मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वारी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ वारी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पंढरपुरी वारी जाई ,

विठ्ठलाच्या दर्शनाला l

जाती पाय वेगे वेगे,

आतुरले ते भेटीला …..१

 

   विठू राहे पंढरीत ,

   जमे भक्तांचा मेळावा l

   माहेराची ओढ जशी,

   लागते लेकीच्या जीवा …..२

 

चहूबाजू येती सारे,

 टाळ, चिपळ्या घेऊन l

विठ्ठलाची गाणी गाता,

 मन जाई हे रंगून …३

 

    आषाढाची वारी येता ,

      वारकऱी मन जागे l

   भेटीस आतुर होई,

     पांडुरंगी ओढ लागे  …४

 

 वारी निघे पंढरीला,

 कानी टाळांचा गजर l

वेग येई पावलांना,

  राऊळी लागे नजर ….५

 

    जसा जसा मार्ग सरे,

     मन होई वेडे पिसे l

    डोळ्यापुढे मूर्ती येई,

     विठ्ठल सर्वत्र दिसे ….६

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 137 ☆ अभंग – तुझी माझी मैत्री… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 137 ? 

☆ अभंग – तुझी माझी मैत्री… ☆

तुझी माझी मैत्री, मध गोड जसा

शुभ्र मऊ ससा, आकर्षक.!!

 

तुझी माझी मैत्री, लोणचे आंब्याचे

सदैव कामाचे, सर्व ऋतू.!!

 

तुझी माझी मैत्री, चांदणे टिपूर

आहे भरपूर, जागोजागी.!!

 

तुझी माझी मैत्री, भारी अवखळ

तैसीच चपळ, स्फूर्तिवंत.!!

 

तुझी माझी मैत्री, अशीच टीकावी

कधी नं सुटावी, मैत्री-गाठ.!!

 

तुझी माझी मैत्री, नाव काय देऊ

किती सांग गाऊ, मैत्री गीत.!!

 

तुझी माझी मैत्री, राज हे मनीचे

शब्द अंतरीचे, भावनिक.!!

 

कवी राज म्हणे, तुझी माझी मैत्री

मज आहे खात्री, सर्वोत्तम.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-13… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-13…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

मजकरवी गुरूमाऊली निवृत्तीने

न केवळ तुज उपदेशिले प्रेमाने

मजला ही दिधलासे आत्मानंद

स्वानुभवाच्या खाऊचा परमानंद॥६१॥

 

आता या कारणे आत्मज्ञान मिळता

डोळसपणे आपण परस्परा पाहता

दोघांमधला भेदाभेद न उरला

शाश्वत भेटी आत्मानंद पावला॥६२॥

 

ज्ञानामृत या पासष्ट ओव्यामधले

ज्याने त्यां दर्पण करुनि चाखिले

निश्चये पावेल शाश्वत आत्मसुख

सोडुनि देता अशाश्वत इंद्रियसुख॥६३॥

 

दिसते ते नसते, कारण ते नष्टते

नसते ते असते, परि नच दिसते

आत्मस्वरूपा त्या पाहण्या

गुरूपदेश घ्यावा ज्ञान वेचण्या॥६४॥

 

जाण तू निद्रेपलिकडे जे झोपणे

समजुनि जागृती पलिकडे जागणे

तुर्यावस्थेमध्ये या ओव्या रचणे

घडले गुरूकृपे ज्ञानदेव म्हणे॥६५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

निवेदन- आज याबरोबरच चांगदेव पासष्टी हे सदर संपत आहे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंढारीची किर्ती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पंढारीची किर्ती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

वैष्णवाची नांदी

अंतरित मुर्ती

भेदभाव नसे

तिन्हीलोकी किर्ती.

 

अरे पांडुरंगा

पवित्र हि कृपा

भक्ता कर्ममुक्ती

मुक्त सर्व शापा.

 

तुझ्या भेटीसाठी

जन्म जीवनाचा

श्वास  पांडुरंग

धन्य गाठीभेटी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ माझा विठ्ठल… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ माझा विठ्ठल… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

माझा विठ्ठल विठ्ठल

हरी नामाचा गजर

दिंडी संगे वारकरी

विठू भेटीला अतुर

 

दिंडी चालते चालते

भक्ती भावात तल्लीन

टाळ मृदुंग चिपळ्या

गोड भजन कीर्तन

 

वाट सरते सरते

ओढ भेटीची लागते

चंद्रभागा बोलाविते

कष्ट सारी निवविते

 

पाया रचितो ज्ञानोबा

होतो कळस तुकोबा

साधू संत सारे येती

साद घालितो चोखोबा

 

माझी पंढरी पंढरी

देव उभा विटेवरी

माय विठू रखुमाई

जसा विसावा माहेरी

 

अरे सावळ्या सावळ्या

रूप तुझे पाहुनिया

तृप्त होते मन माझे

मोक्ष मिळो तुझ्या पाया

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सराव… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– सराव…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

शिक्षण आता बास झालं  

कार्यक्रम  करावे म्हणतो

माईक धरून गाण्याचा

म्हणून सराव करतो.

रसिकांसमोर तसंच जाणं 

खरं म्हणजे धाडस आहे

लपून छपून सराव करणे

सध्या माझे चालू आहे

माईकशी मेळ जमला की

कार्यक्रम  करणार  बरं 

ऐकायला सगळे याल ना !

सांगा अगदी खरं  खरं  

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पांडुरंगा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पांडुरंगा…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(व्योमगंगा)

पंढरीला वैष्णवांची मांदियाळी पांडुरंगा

चंद्रभागा देवतांचे पाय क्षाळी पांडुरंगा

 

भक्त आले संत आले लाभ घेती  दर्शनाचा

आत्मरंगी रंगले ते देत टाळी पांडुरंगा

 

मोक्षप्राप्ती मागताना एकवेडी आस आहे

काळजाच्या अंतरंगी मूर्त काळी पांडुरंगा

 

जीवनाची बाग आहे तू दिलेले दान येथे

फुलव तू ती काळजीने होत माळी पांडुरंगा

 

तूच दाता तूच त्राता देह माझा चंदनाचा

घातली मी माळ कंठी गंध भाळी पांडुरंगा

 

दान आता मागतो मी जगवण्याला सत्व माझे

नाचताना वाळवंटी देत हाळी पांडुरंगा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 158 – नको गर्व वेड्या ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 158 – नको गर्व वेड्या ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

नको गर्व वेड्या

वृथा या धनाचा।

असू देत ओला

 तो कोना मनाचा।

 

खुळी द्वैत बुद्धी

तुला साद घाली।

अथांग मनाला

कुठे जाग आली।

 

हा पैसा नि सत्ता

असे धूप छाया।

तू धुंदीत यांच्या

नको तोलू माया।

 

लाखो सिकंदर

इथे आले गेले।

सत्तेमुळे कोणा

अमरत्व आले।

 

नको देऊ थारा

मनाच्या तरंगा।

विवेकी मनाला

धरी अंतरंगा।

 

बोली मनाची ही

मनाला कळावी।

निस्वार्थ हळवी

सरम जुळावी।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थना… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ प्रार्थना… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

प्रार्थना म्हणजे ती नाही,

जी आपण हात जोडून,

गुडघ्यावर बसून देवाकडे काहीतरी

मागण्यासाठी केलेली असते.

 

 सकारात्मक विचार करून,

लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं,

ही खरी प्रार्थना!

 

जेव्हा तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी,

अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता,

ती प्रार्थना असते!

 

जेव्हा आपण लोकांना निरोप देताना,

त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो,

ती प्रार्थना असते!

 

जेव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो,

ती प्रार्थना असते!!

 

जेव्हा आपण कोणाला तरी,

मनापासून माफ करतो,

ती प्रार्थना असते!!

 

प्रार्थना म्हणजे कंपनं असतात.

एक भाव असतो.

एक भावना असते.

एक विचार असतो.

प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो,

मैत्री, निखळ नाती, हे सगळं

म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!

 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #180 ☆ पदोपदी वारी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 180 – विजय साहित्य ?

🌼 पदोपदी वारी…! 🌼 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आत्मानंदी बोध, आळंदीचे धाम

मुखी हरीनाम, शुभारंभी…! १

 

जन्म जन्मांतरी, नष्ट‌ होई पाप

पुण्याचा प्रताप,  पुण्यशील..! २

 

पालखी विठोबा , पुणे शहरात

माहेरपणात, रमे वारी…! ३

 

अष्टांग योगाचा, दिव्य दिवे घाट

भक्ती रस लाट, उचंबळे…! ४

 

सप्तचक्र‌ ताबा, प्राणायाम ठेवा

सोपानाची सेवा,‌सासवड…! ५

 

जिंकतो इंद्रिये, विनासायास

जेजुरी निवास, मोक्षदायी…! ६

 

जिव्हाळा‌ संपन्न, वाल्ह्याचा मुक्काम

प्रेमळ विश्राम, पालखीचा..! ७

 

वैष्णवांसी लाभे , आनंदाचा कंद

सज्ज हे लोणंद, स्वागतासी…! ८

 

तरडगावात, ब्रम्हानंदी सुख

चिंतनी सन्मुख, पांडुरंग…! ९

 

ब्रम्ह पुर्ण सत्य, फलटणी  बोध

जीवनाचा शोध, संकीर्तनी..! १०

 

द्वंद्वमुक्त होई, बरड निवासी

वारीचा प्रवासी, सुजलाम..! ११

 

नातेपुते गावी, मुक्त मोहातून

व्यक्त श्वासातून, पांडुरंग…! १२

 

ज्ञानाची साखळी, माळशिरसात 

भक्ती अंतरात, नवविधा…! १३

 

नको‌ वेळ वाया, सांगे वेळापूर

दिसे अंतपूर, पंढरीचे…! १४

 

वाखरी मुक्कामी, वाचासिद्ध वाणी

प्रासादिक गाणी,  ठायी ठायी..! १५

 

पांडुरंगमय, होई वारकरी

कृपाछत्र धरी, पांडुरंग…! १६

 

केला नामोल्लेख,पदोपदी वारी

सुखदुःखे हारी, मुक्कामात..! १७

 

कविराज चित्ती, प्रतिभेची मात्रा

घडविली यात्रा, प्रासादिक..! १८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares