मराठी साहित्य – विविधा ☆ अस्मादिकांच्या पादुका…… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ अस्मादिकांच्या पादुका…… ☆ सौ  ज्योती विलास जोशी 

पायातलं वहाण म्हटलं की सिंड्रेलाच्या परिकथेतला तिचा तो एक बूट आठवतो. जिच्या भोवती कथा फिरते. मला प्रकर्षानं आठवते ती ‘द आदर पेअर’ही इजिप्शियन अवॉर्ड विनिंग फिल्म ! अवघ्या चार मिनिटाच्या या फिल्म मध्ये रेल्वेत चढताना एकच बूट पायात राहिलेल्या मुलानं सारासार विचार करून तो बूट प्लॅटफॉर्मवरच्या मुलाकडे भिरकावला जेणेकरून त्याला त्याचा वापर होईल. निरागसतेला केवढ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ही गोष्ट.

चाळीस लाखाच्या चप्पल्स चोरी करून लक्षाधीश झालेला माटुंग्याचा इब्राहिम सर्वश्रुत आहे.कुलभूषण जाधवला त्याची आई पाकिस्तानात भेटायला गेली तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली तिच्या आभूषणांसह तिचे चप्पल काढून घेतले.तेव्हा ट्विटरवर ‘चप्पल चोर पाकिस्तान’या# खाली दिवसभर ट्विटर ट्रेंड करत होतं.आपल्या कोल्हापूरी चप्पलनं तर जगात चप्पल ची किंमत वधारून ठेवलीय….

जूते लो पैसे दो म्हणत हम आपके है कौन मध्ये माधुरी थिरकते. लग्नातल्या या विशिष्ट प्रसंगाने चप्पलला केवढा भाव मिळतो. नवऱ्या मुलाने देऊ केलेल्या पैशावरून त्या चप्पलची किंमत ठरते…. ते निराळंच….एकेकाळी ‘पायातली वहाण पायातच’ असं म्हणून स्त्रीला हिणवणारया पुरुष प्रधान संस्कृतीच स्मरण झालं. दुसऱ्याच क्षणी चप्पल जोडीवर फुल ठेवून त्याची पूजा करत आर्चीला विनवणारा सैराट सिनेमातला परशा आठवला.

आताशा प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अस्तित्वाला एक दिवस ठरवायची पद्धत आहे. तो त्याच्या अस्तित्वाचा दिन म्हणून साजरा करतात. पंधरा मार्चला नुकताच चप्पल दिन होता. एरवी ‘चपलीनं मारीन’या इतक्या मोठ्या अपमानाचा मूळ असणारी ही चप्पल आजच्या दिवशी इतकी वलयांकित का झाली ? त्याचं रहस्य मला कळलं होतं……..अर्थातच एक नवीन चप्पल जोड खरेदी करून मीही ‘चप्पल डे’ साजरा केला.

आज व्हाट्सअपचं पान हिरवंशार झालं होतं. उघडून पाहते तो प्रत्येक पानावर चप्पल दर्शन घडत होतं. अनाहूतपणे कर जुळू नयेत याची मी काळजी घेत होते.चप्पलचं असणं किती महत्त्वाचं आहे. तिचं असणं हेच तिचं अस्तित्व! अस्तित्व साजरा करण्याच्या दिवसांमध्ये एक दिवस तिचा ही असणारच ना? माझ्याच प्रश्नांचं निरसन माझ्याच अभ्यासातून झालं. उद्या परत कोणाच्या अस्तित्वाचा दिवस असा विचार करत मी झोपी गेले.

नित्य नेमानं सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा डाटा ऑन केला आणि पुन्हा हिरवंगार पान मला खुणावू लागले. बुचूबुचू मेसेजेस येऊन पडले होते. प्रामुख्यानं आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपचं पान अगोदर उघडलं जातं आणि ते आजही उघडलं तर ‘अहो आश्चर्यम’ गुड मॉर्निंग च्या जागी एक चप्पल जोडचा फोटो! ‘टुडे ‘या मथळ्याखाली…..आणि खाली लिहिलेलं…..हे कुणाचं आहे? माझं कुणीतरी घालून गेलं आहे’

सकाळ सकाळी रामाच्या पादुकांच दर्शन व्हावं तसा मी नमस्कार केला. टेक्नॉलॉजीला ही मनोमन दंडवत घातला ते पुढचा मॅसेज वाचून…. अगं तुझं आणि माझं एक्सचेंज झालंय बहुतेक अगदी सेम टू सेम..

चप्पल हा खरंच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ! आमची आजी म्हणायची ‘देह देवळात चित्त खेटरात’.. तिच्या या बोलण्याचा मला पदोपदी अनुभव येतो बापाला आपली मुलगी देखणी असली की जसं कोणीही उचलून नेईल अशी सुप्त भीती मनामध्ये असते ना तसंच प्रत्येकाला आपली चप्पल डोळ्यात भरण्या जोगी आहे; कोणी तरी घालून जाईल असंच वाटतं आणि कधीकधी घडतही तसंच…..

मंदिरात आत जाताना नेहमीच्या पेढेवाल्याकडे पेढे देऊन चप्पल ठेवायची प्रथा त्यामुळेच पडली असावी. तो बिचारा स्वतःचे पेढे खपवण्यात इतका मशगुल असतो की आपल्या चप्पलची त्याला कितपत काळजी असते देव जाणे !आपला तो अंधविश्वासच !!

पैसे देऊन स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवण्याची मानसिकता बहुतेकांची नसतेच. खेटरंच ते… त्यासाठी इतकी किंमत द्यायची गरज नाही. जे कोणी त्या स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवतात ते टोकन देऊन चप्पल परत घेताना, देणारा माणूस चप्पल अशा पद्धतीने भिरकावत होतो की आपल्या चप्पलची हीच लायकी आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा..आपल्या देशात भाजी रस्त्यावर आणि चप्पल दुकानाच्या शोकेसमध्ये अशी परिस्थिती असताना चप्पल ची अशी किंमत केलेली मनाला लागते. सहाजिकच आहे ना?

चप्पल बूट यांच्या आताच्या जाहिराती पाहून आमचे आजोबा सांगायचे. “आम्हाला वर्षातून एकदा चप्पल मिळे. सततची घालायची सवय नसल्यानं ती घातलेल्या दिवशी आम्ही कुठेतरी विसरून येत असू. त्यानंतर पुन्हा एक वर्षांनंतरच नवीन मिळे.चप्पल घालायची सवयच नसल्याने ती विसरायची सवय जास्ती लागली होती.”

कुटुंबात जितक्या व्यक्ती तितकी वाहनं आणि चौपट वहाणं. चपलांची खानेसुमारीची डोकेदुखी होऊन बसली आहे. माणशी दहा याप्रमाणे चप्पलचा स्टॅन्ड भरलेला असतो. वॉकिंग, जॉगिंग, कॅज्युअल, स्पोर्ट्स, स्लिपर्स ,फॉर्मल बापरे बाप!म्हणून का चप्पल इतक वलयांकित? आणि तिची जागा दुकानातल्या काचेत आणि मेथीची पेंडी रस्त्यावर?…..

एकदा माझ्या मैत्रिणीकडे आम्ही रात्री जेवायला गेलो होतो. जेवणानंतर गप्पा-टप्पात बारा वाजून गेले. फ्लॅट सिस्टिम मधल्या तिच्या घरातून आम्ही चौघेही बाहेर पडलो आणि लिफ्टने खाली निघालो तितक्यात, दोघांच्या पायात घरातलेच स्लीपर आहेत हे त्यांच्या लक्षात आलं पण पुन्हा आत जाऊन चप्पल घेण्याऐवजी तात्पुरतं शेजारच्या फ्लॅटच्या चप्पल स्टैंड मधील आपल्याला बसतील ते चप्पल घालून ते खाली आले.माझ्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून ती हसली. “अगं गाढ झोपलेत ते ! काय समजतं त्यांना? शिवाय आमचे स्लीपर्स आहेतच की त्यांच्या दारात….

रात्री घरी पोचलो आणि कॉरिडोर मधल्या माझ्या चप्पलच्या रॅकला एक कुलूप आणि त्याला दोन किल्ल्या लावलेल्या मला दिसल्या. मी स्टॅन्डला कधीच कुलूप लावलं नव्हतं आत्ता मी लगेच एक किल्ली फिरवली चपला बंदिस्त केल्याआणि आत आले.दर खेपेला कुलूप उघडून चप्पल काढायची आणि बाहेर पडायचं…. चप्पल स्टॅन्ड ला जणू मी लाॅकरचा दर्जा प्राप्त करून दिला होता.प्रत्येक ठिकाणी जायचे चप्पल निरनिराळे… दुपारी मंदिराला घालून जायचे चप्पल घालून मी बाहेर पडले. भजन आटोपलं आणि मंदिरात गेले देव दर्शन करून बाहेर आले तो चप्पल गायब ‘मंदिराला घालून जायचे चप्पल’असलं म्हणून काय झालं आता पुन्हा मंदिरात जायचं तर कोणतं चप्पल वापरायचं? पंचाईत झाली ना माझी??

माझे डोळे सगळ्यांच्या पायांकडं भिरभिरू लागले. काय काय करावं सुचेना. मंदिरात बसलेला राम आठवला. तो असताना मी का उगा चिंता करत बसले होते? पुन्हा एकवार मी राम मंदिरात जाऊन रामाला साकडं घातलं, रामा बाबा रे, तू हि अनवाणीच आहेस पण तुझ्या पादुका सुरक्षित आहेत रे ….भरतानं सिंहासनावर ठेवल्यात. राज्य करताहेत त्या ….रामाचा हसतमुख चेहरा मला काहीतरी सांगतोय असा मला भास झाला . काय ?माझ्या हि चप्पलांचा असाच कोणीतरी सन्मान केला असेल ? इश्श्य काहीतरीच ! कुणाच्या पायातून गेली असेल माझी चप्पल त्याला सद्बुद्धी दे रे देवा..” मी रामाला साकडं घालून बाहेर आले.

मंदिराबाहेर चपलांचा खच पडला होता. गर्दी कमी होऊ लागली तशी चपलांही कमी होऊ लागल्या. चुकून आपल्या पायातील चप्पल आपलं नव्हे म्हणून कोणी परत येतं का असं वाटून मी थोडीशी रेंगाळले.

फुलवाला हे सर्व काही पाहत होता. नेहमीचा तोंड ओळख असणारा तो हसला आणि मला त्याने एक अफलातून सल्ला दिला.”मावशी,अहो चपला कमी व्हायला लागल्यात. तुम्हाला बसणारा साईज आता उरणार नाही. त्यापेक्षा त्यातलं तुम्हाला बसतंय ते घाला आणि जा घरी नाहीतर अनवाणी जायची पाळी येईल.”त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं.मी अनवाणी कशी जाणार? त्यातलं एक चप्पल देवाच्या साक्षीने मी चोरलं आणि घर गाठलं.

घर गाठताच त्या चप्पलचं ‘मंदिराचं चप्पल’असं नामकरण झालं.ते चप्पल घालून मी नियमित मंदिरात जाते. जी कोणी माझं चप्पल घालून गेली आहे ती माझं चप्पल ठेवून स्वतः चप्पल घेऊन जाईल.या आशेवर आहे मी अजून ….अजूनही मला वाटतं रामाच्या कृपेनं माझ्या पादुका मला मिळतील पुनःश्च राम राज्य येईल….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इतिहास…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ इतिहास…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

 

अलवार पावलाना

हळुवार टाकताना

झाला इतिहास नाही

अजुनी इथे शहाणा

 

आणून आव उसना

बडवून घेत छाती

लाऊन धार घेती

हाती जुनीच पाती

 

येथे सुधारणाच्या

फैरी झडून गेल्या

नाही आवाज कोठे

फुसकेच बार झाल्या

 

केल्या नव्या तरीही

बदलून सर्व नोटा

सवयी नुसार त्यानी

धरल्या जून्याच वाटा

 

वासे नव्या घराचे

फिरले कसे कळेना

सत्तांध भींत आडवी

सांधा कुठे जुळेना

 

अंधार जाळताना

जळतात फक्त बोटे

दिसतात काजवे पण

ते ही तसेच खोटे

 

आता भलेपणाची

उठलीत सर्व गावे

संस्कार वसवण्याला

कसुनी तयार व्हावे

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 78 – जुगार हाटला ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 78 – जुगार हाटला ☆

गंध मातीचा दाटला

स्वप्ना अंकूर फुटला।

खेळ दैवाचा जाणण्या

पुन्हा  जुगार हाटला।

 

पाणी रक्ताचं पाजून

रान खुशीत डोललं।

मशागती पाई आज

पैसं व्याजानं काढलं।

 

दगा दिला नशिबान

ओढ दिली पावसानं।

सारं आभाळ फाटलं

शेत बुडालं व्याजानं।

 

धास्तावली पिल्लं सारी

दोन पिकलेली पानं।

पाठीराखी बोले धनी

मोडा सार सोन नाण।

 

सावकारी चक्रात या

कसं धिरानं वागावं।

फाटलेल्या आभाळाला

किती ठीगळं लावावं।

 

कसं सांगाव साजणी

सारी सरली ग आस।

वाटे करावा का धीर

गळा लावण्याचा फास।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ भासमय ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भासमय ☆ सौ राधिका भांडारकर ☆

वाळवंटी हरीण

तहानलेलं धावतं

भासतो जलाशय

परी ना कधी पोहचतं…..

 

तद्वत धाव धावतो

टाकीत धापा जीवनी

नसुन जे भासते

वेध त्याचा मनोमनी……

 

मनी  नसे संतुष्ट

असुनही वाटे नसे

आटापीटा  किती

धाव आभासी असे…..

 

आपुले आपल्यापाशी

परी नजर पल्याडी

उन पाण्याचाच खेळ

वाट खोटी वाकडी….,…

 

जाती घरंगळुनि

कण वाळुचे ते

मृगजळामागे धावलो

नंतर जाणवते….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 94 – आली दिवाळी…… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 94 – विजय साहित्य ?

☆ आली दिवाळी…… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

घरोघरी दरवळे

फराळाचा  मिश्र वास

कडू गोड आठवांची

शोभे दिवाळी  आरास.  १

 

येता दिवाळी दारात

ज्योत स्नेहाची जागवू.

स्वार्थ सारा मनातला

वातीसम जीवे जाळू.  २

 

मनी तोरण मानाचे

दान विचारांचे देऊ.

वासनेच्या  असुराला

नरकाची वाट दावू.  ३

 

मनातल्या  आनंदाचे

रंग रांगोळीत घेऊ

आदराची मांदियाळी

स्वागताला  ओठी ठेवू.  ४

 

दीपज्योती स्नेहमैत्री

काय वर्णू त्याचे मोल

स्नेहमैत्री जागवूया

घ्यावा संदेश अमोल.  ‌५

 

अशी दिवाळी आरास

तन मन प्रक्षाळते

पाडव्याला औक्षणात

नेत्रज्योत तेजाळते.  ६

 

सण भाऊबीज खास

माया ममतेची बोली

ओवाळते भाऊराया

भगिनीची ह्रद्य झोळी. ७

 

आली दिवाळी दिवाळी

स्नेहज्योत तेजाळली

जाळू स्वभावाचे दोष

गळाभेट गंधाळली. ‌ ‌८

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राही… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ राही ….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

किती विश्वासाने

दिलास हाती हात ,

तू विचारलीस मग

हळूच मजला जात .

           का जात घेऊनी

           जन्मास आलो होतो ,

           ह्या जाती मधूनी

           मलाच शोधत होतो .

मी सांगितली तुज

माझी मानव जात ,

तू नकळत माझा

घट्ट केलास हात .

             तू शांत चंद्रमा आणि

             मी धगधगणारा सूर्य ,

             या नव क्रांतीसाठी

             दिलेस मजला धैर्य .

हे धैर्य घेऊनी

दारी आलीस जेव्हा ,

मग मानवतेची

ज्योत तेवली तेव्हा .

            मी कधीच माझी

            जात चोरली नाही,

            तू बिलगून मजला

            बनून गेलीस राही .

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

‘काळजातला बाप ‘कार

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 84 – कॅनव्हास ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #84 ☆ 

☆ कॅनव्हास ☆ 

मी कॅनव्हास वर अनेक सुंदर

चित्र काढतो….

त्या चित्रात. . मला हवे तसे

सारेच रंग भरतो…

लाल,हिरवा,पिवळा, निळा

अगदी . . मोरपंखी नारंगी सुध्दा

तरीही

ती.. चित्र तिला नेहमीच अपूर्ण वाटतात…

मी तिला म्हणतो असं का..?

ती म्हणते…,

तू तुझ्या चित्रांमध्ये..

तुला आवडणारे रंग सोडून,

चित्रांना आवडणारे रंग

भरायला लागलास ना. .

की..,तुझी प्रत्येक चित्रं तुझ्याही

नकळत कँनव्हास वर

श्वास घ्यायला लागतील…

आणि तेव्हा . . .

तुझं कोणतही चित्र

अपूर्ण राहणार नाही…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सायंकाळची शोभा….. ☆ स्व. भास्कर रामचंद्र तांबे

स्व. भास्कर रामचंद्र तांबे

भा. रा. तांबे

? कवितेचा उत्सव ?

☆ सायंकाळची   शोभा …. ☆ स्व. भास्कर रामचंद्र तांबे  ☆ 

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर

ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.

 

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी 

कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी!

 

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे

झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे!

 

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे

रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्याचे.

 

अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती

साळींवर झोपती जणु का पाळण्यात झुलती.

 

झुळकन् सुळकन् इकडून तिकडे किती दुसरी उडती

हिरे, माणके, पांचू फुटुनी पंखचि गरगरती !

 

पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा

कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा.

 

स्व. भास्कर रामचंद्र तांबे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 107 ☆ डोळे ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 107 ?

☆ डोळे ☆

(जुन्या डायरीतून….)

काहूर भावनांचे

      अंतरात दाटलेले

           समजून घे जरा तू

       तुज सांगतील डोळे!

 

ही मूक वेदना

       हृदयास जाळणारी

             अंगार ना विझे हा

          व्यर्थ सांडतील डोळे!

 

गेले कुठून कोठे

    माझे मला कळेना

         गर्दीत माणसांच्या

      मज शोधतील डोळे!

 

सांभाळले प्रीतीला

         होऊन मुक्त राधा

             हे वेड भाळण्याचे

         बघ लावतील डोळे!

 

सर्वस्व वाहिले अन्

          झाले तुझी सख्या रे

                सारे कलंक काळे

          मूक शोषतील डोळे!

 

दृष्टावतील कोणी

         पडतील घाव देही

              अनुरागी तृप्त झाले

          मिटतील शांत डोळे!

© प्रभा सोनवणे

२९ नोव्हेंबर १९९८

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहिली कोजागिरी ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पहिली कोजागिरी ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

आभाळावरी भाळुनी

शुभ्र चांदणे आले

तुझी प्रीत स्मरुनी

मी बावरी झाले

 

चंद्र होता लाल

पुनवेचा तो गोल

नाही नाही म्हणताही

ढळला माझा तोल

 

होते तुझ्या बाहुत

उरी ती धडधड

तन शहारले होते

चांदण्यात लखलख

 

वेडी झाली होती

वर तारका आरास

तुझ्या संग न्हाऊन

मुक्त चंद्र प्रकाश

 

चंद्राची ती लाली

उतरली ती गाली

भान हरपले मी

त्या क्षितिजासाठी

 

सारे आकाश तारे

उजळुनी ते सजले 

तू आणि मी

एकच तेंव्हा झाले

 

आठवण आहे त्या

पुनवेची उरी

नाही विसरली ती

पहिली कोजागिरी

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares