(कृपया प्रेम हा विषय कवी कालिदास यांचेपासूनचा प्रेमभाव अभिव्यक्ती व हळवे मन, विरह अशा वास्तवातून सत्य कल्पनेचा अभ्यासात्मकसुध्दा विषय आहे तरुण मनाला शाब्दिक ताकदीने तत्वांचा प्रबंध लिहायला लावणारा. त्यामुळे या कवितेकडे मी कवी म्हणूनच वाचकांनी दृष्टीकोन ठेवावा.)
☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
श्रावण ! प्रत्येक कवीचा आवडता विषय ! अगदी बालकवींच्या ” श्रावणमास “ या कवितेपासून तर आजच्या अगदी नवोदित कवी पर्यंत पिढी दरपिढी अनेक कवितांमधून श्रावण रसिकांच्या भेटीला येतोच आहे. मग गझलकार तरी याला अपवाद कसा असणार ? कारण आधी गझलकार हाही कवीच आहे ! फक्त त्याने गझलेच्या तंत्राकडे म्हणजेच शरीरशास्त्राकडे अतिशय गंभीरपणे बघायला हवे ! केवळ मंत्राच्या मागे लागून जर गझलेच्या आकृतीबंधाकडे दुर्लक्ष झाले तर ती कविताही राहत नाही आणि गझलही होत नाही , हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करीत आहे. गझलेतील लय , यती आणि एकूणच आकृतीबंध सांभाळून वाचकाला आवडणारी रचना / गझल देणे हे साधे सोपे नसते ! यासाठी प्रचंड मोठा शब्दसाठा , किमान व्याकरणाची माहिती , शुद्धलेखन याची गरज असतेच . पण त्याच बरोबर भौगोलिक / प्रादेशिक जाणीवा असणे हे सुद्धा गरजेचे असते ! अन्यथा आषाढात रिमझिम पाऊस आणि श्रावणात कोसळधारा कवितेतून बरसतात ! काही गझलांमधे उन्हाळ्यात प्राजक्त फुलतो तर पावसात पानझड होते . हे हास्यास्पद प्रकार होऊ नयेत याचीही काळजी गझलकाराने घ्यायला हवी !
सध्या आणखी एक प्रकार बघायला मिळतो की , हवी तेवढी सूट घेऊ नवोदित गझलकार गझल लिहितात ! अगदी एक शेर झाला की त्यात भरीचे ४ शेर घालून गझल पूर्ण करून समाज माध्यमावर पोस्ट करतात ! बरं त्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर ” अमुक तमुक प्रस्थापित गझलकाराने ही सूट घेतली होती म्हणून मीही घेतली !” हे सांगतात . यावर काय बोलणार ? आम्हीच आमची जबाबदारी ढिसाळपणे वापरत असू तर नवीन लोकांना कां दोष द्यायचा ?
गझल तंत्राधिष्ठीत पण काव्यात्म लेखन प्रकार आहे ! गझल असते किंवा नसतेच ! त्यात ” गझले सारखे किंवा गझलवजा ” म्हणण्याचा प्रघात आताशा रूढ होत आहे. याच्याशी अनेक कारणे निगडीत आहेत , त्यातील ” गझलगुरू ” हाही प्रकार महत्वाचा आहे. ते गझलतंत्र तर सोडाच , पण चक्क गझल शिकवतात . (?) त्यामुळे आज गझलेची संख्यात्मक वाढ होत आहे , पण गुणात्मकतेची काळजी वाटते ! अष्टाक्षरी , ओवी , अभंग , गवळण , भावगीत , भक्तीगीत , भारूड , पोवाडा , पाळणे , आरत्या , श्लोक , आर्या , दिंडी असे अनेक प्रकार मान्य करणाऱ्यांना गझलचे तंत्रच तेवढे का खटकते / का खुपते हा अभ्यासाचा विषय आहे ! त्यावर कृत्रिमतेचाही आरोप होतो . असो !
हीच बाब विषयांशीही निगडीत आहे . आज जुने , नवे जेवढे हात गझल लिहू लागले आहेत , त्या गझलेतला श्रावण शोधावाच लागतो . समाज , सुधारणा , भूक , दारिद्रय यांच्याच परीघात रमलेली गझल प्रेम , माया , निसर्ग यापासून दूर जाते आहे की काय ही भिती वाटते . पण तेव्हाच काही दादलेवा शेर वाचले की कळतं ” पेला अर्धा भरला आहे “.
मिठीत होती अधीरता अन् दिठीत होता साजण
सायंकाळी . ढगात आला श्रावण
हा श्रावणाचा माझाच एक शेर आहे ! अस्ताचलास जाणारा सूर्य , त्याची ढगावर पडलेली किरणे आणि उमटलेलं इंद्रधनुष्य , ही श्रावणाची ओळख चट्कन पटते ती सायंकाळी .
तुझ्या फुलांचा सडा पहाया रोज अंगणी
श्रावण येतो मज भेटाया रोज अंगणी
कोल्हापूर येथील श्री .नरहर कुलकर्णी यांचा हा राजस शेर मनाला भावतो !
हासरा नाचरा श्रावण कुसुमाग्रज दाखवतात ! तर ” ऋतू हिरवा ऋतू बरवा या ओळीनी श्रावण वेगळाच भासतो !
समीक्षक प्रकाश क्षीरसागर त्यांच्या एका शेरात म्हणतात ,
गझलेस भावलेला श्रावण किती निराळा
सृष्टीस भाळलेला श्रावण किती निराळा
श्रावण सुरू झाला की कवीच्या प्रतिभेला धुमारे फुटू लागतात , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . नयनरम्य श्रावण , रंगाने , गंधाने आपल्याला मोहून टाकतो . अशाच अर्थाचा प्रसाद कुलकर्णी यांचा एक शेर बघा !
तनही बरवा मनही बरवा श्रावण हिरवा
धुंद करी ही बेधुंद हवा श्रावण हिरवा
श्रावणावर अनेक कविता आहेत पण गझल मात्र मोजक्याच आहेत . त्यातही तुरळक शेर सापडतात . नवोदित आणि जेष्ठ गझलकारांना असे सुचवावेसे वाटते की सृष्टीतला कण न् कण आपल्या काव्याचा विषय होऊ शकतो . फक्त ती दृष्टी हवी ! त्यामुळे त्याच त्या विषयांच्या रिंगणात फिरण्यापेक्षा नवनवे विषय घेऊन आपली गझल पूर्ण करावी ! आज नवोदित गझलकारांमध्ये काही आश्वासक हात नक्कीच आहेत . त्यामुळे तंत्र सांभाळून गझलेचा मंत्र सांभाळला जात आहेच . एवढेच नाही तर नाण्याला जशा दोन बाजू असतात , आणि दोन्ही खणखणीत असाव्या लागतात , तीच गोष्ट गझलेची आहे . तंत्र मंत्र योग्यच असायला हवे एवढेच नाही तर नाण्याला एक तिसरी बाजू म्हणजे एक कडापण असते . अत्यंत गरजेची ! तशीच मराठी गझलेची कडा म्हणजे , मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन सांभाळून , निर्दोष तंत्रात आलेली गझलेतली गझलियत .
या तीनही बाजुंचा सारासार विचार करून गझलेकडे वळणारे बघितले की ,