मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कॅनवास… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

कॅनवास ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(वनहरिणी)

मान्य की माझ्या ह्या जन्मीचा, कॅनवास हा अफाट नव्हता

सटवाईने लिहिला भाळी,विधीलेखही अगम्य नव्हता

*

तशी फारशी नव्हती वळणे,वाट बिकट वा नव्हती खडतर

भरकटणे वा चुकणेबिकणे,वहिवाटेला नव्हते मंजुर

*

जन्मजात पण रक्तामधला,होवु लागला मुंज्या जागा

हळूहळू मग चाकोरीला,ग्रासु लागली पिशाच्चबाधा

*

दावे तोडुन एक वासरू,कळपामधुनी गहाळ झाले

बेछूट आणि उदंड होवुन, झपाटलेल्या रानी आले

*

तसाच झालो बंधमुक्त मी,हद्दीमधुनी हद्दपारही

मोडुन तोडुन सर्व नकाशे,जरा जाहलो विश्वंभरही

*

अरुणप्रभेचे सूर्यास्ताचे,चढणीचे अन् उतरंडीचे

क्षणांत साऱ्या रंग मी भरले,काळजातल्या इंद्रधनूचे

*

रंगत गेला रंगसोहळा, कॅनवासही विराट झाला

मुळे पोचली अथांगात अन् शेंडा माझा गगनी भिडला !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

(सरत्या वर्षाला निरोप )

मित्रा तुला अलविदा म्हणतांना खूप गहिवरून आलंय रे

तू नव्याने आलास तेव्हा तुझं जंगी स्वागत झालं

एक आनंदतरंग घेऊन आलास तू माझ्या जीवनात

माझ्या सुखदुःखाच्या क्षणांशी एकरूप झालास

संकटसमयी माझं बळ शक्ती ठरलास

माझ्या आनंदात दिलखुलासपणे सहभागी झालास

तुझ्या कुशीत मी कधी अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली

तू आंजारलं गोंजारलंस प्रेमानं सांत्वन केलंस

… आणि आता क्षण येऊन ठेपलाय …. तुला निरोप देण्याचा

 

तुझ्याशी खूप बोलायचयं… काही सांगायचयं … पण तू तर निघालास

काय म्हणालास मित्रा ?.. काळ कोणासाठी थांबलाय ?

बरोबर आहे मित्रा तुझं ….

माझीचं सगळी गात्रं थकलीत, मीच नाही धावू शकले तुझ्या वेगाने

 

 

तू निघालास मित्रा पुन्हा कधीही परत न येण्यासाठी

पण तुझ्या आठवणी मी जपून ठेवल्यात ह्रदयकुपीत

अलविदा मित्रा…… अलविदा.. अलविदा.. अलविदा….

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीमद्‌भगवद्‌गीता : शेवटचा अध्याय : १८ : मोक्षसंन्यासयोग 

श्रीमद्भगवद्गीतेचे मराठी श्लोकात पद्यरुपात भावानुवाद करून तुमच्यापुढे सादर करायचा वसा अंगिकारला. इ. स. २०२२ च्या उत्तरार्धात या अभियानाला प्रारंभ केला. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही या नम्र निष्ठेने हे कार्य करीत आलो. भगवंतांची कृपा आणि त्यांचे पाठबळ याखेरीज हे शक्यच नव्हते. किंबहुने हे कार्य त्यांचेच आहे; मी तो केवळ त्यांच्या हातातील लेखणी! हे सद्भाग्य मला दिल्याबद्दल भगवंतांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आता अठराव्या अध्यायातील अखेरच्या श्लोकांचा भावानुवाद आजपासून सादर करून या अभियानाचा समारोप करीत आहे. शुभं भवतु।

अर्जुन उवाच 

संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्‌ । 

त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १ ॥ 

कथित अर्जुन 

महाबाहो ऋषिकेषा केशिनिसूदना मनमोहना

सन्यास त्याग तत्व पृथक जाणण्याची मज कामना ॥१॥

श्रीभगवानुवाच 

काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः । 

सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २ ॥ 

*
काम्य कर्माचा त्याग सांगती काही पंडित संन्यास

सर्वकर्मफलत्यागा इतर विचक्षण म्हणती संन्यास ॥२॥

*
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः । 

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३ ॥ 

*
विद्वान काही म्हणती कर्मा दोषी

त्याग करावा कर्माचा सांगती मनीषी

ना त्यागावी कधी यज्ञ दान तप कर्म

दुजे ज्ञानी सांगती हेचि सत्य धर्माचे वर्म ॥३॥

*
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम । 

त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४ ॥ 

*
प्रथम कथितो तुजसी विवेचन त्यागाचे

सात्विक राजस तामस प्रकार त्यागाचे

नरपुंगवा तुज माझे कथन दृढ निश्चयाचे

भरतवंशश्रेष्ठा घेई जाणुनी हे गुह्य त्यागाचे ॥४॥

*
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्‌ । 

यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्‌ ॥ ५ ॥ 

*
यज्ञदानतप नये त्यागू कर्तव्ये निगडित जीवनाशी

यज्ञदानतप तिन्ही कर्मे पावन करिती मतिमानाशी ॥५॥

*
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च । 

कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्‌ ॥ ६ ॥ 

*
कर्मांसह या अन्यही कर्मे करत राहणे कर्तव्य 

फल आसक्ती त्यागोनीया पार्था आचरी कर्तव्य ॥६॥

*
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते । 

मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७ ॥ 

*
नियतीदत्त कर्माचा संन्यास नाही योग्य 

मोहाने त्याग तयांचा हाचि तामस त्याग ॥७॥

*
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्‌ । 

स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्‌ ॥ ८ ॥ 

*
समस्त कर्मे दुःखदायक पूर्वग्रहासी धरिले

होतिल तनुला क्लेश मानुनी कर्माला त्यागिले 

असेल जरी राजस त्याग अनुचित ही धारणा

फल त्या त्यागाचे कधिही प्राप्त तया होईना ॥८॥

*
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । 

सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९ ॥

*
विहित कर्मे आचरणे हे जाणुनी देहकर्तव्य

आसक्ती फल मनी न ठेवुनी करणे कर्मकर्तव्य

नाही वासना कर्मफलाची करितो त्यांचा त्याग

पार्था मानिती त्यासी बुधजन सात्विक त्याग ॥९॥

*
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते । 

त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १० ॥ 

*
कुशल अकुशल कर्मांसह त जो करी न भेदभाव

सत्त्वगुणी मेधावी त्यागी निःसंशय तो मानव ॥१०॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ (१) विसर्जन आणि (२) घट बसले.. ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ (१) विसर्जन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित गणेश काव्यलेखन स्पर्धा)

(विषय — निरोप, वृत्तबद्ध रचना, वृत्त – लवंगलता)

निरोप तुजला देता देवा कंठ दाटून येतो

पुढल्या वर्षी लवकर यावे प्रार्थना तुला करतो

*

गणेश उत्सव आनंदाचा धामधुमीतच सरला

प्रत्येक दिवस भावभक्तिने प्रसन्नतेचा ठरला

*

गणेश आले पार्थिव मूर्ती प्रतिष्ठापना केली

सुंदर ऐसे मखर सजविले छान सजावट केली

*

दुर्वा पत्री फळा फुलांनी पूजा सुरेख सजली

पंचखाद्य अन मोदक पेढे प्रसाद पाने भरली

*

उच्चरवाने जयघोष करत आरत्या पठण झाले

दहा दिवस हे मंत्र भारले मन तृप्त तृप्त झाले

*

क्षणभंगुर हे जीवन आहे आनंदाने जगणे

कर्तृत्वाचे प्रसाद वाटप सकल जनासी करणे

*

हसत जगावे हसतच जावे कीर्तिरुपाने उरणे

उत्सवात तू हेच सांग*शी मनापासून शिकणे

*

आली अनंत चतुर्दशी ही मन जडावले आता

निरोप कसला बाप्पा सदैव अंतर्यामी असता

*

कुसंगती अन दुर्बुद्धीचे आज विसर्जन व्हावे

मन गाभारी परी गणेशा तू आसनस्थ व्हावे

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

? कवितेचा उत्सव ?

☆ (२) घट बसले..  ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(आदिमाया आदिशक्ती काव्यलेखन महोत्सव – दहा दिवसीय विशेष काव्यलेखन स्पर्धा)

(विषय — घटस्थापना – (अष्टाक्षरी))

चराचरी भरलेले

तत्व ईश्वरी सजले

नवरात्र घरोघरी

आज हे घट बसले ||

*

आई संस्थापित होते

आज ही घटस्थापना

शस्त्रसज्ज दुर्गामाता

उभी खलनिर्दालना ||

*

रूप घटाचे आगळे

दैवी अस्तित्व पेरते

आदिमाया आदिशक्ती

बीजातून अंकुरते ||

*

शारदीय नवरात्र

करू आईचे पूजन

मन शांत शांत होई

तिचे मंगल दर्शन ||

*

माझ्या देहाच्या घटात

पूजा देवीची मांडली

नेत्रज्योती तेजाळून

मनी आरती गायली ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सोनेरी सकाळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? सोनेरी सकाळ ? श्रीमती अनिता जयंत खाडीलकर 

निळ्याशार नभातूनी

सोनेरी कर फाकत 

गर्द अशा झाडीतून 

चैतन्य आणी रानीवनी 

 

मधुनच डोकावते

निळे कौलारू घर

शेजारीच डोकावते

लाल कौलारू घर 

 

हिरव्या माडाच्या बनात

कुठे नारळ डोकावती

सूर्य स्रोत फैलावत 

उजळून टाकी पातीपाती 

 

मधूनच डोकावती

काळे छप्पर, पिवळी भिंत 

सौंदर्या आली भरती

वर्णना नसे अंत

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ।।जीवेत शरद: शतम।। ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

।।जीवेत शरद: शतम।। ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

।।जीवेत शरद: शतम।।

डॉ. तारा भावाळकर – शुभेच्छा

आयुष्याची ८५ वर्षे

म्हंटलं तर वाटचाल प्रदीर्घच

पण, चालणे कधी कसे झाले कळलेच नसेल.

कधी पाऊल उचलताना जड झाले असेल.

पायाखालची माती कधी बेसुमार तावली असेल

कधी मातीच बुक्का बनून पायावर गांधली असेल.

कधी टोचले असतील काटे टचकन डोळ्यात पाणी आणीत

कधी फुलली असतील फुले सुगंधाने मन वेढीत

कितीदा आले असतील झेपावत, व्यथा- वेदनांचे सुसाट वारे

तुमच्या खंबीर दृढ मनावर थडकून मुकाट फिरले असतील सारे

कितीकांना दिला असेल घासातला घास तुम्ही

कितीकांना दिला असेल चालण्यासाठी आधाराला हात तुम्ही

कुणाचे ओझे घेतलेत खांद्यावर

कुणाचा आनंदही तुमच्या मुखावर

कितिकांच्या दु:खाने तुमचे डोळे पाणावले असतील

कितिकांचे कष्ट तुमच्या खांद्याने झेलले असतील.

आता वाटचाल अगदी संथ

मनही भारावलेले तृप्त

जीवनाच्या या वळणावर

जगन्नियंता आशीर्वादाचे बोल

तुमच्यासाठी उद्घोषित असेल

कल्याणमस्तु…! कल्याणमस्तु…!

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक संवाद : ताराबाई भावाळकरांशी ☆ सुश्री नीलम माणगावे ☆

सुश्री नीलम माणगावे

? कवितेचा उत्सव ?

 एक संवाद : ताराबाई भावाळकरांशी ☆ सुश्री नीलम माणगावे ☆

मी म्हणाले, ‘एकट्या कशा हो रहाता तुम्ही?’

‘एकटी कुठे?’ त्या सहज म्हणाल्या,

‘मित्र-मैत्रिणींचा मेला असतोच की दिवसभर!’

‘पण रात्री… ’ मी पुन्हा विचारते, ‘ एकटं नाही वाटत?’

‘पुन्हा तेच….. ’ त्या हसून म्हणाल्या, ‘ एकटं का वाटावं?

पुस्तकांचा सहवास किती मोठा! त्यांचे लेखकच काय?

त्यातली पात्रंसुद्धा कुठे झोपू देतात?

सतत बोलतात. चर्चा करतात.

त्यांच्या शंका-कुशंका संपतच नाहीत.

पात्रे तर वेळी-अवेळी कधीही

हसतात – हसवतात, रडतात-रडवतात.

‘आणि लोकसाहित्यातील स्त्रिया?’

‘त्या तर सोडतच नाहीत.

‘सतत गाणी गातात… गोष्टी सांगतात.

हाताला धरून फेर धरतात.

दळायला लावतात. कांडायला धरतात.

रांगोळीच्या रेषा होतात. जगण्यात रंग भारतात.

आणखी काय हवं ? ‘

 

पुन्हा तो सोशल मीडिया…. तो स्वस्थ कुठे बसू देतो?

अगं, हातात काहीच नसताना,

बंदीगृहात वीस-वीस, पंचवीस- पंचवीस वर्षं

राहिलेल्या नेत्यांनी

अंधार्‍या, तुटपुंज्या जागेत, इतिहास निर्माण केला.

मग मी स्वत:ला एकटं का समजावं?

एकटी असले तरी एकाकी नाही हं मी!

 

तिकडे विठ्ठल साद घालतो.

तुकाराम भेटत रहातो.

 

गहन अंधारात मुक्ताई बोट धरते.

 

सावित्रीबाई दिवा होते.

हे सारे सोबत असताना

मी एकटी कुठे?

शिवाय, वाचन, आकलन, चिंतन, मनन, लेखन

मला फुरसत कुठे आहे?’

‘खरं आहे. ‘ एखाद्या सदाबहार झाडाकडे बघावे,

तशी त्यांच्याकडे बघत मी म्हणाले,

‘तुम्ही तर अक्षर – सम्राज्ञी !

सम्राज्ञी कधी एकटी नसते.

सारा समाज तिचा असतो.

 

‘अवघा रंग एक झाला… ’ असं तिचं जगणं.. ’

‘एवढही काही नाही गं’

त्या नम्रपणे म्हणाल्या.

‘तुम्हा सर्वांचं प्रेम ही माझी संपत्ती

अक्षरधन हे माझं ऐश्वर्य

हेच माझं… माझ्या काळजातलं बळ

माझा श्वास… माझा विश्वास

माझ्यासाठी खास

 

मी बघतच राहिले.

आणि माझ्या लक्षात आलं,

या एवढ्या कणखर कशा?

त्यांच्याच तर आहेत सार्‍या दिशा

 

©  सुश्री नीलम माणगावे

संपर्क – जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर, मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तारा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ तारा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

गोदावरीच्या काठावरूनी सांगत आला वारा

कृष्णेकाठी तळपत आहे साहित्यातील तारा

*

जनस्थानाचे सोडुन बंधन

गणरायाला करुन वंदन

शब्दांकूर ते येता उगवून

पानोपानी आला बहरून अक्षर मोगरा

*

परंपरांच्या मूळात जाऊन

लोकजीवनाला अभ्यासून

ग्रंथांमधले ज्ञान तपासून

लोककलांचे पूजक बनुनी जपले कला मंदिरा

*

अज्ञानाचा बुरखा फाडून

कण ज्ञानाचे अखंड वेचून

स्पष्ट मांडण्या मते आपली कधीच नाही कचरला

*

ओवी, गीते, लोककथा कथन

अभिनय साथीला अभिवाचन

जीवंत तुम्ही आहे ठेवली महाराष्ट्राची लोकधारा

*

आता गाठणे आहे दिल्ली

अभिजात मराठी सुखावली

कर्तृत्वाची हीच पावती जाहला गौरव आज खरा

कृष्णेकाठी तळपत आहे साहित्यातील तारा.

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #267 ☆ भेटतो चांदवा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 267 ?

भेटतो चांदवा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

माझ्या प्रीतीच्या फुलात, रात्री पाहतो चांदवा

आकाशात नाही तरी, आहे भेटतो चांदवा

*

मीही भाग्यवंत आहे, चांदण्यांच्या सोबतीने

आहे अंगणात माझ्या, पिंगा घालतो चांदवा

*

आडवाटेचा हा मार्ग, नाही साथ सोडलेली

रोज सोबतीने माझ्या, रस्ता चालतो चांदवा

*

काही दिवसांचा खाडा, ठेवे अंधारात मला

चंद्र किरणेही स्वतःची, देणे टाळतो चांदवा

*

आकाशाच्या गादीवर, त्याला झोप येत नाही

घरी जाण्याच्याचसाठी, घटका मोजतो चांदवा

*

माझी आठवण ठेवली, नाही दुर्लक्षित झालो

माझ्या दारात येऊन, कायम थांबतो चांदवा

*

हाती त्याच्या ना घड्याळ, तरी पाळतो तो वेळा

कामावरती वेळेवर, आहे पोचतो चांदवा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जुगाराचा घोडा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जुगाराचा घोडा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

उधळून गेला

आयुष्याचा घोडा

तबेल्याची संगत

मालकाचा जोडा.

*

रंगलेला जीव

शर्यतीचा पक्का

मैदानात धाव

जुगाराचा एक्का.

*

संघर्षात सुख

अनुभवे खुप

नियतीचे बंध

जीवनाचे रुप.

*

अमापाची गर्दी

लौकिकाचा राजा

सोबतीचे पान

गुलामीची सजा.

*

फसलेला डाव

असूरांची माया

वेळेसाठी घोडा

पटावर काया.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares