कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)
कवितेचा उत्सव
☆ नीज नीज माझ्या बाळा ☆ कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर) ☆
नीज नीज माझ्या बाळा,करू नको चिंता
काळजी जगाची सा-या आहे भगवंता !
अंगावर पांघरूण ओढुनिया काळे
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
पिता तो जगाचा बैसे जागत अजून
ज्याने मांडियला सारा विश्वाचा हा खेळ
तोच चालवील त्याला,तोच सांभाळील
झोपली पाखरे रानी,झोपली वासरे
घरोघरी झोपी गेली,आईची लेकरे
नको जागू,झोप आता,पुरे झाली चिंता
काळजी जगाची सा-या आहे भगवंता.
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈