मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नांदो रामराज्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ नांदो रामराज्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

तन गुंतले संसारी

मन अयोध्यानगरी

आधी स्पर्शली प्रेमाने

देवालयाची पायरी

*

स्पर्श  पायरीला होता

मनी भक्तीभाव  दाटे

मन गाभारी जाऊनी

रामरायालागी भेटे

*

 मना भेटे रामराया

 गेले सीतामायी पाशी

 भक्तिभावाने ठेविली

ठोई तिच्या चरणाशी

*

 रामराम सिताराम जपी

 मन रंगुनीया जाई

 नांदो रामराज्य यापुढे

  बाकी मागणे न काही

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुखावले मन… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– सुखावले मन… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

राम राया तुझे | प्रथम दर्शन |

सुखावले मन | दर्शनाने ||१||

*

गंडकी नदीची | शिला ही पावन |

मूर्तीची घडण  | कोरूनिया ||२||

*

कोदंड  धारक | हाती एक शर |

धर्म रक्षी नर  |  उद्धाराला ||३||

*

दशावताराची | छान प्रभावळ |

प्रसन्न सोज्वळ | सिद्ध मूर्ती ||४||

*

हनुमंत स्थान | प्रभू चरणासी |

मान गरुडासी | सोबतीला ||५||

*

रेशमी  कुंतल | ॐ  स्वस्तिक चिन्ह |

मुद्रा ही प्रसन्न | मुखावर ||६||

*

अयोध्या नगरी  | विराजेल मूर्ती |

पसरली किर्ती | त्रिलोकात ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वर्ग भूवरी… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वर्ग भूवरी … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

वृत्त – समुदितमदना ( ८|८|८|३ )

श्रीरामांचे मंदिर घडले भाग्य आपुले असे

उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||

*

स्वप्न पाहिले जे शतकांचे उतरे प्रत्यक्षात

सफल होतसे श्रद्धा भक्ती अवतरुनी  सत्यात

गर्भागारी लोभसमूर्ती शोभूनी दिसतसे

उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||

*

अवतारी हा विष्णू झाला पुरुषोत्तम श्रीराम

चराचराला व्यापुन उरतो मंगलनिधान राम

मानसपूजा मनामनाची प्रत्ययास येतसे

उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||

*

भाग्याची ही मंगल वेळा अनुभवताना आज

अवघी अवनी लेवुन सजली आनंदाचे साज

नयनांपुढती बाल राम हा अवतरताना दिसे

उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||

*

श्रीरामांचे मंदिर घडले भाग्य आपुले असे

उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||

साभार : राम – विकिपीडिया (wikipedia.org)

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीराम… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ श्रीराम… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

(अष्टाक्षरी)

ध्यानी राम, मनी राम ,

अंतरंगी आत्माराम !

जाणीव त्याची सदैव,

ठेवी मनात श्रीराम !….१

*

बालरूप ते वाढले,

अयोध्येस श्रीरामाचे!

वशिष्ठ आश्रमी झाले,

संगोपन श्रीरामाचे!….२

*

राजाराम सर्वांसाठी,

प्रिय होऊन राहिला !

अयोध्येच्या सिंहासनी,

राजा बनण्या तो आला!….३

*

कैकयीच्या आदेशाने,

वनवासी राम गेला !

कर्तव्यास तो न चुकला,

आदर्श जनात झाला !….४

*

आदर्श पुत्र,अन् राजा,

बिरूदे त्या प्राप्त झाली!

श्रीराम अवताराने ,

भूमी संपन्न झाली.!…५

*

दीर्घ काळ हा जाहला,

मंदिर उभारण्याला !

भाग्य असे हे आमचे,

मिळेल ते पहाण्याला!..६

*

सजे अयोध्या नगरी,

अभिमान , गौरवाने !

कीर्ती पसरे देशाची,

श्रीरामाच्या वास्तव्याने !…७

*

‘श्रीराम’ तारक मंत्र ,

प्रत्येक जागवी मनी!

श्रीरामाचा नामघोष ,

आनंद देई जीवनी !….८

*

साभार : राम – विकिपीडिया (wikipedia.org)

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 157 ☆ हे शब्द अंतरीचे… माझे बालपण…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 157 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… माझे बालपण…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

(अष्टअक्षरी)

माझे बालपण आता,

नाही येणार हो पुन्हा

पुन्हा रडतांना मग,

नाही फुटणार पान्हा.!!

*

नाही फुटणार पान्हा,

आई आता नाही आहे

सर्व दिसते डोळ्याला,

तरी कुठे कमी राहे.!!

*

तरी कुठे कमी राहे,

बाप सुद्धा माती-आड

बोटं धरून चालावे,

प्रेम केले जीवापाड.!!

*

प्रेम केले जीवापाड,

त्याची सय आता येते

छत हे कोसळतांना,

मज पोरके भासते.!!

*

मज पोरके भासते,

आई-बाप नसतांना

त्यांचे छत्र शीत शुद्ध,

त्यांची स्मृती लिहितांना.!!

*

त्यांची स्मृती लिहितांना,

शब्द हे अडखळती

कवी राज हास्य करी,

अशी निर्मळ ही प्रीती.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆

हा हाय तुझ्या गोड गातची गाना

छळी विरहवेदना प्राणा॥ध्रु.॥

 

सुमकोमलशा प्रेमिं अनंती तुजशी

हे प्रीति, धरुनि हृदयाशी

हा कांहि असे काळ म्हणुनि या जगतीं

विस्मरुनि हीहि गे वृत्ती

जों दंग अम्ही संगसुखासव पीतां

अनुभवित पलीं शाश्वतता

हा हाय विरह तो आला

प्रेमाच्या आनंत्याला

आरोपुनि त्याच्या काला

जरि अंताला। अम्हि तया पलां

विसरलो तरी अंत अम्हां विसरेना

छळी विरहवेदना प्राणा॥१॥

 

ना लागेना गोड अतां मज कांही

मज कुठेंहि करमत नाहीं

ये विजना त्रासूनि जनीं मी आणी

त्रासूनि जनां मी विजनीं

मी केश पुन्हा विंचरीं, पुन्हा विखुरीं

विस्मरत गोष्ट जी स्मरली

फिरफिरुनि तनु लव बसते

बघबघुनि नेत्र लव मिटते

परि हाय अनुक्षण मन तें

झुरझुरूनिया। झुरतेंचि, तया

पल विरम नसे, करित सखी तुझ्या स्मरणा

छळी विरहवेदना प्राणा॥२॥

 

फुलताचि फुलें सहज खुडी मी मोदें

हा तोचि चुरगळूं खेदें?

कीं खोंवुं फुलां केशकलापीं तव ये

तुज बाहुं कुठें अजि सखये?

तव पूर्वीचे प्रेमदूत दिसतां तें

हसतचि झुरें मी खेदें

या इष्ट जनीं समजवितां ‘लव खाई’

लागली भूकही जाई

स्मरत कीं कसे म्यां रुसुनी

बसतांच तुवां मन धरुनी

तव कवल देत मग वदनीं

मृदु पालविलें । मधु कालविले

मधु अधरीं तें करित अमृत जे अन्ना

छळी विरहवेदना प्राणा॥३॥

 

हा हाय अतां भेट अम्हांसी कुठली

आशाहि अजि मज विटली

तरी काकुळती येत विनविलें होते

आधींच का न म्यां तैं तें

कीं भेटीसी हीच एकली राती

ये झणीं नको दवडूं ती

मी समयांच्या सारसारुनी वाती

पाहिली वाट त्या रातीं

पद पथें जरा वाजतांच दचकावे

दूरता शून्य बैसावें

तो दार अहा किलकिललें

हो तूंचि । मज झणीं स्वकरें

हृदिं हुंदहुंदुनी धरिलें!

विसरुनि राती। लवचि उरे ती। भोगुं संगतीं

ढकलिली तुला दूर, धरुनि अभिमाना

छळी विरहवेदना प्राणा॥४॥

 

विरहाग्नीनें पुष्ट अश्रू हे आणि

विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी

नांदोत असे करित परस्परपूर्ती

हा विरह, आंसवें आणि तीं

मज सुखही दे दुःख, दुःखची तैसे

हो जपी जपी फलद तुम्हां हो तुमची

मज आणि तपस्या माझी

ती शिला नको वा मूर्ति

भावने नसूनी दिसती

आलिंग्य, चुंब्य असती ती

प्रत्यक्ष अशी। तव मूर्ती मशी। समचेतनशी

तींतची दिसो देव माझिया भुवना

छळी विरहवेदना प्राणा॥५॥

  –  कवी – वि दा सावरकर

 

रसग्रहण

८         काव्यानंद  :

            विरहोच्छ्वास 

            कवी…..वि.दा.सावरकर 

            रसास्वाद: शोभना आगाशे

रसग्रहण

असं म्हटलं जातं की सावरकर स्वातंत्र्य चळवळीत गुंतले नसते तर नक्कीच महाकवी झाले असते. पण मला हे समजत नाही की, ‘कमला’ व ‘गोमंतक (पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग)’ ही महाकाव्ये, ‘सप्तर्षी’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’, ‘आकांक्षा’, ‘चांदोबा चांदोबा, भागलास कां?’, ‘सायंघंटा’ ही सहा दीर्घकाव्ये, व अनेक (शंभरहून अधिक) प्रकाशित तसेच अप्रकाशित काव्यें रचणाऱ्या कवीला महाकवी का म्हणू नये? याव्यतिरिक्त संकल्पित पण अपूर्ण अशा त्यांच्या अनेक रचना उपलब्ध आहेत. असेच ‘पानपत’ हे संकल्पित पण अपूर्ण महाकाव्य. या काव्याचा ‘विरहोच्छ्वास’ हा एक सर्ग त्यांनी पूर्ण  केला होता. यात चाळीस उच्छ्वास (कविता) आहेत. त्यापैकी पाच ‘सावरकरांच्या कविता’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचा रसास्वाद आज आपण चाखणार आहोत.

मुकुल नावाचा एक वीर युवक हिंदुपदपातशाहीसाठी लढत असतांना शत्रुच्या हाती सापडतो. मृत्यूदंडाची अपेक्षा करीत कोठडीत काळ कंठीत असतांना त्याने जे भावनापूर्ण सुस्कारे टाकले, ते यात गोंवलेले आहेत.

सावरकरांच्या प्रासंगिक कविता, पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कविता, स्वातंत्र्यलढा, तुरुंगवास, अस्पृश्यता निर्मूलन,  हिंदुएकता अशा ध्येयाने प्रेरित कविता यांच्या भाऊगर्दीत शृंगाररसयुक्त कविता मागे पडतात. पण अशा कविता वाचल्यानंतर पटतं की सावरकर हे परिपूर्ण कवी होते. या कवितेतले, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कांही बोल्ड किंवा सावरकरांच्या समाजमनातील प्रतिमेशी न जुळणारे शब्द वाचतांना आपल्याला पण अडखळायला होतं. कविता नेहमीप्रमाणेच गेय आहे.त्यांच्यातला शब्दप्रभू/भाषाप्रभू ठिकठिकाणी डोकावतोच. उदा. अनंतापासून निर्मित आनंत्य, आलिंगनापासून आलिंग्य व चुंबनापासून चुंब्य असे अनवट शब्द. थोडंसं या अर्थाने ‘लव’, क्षणोक्षणी साठी ‘अनुक्षण’, बोलावणे साठी ‘बाहणे व त्यापासून बाहू’ (तुज बाहू कुठे अजि सखये), घासासाठी ‘कवल’ असे गोऽड शब्द. ‘संगसुखासव’ यासारखा अपरिचित  शब्द. (संगसुखाला आसव हे सफिक्स किंवा अनुप्रत्यय जोडावा ही कल्पनाच अनोखी आहे.) फिरफिरूनि, बघबघुनि, झुरझुरुनि, सारसारुनि, हुंदहुंदुनि असे त्या कृतीला अधोरेखित करणारे नादमय शब्द.

अनेक ठिकाणी कवीने

शब्दांचे खेळ करून काव्यातील आकर्षकता वाढवलेली

दिसून येते. उदाहरणार्थ वाक्यातील कर्ता, कर्म यांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण वाक्य बनवून, ती दोन वाक्यं पाठोपाठ येतील अशी रचना करणे.

याला क्लृप्ती किंवा इंग्रजीत गिमिक म्हणता येईल. जसे की,

“जरि अंताला अम्हि …. विसरलो, तरी अंत अम्हां विसरेना”, किंवा

“ये विजना त्रासुनि जनी मी आणि त्रासुनि जनां मी विजनी”, तसेच “विरहाग्नीने पुष्ट अश्रू हे आणि विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी”.

श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून “मी समयांच्या सारसारुनि वाती” ही ओळ उद्धृत करता येईल. ‘समयांच्या’ या शब्दाचे तीन अर्थ  होऊ शकतात, पहिला समईचं अनेकवचन समया, दुसरा समय म्हणजे काळ व तिसरा समय म्हणजे करार (इथे नायक व सखी यांच्यातला अलिखित  करार) व हे तीनही अर्थ  इथे चपखल बसतात. तसेच ‘जपी’ हा शब्द प्रथम क्रियापद म्हणून व पाठोपाठच नाम म्हणून वापरला आहे. असे लीलया केलेले शब्दांचे खेळ पाहून अचंबित व्हायला होतं.

रसग्रहण लांबत चालल्यामुळे आज आपण कवितेच्या अर्थाविषयी फारशी चर्चा करणार नाही. शिवाय अर्थ सोपा आहे. फक्त शेवटच्या कडव्याच्या संदर्भाविषयी थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. नायक आपल्या हृदयस्थ सखीला विचारतो की, शिळेच्या वा धातूच्या मूर्तीची आराधना करीत, त्या त्या प्रतिकांशी मानवी नाती जोडून, मीराबाई, नामदेव, तुकाराम, चैतन्य महाप्रभू या संतांप्रमाणे उत्कट प्रेम केलं तर अंती देवाचं प्रत्यक्ष दर्शन होतं असं म्हणतात, मग तुझ्या सजीव मूर्तीवर मी (देवाचे प्रतीक समजून) उत्कट प्रेम करीत असूनही मला तुझी प्रत्यक्ष भेट का होत नाही?

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द, देह, रोमांच ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ शब्द, देह, रोमांच ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

जड बोजड शब्दांचा

नको कवितेत पसारा,

साध्या सोप्या शब्दांनी

फुलूदे तिचा पिसारा !

अर्थ भिडता हृदयाला

डोळे भरून यावेत,

नकळत उचलून तिला

कुणीही घ्यावी कवेत !

वाचतांना अर्थगर्भ रचना 

काटा अंगावरी फुलावा,

रोमांचित करुनी अंग अंग

अवघा देहची शब्द व्हावा !

अवघा देहची शब्द व्हावा !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “इथवर जगल्या आयुष्याचे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “इथवर जगल्या आयुष्याचे– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

चार घरच्या समवयस्क मैत्रिणी

अनुभव मोठा गाठी बांधुनी

निवांत बसुनी घर ओट्यावर

भवताल सारा घेती समजुनी

इथवर जगल्या आयुष्याचे

चेहर्‍यावरती तेज झळकते

पचवून साऱ्या सुखदुःखाला

ताठ कण्याने निवांत बसते

संस्कृतीची कास धरुनी

प्रत्येकीची वेगळी  कहाणी

नऊवारी साडीतल्या मैत्रिणी

ठेवती महाराष्ट्राची शान जपोनी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माहित नव्हते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ माहित नव्हते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

माहीत नव्हते मजला,

हा पाडाव की पडाव.

निश्चित कांही नाही,

कोणता पुढील गाव

थकल्या माझ्या मना रे,

थोडा तरी विसाव.

उद्या पुन्हा भ्रमंती ,

नवा अभिनव ठाव.

दुर्दम्य निग्रहाने ,

नांगरुन बेत तू ठेव.

निश्चिंत होउन सोड,

पाण्यात तुझी रे नाव.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पर्यावरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ पर्यावरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 जसं तान्ह्या बाळास पांघरूण,

तसं अवनीस घातले आवरण !

आतून उबदार, बाहेर देखणे,

निसर्गाचे ल्यायले तिने लेणे !

सृजन निर्मिती करीतसे धरा,

सिंचन तिला पावसाचे करा!

माती पाण्याच्या संगतीत,

हिरवी रोपे भूवर तरतात!

जगवते ती प्राणिमात्रांना,

जाणीव ठेवा तिची मना!

सांभाळावी जीवापाड  तिला,

हानी न करावी भूतलाला!

पंचमहाभूतांची निर्मिती,

ईश्वरे केली प्राणीमात्रांसाठी!

जपू या पर्यावरणाला,

 उतराई होऊ या सृजन सृष्टीला!

जाणीव कायम मनात ठेवू,

पर्यावरणाला जपून राहू!

नाही पर्यावरणाचा एकच दिन,

साथ देऊ त्यास आपण रात्रंदिन!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares