☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) – ऋचा १ ते ५
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – अग्नि
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सव्विसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अग्नी देवतेला आवाहन केलेले असल्याने हे अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी अग्निदेवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
वसि॑ष्वा॒ हि मि॑येध्य॒ वस्त्रा॑ण्यूर्जां पते । सेमं नो॑ अध्व॒रं य॑ज ॥ १ ॥
हे पंचाग्नी समर्थ देवा विभूषित व्हावे
दिव्य लेवुनीया वसनांना सज्ज होउनी यावे
भक्तीभावाने मांडियले आम्ही यज्ञाला
तुम्हीच आता न्यावे यागा संपन्न सिद्धिला ||१||
☆
नि नो॒ होता॒ वरे॑ण्यः॒ सदा॑ यविष्ठ॒ मन्म॑भिः । अग्ने॑ दि॒वित्म॑ता॒ वचः॑ ॥ २ ॥
अग्निदेवा हे चिरतरुणा दिव्यकांतिदेवा
स्तुतिस्तोत्रांनी अर्पण करितो अमुच्या भक्तीभावा
श्रवण करोनी या स्तोत्रांना यज्ञवेदी धावा
हविर्भाग हे सर्व देवतांना नेउनि पोचवा ||२||
☆
आ हि ष्मा॑ सू॒नवे॑ पि॒तापिर्यज॑त्या॒पये॑ । सखा॒ सख्ये॒ वरे॑ण्यः ॥ ३ ॥
अपत्यासि तू असशी पित्यासम सगा सोयऱ्यांशी
जिवलग स्नेही तू तर असशी सखा होत मित्रांशी
गार्ह्यपत्य हे देवा तू तर अमुचाची असशी
कृपा करोनी यज्ञा अमुच्या सिद्धिप्रद नेशी ||३||
☆
आ नो॑ ब॒र्ही रि॒शाद॑सो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा । सीद॑न्तु॒ मनु॑षो यथा ॥ ४ ॥
यज्ञयाग संपन्न करण्या मनुज होई सिद्ध
आसन घेउनिया दर्भाचे आहुतीस सिद्ध
मित्रा वरुणा आणि अर्यमा तुम्हासी आवाहन
प्रीतीने येऊनीया स्वीकारावे दर्भासन ||४||
☆
पूर्व्य॑ होतर॒स्य नो॒ मन्द॑स्व स॒ख्यस्य॑ च । इ॒मा उ॒ षु श्रु॑धी॒ गिरः॑ ॥ ५ ॥
पुराणपुरुषा देवांच्या प्रति करिसि हवी अर्पण
तुमच्या चरणांवरती केला आम्ही हवी अर्पण
तुम्हासी लाभावा संतोष म्हणून हवी अर्पण
कृपा करावी आम्हांवरती प्रार्थना करा श्रवण ||५||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे..या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ ‘जोशीमठ’ च्या निमित्ताने… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
समुद्राच्या लाटांमध्ये पाऊलभर पाण्यात कधी उभे राहिले आहात का हो ? लाट जेव्हा सरसर मागे फिरते, तेव्हा शब्दशः तुम्हारे पैरोतलेसे जमीन खिसक जाती हैं । उत्तराखंडमधील जोशीमठात गेले वर्षभर हीच परिस्थिती आहे.
भौगोलिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेले जोशीमठ हा बद्रीनाथ, हेमकुंड साहेब, अनेक ट्रेकिंगचे मार्ग, आऊली स्किईंग – या आणि हिमालयातील अशा अनेक ठिकाणांसाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. स्वाभाविकरीत्या, दरवर्षी येथील पर्यटकांचा ओघ वाढत गेला आणि मागणी – पुरवठा नियमानुसार जोशीमठ येथील infrastructure सोयी – रस्ते, इमारती, हॉटेल्स यांच्या संख्या वाढत गेल्या. महामार्ग मोठे होत गेले, जलविद्युत प्रकल्प उभे राहू लागले.
दुर्दैवाने हा सगळा डोलारा ज्या पायावर उभा होता / आहे, तो पायाच कमकुवत आहे. भूस्खलनातून वाहून आलेल्या दगडमातीवर जोशीमठ वसलेले आहे. त्यामुळे हा पायाच अस्थिर आहे. नव्या जमान्यातील ही हाव भागवण्याचा ताण या भूस्तराला पेलवत नाहीये. रस्ते, इमारतींचे पाये खणताना, बोगदे खोदताना लावलेले सुरुंग, हा आधीच नाजूक असलेला समतोल वेगाने ढासळवत आहेत. शहरीकरणासाठीची जंगलतोड जमिनीला धरून ठेवणाऱ्या मुळांच्या मुळावर उठली. झालेली हानी निसर्ग स्वतःहून भरून काढतो, पण निसर्गाला तेवढा recovery time दिलाच गेला नाही.
… आणि आज अख्खं ‘ जोशीमठ ‘ गावच्या गाव जीव मुठीत धरून आहे. चकाचोंद आणि भरभराटीच्या नादात मूलभूत अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. आपण खूप सहजपणे सरकार, व्यापारी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आहोत.
… पण, आपण क्षणभर थांबून विचार करूया का ?
… आपल्या सगळ्यांचाच जोशीमठ होतो आहे का ?
टार्गेटस्, डेडलाइन्स, प्रोजेक्ट्स, इंक्रीमेंट्स, प्रमोशन, बदल्या, फिरतीच्या नोकऱ्या – या मागणी पुरवठा चक्रात, या सगळ्या चकाचोंदच्या मागे धावताना आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठिकाणावर राहते आहे का ? आपला समतोल ढासळत आहे का ? झालेली हानी शरीर नैसर्गिकरीत्या भरून काढतं. पण आपण शरीराला तेवढा recovery time देत आहोत का ?
…. आणि ज्या धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठानासाठी हिंदुस्तान दूनियाभरात नावाजला जातो, तो आपला पाया मजबूत आहे का ? इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाच्या नादात आपण शुभम् करोति, रामरक्षा विसरलो आहोत का ? टीव्ही वरच्या मालिकांमध्ये, जाहिरातींमध्ये आपल्या धर्माची, संस्कृतीची, पूर्वजांची निराधार खिल्ली उडवली जाते तेव्हा आपणही दात काढून फिदी फिदी हसतो का ? आपल्या रूढी परंपरांची टोपी उडवणारे व्हॉट्सॲप मेसेज आले की आपण ते पाठवणाऱ्यांना कडक शब्दांत समज देतो का आपणही ते मेसेज पुढे ढकलतो ?
… जोशीमठाबाबतीत कदाचित आपल्याला खूप उशीर झाला आहे. Irreversible damage – न भरून येणारे, न सुधारता येणारे नुकसान झाले आहे.
… तुमच्या वैयक्तिक जोशीमठाची काय स्थिती आहे ? पुनर्वसन होऊ शकेल ना ? ऱ्हास थांबवता येईल ना ? ……