☆ माझे मृत्यूपत्र… – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆
(देशभक्त वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.)
माझे मृत्युपत्र या कवितेचे रसग्रहण.
सावरकरांना न ओळखणारा या पृथ्वीतलावर विरळाच. भारतमातेच्या मुकुटातील हा दैदिप्यमान हिराच.mयांचे अमरत्व म्हणजे यांचा जाज्वल्य देशाभिमान, देशभक्ती, उदात्त देशप्रेम होय. भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला तोडण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवासमोर शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.
असा हा तेजस्वी तारा भारतीय क्षितिजावर चमकत राहिला..
स्वातंत्र्य वीर सावरकर हे उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.यांनी साहित्याच्या सर्व दालनात प्रवेश केला.यांचे साहित्य सर्व व्यापी आहे.
माझे मृत्युपत्र हे यांचे वहिनीस लिहिलेले पत्रात्मक काव्य आहे.
राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना इंग्रजांनी पकडले. त्यांना पन्नास वर्षांची काळया पाण्याची शिक्षा जाहीर केली. यातून आपली सुटका नाही.हे त्यांनी जाणले. हे कटू सत्य वहिनीला कसे सांगायचे? घरची परिस्थिती मोठी प्रतिकूल होती.१९०९मध्ये त्यांच्या मोठया भावाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचा चार वर्षांचा मुलगा देवाघरी गेलेला. अशा परिस्थितीत ही मर्मभेदी गोष्ट कशी सांगावी या विचारात ते असताना काव्य प्रतिभा हात जोडून उभी राहिली.असा हा या कवितेचा जन्म.ही कविता देशभक्ती ने ओथंबली आहे.आजपर्यत अनेक कवींनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या.परंतु झाले बहु, होतील बहु परी या सम नसे.
☆ माझे मृत्यूपत्र… ☆
हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले,
वकृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,
तुतेची अर्पियली नवी कविता रसाला
लेखाप्रती विषय तुचिं अनन्य झाला.
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रियमित्रसंघा
केले स्वयें दहन यौवन देह भोगा
तत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा
त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमता
दावानलात वहिनी नव पुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्य सिंधू
त्वत्स्थंडिली वरी प्रिय बाळ झाला
त्वत्स्थंडिली वरी आता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्स्थंडिली च असते,दिधले बळी मी
की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे
बुद्धयाची वाण धरिले सतीचे.
माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी
हा वत्सवत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हाते
आलिंगन प्रियकरा मम अंगनेते
प्रस्तुत कविता सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्ती चे प्रतीक आहे. सावरकरांची त्यागी भावना दर्शविणाऱ्या या ओळी बघु या.
हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले
या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्नि कुंडात
माझा परिवार, मित्र, यौवन सारे भोग
यांची आहुती दिली आहे.
या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या काव्यातील शब्दसंपदा संस्कृत प्रचुर आहे.या काव्यात वीर रसाला करूण रसाची झालर लावली आहे.
भगवान् श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचे प्रबोधन केले व त्यात ज्ञान,कर्म, भक्ती या योगांची माहिती दिली.सावरकर हे बुद्धिमत्तेचे पुतळे होते.त्यांनी ज्ञान,कर्म,भक्ती मार्गाचा अवलंब केला. ही कविता राष्ट्रीय भावनेची व देशभक्ती ने ओतप्रोत भरलेली आहे. कविता आशय संपन्न आहे.
आम्ही हे मातृभूमीची सेवा आंधळेपणाने घेतली नसून डोळे उघडे ठेवून घेतली आहे. कवि म्हणतो की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ठिकठिकाणी सावरकरांचे मातृभूमी विषयीचे प्रेम कळसास पोहचले आहे. सावरकरांचा निस्वार्थी भाव या ओळीत दिसून येतो
हे आपले कुलही त्यामध्ये ईश्र्वरांश
निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश
सावरकरांना पुढील चित्र दिसत असून ते त्यांनी सुंदर विरोधाभास अंलकाराने रेखाटले आहे.
हिंदुस्थान हा आमचा देश आहे. आमच्या देशात आमचेच राज्य हवे या तत्वनिष्ठ स्वभामुळे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.
त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे.
अंदमानच्या काळ्याभोर कोठडीत खिळ्यांचया साह्याने भिंतीवर लिहिलेली कविता आहे.या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभेला आमचा खरोखरी सलाम.
फुंकर.. किती सुंदर अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता. आणि अस्फुट ऐकूही येतो, फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.
… फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.
☆ फुंकर … ☆
धनी निघाले शेतावरती
बांधून देण्या भाजी भाकर
चुलीत सारून चार लाकडे
निखार्यावरी घाली फुंकर।
माय जाणते दमले खेळून
बाळ भुकेले स्नानानंतर
बशी धरूनी दोन्ही हातानी
दुधावरती हळूच फुंकर।
कुसुम कोमल तान्हे बालक
चळवळ भारी करी निरंतर
ओठ मुडपुनी हसे, घालता
चेहर्यावरती हळूच फुंकर।
खेळ खेळता सहज अंगणी
डोळ्यात उडे धूळ कंकर
नाजूक हाते उघडून डोळा
सखी घालते हळूच फुंकर।
राधारमण मुरलीधर
धरूनी वेणु अधरावर
काढीतसे मधु मधूर सूर
अलगुजात मारून फुंकर।
किती दिसांचा वियोग साहे
रागेजली ती प्रिया नवथर
कशी लाजते पहा खरोखर
तिच्या बटांवर घालून फुंकर।
सीमेवरूनी घरधनी येता
अल्प मिळाला संग खरोखर
रात जाहली पुरेत गप्पा
दिवा मालवा मारून फुंकर।
संसारातील जखमा, चटके
सोसायाचे जगणे खडतर
सुसह्य होते कुणी घालता
सहानुभूतीची हळूच फुंकर।
अटल आहे भोग भोगणे
कुणी गेल्याचे दु:ख भयंकर
पाठीवरती हात फिरवूनi
दु:खावरती घाला फुंकर।
कितीक महिने गेले उलटून
मित्र भेटही नाही लवकर
मैत्रीवरची धूळ झटकुया
पुनर्भेटीची घालून फुंकर।
लेखिका — अज्ञात
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈