मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फेर श्रावणाचा ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ फेर श्रावणाचा ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आला श्रावण सणांचा

बरसणाऱ्या धारांचा

नाना रुपी फुलणाऱ्या

निसर्गाच्या किमयेचा ||

 

क्षणी उन क्षणी धारा

इंद्रधनुचा नजारा

सुवासिक फुले पाने

गर्द हिरवा फुलोरा ||

 

दरवळे पारिजात

लक्ष फुलांचा नवस

बेल पत्रींनी सजली

देवघराची आरास ||

 

नागपंचमीचा सण

मन माहेराला जाते

झोका बांधला लिंबाला

उंच झुलूनिया येते ||

 

आहे शेतात वारूळ

नागराजाचे राऊळ

पूजा करुनी सयांचे

किती रंगतात खेळ ||

 

झिम्मा फुगड्या रासाचे 

भारी वाटे आकर्षण

श्रद्धा भक्ती उत्साहाचा

आला लाडका श्रावण ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हायकू ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हायकू☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

(१)

वादळ वारे

सागराला तुफान

मन बेभान

 

(२)

दाट शीतल

वटवृक्षाची छाया

आईची माया

 

(३)

पुनवेचा चंद्र

गंधाळलेली रात

प्रेमाची साथ

 

(४)

रातराणीचा

दरवळला गंध

मधूर धुंद

 

(५)

निरभ्र नभ

विहरती पांखरे

स्वच्छंद मने

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणसर ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावणसर ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

 

अशीच एखादी सर येते

हळुच शिडकावा करून जाते.

भिजणार्या ओल्या भूमीबरोबरच

तप्त मनासही शीतलता देते.

    श्रावणसरीतील ओलाव्याने

     स्रुष्टीसखी न्हाऊन निघते.

    त्रुप्त मनीच्या संतोषाने

    अणुरेणूलाही चिंब करते.

 त्रुप्त धरती गंधित होते

हेमपुष्पही जन्म घेते.

शिवार सारे फुलून जाते

आगळ्या सौंदर्यै धरती नटते..

   स्रुष्टीसखीचा बहार पाहून

   तनमनही रोमांचित होते

   जलधारांना  दुवा देते

   शिवारांतील सोनं वेचू पाहते.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधा कृष्ण ☆ सौ. मनिषा रायजादे – पाटील

सौ. मनिषा रायजादे- पाटील

अल्प परिचय

शिक्षण: एम.ए, डी एड्,बी एड् ,डी एस एम

व्यवसाय: प्राथमिक शिक्षिका

  • अनेक कवितासंग्रहातून, दिवाळी अंकातून ,वर्तमानपत्रातून कविता प्रकाशित
  • अनेक राज्यस्तरीय संमेलनामध्ये सहभाग
  • अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.
  • 2019 मध्ये माझी डी. एड् . विधार्थिनीचा  मेळावाची स्मरणिकेची संपादिका म्हणून निवड.
  • माय टीव्ही वर आतापर्यंत 3 वेळा मुलाखत व आकाशवाणी सांगली केंद्रावर मुलाखत व कविता वाचन .

? काव्यमनीषा कवितासंग्रह प्रकाशित ?

निवड-

  1. काव्यप्रेमी शिक्षक मंच जिल्ह्यासचिव
  2. काव्यप्रेमी गझल मंच राज्यकार्यकारणी सभासद
  3. आम्ही विश्वलेखिका सांगली जिल्ह्याअध्यक्षा
  4. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद तालुका शहर अध्यक्षा
  5. अ .भा .क . क्रीडा मंच तालुका अध्यक्षा
  6. शब्दवैभव साहित्य मंच सांगली उपाध्यक्षा

पुरस्कार- 

  • कस्तुरबा गौरव पुरस्कार- लठ्ठे  – एज्युकेशन सोसायटी सांगली
  • आदर्श अध्यापिका पुरस्कार – प्रतिष्ठा फाऊंडेशन चिंचणी
  • राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार- हिरकणी बहुउद्देशीय संस्था जालना.
  • नॅशनल युनिटी अवॉर्ड- आदर्श फौंडेशन संस्था, पेठ.
  • राज्यस्तरीय राष्ट्ररत्न पुरस्कार-एशियन कल्चरल सोशल आर्ट लिटरेचर फेडरेशन, मुंबई.
  • सन२०१९ च्या ९३ व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे गझल रचनेची निवड

? कवितेचा उत्सव ?

☆ राधा कृष्ण ☆ सौ. मनिषा रायजादे – पाटील ☆

(काव्यमनीषा संग्रहातून)

एकरूप

दोन जीव

देह दोन

एक भाव

 

             कृष्ण राधा

             नित्य ध्यास

             दोन देह

             एक श्वास

 

अवतरे

जगी प्रीत

समर्पण

हीच रीत

 

             प्रेमांकुर

             मनी फुले

             राधा वेडी

             स्वप्नी झुले

 

हा दुरावा

प्रीती जरी

दृढ नाती

जन्मांतरी

 

© सौ.मनिषा रायजादे पाटील

ओंकार निवास, नवजीवन कॉलनी, मिरज, जि-सांगली

फोन नं-9503334279

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 69 – रानफुल झाले मी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 69 – रानफुल झाले मी 

रानफुल झाले मी दवात चिंब न्हाले मी।

सुंदर हिरव्या कुरणी भान हरपून गेले मी ।।धृ।।

 

हा उषेचा रंग न्यारा साद घाली मंदवारा ।

भास्कराने भूषविला सोनसरीं हा पिसारा ।

कल्पनेचे पंख माझे अंबरी या विहीरते मी।।१।।

        

जीव माझा सानुलासा मुक्तछंदी लहरते मी।

सुगंधाची लाट साऱ्या दशदिशांना उधळते मी।

अंतरीच्या मकरंदाने तव क्षुधा शमविते मी।।३।।

 

खंत नसे वादळाची नच तमा  संकटाची।

भारलेल्या या क्षणांना भ्रांती का रे ती उद्याची ।

दो घडीच्या जीवनी या जन मनांना जोडते मी।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण-गारवा ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण-गारवा ☆ श्रीशैल चौगुले ☆

(वृत्तः बालानंद)

गोड गारवा  रमे जसा

त्यात पारवा  घुमे कसा.

 

वारा मजेत  गात गीत

तारां सवेत  पावा नित

कृष्णा वाजवी  सूर तसा

गोड गारवा  रमे जसा   .

 

हिरव्या माळा  रंग भरी

हिरवी पाने    ताल धरी

हरित पाखरे   कानोसा

गोड गारवा     रमे जसा.

 

पुलकित लोचन  दिप तेवण

मनात हर्षित    मानव वन

आला श्रावण  रिम-झिमसा

गोड गारवा    रमे जसा.

 

ऊन-पाऊस  खेळ घडे

इंद्रधनू षी    चहूकडे

ओढा वाहे   चाळ तसा

गोड गारवा   रमे जसा.

 

फुलपाखरेच  फुलां वरी

भृंगर गुंजन    नाद धरी

सृष्टी भास तव  स्वर्गी तसा

गोड गारवा   रमे जसा.

        

नाग पुजा सण पंचिम नृत्य

धरेवर हेच   अंतिम सत्य

नभ घन नाचे  शिवा तसा

गोड गारवा   रमे जसा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 86 – विजय साहित्य – तो सागरी किनारा . . . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 86 – विजय साहित्य  ✒ तो सागरी किनारा✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

तो सागरी किनारा . . .

लग्नाआधी, लग्नानंतर, दोघांनाही

तितकाच जवळचा वाटायचा

जितका सागराला किनारा

अन किनाऱ्याला  सागर,

परस्परांना  आपलं समजायचा. . . !

सागरात काय दडलय,

याची प्रचंड उत्सुकता किनाऱ्याला.

सागराला देखील  अनावर  ओढ

आपल साम्राज्य ,किनाऱ्याला बहाल करण्याची.

कधी धीर गंभीर. . . कधी रौद्र, वादळी,

तर कधी कधी खळाळत , उत्स्फूर्तपणे

सागर धाव घ्यायचा  किनाऱ्याकडे.

उसळत्या लाटांचा, मर्दानी जोषात, सागराच येणं

त्याची गाज, बहाल केलेला,

शंखशिंपल्यांचा नजराणा पाहून, किनारा सुखावतो.

असा सालंकृत किनारा, सागराच्या भरतीन

सदा रहायचा आलंकृत,अन् प्रेमांकित देखील.

भरती ओहोटीच्या  आपलेपणातून

किनाऱ्याच सुखवस्तूपण  बहरायच.

त्याच्या तिच्या नात्याच प्रतिबिंबच लहरायचं

त्या सागर लाटांमधून. . . !

पतीपत्नीच्या नात्याला  कधी कधी

वैचारिक मतभेदान,  भरती ओहोटीला

सामोरे जाव लागायच , तेव्हाही . . .

तो सागर किनाराच द्यायचा आसरा

दोन भरकटलेल्या नावांना. . .

सांगायचा  अनुभवी बोल

”भरती ओहोटी मधला काळ

तोच खरा कसोटीचा

या काळात, एकाने व्हायचं पसा

तर  दुसऱ्यानं व्हायचं दाता ”.. .!

उसळत्या सागराचा,  अन सौदर्यशील किनाऱ्याचा

तो विहंगम भावसंवाद,

परस्परांना ओढ लावायचा

ना ते ना ते म्हणतानाही

भवसागरात जगायला शिकवायचा

नातं जोडून ठेवायचा

तो सागरी किनारा. . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणसर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावणसर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मनी झरे का अवचित झरझर

                     अवखळ श्रावणसर

                              अलगद कानी गुणगुणती अन

                                                    बासरीचे सूर मधुर —–

 

निळे सावळे भासे का नभ

                      प्रसन्न जरी दिनकर

                                निरभ्र असुनी भवती सारे

                                                      मनी दाटे हुरहुर ——

 

जग सारे हे तसेच येथे

                       मनाची परि भिरभिर

                                 शोधू लागले कोठून आली

                                                       नकळत श्रावणसर ——

 

मग क्षणात चमके इंद्रधनू अन

                        सूर्य हसे हळुवार

                                   लख्ख दिसे मज मनी दडलेला

                                                         कृष्णसखा सुकुमार ——

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 76 – गा-हाणं…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #75 ☆ 

☆ गा-हाणं…! ☆ 

वर्षभर आम्ही तुझ्या

येण्याची वाट पाहतो..

तू येतोस आणि आमचं घर

आनंदानें भरून जातं

खरं सांगायचं तर

आमची सारी स्वप्नं तुझ्या

येण्या न येण्यावरच अवलंबून असतात..!

 

मुलांच शिक्षणं

बायकोला नवं लुगडं

आईच्या औषधांचा खर्च

आणखी बरंच काही…

फक्त तुझ्यावरच अवलंबून असतं..!

 

हे माझ्या एकट्याचं नाही

तर असंख्य लोकांच

हेच मनोगत आहे

कित्येकांनी तर तुझ्या

न येण्यानं आपला जीवन प्रवास

अर्धवट सोडून..

अत्महत्ये सारखा अवघड मार्ग

स्विकारलाय..!

 

आताही..तुझ्या येण्यानं..

आम्हांला आनंद होतो पण..

त्या पेक्षा जास्त ..

तुझ्या येण्याची भिती वाटू लागलीय

कारण…

तू येशील आणि सगळीकडे

दु:खाचं सावट पसरवून जाशील..

अन् आम्ही..

काहीच करू शकणार नाही…!

 

तुझ्या अशा वागण्याचं

कारण काय

माहीत नाही पण ..

हे पावसा…,

आम्हा तमाम शेतक-याची

तुला एक विनंती आहे..

आमच्या शेतात

एक वेळ कमी धान्य पिकलं तरी चालेल..

आमची मुलं एखादी इयत्ता

कमी शिकली तरी चालतील

पण …

महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला

तू असं पाण्यात ठेऊ नकोस ..

 

हे पावसा दर वर्षी..

आम्हा शेतकऱ्यांच गा-हाणं तू ऐकतोस

तसंच

आम्हा शेतक-यांच हे ही गा-हाणं

तू ऐकशील ह्याची खात्री आहे..!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वे ध ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

⭐ वे ध ! ⭐  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

बसलो निवांत पडवीत

झोके घेत झूल्यावर

बघता बघता भरून गेले

काळ्या जलदांनी अंबर

 

सोबतीस त्या घुमू लागता

समीराचा भयावह नाद

वाटे तरु लता उच्चरवाने

गाऊ लागती चारी ते वेद

 

जाई चमकून मधेच चपला

उजळून आसमंत सारा

जीव रानीचे भ्याले सारे

शोधू लागले उबेचा निवारा

 

रचले यज्ञकुंड निसर्गाने

भेगाळल्या धरती वरती

धुवांधार आषाढ सरी

देती त्यावर ओली आहुती

 

हे चक्र कालातीत निसर्गाचे

सदा असेच पुढे जायाचे

वेध लावून सासुरवाशीणींना

हसऱ्या नाचऱ्या श्रावणाचे

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१५-०८-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print