श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ चैत्र पालवी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काल होते शुष्क सारे
आज फुटले हे धुमारे
पालवीचे हात झाले
अन् मला केले इशारे
चैत्र आला,चैत्र आला
सांगती हे रंग सारे
नेत्र झाले तृप्त आणि
शब्द हे अंकुरले
आम्रवृक्षाच्या तळाशी
दाट छायेचा विसावा
पर्णराशीतून अवचित
कोकीळेचा सूर यावा
ही कशी बिलगे सुरंगी
रंग मोहक लेऊनी
मधुरसाच्या पक्वपंक्ती
वृक्ष हाती घेऊनी
जांभळीला घोस लटके
शिरीषातूनी खुलती तुरे
पळस,चाफा,सावरीच्या
वैभवाने मन भरे
चैत्र डोले हा फुलांनी
वृक्ष सारे मोहोरले
पाखरांच्या गोड कंठी
ॠतुपतीला गानसुचले
भावनांचे गुच्छ सारे
शब्दवेलीवर फुलावे
रंग माझ्या अंतरीचे
त्यात मी पसरीत जावे
साल सरले एक आता
सल मनातील संपवावे
स्वप्नवेड्या पाखराने
चैत्रमासी गीत गावे.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈