मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवणीतलं घर ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ आठवणीतलं घर ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

घर नाही, अंगण नाही,

 नाही मातीचा ओलावा !

तुळशी वृंदावन छाया नाही,

अंगणी नाही दिवा!

 

आठव येतो गावाकडचा ,

मनी आठवते, मातीची माया!

दारापुढला आंबा देई,

 माथ्यावरती दाट छाया!

 

आठवते मज अंगण अपुले,        

गप्पांचा तो कट्टा !

येई-जाई त्यास मिळे विसावा,          

करी परस्परांच्या थट्टा!

 

नातीगोती सर्वांची होती,

 साधे सुधेच जगणे !

पाहुणचार घरात होई ,

गात आनंदाचे गाणे!

 

येणारा जो असे पाहुणा,

पाहून खुशी होई !

दारा मधला माड देखणा,

 मनास भुलवून जाई !

 

घर होते घरासारखे,

 माणसे होती प्रेमळ!

आनंदाचे गाणे होते,

सदैव ठेवी मन निर्मळ!

………………….

………….

शहरामधल्या सिमेंटच्या ,

चौकोनी, देखण्या माड्या!

भुलवित नाहीत मम मनाला ,.                                

सुंदर मोठ्या गाड्या !

 

प्रत्येकाचे मन बंदिस्त असे,

 जणू सिमेंटच्या भिंतींचे !

भक्कम अन् अभेद्य असे ते,

  नाही पाझर पाण्याचे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नारी… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नारी… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

आधीची ती नारी होती मराठमोळी

नेसून नऊवारी आणि हाती भाकरी पोळी

 

शेती असो वा रानमाळी

उपसत होत्या घर जमीन काळी

थकायची  नाही कष्टाला कधीही काळीवेळी

 

वडीलधारी सर्वांच्या धाकात होत्या पोरीबाळी

हसत खेळत उचलत होत्या कष्टाचीच मोळी

 

शिक्षणाच्या आसेने झाल्या सावित्रीच्या लेकी बाळी

पुढारलेल्या म्हणवुन घेऊ लागल्या सर्वां डोळी

 

झेप घेतली गरुडाच्या पंखांनी निळ्या आभाळी

उत्तुंग यश ते मिळवले जळी स्थळी

 

नाही कुठला प्रांत नाही कुठली प्रवाळी

प्रत्येक क्षेत्रात पुढाकार अन विजयाची घौडदौड निराळी

 

हीच ती नारी पेलणारी नात्यांची नव्हाळी

मिळून सार्‍या जणी करूया साजरी ही प्रगतीची झळाळी

 

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #152 ☆ संत जनार्दन स्वामी…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 152 ☆ संत जनार्दन स्वामी…! ☆ श्री सुजित कदम

 जन्मा आले जनार्दन

देशपांडे घराण्यात

कृष्णातीरी औदुंबरी

दिला वेळ चिंतनात..! १

 

संत जनार्दन  स्वामी

कर्मयोगी उपासक

एकनाथ मानी गुरू

राजकार्यी प्रशासक…! २

 

यवनांची केली सेवा

देवगिरी गडावर

पद किल्ला अधिकारी

गिरी कंदरी वावर…! ३

 

धर्मग्रंथ पारायणे

एकांतात रमे मन

दत्तभक्ती ज्ञानबोध

धन्य गुरू जनार्दन. ४

 

संत साहित्य निर्मिती

लोक कल्याणाचा वसा

संत जनार्दन स्वामी

आशीर्वादी शब्द पसा….! ५

 

गुरू चरित्राचे आणि

ज्ञानेश्वरी पारायण

तीर्थक्षेत्री रममाण

संत क्षेष्ठ जनार्दन…! ६

 

जनार्दन स्वामी शिष्य

एकनाथ जनाबाई

दत्तात्रेय अनुग्रह

गुरू कृपा लवलाही…! ७

 

सुरू केली जनार्दने

दत्तोपासनेची शाखा

श्रीनृसिंह सरस्वती

नाथगुरु पाठीराखा…! ८

 

दत्त जाहला विठ्ठल

देव भावाचा भुकेला

निजरूप हरिभक्ती

दत्त कृष्ण एक केला…! ९

 

स्वानंदाचा दिला बोध

परमार्थ शिकविला

स्वयमेव गुरू कृपा

भक्तीभाव मेळविला…! १०

 

आदिनारायण अर्थी

दत्तात्रेय जनार्दन

गुरू परंपरा दैवी

पांडुरंगी संकर्षण…! ११

 

दत्त दर्शनाचा लाभ

बोधदान दिक्षा दिन

गुरू शिष्य दोघांचाही

नाथषष्ठी स्मृती दिन..! १२

 

पुण्यतिथी महोत्सव

हरिपाठ संकीर्तन

मठ आणि आश्रमात

सेवा भाव समर्पण…! १३

 

सुर्यकुंड दुर्गातीर्थ

रम्य भावगर्भ स्मृती

संत जनार्दन स्वामी

अध्यात्मिक फलश्रृती…! १४

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कशाले काय म्हनू नये…

अशाच काहीशा नावाची आणि अर्थ असणारी बहिणाबाई यांची एक कविता शाळेत होती…

बिना कपाशीनं ऊले

त्याले बोंड म्हनू नये…..

               हरिनाम हि ना बोले

               त्याले तोंड म्हनू नये……

नाही वाऱ्याने हालंल

त्याले पान म्हनू नये…

असे बरेच कशाला काय म्हणू नये हे खास अहिराणी भाषेत पण सहज समजेल या शब्दांत त्यांनी सांगितले आहे. हे सगळे दोष आहेत. माणूस म्हणून कसे रहावे हेच सांगण्याचा हेतू त्यात होता. यात त्यांनी माणूसच नाही, तर वनस्पती, आणि निसर्ग यांच्यातील अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक गोष्टी सहज ओघावत्या शब्दात सांगितल्या.

पण आता काळ बदलला. जगण्याचे तंत्र (आम्ही आमचेच) बदलले. नवीन तंत्रज्ञानात आम्ही आमचे वागण्याचे ताळतंत्र काही प्रमाणात सोडले. कारण आता आला मोबाईलचा जमाना. आणि या मोबाईलच्या जमान्यात आम्ही माणूस म्हणून जगायचेच विसरलो. इतकेच नाही तर काही अपप्रवृत्तींचे दर्शन आम्ही राजरोसपणे दाखवायला, करायला लागलो. (अर्थात सगळेच नाही. पण संख्या कमी देखील नाही.) याचे वाईट वाटणारे आहेत तसेच समर्थक देखील आहेत. (तो खुपच ॲक्टिव्ह असतो, मोबाईल वर गाणं बघतच जेवतो, शाळेत जात नाही अजून, पण मोबाइल बरोब्बर हाताळतो इ…)

आता मोबाईल त्यातले फेसबुक, व्हॉटस्ॲप, गुगल, यू ट्यूब, इनस्टा. ट्विटर, गेम या बद्दलच तरुणाईचे ट्विट असते. असे आणि इतरही बरेच काही यातच आम्ही स्वतःला हरवले आहे. आम्ही या मोबाईलच्या अधीन झालो आहोत. आणि अप्रत्यक्ष पणे त्यांचे समर्थन देखील करतो.  आम्ही कामाव्यतिरिक्त बराचसा वेळ मोबाईल मध्येच घालवून वेळ घालवत असतो.

आज सहजपणे या मोबाईल बद्दल खालील प्रमाणे म्हणतील का?……. कारण सततचा त्याचा वापर. आणि तो वापरण्याची अधीरता.

        नाही केले अपडेट…..

        त्याला स्टेटस् म्हणू नये..

नाही बदलले चित्र…..

त्याला डी.पी. म्हणू नये.

         नाही आला मेसेज……

         त्याला गृप म्हणू नये.

नाही काढले फोटो…….

त्याला सोहळा म्हणू नये.

          ज्याने केले नाही फॉरवर्ड……

          त्याला ॲक्टिव्ह म्हणू नये.

जो जागेवरच थांबला…….

त्याला नेट म्हणू नये.

         जो वेळेवर संपला…..

          त्याला नेटपॅक म्हणू नये.

ज्याने नाही झाला संपर्क…….

त्याला रेंज म्हणू नये.

          ज्याने दाखविला नाही रस्ता…….

          त्याला मॅप म्हणू नये.

जी लवकर डिस्चार्ज झाली……

तिला बॅटरी म्हणू नये.

              ज्याचे दिले नाही उत्तर……..

               त्याला गुगल म्हणू नये.

जी भरते लवकर……

 त्याला मेमरी म्हणू नये.

                    ज्यात नाही नवे ॲप……

                    त्याला प्ले स्टोअर म्हणू नये. जो होतो सतत हॅंग…….

त्याला मोबाईल म्हणू नये.

 

शेवटी तर असे म्हणावे लागेल की……

 

        ज्यांच्याकडे नाही मोबाईल……..

        त्याला माणूस म्हणून नये.

जिथे नाही वाय फाय……..

त्याला घर म्हणू नये.

कारण आम्ही बराचवेळ काही कारणाने किंवा कारणाशिवाय मोबाईल सोबतच असतो.

सगळ्या नवीन गोष्टी वाईटच असतात असे नाही. पण चांगले काय आहे? हे आपणच समजून घेत ते आणि तेवढेच वापरले पाहिजे. नेमके, वेचक घेऊन  ठराविक काळात वापरला तर मोबाईल देखील चांगलाच आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

ज्या काळी, म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी, ” महिला दिन ” साजरा करून त्या दिवशी खोटी … औपचारिक कणव दाखवून महिला वर्गाला शुभेच्छा देण्याची प्रथा नव्हती, त्या वेळी नामवंत कवी विंदा करंदीकर यांनी  ‘ झपताल ‘ या नावाची किती सुरेख कविता लिहून तत्कालीन  स्त्रीचे  जीवन  रेखाटले होते ते दर्शविण्यासाठी ती कविता  खाली देत आहे. आता सर्रास इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या तरुण पिढीला  हे  कोण विंदा ? असा प्रश्न पडणे साहजिकच  आहे . पण घरातील कोणा शिकलेल्या  आजी … आजोबा  , काका…काकू ,मामा… मावशी ,आई …बाबा  याजकडून ते माहीत करून घ्यावे … 

विंदांच्या या ‘झपताल’ कवितेचं वैशिष्ट्य हे की ती कविता कोणी स्त्रीने लिहिलेली तक्रारवजा कविता नाही, तर त्या जुन्या काळांतल्या एका पुरुषाने, एका संवेदनशील पतीने आपल्या पत्नीचं केलेलं कौतुक आहे. 

आपल्याकडे महाराष्ट्रातल्या साधारणपणे मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात सत्तरऐंशी वर्षांपूर्वी घरी चोवीस तास ‘आई’ किंवा ‘पत्नी’ म्हणून कामाच्या रगाड्यात भरडल्या जाणा-या आणि चाळीतल्या सव्वा-दीड खोलीत आयुष्य काढीत उभं आयुष्य फक्त सहन, सहन आणि सहन करीत करीत काढलेल्या महिलांची काय स्थिती होती, ते विंदांनी त्यांच्या ‘झपताल’ या कवितेत समर्पकपणे मांडलेलं आहे. 

आमच्या मागच्या पिढीतल्या नऊवारी लुगड्यातल्या कोणाही आजी, आई, मावशी, आत्या, काकू, मामी…. यांना स्वत:ची ‘मतं’ तर दूरच राहिली, स्वत:ची ‘पर्स’ही त्यांना माहीत नव्हती. तरी घटस्फोट न घेता, (ब्रेक-अप न करता) आणि कोणतंही ‘लोन’ न घेता, भांडततंडत का असेना, पटलं न पटलं तरी, पन्नास पन्नास, साठ साठ वर्ष चार, पाच, सहा मुलं वाढवून, पुढे त्यांना मार्गी लावून, ‘त्याचसाठी अट्टाहास करीत  ‘शेवटच्या दिसापर्यंत’ टुकीने संसार निभावले.   

विंदांची ही कविता हल्लीच्या तरुणींना समजेलच असं नाही, त्यात त्यांची चूकही नाही. कारण त्यांना हे मुळातच काही माहीतच नाही. त्यातल्या काही अस्सल ‘मराठी’ शब्दांचा अर्थही समजणार नाही, उदा. ओचें,  उभे नेसून,  पोतेरें,  मुतेली, बाळसे, चूल लाल होणे, मंमं, आणि संसाराची दहा फुटी खोली.. वगैरे. घरी एखादी आजी असलीच तर तिला त्यांनी या शब्दांचे अर्थ विचारावे. ते दिवस आणि तो काळ  ज्यांनी पाहिला आहे, भोगला आहे, त्यांनाच ही कविता चांगली समजेल, घरोघरच्या साठी-सत्तरी उलटून गेलेल्या केवळ महिलांनाच नव्हे तर घरोघरच्या संवेदनशील असलेल्या पुरूषांनाही समजेल. 

☆  झपताल

ओचें बांधून पहांटे उठते तेव्हांपासून झपाझपा वावरत असतेस

कुरकुरणा-या पाळण्यामधून दोन डोळे उमलूं लागतात 

आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते …… 

 

उभे नेसून वावरत असतेस.. तुझ्या पोते-याने म्हातारी चूल पुन्हां एकदां लाल होते

आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवूं लागतो 

म्हणून तो तुला हवा असतो…… 

 

मधून मधून तुझ्या पायांमध्यें माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात 

त्यांची मान चिमटीत धरून तूं त्यांना बाजूला करतेस, 

तरी पण चिऊकाऊच्या मंमं मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो …… 

 

तूं घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात 

स्वागतासाठी तूं ‘सुहासिनी’ असतेस..वाढतांना ‘यक्षिणी’ असतेस .. भरवतांना ‘पक्षिणी’ असतेस, 

सांठवतांना ‘संहिता’ असतेस .. भविष्याकरतां तूं ‘स्वप्नसती’ असतेस .. 

संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी …… 

 

… तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

कविवर्य – विंदा करंदीकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ऊर्जा… – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– ऊर्जा ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तू उर्जेचा स्रोत म्हणूनिया

 हात पसरले तुझ्याकडे

त्या उर्जेचे प्रवाह

वाहती तारा जगाकडे

प्रवास इथला संपत नाही

एक पुढे तर मागे एक

वा-यालाही मागे टाकील

 असाच इथला जीवन वेग

समान अंतर जरी ठेवले

तरी ध्येय ते एक असे

वाट दूरची असेल तरीही

 क्षितीजापुढती धाव असे.

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फा र क त… वयाशी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😅 फा र क त…वयाशी ! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

येता कधीतरी कंटाळा

वाटतो बदलावा रस्ता, 

असते कठीण मोडणे

आपला रोजचा शिरस्ता ! 

 

वाट बदलता रुळलेली

मन करी खळखळ,

शंकासूर बघा मनातला

करू लागे वळवळ !

 

असतील काटे वाटेवर

का असेल मऊ हिरवळ,

शंका कुशंकांचे उठे मनी

नको वाटणारे मोहोळ !

 

होता द्विधा मनस्थिती

पहिले मन खाई कच,

दुसरे सांगे बजावून

साध खरा मौका हाच !

 

पण

 

सांगतो तुम्हां करू नका

मन व वयाची गफलत,

जगा कायम तरुण मनाने

घेवून वयाशी फारकत !

© प्रमोद वामन वर्तक

११-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री जन्मा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्त्री जन्मा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

जन्म जरी, कष्टप्रद

आई हसे, आरामात

रम्य तो काळ सुखाचा

शैशव लाडाकोडात

 

बालपणी हौस भारी

नव्याची ती नवलाई

तारुण्यात स्वप्ने, जरी

लग्नाची करिती घाई

 

उपवर ती  झेलते

आधी श्रीमंती नकार

होकार मिळे तेव्हाच

विवाह होई साकार.

 

संसारात हरवली

आराम तो कुठला

संपले ना समस्यांचे

डोंगर, घाम फुटला.

 

आराम हराम सखे

वाक्य मनी ठसलेले

वार्धक्यात कळते गं

गणित ते चुकलेले

 

आपले ना कुणी इथे

आपण मात्र सर्वांचे

कोडे कधी ना सुटले

पावन या स्त्री जन्माचे

 

बदलल्या त्या भूमिका

आराम कुठे जीवाला

रोजच्या बहुगर्दीत

आठवू कधी देवाला

 

घेईन आराम स्वर्गी

देवा, तूच करी लाड

उरते काम अजूनी

संपविण्या पुन्हा धाड.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

७/३/२०२३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 173 ☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 173 ?

💥 गझल… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

या निशेचा नशिला नूर आहे

पण मनी कसले काहूर आहे

सांग मी आता जाणार कोठे

गाव हे परके, मगरूर आहे

साहवेना जगणे अन मरणही

शाप हा इतका भरपूर आहे

घेतला “काव्य वसा” वेदनेचा

डंख जहरी मज मंजूर आहे

ध्वस्त झाली जिवनाचीच नौका

सागरा  ने ,मी आतूर आहे

कृष्ण राधेला बोले, मृगाक्षी,

 ज्योत तू अन मी कापूर आहे

गीत हृदयीचे झंकारताना

आर्ततेचाच ‘प्रभा ‘ सूर आहे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ।। मानसहोळी ।।…संत जनाबाई यांची! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ।। मानसहोळी ।।…संत जनाबाई यांची! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कराया साजरा । होलिकेचा सण ।

मनाचे स्थान । निवडीले ।।

 

ऐसे ते स्थान । साधने सरावले ।

भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

 

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।

त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

 

रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।

इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।

 

गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।

अर्पिले तयात । ऐसे केले ।।

 

रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।

भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

 

वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले । 

यज्ञरूप आले । झाली कृपा ।।

 

दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।

आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।

 

झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।

जाणावया तेथ । नूरले काही ।।

 

वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी।

जेणे मुक्तीची दिवाळी।अखंडित ।। 

 

 होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*

 

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares