मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय दुसरा – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । 

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥ 

वीर क्षत्रिया त्यजी भया जाणूनिया स्वधर्मासी

युद्धाहुनी श्रेष्ठ भला दुजा नसे धर्म क्षत्रियासी ॥३१॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ । 

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्‌ ॥ ३२ ॥ 

भाग्यवान क्षत्रियासी युद्धाने केवळ लाभते

आपोआप मुक्त स्वर्गद्वार होणे नशिबी प्राप्त ते ॥३२॥ 

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि । 

ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३ ॥ 

यद्यपि विन्मुख होशी या धर्मयुद्धा 

गमावशील स्वधर्म तथा कीर्तिसुद्धा

संचय न होई  यत्किंचित पुण्याचा

होशील धनी तू केवळ  पापाचा ॥३३॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ । 

सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥ 

अपकीर्ति मग पसरेल तुझी पार्था या जगती

मरणापरीस अधिक दुःसह मनुष्यास ती दुष्कीर्ति ॥३४॥

भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः । 

येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ ३५ ॥ 

आदर करिती तुझा आजवर महारथी जाणुनी

म्हणतील भ्याड फिरला मागे  भिउनी रणांगणी ॥३५॥ 

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । 

निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ ३६ ॥ 

निंदक वैरी तुझे निंदतिल अश्लाघ्य वचने

यापरी  दूजे काही नाही जीवनात दुखणे ॥३६॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ । 

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥ 

मृत्यू येता स्वर्गप्राप्ती  जिंकलास भोगी धरणी

उठि कौन्तेया निश्चय करुनी युद्धासी तू रणांगणी ॥३७॥ 

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । 

ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥ 

सुख-दुःख हानी-लाभ जित-जेता समान 

युद्ध करी रे नाही पाप रणांगणातील रण ॥३८॥

एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । 

बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९ ॥ 

ज्ञानयोगाचे हे ज्ञान कथिले पार्था मी तुजला

ऐक कर्मयोग नष्ट करण्या कर्मबंधनाला ॥३९॥ 

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । 

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ ४० ॥ 

बीजाचा  ना होतो नाश  नाही फलदोष यात

कर्मयोगाचा धर्म जननमरण भय रक्षण  करित ॥४०॥ 

बीजाचा  ना होतो नाश  नाही फलदोष यात

जननमरण भय रक्षण  कर्मयोग धर्म करित ॥४०॥ 

– क्रमशः भाग दुसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेडा सागर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वेडा सागर ☆ श्रीशैल चौगुले ☆

प्रकाशातला विशाल सागर वेडा

प्रवाहात अजाणते धावतो कसा

अहंकार कि अल्लड देहाची बुध्दि

प्रलयाने विनाश आत्मघात वसा.

दिशा तोडून,भान सोडून पळतो

वसुमतीला कुशीत उगी छळतो

काही न उरते केवळ स्मृती ठसा.

अघोर काळ्याकुट्ट आभाळी शिरतो

तेंव्हा संकट भय विश्वाला भरतो

कळेल का या सागरा दुःखाची रेषा.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #211 ☆ वयात आले… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 211 ?

☆ वयात आले… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

फूलपाखरा तुझे चालणे वयात आले

नव्या फुलांचे नवे डोलणे वयात आले

 

तू हृदयाचे चिन्ह कोरले हातावरती

तेव्हा कळले तुझे वागणे वयात आले

 

पहिल्यांदा मी गालावरची खळी पाहिली

जाणवले मज तुझे लाजणे वयात आले

 

नजरेमधल्या शब्दांनाही कंठ लाभला

डोळ्यांमधले अजब बोलणे वयात आले

 

अश्वावरची गोंडस मूर्ती टिपल्यानंतर

श्वासामधले शीघ्र धावणे वयात आले

 

रंग बिरंगी पंखावरची धूळ नभावर

आकाशातिल धुंद चांदणे वयात आले

 

जिथे भेटले पवन-गंध ती बाग असावी

दोघांमधले आज भेटणे वयात आले

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आदिशक्तीचा सोहळा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– आदिशक्तीचा सोहळा…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

थिरकले पाय,

दांडियाच्या तालावर |

चैतन्य ओसंडून वाहिले,

तरुणाईच्या गालावर |

नऊ दिवसांचा चाले,

आनंदाचा  रासरंग |

देहभान विसरून,

गरब्यात होई दंग |

एक एक ठेका धरत,

लय बद्ध नाच चाले |

मने जुळती मने कळती,

ओलेचिंब मन झाले |

मौज मजा मस्ती,

आनंदाची उधळण |

संगीताने मंत्रमुग्ध,

बेधुंद प्रत्येक क्षण |

सुंदर नखरापट्टा,

साजशृंगार वेशभूषा |

लाखात उठून दिसावं,

जिची तिची मनीषा |

देवीच्या मंडपात उत्साहात ,

गरबा खेळायला गोळा  |

आदिमाया आदिशक्तीचा,

नऊ दिवसांचा सोहळा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ घर☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुझ्या न माझ्या स्वप्नांचे घर

दिसतेआहे पैलतीरावर

निरखू आपण मिळून दोघे

उभा राहुनी या काठावर

 

आनंदाने जगायचे तर

चालायाच्या वाटा खडतर

परस्परांच्या मर्जी खातर

बनतजायचे मालक नोकर

पेरायाची जिभेत साखर

ठेवायाचा बर्फ शिरावर

ठरवायाचे आपले आपण

कोण चुकीचे कोण धुरंधर

 

रीत जगाची प्रित सांगते

जोडायाला हळवे नाते

खुलेपणाची पारख होते

भविष्यात ती कायम टिकते

अनोळखीचे अंतर सरते

लळाजिव्हाळा मनात जपते

आयुष्याच्या वळणावरती

वळतो जुळतो हेच बरोबर

 

भवसागर हा मध्ये केवढा

तरावयाला गहन निरंतर

हात घेवुनी हाती आपण

चालायाचे अफाट अंतर

तिथे जावुनी घेत विसावा

निवांत आपण थांबू नंतर

बांधू तेथे विसाव्यास मग

 इवलेसे पण मालकीचे घर

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 148 ☆ अभंग… नित आठवावे, कृष्णरूप.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 148 ? 

☆ अभंग… नित आठवावे, कृष्णरूप.!!

मानव शरीर, एकदाच मिळे

साधावे सोहळे, मुक्तपणे.!!

वाईट चिंतन, सोडूनिया द्यावे

नित आठवावे, कृष्णरूप.!!

स्थिरता असावी, गांभीर्य जपावे

कुकर्म सांडावे, स्व-प्रवृत्ती.!!

अहिंसा हे तत्व, आचरण व्हावे

शेवटास न्यावे, दिन वृत्ती.!!

कवी राज म्हणे, देव आठवावा

सदैव स्मरावा, एकचित्त.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कथा… सौ. उज्वला केळकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ कथा… सौ. उज्वला केळकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

रसग्रहण

जे सत्यात नसते ते कधी कधी स्वप्नात दिसते. स्वप्ने कुणीही पहावीत.  कधी कधी स्वप्ने इतकी सुखद असतात की ती संपूच नयेत, त्यातून जाग येऊ नये असेच वाटते.  पण तसे होत नाही.  सुखद स्वप्नांतून सत्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मळकट वास्तवाची जाणीव मनाला कातरते. काहीशा अशाच भावनांना निरखून लिहिलेली सुश्री उज्ज्वला केळकर यांची ही कविता…

☆ – कथा – सौ. उज्वला केळकर  ☆

मरगळल्या दिशा

गच्च भरलेलं आभाळ

आंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छ्प्पर फाडून आत आलेला.

फुटक्या कौलारातून  निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर.

पोरं टोरं

कळकट, मळकट

केस विस्कटलेली, शर्ट फाटलेली

बसली आहेत, निमूटपणे

कथा ऐकत

कुणा सुशील, सुंदर राजकान्येची

तिला पळवून नेणार्‍या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची.

आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी, झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात, यक्षांचे राजे

वाटा दाखवणारे, वर देणारे

सारी मुलेच मग बनतात राजपुत्र

भरजरी पोशाख ल्यालेले, तलवार घेतलेले

आणि निघतात सोडवायला

त्या सुशील, सुंदर राजक्न्येला

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून.

घंटेची आरोळी ठोकून,

टाकतो सारी कथाच विस्कटून 

टाकतो सारी कथाच विस्कटून.  

मुक्तछंदातील ही कविता वाचल्यानंतर आपण कुठल्याशा अविकसित,दैन्यावस्थेतल्या दलीत, पीडीत अशा भागात जाऊन पोहोचतो.  तिथले  जीवन अत्यंत निकृष्ट,निकस आहे.  कुठल्याही प्रगतीच्या खाणा खुणा नसलेल्या या भागातल्या शाळेत शिकून जीवनाला फुलवू  पाहणाऱ्या, आकार देऊन पाहणाऱ्या लहान मुलांच्या केविलवाण्या राज्यात व्यथित अंतकरणाने जातो.

मरगळल्या दिशा गच्च भरलेलं आभाळ

अंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छप्पर फाडून आत आलेला

फुटक्या कौलारातून निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर

या काव्यपंक्तीतून कवियत्रीने स्वतःच्या मनातल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत..  असे एक वातावरण जे खरं म्हणजे स्वतः अनुभवलेलं  नसल्यामुळे प्रत्यक्ष दिसणाऱ्या विदारक दृश्यामुळे त्यांचे मन हेलावते. 

एका खेड्यातल्या शाळेचं हे चित्र. आधीच तेथील लोकांचे जीवन दिशाहीन, मरगळलेलं.  त्यातून आकाश ढगांनी भरलेलं, अंधारलेल्या वर्गात अधिकच काळोख आणणारं. नुसतं एवढंच नाही तर त्यातून छप्पर पाडणारा सुसाट वारा आणि गळणारे पाणी जे फाटक्या कपड्यातल्या विद्यार्थ्यांना भिजवत आहे.  त्या बाल विद्यार्थ्यांची ही  शैक्षणिक दशा पाहून कवियत्रीच्या अंगावर अक्षरश: शहारे उभे राहतात.

कळकट मळकट

केस विस्कटलेली शर्ट फाटलेली

बसली आहेत

निमुटपणे

कथा ऐकत

हे कळकट, मळकट, केसावर कधीही कंगवा न फिरवलेली विस्कटलेल्या केसांची, फाटक्या कपड्यातील मुले मात्र गुपचुप शांत बसून गुरुजी सांगत असलेल्या कथेत रमली आहेत.

कुणी सुशील सुंदर राजकन्येची

तिला पळवून नेणाऱ्या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची

गुरुजी सांगत असलेल्या कथेत एक सुंदर राजकन्या आहे.ती सुशीलही आहे. तिला कुणा दुष्ट, भयंकर राक्षसाने पळवलेले आहे. मात्र तिच्या रक्षणासाठी प्रेमळ यक्ष— सेवक, तसेच धैर्यवान राजपुत्र ही आहेत.

 आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात यक्षाचे राजे

वाटा दाखवणारे वर देणारे

या कथेच्या माध्यमातून ती सारी कळकट मुले खरोखरच मनाने एका जादुई नगरीत— जी चमचमणारी लखलखणारी आहे  तिथे जाऊन रमतात. त्या झगमगाटाने प्रफुल्लित होतात.  त्या क्षणी कथा सांगणारे गुरुजी म्हणजे मुलांना त्या यक्ष नगरीचे सम्राट वाटतात आणि तेच आपल्या आयुष्याची वाट आखणार आहेत, सुंदर जीवनासाठी आशिष देणार आहेत याची खात्री मुलांना वाटते.

 सारी मुलेच बनतात राजपुत्र

 भरजरी पोशाख ल्यालेले

 तलवार घातलेले

 आणि निघतात सोडवायला

 त्या सुशील सुंदर राजकन्येला

कथेत रमलेल्या मुलांना आता वाटायला लागते की ते स्वतःच राजपुत्र आहेत. त्यांच्या अंगावर भरजरी पोशाख आता आहेत.  हातात तलवारी आहेत आणि राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या सुंदर राजकन्येला सोडवण्यासाठी ते आता समर्थ आहेत.

या चार ओळी म्हणजे उज्वला ताईंच्या या काव्यातला गर्भितार्थ  सांगणाऱ्या, शिखर गाठणाऱ्या ओळी आहेत. वरवर  ही जरी परिकथा वाटत असली, सरळ सरळ अर्थ सांगणारी राजकन्येची गोष्ट  वाटत असली तरी त्या कथेशी मनाने जोडल्या गेलेल्या मुलांचे स्वप्नविश्व, भाव विश्व फुलवणारी आहे. भरजरी पोशाख, तलवारी,राजकन्या,राजपुत्र, राक्षस हे रूपकात्मक शब्द आहेत. यातून कधीतरी मरगळलेल्या जीवनाला सौंदर्य आणि गळून गेलेल्या मनाला आत्मविश्वास मिळण्याची आशा दिसून येते. या कथेतील सुंदर राजकन्या म्हणजे एक सुरेख जीवन आणि राक्षसांच्या तावडीत सापडलेली राजकन्या म्हणजेच या सुंदर जीवनावरचे दारिद्र्याचे मळकट आवरण आणि  ते दूर करण्याचं बळ आपल्याही हातात आहे हा विश्वास त्या मुलांना मिळतो.

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून

घंटेची आरोळी ठोकून

टाकतो सारी कथाच विस्कटून

टाकतो सारी कथाच विस्कटून…

कथेतला सुखद शेवट कल्पित असतानाच तास संपल्याची घंटा शिपाई वाजवतो आणि घंटेचा तो कर्कश्श आवाज ऐकल्यानंतर सुंदर कथेचा सारा पटच उधळून जातो. कथा तिथेच अर्धवट विस्कटून जाते.

इथे उज्वला ताईंनी शाळेच्या शिपायाला राक्षसाची उपमा दिली आहे.  आणि हा राक्षस रुपी शिपाई म्हणजेच मुलांच्या आयुष्यातलं दुःखद वास्तव आहे. राजकन्या, राजपुत्राची कथा म्हणजे सुखद स्वप्न आणि तास संपल्याची घंटा म्हणजे वास्तवाची जाणीव. पुन्हा तेच नैराश्य. तीच उदासीनता.तेच मळकट दैन्य. दिशाहीन आयुष्य.

आणि त्यातूनच उमटणारे अनेक विदारक प्रश्न. या मुलांची आयुष्यं कधी उजळणारच नाहीत का? या मुलांना सुंदर भविष्य बघण्याचा अधिकारच नाही का? प्रगतीचे वारे यांच्यापर्यंत कधी पोहोचणार? शहरे यच्चयावत सुविधांनी सजत असताना खेडोपाडीचे हे दैन्य दूर करण्याचे आवश्यक कार्य कोण, कधी आणि कसे करणार?

उज्ज्वला ताईच्या  कथा या सरळ साध्या कवितेतून जणू  त्यांनी सहृदयतेने  संवेदनशील सामाजिक प्रश्नांनांच स्पर्श केलेला आहे.  काव्यातल्या प्रत्येक ओळीतून झिरपणाऱ्या वेदनांना त्यांनी एक लक्षवेधी सामाजिक स्वरुप दिलेले आहे. आपण सारे आपल्याच  सुखात रमलो आहोत पण आपल्या झोळीतील काही गोजीरवाणी सुखे, आनंद या नुसतेच स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या  ओंजळीत कधी पडणार?

या   कवितेतून व्यक्त होणारी उज्वला ताईंची सामाजिक जाणीव, कळकळ ही वंदनीय आहे.

जाता जाता इतकेच म्हणेन,” एक सुंदर संदेश देणारी, डोळे उघडे ठेवून आजूबाजूचे जग सह नुभूतीने पाहायला लावणारी दमदार, अर्थपूर्ण कविता— कथा.”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आम्ही… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आम्ही… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

युद्धाचे परिणाम माहीत

नसल्यामुळेच . .

तिने लढाया केल्या.

मला कारणं माहीत होती,

म्हणूनच मी तह केले.

त्यांनी विजोड जोड्या लावल्या

म्हणून आम्हीही गाळलेले

शब्द भरले.

व्यत्त्यासाने प्रमेये सिद्ध केली-

भूमितीची.

हातचे वापरुन गणितं सोडवली. . व्यवहाराची.

दुर्देवाचे सगळे फेरे.

प्रगतीबुकावर लाल शेरे.

तरीही पुढची यत्ता गाठली.

इतुके यश होते रगड.

अगदीच नव्हतो आम्ही दगड .

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साज सजणीचा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 💓 💃 साज सजणीचा! 💃💓 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

शोभा वाढवी कुंतलाची

झुले भाळावरी पदक,

चाले जणू भांगेतुनी  

नागिण “बिंदी” मादक !

 

करती कानांशी सलगी

घेती बोलतांना हिंदोळे,

लक्ष वेधती साऱ्या सख्यांचे

सुंदर सोन्याची कर्णफुले !

 

टोचून चाफेकळीला

सोडत नाही जी साथ,

शुभ्र टपोऱ्या मोत्यांसवे 

शोभून दिसे हिऱ्याची नथ !

 

गोल गळ्याची शोभा

वाढविती नानाविध हार,

चिंचपेटी, बोरमाळ, ठुशिसवे

उठून दिसे नवलखा हार !

 

पाटल्या, तोडे, कंकण,

चुड्यासवे करती किणकिण,

लांब सडक बोटांवरती

अंगठ्या हिऱ्यांच्या छान !

 

शोभा वाढवी सिंहकटीची

साजरी रत्नजडीत मेखला,

कंबर पट्टा वेलबुटींचा

मत्सराने खाली झुकला !

 

जरी चालसी हलक्या पावली

नाद मंजुळ करती पैंजणे,

येता अशी तू सजूनी धजूनी

कलीजा खलास होई सजणे !

कलीजा खलास होई सजणे !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अन देवी प्रसन्न हसली… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अन देवी प्रसन्न हसली… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

तिने परत एकदा आरसा

न्याहाळला, नथ पक्की दाबली

आणि पदर सावरून

ती हॉल मध्ये आली.

तो सुद्धा कुर्ता घालून तयार

होऊन बसला होता.

“अरे व्वा …!!

सुरेख तयार झाली आहे गं ..!!

लग्नानंतरचं पहिलं नवरात्र म्हणून यावर्षी मी खास ही

गर्भरेशमी पैठणी आणली आहे देवीसाठी.

यानी ओटी भर बरं का.

बाकी तांदूळ, नारळ आणि

ओटीचं सगळं सामान या

पिशवीत ठेवलंय.

जोड्याने जाऊन या दर्शनाला.”

सासूबाई नव्या सुनेला म्हणाल्या.

त्यांच्या उत्साहाचं तिला कौतुक वाटलं.

        

दोघे मंदिराजवळ पोहोचले

तेव्हा ओटी भरायला आलेल्या

बायकांची चांगलीच गर्दी झाली

होती. शिवाय पुरुषांची पण

दर्शनाची वेगळी रांग होती.

तिला रांगेजवळ सोडून तो

गाडी पार्क करायला गेला.

 

रस्त्याच्या कडेला फुलांची,ओटीच्या

सामानाची बरीच दुकानं होती,

तिने आठवणीने सोनचाफ्याची वेणी

देवीसाठी घेतली, 

तिच्या घमघमणाऱ्या गंधाने

तिला आणखीनच प्रसन्न वाटलं.

तिने स्वतःच्या केसात चमेलीचा

गजरा माळला. हिरवाकंच चुडा

सुध्दा तिने ओटीच्या पिशवीत

टाकला.

एव्हाना तोही दर्शनाच्या रांगेत

सामील झाला होता. 

ती ओटी भरणाऱ्या बायकांच्या

रांगेत जाऊन उभी राहिली.

आई सोबत लहान पणापासून

नवरात्रीत देवीच्या दर्शनाला ती

नेहमी जायची. तिथल्या गर्दीचा

कंटाळा यायचा खरं तर.

पण वर्षातून एकदाच गावाबाहेरच्या

देवीच्या मंदिरात तिला जायला

आवडायचं सुध्दा.

ती आईला म्हणायची,

“आई या मंदिरात ओटीच्या

नावाखाली किती कचरा

करतात गं या बायका.

देवीला पण राग येत असेल बघ.

तिचा चेहरा नं मला वैतागलेला

दिसतो दरवर्षी.”

आई नुसती हसायची. 

आईच्या आठवणीत ती

हरवून गेली थोडा वेळ.

 

तेवढ्यात आपला पदर कोणीतरी ओढतअसल्याचं

जाणवलं तिला.

काखेला खोचलेलं पोर घेऊन एक डोंबारिण तिला पैसे मागत होती. रस्त्याच्या पलीकडे डोंबाऱ्याचा खेळ रंगात आला होता. म्हणून त्याची बायको पैसे मागत मागत रांगेजवळ आली होती. तिने अंगावर

चढवलेला ब्लाऊज आणि

परकर पार विटलेला,

फाटलेला होता .

तिच्या मागे उभी असलेली

बाई तिच्यावर खेकसलीच, 

“एऽऽऽऽ, अंगाला हात लावू नको गं.”

 

तिने पैसे काढेपर्यंत डोंबरीण पैसे मागत बरीच पुढे निघून गेली.

हळूहळू रांग पुढे सरकत होती.

आता तिची सात आठ वर्षाची मुलगी सुद्धा येऊन पैसे मागत होती.

 

शेवटी एकदाची ती

गाभाऱ्याच्या आत जाऊन

पोहोचली.

पुजारी खूप घाई करत होते. तिने पटकन समोरच्या ताटात

पिशवीतली पैठणी ठेवली,

मग घाईने तिने त्यावर नारळ ठेवले, त्याला हळद कुंकू लावून तिने ओटीचे सगळे तांदूळ, हळकुंड , सुपारी, बदाम ,खारका,

नाणे ओंजळीने ताटात ठेवले.

पुजारी जोरजोरात

“चला,  चलाऽऽऽ ….” ओरडत होते.

देवीच्या उजव्या बाजूच्या

कोपऱ्यात नारळाचा खच पडला होता, तर डाव्या बाजूला पुजारी ओटीच्या साड्या जवळ जवळ

भिरकावत होते.

एवढ्या गोंधळात तिने देवीच्या मुखवट्याकडे क्षणभर पाहिले,

आजही तिला देवी त्रासलेली वाटत होती.

 

मग हात जोडून ती ओटीचं

अख्खं ताट घेऊन बाहेर आली. आणि तिने मोकळा श्वास घेतला.

 

तोसुद्धा दर्शन घेऊन तिच्या

जवळ आला.  “काय गं?

ओटी घेऊन आलीस बाहेर ?”त्याने विचारलं. 

 

 “तू थांब इथे.

मी मला दिसलेल्या देवीची

ओटी भरून येते.”

असं म्हणून ती ताट घेऊन

भराभर पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आली,

झाडाच्या सावलीत आडोशाला तिला डोंबारीण दिसली,

तिच्या बाळाला ती छातीशी घेऊन पाजत होती.

“दीदी, हलदी कुमकुम

लगाती हूं आपको.”असं म्हणून तिने तिला

ठसठशीत कुंकू लावले.

ताट बाजूला ठेवून तिने

तिची ओटी भरली.

सोबत सोनचाफ्याची वेणी

आणि हिरव्या बांगड्यांचा चुडापण दिला. मग तिने तिला नमस्कार केला. 

डोंबारणीचं पोर तिच्या कुशीत झोपून गेलं होतं. 

तेवढ्यात तोही तिथं आला

आणि त्याने फळांची आणि खाऊची पिशवी तिच्या हातात दिली. ती म्हणाली,”ये लो दिदी, छोटू और उसकी बहन

के लिये.”डोंबारीण परत एकदा डोळ्यांनी हसली.

ती पैठणीवरून हळुवारपणे हात फिरवू लागली.

तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव वेचून ती दोघं परत मंदिरात आले.

आता गर्दी बरीच कमी झाली होती. गाभाऱ्यात जाऊन दोघांनी डोळे भरून देवीचे दर्शन घेतले.

        

तिला आता देवीचा मुखवटा खूप प्रसन्न वाटला.

इतक्यात गाभारा

सोनचाफ्याच्या गंधाने दरवळून गेला. त्या दोघांच्या पाठीमागे

डोंबारीण तिच्या मुलांसोबत आणि नवऱ्या सोबत पैठणी

गुंडाळून , हिरवा चुडा आणि

वेणी घालून देवीचं दर्शन

घ्यायला आली होती.

देवीचा मुखवटा तेजाने

आणखीनच उजळून

निघाला होता.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares