मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ कविता… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(वृत्त — पादाकुलक – मात्रा — ८-८)

नव्या भावना मनात येता

फेर धरूनी नाचु लागता

विणू लागतो गोफ तयांचा

आकाराला येते कविता ||

*

विषयांचे ना कसले बंधन

कवी कल्पना अचाट असते

शब्दांची मग घेत भरारी

विश्वच अवघे समोर येते ||

*

जळाप्रमाणे शब्द प्रवाही

मनाप्रमाणे नाचविणारे

भावमधुर तर कधी तीक्ष्णसे

विविध भावना जागविणारे ||

*

शब्द कुंचला सवे घेऊन

मनातील ते चित्र प्रकटता

अर्थपूर्ण अन आशयघनशी

आकाराला येते कविता ||

*

शब्द सागरी अमोल रत्ने

छंद वृत्त अन लयीत लिहिता

अभंग ओवी गवळण गाणी

भावमोहिनी सुरेल कविता ||

*

शब्द सखी ही ओढ लावते

मनात घाली सदैव पिंगा

तिच्या बरोबर खेळ रंगतो

उघळी मोहक प्रसन्न रंगा ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #223 ☆ आत्मबोध… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 223 ?

☆ आत्मबोध… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जरी कधीही केले माझे स्वागत नाही

तरी फूल ते काटेरी मज बोचत नाही

*

कुंतलातला गजरा आहे तिला शोभतो

नको लपेटू हाती गजरा शोभत नाही

*

झाड फळांनी बहरुन आले पोरे जमली

शिशिर पाहुनी कुणीच आता थांबत नाही

*

वस्त्र तोकडे रात्री पोरी नाचत होत्या

असा अवेळी मोर कधीही नाचत नाही

*

घरोघरी बघ बर्गर पिज्जा येतो आता

कुणीच कृष्णा लोणी आता चाखत नाही

*

आत्मबोध अन नंतर चिंतन व्हावे त्याचे

श्रद्धा नाही तिथे देवही पावत नाही

*

रीत सांगते संध्यास्नाना नंतर भोजन

असले बंधन कुणी फारसे पाळत नाही

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोणते नाते ?… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कोणते नाते ?… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

लेवून श्यामलं वसने,

सांज नभाला आली.

क्षितिजावर झुकून अलगद ,

सांगून कांही गेली.

मी मिटून पापणी माझी,

तुझेच स्वप्न पहातो.

खिडकीत सलगीने मग,

चंद्र असा का येतो.

सारुन दूर तमाला,

चांदणे सहिष्णू होते.

मी पुन्हापुन्हा नव्याने,

शोधीन आपले नाते.

थांबवेन मी चंद्राला,

तू थांब,नको ना जाऊ.

सांग अशा नात्याला ,

मी नाव कोणते देऊ?

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भावुक कॅमेरामन… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– भावुक कॅमेरामन– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कृतार्थ हा भाव  | आसवे लोचनी |

कॅमेऱ्याचा धनी | सुखावला ||१||

*

राघवाची मूर्ती | वसे गाभाऱ्यात |

छबी कॅमेऱ्यात | टीपण्यासी ||२||

*

सुवर्ण क्षणांचे |  थेट प्रक्षेपण |

पाही भक्तगण | दूरवर ||३||

*

कॅमेऱ्याच्या मागे | माणूसच उभा |

हृदयाचा गाभा  | भक्तीमय  ||४||

*

मंगल सोहळा | टीपण्याचे  भाग्य |

जन्माचे सौभाग्य | याची देही ||५||

*

ज्याची त्याची झाली | कृतार्थ लोचने |

राघव दर्शने | त्रिलोकात ||६||

*

भावनांना केली | मोकळी ही वाट |

सोहळ्याचा थाट | टिपतांना ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गौरव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

गौरव☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मोल नाही आज येथे संस्कृतीला

मानतो आदर्श कोणी रावणाला

*

ऐकतो  आहे  बहाणे रोज येथे

वाचवाया देश माझा राम आला

*

अंधश्रद्धा काय आहे हे कळाले

वास्तवाचा भ्रामकाशी वाद झाला

*

सौख्य कोठे सापडेना शोधताना

फक्त दिसतो घोषणांचा बोलबाला

*

भाकरीला कोणता पर्याय नाही

का उगी करता पुढे या दैवताला

*

गरजवंताना सुखाचे दान द्या ना

माणसाशी माणसांना जोडण्याला

*

बदलते वारे युगाचे ओळखावे

आणखी परतून लावा संकटाला

*

साधकाने साधना केली चुकीची

का उगा तो दोष देतो संचिताला

*

घातपाताचेच तुमचे ध्येय आहे

हतबलानो द्या निमंत्रण गारद्याला

*

कोणता पुरूषार्थ केला तेच सांगा

जन्म तुमचा सार्थ नाही गौरवाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 159 ☆ हे शब्द अंतरीचे… माझी आई… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 159 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… माझी आई… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

(चाल :- आये हो मेरे ज़िन्दगी में तुम बहार बनके (राजा हिंदुस्थानी))

माझी आई माझी आई, दिला जन्म तिने मजला

माझी आई माझी आई, दिला जन्म तिने मजला

कसा होऊ उतराई, दिला जन्म तिने मजला… धृ

*

खूप कष्ट तिला झाले, खूप त्रास तिला झाला

नऊ मास तिने मजला, पोटात वाढविला

सांगा तुम्ही हो मजला, तिला काय देऊ आजला…१

*

दिनरात काम केले, संसार चालविला

माझ्याच साठी आई, संसार पूर्ण केला

किती प्रेम मला दिले, शब्द न स्फुरती मजला…२

*

शब्द निःशब्द होता,  अश्रूंचा बांध फुटला

वात्सल्य तुझे आई,  चाफ्यास बहर आला

आयु हे माझे सर्व,  अर्पण करतो तुजला…३

*

अशी माझी आई जननी, ऋणानुबंध फुलला

आई-विना कुठे मग, शोभा ये अंगणाला

वसंत ऋतु जीवनी, आई मुळेच आला…४

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आत्मविश्वास… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ आत्मविश्वासकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

तरुण वयात, उमेदीच्या काळात स्वतःची महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती आणि क्षमता यावर ठाम विश्वास असतो. अशावेळी काही भरीव कामगिरी, समाजोपयोगी काही मोठे कार्य करण्याची उर्मी असते. पण अशावेळी समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा विरोध, अडथळे यांचा सामनाही करावा लागतो. शेवटी स्वप्न अर्धवट सोडायची देखील वेळ येते. अशा काही चांगलं करू पाहणाऱ्यांचा संघर्ष डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ” आत्मविश्वास ” या त्यांच्या कवितेत मांडला आहे. आज आपण या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत

☆ आत्मविश्वास ☆

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

 

झेपावलो —- विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची —

— ब्रह्मांडाला गंवसणी घालायची

 

घेतांना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता

अन् तरीही असहाय्यता

क्षितिजाला गंवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

 

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षासी विस्तीर्ण

व्योमाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची —-

— त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

 

क्षण आला वज्रासारखा

निष्ठुरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन् त्या अभेद्य कवचाकडे

पकडू ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

 

मात्र,

जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन् त्यावर बसून

खंवटपणे वेडावणारे

खत्रूड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

 

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

—– जाणवलं —–

मग मात्र ढेपाळलो

पंखांतील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी?

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. अतिशय कर्तबगार, महत्त्वाकांक्षी तरुणासाठी रंगीबेरंगी पिसांच्या देखण्या पक्षाचे रूपक योजले आहे. त्या पक्षाच्या वर्णनातून त्या महत्वाकांक्षी तरूणाचे यथार्थ वर्णन केलेले आहे. पक्षी मोठ्या अभिमानाने आपली डौलदार मान वळवून आपल्या रंगीत पिसांकडे पहातो. त्यांच्या बळकटपणाचे त्याला फार कौतुक वाटते. आपल्या पिसांचा त्याला फार अभिमान वाटतो.

तसाच कवी तरुण सळसळत्या उत्साहाचा आहे. चांगले शिक्षण घेतले. मनात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. आपल्या क्षमतांवर विश्वास असणारा तो ‘काय करू आणि काय नको ‘ अशी त्याची अवस्था आहे.  त्याच्या वागण्या बोलण्यात आपल्या प्राविण्याने, क्षमतांमुळे एक प्रकारचा रुबाब दौल आहे. त्याच्या कृतीतून ती ऐट, अभिमान डोकावतो हे डौलदार मान वळवणे या शब्दातून व्यक्त होते. असा तो आपल्याशी भरभरून बोलतो आहे.

झेपावलो… विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची….

… ब्रम्हांडाला याची गवसणी घालायची

कवीने विस्तीर्ण आकाशात झेप घेतली. त्याला आपल्या क्षमतांवर, कार्यकर्तृत्वावर अतूट विश्वास होता. त्यांच्या भरवशावरच त्यांनी या ब्रम्हांडाला गवसणी घालण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत जग जिंकण्याच्या जबरदस्त महत्वाकांक्षेने गगनभरारी घेतली. सर्वसमावेशक असे काहीतरी मोठे भव्यदिव्य करण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने ही झेप घेतली होती.

घेताना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता 

अन् तरीही असहायता ?

क्षितिजाला गवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

गगनभरारी तर घेतली खरी पण या विस्तीर्ण आकाशाची अथांगता अनुभवल्यावर अवघे क्षितिज आपल्या कवेत घेण्याचे प्रयत्न केविलवाणे वाटू लागले आणि असहाय्यता जाणवू लागली.

कवीच्या मनाने सर्वांच्या उद्धारासाठी काहीतरी मोठे समाजकार्य करण्याचे ठरवून मनाने भरारी घेतली होती. पण त्याची विस्तीर्ण कार्यकक्षा, त्यासाठी करावे लागणारे प्रचंड कार्य, नियोजन यांचा आवाका बघून कवीला थोडी असहाय्यता जाणवू लागली. त्यासाठी आपले प्रयत्न अपुरे पडतील का असेही वाटू लागले.

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षाही विस्तीर्ण

जीवनाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची…

….. त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

आपल्या दृष्टीच्या आवाक्यापेक्षाही विस्तीर्ण अंतरिक्ष म्हणजेच आपले अफाट कार्यक्षेत्र पाहून कवी थबकलाच. पण क्षणभरच. आपल्याला हे कार्य जमेल की नाही असेही क्षणभर त्याला वाटले. पण तेही क्षणभरच.  कारण त्याचा आपल्या कर्तृत्वावर, क्षमतांवर, निर्णयावर गाढ विश्वास होता. त्यामुळेच हे कार्य आपण निश्चितपणे करू शकू ही ठाम आशा तो मनात बाळगून होता.

क्षण आला वज्रासारखा

निष्ठूरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन त्या अभेद्य कवचाकडे

पकडून ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

कुणीही आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही वेगळे करत असेल तर त्याचे कुणाला सोयरसुतक नसते. पण तो जर दुसऱ्यांसाठी, समाजासाठी काही उदात्त हेतूने चांगले कार्य करू पहात असेल तर मात्र काही विघ्नसंतोषी माणसे त्याच्या मार्गात आडवी येतात. त्याला यश मिळू नये म्हणून ते छुपी कारस्थाने करून त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. तो स्वतःच मनाने खचून हे कार्य थांबवेल असे त्यांना वाटत असते. त्यासाठी आत्मविश्वास ढळेल अशी परिस्थिती ते निर्माण करतात .पण आपला आत्मविश्वास शाबूत ठेवण्यासाठी तो आपल्या क्षमता, मनोनिग्रह, आपले नियोजन यासर्व गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पहातो आणि आपल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो.

मात्र जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन त्यावर बसून

खवटपणे वेडावणारे

खत्रुड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

जेव्हा त्याने पाहिले, आपल्या विरुद्ध समाजातील नकारात्मक प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. अशा नकारात्मक प्रवृत्तींना खतपाणी घालून त्यांचे उदात्तीकरण करण्याचा कुटील उद्योग काहीजण करत आहेत. अशी माणसे स्वतःचे महत्त्व शाबूत ठेवण्यासाठी आणि समाज एकत्र येऊ नये म्हणून काहीही करून समाजात फूट पाडत आहेत. चांगल्याच्या पायात खोडा घालणे हाच त्यांचा उद्देश बघून तो धास्तावून गेला.

इथे काळे ढग म्हणजे समाजातील या नकारात्मक प्रवृत्ती, त्यांचे झगमगते उदातीकरण म्हणजे भेदक सौदामिनी आणि आपले समाजातले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा बिनधास्त वापर करणारे आपमतलबी लोक म्हणजे डोमकावळे या रूपकांमधून कवीने समाजातील या दुष्प्रवृत्तींचे अचूक वर्णन केलेले आहे.

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

………. जाणवलं……….

 मग मात्र ढेपाळलो

पंखातील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी ?

कवी धास्तावला होता. तरीही त्याचा स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरचा, स्वतःवरील संस्कारांवरचा विश्वास ठाम होता. पण जेव्हा कवीने हे पाहिले की, ‘ जे आपमतलबी लोक असे अडथळे आणत आहेत, लोकआंदोलन  घडवून आणत आहेत त्यांना विरोध करायचं सोडून लोक त्यांनाच पाठिंबा देत आहेत आणि ज्यांच्यासाठी कवी चांगले उदात्त काही करू पाहतोय त्यालाच  त्यांचा पाठिंबा मिळत नाही. त्या विरुद्ध काही केले तरी आपली ताकद कमी पडते आहे,’ तेव्हा मात्र त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढेपाळला.

या सर्व नकारात्मक प्रवाहात आपण वहावत तर जाणार नाही ना कुठे, अनवधानाने प्रलोभनांना बळी तर पडणार नाही ना अशी त्याला आता वेगळीच भीती वाटू लागली. आपली तत्त्वे, आपले संस्कार यांच्या आधाराने आपण घरात तरी सुरक्षित राहू शकू की नाही अशी शंका सतावू लागली.

एखादा वेगळा उद्योग सुरू करून जम बसवलाय,  चांगली संस्था सुरू केलीय अन् ती लोकप्रिय होतेय असे पाहिले की त्याला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी काही विघ्नसंतोषी माणसे कशी खोडा घालतात, त्यांच्याविरुद्ध लोकांना भडकवतात अशी उदाहरणे आपण समाजात नेहमी बघत असतो. आपल्या चांगल्या कामामुळे काही लोक यशस्वी होतात, समाज मान्यता मिळवतात हे अशा काही जणांना खटकते आणि ते त्यांना बदनाम करून त्यांच्या कामात विघ्न आणून स्वतः समाजात मोठे होतात. सतत आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करतात.

या कवितेत रुबाबदार देखणा पक्षी म्हणजे तो ध्येयासक्त, महत्वाकांक्षी तरूण, काळे ढग म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती, त्या प्रवृत्तींचे उदात्तीकरण म्हणजे भेदक सौदामिनी, समाजातले आपले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करणारे आपमतलबी लोक म्हणजे हे डोमकावळे या रूपकांमुळे कवीची भूमिका अचूक आणि  स्पष्टपणे विशद होते.

अभेद्य म्हणजे भेदण्यास कठीण असे कवच, विजिगीषु  गगनभरारी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार या विश्वासाने घेतलेली झेप, ब्रम्हांडाला क्षितिजाला गवसणी म्हणजे अतिशय अशक्य गोष्ट करायला धावाधाव करणे, शब्दज म्हणजे आकाश, अथांगता, व्योम म्हणजे अंतरिक्ष, वज्र म्हणजे कठोर, भेदक सौदामिनी, खत्रूड म्हणजे कृश मरतुकडे डोमकावळे यासारखे आशयघन अनोखे शब्द अचूक वापरल्याने कवितेला एक छान शब्दवैभव प्राप्त झालेले आहे. अशा रीतीने समाजोध्दार किंवा चांगली समाजसेवा करू पहाणारा आणि समाजविघातक प्रवृत्ती यांच्यातल्या संघर्षाची कहाणी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘आत्मविश्वास’ या कवितेत अतिशय परिणामकारकपणे सांगितलेली आहे.

रसास्वाद:

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शारदा स्तवन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

शारदा स्तवन… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

ही फुले कागदी, मम शब्दांची माते,

कोठुनी, कसा, मग सुगंध यावा त्यांते?

ही असता जाणीव, मनांत माझ्या नित्य,

निर्मिली पूजेस्तव, तुझ्या परी हे सत्य –

*

जरी नसे तयांना, सुगंध आणि मृदूता,

रिझवीन रसीका, प्रती रंग मोहकता,

तव चरणी नाही, नसो तयांचा वास,

शृंगारीन मंदिर, तुझे तयांनी खास –

*

तव विशाल मंदिर, पाहून मी नत होतो,

बेधुंद होवुनी, कधी नाचतो गातो,

गाण्यांत नसू दे शब्द, सूर वा ताल,

कौतुके स्वीकारी, जरी बोबडे बोल –

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ती’ आणि ‘ही’…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ती’ आणि ‘ही’… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मालिकेतील ‘ ती ‘ आणि जीवनातील ‘ ही ‘ यांचा काही मेळ बसत नाही 

 

मालिकेतील ‘ती’ नीटनेटकी राहते. 

स्वयंपाक घरात जरीच्या साड्या घालते. 

सण नसले तरी दागिने चढवते….. 

जीवनातील ‘ही’ केसाचा अंबाडा बांधते. 

स्वयंपाक घरात गाऊनमध्ये वावरते. 

सणालाही दागिने घालण्यास कानाडोळा करते.

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’

ह्यांचा काही मेळ बसत नाही ……. 

 

मालिकेतील’ ती’ला नवरा  प्रेमळ मिळतो.

वाढदिवशी स्वयंपाकघरात येऊन आलिंगन देतो. 

संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट पण करतो….. 

जीवनातील’ ही’ला नवरा नवर्‍यासारखा मिळतो. 

वाढदिवसाचे हिला लक्षात आणून द्यावे लागते .

संध्याकाळी हिला सर्वांच्या आवडीचा मेनू बनवावा लागतो. 

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..  

 

मालिकेतील ‘ती’ला सणाचे कोडकौतूक असतं.

सणाला ‘ती’ न दमता सर्व काही व्यवस्थित दिसतं. 

प्रत्येक सणाला संपूर्ण कुटुंब कार्यरत असतं….. 

जीवनातील ‘ही’ला सण आला की दमायला होतं. 

एक एक वस्तू  जोडतांना नाकीनऊ येतं. 

‘कोणी सण तयार केले ‘?ह्या विचाराने मन दमतं

मालिकेतील ‘ती’ जीवनातील ‘ही’ हयांचा काही मेळ बसत नाही…….  

 

मालिकेतील ‘ती’ भाम्रक जीवन दाखवत राहते. 

जीवनातील ‘ही’ त्यात स्वतःला चाचपडत राहते. 

मालिकेतील ‘ती’ काही न करता जिंकत राहते.

जीवनातील ‘ही’ सर्व करुन हारत राहते. 

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..  

ह्यांचा काही मेळ बसत नाही…….. 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “हिम्मत…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “हिम्मत– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

एकेक पायरी चढत जायचे

आपण आपल्या हिमतीने

निसर्गाने खाद्य ठेवले आहे

घेईन आपल्या कुवतीने — 

*

निसर्गात रहायचेच तर

त्याच्याच रंगी रंगलेलं बर

त्यालाही आपुलकी वाटेल

संरक्षण  मात्र  होतंय खरं — 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares