मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मोल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

रमण्यावरती कोण पेशवा दान वाटतो आहे

पूर्वसुरींच्या घटनांचे तो पाप क्षाळतो आहे

 

विध्वंसाचा डाव भयानक तोच खेळला होता

अपराधांचे कथन कराया मौन पाळतो आहे

 

विरांगणेच्या घटृमिठीचा आठव आला तेंव्हा

अमूर्त सुंदर सखी कुंतली फूल माळतो आहे

 

जगावेगळी प्रीत बावळी त्या दोघांची होती

दोघांचेही प्रेम आंधळे तोच मानतो आहे

 

विरहवेदना काळजातल्या जरी राहिल्या ताज्या

तरी सखीला तोच आपल्या सौख्य मागतो आहे

 

रीत जगाची कोण पाळतो समर्पणाच्या वेळी

आत्मबलाने डाव जिंकणे हेच साधतो आहे

 

मोल जयाचे तया द्यायचे खरेच असते येथे

असा तसा मग कधीतरी हा देह संपतो आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 145 ☆ वेदनेच्या कविता… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 144 ? 

☆ वेदनेच्या कविता…

वेदनेच्या ह्या कविता सांगू कशा 

मूक झाली भावना ही महादशा..धृ

 

अश्रू डोळ्यांतील संपून गेले पहा 

स्पंदने हृदयाची थांबून गेली पहा 

आक्रोश मी कसा करावा, कळेना हा.. १

 

नाते-गोते आप्त सारे विखुरले 

रक्ताचे ते पाणी झाले आटले 

मंद मंद मृत शांत भावना.. २

 

ऐसे कैसे दिस आले, सांगा इथे 

कीव ना इतुकी कुणाला काहो इथे 

आंधळे हे विश्व अवघे भासे इथे.. ३

 

सांगणे इतुकेच माझे आता गडे 

अंध ह्या चालीरीतीला पाडा तडे 

राज कवीचे शब्द आता तोकडे.. ४

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ फिनिक्स… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ फिनिक्सकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

जीवनात चढउतार येतात, मानापमानाचे खेळ सुरू असतात. बरेचदा अपयश, बदनामीमुळे मानसिक, शारीरिक होरपळ होते. यातूनही नव्या जिद्दीने पुन्हा उभे रहात नवा डाव सुरू होतो. अशाच एका जिद्दी, नव्या उमेदीने पुन्हा डाव मांडणाऱ्या माणसाचे मनोगत डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘फिनिक्स’ या कवितेत मांडले आहे. तिचाच आज आपण रसास्वाद घेणार आहोत.

फिनिक्स  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

पुनःपुन्हा पुनःपुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

……….. नकळतच!

 

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहे तर …..

            ….. जिवंत आहे

विश्वासच बसत नव्हता!

 

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी!

 

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

            ….. नेहेमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला!

 

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला?

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

पुन:पुन्हा पुन:पुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

…. नकळतच !

आयुष्यात अपयशाचा, संकटांचा पुन्हा पुन्हा तोच दाहक अनुभव मी घेतला आहे. त्या धगीने नकळतच मी शरीराने आणि मनानेही पूर्णपणे होरपळून निघालो आहे.

या कवितेचे शीर्षकच कवितेचे सार सांगत आहे. आपल्याच राखेतून नवा जन्म घेत आकाशात झेपावणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. पौराणिक कथांमध्ये त्याला अमरपक्षी म्हणतात. स्वतःच्या राखेतून उठण्याच्या क्षमतेमुळे त्याला अमर म्हटले जाते. अशीच विजिगीषू वृत्ती असणाऱ्या एका परिस्थितीशी लढणाऱ्याचे हे मनोगत.

मुक्तछंदात असणारी ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेली आहे. कवी मोकळेपणाने आपण आयुष्यात अनुभवलेले दाहक प्रसंग कथन करीत परिस्थितीशी संवाद साधतो आहे. या अनुभवाने आपण पूर्णपणे गलितगात्र झाल्याचे सांगत आहे. अपयश, बदनामी, प्रेमभंग, अपमान अशासारख्या गोष्टींनी पुन्हा पुन्हा या प्रसंगाला सामोरे जातो आहे. त्याची तीव्रता दाखवायला नुसते पुन्हा पुन्हा असे न लिहिता पुन:पुन्हा पुन:पुन्हा असा प्रभावी शब्दप्रयोग केलेला आहे.

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहेत तर…

… जिवंत आहे

विश्वास बसत नव्हता !

या अवस्थेची जाणीव झाली. संवेदना जागी झाली आणि खूप बरं वाटलं. कारण हे जाणवण्या एवढं माझं मन अजून सावध आहे म्हणजे मी अजून जिवंत आहे. पण खरंच माझा यावर विश्वासच बसत नाही.

बसलेल्या कठोर आघाताने आपण जणू निष्प्राण झालो, पूर्ण उमेद खचल्याने धुळीला मिळालो अशीच कवीची भावना झालेली असते. पण संवेदना जागृत आहेत हे लक्षात आल्यावर आपण अजून जिवंत आहोत ही जाणीव त्याला होते आणि थोडसं निर्धास्त पण वाटतं.

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी !

मी जिवंत आहे या जाणिवेचे सुख क्षणीकच ठरले. कारण त्या दाहकतेने बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं आणि त्यांच्या त्या भयावह आठवणींनी पुन्हा पुन्हा जीव पोळून निघत होता.

अशा जीवघेण्या आघातामुळे होणारे शारीरिक मानसिक त्रास, चटके हे नेहमी दृश्य असतात. ते सोसावेच लागतात. त्यामुळे विसरता येत नाहीत आणि त्यांच्या आठवणी या जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे आपण आता संपलो असे वाटून आत्मविश्वास रसातळाला जातो.

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

…नेहमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला ?

आता मात्र मी ठरवलंय असा पुन्हा अनुभव आला की, नेहमीसारखं त्यात जळून खाक व्हायचं. म्हणजेच नेस्तनाबूत व्हायचं. पण आता या राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उठायचं मात्र नाही. पुन्हा होरपळत त्यात नव्याने जाळून घ्यायचं नाही. म्हणूनच आता पुन्हा कसलाही प्रयत्न करायचा नाही. जिवंत असूनही मेल्यासारखे जगायचे.

कवी झालेल्या होरपळीने इतका गलितगात्र झाला आहे की, आता पुन्हा पुन्हा हा अनुभव घ्यायची त्याची तयारी नाही. त्यामुळे त्याने आता पुन्हा उभारी घ्यायचीच नाही. असंच उध्वस्तपण सोसत रहायचं असा निर्धार केला आहे.

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला ?

या दाहक आघाताने जणू जळून राख झालेल्या माझ्या तापलेल्या मन आणि शरीराला तू का तुझा संजीवन देणारा स्पर्श केलास ? आता यातून पुन्हा एकदा नव्या फिनिक्सला जन्म द्यायचा काय ?

इथे कवीला कुणीतरी आधाराचा हात देणारे, मानसिक उभारी देणारे, पुन्हा लढण्याचे बळ देणारे भेटलेले आहे. त्यामुळे तो पुन्हा उभा राहतोय. पण त्याला या पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाची, कटू अनुभवाची जबरदस्त भीती वाटते आहे. त्यामुळे तो त्या सुहृदाला विचारतो, ” का मला संजीवन देणारा तुझा स्पर्श केलास ? का माझी जीवनेच्छा पुन्हा जागृत केलीस ? “

झाल्या आघाताने कवीचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातून तो सावरतो. पुन्हा उभा रहातो. पुन्हा कोसळतो. त्याची असह्य तगमग होते. ही सारी मानसिक, भावनिक आंदोलने सहजसुंदर शब्दरचनेत मांडण्यात कवी अतिशय यशस्वी झालेला आहे.

या कवितेत फिनिक्स या रूपकाचा खूप छान उपयोग केलेला आहे. परिस्थितीने पूर्ण हतबल झालेला कवी पुन्हा नव्या उभारीने परिस्थितीला सामोरे जात नव्याने डाव मांडतो. यासाठी योजलेले फिनिक्सचे रूपक अगदी यथार्थ आहे.

ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात असली तरी प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीला केव्हा ना केव्हा सामोरा गेलेलाच असतो. त्यामुळे ही कविता फक्त एकट्या कवीची न रहाता सर्वस्पर्शी होते. कारण असे अनुभव हे सार्वत्रिक असतात. हे अनन्योक्ती अलंकाराचे छान उदाहरण म्हणता येईल.

माणसाला आयुष्याच्या वाटचालीत कधी शत्रूकडून त्रासदायक आघात, व्यवहारात, व्यवसायात पूर्ण अपयश, मित्रांकडून फसवणूक, जोडीदाराकडून प्रेमात अपेक्षाभंग अशा जीवघेण्या अनुभवांना तोंड द्यावे लागते. तो मोडून पडतो. शारीरिक, मानसिक होरपळ होते. आत्मविश्वास लयाला जातो. अशावेळी एखादा मित्र, एखादा हितैषी, जिवलग, जोडीदार आधाराचा हात देतो. पाठीशी खंबीर उभा राहतो. मनाची उभारी वाढवून पुन्हा लढण्याचे बळ देतो. पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा अशा अनुभवाची पुनरावृत्ती होते. पण माणसाची दुर्दम्य  इच्छाशक्ती, जबरदस्त जीवनेच्छा गप्प बसू देत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने तो जगण्याला सामोरा जाण्यास तयार होतो.

अशाच पद्धतीने लढणाऱ्याच्या मानसिक आंदोलनाचा एक सुंदर आलेख कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी फिनिक्स मध्ये मांडलेला आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समुद्राची हाक… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ समुद्राची हाक… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

तो समुद्र मला बोलवत होता,

पण त्याची हाक माझ्याशिवाय      

कुणाला कळतच नव्हती!

 

ओढ लागली होती….

त्या भरती ओहोटीची, पांढऱ्या शुभ्र वाळूची…

तेथे वाळूचा किल्ला बांधायचा होता,

आणि लाटेच्या तडाख्याने पुसले जाणारे नाव लिहायचे होते..

 

थोड्याशा पाण्यात डुंबत  राहून..      

सागराचे ते विशाल रूप न्याहाळायचे होते!

उगवतीचा सूर्य नाही तर निदान

अस्ताला जाणारा सूर्य डोळ्यात साठवून ठेवायचा होता……

 

असे किती सूर्यास्त समुद्रावर पाहिले,

तरी मन तृप्त होत नाही…

तो केशरी,लाल गोळा स्वतःचे अस्तित्व,

त्या सागराच्या क्षितिजाशी  विलीन  करून,

त्यातच लोप पावताना पहायचा होता मला….

 

असे किती सूर्योदय- सूर्यास्त येतील..

पण गेला क्षण येत नाही ना…

ती खंत मी कुणाला, कशी सांगू?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संपली बाबा ओल… कवी : मुरारी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ संपली बाबा ओल… कवी : मुरारी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

शोध घेत पाण्याचा

सारेच चाललेत खोल

भूगर्भातून आवाज येतोय

‘संपली बाबा ओल’

 

उपसा करतोस वारेमाप

अडवीत नाहीस पाणी

किती वर्षं वागणार आहेस

असाच येड्यावाणी?

 

पाण्यावाचून सजीव सृष्टी

सारीच येईल धोक्यात

बघ बाबा शिरतंय का

काहीतरी डोक्यात

 

निसर्गाने दिले तरच

भांडे आपले भरेल

विचार कर नाहीतर

पाणी तयार कोण करेल?

कवी: श्री मुरारी देशपांडे

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवस कवींचे ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवस कवींचे ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

दिवाळी अंकाचे दिन आले

निवेदनांचे वृत्त पसरले

 चित्त कवींचे प्रसन्न झाले

रटपट, लटपट, खटपट करुनी अनेक कविता धाडतात..

 काही कविता प्रसिद्ध होती

परि अनेक साभार परतती

तरी कवी नाराज‌ न होती

इकडुन तिकडे तिकडून इकडे कविता प्रवास करतात.

 उत्साही कुणी करी  निवेदन

राज्यस्तरीय कविसंमेलन

नको निमंत्रण, नको मानधन

अध्यक्षांसह, प्रमुख पाहुणे , कविवर्यही जमतात.

 “कविता वाचा तीनमिनिटांची

जरुर नाही प्रस्तावनेची

ओळख सांगू नका कवीची “

नवसे, गवसे, हौसे ,खासे अपुली काव्ये वाचतात.

अशी अवस्था केविलवाणी

तरीही नाही निराश कोणी

उमेदीने, नव्या दमाने, पदरमोडिने

“काव्यांजली”प्रसवताती.

कविवर्य तसे पक्के असती

प्रथम आपुले काव्य वाचती

ते झाल्यावर निघून जाती

श्रोत्यांमध्ये, नात्यामधले मोजकेच उरतात.

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

जीवनाची ही न सोपी वाट आहे

रोज चकव्यांची नव्याने भेट आहे

 

जोडण्या नाती कुणाशी मी धजेना

आप्त..स्नेह्यांशीच माझी गाठ आहे

 

ठेविला ज्यांच्यावरी विश्वास होता

दाविली त्यांनीच आता पाठ आहे

 

‘ते’ लव्हाळे वेळ येता वाकणारे

सर्वकाळी झाड माझे ताठ आहे

 

ही भयाणी रात्र; मी निर्धास्त आहे

पौर्णिमेची रात्र पाठोपाठ आहे

 

प्रेम स्थायीभाव माझ्या अंतरीचा

राग; प्रीती सागरीची लाट आहे

 

खेळ स्वच्छंदी पतंगांचा म्हणे तो

(एकमेकांच्यात काटाकाट आहे)

 

प्रेम.. ताटातुट..दु:खे..ओढ..भीती

ही तुझी -माझी कथा भन्नाट आहे

 

तू नको देऊ न मागू उत्तरेही

मारली प्रश्नास मी त्या काट आहे

 

ही तुझी शाकारणी पाहून वाटे

शक्यता ‘त्या’ पावसाची दाट आहे

 

घास कष्टाच्या पुरेसा भाकरीचा

पंगतीचे ना हवे रे ताट आहे

 

जीवनाची ही अशी शाळा कशी रे

रोज दुःखी तास..दु:खी पाठ आहे

 

तोडुनी येतो प्रवाहाला जरी मी

विघ्नसंतोषी परंतू काठ आहे

 

टेकडीच्या पैल भेटीला उभी तू

राजरस्ता वाटतो हा घाट आहे

 

पंगती खोळंबल्या आहेत सा-या

एक तो माझा रिकामा पाट आहे

 

बोलती घोळून, त्यांना सर्व लाभे

मी असा हा, बोलणारा थेट आहे

 

हीन ही ना दीन लेखू आसवांना

आसवांनी घेतलाही पेट आहे.

 

देखणे..नाजूक आहे फूल; त्याचा

राठ (त्यासाठीच) ‌झाला देठ आहे

 

रे विकायाला मला नेऊ कुठे मी

एवढी श्रीमंत कोठे पेठ आहे ?

 

माणसांच्या या समुद्री दूरचे ते

मी निनावी… निर्जनी मी बेट आहे

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – आली गौराई लाडकी… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– आली गौराई लाडकी… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

आली गवर लाडकी

सोन्याच्या पाऊली

लिंबलोण उतरिते

घराची माऊली

आली गवर लाडकी

समृद्धीच्या पावली

आवडीने तीजसाठी

भाजी भाकरी केलेली

आली गवर लाडकी

 तिला घरात  फिरवू

 तिच्या वावरण्याने

 सुख सारे घरात भरवू

  आली गौराई लाडकी

   शंकरोबा सहीत

   शंकराचा मान राखू

   अन गौराई  सहित

   आली गौराई लाडकी

   दोन दिसाची पाहुणी

   तिला जपू या साऱ्यांनी

   घाला गोडधोड  करुनी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गौराई… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ गौराई… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(अष्टाक्षरी)

आली आली हो गौराई,

असे माहेरवाशीण !

स्वागत प्रेमे करु या,

आज असे तिचा सण!

 

लेक मायेची, मानाची,

किती कौतुक हो तिचे!

सजली नटली गौरी ,

शृंगार तिला ही साजे!

 

रांगोळी घातली पहा,

जले माझे अंगण!

सोनपावले देवीची,

ओटीत घालते खण!

 

नथ घातली नाकात,

पायी पैंजण सोन्याचे!

कपाळी लाविला टिळा,

कुंकू लावी सौभाग्याचे!

 

धनधान्य ते विपुल,

येई तिच्याच पावली!

सावली अखंड राहो,

माझ्या मुलाबाळांवरी!

 

इतुके माझे मागणे,

हट्ट  पुरव तू माझा

आशीर्वाद राहो  नित्य,

माझ्या संसारात तुझा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गौराई आल्यात सोन्याच्या पायी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

गौराई आल्यात सोन्याच्या पायी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

गौराई आल्यात सोन्याच्या पायी,

सख्या जमल्या जलाशयी,

पुजून गौर आनंदाने,

निघाल्या घरी मौनव्रताने

 

पाण्याचा तांब्या खुलला छान,

गौरीच्या रोपाचा भलताच मान,

आनंदाला उधाण येई,

उंबऱ्यावर औक्षण होई

 

श्रावणगौरीची गळाभेट झाली

 हळदी कुंकू  पावले सजली

दोघी बहिणी घरभर फिरल्या,

उदंड उदंड म्हणत राहिल्या,

 

सुंदर मुखवटे, उभ्या राहिल्या,

कोडकौतुके तृप्त जाहल्या

भाजीभाकरी,घावनघाटले,

नेवैद्याने तृप्त जहाल्या

 

दुसरे दिवशी पुरण,वरण

माहेरवाशीण आणि सवाष्ण

 हळदी कुंकू संध्याकाळी

नटल्या, सजल्या पोरी बाळी

 

तिसरे दिवशी सासरी निघाली,

मुरडीच्या करंज्या, ओटी भरली,

धनधान्याने कोठी भरली

गौराई सोन्याच्या पावली निघाली.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares