मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी एकटी….. ☆ श्री शरद दिवेकर

? कवितेचा उत्सव ?

 ☆ मी एकटी….. ☆ श्री शरद दिवेकर☆ 

अरे, एव्हाना ती यायला हवी होती !

अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती !

 

ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात.

आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात.

 

सुरू होते पूजा अर्चना

आणि सरस्वतीची आराधना.

 

मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट.

खाऊ झालाच समजा सफाचाट.

 

कधी कधी ऐकू येतो गलका.

माझ्या कानांना मस्त बसतो दणका.

 

थोड्या वेळाने परतायची वेळ होते.

आमचं मन खट्टू होते.

 

मी पुन्हा एकदा नव्याने उजळणी करते.

आणखी एक आवर्तन पूर्ण होते.

 

उद्याच्या पुनर्भेटीचा संकल्प ठरतो

आणि सुर्य पश्चिमेला मावळतो.

 

पण आता सगळं  सुनसान आहे.

सर्वत्र स्मशानकळा आली आहे.

 

सगळीकडे जमली आहेत कोळीष्टके.

सगळे आयत, चौरस झाले आहेत ओकेबोके.

 

इकडे आणि तिकडे जमले आहेत धुळीचे थर.

माणसाचा कुठे उरला आहे इकडे वावर.

 

त्यामुळेच मनात काहूर उठलंय

की ती आता कधीच येणार नाहीत की काय ?

 

कधीची उभी आहे मी निष्पर्ण वृक्षासारखी.

मी एकटी, मी एकाकी.

 

प्रत्येक गावा गावातील शाळा.

प्रत्येक शहरा शहरातील शाळा.

 

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

70457 30570

[email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 87 – थांब थोडा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 87 – थांब थोडा ☆

मनी असे हाव।करी धावाधाव।

नसे मुळी ठाव। थांब थोडा।

 

संतप्त रुधीर । नसावे अधीर।

धरूनिया धीर।थांब थोडा।

 

कराया प्रगती।निःस्वार्थ सोबती।

धरून संगती।थांब थोडा।

 

असत्याची गोडी। अधर्मांना जोडी।

मोहपाश तोडी।थांब थोडा।

 

जपावे नात्यास। जननी पित्यास।

सांगाती नित्यास। थांब थोडा।

 

अनाथा आधार। दुःखीतांचे भार।

घेऊन उधार। थांब थोडा ।

 

स्वर्ग आणि नर्क। वाया हे वितर्क।

सदैव  सतर्क।थांब थोडा ।

 

जीवनाचे सार। सात्त्विक विचार।

सोडी अविचार।थांब थोडा ।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी काही आदर्श गृहिणी नाही..सोनल ऋषिकेश ☆ संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

? मनमंजुषेतून ?

☆  मी काही आदर्श गृहिणी नाही..सोनल ऋषिकेश ☆ संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

नाही.. मी काही आदर्श गृहिणी नाही.

मला calendar वर साध्या नोंदी करता येत नाही की

महिन्याचा शेवटी पुरवा-पुरव करताना adjustment चं feeling ही येत नाही…

तारखा लक्षात असल्या तरी तिथीशी अजून गट्टी जमत नाही आणि

उपवास केले नाही म्हणून अपराधी सुद्धा वाटत नाही…

 

नाही जमत मला दुधाच्या पिशव्या धुवून साठवून ठेवणं,

पेपर रद्दीच्या वाट्यालाही मी सहसा जात नाही…

रोज कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवायला जमतंच असं नाही,

चोवीस तास स्वच्छतेचा जयघोषही मी करत नाही…

 

वाळवण, लोणची, मुरांबे यातलं काही करत नाही,

प्रत्येक सणाला साडी पण नेसतेच असं नाही…

 

मला वाटतं बुवा कधी कधी काम सोडून निवांत बसून राहावं,

आपलं प्रतिबिंब दुसऱ्याच्या आरश्यातून पाहावं, 

कारण खरंच मी आदर्श गृहिणी वैगरे नाही…

 

काही वेळ स्वतःसाठी काढताना स्वार्थी असल्यासारखं वाटत नाही,

दुसऱ्यांना जपताना मात्र राग, लोभ काही ठेवत नाही…

नाही विसरत मी महत्वाच्या तारखा, प्रसंग आणि घटना,

त्या अविस्मरणीय करताना Surprise द्यायलाही मी विसरत नाही…

 

नैवेद्य करताना भक्तीभाव कमी पडत नाही की

भुकेल्याला जेवू घालताना हात आवरता घेत नाही…

वर्तमान जगताना भविष्याची तजवीज करायला विसरत नाही,

अनुभवाची शिदोरी उगाच कोणालाही वाटत फिरत नाही…

 

आदर्श होण्याचा अट्टाहासही करत नाही आणि

गृहिणीची कर्तव्ये पार पाडण्यात कसलाही कमीपणा वाटत नाही…

‘स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं’ ही खंत नकोय मला,

आत्ताच मोकळा श्वास घेतीये, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही!!!

 

 –  सोनल ऋषिकेश

संग्राहिका :–  माधुरी परांजपे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ म्हणे राम आज ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ म्हणे राम आज ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

म्हणे राम आज

लढू मी कोणाशी

सोन्याच्या लंकेशी

माझा तह !

 

सोपी झाली आता

विषाची परीक्षा

भेसळीची दीक्षा

विषालाही !

 

स्वतःचा स्वत:शी

अशक्य संवाद

कर्कश निनाद

ठायी ठायी !

 

मठाचे मांगल्य

सांडुनिया मठ

उरे  एक  पेठ

व्यापाराची !

 

शाश्वत केवळ

निशाणांचे दांडे

त्यावरती झेंडे

रोज नवे !

 

अख्खे शेत खाई

साक्षात कुंपण

विषाक्त चंदन

सर्पांसंगे !

 

परागंदा राजा

रिते सिंहासन

सेनापतीविण

सैन्य रणी !

 

बेपत्ता चेहरे

मुखवटे शेष

भरोशाचा देश

शोधू कोठे !

 

खेळ हा उलटा

चाले क्षणोक्षणी

मीच शीर्षासनी

किंवा देवा !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 111 – हा तिरंगा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 111 – विजय साहित्य ?

☆ ?? हा तिरंगा ??  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

भारतीयांचा राष्ट्रध्वज हा झळके गगनी तेजपताका

हा तिरंगा, मानचिन्ह हे त्रिगुणी याची रंग शलाका.

वरी केसरी,  मधे पांढरा गडद हिरवा तळजागी

हा तिरंगा,  गंध आडवे भारतभूच्या शिरभागी .

 

तिरंग्याची लांबी, रुंदी, ठेवा ध्यानी प्रमाण तीचे ठरलेले

प्रमाणबद्ध हा  एक तिरंगा, तीनास दोन हे ठसलेले . . !

सारनाथचेअशोक चक्र ते श्वेत विभागी आहे झळकत

निळसर रंगी चोवीस आर्र्‍या ,हा तिरंगा,  आहे मिरवत. . . !

 

हा तिरंगा,  मानचिन्ह हे लोकशाहीचे वस्त्र महान.

कधी न मळला,विटला, उडला ,रंग तिहेरी, राजस छान.

याच्या साठी जन्मा आले,  याच्या साठी ते बलिदान

देश आमुचा भारतीयांचा, राष्ट्रध्वज हा अमुची शान….!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || अमृतभूमी || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ || अमृतभूमी || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

भारत आमची देवभूमी

उभ्या जगात अमीट ठसा

कर्तृत्वाने सदैव जपूया

देशभक्तीचा घेतला वसा ||

 

इतिहासाच्या पानापानांत

शौर्य भक्तीची झुंजार वाणी

दऱ्या-खोर्‍यातूनी घुमतसे

स्वतंत्रतेची मंगलगाणी ||

 

स्वातंत्र्यास्तव किती झुंजले

रक्त सांडले प्राण अर्पिले

बली वेदीतून आकारा ये

स्वतंत्रतेचे शिल्प साजिरे ||

 

ज्ञान-विज्ञान संपन्नतेचा

थोर वारसा असे लाभला

शिखरे गाठून कर्तृत्वाची

देऊ झळाळी या वैभवाला ||

 

जन्म लाभला पवित्र देशी

भाग्य आपुले हे अविनाशी

तिच्या प्रगतीचे होऊ भोई

यश पताका नेऊ आकाशी ||

 

ही भारतभूच्या स्वातंत्र्याची

अमृतमहोत्सवी पर्वणी 

आसेतू हिमाचल गर्जती

सुरेल मंगल यश गाणी ||

सुरेल मंगल जय गाणी ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बरे नाही… ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ बरे नाही… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

(रंगराग)

बेगडी रिवाजाना पाळणे बरे नाही

देवळात देवाना शोधणे बरे नाही

 

बेरक्या पुढा-यांंची भाषणे किती खोटी

नेहमी दिमाखाने बोलणे बरे नाही

 

बिघडले असे स्वार्थी सोयरे कसे माझे

सारखे मला त्यानी फसवणे बरे नाही

 

मागच्या रिवाजांची मांडणी पुढे झाली

जातपात आताही नोंदणे बरे नाही

 

कोणत्या चुका आम्ही मागच्या पुढे केल्या

दाखवा समाजाला टाळणे बरे नाही

 

झाड सावली देते सारखी कुणाला ही

निंदकाला टाळायला सांगणे बरे नाही

 

 © श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 97 – पडवी ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #97  ?

☆ पडवी 

हल्ली शहरात आल्या पासून

गावाकडंची खूप आठवण येऊ

लागलीय

गावाकडची माती

गावाकडची माणसं

गावाकडचं घर

अन्

घरा बाहेरची पडवी

घराबाहेरची पडवी म्हणजे

गावाकडचा स्मार्टफोनच…!

गावातल्या सर्व थोरा मोठ्यांची

हक्काची जागा म्हणजे

घराबाहेरची पडवीच…!

जगातल्या प्रत्येक गोष्टीवर इथे

चर्चासत्र रंगतं

आणि कोणत्याही प्रश्नावर इथे

हमखास उत्तर मिळतं

दिवसभर शेतात राबल्यावर

पडवीत बसायची गंमतच

काही और असते..

अन् माणसां माणसांमध्ये इथे

आपुलकी हीच खासियत असते

पडवीतल्या गोणपाटावर अंग

टाकलं की ,

आपण कधी झोपेच्या

आधीन होतो हे

कळत सुध्दा नाही

पण शहरात आल्या पासून ,

ह्या कापसाच्या गादीवर

क्षण भर ही गाढ झोप

लागत नाही…!

घराबाहेरचं सारं जग एकाएकी

अनोळखी वाटू लागलंय….

अन् ह्या चार भितींच्या आत

आज.. डोळ्यांमधलं आभाळं देखील

नकळतपणे भरून आलंय

कधी कधी वाटतं

ह्या शहरातल्या घरांना ही

गॅलरी ऐवजी

पडवी असती तर

आज प्रत्येक जण

स्मार्टफोन मधे डोकं

खुपसून बसण्यापेक्षा

पडवीत येऊन बसला असता…

आणि खरंच

गावाकडच्या घरासारखा

ह्या शहरातल्या घरानांही

मातीचा गंध सुटला असता….!

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रजासत्ताक दिन …. ☆ श्री रवींद्र सोनावणी

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

?? प्रजासत्ताक दिन …. ?? श्री रवींद्र सोनावणी ☆ 

जन्मलो देशात त्याचे

नाव हिंदुस्थान आहे 

फडकतो डौलात अमुचा

तो तिरंगा प्राण आहे

 

भिन्न भाषा वेशभूषा

संस्कृतीने एक आम्ही

प्राणाहूनीही प्रिय आम्हा

आमची ही हिंदभूमी

 

गतिमान हे विज्ञानयुग

आम्ही इथे आहोत राजे

 चिमटीत धरतो विश्व

 अणुशक्तीत आमुचे नाव गाजे

 

दूत आम्ही शांतीचे

आम्हा नको कधीही लढाई

मनगटे पोलादी परि ना

मारतो खोटी बढाई

 

आहेत आम्हाला समस्या

त्या आम्ही पाहून घेऊ

सदनात आमुच्या दुष्मनांनो

तुम्ही नका चोरुन पाहू

 

रक्षिण्या स्वातंत्र्य येथे

वीरता बेबंद आहे

रक्तामध्ये एल्गार अन

श्वासामध्ये जयहिंद आहे

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भारतमातेची आरती .. ☆ डाॕ संगीता गोडबोले

 डाॕ संगीता गोडबोले 

? कवितेचा उत्सव ?

?? भारतमातेची आरती.. ??  डाॕ संगीता गोडबोले  ☆ 

जय देवी जय देवी जय भारतमाता

नतमस्तक तुज चरणी गाऊ तव गाथा

 

हिमालयासम गिरिवर रक्षण तव करिती

स्वर्गही त्यागुन उतरे नंदनवन  भूवरती

गंगा सिंधु कावेरीसह कितिक ते जलधी

वर्षा  ग्रीष्मादि  ऋतू तुझीच समृद्धी

 

विविध तरुलता कथती  सुरस तव  कथा

जय देवी जय देवी जय भारतमाता

 

त्यागमूर्त जणु भगवा  तव हाती साजे

यशगाथा पुत्रांची विश्वभरी गाजे

भाषा अठरा षट् शास्त्रे अन् पुराणेही अठरा

जगती विज्ञानाच्या ..तू लखलखता तारा

जयतु जन्मभू गर्जे हृदय मम सदा

 

जय देवी जय देवी जय भारतमाता

 

© डाॕ संगीता गोडबोले

कल्याण .

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print