मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं ! ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 आजी …  लेखक – अज्ञात 🌼 संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

निर्माल्याच्या जवळ असूनही,

कमाल असते ताजी !

अस्थिर हाती सुस्थिर माया,

म्हणजे खंबीर आजी !

 

आईहुनही घाली पाठीशी,

चूका करुनही माफ !

माया सांगे आत उकळती,

चश्म्यावरची वाफ !

 

एका पिढीला मधे ठेऊनी,

जिची उडी आवेगी !

तरलपणाने तिला समजते,

सगळे बसल्या जागी !

 

आता केवळ शतकासाठी,

नगण्य उरले कमी !

शतकपूर्तीची तिला असावी,

शंभर टक्के हमी !

 

रसाळ होता कमाल आंबा,

ठिबकत असते आजी !

पूर्ण फुलानी भरली फांदी,

तशीच झुकते आजी !

 

आजी असते निरांजनातील,

थरथरती फुलवात !

भविष्य आणि भूतामधली,

वर्तमानी रुजवात !

 

जरी उसवला तरीही असतो,

आजी भक्कम पीळ !

आणि घराच्या गालावरचा,

सौंदर्याचा तीळ !

 

घरात कायम आजी म्हणुनी,

दार घराचे खुले !

तिन्हीसांजेला अध्यात्माचे,

फूल भक्तिवर फुले !

 

🙏🏻 सगळ्या आजीना समर्पित  🙏🏻 

 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जिव्हाळ्याची गावे सारी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ जिव्हाळ्याची गावे सारी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

जिव्हाळ्याची गावे सारी

मागे आता दूरदूर

संपलेल्या प्रवासाची

गंतव्याला हूरहूर !

 

लख्ख चमकावी वीज

जावी विझून क्षणात

तसा वाटे जन्म सारा

सरलेला निमिषात !

 

जीर्णशीर्ण डायऱ्यांचे

फडफडे पान पान

भोगलेल्या आयुष्याची

श्रवणी ये मंद धून !

 

आषाढाच्या रानी तेव्हा

मोर स्वच्छंद नाचला

गेला झडुनिया सारा

इंद्रधनूचा पिसारा !

 

कधीचेच नि:संदर्भ

गावातील माझे घर

शेतमळ्यांच्या मध्यात

माझे बोडके शिवार !

 

भर दिवसाही येथे

अपरात्रीची शांतता

स्वगृहा यजमानाची

वाटे झाली भूतबाधा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 120 ☆ माणुसकीची गुढी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 120 ? 

☆ माणुसकीची गुढी…

माणुसकीची, गुढी उभारू

विकल्प मनीचा, सहज संपवू

आत्म-परीक्षण, करता आपण

माणुसकीला, सदैव टिकवू.!!

 

माणुसकीची, गुढी उभारू

भेदभाव मिटवून टाकू

अंधश्रद्धा, झुगारुनिया

तनमन राष्ट्रहितार्थ झोकू.!!

 

माणुसकीची, गुढी उभारू

एकमेका सहाय्य करू

स्वार्थ-विरहीत, जीवन जगता

सु-संकल्प पताका, हाती धरू.!!

 

माणुसकीची, गुढी उभारू

राग-द्वेषा, तिलांजली देऊ

एकदाच येणे, भू-तलावर

काही चांगले, करुनी जाऊ.!!

 

माणुसकीची, गुढी उभारू

थोरांचा तो, आदर्श घेऊ

अनेक जाहले, शूरवीर येथे

तयांचे शुद्ध, पोवाडे गाऊ.!!

 

माणुसकीची, गुढी उभारू

कवी राज मनी, हेच चिंती

पूर्ण आयु, ईश्वर चिंतन

असेलच मग, कुठलीच भीती.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बॅग कशी भरायची?…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “बॅग कशी भरायची?…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी….  

बॅग कशी भरायची ते *आता मला कळले आहे ! *

फापट पसारा आवरून सारा , 

आता सुटसुटीत व्हायचं  आहे  !

 

याच्यासाठी त्याच्यासाठी , हे हवं , ते हवं 

इथे तिथे – जाईन जिथे , तिथलं काही नवं  नवं 

हव्या हव्या चा हव्यास आता  प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 

*बॅग हलकी स्वतः पुरती * आता फक्त ठेवायची आहे ! 

बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! 

 

अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो 

*आयुष्याच्या होल्डॉल मध्ये *काय काय कोंबत होतो !

किती बॅगा किती अडगळ ! साठवून साठवून ठेवत होतो 

काय राहिलं, कुठे ठेवलं आठवून आठवून पाहत होतो 

त्या त्या वेळी ठीक होतं आता गरज सरली आहे, 

कुठे काय ठेवलंय ते ते *आता विसरून जायच आहे *

बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! 

 

खूप जणांनी खूप दिलं .. सुख दुखाःचं भान दिलं 

आपण कमी पडलो याचं शल्य आता विसरायचं आहे !

मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’ यातून बाहेर पडायचं आहे !

बॅग कशी भरायची ते  *आता मला कळले आहे ! *

 

आत बाहेर काही नको .. आत फक्त एक कप्पा, 

जना – मनात एकच साथी सृष्टी करता एकच देवबाप्पा ! 

सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचं आहे !

रिक्त -मुक्त होत होत अलगद विरक्त होत जायचं आहे .

… बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे… 

… बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे… 

 

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 51 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 51 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९५.

या जीवनाचा उंबरठा मी प्रथम ओलांडला

त्या क्षणाची जाणीव मला नव्हती.

मध्यरात्री अरण्यात कळी फुलावी तसं मला

उमलू देणारी ती शक्ती कोणती बरं?

 

सकाळी उजेडात डोळे उघडून पाहिले

तेव्हा आपण या जगात परके नाही,

हे क्षणात माझ्या ध्यानी आले.

माझ्या आईच्या रूपानं निनावी आकारहीनानं मला आपल्या

हातात घेतलं आहे असं मला जाणवलं.

 

माझ्या मृत्यूच्या वेळी सुद्धा तीच अनोळखी शक्ती

जशी मी तिला ओळखत होतो,प्रकटेल.

जीवनावर मी प्रेम केलं तसंच मी मरणावरही प्रेम करेन,

हे मला ठाऊक आहे.

 

माता आपल्या उजव्या स्तनाजवळून बालकाला

दूर करते तेव्हा ते रडतं,

पण ती त्याला डाव्या स्तनाला लावते

तेव्हा क्षणात त्याला समाधान लाभतं.

 

९६.

मी इथून जाईन तेव्हा जातानाचा निरोपाचा शब्द

हाच असावा –

मी इथं जे पाहिलं ते उत्कृष्ट आणि अद्वितीय होतं.

 

प्रकाश सागरावर बागडणाऱ्या कमळातील लपलेला मध मी चाखला आणि मी पुनीत झालो.

हाच माझा निरोपाचा शब्द असावा.

 

अगणित आकाशाच्या खेळघरात मी खेळलो

आणि निराकाराचं दर्शन मला इथं झालं.

 

जे शब्दातीत आहे त्याचा स्पर्श मला झाला

आणि माझं सर्वांग थरथरून गेलं.

 

शेवटच व्हायचा असेल तर तो इथंच व्हावा.

हाच माझा अखेरचा शब्द असावा.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन विहंग… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मन विहंग… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

कधी वाटते मला की फुलपाखरूच व्हावे

फुलाफुलातूनी पराग कण वाचावे.

 

कधी वाटते मला की स्वच्छंदी पाखरू   बनावे

आसमंत सारा विहरूनी विसावे

 

कधी वाटते मला की काजवाच व्हावे

चमकुनी रात्रीस सार्‍या प्रकाशमान  करावे.

 

कधी वाटते मला की मनावरी स्वार  व्हावे

जग पिंजुनीया सारे, क्षणात परतून यावे

 

कधी वाटते मला की नवल एक व्हावे

 जग सारे स्वच्छ नि निर्मळ बनावे.

 

कधी वाटते मला की माझ्यात मी विसावे

माझेच अंतरंग आरशापरी दिसावे

 

वाटणे हे सारे, स्वप्न परि नसावे

शब्दात उतरूनी सत्य-सत्य  व्हावे.

 

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरोप… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

अल्प परिचय

प्रणिता प्रशांत खंडकर (पूर्वाश्रमीची… ललिता कमलाकर कऱ्हाडकर)

जन्म आणि शालेय शिक्षण… शहापूर, जि. ठाणे.

महाविद्यालयीन शिक्षण.. मुलुंड काॅलेज आॅफ काॅमर्स… बी. काॅम.

एल. आय. सी. मध्ये छत्तीस वर्षे नोकरी करून, प्रशासनिक व्यवस्थापक या पदावरून नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.

एल. आय. सी. च्या मासिकं, त्रैमासिक यांमधून मराठी तसेच हिंदी कविता, कथा प्रसिद्ध आणि विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके.

‘अलवार’ हा कवितासंग्रह आणि ‘ अनाहत’ हा कथासंग्रह  प्रसिद्ध.

? कवितेचा उत्सव ?

☆ निरोप… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

(एका भारतीय सैनिकाच्या नववधूच्या भावना.. लग्नानंतर दोनच दिवसांनी तिचा पती  कर्तव्यपूर्तीसाठी सीमेवर जायला निघाला आहे. ती त्याला सांगतेय…)

 मी आताच होता भरला,

 हातात चुडा हा हिरवा.

 अन् रंग मेंदीचा हिरव्या,

  नुकताच लाल हा झाला.

  मी भाळावर रेखि येला,

   पूर्णचंद्र, सौभाग्याचा.

  या गळ्यात नाही रूळला,

   सर मणी मंगळसूत्राचा.

   शेजेवर विखुरलेला

   हा गंध फुलांचा ताजा,

   ओठांनी कसा स्मरावा,

    तो स्पर्श तुझा निसटता.

 

    ठाऊक आहेच मजला,

    कर्तव्याप्रतीची तव निष्ठा,

     पुसुनी क्षणात अश्रूंना

      मी औक्षण केले तुजला.

      हा वीरपत्नीचा बाणा,

      मी अंगिकारला आता,

      तू सुपुत्र भारतभूचा,

      अभिमान तुझा तिरंगा.

      जोडून दोन्ही मी हाता,

       प्रार्थीन या भगवंताला.

       विजयश्री लाभो तुजला,

       रक्षावे मम सौभाग्याला.

       

       भेटीची तुझ्या ही प्रतिक्षा,

       राहिल क्षणोक्षणी मजला.

       विजयाची तुझिया वार्ता,

       सुखवू दे मम गात्रांना.

 

© सुश्री प्रणिता खंडकर.

सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती.   लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवासी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते. पहिल्यांदा प्रवास करणारे मागे पडलेल्या मुंबईकडे बघून, नाहीतर समोर दिसणारी मोठमोठी जहाजे जसजशी जवळ येत होती तस तसे त्यांच्या प्रचंड आकारमानाकडे बघून अचंबित होत होती.

हजारो कंटेनर घेऊन जाणारे एक विशाल महाकाय जहाज जे एन पी टी मधुन निघून खोल समुद्राच्या दिशेने निघाले होते. लाँचला आडवे जाणाऱ्या जहाजाला जाऊ देण्याकरिता लाँचचा स्पीड कमी करण्यासाठी लाँच च्या सारंगा ने खाली इंजिन रुम मध्ये बांधलेल्या घंटेची दोरी वाजवून खालच्या डेकवरील खलाशाला सूचना दिली. त्याने इंजिनचा आर पी एम कमी केला आणि लाँच काही वेळ पुढे न जाता जागेवर थांबली. माचीस बॉक्स एकावर एक ठेवले जावेत तसे हजारो कंटेनर एकमेकांवर लादून ते महाकाय जहाज एखाद्या ऐरावताप्रमाणे ऐटीत समुद्राला कापत पुढल्या सफरीला निघाले होते. जहाजाच्या पाठीमागे समुद्राच्या लाटांना कापून लघुकोनात निघून दोन लाटा एकमेकांपासून दूर जात होत्या. एक लाट लाँचच्या दिशेने आली आणि लाँचला हेलकावून निघून गेली.

सारंग ने पुन्हा एकदा दोरी ओढून घंटा वाजवली आणि खलाशाने इंजिनच्या आर पी एम ला पूर्ववत करून लाँचचा स्पीड वाढवला.

सगळ्यांच्या नजरा कंटेनर घेऊन जाणाऱ्या त्या महाकाय जहाजाकडे लागल्या होत्या. काही वेळाने जसजशी मुंबई आणि मोठं मोठी जहाजे मागे गेली तसं प्रत्येकजण स्वस्थपणे बसून समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत निवांत बसले.

लाँच मध्ये एक पंचविशीतील तरुण जोडपं बसलं होतं. त्यांचं नवीनच लग्न झालेलं असावं कारण त्यांच्या अंगावरची हळद अजूनही उतरली नव्हती. त्यातल्या तरुणाला फक्त एकच डोळा होता,  त्याला दुसरा डोळाच नव्हता, खोबणीत डोळा नसल्याने खाच पडलेली होती. त्याच्या बायकोने गॉगल घातला होता आणि ती त्याला खेटूनच बसली होती. लाँच मधील जवळपास सगळ्यांचेच त्याच्याकडे लक्ष जात होते.  त्याला पण  सगळ्यांच्या त्यांच्याकडे बघणाऱ्या नजरा दिसत होत्या. बऱ्याच जणांच्या मनात आले की ह्या तरुणाने त्याच्या बायकोने  घातलाय  तसा काळा चष्मा किंवा गॉगल का नाही लावला. त्याचा नसलेला डोळा निदान गॉगलच्या आड लपला तरी असता.

समोर बसलेल्या एका आठ नऊ वर्षांच्या लहान मुलाने  तर त्याच्याकडे बघुन त्यांच्या आईला विचारत होती, आई त्या अंकलचा एक डोळा कुठे आहे. त्याच्या आईने त्याला सांगितले त्यांना एक डोळा नाहीये, पण दुसरा तर आहे ना.

तेवढ्यात तो तरुण त्या मुलाला म्हणाला बाळा तुझे नांव काय, मुलाने त्याचे नांव आर्यन सांगितले.

‘बरं आर्यन, माझा एक डोळा ना मी तुझ्याएवढा असताना एका अपघातात गेला. मी खेळताना रस्त्याच्या कडेला जमिनीत उभ्या केलेल्या लोखंडी सळई वर पडलो.  नशीब सळई डोळ्यातून आरपार जाऊन माझ्या डोक्याच्या आरपार नाही निघाली.

आर्यनने त्याला विचारले, ‘मग अंकल तुम्हाला एका डोळ्याने सगळं दिसतं का’ 

त्यावर तो म्हणाला, ‘आर्यन माझे नांव प्रसाद आहे, मला तू प्रसाद अंकल म्हणून हाक मार. मला एका डोळ्याने दिसतं पण एका डोळ्याने कसे दिसते ते बघायचे आहे का तुला?’ आर्यनने उत्सुकतेने ‘हो’ म्हटले. 

प्रसाद ने त्याला रुमाल आहे का विचारले, त्याने माझ्याकडे नाही पण आईचा आहे सांगितले आणि आईकडून रुमाल मागून प्रसादकडे दिला. प्रसादने रुमालाची घडी घालून आर्यनच्या एका डोळ्यावर असा बांधला की आर्यनला त्याच्या उघड्या असलेल्या एकाच डोळ्यातून दिसू शकेल. प्रसादने त्याला विचारले, ‘काय मग आर्यन दिसतं की नाही एका डोळ्याने?’

आर्यन म्हणाला प्रसाद अंकल दिसतंय पण दोन डोळ्यांनी जसं दिसतं तसे नाही दिसत.’

प्रसाद त्याला म्हणाला, ‘माझा अपघात झाल्यावर मलासुद्धा असेच वाटायचे पण हळूहळू सवय झाली. मला एकाच डोळ्यातून सगळं दिसतं आणि आता दोन डोळ्यांनी मला किती दिसायचे हे आठवत सुद्धा नाही.’

‘पण आर्यन तुला माहिती आहे का ही माझ्या बाजूला बसलीय ना माझी बायको तिला तर दोन्हीही डोळ्यांनी दिसत नाही. मला तर नऊ वर्षांचा होईपर्यंत दोन्हीही डोळ्यांनी दिसायचे आणि आता तर निदान एका डोळ्याने  तरी दिसतेय पण हिला तर ती जन्मल्यापासून काहीच दिसत नाही.’

प्रसाद जे सांगत होता ते ऐकून आर्यनच्या, त्याच्या आईच्या आणि आजूबाजूला बसलेल्या इतर सर्वांच्या मनात कालवाकालव झाली. प्रसाद आणि त्याच्या बायकोबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आर्यन च्या बालमनाला थोडं अचंबित होण्याव्यतिरिक्त  काही प्रश्न निर्माण झाले नाहीत पण त्याच्या आईला आणि शेजारी बसलेल्या जाणत्या व्यक्तींना वाटले की, ह्याला एका डोळ्याने दिसत असूनही जन्मजात आंधळ्या मुलीसोबत याने लग्न का बरं केले असावे?

लाँच हेलकावे खात मांडवा जेट्टीपासून वीस पंचवीस मिनिटांवर आली होती. समुद्रातील सी गल पक्षी लाँच भोवती घिरट्या घालू लागले, लाँच मधील प्रवासी त्यांना वेफर आणि कुरकुरे हवेत भिरकावून खायला देऊ लागले.  सी गल पक्षी हेवेतल्या हवेत ते पकडत क्वचितच एखादा वेफर पाण्यात पडत असे. आर्यन सुद्धा मजा बघत होता, कोणी व्हिडीओ काढत होते तर कोणी फोटो.  सी गल पक्ष्यांना खायला देऊ नका,  जंक फूड त्यांचा आहार नाही अशा सूचनांचे पोस्टर असूनही बरेच प्रवासी त्यांना खायला देण्यासाठी लाँच मधूनच  कुरकुरे आणि वेफर खरेदी करत होते. प्रसादने पलीकडे हाताने इशारा करुन, आईला जवळ बोलावले. प्रसादची आई आली आणि आर्यनच्या आई शेजारी बसली. 

प्रसादच्या आईच्या कपाळावर कुंकू नव्हते, एक साधीशी नऊवारी साडी तिने नेसली होती.  तिचं व्यक्तिमत्व हसरं आणि प्रसन्न होतं. बसताना ती म्हणाली, ‘अरे प्रसाद जा की आरतीला घेऊन, तिचे फोटो काढून घे की मोबाईल मध्ये.’

प्रसाद ने आरतीच्या हाताला धरले आणि तो लाँचच्या मधल्या मोकळ्या जागेकडे जाऊ लागला.

उभं राहिल्यावर अंध आरतीच्या चेहऱ्यावर लाँच हेलकावत असल्याने जशी लाँच समुद्रात तरंगते तशी ती लाँच मध्ये नाही तर हवेत तरंगतेय असे भाव स्पष्टपणे  दिसायला लागले.  डोळेच नाही तर, समुद्र काय आणि त्याच्यावर तरंगतय काय हे कोणी सांगून कसं कळणार पण कदाचित आरती आयुष्यात पहिल्यांदाच तरंगणे अनुभवता होती. प्रसाद तिला आपुलकीने मोकळ्या जागेत हाताला धरून उभा होता.  त्याने आर्यनला बोलावून दोघांचे फोटो काढायला सांगितले.  आर्यनने आनंदाने त्यांच्या दोघांचे खुप फोटो काढले. प्रसाद आरतीला लाँचच्या रेलिंग जवळ घेऊन गेला॰ तिचे दोन्ही हात रेलिंगवर टेकवून तिला म्हणाला आता तूच अनुभव लाँचचे हेलकावणे. आरती समुद्राचा गार वारा आणि लाटांमधून बाहेर पडणारे अनंत तुषार अंगावर पडताना अनुभव होती.

आर्यन आईकडे येऊन म्हणाला की, आई प्रसाद अंकल ने एवढे फोटो काढले पण बिचारी आरती आंटी ते बघूच  नाही ना शकणार!

बाजूला बसलेल्या प्रसादच्या आईने हे ऐकले. ती म्हणाली ‘बाळा, आरती पण बघू शकेल फोटो म्हणून तर मी प्रसादला सांगितले न की फोटो काढ म्हणून. आम्ही पुन्हा समुद्रात फिरायला येऊ किंवा नाही पण इथल्या आठवणी तर राहिल्या पाहिजेत की नाही.’

आर्यनच्या आईने प्रसादच्या आईकडे बघून विचारले, ‘काकी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का?’

प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली.

क्रमश: – भाग १

लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुमनांच्या बगिचामध्ये…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? सुमनांच्या बगिचामध्ये… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

त्याग करावा ना लागे काही

मोद हासरा भोवती राही

त्या गं कुसुमांच्या गावामध्ये

गंध रवी अस्ता जात नाही॥

या सुमनांच्या बगिचामध्ये

रंगगंध गंमत जंमत

या तुम्हीही छान गावात

अनुभवा रंगत संगत॥

सूर आळवीत कोणी राणी

गात बसते मधाळ गाणी

सूरही होती मोहित आणि

दंगूनी ऐकती गोड वाणी॥

राग लोभ विकारांवरती

जय येथ सारे मिळवती

राग वनराणी जे छेडती

विहरणारे भान हरती॥

जागा अशी मनात भरते

रोज रोज जावेसे वाटते

जा, गा, मना हर्षूनी तिथे तू

कानी कोण हे मला सांगते?

शिरा-शिरातुन चैतन्याचे

आपसुक रुधिर वाहते

शिरा तुम्हीही गंध गुहेत

जिथे मनमोहिनी राहते॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाफा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ चाफा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मन चाफ्यात रमले

चाफाच होऊन गेले

हृदयाचे पान,भाव

मौनच पवित्र झाले.

प्रेमाचे स्तब्ध हे नाते

संवाद पाकळी बंद

लोचनाचे बोल ओठी

शब्द कवणाचे छंद.

हळुच झुळूक एक

वार्याचा स्पर्श अनोखी

स्मृतींना हलकी जाण

चाफा झुलतोच झोकी.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares