मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती.   लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवासी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते. पहिल्यांदा प्रवास करणारे मागे पडलेल्या मुंबईकडे बघून, नाहीतर समोर दिसणारी मोठमोठी जहाजे जसजशी जवळ येत होती तस तसे त्यांच्या प्रचंड आकारमानाकडे बघून अचंबित होत होती.

हजारो कंटेनर घेऊन जाणारे एक विशाल महाकाय जहाज जे एन पी टी मधुन निघून खोल समुद्राच्या दिशेने निघाले होते. लाँचला आडवे जाणाऱ्या जहाजाला जाऊ देण्याकरिता लाँचचा स्पीड कमी करण्यासाठी लाँच च्या सारंगा ने खाली इंजिन रुम मध्ये बांधलेल्या घंटेची दोरी वाजवून खालच्या डेकवरील खलाशाला सूचना दिली. त्याने इंजिनचा आर पी एम कमी केला आणि लाँच काही वेळ पुढे न जाता जागेवर थांबली. माचीस बॉक्स एकावर एक ठेवले जावेत तसे हजारो कंटेनर एकमेकांवर लादून ते महाकाय जहाज एखाद्या ऐरावताप्रमाणे ऐटीत समुद्राला कापत पुढल्या सफरीला निघाले होते. जहाजाच्या पाठीमागे समुद्राच्या लाटांना कापून लघुकोनात निघून दोन लाटा एकमेकांपासून दूर जात होत्या. एक लाट लाँचच्या दिशेने आली आणि लाँचला हेलकावून निघून गेली.

सारंग ने पुन्हा एकदा दोरी ओढून घंटा वाजवली आणि खलाशाने इंजिनच्या आर पी एम ला पूर्ववत करून लाँचचा स्पीड वाढवला.

सगळ्यांच्या नजरा कंटेनर घेऊन जाणाऱ्या त्या महाकाय जहाजाकडे लागल्या होत्या. काही वेळाने जसजशी मुंबई आणि मोठं मोठी जहाजे मागे गेली तसं प्रत्येकजण स्वस्थपणे बसून समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत निवांत बसले.

लाँच मध्ये एक पंचविशीतील तरुण जोडपं बसलं होतं. त्यांचं नवीनच लग्न झालेलं असावं कारण त्यांच्या अंगावरची हळद अजूनही उतरली नव्हती. त्यातल्या तरुणाला फक्त एकच डोळा होता,  त्याला दुसरा डोळाच नव्हता, खोबणीत डोळा नसल्याने खाच पडलेली होती. त्याच्या बायकोने गॉगल घातला होता आणि ती त्याला खेटूनच बसली होती. लाँच मधील जवळपास सगळ्यांचेच त्याच्याकडे लक्ष जात होते.  त्याला पण  सगळ्यांच्या त्यांच्याकडे बघणाऱ्या नजरा दिसत होत्या. बऱ्याच जणांच्या मनात आले की ह्या तरुणाने त्याच्या बायकोने  घातलाय  तसा काळा चष्मा किंवा गॉगल का नाही लावला. त्याचा नसलेला डोळा निदान गॉगलच्या आड लपला तरी असता.

समोर बसलेल्या एका आठ नऊ वर्षांच्या लहान मुलाने  तर त्याच्याकडे बघुन त्यांच्या आईला विचारत होती, आई त्या अंकलचा एक डोळा कुठे आहे. त्याच्या आईने त्याला सांगितले त्यांना एक डोळा नाहीये, पण दुसरा तर आहे ना.

तेवढ्यात तो तरुण त्या मुलाला म्हणाला बाळा तुझे नांव काय, मुलाने त्याचे नांव आर्यन सांगितले.

‘बरं आर्यन, माझा एक डोळा ना मी तुझ्याएवढा असताना एका अपघातात गेला. मी खेळताना रस्त्याच्या कडेला जमिनीत उभ्या केलेल्या लोखंडी सळई वर पडलो.  नशीब सळई डोळ्यातून आरपार जाऊन माझ्या डोक्याच्या आरपार नाही निघाली.

आर्यनने त्याला विचारले, ‘मग अंकल तुम्हाला एका डोळ्याने सगळं दिसतं का’ 

त्यावर तो म्हणाला, ‘आर्यन माझे नांव प्रसाद आहे, मला तू प्रसाद अंकल म्हणून हाक मार. मला एका डोळ्याने दिसतं पण एका डोळ्याने कसे दिसते ते बघायचे आहे का तुला?’ आर्यनने उत्सुकतेने ‘हो’ म्हटले. 

प्रसाद ने त्याला रुमाल आहे का विचारले, त्याने माझ्याकडे नाही पण आईचा आहे सांगितले आणि आईकडून रुमाल मागून प्रसादकडे दिला. प्रसादने रुमालाची घडी घालून आर्यनच्या एका डोळ्यावर असा बांधला की आर्यनला त्याच्या उघड्या असलेल्या एकाच डोळ्यातून दिसू शकेल. प्रसादने त्याला विचारले, ‘काय मग आर्यन दिसतं की नाही एका डोळ्याने?’

आर्यन म्हणाला प्रसाद अंकल दिसतंय पण दोन डोळ्यांनी जसं दिसतं तसे नाही दिसत.’

प्रसाद त्याला म्हणाला, ‘माझा अपघात झाल्यावर मलासुद्धा असेच वाटायचे पण हळूहळू सवय झाली. मला एकाच डोळ्यातून सगळं दिसतं आणि आता दोन डोळ्यांनी मला किती दिसायचे हे आठवत सुद्धा नाही.’

‘पण आर्यन तुला माहिती आहे का ही माझ्या बाजूला बसलीय ना माझी बायको तिला तर दोन्हीही डोळ्यांनी दिसत नाही. मला तर नऊ वर्षांचा होईपर्यंत दोन्हीही डोळ्यांनी दिसायचे आणि आता तर निदान एका डोळ्याने  तरी दिसतेय पण हिला तर ती जन्मल्यापासून काहीच दिसत नाही.’

प्रसाद जे सांगत होता ते ऐकून आर्यनच्या, त्याच्या आईच्या आणि आजूबाजूला बसलेल्या इतर सर्वांच्या मनात कालवाकालव झाली. प्रसाद आणि त्याच्या बायकोबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आर्यन च्या बालमनाला थोडं अचंबित होण्याव्यतिरिक्त  काही प्रश्न निर्माण झाले नाहीत पण त्याच्या आईला आणि शेजारी बसलेल्या जाणत्या व्यक्तींना वाटले की, ह्याला एका डोळ्याने दिसत असूनही जन्मजात आंधळ्या मुलीसोबत याने लग्न का बरं केले असावे?

लाँच हेलकावे खात मांडवा जेट्टीपासून वीस पंचवीस मिनिटांवर आली होती. समुद्रातील सी गल पक्षी लाँच भोवती घिरट्या घालू लागले, लाँच मधील प्रवासी त्यांना वेफर आणि कुरकुरे हवेत भिरकावून खायला देऊ लागले.  सी गल पक्षी हेवेतल्या हवेत ते पकडत क्वचितच एखादा वेफर पाण्यात पडत असे. आर्यन सुद्धा मजा बघत होता, कोणी व्हिडीओ काढत होते तर कोणी फोटो.  सी गल पक्ष्यांना खायला देऊ नका,  जंक फूड त्यांचा आहार नाही अशा सूचनांचे पोस्टर असूनही बरेच प्रवासी त्यांना खायला देण्यासाठी लाँच मधूनच  कुरकुरे आणि वेफर खरेदी करत होते. प्रसादने पलीकडे हाताने इशारा करुन, आईला जवळ बोलावले. प्रसादची आई आली आणि आर्यनच्या आई शेजारी बसली. 

प्रसादच्या आईच्या कपाळावर कुंकू नव्हते, एक साधीशी नऊवारी साडी तिने नेसली होती.  तिचं व्यक्तिमत्व हसरं आणि प्रसन्न होतं. बसताना ती म्हणाली, ‘अरे प्रसाद जा की आरतीला घेऊन, तिचे फोटो काढून घे की मोबाईल मध्ये.’

प्रसाद ने आरतीच्या हाताला धरले आणि तो लाँचच्या मधल्या मोकळ्या जागेकडे जाऊ लागला.

उभं राहिल्यावर अंध आरतीच्या चेहऱ्यावर लाँच हेलकावत असल्याने जशी लाँच समुद्रात तरंगते तशी ती लाँच मध्ये नाही तर हवेत तरंगतेय असे भाव स्पष्टपणे  दिसायला लागले.  डोळेच नाही तर, समुद्र काय आणि त्याच्यावर तरंगतय काय हे कोणी सांगून कसं कळणार पण कदाचित आरती आयुष्यात पहिल्यांदाच तरंगणे अनुभवता होती. प्रसाद तिला आपुलकीने मोकळ्या जागेत हाताला धरून उभा होता.  त्याने आर्यनला बोलावून दोघांचे फोटो काढायला सांगितले.  आर्यनने आनंदाने त्यांच्या दोघांचे खुप फोटो काढले. प्रसाद आरतीला लाँचच्या रेलिंग जवळ घेऊन गेला॰ तिचे दोन्ही हात रेलिंगवर टेकवून तिला म्हणाला आता तूच अनुभव लाँचचे हेलकावणे. आरती समुद्राचा गार वारा आणि लाटांमधून बाहेर पडणारे अनंत तुषार अंगावर पडताना अनुभव होती.

आर्यन आईकडे येऊन म्हणाला की, आई प्रसाद अंकल ने एवढे फोटो काढले पण बिचारी आरती आंटी ते बघूच  नाही ना शकणार!

बाजूला बसलेल्या प्रसादच्या आईने हे ऐकले. ती म्हणाली ‘बाळा, आरती पण बघू शकेल फोटो म्हणून तर मी प्रसादला सांगितले न की फोटो काढ म्हणून. आम्ही पुन्हा समुद्रात फिरायला येऊ किंवा नाही पण इथल्या आठवणी तर राहिल्या पाहिजेत की नाही.’

आर्यनच्या आईने प्रसादच्या आईकडे बघून विचारले, ‘काकी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का?’

प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली.

क्रमश: – भाग १

लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुमनांच्या बगिचामध्ये…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? सुमनांच्या बगिचामध्ये… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

त्याग करावा ना लागे काही

मोद हासरा भोवती राही

त्या गं कुसुमांच्या गावामध्ये

गंध रवी अस्ता जात नाही॥

या सुमनांच्या बगिचामध्ये

रंगगंध गंमत जंमत

या तुम्हीही छान गावात

अनुभवा रंगत संगत॥

सूर आळवीत कोणी राणी

गात बसते मधाळ गाणी

सूरही होती मोहित आणि

दंगूनी ऐकती गोड वाणी॥

राग लोभ विकारांवरती

जय येथ सारे मिळवती

राग वनराणी जे छेडती

विहरणारे भान हरती॥

जागा अशी मनात भरते

रोज रोज जावेसे वाटते

जा, गा, मना हर्षूनी तिथे तू

कानी कोण हे मला सांगते?

शिरा-शिरातुन चैतन्याचे

आपसुक रुधिर वाहते

शिरा तुम्हीही गंध गुहेत

जिथे मनमोहिनी राहते॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाफा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ चाफा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मन चाफ्यात रमले

चाफाच होऊन गेले

हृदयाचे पान,भाव

मौनच पवित्र झाले.

प्रेमाचे स्तब्ध हे नाते

संवाद पाकळी बंद

लोचनाचे बोल ओठी

शब्द कवणाचे छंद.

हळुच झुळूक एक

वार्याचा स्पर्श अनोखी

स्मृतींना हलकी जाण

चाफा झुलतोच झोकी.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 142 – समन्वय ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 142 – समन्वय ☆

समन्वय सुख दुःखाचा

मार्ग सुलभ जगण्याचा।

मन बुद्धी या दोहोंचा

मेळ घडावा सर्वांचा।

यश कीर्तीच्या शिखरी

उत्तुंग मनाची भरारी।

परी असावे रे स्थिर

ध्येय असावे करारी |

घेता सुखाचा अस्वाद

राहो दुःखी  तांचे भान।

क्षण दुःखी व सुखद

मिळो समबुद्धी चे दान

हक्क कर्तव्य कारणे

राही सदैव तत्पर ।

लेवू हक्काची भूषणे

करू कर्तव्ये सत्वर ।

जीवन उत्सवा आवडी

प्रेम रागाची ही जोडी।

लाभो द्वेषालाही थोडी

प्रेम वात्सल्याची गोडी

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त )

ऋषी – मेधातिथि काण्व : देवता – इंद्र, अग्नि

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकविसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्रदेवतेला आणि अग्निदेवतेला आवाहने केलेली आहेत. त्यामुळे हे सूक्त इंद्राग्नि सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद 

इ॒हेन्द्रा॒ग्नी उप॑ ह्वये॒ तयो॒रित्स्तोम॑मुश्मसि । ता सोमं॑ सोम॒पात॑मा ॥ १ ॥

देवेंद्राला  गार्ह्यपत्या अमुचे आवाहन

आर्त होउनी उभयतांचे त्या करितो स्तवन

त्या दोघांना सोमरसाची मनापासुनी रुची

सोमपान करुनिया करावी तृप्ती इच्छेची ||१||

ता य॒ज्ञेषु॒ प्र शं॑सतेन्द्रा॒ग्नी शु॑म्भता नरः । ता गा॑य॒त्रेषु॑ गायत ॥ २ ॥

इंद्राचे अन् अग्नीचे या यज्ञी स्तवन करा

हे मनुजांनो अलंकार स्तुति त्यांना अर्पण करा

स्तोत्रे गाउनिया दोघांची प्रसन्न त्यांना करा

आशिष घेउनी उभयतांचे यज्ञा सिद्ध करा ||२||

ता मि॒त्रस्य॒ प्रश॑स्तय इंद्रा॒ग्नी ता ह॑वामहे । सो॒म॒पा सोम॑पीतये ॥ ३ ॥

इन्द्राग्नी यज्ञासी यावे करितो आवाहन 

सोमरसाचे प्राशन करिण्या करितो पाचारण 

सन्मानास्तव मित्राचा तुम्हासी आमंत्रण

सोमपात्र भरलेले करितो तुम्हासी अर्पण ||३||

उ॒ग्रा सन्ता॑ हवामह॒ उपे॒दं सव॑नं सु॒तम् । इ॒न्द्रा॒ग्नी एह ग॑च्छताम् ॥ ४ ॥

सिद्ध करुनिया हवी ठेवला या वेदीवरती

अर्पण करण्या इंद्राग्निंना आतुर अमुची मती

उग्र असुनिही उदार इन्द्र आणि अग्नी देवता

स्वीकाराया हविर्भाग हा यज्ञी यावे आता ||४||

ता म॒हान्ता॒ सद॒स्पती॒ इंद्रा॑ग्नी॒ रक्ष॑ उब्जतम् । अप्र॑जाः सन्त्व॒त्रिणः॑ ॥ ५ ॥

समस्त जनतेचे रक्षक तुम्ही चंड बलवान

अग्निदेवते सवे घेउनी करता संरक्षण

दुष्ट असुरांना निर्दाळुनी तुम्ही करा शासन

शौर्याने तुमच्या कुटिलांचे होवो निःसंतान ||५||

तेन॑ स॒त्येन॑ जागृत॒मधि॑ प्रचे॒तुने॑ प॒दे । इंद्रा॑ग्नी॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ६ ॥

चैतन्याच्या तेजाने उज्ज्वल तुमचे स्थान

कृपा करुनिया आम्हावरती व्हावे विराजमान

सत्यमार्गी ही तुमची कीर्ति दिगंत विश्वातून 

जागुनिया तुमच्या महिमेला करी सौख्य दान ||६||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.  त्यामुळे आपल्याला गीत ऋग्वेदातील नवनवीन गीते आणि इतरही कथा, कविता व गीते प्रसारित केल्या केल्या समजू शकतील.  चॅनलला सबस्क्राईब करणे निःशुल्क आहे.)

https://youtu.be/U07wHkVNtT4

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 21

Rugved Mandal 1 Sukta 21

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ माय मराठी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 जन्म कुसुमाग्रजांचा ,

  सौभाग्य महाराष्ट्रा चे!

 लाभे कृपा शारदेची ,

   भाग्यवंत आम्ही येथे !

 

 माय मराठी रुजली,

  अमुच्या तनामनात!

 दूध माय माऊलीचे,

  प्राशिले कृतज्ञतेत !

 

साहित्य अंकी खेळले,

 लेख, कथा अन् काव्य!

माऊलीने उजळले ,

 ज्ञानदीप भव्य- दिव्य!

 

घेतली मशाल हाती ,

 स्फुरे महाराष्ट्र गान !

भक्तीचे अन् शौर्याचे,

 राखले जनी हे भान!

 

 ज्ञानेश्वरी ज्ञानयाची,

  सोपी भाषा तुकयाची!

 मराठी रामदासांची ,

   समृद्धी माय मराठीची!

 

 सौंदर्यखनी मराठी,

  कौतुक तिचे करू या!

 मी महाराष्ट्रीय याचा,

  अभिमान बाळगू या!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #164 ☆ मौलिक आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 164 – विजय साहित्य ?

☆ मौलिक आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

(अष्टांक्षरी रचना…)

एक धागा सुखाचा रे

पदोपदी गुंफलेला

आठवांच्या मागावर

ताना बाना सांधलेला,..! १

 

बाल तारूण्य वार्धक्य

एक धागा जरतारी

वस्त्र तीन रंगातले

आत्मरंगी कलाकारी…! २

 

आठवांचे मोरपीस

बंध हळव्या शब्दांचे

भावनांचे कलाबूत

हार काळीज फुलांचे…! ३

 

सुख नाही रे जिन्नस

त्याचा नसावा व्यापार

काळजाच्या वेदनेला

सुख मौलिक आधार…! ४

 

एक धागा सुखमय

ठेवी नात्यांना बांधून

स्वभावाचे दोष सारे

घेती आयुष्य सांधून…! ५

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ माय मराठी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

माय मराठी भाषेचा

वाजे जगभर डंका

तिच्या रंग-रूपाला चढे

अलंकारीत साज नवखा

 

भाव थोर मनी जपावा

माय मराठी बोलीचा

मुखातून गोड यावा

शब्द शब्द थोरवीचा

 

माय मराठीची महती

शिळा सह्याद्रीच्या गाती

समुद्राच्या लाटांसंगती

अमृत होऊन फेसाळती

 

माय मराठी आमुचा प्राण

आमुच्या बोलीचा अभिमान

इथे दर्याखोर्या घुमवती

माय मराठीपणाची आण

 

भजन,भारूड असो ओवी

गीतातून मराठी रूळती

मराठीची महान थोरवी

तुकोबा, ज्ञानोबास गौरवी

 

मराठी पाखरांच्या किलबिलात

मराठी सळसळ वार्‍यासंग

पानाफुलांच्या रंग-रूपात

मराठी नदी सागराचा खळखळाट

 

मराठी रूजावी मनामनात

मराठी नांदावी गावागावात

माझी थोर माय मराठी

नवखावी साऱ्या जगात

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #150 ☆ संत चोखामेळा… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 150 ☆ संत चोखामेळा… ☆ श्री सुजित कदम ☆

वैदर्भीय संतकवी

संत चोखोबा महार

सामाजिक विषमता

दूर केली तत्त्वाकार…! १

 

दैन्य दारिद्रय वैफल्य

गेले चोखा त्रासुनीया

जाती बांधव उद्धार

आला विठू धावुनीया…! २

 

हरिभक्त परायण

झाला आप्त परिवार

परमार्थ अध्यात्माचा

केला प्रचार प्रसार…! ३

 

चोखामेळा  कर्म गाथा

साडे तीनशे अभंग

विठ्ठलाच्या चिंतनात

दंग झाले अंतरंग…! ४

 

नामस्मरणाचा वसा

गुण संकीर्तन ठेवा

जातीभेद झुगारून

केली समाजाची सेवा…! ५

 

भावविश्व चोखोवांचे

वास्तवाचे संवेदन

अन्यायाची अनुभूती

वेदनांची  आक्रंदन…! ६

 

भक्ती काव्य व्यासंगाने

दिला वेदनेस सूर

चोखोबांच्या अभंगात

भाव भावनांचा पूर…! ७

 

जात संघर्षाची तेढ

दूर केली संघर्षाने

स्पृश्य अस्पृश्य विवाद

दिला लढा प्रकर्षाने…! ८

 

भक्ती तळमळ निष्ठा

चोखा प्रेमाचे आगर

भाव विभोरता शब्दी

चोखा भक्तिचा सागर…! ९

 

कुटुंबाने जोपासली

संत कवी परंपरा

पत्नी पुत्र बहिणीने

अभंगार्थ केला खरा…! १०

 

कर्ममेळा पुत्र आणि

पत्नी सोयरा आरसा

बंका निर्मळा  आप्तांनी

नेला पुढे हा वारसा…! ११

 

प्राणसखा ज्ञानेश्वर

चोखोबांच्या अभंगात

विठू पाटलाचा दास

संत चोखा समाजात…! १२

 

गावकुस कामकाज

झाला एक अपघात

चोखा झाले स्वर्गवासी

विठू नाम अंतरात…! १४

 

चोखोबांच्या हाडातूंन

विठ्ठलाचा होई नाद

भक्ती अनादी अनंत

घाली पांडुरंगा साद….! १५

 

संत चोखोबा समाधी

महाद्वारी पंढरीत

विचारांचा झाला ग्रंथ

देवालय पायरीत…! १६

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गुरूदेव दत्त… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? गुरूदेव दत्त… ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

कटी नेसून पितांबर

उभे दत्तात्रय गाभारी,

शांत प्रकाश समयांचा

तेज विलसे मुखावारी !

अशा प्रसन्न मंदिरात

दत्त भजावा परोपरी,

जाता शरण मनोभावे

चिंता कशास उरे उरी !

छायाचित्र – दीपक मोदगी, ठाणे.

© श्री प्रमोद वामन वर्तक

२१-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares