मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खुशाल टाळा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ खुशाल टाळा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

खुशाल टाळा टाळणार पण मजला कुठवर

चुकवा रस्ते, द्या गुंगारा

असेन मी तर हर वळणावर

*

नगरीमधुनी खुशाल तुमच्या करा बहिष्कृत

वेसपारच्या वाड्यावस्त्या

उत्सुक माझे करण्या स्वागत

*

लपवाछपवी फसवाफसवी सोपी नाही

क्ष-किरणांच्या नजरेमधुनी

दगा आतला सुटणे नाही

*

गृहीत धरणे सदाकदा मज धोकादायक

प्रशांत सागर परी तळाशी

वडवानल मी खात्रीलायक

*

कृतघ्नतेने तुमच्या भरला गळवट रांजण

आज क्षमेचे शांत चांदणे

उद्या कदाचित अग्निप्रभंजन

*

सोन्याची ही तुमची लंका तुमचे भूषण

अभिमानी ही माझी फकिरी

माझ्यासाठी माझे त्रिभुवन!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

२५. ११. २०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्तव्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ कर्तव्य सुश्री नीलांबरी शिर्के 

काही जळते

जगास कळते

कारण तेथून

येतो धूर

 

प्लॅस्टीक कचरा

गटारी तुंबता

तिथल्या नदिला

येतो पूर

 

 शासनाने

सर्व करावे

असाच असतो

आपला सूर

आपले कर्तव्य

विसरून आपण

 तया पासून

रहातो दूर

 

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ६१ ते ७०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ६१ ते ७०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । 

भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१ ॥ 

*

सकल चरांचा देह यंत्र आत्म्याचे 

सुकृतानुसार कर्म करुनी घ्यायाचे

ईश्वरमाया चालविते कायायंत्राला

हृदयी तो स्थित राही कर्म करायाला ॥६१॥

*

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । 

तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥ ६२ ॥

*

सर्वभावाने शरणागत परमेशा होई

तया कृपेने परम शांती स्थान प्राप्त होई ॥६२॥ 

*

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‍गुह्यतरं मया । 

विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३ ॥ 

*

गुह्यात गुह्यतम श्रेष्ठ ज्ञान कथिले पार्था मी तुजला

विचार अन्ती कर्म करावे स्वीकार जे तव इच्छेला ॥६३॥

*

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः । 

इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्‌ ॥ ६४ ॥ 

*

तू मजसि अतिप्रिय यास्तव हितवचन मी सांगेन तुला

गुह्यतम सकल ज्ञानामधील परम रहस्य कथितो तुजला ॥६४॥

*

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । 

मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५ ॥ 

*

माझ्याठायी गुंतवुनी मन भक्त अनन्य होई तू माझा

पूजन करी मम प्रणाम करी मज जन्म धन्य हो तुझा

करशील याने प्राप्त मजला सत्य आहे माझे वचन

अतिप्रिय मजला तू असशी जाणौन घेई हे अर्जुन ॥६५॥

*

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । 

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ ६६ ॥ 

*

धर्म सर्व त्यागूनीया तू केवळ मज येई शरण

शोकमुक्त हो पापमुक्त करुनी मोक्ष तुला मी देईन ॥६६॥

*

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । 

न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७ ॥ 

*

अभक्त असुनी तपरहित जो त्यास ज्ञान हे देउ नको

मनी ज्यास ना ऐकायाचे त्यास शास्त्र हे कथू नको

अनिष्ट दृष्टी माझ्या ठायी त्यास कदापि बोलू नको

अपात्र तयासी दिव्य ज्ञान हे पार्था कधिही देऊ नको ॥६७॥

*

य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति । 

भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८ ॥ 

*

परमभक्त माझा कथील गीतारहस्य मद्भक्तांसी

वचन माझे माझी प्राप्ती निःसंशये होईल तयासी ॥६८॥

*

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः । 

भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९ ॥ 

*

कार्यमग्न मम प्रिय कार्ये तो श्रेष्ठ अखिल जगती

तयापरीस मज अधिक कोणी प्रिय ना या जगती ॥६९॥

*

अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः । 

ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७० ॥ 

*

धार्मिक गीताशास्त्र संवाद उभयांमधील आपुला

श्रद्धेने जो पठण करील पोहचेल कार्य मजला

यज्ञाद्वारे ज्ञानाच्या लाभेल तयाची अर्चना मला

घोषित करितो मी धनंजया होईन प्राप्त मी तयाला ॥७०॥ 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द पक्षी…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द पक्षी…! ☆ 

☆ 

मेंदूतल्या घरट्यात जन्मलेली

शब्दांची पिल्ल

मला जराही स्वस्थ बसू देत नाही

चालू असतो सतत चिवचिवाट

कागदावर उतरण्याची त्यांची धडपड

मला सहन करावी लागते

जोपर्यंत घरट सोडून

शब्द अन् शब्द

पानावर मुक्त विहार करत नाहीत

तोपर्यंत

आणि

तेच शब्द कागदावर मोकळा श्वास

घेत असतानाच पुन्हा

एखादा नवा शब्द पक्षी

माझ्या मेंदूतल्या घरट्यात

आपल्या शब्द पिल्लांना सोडुन

उडून जातो माझी

अस्वस्थता

चलबिचल

हुरहुर

अशीच कायम

टिकवून ठेवण्या साठी…!

© श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्याला… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्याला… ☆ श्रीशैल चौगुले ☆

प्याला भरुन दे साकी

आज होईन मी तृप्त

काल घडून जे गेले

स्मृती पेईन अतृप्त.

*

धुंद कैफात हे मन

हृदया भय का, पिण्या

नव्या नशेची हि वेळ

तारुन नेता कारुण्या.

*

मैफल रंगात आली

तोल सावरित हाला

आणखी भरता साकी

अजाण भविष्य प्याला.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चहाबोध… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चहाबोध... ? सौ शालिनी जोशी 

प्रभाते मनी चहा चिंतीत जावा l

पुढे मुखे तोचि प्राशन करावा l

चहापान हे थोर सांडू नये रे l

करी तोचि तो सदा धन्य हो रे ll १ ।। 

*

जो आलंयुक्त चहापंथेची जाये l

तो तरतरीत तत्काळ होये l

म्हणोनि चहाचा आळस नको रे l

अतीआदरे सेवना योग्य तो रे Il २ ll

*

सदा सर्वदा प्रिती चहाची धरावी l

सर्व निराशा चहाकपी बुडवावी l

परी अतीचहा सर्व दु:ख करी रे l

विवेके मंत्र हा विसरू नये रे ll3ll

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 260 ☆ कोण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 260 ?

☆ कोण ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कुसुम, कोमल,

कामिनी कुंजवनीची,

कौतुक करावे किती,

कलिका कुजबुजती!

कादंबिनी,

कोकिळ कूजती !

काननी केवडा,

केतकी, कुंद कोमेजती!

 कल्पना कृतीत,

कविता, कादंबरी!

कुठली कस्तुरी ??

कार्तिकातली कुमुदिनी!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिवजयंती विशेष – जनतेचा कैवारी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ शिवजयंती विशेष – जनतेचा कैवारीसौ. वृंदा गंभीर

जिजाऊ पोटी हिरा जन्मला

नाव ठेवले शिवाजी

वदंन माझे शिवरायाला

मारली स्वराज्याची बाजी

*

स्वप्न पाहिले स्वराज्याचे

मर्द मावळे जमविले

शंख फुकले लढाईचे

एक एक करून किल्ले मिळविले

*

प्रताप, राज, तोरणा, पुरंदर

जोडीला होते नाईक

जाधव, मोहिते, निंबाळकर

झाले जनतेचे पाईक

*

सह्याद्रीचा सिंह काडडला

घोड्यावर स्वार होऊनी

ताकदीने वैऱ्यांशी भिडाला

भगवा फडकवला राजांनी

*

रायगडावर तोरण बांधले

शिव छत्रपती राजा झाले

जनतेचा कैवारी म्हणू लागले

शिवबा शिवतारी ठरले

*

माँ साहेबांचे स्वप्न पूर्ण केले

सह्याद्रीला कवेत घेतले

स्वामी रामदासांचे आशीर्वाद

रायगडावर स्थिर झाले

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागा सुखदायी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जागा सुखदायी ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

उजळायाच्या कधी सावल्या

भवती अंधाराच्या

तुडवत आलो खूप लांबवर

वाटा दैवगतीच्या

अजून नाही भाग्य लाभले

झाल्या तिन्हीसांजा

मीच लागलो मागे आता

दुर्धर दुर्भाग्याच्या

 

तोल सावरत आलो धावत

काळा संगे जेंव्हा

तेंव्हा सा-या संपत गेल्या

भेटी दिलदारांच्या

चित्तथरारक असते खेळी

आपल्या आयुष्याची

सांभाळावे तिला लागते

वाटेवर जगण्याच्या

 

चालतजाव्या निवांत सा-या

चाली संसाराच्या

नको कधी ही बिघडायाला

नादाने भलत्यांच्या

जमेल जेव्हा असे वागणे

साधे भोळे तेव्हा

दिसतील जगा समोर तुमच्या

सुखदायी जगण्याच्या

 

किती लागलो होतो मागे

क्षणिक आनंदाच्या

या देहाच्या होत्या खेळी

केवळ हव्यासाच्या

जेव्हा कळले तेंव्हा पडली

आत्म्यालाही भ्रांती

पुन्हा जाहलो स्वाधीन तेव्हा

अखेर वास्तवतेच्या

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

माणसाचा आणि निसर्गाचा काहीही संबंध नाही असे समजणारी माणसे समाजामध्ये आहेत. पण ती माणसे हे विसरुन जातात की माणूस हाच मुळी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव किंबहुना आपली संस्कृतीच निसर्गावर आधारलेली आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे कवी, कवयित्री, चित्रकार यासारख्या कलाकाराला स्वतःच्या आयुष्याकडे पाहतानाही निसर्ग हा आठवतोच! निसर्गातील प्रतीके वापरुन मानवी जीवनाचा अर्थ व्यक्त करणारी अनेक काव्ये, साहित्यकृती आपण वाचल्या आहेत. अशीच एक रुपकात्मक कविता वाचनात आली. ती म्हणजे कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांची ‘ योगी ‘ ही कविता.

सौ राधिका भांडारकर

☆ योगी ☆

मातीतल्या बीजाला

अंकुर फुटतो

धरणीला आनंद होतो

पावसाचे शिंपण होते

अन् रोप उलगडते

हळुहळू त्याचा

वृक्ष होतो

तो बहरतो, फुलतो, फळतो

आनंदाची सर्वत्र पखरण करतो

 

मग आयुष्याचा तो क्षण येतो

पानगळीचा…

एक एक पान गळू लागते

फांदीला सोडून धरणीवर उतरते

त्याचवेळी आभाळाची ओढ सरते

ज्या मातीतून उगवले

तिथेच परतीची पाऊले

विलग पानांचा होतो पाचोळा

वार्‍यावर उडतो कचरा सोनसळा

वृक्ष होतो बोडका

तरी भासतो योग्यासारखा

गळणार्‍या पर्णांना निरोप देताना

उभा ताठ, ना खंत ना वेदना

कर्मयोगी निवृत्तनाथ

ऋतुचक्राशी असे बद्ध

एकाकी हा कातरवेळी

संवाद करी पानगळी

हा शिशिर सरेल

पुन्हा वसंत फुलेल

नव्या जन्मी नवी पालवी

हिरवाईने पुन्हा नटेल. .

~ राधिका भांडारकर

‘योगी’ ही एक रुपकात्मक कविता आहे. माणसाचं जगणं समजावून सांगण्यासाठी निसर्गातील वृक्षाचा रुपक म्हणून उपयोग करुन घेतला आहे. कविता जसजशी वाचत जावी तसतसं लक्षात येत की हे सगळं मानवी जीवनाला लागू होतय. सुरुवातीला कवयित्री म्हणते,

“मातीतल्या बीजाला

 अंकुर फुटतो

 धरणीला आनंद होतो

 पावसाचे शिंपण होते

 अन् रोप उलगडते

 हळुहळू त्याचा

 वृक्ष होतो

 तो बहरतो, फुलतो, फळतो

 आनंदाची सर्वत्र पखरण करतो”

बाळाला जन्म दिल्यावर मातेला होणारा आनंद आणि बीजाला अंकुर फुटल्यावर मातीला होणारा आनंद — मातेला होणारा असो किंवा मातीला होणारा आनंद असो — त्या आनंदाची अनुभूती एकाच प्रतीची नाही का ? सृजनशीलतेचा आनंद अगदी एकसारखाच आहे. पुढे पाऊस पडतो. पाणी मिळत जातं आणि रोप उलगडते. आई तरी याशिवाय वेगळं काय करते ? संगोपनाच्या मेघातून मायेचा वर्षाव होतो आणि मूल मोठं होत जातं, नाही का ? कवितेत पुढे म्हटल्याप्रमाणे रोपाचा जसा वृक्ष होतो तसे त्या बाळाचेही रुपांतर पूर्ण व्यक्तीमध्ये होते. वृक्षाने सर्वांगाने बहरावे त्याप्रमाणे माणूसही त्याच्यावर होणार -या संस्कारांमुळे पूर्ण विकसित होतो. त्याच्या कर्तृत्वाने फुलतो, कर्माची फळे मिळवत जातो आणि आनंदाची, सौख्याची पखरण करतो–एखाद्या वृक्षाप्रमाणेच!

निसर्गाचा जो नियम वृक्षाला लागू, तोच नियम माणसालाही लागू होतो. (कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाहीच). यापुढील काव्यपंक्ती,

“मग आयुष्याचा तो क्षण येतो

 पानगळीचा. . .

 एक एक पान गळू लागते

 फांदीला सोडून धरणीवर उतरते

 त्याचवेळी आभाळाची ओढ

 सरते. “

या काव्यपंक्ती काय सुचवतात पहा. वृक्षांची पानगळ सुरु होते. पूर्ण बहरलेला वृक्ष एक एक पान गाळू लागतो आणि निष्पर्ण होऊ लागतो. त्याचे वैभव ओसरते. ही पानगळ असते त्या वृक्षाच्या आयुष्यातील उतरणीचा, संकटाचा काळ असतो. माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. माणूस काही काळ खचून जातो. वैभवाला, प्रगतीला उतरती कळा लागते. कवयित्रीने पुढे म्हटल्याप्रमाणे ” आभाळाची ओढ सरते “. म्हणजे नवीन काही करण्याची, पुढे जाण्याची, आभाळ कवेत घेण्याची उमेद रहात नाही. त्यापुढील काव्यपंक्ती

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी हेच सांगतात की ज्या मातीतून पाने वर वर आली त्याच मातीत पानगळीच्या निमित्ताने ती पाचोळा होऊन खाली पडत आहेत, वृक्षापासून अलग होत आहेत. म्हणजे जिथे वैभव मिळाले तिथेच ते सोडून देण्याची वेळ येते. बघता बघता वृक्ष बोडका होतो. फक्त शुष्क फांद्या दिसू लागतात. पानगळ होत असताना तो निमुटपणे सहन करत एखाद्या कर्मयोग्यासारखा, खंत, खेदाच्या पलीकडे जाऊन ताठपणे उभा असतो. जी पाने गळून गेली त्याबद्दल दुःख नाही. उलट ऋतूचक्राशी असलेले नाते समजून घेऊन पानझडीचा शिशिर संपण्याची वाट पहात उभा असतो. कारण त्याला माहित असतं, पुढे वसंत येणार आहे. पालवी फुटणार आहे. नवी पाने येणार आहेत. पुन्हा हिरवाईने नटायचे आहे. आभाळाकडे झेप घ्यायची आहे.

मानवी जीवनाचे यापेक्षा वेगळे काय आहे ? संकटांचा ऋतू आला की सुखाची पानगळ सुरु होते. प्रगती थांबली की काय असे वाटू लागते. हे सगळं यश, वैभव इथेच सोडून जावं लागणार की काय ? अशीही भावना होऊ लागते. पण… पण तरीही माणूस डगमगत नाही. कारण त्यालाही जीवनचक्राचे नियम माहित होतात. दुःखाचे वादळ आले तरी त्याला वावटळ समजून अंगावर घेतले पाहिजे. कारण पुढे सुखाचा वसंत येणार आहे याची खात्री असते. हा विश्वास त्याला कुठून मिळतो ? निसर्गातूनच! असा एखादा वृक्ष दिसू लागतो पुनःपुन्हा बहरणारा आणि त्याच्या मनाच्या मातीतही उमेदीचे अंकुर फुटू लागतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच हे अतूट नातं कवयित्रिने अगदी अचूकपणे टिपले आहे.

कवितेत वापरलेले ‘कर्मयोगी निवृत्तीनाथ’ हे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. कारण कर्म करुनही त्याचे फळ मिळाले नाही किंवा मिळालेले फळ निसटून गेले तरी मनाची शांती ढळू न देता जो निवृत्त होतो तोच खरा कर्मयोगी आणि निवृत्तीनाथ ! वृक्षाच्या प्रतिकातून मानवी जीवनावर सहजपणे भाष्य करताना कवितेला झालेल्या या आध्यात्मिक विचारांच्या स्पर्शामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. आयुष्यातील चढउतार पचवायची ताकद ख-या कर्मयोग्यातच असते. निवृत्त होऊनही नव्या जन्मीच्या हिरवाईची वाट पाहणारा जीवनाविषयीचा आशावाद, सकारात्मकता या कवितेतून दिसून येते.

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी वाचताना “माती असशी, मातीत मिसळशी” किंवा “तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माती सांगे कुंभाराला” या काव्यपंक्तींची आठवण येतेच. एकच विचार प्रत्येक कवी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने कशा पद्धतीने मांडत असतो हे अशा काव्यांतून स्पष्ट होते.

वृक्षाच्या अंगी असलेले कर्मयोगीत्व जर माणसाने अंगिकारले तर त्याचं जीवनही पुनःपुन्हा प्रगतीच्या, वैभवाच्या हिरवाईने बहरून येईल असा सुप्त संदेश देणारी ही कविता एक सुंदर निसर्ग काव्याचे रुप घेऊन आपल्यासमोर सादर केल्याबद्दल कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना मनःपूर्वक धन्यवाद!

रसग्रहण –  सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares