मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

माणिक सिताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२).  साहित्य विश्वात  कवी ग्रेस हीच त्यांची खरी ओळख.  बा.सी. मर्ढेकरांनंतर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते.  ग्रेस यांच्या कवितेत एकप्रकारची दुर्बोधता जाणवते.  यावर त्यांचे उत्तर असायचे की,” मी जे काव्य करतो ते माझे स्वगत असते आणि स्वगतात भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगताला श्रोता नसतो.  मीच माझा फक्त असतो,”

असा हा एक मुक्त काहीसा कलंदर कवी.  ज्ञानाचे सोंग न करणारा, दुर्बोधतेत संदेश देणारा आणि त्याच वेळी सामाजिक भान ठेवणारा, शब्दकोषांना नवीन शब्द देणारा असा नामांकित कवी.

  संदिग्ध  घरांच्या ओळी

 आकाश ढवळतो वारा

 माझ्याच किनाऱ्यावरती

 *लाटांचा आज पहारा…*किंवा

 

 भय इथले संपत नाही

 मज तुझी आठवण येते अथवा

 

 मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदीपरी खोल

दगडाचे माझ्या हाती, वेगाने होते फुल

अशा कितीतरी ग्रेस यांच्या काव्यपंक्ती मनाला चिपकलेल्या आहेत.

नुकतीच मी त्यांची कर्णभूल ही कविता पुन्हा वाचली.  खूप वेळा वाचली. अर्थ शोधत शोधत वाचली आणि या कवितेत मला काहीतरी सापडलं आणि जे मला सापडलं ते तुमच्यापाशी बोलावं असं वाटलं म्हणून या कवितेचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करत आहे.

 सुरुवातीला आपण त्यांची कर्णभूल ही कविता संपूर्ण वाचूया.

☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆

*

 त्याने दान मांडताना

तिची झोळी तपासली

चंद्र चांदण्याच्या खाली

होत्या वाळवीच्या साली

उभा राजवाडा लख्ख

शोधे जादूची बासरी

पट्टी डोळ्याची बांधून

कुठे पाहे ना गांधारी

*

चंद्र सूर्याची सावली

त्याचे सत्य हले डूले

स्वप्नसंगात सोडतो

कर्ण कवचकुंडले

ग्रेस

ही कविता वाचल्यावर पटकन जाणवते ते या कवितेत महाभारतातील घटनेचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पात्रांचा उल्लेख आहे.  शिवाय कवितेच्या शीर्षकावरूनही प्रारंभी हाच बोध होतो.  कर्ण ही महाभारतातील उपेक्षित व्यक्ती पण तरीही बहुआयामी आणि आदरणीय. उपेक्षित असली तरी दुर्लक्षित नक्कीच नाही. कर्णाच्या मनातल्या भावभावनांचा प्रवाह कवीने या काव्यात एका विशिष्ट वैचारिकतेतून मांडला आहे असे वाटते.

 त्याने दान मांडताना

तिची झोळी तपासली

 चंद्र चांदण्यांच्या खाली

 होत्या वाळवीच्या साली…१

कुरुक्षेत्री  कौरव पांडव यांच्यात घनघोर युद्ध होणार आहे.  या युद्धातले खरे नायक म्हणजे धनुर्विद्यानिपुण अर्जुन आणि राजनीतिज्ञ  युगंधर कृष्ण.  युद्ध अटळ आहे.  कृष्णाची शिष्टाई असफल ठरली आहे.  फक्त एकच हुकुमाचे पान तेवढं बाकी आहे.  कर्णाच्या जन्माचे रहस्य  जे कुंतीने आजपर्यंत लपवून ठेवलंय. कुंती जाणून आहे की कर्ण हा अर्जुना इतकाच तोलामोलाचा योद्धा आहे.  पण तो शत्रुपक्षात असल्यामुळे तिला पांडवांच्या विजयाबद्दल कुठेतरी भय आहे आणि याच क्षणी कर्णाच्या दानशूर वृत्तीची जणू काही परीक्षा घेण्यासाठीच ती स्वतः कर्णाला युद्धापूर्वी भेटते आणि कर्णाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगते आणि त्याचवेळी अर्जुनाच्या प्राणांचे दान मागते. थोडक्यात ती कर्णाला भावनिक आवाहन देते. (इमोशनल ब्लॅकमेलच करते म्हणाना!)

त्यावेळी कर्णाच्या अंतरात भावनांचं वादळ उठलं असणार.  मागितलेलं दान तर द्यायलाच हवं पण ते देण्याआधी त्याच्या मनात कुंतीविषयी नक्कीच करुणा उत्पन्न झाली असावी.

तिची झोळी तपासली या शब्दरचनेतून कवी ग्रेस जणू काही कर्णाचं मन मांडत आहेत.  कुंतीच्या अस्तित्वाचा विचार कर्णाच्या मनात येतो आणि त्याला जाणवतं की “या माऊलीच्या वाटेवर फक्त वरवरच चंद्र चांदण्यांची पखरण असल्यासारखी भासते पण प्रत्यक्षात मात्र तिच्या जीवनाला जणू काही व्यथांच्या  वाळवीनेच पोखरलेलं आहे. ती एक असहाय, दुःखात्मा आहे याच दृष्टीकोनातून कर्ण या भेटीच्या वेळी तिच्याकडे पहात असावा.  कुठली सुखे होती तिच्या जीवनात?  शापितच आयुष्य तिचे… पती-वियोग,  वनवास सारे सारे भोगले हिने.

या चरणात झोळी, वाळवी, हे कुंतीच्या दुःखासाठी योजलेले  प्रतिकात्मक शब्द आहेत आणि त्यातूनच तिचे करुणामय जीवन उलगडते.

 उभा राजवाडा लख्ख

 शोधे जादूची बासरी

 पट्टी डोळ्यांची बांधून

 कुठे पाहे ना गांधारी॥ २ ॥

या चरणामध्ये वाचकांपुढे येथे ती डोळ्याला पट्टी बांधून वावरणारी गांधारी. जशी कुंती तशीच गांधारी. दोघीही राजवाड्यात राहूनही  दुःखीच.  वास्तविक गांधारी म्हणजे हस्तीनापुरची महाराणी!  उभा राजवाडा लखलखतोय पण गांधारीच्या आयुष्यात साचलाय तो अंधार.. दाट काळोख! पातिव्रत्य सांभाळत अंध पतीसाठी तिनेही जीवनभर डोळ्यावर पट्टी बांधली आणि एका गुढ अंधारातच ती जगली.  आश्वासक असं तिच्याजवळ काय होतं?

शोधे जादूची बासरी  या शब्दरचनेतून कृष्ण दर्शन होते पण गांधारीला कुठे मिळाला कृष्णचरणी विसावा?  कृष्ण प्रेम हेही पांडवांसाठीच नित्य होते.  खरोखरच गांधारीच्या आयुष्याचे सारेच सूर हरवलेले होते.

 चंद्र सूर्याची सावली

 त्याचे सत्य हाले डुले

 स्वप्न संगात सोडतो

 कर्ण कवच कुंडले..॥३॥

हा शेवटचा चरणही  प्रतिकात्मक आहे. चंद्र, सूर्य, सावली ही यश अपयशाच्या अर्थाने वापरलेली रूपके असावीत आणि जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा अर्थातच कर्णाचा जीवनपट उभा राहतो.  आयुष्यभर सुतपुत्र म्हणूनच त्याची उपेक्षा झाली.  क्षत्रिय असूनही त्याच्या क्षात्रतेजाला योग्य ती मान्यता मिळाली नाही.  त्याच्या जन्माचे रहस्यही कुणी जाणण्याचा प्रयत्न केला नाही.  त्या वेळेच्या समाजासाठी तो एक परित्यक्त, सुतपुत्र, राधेय होता.  मात्र दुर्योधनाने चाणाक्षपणे त्याला मैत्रीचा हात दिला.  अंगद देशाचे राज्यपद ही दिले. आणि एक प्रकारे त्याच्या जीवनात शीतल सावली आणली.

त्याचे सत्य हाले डुले  यातला हाले  डुले  हा कवीने वापरलेला जोडशब्द फारच चपखल आहे.  सत्य कुणालाच कळले नाही आणि जो काही मानसन्मान मित्र दुर्योधनाकडून कर्णाला मिळाला होता त्यातलाही आनंद परिपूर्ण नव्हता. जीवनात अनेक चढ —उतार, खड्डे, यश अपयश, अवहेलना याचा सामना कर्णाला करावा लागला होता.

दाता, दानशूर  म्हणून त्याचा लौकिक होता.   जगाला दान देण्याचं एक समाधानयुक्त स्वप्न तो पूर्ण करत असतानाच,  कुरुक्षेत्री युद्ध सुरू होण्यापूर्वी साक्षात इंद्र  कर्णापुढे उभा राहतो आणि कर्णाला मिळालेली जन्मजात कवच कुंडले दान म्हणून मागतो.  कर्णाच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण पण इंद्राला कवच कुंडले अर्पण करून तिथेही कर्ण दात्याचा धर्म अक्षरशः पाळतो. नियती ही नेहमीच कर्णाच्या विरोधात राहिली. अर्थात यामध्ये स्वप्न, धर्म आणि समाधान यांच्या बदल्यात कर्ण एक प्रकारे युद्धाच्या प्रारंभीच स्वतःचे बलिदान जणू काही मान्य करतो.

हे  तीनही चरण वाचल्यानंतर मनात अनंत प्रश्न उभे राहतात.  कवी ग्रेसच्या काव्याचं वैशिष्ट्य हेच आहे की काव्यातलं अव्यक्त जे आहे ते वाचकाने स्वजाणिवेतून जाणावे.  प्रथम वाचकांचं मन घुटमळतं ते शीर्षकाभवती. 

कर्णभूल

कर्णाची चूक असा अर्थ घेतला तर मनात येते..  काय चूक होती कर्णाची किंवा कोणती चूक कर्णाने केली? दुर्योधनासारख्या अधर्मी पक्षासाठी त्याने का आपले जीवन व्यर्थ घालवले? त्याचवेळी कर्णभूल या शब्दरचनेतले इतर अनेक रंग, अनेक अर्थ आणि अनेक दृष्टिकोन उलगडण्यातच वाचकांचे मन गुंतून राहतं.

कर्णभूल याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की कर्णाला समजून घेण्यामध्ये इतरांची झालेली चूक.   कर्णाला कुणीच समजून घेतले नाही का?

कुंती, गांधारी आणि कर्ण हे मग समदु:खी जाणवायला लागतात.  तसेच कवीच्या मनातल्या,  या पात्रांनी केलेल्या चुका वाचकांपुढे सुस्पष्ट होऊ लागतात.

का कुंतीने  कर्णाच्या जन्माचे रहस्य दडवून ठेवले?

का गांधारीने केवळ संकेताच्या मागे जाऊन डोळ्यावर पट्टी बांधली?  कदाचित गांधारी दृष्टी घेऊन वावरली असती तर महाभारत वेगळे झाले असते का?

का कर्णाने मैत्रीच्या वचनाखातर दुर्योधनाची अनिती दुर्लक्षित केली?

या विचारांती  हे संपूर्ण तीनच कडव्यांचं लहानसं वाटणारं काव्य डोंगराएवढा अर्थ घेऊन आपल्यासमोर खळाळतं. या काव्याच्या आणि त्यातल्या ओळखीच्या पात्रांच्या माध्यमातून कवी ग्रेसना वेगळंच काहीतरी सांगायचं आहे का?

कुंती, गांधारी, कर्ण यांची जीवनेही मग प्रतिकात्मक वाटू लागतात.  मानवी जीवनाशी यांचा संदर्भ जुळवताना वाटते, अखेर सत्य एकच… चुकीचा कुठलाही मार्ग यशाच्या दिशेने जात नाही.  चूक छोटी किंवा मोठी नसतेच.  चूक ही चूकच असते आणि त्यांचे अंतिम परिणाम हे नकारात्मक असतात आणि हेच सत्य कदाचित ग्रेस ना महाभारतातील या पात्रांद्वारे जगापुढे मांडायचे असतील…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहा एका रांगोळीने… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ पहा एका रांगोळीने… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

अंगणात रेखियली एक रांगोळी सुंदर

माझे अंगण वाटले मग मलाच चंदन

घर झाले सुशोभित पहा एका रांगोळीने

मनोमन केले मग रांगोळीलाच वंदन…

*

येते अंगणाला शोभा फक्त एका रांगोळीने

जशी माणसाला शोभा येते पहा आंघोळीने

शुचिर्भूत होते घर दारी रांगोळी हासतां

जसे शोभतात देव लावताच चंदनाने…

*

लक्षुमीची पाऊले ती दारी शोभती गोपद्मे

लखलख निरांजने बागा शोभती उद्याने

सारी नक्षत्रे नि तारे उतरती अंगणात

मनी अस्फूट अस्फूट जणू सृष्टी गाते गाणे…

*

लखलख लखलख जणू आकाश अंगणी

असे प्रकाशाचे पर्व सारे साधती पर्वणी

आनंदाचे अंगअंग आनंदाचे रंगरंग

मनी झुलतात झोके घरोघर ते चंदनी..

*

गलगलं गलगलं असा सण दिवाळीचा

मंगल उटणे सुगंधी पवित्र त्या अभ्यंगाचा

भाऊबहिणीचा सण तसा सण पाडव्याचा

लाडू करंजी कडबोळी अनरसे चिवड्याचा…

*

घमघमाट नि तृप्ती ओसांडते मुखावर

रोषणाई नि चांदण्या उतरती घरावर

देवदेवतांची कृपा बरसती आशीर्वाद

मग दिवाळीचा वाढे पहा आणखीन स्वाद…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक धागा सुखाचा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 एक धागा सुखाचा… 🙏 ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

एक जरी असला धागा

हवा खरच तो अतूट,

भार झेलून दु:खांचे

दूर करेल जो संकट !

*

धागा धागा घट्ट विणूनी

करा मग वस्त्र तयार,

कला कुसर अशी करा

लागावी लोकांची नजर !

*

सुखाचा पाऊस पडण्या

मग लागे कितीसा वेळ,

पण विसरू नका घालण्या

सुख दुखःचा ताळमेळ !

*

शंभर पहाड पडले

जरी तुम्हावर संकटांचे,

न डगमगता आळवा

मग श्लोक तुम्ही मनाचे !

*

धागे मग दु:खाचे अंती

जाती पार बघा लयाला,

मन होईल इतके आनंदी

जणू हात लागे गगनाला !

*

दु:खाचे पण असेच असते

जास्त कुरवाळायचे नसते,

आपण लक्ष दिले नाही तर

ते हरून कोपऱ्यात बसते !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ दिले निमंत्रण अवकाशाला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ दिले निमंत्रण अवकाशाला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

‘ऐलपैल’ हा माझा पहिलावहिला कवितासंग्रह. त्याचा प्रकाशन सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्याच्या एस्. एम्. जोशी सभागृहात संपन्न झाला. अध्यक्ष होते नामवंत साहित्यिक, समीक्षक, संपादक डॉ. प्रा. रमेश वरखेडे आणि प्रमुख पाहुणे होते प्रख्यात निवेदक, वक्ते, संपादक व ‘शब्दमल्हार’चे प्रकाशक मा. स्वानंद बेदरकर. सूत्रसंचालक होते ‘मधुश्री’प्रकाशनाचे मा. पराग लोणकर. मा. वरखेडे सरांनी माझ्या कवितांचे केलेले साक्षेपी समीक्षण सह्रदय समीक्षेचा वस्तुपाठ ठरावा. स्वानंदाने आपले मनोगत व्यक्त करतांना माझ्या काही कवितांचे वाचनही केले. मन आणि कान धन्य करणारा तो एक अनन्यसाधारण अनुभव होता. रसिक, मित्र, आप्तांची उपस्थिती आणि प्रतिसाद यांनी मन भरून आले. त्याचा संदर्भ असलेली ही कविता :

दिले निमंत्रण अवकाशाला

 *

दिले निमंत्रण अवकाशाला, क्षितिजतटावर बाहू पसरुन

उरी घ्यावया धरेस एका, किति आभाळे आली दाटुन

 *

अंध गुहेचे दार बंद हे, कुणी उघडले किती दिसांनी

मोरपीस किरणांचे फिरले, काळोखावर जणु युगांनी

 *

पत्ता शोधित आले दारी, दूर दिशांतुन काही पक्षी

वठल्या रानी पानोपानी, वसंत फुलवित रेखित नक्षी

 *

रसज्ञ आले आप्त मित्रही, घ्याया श्रवणी कवनकहाणी

स्मरून अपुला जुना जिव्हाळा, दाखल झाले जिवलग कोणी

 *

विदग्ध वक्ते मंचावरती, (त्यात जरासा एक कवीही)

ह्रदयीचे ह्रदयाशी घेण्या, झाले उत्सुक श्रवणभक्तही

 *

प्रगल्भ रिमझिम रसवंतीची, बरसु लागली मंचावरुनी

सचैल भिजली अवघी मैफल, कृतार्थ झाली माझी गाणी

 *

जुने भेटता पुन्हा नव्याने, पुन्हा नव्याने जन्मा आलो

रिंगण तुमचे पडता भवती, उचंबळाचा सागर झालो

 *

अनन्य उत्कट अमृतक्षण हा, तुमची किमया तुमचे देणे

अवचित यावे जसे फळाला, कधीकाळचे पुण्य पुराणे

 *

जन्ममृत्युच्या वेशीवरती, अंधुक धूसर होता सारे

आप्त मित्र अन् रसिकजनांनो!करतिल सोबत तुमचे तारे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अभिजात मराठी… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अभिजात मराठी… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

योगर्टच म्हणणार जरी 

            असलं साधं दही

इंग्रजीतच करणार आम्ही 

            लफ्फेबाज सही  !

मालिका नाही तर सारे

            सिरियलच म्हणू

नोटबुक कुठे विचारू,  

             पण म्हणणार नाही वही  !

गाडीमध्ये जागा नसते 

             असते फक्त  सीट

मनासारखं झालं नाही तर 

              म्हणणार ओह शीट‘,

म्हणणार नाही अरे देवा‘,  

              म्हणू ओ माय गॉड‘,

थुंकू नकासांगणार नाही,  

              म्हणू  ‘डू नॉट स्पिट‘  !

बैठक नसते आमची कधी

              होल्ड करतो मिटिंग

विद्युत रोषणाई करत नसतो

              करतो पण लायटिंग  !

छान दृश्य नसतं आता

               वंडरफुल सीन

पैज लावणं गावठीपणा

                करायचं तर बेटिंग !

कणसं नसतात भाजायची,  

               रोस्ट करायचे कॉर्न

शोकसभा कुठून होणार

                करू आता मॉर्न

वेडंवाकडं दिसता काही 

                अश्लील नका म्हणू

डोळा मारत म्हणायचं

                अॅडल्ट आणि पॉर्न  !

बाबा कधीच मोडीत गेले

                आता फक्त डॅडी

कार घेतली म्हणायचं

                नाहीतर म्हणाल गाडी,

आई कधीच मम्मी झाली

                आत्याबाई आंटी,

पल्स बघतात आजारपणात

               नाही बघत नाडी  !

न्यायालय नसतं इथं

                कसं सुप्रीम कोर्ट

पारपत्र ठाऊक नाही,

                 असतो पासपोर्ट

पोर्ट असतं, शिप असतं

                  नसतं जहाजबंदर

दिवाळीचा किल्ला सुद्धा 

                   झालाय आता फोर्ट  !

खरं तर टॉमीलाही 

                मराठी नाही आवडत

कम हिअर म्हटल्यावरच

                येतो कसा दौडत  !

जस्ट लिव्ह एव्हरीथिंग 

               सॉलिड न्यूज भेटली

अभिजातची ग्रेड आपल्या

                मराठीनं गाठली

जेव्हा आय हर्ड तेव्हा

                हार्ट आलं भरून

इमोशन प्राईडची या

                मनामध्ये दाटली  !!

आफ्टरअॉल मराठी

                मदरटंग आपली

जरी आहे काळजामध्ये 

                मागच्या खणात लपली

मराठी शाळा पाडून तिथं

               इंग्रजी शाळा बांधली

काल आमच्या मंत्र्यांनी

               फीत आहे कापली !!

पार्टीशार्टीड्रिंक्स करू

               टेरेसवरती आज

मराठीची फायनली

               व्हिक्टरी झाली आज,

मदरटंग आहे आपली

               खूप वाटतंय भारी

माय मराठी घेऊन आली

               अभिजातचा साज  !

कवी : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फूल साजिरे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ फूल साजिरे ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

फूल साजिरे

फुलून आले

धरती दिशेला

थोडे झुकले

*

धन्यवाद जणू

म्हणे भूमाते

इतके सुंदर

रूप दिले

*

जीवन रस

तिनेच दिला

कणाकणाने

फुलण्यासाठी

*

रंगही मोहक

तीच देतसे

आकर्षित फूल

दिसण्यासाठी

*

कुठून येतसे

गंधाचे अत्तर

कुणा न गवसे

याचे उत्तर…

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वराज्य…!” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वराज्य…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

दशके लोटली सात तरी तो स्वातंत्र्यलढा अजुनी गाजे

‘मला पहा अन फुले वहा ‘ या मनोवृत्तीचे तण अती माजे ।।

 स्वतंत्र देशी स्वतंत्र आम्ही.. रुचे मना ते करूही धजतो

 लोकशाहीचे नायक आम्ही.. कोण आम्हाला अडवू शकतो ।।

जो तो आहे स्वतंत्र तर मग.. का आम्हा चिंता इतरांची

आपले आपण फक्त पहावे, , जळो ना तिथे भ्रांत दुजांची … ।।

 कामापुरते गोड आम्ही अन काम संपता पाठ करू

 गरज आमची पडेल तेव्हा.. नन्नाचा पाढाच सुरु ।।

सहाय्य करण्या दुजा कुणाला सवडच नाही आम्हा मुळी

अन सहाय्य तेही कसे करावे.. भिन्न की आमची जातकुळी ।।

 निधर्मी आमचे राष्ट्र म्हणविते.. आम्हास देणे-घेणे नाही

 निधर्म म्हणजे धर्म सोडणे.. याविण अर्थच ठाऊक नाही ।।

शतक की आले एकविसावे.. तिकडे आम्हा झेपायाचे

यायचे जयांना त्यांनी यावे, इतरां मागे सोडायाचे ।।

 राजधर्म हा असेच शिकवी.. कलियुगातली हीच स्थिती

 नेते म्हणजे राजे येथे.. लोकशाही ती दिन अती ।।

राजा आणिक रंकामधली निशिदिनी वाढतीच दरी ती

एकाची नित चाले ‘प्रगती’.. दुज्या नशिबी अधोगती ।।

 मर्कटहाती कोलीत तैसा स्वैराचारा जणू परवाना

 दुर्दशेस या आम्हीच कारण.. उठवू न शकतो निद्रिस्त मना ।।

उठा उठा हो सामान्यांनो.. उशीर किती हा आधीच झाला

जागे व्हा.. तुम्ही सज्जच व्हा अन परजा आपल्या मनशक्तीला ।।

 शक्ती एकजुटीची जाणून … मिळवा मतभेद की मातीला

 स्वैराचारा शह द्या.. मिरवा जित्याजागत्या लोकशाहीला……..

 मिरवा सशक्त स्व-राज्याला…… ।।

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वीट अवीटाचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

वीट अवीटाचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

शीणली पाऊले,

झाली ओढाताण.

जीर्ण झाली आता,

पायीची वहाण.

पायांची दुर्दशा,

प्रवास संपेना.

वाट सापडेना,

मुक्कामाची.

आक्रंदते मन,

अंतर्यामी खोल.

नात्यांचीही ओल,

हरवली.

कशासाठी देवा,

करु पायपीट.

वीट आला असे,

अवीटाचा.

लखलाभ तुला,

तुझे पंढरपूर.

चंद्रभागा वाहो,

पापणीत.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कसा जाऊ सांग आता… ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

 ☆ कसा जाऊ सांग आता… ☆ श्री आनंदहरी 

पडेना हे पाऊल पुढे

जगणे भार होई गं ss

 कसा जाऊ सांग आता

 विठ्ठलाच्या पायी गं ?…।।

*

काळजात अद्वैती तो

गळाभेट नाही

रूप साजिरे पाहण्यासी

मन ओढ घेई

किती वाट पाहू आता

जीव तुटत जाई गं ss।। १ ।।

*

त्याला आस नाही उरली

माझिया भेटीची

वेळ झाली वाटे आता

ताटातुटीची

डोळ्यांमध्ये त्याच्यासाठी

आसवांची राई गं ss ।। २ ।।

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

होता भेट तुझी ती

रात पौर्णिमेची

मिठीत दडलेल्या

विश्व मोहिनीची

*

ते नयन का व्हावे

सैरभैर तेव्हा

माझाच मी नुरलो

आला सुगंध जेव्हा

*

ती चांद रात होती

फुलांची वरात

होते नक्षत्रांचे देणे

सुखाची बरसात

*

ती कस्तुरीची किमया

मृगया होती खास

राना पल्याड गेला

केशराचा वास

*

मधुरम निनाद तो

पायी नुपुरांचा

स्वच्छन्द मनमोर

नाचे वनी केतकीच्या

*

अधीर शुक्रतारा

ओघळते मोती

कोंदणाच्या जागी

पाझरल्या ज्योती

*

सृजनशील नियम हा

प्रेमराग गाती

सर्व काही उघड गुपीत

अनादी अनंत राती

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares