतीने लिप्त राहतो

असला कर्ता राजस कर्ता ओळखला जातो ॥२७॥

*

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः । 

विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८ ॥ 

*

शठ गर्विष्ठ अयुक्त असंस्कृत परजीवित नाशतो

दीर्घसूत्री आळशी विषादी तो तामस कर्ता असतो ॥२८॥

*

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु । 

प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९ ॥ 

*

साकल्याने तुला कथीतो समग्र विवेचन

गुणागुणांचे पृथक् तत्वे धनंजया तुज ज्ञान

बुद्धीधृतीचे त्रिविध भेदांचे तुज करितो कथन

ऐकोनीया चित्त लावुनी अंतर्यामी तू जाण ॥२९॥

*

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । 

बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३० ॥ 

*

प्रवृत्ती-निवृत्ती कर्तव्याकर्तव्य मोक्ष तथा बंधन

भय-अभय यथार्थ जाणी सात्त्विक ती बुद्धी अर्जुन ॥३०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – राजमाता जिजाऊ… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? राजमाता जिजाऊ? श्री आशिष  बिवलकर ☆

स्वराज्याची जननी,

राजमाता जिजाऊ!

थोरवी त्यांची आज,

सारे मिळून गाऊ!

*

जाधवांची होती कन्या,

शुर आणि कणखर!

भोसल्यांची झाली सून,

कर्तव्यात होती तत्पर!

*

तीनशे वर्षाची होती,

काळीकुट्ट अमावस्या!

माय भवनीला साकडे

घातले, केली तपस्या!

*

पराक्रमी पुत्र शिवाजी,

येई जन्माला पोटी!

स्वराज्याचे बाळकडू

पाजले त्याच्या ओठी!

*

तावून सलखून केले,

संस्कार शिवबावर!

सोळाव्या वर्षी केला,

तोरणा किल्ला सर !

*

 एक एक मावळ्यावर,

 केली त्यांनी माया!

 पाठीशी उभे ते राहिले,

 बळ दिले शिवराया!

*

तीन तपे देव मस्तकी,

धरून केला हलकल्लोळ!

साऱ्या मुघलांनी घाबरून,

काढला स्वराज्यातून पळ!

*

स्वराज्याची गुढी उभारली,

हिंदवी स्वराज्य स्थापन केले!

दहा दिशातून अरुणोदय झाला,

छत्रपती शिवाजी महाराज झाले!

*

धन्य ते शिवाजी महाराज,

धन्य राजमाता जिजामाता!

त्यांच्या मुळेच हिंदुस्थानात,

हिंदूधर्म अभिमानाने पहाता!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आ रं भ शू र ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🤣🚶🏻‍♀️आ रं भ शू र ! 🚶🤣 ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

दिसले सकाळी मजला

चेहरे नवीन फिरतांना,

पाहून उत्साह वाटला

मज ते सारे बघतांना !

*

अजून थोडे दिवस तरी

त्यातले काही दिसतील,

जसं जसे दिवस जातील

थोडेतरी गायब होतील !

*

एक तारीख नववर्षाची

करती चालण्याचा संकल्प,

पण भर सरता उत्साहाचा

होतो आळसाचा प्रकोप !

*

‘उद्या नक्की’चा वायदा

करून आपल्या मनाशी,

आरंभशूर करती सलगी

मऊ ऊबदार गादीशी !

मऊ ऊबदार गादीशी !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०१-०१-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares