मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆

पाशही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे, देणे घेणे, नसतील असले शब्द जिथे

नसेल खुरटे घरटे अपुले बंद ही नसतील कधी दारे

 स्वच्छ मोकळ्या माळावरुनी वाहत येतील शीतल वारे

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकांचे

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊ काऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना

 – श्री सुहास रघुनाथ पंडित

(प्रेम रंगे, ऋतुसंगे या काव्यसंग्रहातून)

पती-पत्नीच्या नात्यात संध्या पर्व हे जीवनाच्या किनाऱ्यावरचे साक्षी पर्वच असते. आयुष्याकडे मागे वळून पाहताना खूप काही मिळवलं आणि खूप काही गमावलं असं वाटू लागतं.  हरवलेल्या अनेक क्षणांना गवसण्याची हूरहुरही लागते.  “पुरे आता, उरलेलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगूया की..” असे काहीसे भाव मनात उमटतात.

याच आशयाची सुप्रसिद्ध कवी श्री सुहास पंडित यांची ही कविता. शीर्षक आहे विश्रांतीचा पार जुना*

ही कविता म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पती-पत्नींचे  एक मनोगत आहे. मनातलं काहीतरी मोकळेपणाने आता तरी परस्परांना सांगावं या भावनेतून आलेले हे विचार आहेत.

पाश ही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे देणे घेणे नसतील असले शब्द जिथे

बंधनात, नियमांच्या चौकटीतल्या आयुष्याला आता वेगळ्या वाटेवर नेऊया. आता कसलेही माया— पाश नकोत, कसलीही गुंतवणूक नको. तुझं माझं दिल्या घेतल्याच्या अपेक्षांचं ओझंही नको, अशा मुक्त ठिकाणी आता दूर जाऊया.

नसेल खुरटे घरटे अपुले बंदही नसतील कधी दारे

स्वच्छ मोकळ्या माळावरती वाहत येतील शीँँतल वारे

आज पर्यंत आपल्या भोवतीचं वातावरण खूप संकुचित होतं. कदाचित जबाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे, मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे असेल आपल्याला काटकसरीने राहावं लागलं, आपल्याकडे कोण येणार कोण नाही याचे तारतम्यही ठेवावे लागले, आपल्याच मनाची दारे आपणच बंद ठेवली, मनाला खूप मारलं पण आता मात्र आपण आपल्या मनाची कवाडे मुक्तपणे उघडूया, आपल्या जगण्याचे वावर आता मोकळं आणि अधिक रुंद करूया जेणेकरून तेथे फक्त आनंदाचेच स्वच्छ आणि शीतल वारे वाहत राहतील.  मनावरची सारी जळमटं, राग —रुसवे, मतभेद, अढ्या दूर करूया.

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकाचे   

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

एकमेकांविषयी आता कसल्या ही शंका कुशंकांचा गोंधळ नको.  इथून पुढे विश्वासानेच परस्परांच्या नात्याला उजळवूया.  झालं गेलं विसरून एकमेकांची मने पुन्हा जिंकूया,जुळवूया.सगळी भांडणे, मतभेद विसरुन जाऊया.

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊकाऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची

काळ किती सरला!  आपल्या घरट्यातली आपली चिमणी पाखरं आता मोठी झाली उडून गेली पण त्यांच्या पिल्लांनी आता आपल्या घराचं गोकुळ होईल.. पुन्हा,” एक होती चिमणी एक होता कावळा” या बालकथा आपल्या घरट्यात रंगतील आणि पुन्हा एकदा बालसंगोपनाचा आपण भोगलेला तो गोजिरवाणा काळ आपल्यासाठी मनात उतरेल.  या दोन ओळीत उतार वयातील नातवंडांची ओढ कवीने अतिशय हळुवारपणे उलगडलेली आहे आणि आयुष्य कसं नकळत टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातं याची जाणीवही दिलेली आहे.

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

जीवनातले अत्यंत अवघड खाचखळगे पार केले, दगड धोंड्या च्या वाटेवर ठेचकाळलो  पण त्याही धकाधकीत आनंदाचे क्षण होतेच की!   आता या उतार वयात आपण फक्त तेच आनंदाचे, शांतीचे क्षण वेचूया  आणि सुखानंदांनी भरलेले  हे मधुघट पुढच्या पिढीच्या हातात सोपवूया.

कवीने या इतक्या सोप्या, सहज आणि अल्प शब्दांतून केवढा विशाल विचार मांडलाय! दुःख विसरू या आणि आनंद आठवूया.  भूतकाळात कुढत बसण्यापेक्षा सुखाच्या आठवणींनी मन भरुया आणि हाच आनंदाचा, सुसंस्कारांचा वारसा पुढच्या पिढीला देताना हलकेच जीवनातून निवृत्तही होऊया.  पुढच्या पिढीच्या आयुष्यात आपली कशाला हवी लुडबुड? त्यांचं त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. आपल्या विचारांचं, मतांचं दडपण आपण त्यांना कां बरं द्यावं ?

पुरे जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा फार जुना

किती सुंदर आणि आशय घन आहेत या काव्यपंक्ती! सगळ्यांचं सगळं निस्तरलं, सतत दुसऱ्यांचा विचार केला, त्यांच्यासाठीच राब राब राबलो, कित्येक वेळा याकरिता आपण आपल्या स्वतःच्या सुखालाही पारखे झालो पण आता पुरे झालं! आता फक्त तू मला आणि मी तुला. नको कसली धावाधाव. जरा थांबूया, निवांतपणे  आपल्याच जीवनवृक्षाच्या  पारावर विश्रांती घेऊया. विश्रांतीचा तो पार आपल्याला बोलावतो आहे.

विश्रांतीचा  पार जुना या शब्दरचनेचा मी असा अर्थ लावते की आता निवांतपणे या पारावर बसून विश्रांती घेऊ आणि भूतकाळातल्या जुन्या, सुखद आठवणींना उजाळा देऊ.

संपूर्ण कवितेतील एक एक ओळ आणि शब्द वाचकाच्या मनावर कशी शीतल फुंकर घालते..  शिवाय वृद्धत्व कसं निभवावं, कसं ते हलकं, सुसह्य आणि आनंदाचा करावं हे अगदी सहजपणे साध्या सरळ शब्दात सांगते.

प्रतिभा, उत्पत्ती, अलंकार या काव्य कारणांना काव्यशास्त्रात महत्त्व आहेच. कवी सुहास पंडितांच्या काव्यात या काव्य कारणांची सहजता नेहमीच जाणवते. मनातील संवेदना स्पंदने ते जाता जाता लीलया मांडतात त्यामुळे वाचक, कवी मनाशी सहज जोडला जातो, कुठलाही अवजडपणा,बोजडपणा,क्लीष्टता, काठिण्य त्यांच्या काव्यात नसते.

विश्रांतीचा पार जुना या काव्यातही याचा अनुभव येतो. जिथे —तिथे, दारे —वारे,घेऊ —देऊ यासारखी स्वरयमके या कवितेला लय देतात.

खुरटे— घरटे, कल्लोळ कुशंकांचा, खपणे— जपणे या मधला अनुप्रासही फारच सुंदर रित्या साधलेला आहे.

कुंभ सुखाचे, सोनपाखरे आठवणींची, कण शांतीचे, विश्रांतीचा पार या सुरेख उपमा काव्यार्थाचा धागा पटकन जुळवतात.

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची या ओळीतील चेतनागुणोक्ती  अलंकार खरोखरच बहारदार भासतो.

खुरटे घरटे ही शब्द रचनाही मला फार आवडली. यातला खुरटे हा शब्द अनेकार्थी आणि अतिशय बोलका आहे. चौकटीत जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाची मानसिकताच या खुरटे शब्दात तंतोतंत साठवलेली आहे. आणि याच खुरटेपणातून, खुजेपणातून मुक्त होऊन मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास घेण्याचं हे स्वप्न फक्त काव्यातील त्या दोघांचं न राहता ते सर्वांचं होऊन जातं.

या कवितेतला आणखी एक दडलेला भाव मला अतिशय आवडला. तो भाव कृतज्ञतेचा. पतीने पत्नीविषयी दाखवलेला कृतज्ञ भाव. “आयुष्यभर तू या संसारासाठी खूप खपलीस, खूप त्याग केलास, कामाच्या धबगड्यात मीही तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तुला गृहीत धरले,पण आता एकमेकांची मने जपूया”संसारात ही कबुली म्हणजे एक पावतीच,श्रमांची सार्थकता,धन्यता!

खरोखरच आयुष्याच्या या सांजवेळी काय हवं असतं हो? हवा असतो एक निवांतपणा, शांती, विनापाश जगणं. दडपण नको ,भार नको हवा फक्त एक विश्रांतीचा पार आणि जुन्या सुखद आठवणींचा शीतल वारा. दोघां मधल्या विश्वासाच्या सुंदर नात्यांची जपणूक..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रजासत्ताक दिन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रजासत्ताक दिन…🇮🇳 ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

जन्मलो देशात त्याचे

नाव हिंदुस्थान आहे 

फडकतो डौलात अमुचा

तो तिरंगा प्राण आहे

*

भिन्न भाषा वेशभूषा

संस्कृतीने एक आम्ही

प्राणाहूनीही प्रिय आम्हा

आमची ही हिंदभूमी

*

गतिमान हे विज्ञानयुग

आम्ही इथे आहोत राजे

 चिमटीत धरतो विश्व

 अनुशक्तीत आमुचे नाव गाजे

*

दूत आम्ही शांतीचे

आम्हा नको कधीही लढाई

मनगटे पोलादी परि ना

मारतो खोटी बढाई

*

आहेत आम्हाला समस्या

त्या आम्ही पाहून घेऊ

सदनात आमुच्या दुष्मनांनो

 तुम्ही नका चोरुन पाहू

*

रक्षिण्या स्वातंत्र्य येथे

वीरता बेबंद आहे

रक्तामध्ये एल्गार अन

श्वासामध्ये जयहिंद आहे

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतके मला पुरे आहे – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

इतके मला पुरे आहे लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

बसायला आराम खुर्ची आहे

हातामध्ये पुस्तक आहे

डोळ्यावर चष्मा आहे

इतके मला पुरे आहे ।।१।।

*

निसर्गामध्ये सौंदर्य आहे

निळे आकाश आहे

हिरवी झाडी आहे

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे

इतके मला पुरे आहे ।।२।।

*

जगामध्ये संगीत आहे

स्वरांचे कलाकार आहेत

कानाला सुरांची जाण आहे

इतके मला पुरे आहे ।।३।।

*

बागांमध्ये फुले आहेत

फुलांना सुवास आहे

तो घ्यायला श्वास आहे

इतके मला पुरे आहे ।।४।।

*

साधे चवदार जेवण आहे

सुमधुर फळे आहेत

ती चाखायला रसना आहे

इतके मला पुरे आहे ।।५।।

*

जवळचे नातेवाईक आहेत,

मोबाईलवर संपर्कात आहेत

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरे आहे ।।६।।

*

डोक्यावरती छत आहे

कष्टाचे दोन पैसे आहेत

दोन वेळा दोन घास आहेत

इतके मला पुरे आहे ।।७।।

*

देहामध्ये प्राण आहे

चालायला त्राण आहे

शांत झोप लागत आहे

इतके मला पुरे आहे ।।८।।

*

याहून जास्त आपल्याला काय हवे आहे?

जगातील चांगले घेण्याचा

आनंदी आशावादी राहण्याचा

विवेक हवा आहे

इतके मला पुरे आहे ।।९।।

*

शरीर माझे योग्य साथ देते आहे,

स्मृतीची मला साथ आहे,

मी कुणावरही आज अवलंबून नाही

इतके मला पुरे आहे ll10ll

*

इतकेच मला पुरे आहे!

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खात्री असू दे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ खात्री असू दे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

‘मंदिर त्याचे अयोध्येमध्ये

माझे का नाही  ?’… 

रुसून बसला बाळकृष्ण

अन् बोलेना काही… 

*

‘द्वारकेआधी जन्मलास ना 

अयोध्येत तू रामरूपाने

का मग रूसतो सांग कन्हैया

उगीच आता हट्टाने !…  

*

सोड हट्ट हा आणिक रुसवा 

लवकर जा रे गोधन घेऊनी 

गोपाल तुझी बघ वाट पहाती

हुंदडायला वनरानी…

*

रुसू नको रे पूर्ण होऊ दे 

अवधनगरी ती सर्वांगानी 

मथुरेतही मग होईल सारे 

खात्री असू दे तुझ्या मनी ‘ —

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्न अधुरे राहिले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ स्वप्न अधुरे राहिले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

हात तुझा हाती होता,

राहून गेले चालणे !

साथ तुझी हवी होती,

जमले नाही थांबणे !… १

*

स्वप्नात थवा उंच गेला,

उडून नील आभाळी !

पहात बसले येथे,

भग्न स्वप्नं भूतकाळी !… २

*

अधुऱ्या  स्वप्नांची माला,

गात होती माझ्या मनी!

गीत ते संपले कधी,

कळले नाही जीवनी !… ३

*

आक्रंदणाऱ्या रे मना,

दु:ख जगी दाऊ नको !

हसतील तुज सारे,

अगतिक  होऊ नको!.. ४

*

जे मिळाले आजवर,

जपेन ते अंतरात !

आयुष्य सारे  त्यावर,

पेलेल  खंत मनात !…. ५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 206 ☆ एकच नाम…प्रभू श्रीराम… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 206 – विजय साहित्य ?

एकच नाम…प्रभू श्रीराम ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

गात्री रूजले, एकच नाम..

प्रभू श्रीराम, प्रभू श्रीराम…

*

आली स्वगृही, स्वप्न पाऊली

सुंदर मुर्ती रघुरायाची,

दिव्या दिव्यांची, सजे आवली

करा तयारी, सणवाराची..

आले मंदिरी, प्रभू श्रीराम..||१||

*

चरा चराला, पडे मोहिनी

राम रुपाची, दिव्य बासरी

वेदमंत्र नी, प्राण प्रतिष्ठा

नेत्री भरली, मुर्ती हासरी

घेई अयोध्या, पावन नाम..||२||

*

वेध लागले, चित्त दंगले

पुजा अर्चनी , एकच ध्यास

राम बोल हे, मनी रंगले

साध्य जाहला, दिव्य प्रवास

झाले काळीज,मंगल धाम.||३||

*

घरा घराला, आले बाळसे

गोकुळ झाले, तना मनाचे

लेणे कोरीव, शिल्प छानसे

आतष बाजी, रंग सणाचे

भाव फुलांचे,एकच दाम..||४||

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ध्येय…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “ध्येय…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

खूप काही करायचं

मनात येतं आणि जातं

जमेल का आपल्याला

विचारात ते हरवून बसतं…

 

भीतीचं प्रस्थ मोठं

कृतीपुढे पडतं थिटं

आपलंच मन वागतं खोटं

चांगल्या विचाराला मागं सारतं …

 

मनात आलं की

सुरू करून पहावं

यश अपयशापलीकडे

प्रयत्नांच्या मार्गाने जावं …

 

ध्येय निश्चित करतानाच

यश आपलं ठरतं

कसं पोहचायचं तिथंवर

इतकचं पहायचं असतं…

 

मार्ग मिळतो चालता चालता

संधी वाटतो प्रत्येक अडथळा

यशापेक्षा प्रयत्नांचा काळ मोठा

अनुभवरुपी यशास नसे तोटा….

 

मोजमाप यशाचे

आपणच असते करायचे

नेहमीच परिपूर्ण असणे

कसे बरे जमायचे…?

 

आपण आपलं चालत रहावं

पाऊल एक एक टाकत रहावं

कळणार नाही आलो कुठंवर

ध्येयापलीकडेही खूप दूरवर…..

 

यशापलिकडेही चालावंच लागतं

एका यशानंतर जगणं का संपतं?

नव्या ध्येयासाठी मन पेटून उठतं

ठरवूनही तिथे मग थांबता न येतं ….

 

यश असतो एक मुक्काम

तिथे संपतं नसतं आपलं काम

ध्येय जगण्याचं सर्वात मोठं

आयुष्याच्या शेवटीच तिथं पोहचता येतं….

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ये मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌ । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥ 

*

भजताती मला पार्था मीही त्यांना भजतो

मनुजप्राणि सर्वथा मम मार्ग अनुसरतो ॥११॥

*

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । 

क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥ 

*

मनुष्यलोके कर्मफलाकांक्षी देवतांचे पूजन करती 

पूजन करता देवतांचे होते सत्वर कर्मफल प्राप्ती ॥१२॥

*

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । 

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥ 

*

गुण तथा कर्म जाणुनी चातुर्वर्ण्य निर्मिले मी

कर्ता असुनी त्या कर्मांचा आहे अकर्ताच मी ॥१३॥

*

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । 

इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥ 

*

मला मोह ना कर्मफलाचा त्यात न मी गुंततो

तत्व माझे जाणणारा कर्माशी ना बद्ध होतो ॥१४॥

*

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः । 

कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ ४-१५ ॥ 

*

जाणुनिया हे तत्व कर्मे केली मुमुक्षुंनी

तूही पार्था कर्मसिद्ध हो त्यांना अनुसरुनी ॥१५॥

*

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।

तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥ 

*

कर्माकर्म विवेक करण्या संभ्रमित प्रज्ञावान

उकल करोनी कर्मतत्व कथितो मी अर्जुन 

जाणुन घेई हे ज्ञान देतो जे मी तुजला

कर्मबंधनातून तयाने होशिल तू मोकळा ॥१६॥

*

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । 

अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥ 

*

कर्मगती अति गहन ती आकलन होण्यासी

जाणुन घ्यावे  कर्मासी अकर्मासी विकर्मासी ॥१७॥

*

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । 

स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥ 

*

कर्मात पाहतो अकर्म अकर्मातही कर्म 

बुद्धिमान योगी जाणावा करितो सर्व कर्म ॥१८॥

*

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः । 

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥ 

*

सकल शास्त्रोक्त कर्मे ज्याची 

कामना विरहित असंकल्पाची

भस्म जाहली जी ज्ञानाग्नीत 

तो ज्ञानी असतो तो पंडित  ॥१९॥

*

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः । 

कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥ 

*

कर्म कर्मफलाचा असंग सदातृप्त आश्रयरहित

जीवनी करितो कर्म तथापि तो तर कर्मरहित ॥२०॥

– क्रमशः भाग ४ 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राम नाम जपू चला… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ राम नाम जपू चला… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

लक्ष दीप लावु चला

राम नाम घेऊ चला |

*

क्षण भाग्याचा आज उदेला

मनामनांना हर्ष जाहला |

*

मन-मंदिरही सजवु चला

भक्ती अर्पण करु चला |

*

राम त्राता जाणु चला

भगवा हाती घेऊ चला | 

*

भाव-पुष्प अर्पु चला

मोदानेही गाऊ चला |

*

‌ ‌‌राम नाम जपु चला

 धन्य होऊनी नमु चला ||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्वेश्चन मार्क…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “क्वेश्चन मार्क …” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

‘चेहरा ओळखण्यापलीकडे गेलाय.

अर्धा किलोमीटर तरी ,ट्रकबरोबर घासत गेलीय बाॅडी.

भोसले , काही आयडेंटीटीफिकेशन होतंय का, बघा.

अन् बाॅडी  ससूनलाला पाठवून द्या.

अजून श्वास चालूय.

वाचेल कदाचित.’

पी. एस. आय. जमादार, पटाटा अॅक्शन घेत होते.

‘साहेब , पँटमधल्या वाॅलेटच्या चिंध्या झाल्या आहेत.

शर्टच्या खिशातल्या मोबाईलच्या ठिकर्या.

आॅफिसबॅगमधे एक बिल सापडलंय.

मोबाईल परचेजचं.

त्यावर नाव आणि अॅड्रेस आहे.

ए. ए. कुलकर्णी नाव आहे.

1763 , सदाशिव , पुणे 30 पत्ताय.’

‘ ताबडतोब त्या पत्त्यावर माणूस पाठवा.

नातेवाईकांना बोलावून घ्या.

मी चौकीवर जातोय.

आज खरं तर लवकर जायचं होतं.

लेकीचा वाढदिवस होता.

आता जमायचं नाही बहुतेक.

तुम्ही ससूनलाच थांबा.

मला तसा रिपोर्ट करा.’

जमादार टोकटोक बूट वाजवत, चौकीवर निघून गेले.

1763 ,सदाशिव , पुणे 30.

घराचं नाव सौभाग्य सदन.

आता कुठलं ऊरलंय सौभाग्य ?

सौभाग्य वाचव रे देवा , या घरचं.

तरी बरं , घराला काय घडलंय, याची खबरच नाहीये.

अरविंद आत्माराम कुलकर्णी.

वय वर्ष 63.

अक्षर प्रिंटींग प्रेसचे मालक.

गेली चाळीस वर्ष प्रिंटींगच्या धंद्यात आहेत.

या धंद्यातली ही आता चौथी पिढी.

खरं तर पहिल्यांदा वाड्यातच प्रेस होता.

आता जागा कमी पडायला लागली.

पाच वर्षापूर्वी प्रेस धायरीला हलवलाय.

सकाळी नऊ ते रात्री नऊ.

अरविंदराव मु. पो. धायरी.

दिवसभर प्रेस नाहीतर…

क्लायेंटकडे चकरा.

अॅक्टिव्हा वापरायचे.

पुढे गठ्ठे ठेवायला सोयीची.

दिवसभर दोघांचंही भरपूर रनिंग व्हायचं.

नुकताच अनुजही जाॅईन झालाय.

अनुज अरविंद कुलकर्णी.

बी. ई. ( प्रींटींग टेक्नाॅलाॅजी )

धंद्याला लागलेलं नवं ईन्जीन.

डबल ईन्जीन , डबल टर्नओव्हर.

धंदा जोरात चाललाय.

अनुजही अॅक्टिव्हाच वापरायचा.

कुलकर्णी फॅमिली, अॅक्टिव्हाचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर होणार.

घरी गडबड.

अनुजची बायको आणि आई.

किचनमधे आॅन ड्यूटी.

पुर्या तळणं चाललेलं.

अनुज आणि आरतीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.

त्यात आरती दोन महिन्याची पोटुशी.

आनंदघन बरसायची वाट बघतायेत.

आज तरी..

नक्की.

अनुज आणि अरविंद, आज नक्की लवकर घरी येणार.

घर दरवाजाकडे डोळे लावून, दोघांची वाट बघतंय.

फोनच आला.

‘ मी धायरी पुलीस स्टेशनमधून, काॅस्न्टेबल भोसले बोलतोय.

एका अॅक्टिव्हाला डंपरनं ऊडवलंय.

ए. ए. कुलकर्णी नावाची चिठ्ठी सापडलीय.

ताबडतोब ससूनला या.

कंडीशन सिरीयस आहे.’

अनुजच्या आईनं फोन घेतलेला.

कानापर्यंत पोचलेले शब्द.

मेंदूत शिरायला तयारच नव्हते.

अनुजची आई मटकन् खाली बसली.

‘ अॅक्सीडेन्ट झालाय.’

ती एवढचं बोलली.

आरतीचं चॅनल म्यूट.

ती फ्रीजींग पाॅईंटला पोचलेली.

संवेदना बधीर झालेल्या.

ती कोसळलीच.

अनुजची आई धीराची.

शेजारी हाक मारली.

शेजारचा रवी.

त्याला बोलावला.

तो लगोलग ससूनला पळाला.

अनुजची आई , आरतीच्या ऊशाशी.

घरचा गणपती पाण्यात.

‘कोण असेल नक्की ?

अनुज का अरविंद. ?’

मेंदूचा भुगा.

‘पोरीचं सौभाग्य सांभाळ रे देवा.

मग माझं सौभाग्य दावणीला…

स्वार्थ की त्याग ?

प्रत्येक माणूस आपलंच.

डावं ऊजवं काय करणार ?

कुणी का असेना.

सिद्धीविनायका , सांभाळ रे बाबा ‘

तेवढ्यात दारातून अरविंदराव घरात शिरले.

सहज.

काहीच माहिती नसल्यासारखे.

‘ म्हणजे , अनुजला..’

आता मात्र अनुजच्या आईचा धीर सुटला.

तीनं हंबरडा फोडला.

‘ अरे , नक्की काय झालंय ?

सांगेल का कुणी ?”

भिजलेल्या अश्रूंनी ,दर्दभरी दास्तान ऐकवली.

अरविंदरावांना बघितलं अन् ..

आरतीची ऊरलीसुरली शुद्ध हरपली.

अरविंदरावांच्या हातापायातलं त्राण गेलेलं.

थांबून चालणारच नव्हतं.

‘ तू पोरीला सांभाळ.

मी ससूनला जातोय.

धीर सोडू नकोस.”

अरविंदराव दरवाजातच थबकले.

हाशहुश्श करत ,अनुज घरात शिरत होता.

त्सुनामीच आली होती घरावर.

त्यातून वाचलेलं ते चार जीव.

आई , बाबा ..

टाकलेले निश्वास.

परमेश्वराचे आभार मानणारे डोळे.

डोळ्यातून धुवाधार नायगारा.

‘ आरती , डोळे ऊघड.

अनुज आलाय.’

काळझोपेतून जागं व्हावं, तशी आरती एकदम जागी.

डोळ्यांना दिसणारा अनुज.

डोळ्यात अवघं विश्व सामावलेलं.

अनुज..

तेहतीस कोटी देवांना,

कोटी कोटी थँक्स म्हणणारे ते डोळे.

धडपडत ती अनुजच्या मिठीत शिरली.

अनुजच्या चेहर्यावरचा क्वश्चनमार्क तसाच.

काहीच कळेना.

बाबांनी सगळी स्टोरी रीपीट टेलीकास्ट केली.

” म्हणजे बनसोडचा अॅक्सीडेन्ट झालाय.

आरती , तुझ्यासाठी नवीन सेलफोन घ्यायचा होता.

मग घरी यायला ऊशीर झाला असता.

बनसोड म्हणाला , साहेब तुम्ही घरी जा.

मी घेवून येतो.

म्हणलं गाडी घेवून जा.

मी रिक्षाने जातो.

बावीस वर्षाचा कोवळा पोर.

वर्षभरच झालंय कामाला लागून.

त्याच्या आईबापाला काय तोंड दाखवू मी ?”

आता अनुज हडबडला.

पुन्हा फोन किणकीणला.

” काका , रवी बोलतोय.

हा आपला अनुज नाहीये.

दुसराच कुणीतरी.

गाडी मात्र आपलीच आहे.

पण काळजी नको.

ही ईज आऊट आॅफ डेंजर.

अनुज पोचला का घरी ?”

‘ हो..

आम्ही येतोच आहोत तिकडे “

मणभर वजनाचा क्वश्चनमार्क.

सगळ्यांच्या डोळ्यांना खुपणारा.

पुसला गेला एकदाचा.

परमेश्वरा ,

ज्याचं ऊत्तर माहीत नाही,

असा प्रश्न नको टाकूस रे बाबा , आयुष्याच्या पेपरात.

अशीच कृपा राहू दे रे देवा….

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares