सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ कवितेचा उत्सव ☆ संक्रमण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आज अचानक दिसला गुलमोहर,
केशरी फुलांचा गुच्छ घेऊनी!
हिरव्या पानातून शिशिर बहर,
चाहूल देई पाने सळसळूनी!
आम्र मोहर हा गंधित करूनी,
इवल्या इवल्या मधुर तुर्यानी!
ऐकू येईल दूर कोठूनी,
कोकिळेची त्या मंजुळ गाणी!
अवचित चाहुली वसंत येईल,
कोवळी तांबूस पाने फुलतील!
सुकल्या, करड्या त्या खोडातील,
हळुच आपुले सृजन दावतील!
शिशिरा ची ही थंडी बोचरी,
खेळू लागली ऊन सावली!
पानगळ ही करडी पिवळी,
झाकून गेली जमीन सावळी!
कधी कसे हे चक्र बदलते,
संक्रमण होई दिवसामाशी !
नवलाने नतमस्तक होते,
अन् गुंग होई मति माझी !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈